“नशा है सब पे मगर,
रंग नशे का है जुदा..!”
गेले काही दिवस, लाॅक डाऊन-३ मधे दारू विकावी की न विकावी, याबद्दल चाललेला सरकारी गोंधळ आणि त्यानंतर ती विकावी असं ठरवल्यानंतर मद्यप्रेमींनी घातलेला गोंधळ हा आपल्या खास भारतीय स्वभावाला साजेसा होता. ह्या प्रकारावरून सोशल मिडीयात उधाणलेले विनोद आणि इलेक्ट्राॅनिक मिडीयाची, ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली’ पद्धतीची ट्रायल पाहून, हसावं की रडावं, हेच समजत नव्हतं.
त्यातही सोशल मिडीयात, स्वत:ला सार्वजनिक सुसंस्कृततेचे आपण स्वयंघोषित किंवा जन्मसिद्ध पाईक आहोत असं समजणाऱ्या आणि म्हणून इतरांना संस्कृती, परंपरा, चांगलं-वाईट शिकवून मार्गावर आणण्याचा आपल्याला(च) अधिकार आहे, अशा पद्धतीने नेहेमी टिचिंग मोडमधे( ह्या ‘टिचिंग’ मोडचं सक्रिय रुपांतर ‘लिंचिंग’ मोडमधेही होतं. दोन्ही शब्दांचे अर्थ भिन्न असले तरी, दोन्हींमधे ‘धडा शिकवणं’ गृहीत धरलेलं असतं.) असणाऱ्या एका वर्गाचा दारू विक्रीवर आणि पिणारांवर प्रचंड राग असल्याचं दिसून आलं. हा वर्ग दारुच कशाला, त्यांना न पटलेल्या, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त इतर आवामला मनापासून पटत असलेल्या प्रत्येक गोष्टीला, समजाला किंवा श्रद्धेला वाईटच ठरवत असतो.
दारू चांगली की वाईट, ती कशी नुकसान करते, त्यांने माणसाचं चारित्र्य कसं बिघडवते, पिणारी माणसं कशी गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात वैगेरे वैगेरे याची जेंव्हा फेसबुरी चर्चा सुरू झाली तेंव्हा मला जरा आश्चर्यच वाटलं..! मुळात दारू-सिगारेट-गुटखा-तंबाखू इत्यादी व्यसनांबाबत आपला सांस्कृतिक गोंधळच जास्त आहे. पुन्हा आपल्याकडे ह्या व्यसनं समजल्या गेलेल्या गोष्टींपेक्षा, ती करणाऱ्या माणसाला वाईट म्हणण्याची खोड जास्त असते. ही माणसं म्हणजे पार वाईट, समाजावर धब्बा असे शिक्के मारून आपण मोकळे होतो. याचा दुसरा अर्थ म्हणजे, अजिबात कोणतंही व्यसन नसलेली माणसं म्हणजे सज्जन किंवा समाजाचं भुषण, असा होतो. इथे मला प्रष्न पडतो की, सुपारीच्या खांडाचंही वसन नसलेल्या एखाद्या निर्व्यसनी, परंतु लांच खाणाऱ्या, आपल्या पद-पैसा-प्रतिष्ठेचा वापर, इतरांचा हक्क मारून केवळ आपण स्वत: आणि आपल्या बगलबच्च्यांचं भलं करु पाहाणाऱ्या, सत्तापदावर बसलेल्या निर्व्यसनी माणसाला काय म्हणावं, हा? हिटलरला बाई-बाटली कशाचंही व्यसन नव्हतं, म्हणून आपल्या भारतीय व्याख्येप्रमाणे तो चांगला, नितीवान माणूस ठरतो आणि दारू-सिगरेट व्यर्ज्य नसलेले पंडीत नेहेरू आपल्या दृष्टीने अनैतिक ठरतात. दारूची व ती सेवन करणारांची सांगड आपल्या भारतीय मानसिकतेने नैतिकतेशी घातलेली असल्याने, मी वर म्हणालो तो निर्माण झालेला सांस्कृतिक गोंधळ तो हाच..!
माणसाला व्यसन लागतं, ते तो त्या करत असलेल्या गोष्टींतील नशेच्या आहारी जातो तेंव्हा. मग ती नशा केवळ दारूचीच कशाला हवी? नशा अनेक चिजांची असू शकते. कुणाला सत्तेची नशा चढलेली असते, तर कुणाला संपतीची..! कुणाला प्रतिष्ठेची, तर कुणाला लोकप्रियतेची, तर आणखी कुणाला कशाची..! महानायक अमिताभ बच्चनच्या ‘शराबी’ ह्या चित्रपटातलं ‘ लोग कहते है, मै शराबी हूमं..’ हे सुप्रसिद्ध गाणं आठवतंय? ह्या गाण्यातील पुढचे बोल,
‘किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा
किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा
किसीको देखे साँसों से उभरता है नशा
बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा’
हेच तर सांगातायत. ह्या बोलांतील हुस्न, मोहोब्बत इत्यादी शब्दांच्या जागी सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, पेहेचान, पहूॅंच आदी कोणतीही न पिता नशा चढू शकणारी गोष्ट ठेवून पाहा. अर्थ तोच, जो अट्टल दारूबाजांकडून आपण गृहीत धरत असतो..!!
ह्याच गाण्यात बच्चनजी विचारणा करतायत की,
“नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा
किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा.”
आहे ना आपल्याला नेत्यांपासून भक्तांपर्यंत एकदम फिट्ट बसणारी गोष्ट. “नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा..!” अशी आपली परिस्थिती. आज आपल्यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या नशेत झिंगत असताना, दारू मात्र फुकटची बदनाम केली जातेय..!
अती प्रमाणात केली जाणारी कोणतीही गोष्ट, मग ती दारूच कशाला हवी, दारूबरोबर म्हटली जाणारी दुवा आणि दवाही वाईटच. गेल्या काही वर्षांत आपण आपल्या देशांत अमर्याद सत्तेच्या नशेतून घेतले गेलेले काही नशेबाज निर्णय आणि त्यातून सर्वसामान्यांना झालेला मनस्ताप आपण अनुभवतोय. दारच्या नशेच्या व्यसनात वाताहात होत असेल(च) तर, निदान ती पिणाराची व तो पियक्कड ज्या कुटुंबाचा सदस्य असतो, तेवढ्यापुरतीच ती मर्यादीत असते. पण सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, लोकप्रियता, भक्ती अन्आता तर राष्ट्रवाद, धर्म आणि (आपापल्या)जातीभिमानाच्या नशा-व्यसनात अख्खा देश दोशोधडीला लागतो, हे सिद्धसत्य मात्र आपण सोयिस्कररित्या विसरतो..! ह्या नशा दारूपेक्षा कितीतरी पटीने विनाशक असतात.
मी दारूचं किंवा तत्सम कोणत्याही गोष्टींचं समर्थन करत नाहीय किंवा दारूबंदीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लोकांचा मला अवमानही करायचा नाही, तर नशा डोक्यात भिनवणारी कोणतीही गोष्टी वाईटच, हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व काही तारतम्याने केलं, तर त्यात वाईट असं काहीच नसतं, असं मी समजतो. पण आपण फक्त दारुची(च) सांगड नैतिकतेशी घालून गोंधळ घालून ठेवला आहे. नैतिकतेचा संबंध विचारांशी, प्रामाण्कतेशी, अंतर्बाह्य शुचितेशी असायला हवा, केवळ दारूशी नाही.
मित्रो(😊), नशा डोक्यात असते, “नशा शराब मे होती तो, नाचती बोतल..’ हे लक्षात ठेवा. स्वत:च्या आणि इतरांच्याही डोक्यात जाणारी दारुचीच कशाला, तर कोणतीही नशा वाईटच..!
सबब, दारूला दोष देताना, “नशा है हम सब पे मगर, रंग नशे का है जुदा..!” हे लक्षात ठेवलेलं बरं..!!
-©️नितीन साळुंखे
9321811091
07.05.2020
सद्य स्तिथीतील चालु घडामोडीवर काहीं लिहू शकता येते ही गोष्ट त्यातील विचारातून स्पष्ट होते. लेखाच्या मांडणीतून वाचकाला काय अभिप्रेत असावे अथवा अर्थबोध व्हावा हे उकलत नाही. मात्र विषया वरून एक वायरल झालेलं पोस्ट ची आठवण झाली ती अशी की एरवी आशा लत लागलेल्या दुर्लक्षित लोकांचा देशातील सर्व राज्यांना आर्थिक गाडी रूळावर आणण्या साठी महसूल गोळा करण्यासाठी व्यसन मुक्ती धोरण धाब्यावर ठेऊन राज्यातील सर्व दारू दुकानांना उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली…………70 टक्के अधिकअधिभारासहित……..
LikeLike
Apratim thoughts and information
LikeLike