राणी व्हिक्टोरीया’चा फोर्ट येथील पुतळा आणि देवीचा कोप. –

मुंबईतील इतिहासाच्या पांऊल खुणांचा मागोवा लेखमाला..

राणी व्हिक्टोरीया’चा फोर्ट येथील पुतळा आणि देवीचा कोप. –

राणी व्हिक्टोरीया‘चा फोर्ट येथील पुतळा-

फोर्टमधल्या ‘काळा घोडा’ चौकातून आपण महात्मा गांधी मार्गावरून (एम. जी. रोड- ब्रिटिश काळातलं नांव ‘एस्प्लनेड रोड) ) चालत व्ही.टी. स्टेशनच्या (आताचं ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’) दिशेने निघालो, की काही मिनिटातच आपण हुतात्मा चौकात पोहोचतो. हुतात्मा चौकात चर्चगेट स्टेशनच्या दिशेने तोंड करून उभं राहिलं, की अगदी समोरच, रस्त्याच्यापलीकडे, आपल्याला ‘सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस’ची (CTO ) ब्रिटिश काळातील बांधणी असलेली इमारत दिसते.१८७० साली मुंबईचं मध्यवर्ती पोस्ट ऑफिस-जीपीओ – प्रथम या इमारतीत सुरू झालं, ते १९०९-१० पर्यंत ह्याच इमारतीत होतं.कालांतराने १९०९-१० सालात जेंव्हा सीएसएमटी स्टेशनच्या शेजारच्या सध्याच्या भव्य इमारतीत हलवण्यात आलं). सध्या ‘तारायंत्र’ बंद झालं असलं तरी, इमारतीचं ‘सीटीओ’ नांव अद्याप कायम आहे. या सीटीओ इमारतीच्या मागे ‘एमटीएनएल’चीइमारत व तिच्या मागे असलेली ‘टाटा टेलीकम्युनिकेशन्स’ची बहुमजली इमारत व त्यावरचा उंचं टॉवर आपल्याला दिसू लागतो. ‘टाटा टेलीकम्युनिकेशन्स’ म्हणजेच पूर्वाश्रमीचं ‘व्हि. एस. एन. एल.’चं, अर्थात ‘विदेश संचार निगम लिमिटेड’चं ऑफीस..

सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस (CTO )                             

           

          ‘टाटा टेलीकम्युनिकेशन्स’ची बहुमजली इमारत

हे टाटा टेलिकम्युनिकेशन्सच ऑफीस आज ज्या जागी उभं  आहे, बरोबर त्याच जागी इंग्लंडची (आणि १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वीच्या ब्रिटिश इंडियाचीही) तत्त्कालीन महाराणी ‘हर हायनेस व्हिक्टोरीया’चा शुभ्र संगमरवरात घडवलेला, सिंहासनाधिष्ठीत आणि उंच संगमरवरी मखरात बसवलेला पुतळा होता. राणी व्हिक्टोरिया इंग्लंडच्या पार्लमेन्टमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये संपूर्ण दरबारी वेशात, सर्व राजचिन्ह परिधान करून बसलेली राणी ह्या शिल्पात दाखवलेली होती. शुभ्र राजसी गाऊन परिधान केलेल्या राणीच्या माथ्यावर रत्नजडित मुगुट, उजव्या हातात राजदंड, तर डाव्या हातात ग्लोब, म्हणजे पृथ्वीचा गोल होता. पृथ्वीचा हा गोल म्हणजे ब्रिटिशांच्या त्या काळातल्या पृथ्वीव्यापी साम्राज्याचं प्रतीक होतं. राणीच्या बसण्यातला रुबाब आणि आत्मविश्वास, ह्या ८ फूट ६ इंचाच्या पुतळ्यात, शिल्पकार मॅथ्यू नोबल (Matthew Noble) याने पुरेपूर उतरवला होता. जणू काही राणी साक्षात समोर बसलीय आणि आता उठून उभी राहील असा भास निर्माण करणारी तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ करता येतील असं वाटायला लावणाऱ्या, तिने परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या, केवळ लाजबाब.. !

‘हर हायनेस व्हिक्टोरीया’चा शुभ्र संगमरवरात घडवलेला, सिंहासनाधिष्ठीत आणि उंच संगमरवरी मखरात बसवलेला पुतळा आणि मखर

राणी ज्या सिंहासनावर आरूढ झाली होती,ते सिंहासन(Throne) जमिनीपासून आठ फुट वर असलेल्या शोभिवंत चौथऱ्यावर होतं. जेणेकरून जमिनीवरून पाहणाऱ्याच डोकं आपोआप तिच्या पायापाशी यावं. राणीचं हे देखणं शिल्प, चौथऱ्यापासून वरती सुमारे ४५ फूट उंच, सुरेख, नाजूक जाळीदार मखरात (कॅनोपी ) बसवलं होतं. ह्या मखरावरदेखील राजचिन्ह कोरलेली होती. मखराच्या मध्यभागी इंग्लंडचं राजचिन्ह (रॉयल आर्म्स) असून, त्याला लागूनच वरच्या बाजूला ‘स्टार ऑफ इंडीया’ कोरलेला होता. ब्रिटनचं प्रतीक म्हणून गुलाबपुष्प, तर भारताचं प्रतीक कमळ कोरलेलं होत. मखराच्या मागच्या चार बाजूंवर इंग्रजी आणि तीन भारतीय भासहनमध्ये पुतळ्याची माहिती देणारा मजकूर कोरण्यात आला होता. पायाकडे अष्टकोनी असलेला हा भव्य, तरीही नाजूक मखर वर निमुळता होत गेलेला होता. जणू देव्हाऱ्यात बसलेली कुणी देवताच असावी असा भास तो पुतळा पाहताना होत असे.

सुमारे ८४७ चौरस मीटरच्या भूखंडावर बसवलेल्या राणीच्या पुतळ्याच्या चहुबाजूने घडीव लोखंडाचं नक्षीदार कुंपण होतं, जेणेकरून त्या पुतळ्याकडे पाहाताना एक सुरक्षित अंतर आपोआप राखलं जावं…! राणीचा पुतळा घडवण्यासाठी इटलीच्या करारा मार्बलचा वापर करण्यात आला होता, तर मखर कोरलं होतं इटालीच्याच सिसिलिअन मार्बल मधून. दोन्ही मार्बलच्या अंगभूत रंगछटांचा पुतळा आणि मखर घडवण्यात कलात्मक उपयोग करण्यात आला होता. पुतळा घडवण्यासाठी आलेला सर्व खर्च, रुपये ८० हजार मात्र बडोद्याचे त्यावेळचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी केला होता (काही ठिकाणी ह्या पुतळ्यास आलेला खर्च १,८२,४४३ इतका सून, त्यातील रुपये १,६५,०००/- गायकवाड सरकारांनी दिला होता असं उल्लेख आढळतो). 

The Illustrated London News’ या साप्ताहिकात दिनांक ८ जून १८७२ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी

मुळात हा पुतळा घडवला गेला होता तो, भायखळ्याच्या राणीच्या बागेत बसवण्यासाठी, परंतु त्या पुतळ्याचं देखणं रुपडं पाहून बडोद्याचे महाराज तो पुतळा फोर्टमध्ये बसावा असं म्हणू लागले.  त्याला कारणही तसच घडलं होत. ज्या १८६२ सालात म्युझियमची कोनशिला बसवण्यात आली, त्याच सालात अमेरिकन नागरी युद्धामुळे मुंबईतून निर्यात होणाऱ्या कापसाला प्रचंड मागणी आली होती आणि परिणामी मुंबईचा व्यापार उदीम बहराला आला होता. मुंबई शहर आता किल्ल्यात मावेनासं झालं होतं आणि म्हणून मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर बार्टल फ्रिअर यांनी किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा निर्णय घेऊन त्यादिशेने कामाला सुरुवातही केली होती. मोकळ्या झालेल्या जागेवर ब्रिटिश साम्राज्याची छाप असणाऱ्या एकापेक्षा एक देखण्या इमारती उभ्या राहू लागल्या होत्या. ही नवीन मुंबई, त्यावेळच्या भाषेत सांगायचं तर, फ्रिजर टाऊन, नेमकेपणाने आकार घेऊ लागली होती. सन १८६९-७० मध्ये काळा घोडा चौकातली डेव्हिड ससून लायब्ररीची इमारत उभी राहिली आणि त्याच सालात, बरोबर उलट दिशेच्या टोकावर क्रॉफर्ड मार्केटची इमारत तयार झाली. हुतात्मा चौकातली सीटीओची इमारत १८७० साली सेवेत आली, पुढच्याच वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची वास्तू  डोकं उंच काढून वर आली. ब्रिटिश शासन-प्रशासनिक, शैक्षणिक आणि आर्थिक-व्यापारी केंद्र असलेल्या फोर्ट विभागात, ब्रिटिश साम्राज्याच्या ताकदीचं प्रतीक असणाऱ्या ह्या दगडी आणि तरीही देखण्या इमारतींच्या मालकेच्या हृदयस्थानी, ब्रिटिश साम्राज्याची सम्राज्ञी असलेल्या व्हिक्टोरिया राणीच्या हा भव्य आणि देखण्या पुतळ्याचं अस्तित्व असावं, असा खंडेरावांच्या मनातला विचार इतरही सर्वाना पटला असावा असणं अगदी शक्य आहे आणि म्हणून  ह्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी सीटीओच्या इमारतीच्या पश्चिमेकडून मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग (पूर्वीचा मेयो रोड) आणि सीटीओ इमारतीच्या पूर्वेकडून मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणारा आताचा महात्मा गांधी मार्ग  -एम.जी. रॉड – (पूर्वीचा एस्प्लनेड रोड ) यांच्या उत्तरेकडच्या जंक्शनवरचा, आताच्या दामोदर चापेकर चौकातला मोक्याचा भूखंड मुक्रर करण्यात आला आणि इथे राणीच्या पुतळ्याची स्थापन केली गेली. भारतात स्थापन केले गेलेल्या राणीच्या एकूण पुतळ्यांपैकी, सर्वात प्रथम स्थापन केला गेलेला हा पहिलाच पुतळा, हे ही ह्या पुतळ्याचं वैशिष्ट्य..!

मखरासकटच्या राणीच्या ह्या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ- जुन्या मराठीत सांगायचं तर ‘पुतळा उघडण्याचा कार्यक्रम’ सन १८७२ सालात, नेमकं सांगायचं तर सोमवार दिनांक २९ एप्रिल १८७२ रोजी, ब्रिटीश इंडियाचे त्यावेळचे व्हाईसराय थॉमस जॉर्ज बॅरींग (Thomas George Baring), म्हणजेच लॉर्ड नॉर्थब्रूक यांच्या हस्ते झालं होतं आणि केवळ ह्या समारंभासाठी लॉर्ड नॉर्थब्रूक कलकत्त्याहून मुंबईत आले होते. ह्या निमित्ताने लॉर्ड नॉर्थब्रूक ह्यांनी मुंबईत दरबारही भरवला होता. नॊर्थब्रूक यांच्या गौरवार्थ त्यावेळेस मुंबईत ग्रॅन्ट रोड परिसरात मुंबईकर नागरिकांच्या वतीने एक बाग उभारण्यात आली होती आणि तिला ‘नॉर्थब्रूक गार्डन्स’ असं नांव देण्यात आलं होत. 

राणीच्या पुतळ्यासाठी निवडलेली ही जागा सर्वथैव उचित होती, असं म्हणावं लागतं. ज्या ‘व्हिक्टोरिया गार्डन अँड अल्बर्ट म्युझियम च्या प्रांगणात (अथवा इमारतीत) हा पुतळा बसवण्याचे सुरुवातीस ठरले होअते, ती जागा भायखळ्याला, म्हणजे मुख्य शहरापासून दूर उत्तरेला होती. भायखळा विभाग त्या काळात फोर्टच्या तुलनेत मागास होतं आणि बहुतकरून निवासी विभाग होता. मुंबईच्या गव्हर्नरांची निवासस्थानाची जागा बदलून ती प्रथम परेलच्या आणि नंतर मलबारहिलच्या राजनिवासात गेली असली तरी, राज्यकारभार फोर्ट विभागातूनच हाकला जात असल्याने, गव्हर्नरला मानिमित्त रोज फोर्टला यावंच लागत असे.  पुन्हा सर्व व्यापार, प्रशासन, शिक्षण आणि न्यायव्यवस्थेचं मुख्य ठाणं फोट विभागातचं होतं. सैन्याचीही उपस्थिती होती. अश्या मध्यवर्ती ठिकाणी राणीचं अस्तित्व किंवा ‘नजर’ असणं त्यावेळच्या लोकांना आवश्यक वाटलं असावं. आणि तसा विचार करूनच राणीच्या पुतळ्याची जागा बदलून ती मेयो रोड आणि एस्प्लनेड रोड च्या चौकात बसवला गेला होता, ते योग्यच होतं.  

.. आणि राणीचा कोप..

फोर्ट मध्ये हा पुतळा बसवला गेला आणि त्या काळाच्या मुंबईकरांना मनोरंजनाचं एक स्थळ मिळालं.देखताक्षणीच चित्त मोहून टाकेल असा हा पुतळा, त्याकाळी लोकांच्या प्रचंड आकर्षणाचा भाग बनला होता. त्या आकर्षणाचं रूपांतर काही काळाने कुतूहलात झालं. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, ह्या पुतळ्याचे निरीक्षण करताना उभे असलेले अनेक लोक त्याकाळात दिसून येत, असं त्याकाळात मुंबई भेटीवर आलेल्या काही इंग्लिश पर्यटकांनी नोंदवून ठेवलं आहे. आज जेसीबी मशीन रास्ता खणायचं काम करताना कसे आजूबाजूला अनेक लोक ती करामत पाहत उभे असतात, तसेच. आजच्या काळात जेसीबी मशीनच्या अचाट ताकदीचं आकर्षण असत, तर तेंव्हा राणीच्या अचाट ताकदीचं असावं कदाचित. राणीच्या पुतळ्याचं लोकांमधलं कुतूहल हळू हळू भक्तीमध्ये परावर्तित होत गेलं आणि भव्य शोभिवंत मखरात बसलेली, तितकीच देखणी राणी, लोकांना हळूहळू देवीस्वरूप भासू लागली. दगडाला जरासा आकार दिसला, की त्याला देव समजून पुजायची आपली सनातन आणि वर्तमानातलीही मनोवृत्ती, तिथे संगमरवराच्या अख्ख्या शिळेतून कोरलेली तो शुभ्रवस्त्रावृता, रत्नखचित मुकुटधारी राणी त्यांना देवी भासली असल्यास त्यात काही नवलाची गोष्ट नाही. त्यातून ती अर्ध्या जगावर राज्य करणारी सम्राज्ञी आणि सम्राट-साम्राज्ञीला देव-देवी मानण्याची प्रथा बरेच ठिकाणी होती. अजूनही आहे. आपल्याकडे काकणभर जास्तच आहे. मग शंभर दीडशे वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो. जे आता होतं, तेच तेंव्हाही झालं. काही अधिकच देवभोळ्या लोकांनी ह्या ‘राणी ‘देवीची पूजा करण्यास सुरुवात केली. क्वचित प्रसंगी नवस बोलण्यास सुरुवात केली आणि मुंबईकरांना आणखी एक देवस्थान मिळालं.

 ह्या ‘राणी’देवीच्या भक्तीचा कळस झाला, तो १८९७-९८ सालात. हे वर्ष राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्ष झाली म्हणून, आपल्या देशभरात साजरं होणारं हिरक महोत्सवी वर्ष होत. सरकारी इमारतींवर रोषणाई केली गेलेली होती, राणीचा पुतळाही सजविण्यात आला होता. आणि नेमक्या ह्याच काळात, सन १८९६च्या शेवटाला मुंबईत प्लेगच्या साथीने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. किड्या-मुंनग्यांप्रमाणे माणसं मरू लागली होती. कुटुंबाच्या कुटुंब गारद होऊ लागली होती. घरातला एक माणूस मेला तर, त्याला सोनापुरात पोहोचवून येईपर्यंत दुसरं प्रेत तयार असायचं, अशी सारी भयानक परिस्थिती होती. हे नेमकं कशामुळे होतंय, हा कोणता रोग आहे ह्याची कुणालाच काही कल्पना येत नव्हती. अशातच नवीन वर्ष उजाडलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतील एक दिवस उजाडला, ती मुंबईत आणखी एक अभद्र बातमी घेऊनच. रात्रीच्या अंधारात राणीच्या चेहऱ्यावर कोणीतरी काळ फासून आणि तिच्या गालात तुटलेल्या चपलांचा हार घालून, कुणीतरी राणीच्या पुतळ्याची विटंबना केल्याचं लक्षात आलं आणि एकाच हलकल्लोळ उडाला. राणीच्या राज्याभिषेकाचा हिरक महोत्सव साजरा होत असताना घडलेलं हे आक्रित, सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि पोलिसांनी तातडीने सूत्र हाती घेऊन तपासाला सुरुवात केली. तत्पूर्वी राणीच्या पुतळ्याच्या चारी बाजुंनी ५०-६० फूट ऊंचं आच्छादनं लावून पुतळा झाकून टाकला. 

सरकारी यंत्रणेने राणीच्या पुतळ्याची विटंबना वेगळ्या अर्थाने गांभीर्याने घेतली आणि मुंबईकरांनी वेगळ्या अर्थाने. राणीच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याच दरम्यान मुंबईत पसरलेली प्लेगच्या महामारीची साथ ह्या दोन्ही घटनांचा काहीतरी संबंध आहे आणि प्लेगची साथ ही राणी’देवीच्या’ विटंबनेचा कोप आहे, असा अर्थ त्या वेळच्या मुंबईकरांनी घेतला आणि ती व्यक्ती लवकर सापडावी म्हणून आपले मुंबईकर देव पाण्यात ठेऊन बसले. इकडे वर्ष उलटत आलं तरी पोलिसांना दोषी व्यक्ती सापडत नव्हती. कसून शोध सुरू होता. पोलिसांचा पहिला संशय, हे कृत्य एखाद्या माथेफिरू युरोनियन माणसाचं असावं, असा होता. नंतर संशयाची ती सुई स्थानिकांकडेही फिरू लागली. तिकडे महामारी आटोक्यात येण्याची काही चिन्ह नव्हती. रोगाचा अंदाज येत नव्हता .

अखेर ऑक्टोबर १८९७मध्ये रँड आणि आयर्स्टच्या पुण्याला केलेल्या खुनाच्या आरोपाखाली चापेकर बांधून इन्स्पेक्टर हॅरी ब्रुईन ह्या बाँबे सिटी पोलिस-गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांनी अटक केली आणि चापेकर बंधूनी रँडच्या खुनाबरोबरच मुंबईतल्या राणीच्या पुतळ्याची विटंबना केल्याचंही कबूल केलं आणि राणीच्या पुतळ्याच्या विटंबना कोणी केली त्याचं कोडं सुटलं. ह्या इन्स्पेक्टर हॅरी ब्रुईन ह्यांना स्थानिक पोलीस ‘हरी’साहेब म्हणत असत. हरीसाहेबांवर ब्रिटिश प्रशासनाने सदरच्या प्रकरणात लोकमान्य टिळकांना गुंतवावे आणि अटक करावे असा दबाव टाकला होता, मात्र इन्स्पेक्टर हॅरी ब्रुईन त्याला बाली पडले नाहीत. लोकमान्य टिळकांचा कोणताही संबंध या गुन्ह्याशी नसल्याचे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. नेमकं त्याच दरम्यान मुंबईत पसरलेली महामारी प्लेगमुळे आहे, ह्याच शोध लागला आणि त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. आता देवीचा कोप संपेल आणि महामारी आटोक्यात येईल अशी अशा मुंबईकरांच्या मनात बळावली.  

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्ती सापडल्या तरी, राणीच्या चेहेऱ्यावरचं विटंबनेचं काळ काही पुसलं जात नव्हतं. तो डांबर सदृश्य काळा पदार्थ काढण्याचा प्रयत्न सुरु होता. रसायन शास्त्रात पारंगत असलेल्या मुंबईतल्या आणि मुंबईबाहेरच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होत, पण त्यांच्याही प्रयत्नांना यश येत नव्हतं. अखेर १८९८ साल सरता सरता, मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये रसायन शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या प्रोफेसर त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर ह्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी सुचवलेले उपाय केल्यावर मार्गाने राणीच्या पुतळ्याचा चेहेरा पूर्ववत झाला.

प्रोफेसर गज्जर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राणीच्या पुतळ्याची डागडुजी करून पुतळा पूर्ववत करण्यात आला आणि १८९९ च्या सुरुवातीला, पुतळ्याभोवती लावलेलं आच्छादन काढून टाकण्यात आलं, राणी’देवी’ पुन्हा लोकांना ‘दर्शन’ देण्यासाठी अवतरली..! ज्या दिवशी मुंबईकरांच्या राणी’देवी’चा हा पुतळा पुन्हा जनतेसमोर आला, त्या दिवशी त्याच्या दर्शनाला संपूर्ण मुंबई शहरातून आणि उपनगरातून (त्यावेळच्या साष्टी बेटातून) लोक आले होते, अशी त्यानंतरच्या पेपरांमध्ये प्रसिद्ध झाली. होती. 

पुतळ्यासंबंधी आनुषंगिक माहिती-

वर आपण पाहिलं की, राणीचा हा पुतळा तयार केला होता, तो ‘व्हिक्टोरिया गार्डन अँड म्युझिअम’ मध्ये बसवण्यासाठी. राणीच्या राज्यारोहणास २५ वर्ष झाल्यानिमित्त १९ नोव्हेंबर १८६२ रोजी व्हिक्टोरिया गार्डन अँड म्युझिअमची कोनशिला, त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर बार्टल फ्रिअर यांच्या हस्ते बसवण्यात आली. परंतु त्या अगोदर एक वर्ष राणीचे यजमान प्रिन्स अल्बर्ट यांचे निधन झाल्याने, म्युझियमचे नांव किंचित बदलून ते, ‘व्हिक्टोरिया गार्डन अँड अल्बर्ट म्युझियम’ असे करण्यात आले. शिवाय ह्या म्युझियमच्या इमारतीत, राणीच्या यजमानांचा, म्हणजे प्रिन्स अल्बर्ट यांचा, राणीचा पुतळा ज्या मॅथ्यू नोबल या शिल्पकाराने घडवला, त्याच शिल्पकाराने घडवलेला पुतळा बसवण्यात आला. ह्या पुतळ्याच्या चौथऱ्याचा खर्च मुंबईतले त्याकाळातले धनाढ्य व्यापारी डेव्हिड ससून यांनी केलेला असून, पुतळ्याचा खर्च डेव्हिड ससून यांच्या १८६४ मध्ये झालेल्या मृत्यू पश्चात, त्यांचे चिरंजीव अल्बर्ट ससून ह्यांनी केला आहे.

राणीच्या यजमानांचा, म्हणजे प्रिन्स अल्बर्ट यांचा’ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालताला पुतळा

कोनशिला बसवण्याचा समारंभ झाल्यानंतरच्या दहा वर्षांनी, म्हणजे २ मे १८७२ रोजी म्युझिअम आणि बागेचे लोकार्पण करण्यात आले. ‘व्हिक्टोरिया गार्डन’ ह्या नावाचं  पुढे मराठीत शब्दश: भाषांतर होऊन ते ‘राणीचा बाग’ झालं तर, अलबर्ट म्युझिअमचं नामांतर १ नोव्हेंबर १९७५ रोजी ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ असं करण्यात आलं.

सन १८७२ मध्ये राणीचा पुतळा मेयो रोड आणि एस्प्लनेड रोडवरच्या जंक्शनवर बसवला गेल्यानंतरच्या तीनच वर्षांनी राणीचा मुलगा सातव्या एडवर्ड्सने भारताला भेट दिली होती. त्याच्या भेटीच्या स्मरणार्थ, सन १८७९ मध्ये त्याचे अश्वारूढ शिल्प, राणीच्या पुतळ्यापासून दक्षिणेला काहीच अंतरावर असलेल्या आजच्या जहांगीर आर्ट गॅलरीसमोरच्या चौकात स्थानापन्न केला होता. ब्रॉन्झ मध्ये घडवलेला हा पुतळा, प्रसिद्ध व्यापारी सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या मुंबईतील श्रीमंत व परोपकारी ज्यू व्यापाऱ्यांने त्या वेळच्या मुंबई शहराला आणि शहरवासियांना भेट दिला होता आणि २९ जुने १८७९ रोजी हा पुतळा उघडण्याचा कार्यक्रम त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल ह्यांच्या हस्ते झाला होता.

घोड्यावर सवार सातवा किंग एडवर्ड संपूर्ण लष्करी, फिल्ड मार्शलच्या, रुबाबदार गणवेशात असून, राजा व तो ज्या घोड्यावर आरूढ झालेला आहे, त्याच्या पापांपासून ते राजाच्या डोक्यावरच्या केसांपर्यतचे ब्रॉन्झमध्ये घडवलेले सर्व बारकावे मुद्दाम बघण्यासारखे आहेत. काळपट रंगाच्या जवळपास जाणाऱ्या ह्या अत्यंत प्रमाणबद्ध असलेल्या या संपूर्ण शिल्पात घोड्याचं सौष्ठव इतक्या अचूकपणे पकडलय की, तो अगदी जिवंत असून कधीही चालायला लागेल असा क्षणभर भास होतो असे. 

                             घोड्यावर सवार सातवा किंग एडवर्ड; ‘काळा घोडा’

सातव्या एडवर्डसच्या ह्या शिल्पामुळे, राणीचं कुटुंबच मुळी मुंबईत अवतरलं होत. दूर उत्तरेच्या राणीच्या बागेत, राणीचे यजमान प्रिन्स अल्बर्ट उभे आहेत, फोर्टमध्ये मोक्याच्या ठिकाणी राणी संपूर्ण दरबारी वेशात सिंहासनावर  आरूढ आहे, तर दक्षिणेला राणीचे चिरंजीव सातवे एडवर्ड घोड्याला टाच मारण्याच्या स्थितीत आहेत, असं काहीस ते दृश्य होत. राणीचा पुतळा जसा त्यावेळच्या लोकांच्या कुतूहलाचा विषय होता,, तसाच सातव्या एडवर्ड्सचा पुतळाही लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला होता. पण सातव्या एडवर्डसच्या पुतळ्याबद्दलचं कुतूहल थोडं वेगळ्या स्वरूपाचं होतं. राणीचा पुतळा शुभ्र संगमरवरात घडवलेला होता, तर तिच्या मुलाचं, सातव्या एड्वर्डसचं शिल्प काळपट ब्रॉन्झमध्ये. इथेच लोकांचं कुतूहल चाळवलं आणि चर्चा सुरु झाली, राणी गोरी आणि  तिचा मुलगा काळा कसा, ह्याची. काळ्या रंगाला हिणवायची आपली (आणि जागाचीही ) प्राचीन प्रथा आहे. इथे प्रश्न राजाचा होता आणि त्याला काळा कसं म्हणायचं, म्हणून कदाचित त्याच्या घोड्याला काळा म्हणायला सुरुवात झाली असावी आणि ते नांव त्याला चिटकलं असावं, ते आजतागायत. आता घोड्यावर बसलेला सातवा एड्वर्डस तिथे नाही, पण ते शिल्प पुढे ‘काळा घोडा’ म्हणून मुंबईच्या इतिहासात अजरामर झालं,  

राणीच्या पुतळ्याची सद्यस्थिती

स्वातंत्र्यानंतरच्या काळात मुंबईत असलेल्या ब्रिटिश राजघराण्यातीळ व्यक्तींचे आणि ब्रिटिश प्रशासकांची पुतळे मुंबईतलय त्यांच्या जागेवरून हलवावेत अशी मागणी जोर धरू लागली होती. शेवटी १२ ऑगस्ट १९६५ ह्या दिवशी महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया राणीचा (आणि मुंबईत असलेल्या इतरही ब्रिटिश शासक-प्रशासकांचे) पुतळे हलवण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात आली. राणीच्या पुतळ्याची मोकळी झालेली जागा प्रथम मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात अली आणि त्यानंतर ती जागा १९६८ सलत केंद्रसरकारच्या दूरसंचार खात्याकडे देण्यात आली. त्यानंतर काही काळाने त्याजागी केंद्र सरकारच्या ‘विदेश संचार निगम लिमिटेड (VSNL)’ ची  गगनचुंबी इमारत उभी राहिली, जी खाजगीकरणाच्या लाटेत नंतर ‘टाटा टेलिकम्युनिकेशन’ TATA Tele. )ने विकत घेतली. 

राणीच्या पुतळ्याची (आणि त्यावेळी मूळ जागेवरून काढलेल्या इतरही ब्रिटिश पुतळ्यांची) रवानगी भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात करण्यात अली. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या ‘इस्ट लॉन’वर, झाडांच्याखाली, अगदी उघड्यावर ब्रिटीशांचे सात-आठ पुतळे हारीने मांडून ठेवलेयत, त्यात मध्यभागी राणीचा हा पुतळा आहे. हे सर्व पुतळे कुणालाही पाहता येतात. गेली अनेक वर्ष उन-वारा-पाऊस व पक्ष्यांची विष्ठा झेलून एकेकाळच्या ह्या महाराणीच्या पुतळ्याची साफ विटंबना झालेली आहे. मन तुटल्याची गळयावर खूण आहे. चं नाक साफ झडलं असून, हातातला राजदंड तुटलाआहे..पुरेश्या काळजी अभावी मुळच्या पांढऱ्याशुभ्र असलेल्या या देखण्या शिल्पावर काळपट पुटं चढलीत. मूळच्या अत्यंत देखण्या आणि शिल्प सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या ह्या शिल्पाचं सौंदर्य, सध्याच्या त्याच्या दयनीय अवस्थेतही  जराही उणं झालेलं नाही..

राणीचा पुतळा मुळात घडवला होता, तो ह्याच राणीच्या बागेत बसवण्यासाठी. तो अश्या पद्धतीने पुन्हा इथे स्थानापन्न झाला. 

 वर उल्लेख केलेला ‘काळा घोडा’ही इथेच आहे. राणीच्या पुतळ्याच्या मागे काही अंतरावर, राणीच्या बागेच्या मुख्य कमानीतून आत गेल्यावर, अगदी डावीकडे लॉनवर हा काळा घोडा उघड्यावरच उभा असलेला दिसेल. त्यामानाने राणीचे यजमान प्रिन्स अल्बर्ट नशीबवान म्हणायचे. ते ह्याच वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत आणि अगदी सुस्थितीत उभे आहेत. कधीकाळी मुंबईत दक्षिणोत्तर उभं असलेलं हे राजघराणं, आज राणीबागेच्या संकुलात दिंनवाणं होऊन, त्याच क्रमाने, परंतु पूर्व-पश्चिमोत्तर उभं आहे. 

                                        राणीच्या आणि काळ्या घोड्याच्या पुतळ्यांची सद्यस्थिती. 

राणीच्या पुतळ्यावर असलेला तो देखणा संगमरवरी मखर, राणीचा पुतळा हलवतानाच सुप्रसिद्ध ‘रेमण्ड’ कंपनीचे मालक सिंघानिया ह्यांनी विकत घेतला होता. त्यांनी तो मखर प्रथम त्यांच्या जुहू येथील बंगल्याच्या लॉनवर आणि नंतर रेमण्ड समूहाच्या ‘जे.के. हाऊस’ ह्या ब्रीच कँडी इथल्या गगनचुंबी इमारतीच्या दर्शनी भागावर बसवलेला आहे. हा मखर येता-जाता अगदी सहज नजरेस पडतो. 

‘जे.के. हाऊस’ ह्या ब्रीच कँडी इथल्या गगनचुंबी इमारतीच्या दर्शनी भागावर बसवलेला राणीचा मखर

कधीतरी वेळ काढून, भायखळ्याच्या राणीबागेत जाऊन हे सर्वच पुतळे पाहून या. तसेच पुढे ब्रीच कँडीला जाऊन ते मॅग्निफिशण्ट संगमरवरी मखरंही पाहून घ्या.  इतिहास प्रत्यक्ष त्या जागी जाऊन, खुल्या अस्मानाखाली वाचायचा असतो, बंद खोलीतल्या पुस्तकातून नाही..! 

– नितीन साळुंखे 

9321811091

29.07.2020

टीप –

१. राणीच्या बागेचं आताचं नांव ‘वीरमाता जिजाबाई उद्यान’ असं आहे. सध्या या उद्यानाला जिजामाता गार्डन किंवा नुसतंच राणीचा बॅग म्हणून ओळखलं जातं. 

२. अल्बर्ट म्युझियमचं आजचं नांव ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’  असं आहे. 

३. मेयो रोड आणि एस्प्लनेड रोडवरच्या ज्या चौकात राणीचा पुतळा होता, त्या चौकाचं आजचं नांव ‘चापेकर चौक’ असं आहे. 

संदर्भ – 

१. ‘स्थल-काल’ – डॉ. अरूण टिकेकर – पृष्ठ -२३

२. ‘मुंबईचा वृत्तांत’ – मूळ प्रसिद्धी १८८९. – लेखक बाळकृष्ण बापू आचार्य, मोरो विनायक शिंगणे 

                          पुनर्मुद्रण आणि संपादन २०११ – संपादक बापूराव नाईक 

                          पृष्ठ क्र . चोपन्न ते सत्तावन्न, १६४, २०८, २११, २१२, २१४. 

३. Gazetteer of Bombay City and Island. Vol. I  – प्रसिद्ध १९०९ – एस. एम. एडवर्ड्स – पृष्ठ ३४. 

     Gazetteer of Bombay City and Island. Vol.II – पृष्ठ १४२

     Gazetteer of Bombay City and Island. Vol.III  – पृष्ठ – ३४५-३४८

४. Glimpses of old Bombay and other Papers – जेम्स डग्लस – १९०० – पृष्ठ – १६

५. Visitor’s Illustrated Guide to Bombay : D. A. Pinder – १९०४ – २५-२६,  

६.  Bombay placenames and street-names; an excursion into the by-ways of the history of Bombay City. by: Sheppard, Samuel Townsend, 1880 – page 114.

७. The Victoria & Albert Musium, Bombay; a study in aspiration, cooperation & enervation – Vol. 3, No.1

    P71-101- Alexander Foster 

८. Review of  book ‘ The English Maharani Queen Victoria & India – Miles Taylor’ published on scroll.in

    13.07.2020.

९. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय वेबसाईट 

१०.The Illustrated London News’ या साप्ताहिकात दिनांक ८ जून १८७२ आणि दिनांक १२ डिसेम्बर १८७२ मध्ये

      प्रसिद्ध झालेल्या बातम्या;अनुक्रमे पृष्ठ ५६१ आणि ६४७. 

११. ‘The New Zealalnd Times’ Vol-LXVI, Issue 3321 ह्या वृत्तपत्रात दिनांक ३१ डिसेम्बर १८९७ रोजी प्रसिद्ध

      झालेली बातमी. 

१२. The New Zealand Mail, Issue 1405 ह्या वृत्तपत्रात दिनांक २ फेबुवारी १८९९ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी.  

१३. The Nelson Examiner & New Zealand Chronicale, Vol. XXXI, Issue 41 ह्या वृत्तपत्रात दिनांक २२ जून  

       १८७२ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी.  

१४. महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक १२ ऑगस्ट१९६५ 

विशेष आभार – 

१. माझे मित्र श्री. भारत महारुंगडे  ह्यांनी ह्या लेखासाठी लागणारी जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणे उपलब्ध करून दिली. 

२. निवृत्त पोलीस अधिकारी श्री. रोहिदास दुसरं ह्यांनी रँडच्या खुनासंदर्भातली माहिती उपलब्ध करून दिली. 

३. माझे मित्र श्री. नौशाद शिरगावकर ह्यांनी ‘ग्लिम्प्सेस ऑफ ओल्ड बॉम्बे’ ह्या पुस्तकाची प्रत उपलब्ध करून दिली.