जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

गेट वे ऑफ इंडियावरचा, समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला, २१ फुट उंच चबुतऱ्यावर असलेला १८ फुट उंच, ब्रॉन्झमध्ये घडवलेला  महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण अनेकदा पाहिला असेल. त्यावेळचा सर्वात उंच असलेला हा शिव पुतळा, दिनांक २६ जानेवारी १९६१ ह्या दिवशी, म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षात इथे उभारला गेला. ह्या पुतळ्याचे शिल्पकार आहेत कल्याणचे श्री. सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे.

हा किंवा इतर कोणताही पुतळा पाहताना आपण तो फक्त बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्याने आपली तोपर्यंतची सर्वोत्तम कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही आपण फारसा  लक्षात घेत नाही. एवढंच कशाला, त्या पुतळयाच नीट निरीक्षणही करत नाही. शिल्पकाराचं  नांवही कित्येकदा आपल्याला माहित नसतं. इथे मी हे ह्या शिल्पाबद्दल म्हणत असलो तरी, इतर प्रत्येक कलाकृतीबद्दल ते खरं आहे, हा माझा अनुभव आहे. गेट वे ऑफ इंडियानजीकचा अश्वारूढ शिव पुतळा काय किंवा दादरच्या शिवतिर्थावरचा छत्रपतींचा पुतळा काय, त्या पुतळ्याच्या एका हातात घोड्याचा लगाम असेल, तर दुसऱ्या हातात काय आहे, ह्याच  बरोबर उत्तर त्या पुतळ्यांचं नित्य दर्शन घेणाऱ्यानाही देता येईल की नाही, याची मला शंका आहे. तिथे त्या पुतळ्याबद्दल अधिकची काही माहिती कुणाला असेल याची शक्यताच उरत नाही..! प्रस्तुतच्या लेखातील पुतळ्याबाबतही हे खरं आहे.

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याची जन्मकथा मोठी रोमांचक आहे. हा पुतळा घडवणारे शिल्पकार श्री. भाऊ साठें ह्यांना ह्या पुतळ्याचं काम मिळण्यापासून ते, तो पुतळा गेट वे ऑफ इंडियाच्या समोर २१ फूट उंच चबुतऱ्यावर स्थानापन्न होईपर्यंतच्या दीड-दोन वर्षांच्या काळातल्या साऱ्याच घटना स्पर्धेतून येणाऱ्या राजकारणाने, इर्षेने, हेवेदाव्यानी, त्याचबरोबर रोमांचक क्षणांनी भरलेल्या आणि कृतार्थतेने भारलेल्याही आहेत. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे.

त्याकाळातल्या मुंबईतलं हे तो वरचं सर्वात उंचं आणि सर्वात दिमाखदार शिल्प. ह्या शिल्पाच्या प्रसववेदना तुम्हालाही ठाऊक असाव्यात, तुम्ही त्या अनुभवाव्यात आणि पुढच्यावेळी जेंव्हा तुम्ही हा पुतळा पाहायला जाल, तेंव्हा त्या पुतळ्याकडे पाहण्याची दृष्टी तुम्हा सर्वाना यावी ह्यासाठी ह्या लेखाचं प्रयोजन..!

पुतळा जन्माला येण्यापूर्वी.. 

साल होतं १९५९. महिना मे चा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती अद्याप व्हायची होती. गुजरात आणि महाराष्ट्र एकच संयुक्त राज्य होतं. मुंबईसह महाराष्ट्राची मागणी घेऊन आंदोलन जोरात सुरू होतं. १०६ बळी गेले होते आणि हे बळी घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची गच्छंती होऊन, यशवंतराव चव्हाण संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून बसले होते. मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण होईल अशी सुचिन्ह राजकीय क्षितिजावर दिसू लागली होती. आणि कदाचित म्हणूनच त्या मुहूर्तावर मुंबईत एखाद्या मोक्याच्या जागी, महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, असं ठरवलं गेलं असावं. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होताना, देशातलं पहिलं स्वत:चं तख्त, ते ही महाराष्ट्राच्या भुमिवर निर्माण करणाऱ्या शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत स्थापन करणं हे अत्यंत समयोचित होतं..!

मुख्यमंत्री यशवंतरावांनी त्यावेळच्या वजनदार राजकारण्यांचा समावेश असलेली एक पुतळा समिती तयार केली. जून महिन्याच्या आसपास समितीतर्फे मुंबईतल्या व मुंबई बाहेरच्याही नामवंत आणि नवोदित शिल्पकारांना, सरकारने छत्रपतींचा पुतळा बसवण्यासाठी मुक्रर केलेल्या जागांची पाहाणी करुन, पुतळा कसा असेल, त्याचा खर्च काय होईल इत्यादी तपशिल देऊन, पुतळ्याची आपापल्या कल्पनेतली मॉडेल्स आणि त्यासाठी येऊ शकणा-या खर्चाचं अंदाज पत्रक देण्याची विनंती शिल्पकारांना केली.

देशभरातल्या उत्तमोत्तम, नामवंत शिल्पकारांनी या प्रतिष्ठेच्या कामात रस दाखवला होता. त्यात एक शिल्पकार श्री. सदाशिव, अर्थात भाऊ साठेही होते. परंतु पुतळा घडवण्याच्या स्पर्धेत उतरलेले इतर शिल्पकार आणि भाऊ यांच्यात एक फरक होता आणि तो म्हणजे, भाऊ इतर दिग्गज शिल्पकारांच्या तुलनेत नवोदित म्हणावेत असे होते. गाठीशी फारसा अनुभव नाही. वयाने अवघे ३५ वर्षांचे. शरीरयष्टी किरकोळ. प्रथमदर्शी छाप न पडू शकणारी. शिक्षण पुर्ण होऊन जेमतेम १०-११ वर्ष झालेली. मोठं काम करण्याचा फारसा अनुभव नाही. नाही म्हणायला यापूर्वी त्यांना राजधानी दिल्लीतील महात्मा गांधींचा पुतळा बनवण्याचाी संधी मिळालेली होती आणि त्या पुतळ्याची देशपातळीवर वाखाणणीही झालेली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने साठेंनी महाराजांचा पुतळा घडवण्याच्या कामात आत्मविश्वासाने उतरायचं ठरवलं.

आता सरकारने महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या दोन जागा सुचवल्या होत्या, त्या जागांची पाहणी सुरु झाली. कोणत्याही शिल्पाला उठाव येण्यासाठी, ते शिल्प ज्या जागी बसवायचं असतं, त्याच्या आजूबाजूचा परिसर नेपथ्याची भूमिका बजावत असतो. तो शिल्पाला पूरक असला तरच शिल्प उठून दिसते. म्हणून जागा फार महत्वाची. सरकारने सुचवलेल्या दोन जागांपैकी एक जागा होती मलबार हिलच्या माथ्यावरची हॅंगिंग गार्डनची, तर दुसरी होती गेट वे ऑफ इंडीयाची. हॅंगिंग गार्डनची जागा प्रशस्त असली तरी मुख्य शहरापासून काहीशी एका बाजुला होती. दाट झाडीत लपलेली होती. पुन्हा त्या जागेशेजारीच पारशी समाजातील मृतांची अंतिम क्रिया करण्याचा ‘दोखमा’ होता. म्हणून ही जागा सर्वच संबंधितांनी नाकारली. 

त्यामानाने गेट वे ऑफ इंडीयाची दुसरी जागा सर्व दृष्टीने सोयीची आणि उचितही होती. ‘इंडीया गेट’ राजधानी दिल्लीला असलं तरी, मुंबईचं ‘गेट वे ऑफ इंडीया’ भारताचं प्रवेशद्वार समजलं जातं. देश-विदेशातले पाहुणे भारताला भेट देताना, गेट वे ऑफ इंडीया पाहिला नाही तर भारत भेट पूर्ण झाली, असं समजत नाहीत. पाहुणा देशातला असो वा विदेशातला, त्याची पावलं गेट वे ऑफ इंडीयाच्या दिशेने वळतातच वळतात.  शिवाय गेट वे ऑफ इंडीयाच्या समोरच टाटांचं जगप्रसिद्ध ‘ताजमहल’ हे पंचतारांकीत हॉटेल आहे. तिथे उतरणारे पाहुणे जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठीत व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या समोर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं, लढवय्या विराचं, स्व-कर्तुत्वावर हिंन्दवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र-देशातील करारी राजाचं, श्रीमान योग्याचं शिल्प असणं योग्य होईल, असं ठरवून हे मोक्याचं ठिकाणच महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलं. आपल्या देशाविषयी, देशाच्या इतिहासाविषयी आणि या एकमेंवाद्वितीय इतिहासपुरुषाविषयी इतरांच्या मनात आदर,  दरारा, दबदबा निर्माण करणाऱ्या शिवशिल्पासाठी ही जागा सर्वच दृष्टीने योग्य होती. शिवाय पहिलं आरमार बांधणाऱ्या शिवप्रतिमेची समुद्रावर नजर रोखलेली असणंही सर्वथैव योग्य होती.

शिवशिल्पाची जागा ठरली. आता पाळी होती, ती हे शिल्प साकारायची संधी कुणाला मिळणार याची वाट पाहण्याची. त्या काळातले सर्वच दिग्गज शिल्पकार स्पर्धेत उतरले होते. हे काम करण्याची संधी ज्याला मिळेल, त्या शिल्पकाराला देशभरात प्रसिद्धी अन् प्रतिष्ठाही मिळाणार होती आणि त्यामुळेच हे शिल्प घडवण्याचं काम आपल्यालाच मिळावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत होता. आणि इथेच राजकारणाने प्रवेश केला. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्यच आहे. आपल्याकडची कोणतीही कामं, ‘माणूस कुणाचा’ हे पाहून दिली जातात, तो काय कुवतीचा आहे हे पाहून नाही. तसंच थोड्या फरकाने इथेही घडलं. थोड्या फरकाने म्हणण्याचं कारण इतकंच की, इथे तो पुतळा घडवण्याच्या इच्छेने अन् इर्षेने स्पर्धेत उतरलेल्या शिल्पकारांपेक्षा, ‘माझ्या माणसालाच ते काम मिळालं पाहिजे’ हा राजकारण्यांचा ‘इगो’ मोठा ठरून, पुतळा घडवण्याचं कंत्राट देण्याचा अधिकार असलेल्या ‘पुतळा समिती’च्या मंडळींमध्ये राजकारण घुमू लागलं होतं. त्यांच्या दृष्टीने ते फक्त एक ‘कंत्राट’ होतं आणि ‘कंत्राट ह्या आपल्या देशातील सर्वच राजकारणी – अधिकारीवर्गाच्या आवडत्या शब्दमागून येणाऱ्या राजकारणाने वेग घेतला. सगळेच जण आपापल्या मर्जीतल्या कलावंताला हे काम मिळावं ह्यासाठी एक एक घर पुढे-मागे आणि तिरकेही चालू लागले. 

आपले भाऊ साठे मात्र यात कुठेच नव्हते. त्यांच्या कुणाशी ओळखी नव्हत्या की पुतळा समितीतलं त्यांना कुणी ओळखत नव्हतं. मुंबईत छत्रपतींचा पुतळा बसवण्याचं ठरलं त्या १९५९ सालच्या  दहा-अकरावर्षांपूर्वी, म्हणजे १९४८ सालीच भाऊंचं शिल्पशिक्षण पूर्ण झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला कुठेच काम मिळेना म्हणून, कल्याणला गणपतीच्या मुर्ती घडवण्याच्या  काकांच्या पारंपारीक व्यवसायात उमेदवारी सुरु केली. शास्त्रशुद्ध शिल्पकलेचं शिक्षण घेतलेल्या नंतर त्या कामाचा कंटाळा येऊन भाऊ साठे दिल्लीला गेले. दिल्लीत कुणाची ओळखदेख नाही, अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या दिल्लीतल्या एका स्नेह्याने आसरा दिला.

आसरा तर मिळाला, आता काम मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. पैशांची चणचण होती. बराच काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाचा गणपती बनवण्याचं काम निळालं. दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाच्या या गणेशोत्सवात, दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या सर्वच मराठी व्यक्ती आवर्जून हजेरी लावत असत. तिथेच साठेंची ओळख तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्याशी झाली आणि त्या ओळखीतून साठेंनी त्यांचा अर्ध पुतळा बनवण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली आणि ते काम यशस्वीरित्या पूर्णही केलं. अर्थात हे काम साठेंनी स्वत:हून केलेलं असल्याने, त्यांनी ह्या कामातून पैशांची अपेक्षा ठेवली नव्हती. आपल्या हातातली कला सी. डी. देशमुखांसारख्या सर्वच अर्थाने मोठ्या माणसाच्या दृष्टीस यावी हा हेतू होता. हा हेतू अर्थातच साध्य झाला आणि भाऊंच्या हातातील कला देशमुखांच्या नजरेत भरली.

पुढे दिल्ली नगरपालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचं ठरलं, तेंव्हा झालेल्या स्पर्धेत भाऊ साठेंनी केलेल्या गांधी पुतळ्याच्या दोन फुटी मॉडेलला सर्व संबंधितांनी पसंती दिली आणि ते काम सदाशीव साठेंना मिळाल. गाठीशी प्रचंड कार्य असलेल्या, स्वभावाचे असंख्य पैलू असणाऱ्या महात्मा गांधींची सर्व स्वभाव वैशिष्ट्य एका शिल्पात साकारणं अत्यंत अवघड होतं. परंतु सदाशीव साठेंनी ते शिवधनुष्य लिलया पेललं आणि भाऊंनी घडवलेल्या गांधींच्या ह्या पुतळ्याने, वयाच्या अवघ्या अठ्ठाविशीत असणाऱ्या भाऊ साठेंच्या नावाची कलाविश्वात दखल घेतली गेली. मध्यंतरी कधीतरी यशवंतराव चव्हाण दिल्लीस आले असताना, भाऊंचं हे काम यशवंतरावांच्या नजरेत आलं होतं आणि त्यांनी त्याचवेळेस मुंबईतल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम साठेंना देण्याचं तेंव्हाच निश्चित केलं असावं. अर्थात त्याचं सूतोवाच त्यांनी भाऊंकडे केलं नव्हतं. मात्र त्यांनी मुंबईचा शिव पुतळा घडवण्यासाठी नेमलेल्या समितीकडे भाऊंची शिफारस, भाऊंच्या नकळत केली असावी, असं पुढच्या घटना पाहून म्हणता येईल.  

इकडे पुतळा समितीवरील सदस्यांचं राजकारण जोरात सुरु झालं होत. स्पर्धेतल्या इतर तगड्या स्पर्धकांच्या तुलनेत भाऊ साठे सर्वच दृष्टीने नवखे होते. म्हणून सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. पण साठे स्पर्धेत तर होतेच. त्यात साक्षात मुख्यमंत्र्यांच्या तोंडून भाऊंची स्तुतीही त्यांनी ऐकलेली असावी, त्यामुळे त्यांची थोडीशी का होईना, दखल घेणं भागच होत. पुतळा कमेटीतल्या तत्कालीन सदस्यांनी, साठे स्पर्धेच्या बाहेर जावेत म्हणून जे जे शक्य होतं ते सर्व प्रयत्न केले. गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या बाबतीत साठे इतरांपेक्षा कुठेही कमी नव्हते. दिल्लीच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यात भाऊंची गुणवत्ता सिद्ध झालीच होती. म्हणून तांत्रिक मुद्द्यांवर साठेंचं ‘टेंडर’ फेटाळावं असे प्रयत्न सुरु झाले. साठेंनी सादर केलेल्या पुतळ्याच्या खर्चाच्या अंदाजपत्रकात, अगदी मंडईत भाजीपाल्याचा भाव पाडून मागावा तसा भाव करण्याचाही प्रयत्न केला, जेणेकरून परवडत नाही म्हणून भाऊंनी स्पर्धेतून माघार घ्यावी. पण साक्षात शिवप्रभूंच्या तो पुतळा, त्याचा भाव काय करायचा ह्या विचाराने पुतळा समितीने सुचवलेल्या किमतीत पुतळा बनवायला भाऊ तयार झाले. वास्तविक भाऊंना एवढ्या मोठ्या कामाचा खर्च किती होईल ह्याचा काहीच अंदाज नव्हता. कुणी अनुभवी माणसांना विचारावं, तर ते ही स्पर्धेत उतरलेले. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करताच येत नव्हती. म्हणून त्यांनी अंदाजाने अगदी कमीत कमी खर्चाचं अंदाजपत्रक दिलं होतं. त्यातही खोट काढण्याचा पुतळा समितीचा प्रयत्न कशासाठी आहे, हे भाऊंच्या लक्षात येत होत. साठेंनी समितीने सुचवलेल्या खर्चात पुतळा बनवण्याची तयारी दर्शवली म्हटल्यावर, पुतळा तयार करण्यासाठी लागणारी मुदत समितीने अगदी कमी करून पहिली. साठे त्यालाही तयार होतायत, बधत नाहीत हे पाहून शेवटी जातीचं कार्ड वापरायचाही प्रयत्न केला आणि मग मात्र साठेंनी उद्वीग्न होऊन,  शिवरायांच्या पुतळ्याचं काम करण्याचं नाकारलं आणि ते तडक दिल्लीला निघून गेले. दिल्लीत गेल्यावर साठेंनी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना फोन करून झाल्या गोष्टी सांगितल्या आणि महाराजांचा पुतळा साकारण्याची इच्छा असुनही, पुतळा कमिटीच्या अडवणुकीच्या धोरणामूळे त्यांना ते काम इच्छा असुनही स्विकारता येत नसल्याचं कळवलं.


पुतळा कमेटीचा आडमुठेपणा तोवर यशवंतरावांना माहित नव्हता. ते त्या वेळेस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या कामात व्यग्र होते. साठेंनी मात्र  कर्तव्यबुद्धीने यशवंतरावाना कळवलं होतं, त्यात तक्रारीचा सूर कुठंही नव्हता. यशवंतराव हे ऐकून चकीतच झाले, पण फोनवर काहीच बोलले नाहीत. काही दिवसांनी चक्र फिरली आणि पुतळा कमेटीचे सर्व सदस्य दिल्लीला धावत आले आणि शिवरायांच्या पुतळ्याचं काम तुम्हालाच करायचं आहे, असा समितीचा निर्णय झालेला असून, तुम्ही लगेचच मुंबईला चला, असा आग्रह करू लागले. मग भाऊंनीही फार ताणलं नाही आणि पुतळा बनवण्याचं काम स्वीकारल्याचं त्यांना सांगितलं. यशवंतरावांनीही साठेंना सर्व प्रकारचं सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं. भाऊ साठेंना त्यांच्यतल्या कलागुणांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवण्याचं काम मिळालं आणि खरी परीक्षा सुरु झाली. 

पुतळा जन्माला येताना..

मुंबईचा शिव पुतळा घडवण्याचं कं मिळतंय की नाही याची संदिग्धता असतानाच्या दरम्यानच भाऊंना झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासंबंधी ग्वाल्हेरहून विचारणा झाली होती. अंतर्गत राजकारणामुळे शिवपुतळ्याचं काम आपल्या हातातून गेलं असं गृहीत धरून, झाशीच्या राणीचा पुतळा बनवायचं काम साठेंनी स्वीकारलं होतं आणि आता मुंबईचा शिवपुतळाही त्यांनाच बनवायचा होता. ह्या वेळेस भाऊंचा मुक्काम दिल्लीला होता. ग्वाल्हेरचा राणीचा पुतळा आणि मुंबईचा शिवाजी पुतळा, ह्या दोन दिशांच्या दोन  कामांच्या दृष्टीने सोयीचं व्हावं म्हणून हे दोन्ही पुतळे दिल्लीला न घडवता, कल्याण इथे मध्यवर्ती ठिकाणी घडवायचे असं ठरवलं. कल्याणला राहातं घर असलं तरी तिथं सुसज्ज स्टुडिओ नव्हता. स्टुडिओ उभारण्यापासून सारी तयारी करायची होती. सर्वच कं एकट्याने करणं शक्य नव्हतं, म्हणून भाऊंनी त्यांचे बंधू मोती याना स्टुडिओ उभारण्याचं काम लगेच सुरू करण्याची विनंती केली आणि ते दिल्लीत आपला मुक्काम आटोपता घेण्याच्या दृष्टीने तयारी करायला लागले

दिल्लीला असलेली बारीक सारीक कामं उरकायचा मागे भाऊ लागले. हातात वेळ कमी होता आणि शिव धनुष्य तर यशस्वीपणे पेलायचे होत. म्हणून कल्याणला निघण्याच्या पूर्वी, दिल्ली मुक्कामीच ग्वाल्हेरला राणीच्या पुतळ्याची आणि मुंबईच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रत्येकी अडीच फुटांची मातीची मॉडेल बनवून तयार केली. दिवस पावसाचे होते. मातीची मॉडेल्स सुकायला वेळ लागणार होता. म्हणून वेळेचं नियोजन करण्यासाठी प्राथमिक मॉडेल्स दिल्लीलाच करण्याचा निर्णय घेतला होता.  

कल्याणच्या स्टुडिओचे काम, भाऊंचे बंधू मोती साठे यांच्या देखरेखीखाली जोरात सुरु झालं होतं. त्यावर्षीच्या, म्हणजे १९५९च्या गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर स्टुडिओचं उदघाटन करायचं निश्चित केलं होते आणि त्या दृष्टीने स्टुडिओच्या कामाची आखणी केली होती. मधेच भाऊंनी कल्याणला येऊन स्टुडिओच्या कामाची प्रगती पहिली. स्टुडिओ आकार घेत होत. स्टुडिओच्या रचनेसंबंधी मोतिभाऊना काही अत्यावश्यक सूचना देऊन भाऊ पुन्हा दिल्लीला निघून गेले. दिल्लीला तयार केलेली शिवाजी आणि झाशीच्या राणीच्या पुतळ्याची मातीची मॉडेल एव्हाना सुकली होती.

आता त्या मॉडेल्सना संबंधितांची पसंती आवश्यक होती. म्हणून पुन्हा काहीच दिवसांत महाराजांच्या पुतळ्याचं दिल्लीला तयार केलेलं मॉडेल घेऊन साठे मुंबईस परतले. एव्हाना गणेशचतुर्थीस स्टुडिओचे उदघाटन होऊन गेलं होतं. महाराजांच्या पुतळ्याच्या जन्मकळा सोसण्यासाठी स्टुडिओ सज्ज झाला होता.  

एवढी सगळं होईस्तोवर ऑक्टोबरचा महिना उजाडला होता. दिल्लीहून तयार करून आणलेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या मॉडेलला मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांची मंजुरी आवश्यक असल्याने, संबंधितांच्या पसंतीस मुंबईत घेऊन आले. भाऊंनी तयार केलेलं शिव पुतळ्याचं मॉडेल मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पसंतीस उतरलं. पुतळा समितीच्या सदस्यांनी त्यातही काही बदल सुचवले. समितीने सुचवलेलं काही बदल करण्याचे भाऊंनी मान्य केलं. भाऊंनी तयार केलेले सर्वानी मॉडेल मंजूर केलं आणि त्याबरहुकूम पुतळा घडवण्याच्या का लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मंजुरी भाऊंना मिळाली. 

आता कसोटीची घडी सुरु झाली. साठेंना परिपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिल्पातून समोर उभे करायचे होते आणि त्यासाठी प्रत्यक्ष महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, शिवकालीन इतिहासाचा आणि एकुणच त्या काळाचा अभ्यास आवश्यक होता. भाऊंनी अभ्यासाची सुरुवात केली, ती श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शिव चरित्र’च्या वाचनाने. ह्या पुस्तकाचं त्यांनी सखोल वाचन केलं. बाबासाहेबांनी सुचवलेली आणखीही काही पुस्तकं वाचली. बाबासाहेब तसचं शिवचरीत्राच्या इतर अभ्यसकांशी भरपूर चर्चाही केली. मनात उपस्थीत झालेल्या बारीकसारीक शंकांचं त्यांच्याकडून निरसन करुन घेतलं. महाराज कसे चालत असावेत, कसे बोलत असावेत, प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात त्यांची मन:स्थिती कशी असेल इथपासून ते, महाराजांचा घोडा होता की घोडी, महाराज कोणत्या पद्धतीचा पोशाख वापरात असतील, त्यांची दाढी, मिशी आणि कल्ले असे असावेत इथपर्यंतचे सारे तपशील त्यांच्या चर्चेत येत गेले आणि त्या चर्चेतून महाराजांची आत्मविश्वासाने भरलेला शूर योद्धा, स्वराज्यनिर्माता धीरगंभीर राजा शिवछत्रपतींची प्रतिमा भाऊंच्या मनात आकार घेऊ लागली.

शिव पुतळ्यात गतिमान घोड्यावर आरूढ, हाती तलवार धारण केलेले लढवय्ये शिवछत्रपती महाराज दाखवायचे असल्याने, महाराजांच्या अंगावर नाटक-सिनेमात दाखवतात तश्या सोन्या-रुप्याच्या अलंकारांना फाटा  दिला गेला. नाटक सिनेमात ठिक आहे, पण रणांगणात लढायला जाताना कूणी दाग-दागिने घालून जात नसतात. त्यात ज्या महाराजांचं निम्म्याहून अधिक आयुष्य रणांगणात शत्रूशी लढण्यात गेलय, अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर ती शक्यताही फार उरतही नाही, असा विचार त्या मागे होता. लढवय्या महाराजांच्या हातातली तलवार कशी असावी, देशी धाटणीची की परदेशी, पोर्तुगीज पद्धतीची, ह्यावरही भरपूर संशोधन, चर्चा केली गेली. त्यासाठी महाराजांचे वंशज असलेल्या सातारकर भोसल्यांच्या देवपूजेत असलेल्या तलवारीचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात आला. लंडनला असलेल्या भवानी तलवारीच्या उपलब्ध असलेल्या विविध फ़ोटोंचाही अभ्यास करण्यात आला. शेवटी महाराज वापरात असत तलवार पोर्तुगीज धाटणीची सरळ पात्याची आणि दुहेरी धारेची असावी, असं निश्चित करण्यात आलं.

महाराजांचा पोशाख, त्याकाळच्या प्रचलित मोगली  पद्धतीनुसार नक्की करण्यात आला. उदा. सलवार चोळीच्या खणाच्या कापडाची, चोळण्याप्रमाणे  थोडीशी सैलसरशी दाखवण्याचं निश्चित करण्यात आलं. इतकंच नव्हे तर, महाराजांच्या पायातील  जोडे, तुमान, शेला, दुपट्टा कसे असावेत ह्यासाठी इतिहासातील आधार, म्युझियममध्ये असलेली महाराजांची अस्सल चित्र आणि त्यावरील तज्ञांची  मतं, त्यांच्या सूचना विचारात घेऊन पुतळ्यात दाखवांचं भाऊंनी ठरवलं. 

स्टुडिओत पुतळा घडताना

आता घोडा कसा दाखवा, ह्यावर विचार सुरु झाला. पुतळा अश्वारूढ त्यासाठी भाऊ साठेंनी, ग्वाल्हेरला महादजी शिंद्यांच्या अश्वशाळेत जाऊन तिथले  अश्वतज्ञ सरदार अण्णासाहेब आपटे ह्यांचं मार्गदर्शन घेतलं. तिथल्या अनेक उत्तमोत्तम घोड्याचं, त्यांच्यातल्या प्रत्येक  वैशिष्ट्यांचं,लकबींचं बारकाईने निरीक्षण केलं. मुद्दाम मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन तिथल्याही घोड्यांची बारकाईने पाहणी केली. पुतळ्यात घोड्याची  गतिमानता, चपळाईआणि घोड्यात असलेला अंगभूत नैसर्गिक डौल उतरण्यासाठी असा अभ्यास आवश्यक होता. परिपूर्ण अभ्यासानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मविश्वासाने भरलेलं, विजयी वीराचा डौल असलेलं, गतिमान घोड्याच्या माध्यमातून परिस्थितीवर घट्ट पकड असलेलं, एका सार्वभौम राजाच अश्वारूढ स्वरूप भाऊ साठेंच्या मनात तयार झालं.  

स्टुडिओत पुतळा घडताना

कोणतीही कलाकृती ही ती जन्माला घालणाऱ्या कलावंताच्या मनात तयार व्हावी लागते आणि त्यासाठी कितीही कालावधी लागू शकतो. एकदा का त्या कलाकृतीची प्रतिमा कलावंताच्या मनात साकार झाली, की ती मगच ती त्या त्या कलाकाराच्या  माध्यमातून चित्र-लेखन अथवा शिल्पाच्या माध्यमातून साकार होत जाते. मनात जो पर्यंत एक आकृतिबंध तयार होत नाही, तोवर त्या कलेला दृश्य स्वरूप येत नाही. इथंही तेच झालं. महाराजांची भाऊंच्या मनात उमटलेली प्रतिमा, त्यांनी पहिल्यांदा घडवलेल्या मातीच्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी होती. अधिक आकर्षक होती. म्हणून पुन्हा नवीन मॉडेल तयार करून त्याला संबंधितांची पुन्हा मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. 

महाराजांची भाऊंच्या मनात उमटलेली प्रतिमा मातीच्या मॉडेलमधून साकार होऊ लागली. पहिल्या मॉडेलपेक्षा, हे मॉडेल अनेक अर्थानी वेगळं असणार होत. ह्या मॉडेलचं विस्तारित स्वरूप म्हणजे पुर्णकृती पुतळा असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना अगदी बारीक सारीक तपशील त्यात यावेत यासाठी, महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या वेशात, महाराजांच्याच  अंगकाठीच्या माणसाला स्टुडिओत समोर बसवण्यात आलं. एक उमदा घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात आला आणि महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मातीच मॉडेल करण्यास सुरुवात केली. 

पुढच्या काही दिवसांतच मातीचं नवीन अडीच फुटी मॉडेल तयार झालं. नव्याने तयार केलेलं हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ज्ञांना, जाणकारांना  दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही किरकोळ बदल केले गेले. नव्याने तयार झालेल्या ह्या मॉडेलला संबंधितांची मंजुरी आवश्यक होती. म्हणून सदरचं मॉडेल घेऊन भाऊ पुन्हा मुंबईला आले. मुंबईच्या कौन्सिल हॉलमध्ये, म्हणजे जुन्या विधानभवनाच्या आणि आताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत, मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता, म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं आणि त्यांनी त्यात चुका काढण्यास सुरुवात केली, नाकं मुरडायला सुरुवात केली. हे सारं असुयेपोटी होतं, हे भाऊंना समजत होतं. म्हणून भाऊंनी त्यांच्या शे-यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या  साठेंनी काही प्रतिक्रिया देणं संभवही नव्हतं. 

एवढ्यात यशवंतराव आले. हॉलमध्ये शिरताच समोरच्या अश्वारुढ शिवप्रतिमेला पहाताच, ‘वा, क्या बात है..!’  अशी त्यांची उत्स्फूर्त दाद गेली आणि पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं. आता पुतळा समितीच्या सदस्यांना तक्रार करायला वावच नव्हता. त्या मॉडेलबरहुकूम पुतळा तयार करण्याची विनंती यशवंतरावांनी तिथल्या तिथे केली. भाऊ साठे जिंकले;किंबहुना त्यांचा अभ्यास जिंकला, त्यांचा आत्मविश्वास जिंकला, त्यांची कला जिंकली..!

अशा रीतीने सर्व शिवकथा घडून आता मातीचाच, पण पूर्णाकृती १८ फुटी अश्वारूढ पुतळा घडवण्याचं काम सुरू झालं. प्रत्यक्ष पुतळा घडवण्यापूर्वी त्याचा मातीचा पुतळा बनवून मग त्याचा प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये मोल्ड तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्या मोल्डमधे ब्रॉँन्झचं अथवा आवश्यकतेनुसार इतर धातूंचं ओतकाम करून मगच प्रत्यक्ष पुतळा घडतो. धातूपासून तयार करण्यात येणाऱ्या कोणत्याही पुतळ्यामधे ही प्रक्रिया आवश्यक असते. ही प्रक्रिया खूप लांबलचक, किचकट आणि वेळखाऊ असते. धातूच्ं ओतकाम करण्यासाठी लागणारा प्लास्टर मोल्ड मात्र खूप काळजीपूर्वक तयार करावा लागतो. एकदा का मातीच्या पुतळ्याचा प्लास्टरचा मोल्ड तयार झाला, की मग त्यात काही बदल करता येत नाहीत. म्हणून मातीचा पूर्णाकृती पुतळा करताना सुरुवातीलाच संपूर्ण काळजी घ्यावी लागते.

लहान, अडीच फुटी मॉडेल तयार करणं आणि त्यावरून १८ फुटी उंच, पूर्णाकृती पुतळा घडवणं यात देखील जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मॉडेल नजरेच्या टप्प्यात असतं, तर पुतळा नजरेपासून उंचावर, दूर अंतरावर असतो. त्यामुळे काम करताना ते कसं होतंय हे पाहण्यासाठी प्रत्येकवेळी कमीतकमी २५ फूट दूर जाऊन तो पुतळा पाहावा लागतो. पुन्हा पूर्णाकृती पुतळा घडवताना, एकावेळी पुतळ्याचा चार-पाच फूटांचाच भाग नजरेसमोर असतो आणि त्यामुळे तो भाग, पुतळ्याच्या इतर भागाशी नातं जमावणारा आहे कि बिघडवणारा, हे तिथल्यातिथे पाहता येत नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा दूर अंतरावर जाऊन ते तपासत बसावं लागत. यात खूप वेळ जातो. पुन्हा काही काळाने पूर्णत्वाला जाणारा पुतळा स्टुडिओत जमिनीच्या पातळीवर असला तरी, प्रत्यक्ष त्याच्या जागेवर तो उंच चबुतऱ्यावर असतो आणि तो पाहणारा सामान्य दर्शक जमिनीच्या पातळीवरून तो पाहत असतो. त्यामुळे पुतळा घडवतानाच त्या पुतळ्याच्या प्रमाणबद्धतेत, रचनेत त्यानुसार आवश्यक ते बदल करावे लागतात. म्हणून  कोणताही पुतळा घडवण्याचं काम केवळ यांत्रिकपणे करून चालत नाही, तर तिथे बुद्धीचा संपूर्ण कस लावावा लागतो. शिवाय पुतळ्याचा आकार निर्माण होत असताना, त्याच्या टेक्श्चरचं, म्हणजे पोताचं भानही राखावं लागतं. कोणत्याही शिल्पकारासाठी ह्या अपरिहार्य बाबी असतात.  महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा मातीचा पूर्णाकृती पुतळा घडवताना भाऊ साठेंनाही, अर्थातच, हे भान ठेवावं लागत होतं. शिवप्रभूंच्या पुतळ्यात किंचितही त्रुटी राहू नये ह्याची काळजी ह्याच स्तरावर घेणं आवश्यक होती आणि भाऊ तशी काळजी घेतही होते.  

अनेक व्यवधानं सांभाळत, काळजी घेत मातीच्या पुतळ्याचं काम सुरु होतं. वेळ आपल्या गतीने चालला होता. होता होता १९६०च्या एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुतळ्याचं १८ फुटी ऊंच पूर्णाकृती मॉडेल तयार झालं. पुन्हा एकदा संबंधितांना स्टुडिओत बोलावून त्यांची मंजुरी घेण्यात आली. कारण एकदा का ह्या मॉडेलचा प्लास्टर मोल्ड बनला, की मग त्यात कोणताही बदल करता येणं शक्य नव्हतं. अपेक्षेनुसार सर्वांची मंजुरी मिळाली आणि पुतळ्याचा प्लास्टर मोल्ड तयार करण्याचं काम सुरु झालं. हे काम वेगाने करणं आवश्यक होतं, कारण मे महिन्याचा उन्हाळा सुरु झाला होता. उन्हं जास्त तापली, की पुतळ्याच्या मातीला तडे जाण्याची शक्यता होती. म्हणून मातीच्या पुतळ्याचे प्लास्टर मोल्ड बनवण्याचं काम लगेच हाती घेण्यात आलं आणि पुढच्या महिनाभरात संपूर्ण पुतळ्याच्या विविध भागांचे प्लास्टर मोल्ड तयार झाले आणि आता दुसरीच अडचण दत्त म्हणून समोर उभी राहिली. 

असं नाही की साठें पहिल्यांदाच कुठला पुतळा घडवत होते. एवढं मोठं नसेल, पण विविध माध्यमातून शिल्पाकृती घडवण्याचं काम त्यांनी पूर्वीही केलं होत. ब्रॉंझचेही काही पुतळे त्यांनी बनवले होते. पण ती कामं पुतळ्यांचा प्लास्टर मोल्ड काढेपर्यंतच मर्यादित होती. काढलेल्या मोल्डमध्ये आवश्यक त्या धातूंचं ओतकाम मात्र त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून करून घेतलं होत. हा शिव पुतळा घडवताना गोष्ट वेगळी होती. पूर्वी ज्या व्यक्ती भाऊंनी तयार केलेल्या मोल्ड मध्ये धातूचं ओतकाम करून देत असत, त्या व्यक्ती इथे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या. त्या सर्वासोबत असलेल्या स्पर्धेत यश मिळवून भाऊंनी ह्या शिवपुतळ्याचं काम मिळवलं होतं आणि म्हणून त्यांच्याकडून आता कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करता येत नव्हती. आता जे काही करायचं, ते स्वतःच्या हिमतीवर आणि अनुभवावर. प्लास्टर मोल्डमध्ये पुतळ्याचं धातूचं ओतकामही, त्या प्रकारच्या कामाचा कोणताही अनुभव नसताना स्वतःच करायचं होत. त्यासाठी सुसज्ज फाऊंड्रीची आवश्यकता होती. ती शोधण्यापासून तयारी सुरु कराची होती. 

हा ही अनुभव घेऊन बघू म्हणून, पुतळ्याच्या ओतकामासाठी कुणाची फाऊंड्री उपलब्ध होतेय का, त्याचा शोध घ्यायला भाऊंनी सुरुवात केली. आणि इच्छा तीव्र असली की अनपेक्षित ठिकाणाहूनही मदत मिळते, ह्या उक्तीचा भाऊंना अनुभव आला. भिवंडीचे एक ज्येष्ठ कारखानदार दादासाहेब दांडेकर भाऊ साठेंच्या मदतीला धावले. त्यांची स्वतःची भिवंडीत सुसज्ज फाउंड्री होती. ती त्यांनी भाऊंच्या दिमतीला देऊ केली, मात्र त्यांच्या कारखान्यातील कामगारांना पुतळ्याच्या ओतकामाचा काहीच अनुभव नसल्याने, ते काम मात्र स्वतः भाऊ साठे यांनी करावं, अशी विनंती केली. भाऊंनीही मदतीचा हा हात नाकारला नाही. चुकत माकत, विविध प्रयोग करत का होईना, पण आपण हे काम पूर्ण करू शकू असा आत्मविश्वास साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होताच. भाऊंनी दांडेकरांच्या फाउंड्रीत शिव पुतळ्याच्या प्लास्टर मोल्डमध्ये पुतळ्याचं ओतकाम करण्याचं नक्की केलं. 

भिवंडीच्या कारखान्यात प्लास्टर मोल्ड आणले गेले आणि ओतकामाच्या प्राथमिक कामास सुरुवात झाली. सुरुवातीलाच काही अडचणी लक्षात येऊ लागल्या. सर्वात पहिली अडचण होती, ती कल्याण-भिवंडी-कल्याण ह्या प्रवासाची. कल्याणहून सर्व सहकाऱ्यांसह दररोज कारखान्यात  भिवंडीला येणं आणि दिवसाचं काम संपवून रात्री पुन्हा भिवंडीला परत जाणं आणि ते ही सरकारी एसटीने, म्हणजे तीन-चार तासांचा कालावधी त्यातच जाऊ लागला होता. दुसरी अडचण लक्षात आली, ती गैस सिलिंडरच्या उपलब्धतेची. धातूच्या जोडकामासाठी-वेल्डिंगसाठी- लागणाऱ्या गॅस सिलिंडरची बेगमी तेंव्हा घाटकोपरहून करावी लागत असे. त्याकाळात गॅस एजन्स्या आजच्यासारख्या  गल्लोगल्ली उगवल्या नव्हत्या. शिवाय आवश्यकता असेल तेंव्हा सिलिंडर मिळेलच याची शाश्वतीही नसायची. काम सुरु असताना गॅस मधेच संपला, तर घाटकोपरहून नवीन सिलिंडर येईपर्यंत, तो ही एस्टीनेच, संपूर्ण दिवसाचं काम खोळंबून राहत असे. कधी कधी यात दोन-दोन दिवसही वाया जात असल्याचं लक्षात आलं. तसं फार वेळ झाल्यास एकुणच वेळापत्रक चुकण्याची शक्यता होती. वेळेचं गणित सांभाळण्यासाठी मग एक जुनी, वापरलेली स्टेशनवॅगन खरेदी करण्यात आली आणि मग वरच्या दोन्ही समस्या सुटल्या. प्रवासात वाया जाणारा वेळ वाचून वेळेचं गणित बरंचसं सावरलं गेलं आणि सिलिंडर मागवणं ही सुलभ झालं. अशारितीने पुतळ्याचं ओतकाम मार झालं.  

ओतकामाच्या प्राथमिक प्रयोगास सुरुवात झाली. त्यातही अनंत चुका होत होत्या, अंदाज चुकत होता. बहुमोल वेळ वाया जात होता, पण काही इलाज नव्हता. अनेकांनी आता भाऊंनी कुणातरी ज्येष्ठांची मदत घ्यावी अश्या सूचना केल्या, पण आता भाऊही जिद्दीला उतरले होते. कुणीतरी केलेल्या त्या सूचना भाऊंनी मान्य केल्या असत्या तर, कदाचित पुतळ्याचं काम वेळीच मार्गी लागलं असत, परंतु, सर्व मेहेनत भाऊंनी करूनही त्या मेहेनतीच्या मागे त्या ज्येष्ठ व्यक्तीचंही नांव लागलं असतं. भाऊंना तर ती कलाकृती सर्वस्वी त्यांची असायला हवी होती. शिवाय धातूचं ओतकाम शिकण्याचीही ही नामी संधी होती. म्हणून आता मात्र पुतळ्याच ओतकाम काम आपण स्वतःच  करायचं जिद्दीने भाऊ आणि त्यांचे सहकारी कामाला भिडले. 

प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं, हळू हळू ओतकाम जमू लागलं. आता कामाला वेग आला. तेवढ्यात एक वेगळीच समस्या समोर येऊन उभी राहिली. शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचं काम भिवंडीच्या दांडेकरांच्या कारखान्यात सुरु झालं आहे, ही बातमी बाहेर फुटली. शिव छत्रपती अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत. त्यात त्यांचा तो वरचा सर्वात उंच पुतळा भिवंडीत तयार होतोय, ही बातमी ऐकून अनेकजण पुतळ्याचा तो जन्मसोहळा पाहायला येऊ लागले. त्यात हौशे गवशे तर होतेच, शिवाय परिसरातली प्रतिष्ठित धेंडंही येऊ लागली. त्या त्या सर्वाना सांभाळणं, त्यांचं आदरातिथ्य कारण, त्यांना सर्व माहिती देणं हा नवीनच उद्योग होऊन बसला. त्यात परिसरातल्या शाळांच्या सहलीही तो पुतळा पाहण्यासाठी येऊ लागल्या आणि ते आणखी एक वेगळं काम होऊन बसलं. पण साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातही आनंद मनाला. तो जनताजनार्दनाचा आशीर्वाद मानला आणि वेळी-अवेळी येणाऱ्या त्या अ-तिथींचं प्रेमं स्वागत केलं. त्यांना सर्व माहिती पुरवली. विशेषतः शाळांतून पुतळा पाहायला येणाऱ्या मुलांच्या कुतूहलकडे भाऊंनी विशेष लक्ष दिलं. न जाणो त्यातून उद्याचा शिल्पकार घडणार असेल, तर त्याचं कुतूहल जागृत ठेवलं पाहिजे, असा विचार त्यामागे होता.

आता पुतळ्याच्या कामाने चांगलाच वेग पकडला. पुढचे तीन चार महिने मोठ्या उत्साहाचे गेले. यथावकाश ओतकाम पूर्ण झालं. तयार झालेले पुतळ्याचे विविध भाग जोडण्याचं काम सुरु झालं आणि भाऊंच्या मनातलं ते  १८ फुटी शिवशिल्प साक्षात समोर साकार होऊ लागलं. १९६०च्या डिसेम्बरचा महिना उजाडला. पुतळा गेट वे ऑफ इंडियाच्या समोर २६ जानेवारी १९६१ रोजी स्थानापन्न करायचा होता. आता घाई सुरु झाली. शिवप्रभूंचा चेहेरा, हात, तलवार, म्यान, घोड्याचा लगाम, जिरेटोप, तुरे, गोंडे इत्यादी तुलनेने लहान स्वरूपाची, परंतु अतिशय महत्वाची कामं अद्याप शिल्लक होती. ही कामं जरी लहान स्वरूपाची असली तरी, ती अत्यंत नाजूक असल्याने ती  सोनाराच्या कौशल्याने करणं आवश्यक होतं. म्हणून त्याला वेळही लागत होता. जसजसा डिसेम्बर महिना सरत होता, तसतशी तिकडे मुंबईच्या मंडळींचा रक्तदाब चढत होता. उदघाटनाची तारीख जाहीर झाली होती. पुतळा अद्याप पूर्णपणे तयार झाला नव्हता. पण भाऊ निश्चिंत होते. पुतळा वेळेत पूर्ण होईल ह्याची त्यांना पूर्ण खात्री होती. 

डिसेम्बर संपला आणि जानेवारी उजाडला. जानेवारीच्या सुरुवातीच्या चार-पाच दिवसात पुतळ्याचं उर्वरित कामंही पूर्ण झाली आणि महाराज दक्षिण मुंबईच्या स्वारीला तयार झाले. काही बारीक-सारीक कामं शिल्लक होती, पण ती उरलेल्या चार-दोन दिवसांत पुर्ण करता येण्यासारखी होती. शेवटी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महाराजांचा १८ फुटी देखणा अश्वारूढ पुतळा भिवंडीच्या कारखान्यात उभा राहिला. पुतळ्याकडे पाहताना साठेंच्या नजरेसमोरून गेल्या दोनेक वर्षाचा कालपट सरकत होता. साठेंचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते. केलेल्या श्रमाचं सार्थक होऊन ते शिवप्रभूंच्या रूपात समोर उभं होतं. सर्वानाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं..!

आणि महाराज दक्षिण विजयावर निघाले.. 

आणि थोड्याच वेळात सगळे पुन्हा भानावर आले. आता प्रश्न समोर उभा राहिला तो, हा पुतळा मुंबईला न्यायचा कसा, हा. सुरुवातीला वाटलं होतं, की हा पुतळा रस्तामार्गे मुंबईला सहज घेऊन जाता येईल. पण तेंव्हा पुतळ्याच्या उंचीचा आणि त्यामुळे पुतळ्याच्या वाहतुकीला येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार कुणाच्या मनातच आला नव्हता. ना सरकारी यंत्रणांच्या, ना भाऊंच्या. आता भाऊ आणि त्यांच्याहीपेक्षा सरकारी यंत्रणा जरा जास्तच काळजीत पडली. 

ह्या काळजीमागे कारणही तसंच होतं. कारण भिवंडीहून मुंबईला ते गेट वे ऑफ जाणारा जुना आग्रा रोड त्यावेळेस अत्यंत चिंचोळा होता. शिवाय त्या काळात विद्युतवहनाच्या आणि टेलिफोन्सच्या असंख्य वायरी आता सारख्या जमिनीखालून न जाता, सर्वच ठिकाणी खांबांच्या मदतीने रस्त्यावरून आडव्या जात असत. अशाच वायरी भिवंडी-मुंबई रोडच्या मार्गातही अनेक ठिकाणी डोक्यावरून रस्ता ओलांडून पलीकडे जात होत्या. घोड्यासहितची पुतळ्याची उंची १८ फूट आणि तो ट्रकमधून घेऊन जायचा, तर आणखी त्याची उंची वाढून ती २४-२५ फूट होणार आणि त्या विविध प्रकारच्या वायर्स त्याच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणार हे लक्षात आलं. त्यापेक्षाही मोठी अडचण होती ती भिवंडी-मुंबई रोडवर असणाऱ्या कशेळीच्या पुलाची. तेंव्हा हा पूल उंचीला अत्यंत लहान, जेम तेम १५-१६ फूटांचा होता. त्या खालून ६ फूट उंचीचा ट्रकचा हौदा अधिक त्या हौद्यावरील १८ फूट उंचीचा शिवपुतळा, असे दोन्ही मिळून उंची २५ फूट जाणं तर निव्वळ अशक्य होतं. पुन्हा त्या पुढे असलेला किंग्स सर्कलचा पूलही मोठा अडथळा ठरणार होता. रस्त्यावरुन आडव्या जाणा-या विविध केबल्स आणि हे दोन्ही पूल पुतळ्याला रस्तामार्गे नेण्यात अडचणीचे ठरणार हे लक्षात आलं आणि मग अन्य मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. 

आता एक एक सूचना येऊ लागल्या. कुणी म्हणालं, वसईच्या खाडीतून बोटीने पुतळा थेट गेट वे ऑफ इंडियाला घेऊन जाऊ. पण तसं करायचं म्हटलं तरी, वसईच्या खाडीपर्यंत पुतळा नेताना तो १५-१६ किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याने न्यावाच लागणार होता. त्यासाठीही डोक्यावरून जाणाऱ्या वायर्सचा अडथळा होताच. त्यामुळे जलमार्गाने पुतळा वाहून न्यायची सूचना लगेचच बाद करण्यात आली. कुणीतरी तो हेलिकॉप्टरने न्यावा असंही सुचवलं. हे जरा अतीच झालं, पण सूचना करणाऱ्याच्या मताचा आदर म्हणून त्यावर काहीच मत व्यक्त न करता, ती सूचनाही लगोलग अडगळीत टाकण्यात आली. अनेक सरकारी अधिकारी, वाहतुकीतले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा सुरूच होती. पुतळ्याच्या उदघाटनाची तारीख जवळ येत होती. पुतळा तयार होता, मात्र तो गेट वे ऑफ इंडिया पर्यंत न्यायचा कसा, ह्यावर काही तोडगा सापडत नव्हता.  

अखेर खूप विचारांती पुतळा रस्तामार्गे नेणंच योग्य वाटलं. फक्त तो ट्रकवरून न नेता, आता जशा  सार्वजनिक गणपतीच्या मोठाल्या मूर्ती लोखंडी चाकांच्या ट्रॉलीवर ठेवून ओढत नेतात, तसा महाराजांचा पुतळाही ट्रॉलीवर ठेवून ओढत न्यावा, असं ठरवण्यात आलं. पुन्हा मोजमापं घेण्यात आली.  पुतळ्याची १८ फूट उंची अधिक नऊ इंच व्यासाची चाक लावलेली ट्रॉली मिळून एकूण उंची १९-२० फुटाची होत होती. एवढं करूनही पुतळा रस्त्यातील ओव्हरहेड वायर्स आणि कशेळी व किंग्स सर्कलच्या पुलाखालून सुखरूप पार होईल की नाही याची शंका होतीच. म्हणून साधारण तेवढ्याच उंचीचा बांबू घेऊन, स्त्याने जाऊन रस्त्यात आडवे येणारे पूल आणि वायरी यांची कितपत अडचण येते, हे पाहण्यासाठी साठे आणि त्यांचे काही सहकारी रस्ता मार्गे जीपने निघाले. बांबूच्या साहाय्याने रस्त्यात येऊ शकणाऱ्या सांभाव्य अडथळ्याचं प्रत्यक्ष मोजमाप करताना, पुतळयाला ट्रॉलीवरुन घेऊन जाणंही अडचणीचं आहे, हे लक्षात आलं. तसं केल्यास प्रथम घोड्याचे कान आणि नंतर घोड्यावर सवार महाराजांच्या पुतळ्याचा वरचा भाग कशेळीच्या आणि पुढच्या किंग्स सर्कलच्या पुलाला धडकणार हे लक्षात आलं आणि पुन्हा पुतळ्याच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आत या अडचणींवर मात कशी करायची यासाठी संबंधितांची डोकी पुन्हा भिडली. 

आणि सर्वांच्या विचार विनिमयानंतर एक तोडगा निघाला. घोड्याचे कान आणि महाराजांच्या पुतळ्याच्या कमरेच्या वरचा भाग पुतळ्यापासून वेगळा करावा आणि हे दोन्ही भाग गेट वे ऑफ इंडिया येथे जागेवर जाऊन पुन्हा जोडायचे असं ठरवलं. उर्वरित पुतळा ओढत नेताना, पुतळ्याला काही इजा होऊ नये म्हणून तो ट्रक ऐवजी रोड रोलरने न्यावा असं ठरवलं, जेणे करून एकसारखा मंद वेग, म्हणजे ताशी ४ किलोमिटर मात्रचा, राखला जावा. महाराजांच्या प्रवासासाठी जानेवारीच्या २० तारीख मुक्रर करण्यात आली. दिवस शुक्रवारचा होता. या तारखेची आणि पुतळ्याच्या एकूणच सर्व प्रवासाची, ठाण्याचे त्यावेळचे जिल्हाधिकारी गांगल यांना कल्पना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी ते मुंबई ह्या संपूर्ण प्रवासात महाराजांच्या दिमतीला वाहतूक नियमन आणि सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा देण्या मान्य केलं.  

आता महाराजांच्या पुतळ्याच्या मुंबईवरच्या स्वारीसाठी जय्यत तयारी सुरु झाली. घोड्याचे कान आणि पुतळ्याचा कमरेपासूनच वरचा भाग वेगळा करण्यात आला. उर्वरित पुतळ्याच्या, म्हणजे घोड्याच्या टापांखाली चाकांची लोखंडी ट्रॉली  बसवण्यात आली. भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जाणारा आग्रा रोड त्यावेळेस सिमेंट काँक्रीटचा होता आणि त्याच्या दोन स्लॅब्सच्यामध्ये सांधे होते.  रस्त्याने जाताना, ह्या स्लॅब्सच्या सांध्यावर पुतळा कलंडू नये म्हणून पुतळा ठेवलेल्या लोखंडी ट्रॉलीवर रेतीने भरलेली पोती ठेवावीत असं ठरवलं. एवढं करूनही पुतळा कलंडू लागलाच, तर तोल सावरण्यासाठी पुतळ्याला दोरखंड बांधून, ते दोरखंड धरून पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी दहा-दहा तगड्या जवानांनी चालावं असं ठरवण्यात आलं.  शिवाय सांध्यावरून पुतळा घसरू नये म्हणून जास्तीची खबरदारी म्हणून सांध्यांवर लोखंडी प्लेट्स टाकण्याचंही ठरवलं. पुतळ्याच्या वाहतुकीची सर्व जबाबदारी भिवंडी येथील वाहतूकदार भगवान जोशी यांनी घेतली. सर्व योजना पक्की करून सर्वजण २० जानेवारीच्या दिवसाची वाट पाहू लागले. 

अखेर २० जानेवारी १९६१चा दिवस उजाडला. आज महाराजांची स्वारी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने कूच करणार म्हणून सर्वजण उत्साहात होते. तसेच काहींशी हुरहुरही जाणवत होती. आता काही तासांतच, भाऊ साठे आणि त्यांच्या सहका-यांचा, गेल्या दीडेक वर्षांचा महाराजांचा सहवास संपायची घडी नजीक आली होती. भावना दाटून आल्या होत्या. पण कर्तव्य पार पडायचं होतं. 

रोड रोलर आला. त्या रोलरला पुतळा ठेवलेली ट्रॉली मजबूत दोरखंडानी बांधण्यात आली. पुतळ्याच्या मागून आणि पुढून जाण्यासाठी दोन ट्रक मागवण्यात आले होते. पुढच्या ट्रकमध्ये महाराजांच्या पुतळ्याचा कमरेपासून वेगळा करण्यात आलेला भाग झाकून ठेवण्यात आला. रस्त्याच्या सांध्यांमध्ये अंथरण्याच्या लोखंडी प्लेट्सही ह्या ट्रक मध्ये ठेवण्यात आल्या. त्या ट्रकच्या मागे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्यांच्या स्टेशनवॅगनमध्ये बसले. त्यांच्या मागे रोड रोलर आणि त्याला बांधलेला पुतळा ठेवण्यात आला. रस्त्याने जाताना पुतळ्याचा तोल जाऊ नये म्हणून पुतळ्याला जोडलेले जाड दोरखंड धरून पुतळ्याच्या दोन्ही बाजूनी १०-१० मावळे उभे राहिले. मागच्या ट्रकमध्ये रोड रोलरच्या इंजिनासाठी लागणारा कोळसा आणि इतर आवश्यक साहित्य ठेवण्यात आलं. शिवाय लवाजम्याच्या पुढे आणि मागे वाहतूक नियमन आणि संरक्षणासाठी दोन सुसज्ज पोलीस व्हॅन्स तैनात करण्यात आल्या. आता कोणत्याही क्षणी महाराजांचा काफिला निघण्यास सज्ज झाला. 

२० जानेवारीला महाराज मुंबापुरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत, ही बातमी भिवंडी पासून मुंबईपर्यंत वाऱ्यासारखी पसरली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी प्रचंड मोठा जनसमुदाय जमा झाला होता. महाराजांना कुर्निसात करण्यासाठी जमलेली, महाराजांवर प्रेम करणारी महाराजांची रयत होती ती..! 

बरोबर दुपारी चार वाजता नारळ वाढवून महाराजांच्या काफिल्याने प्रवासाला सुरुवात केली आणि आभाळ फाटून जाईल एवढा मोठा जयजयकार दुमदुमला. फुलांच्या वर्षावात लोकांचा राजा आस्ते कदम दख्खनच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागला.. ! 

अत्यंत धीम्या गतीने, जयजयकाराच्या जल्लोषत महाराजांचा लवाजमा थाटामाटाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. थोड्याच वेळात संध्याकाळ होऊन अंधार पडणार होता. काळोखातून जाताना रस्ता नीट दिसावा म्हणून गॅसच्या बत्त्या सोबत घेतल्या होत्या. महाराजांच्या सेवेत असलेल्या एवढ्या सर्व जणांची जेवणखाण्याची व्यवस्था ठाण्याच्या हद्दीत करावी असं ठरवलं होतं आणि ती रसद पुरवण्याची जबाबदारी ठाण्यातील काही जणांनी स्वेच्छेने घेतली होती. भिवंडी ते कशेळीचा पूल एवढं, अवघं ८ किलोमीटरचं अंतर कापायला लावाजम्याला रात्रीचे आठ वाजले. आणखी दोन तासांनी रात्री १० वाजता महाराजांच्या लवाजम्याने ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला. 

रात्री १० वाजता ठाण्याच्या कलरकेम कंपनीपाशी महाराजांचा काफिला रात्रीच्या भोजनासाठी थांबला. तंबू ठोकले गेले. डेरे पडले. रसद वेळेवर पोहोचती झाली होती. स्वाऱ्यांनी भोजन केले. भोजनानंतर थोडी विश्रांती घेऊन, ताफा पुन्हा दक्षिण दिशेने निघाला. मुलुंडला पोहोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. हा वेळ असतो मुंबईच्या बाहेर पडणाऱ्या मालमोटारींच्या वर्दळीचा. अशा वेळी महाराजांच्या काफिल्यांने  चिंचोळ्या रस्त्याने पुढे मार्गक्रमणा करणं, वाहतुकीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचं नसल्याचा सल्ला सोबतच्या पोलिसांनी दिला. म्हणून मुलुंडला ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीच्या दारात रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याच्या कडेला मंडळींचा डेरा पडला. इतक्या रात्रीही परिसरातील जनता महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन व्हावं म्हणून जमलेली होतीच. महाराजांच्या काफिल्यातल्या माणसांना जमेल तशी मदत करायला धडपडत होती. महाराजांचा जयजयकार अविरत सुरूच होता. 

पुढची मार्गक्रमणा दुसऱ्या दिवशी, म्हणजे २१ जानेवारीला संध्याकाळपासून सुरु होणार होती. हा संपूर्ण दिवस विश्रांतीत आणि काही किरकोळ दुरुस्ती करण्यात गेला. पुतळ्याला जोडलेला रोड रोलर कोळशाच्या इंजिनावर चालत असल्याने, त्याचा वेग खूपच मंद होता. आता तो बदलून, त्याच्या ऐवजी डिझेल इंजिनावर चालणारा दुसरा रोड रोलर जोडण्यात आला. ट्रॉलीच्या लोखंडी चाकांची काही दुरुस्ती करणं आवश्यक झालं होतं, ती ही संध्याकाळपर्यंत उरकून घेण्यात आली. वाहतुकीच्या वर्दळीचा अंदाज घेऊन रात्री ९ वाजता जेवणखाण आटोपून खाशा स्वाऱ्या पुन्हा मुंबईच्या दिशेने चालू लागल्या. रस्त्याच्या दोहो बाजूनी लोकांची गर्दी जमलेली होतीच. पुतळा झाकलेला असला तरी, लोकांना तो महाराजांचा पुतळा आहे, एवढं पुरेसं होत. महाराजांचा जयजयकार सुरु होता. भांडुपच्या नजीक येताच ट्रॉलीच्या चाकांची पुन्हा दुरुस्ती करावी लागली. ती रस्त्यावर उभ्या उभ्याच करून घेण्यात आली. पुन्हा प्रवास सुरु झाला. कोळशावर चालणारा रोलर बदलून डिझेलवर चालणारा रोलर जोडल्याने, ताफ्याचा वेगही काहीसा वाढला होता. रात्रभर प्रवास करून पुतळा २२ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास मुंबई शहराच्या हद्दीत, सायनला, पोहोचला. आता महाराज खऱ्या अर्थाने मुंबापुरीच्या वेशीवर आले होते. 

२२ जानेवारीचा दिवस रविवारचा होता. रविवारचा त्यामूळे मुंबईच्या रस्त्यावरची वाहतूक अगदीच मंदावलेली होती. आता पुतळा कहिश्या वेगाने पुढे जाऊ लागला. किंग्स सर्कलच्या पुलाखालून लवाजमा विनासयास पार झाला. पुतळ्याची भव्य मिरवणूक जसजशी दादरच्या दिशेने सरकू लागली, तसतशा रस्त्याच्या दुतर्फा लोकांच्या झुंडीच्या झुंडी महाराजांचा काफिला पाहण्यासाठी जमू लागल्या. रस्त्यावर, रस्त्याशेजारच्या इमारतींच्या गॅलरींमधून माणसंच माणसं दिसत होती. फुलं उधळली जात होती. महाराजांचा एकच जयजयकार सुरु होता. वातावरणात सारा जल्लोष दाटला होता. मिरवणूक आस्ते कदम आपल्या मुक्कामाच्या दिशेने पुढे सरकत होती. दादर टी. टी. पार करून परेल पोयबावडी, लालबाग, भायखळा, जे जे हॉस्पिटल, महम्मद अली मार्ग, बोरीबंदर मार्गे पुतळा आणि सोबतचा ताफा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला आपल्या पोहोचला आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला. महाराज सुखरूप मुक्कामावर पोहोचले. एक मोठी जबाबदारी, वाटेत काहीही अडथळा न येता पार पडल्याचं समाधान सर्वांच्या चेहे-यावर दाटून आलं.

एक मोठा ऐतिहासी प्रवास सुखरूप संपला होता. साठे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यानी हाती घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामाचा, अंतिम पूर्ततेचा, सार्थकतेचा क्षण आता दृष्टीच्या टप्प्यात आला होता. आता वाहतुकीसाठी सूटा केलेला पुतळा पुन्हा जोडून, त्याच्यासाठी उभारलेल्या चबुतऱ्यावर बसवण्याचं मोठ्या जबाबदारीचं काम तेवढं उरलं होत आणि ते पुढच्या दोन दिवसांत पूर्ण करायचं होतं. त्यामुळे पुतळ्याचा भिवंडी ते मुंबई हा प्रवास संपलेला असला तरी, श्वास घ्यायला उसंत नव्हती. पुढच्या तयारीला लागणं भाग होतं. 

तासभर विश्रांती घेऊन पुन्हा सर्व मंडळी कामाला लागली. पुतळ्याचे सुटे केलेले भाग जोडण्याचं काम, पुतळा जमिनीवर असतानाच करणं भाग होतं. एकदा का पुतळा २१ फूट उंच चबुतऱ्यावर बसवला, की मग काहीच करता येणं शक्य होणार नव्हतं. म्हणून पुतळा जोडण्याचं काम लगेचच हाती घेण्यात आला. हे काम रात्रभरात संपवणं आवश्यक होत, कारण दुसऱ्या दिवशी पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यासाठी क्रेन यायची होती.   

पुतळ्याचे सुटे भाग जोडायला सुरुवात झाली. जोडून झालेल्या भागांचे फिनिशिंग करण्यात आले. चबुतऱ्याच्या तिन्ही बाजूनी बांबूंच्या परांती अगोदरच बांधण्यात आल्या होत्या, जेणेकरून चबुतऱ्यावर पुतळा फिक्स करणाऱ्या कारागिरांना वर-खाली जाता यावं. जवळपास संपूर्ण रात्र पुतळ्यावर शेवटचा हात मरण्यात सरली. ह्यात सरली. पहाटेच्या सुमारास महाराजांचा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर आरूढ व्हायला सज्ज झाला. 

पुतळा, २१ फूट उंच चबुतऱ्यावर क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे चढवण्याची जबाबदारी मुंबईच्या मे. हसनभाई जेठा ह्या कंपनीने घेतली होती. २३ तारखेला सकाळी क्रेन हजर झाली. पुन्हा एक तांत्रिक अडचण उभी राहिली. पुतळा २१ फुटाच्या भव्य चबुतऱ्यावर चढवायचा, तर क्रेनला कमीत कमी ६० लांबीचा बूम (क्रेनचा दांडा) लागणार होता. हसनभाईंनी आणलेल्या क्रेनचा बूम २० फुटाचाच होत. मग जास्तीची आणखी दोन बूम मागवण्यात आली. ती मजबुतीने जोडण्याचं काम सुरु झालं. इकडे भाऊ आणि त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून, काही तपशील राहिला तर नाही ना, ह्याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होते. एकदा का पुतळा चबुतऱ्यावर बसवला, की मग काहीच करता येणार नव्हतं. म्हणून आताच सर्व काळजी घेणं आवश्यक होतं. शेवटी म्यान, तलवार, जिरेटोप, गोंडे, तुरे जगाच्या जागी बसवून पुतळा चबुतरा पादाक्रांत करण्यास होण्यास तयार झाला. तिकडे पुतळ्याला चबुतऱ्यावर चढवण्यास क्रेनही सज्ज झाली होती. संध्याकाळचे चार वाजले होते. 

त्या प्रचंड क्रेनचा ६० फुट लांब बूम ऊंच आकाशात तयारीने उभा राहिला. त्या अवजड धुडाच्या शेजारी महाराजांचा १८ फुटी पुतळा अगदी एवढासा वाटत होता. सभोवताली हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो नाही, हजारो माणसं जमली होती. वातावरणात एकच उत्साह दाटला होता. पुतळा क्रेनला काळजीपूर्वक बांधण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री, पुतळा समितीचे सदस्य, इतर वरिष्ठ सहकारी महाराजांना सलामी देण्यासाठी जातीने उपस्थित होते. क्रेन पुतळा चबुतऱ्यावर ठेवण्यास सज्ज झाली होती.  भाऊंच्या घरची सर्व मंडळी, सहकारी, मित्रपरिवार हा नेत्रदीपक क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी जमला होता. गेले दीड वर्ष चालू असलेल्या एका महापर्वाची आणि भाऊंच्या आयुष्यातील एक उत्कट प्रवासाची यशस्वीपणे सांगता करणारा क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला होता. भाऊ आणि त्यांच्या सहका-यांनी  घेतलेल्या अविरत श्रमाचं फळ समोर उभं होत. सर्वांच्या चेहेऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते. पण तरीही सर्व सावध होते. पुतळा क्रेनला व्यवस्थित बांधला आहे की नाही, तो नीट वरती चढवला जाईल की नाही, ही धाकधूक उरात होती. हसनभाईंच्या कौशल्यावर सर्वांचाच विश्वास होता. तरीही सर्व सुरळीत पार पडावं म्हणून सारेजण देवाचं नांवही घेत होते. 

क्रेनला बांधलेला पुतळा प्रथम दोन-तीन फूट वर उचलून सर्व काही ठाक ठीक असल्याची खात्री केली गेली. पुतळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई ह्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं आणि त्याचक्षणी क्रेनने हळुहळू पुतळा वर उचलायला सुरुवात केली. भाऊंना सुरुवातीपासून साथ देणारे भाऊंचे बंधू मोती आणि त्यांचे सहकारी अगोदरच पुतळा व्यवस्थित ओढून घेण्यासाठी चबुतऱ्यावर चढून सज्ज होते. पुतळा हळूहळू वर जाऊ लागला. सर्व व्यवस्थित सुरु होत, तरीही पुतळा हवेत लटकताना पाहून भाऊंच्या पोटात खड्डा पडला होता. पुढच्या काही मिनिटातच चबुतऱ्यावर अगोदरच सज्ज हाऊन उभ्या असलेल्या मोती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतळा चबुतऱ्यावर काळजीपूर्वक ओढून घेतला. पुतळा चबुतऱ्यावर व्यवस्थित ठेवला गेला. वरुन मोतिने ‘ऑल वेल’चा इशारा केला आणि परिसरात एकच जयघोष निनादला, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..!’ तो दिवस होता २३ जानेवारीचा. 

आता शेवटचं, पण तेवढंच महत्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे पुतळ्याला चबुतऱ्यावर सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने मजबुतीने बसवणं. ते काम करण्याची जबाबदारी घेतली होती, भाऊंचे इंजिनिअर मामाद्वय देवधर बंधू यांनी. आता सारी सूत्र देवधर बंधूंनी हाती घेतली. २३ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पुतळा सिमेंट काँक्रीटने चबुतऱ्यावर घट्ट बसवण्यात आला. पुतळा अगदी मजबुतीने चबुत-याशी जोडला गेल्याची पुन्हा पुन्हा खात्री करून, सर्वजण खाली उतरले. जमिनिवर उतरुन पुतळ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकुन सर्व काही ठिक असल्याची पुन्हा एकदा खात्री केली आणि एक महत्वाचं काम संपल्याच्या समाधानाने सर्वजण मुक्कामावर परतले. 

२४ जानेवारीचा दुसरा दिवस चबुत-यावर चढून पुतळ्याची शेवटची फिनिशिंग, रंगकाम (oxidizaton) आदी करण्यात पार पडला. तो दिवस पुन्हा पुन्हा परातीवर चढून सर्व काही ठाक ठीक आहे ना, ह्याची पुन्हा पुन्हा खात्री करण्यात गेला. काही करायचं राहिलं असल्यास, ते ठीक करण्याची ही शेवटची संधी होती. 

अंधार पडला. पुतळ्याच्या चोहोबाजूनी मोठमोठाल्या प्रखर लाईट्सच्या प्रकाशात बारीक सारीक कामं सुरु होती. एकीकडे समोरच्या बाजूला २६ जानेवारीच्या उदघाट्नचीही तयारी होत होती. मंडप बांधला जात होता. पुतळ्याच्या समोर उभं राहून भाऊ पुतळ्याचं निरीक्षण करत होते. चबुता-याच्या चारी बाजूने फिरून सर्वकाही व्यवस्थीत असल्याची खात्री करून घेत होते. इतक्यात भाऊंचा एक सहकारी धापा टाकत आला आणि पुतळा चबुतऱ्यावर हलल्यासारखा वाटतो आहे, असं सांगू लागला. भाऊंच्या काळजाचा ठोकाच चुकला. खरं तर देवधरमामांनी इंजिनीयरींगमधलं आपलं सर्व कौशल्य पणाला लावून पुतळा चबुतऱ्यावर घट्ट बसवला होता. पुतळा हलण्याची वा पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याची त्यांनी खात्रीही दिली होती. मग हा माणूस असं का सांगतो आहे, हे पाहण्यासाठी भाऊ धावतच त्याच्यासोबत गेले. त्याने पुतळ्याकडे बोट दाखवलं आणि खरंच, पुतळा हलल्यासारखा वाटत होता. विश्वास बसत नव्हता, पण दिसत मात्र तसंच होतं. भाऊंच्या पोटात गोळाच आला. भाऊ डोळे फाडून पुन्हा पुन्हा बघू लागले आणि एकदम लक्षात आलं की, पुतळा हलत नसून, गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रावरून येणाऱ्या भणाणत्या वाऱ्याने, पुतळ्याच्या चोहोबाजूनी लावलेल्या परांतीं कंप पावत आहेत. त्यामुळे पुतळा हालत असल्याचा भास होत होता. पुतळा स्थिरच होता, हलत होत्या, त्या बांबूच्या परांती. तो एक दृष्टीभ्रम होता, पण काही क्षण काळजाचे ठोके चुकवून गेला होता. शंकेला वाव नको म्हणून रातोरात  पुतळ्याच्या पायाला (बेसला) जास्तीची खबरदारी म्हणून अधिक मजबूत पोलादाच्या पट्ट्या तयार करून वेल्ड करून टाकल्या. पुतळा चारी बाजूने कनाती लावून झाकून ठेवला.. 

पुतळ्याची निर्मिती करण्यापासून ते शेवटाला पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न होईपर्यंतच्या काळात भाऊंच्या मनःस्थितीला असंख्य हेलकाव्यातून जावं लागलं होतं, त्याची आता सुखकर सांगता झाली होती. मुंबईच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं चिरंतन स्मारक उभं राहीलं होतं. भाऊंचं नांव शिव प्रभूंच्या या शिल्पाशी कायमचं जोडलं गेलं. भाऊ धन्य धन्य झाले. ऊर भरून आला. आता वाट पाहायची, ती दोन दिवसांनी होणाऱ्या औपचारिक अनावरणाच्या सोहळ्याची. 

२६ जानेवारीचा दिवस उजाडला. आज पुतळ्याचं अनावरं. पहाटेपासूनच गेट वे ऑफ इंडियाचा परिसर लोकांनी फुलून गेला होता. मुंगीलाही शिरायला वाव नव्हता. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन होता. त्यानिमीत्ताने म-हाठी भूमीत स्वत:चं राज्य निर्माण करणा-या शिवकल्याण राजाचं, छत्रपती शिवरायांच्या शिल्पाचं आज अनावरण होणार आणि त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याच्या भावनेनं हजारोंच्या संख्येने महाराजांची रयत जमली होती. अवघ्या वातावरणात पवित्र चैतन्य भरून राहिलं होतं. उंच चबुतऱ्यावर विराजमान झालेल्या महाराजांच्या दर्शनाची रयत उत्कंठतेने वाट पाहत होती. महाराजांच्या नावाचा जयजयकार होत होत. ढोल-ताशे वाजत होते. सनया निनादत होत्या. तूता-या फुंकल्या जात होत्या..!

व्यासपीठावर खाश्या स्वाऱ्या जमू लागल्या. आपापल्या पदाचा प्रोटोकॉल काटेकोरपणे सांभाळत सर्व मान्यवर आपापल्या आसनावर विराजमान होऊ लागले. वातावरणात एकाच उत्साह दाटला होता. इतक्यात गगनभेदी तुतारी निनादली. महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, आचार्य अत्रे आले. आचार्य अत्रेंचं जनतेने घोषणांच्या गजरात स्वागत केलं आणि ते सहाजिकच होतं. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. कहीच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले. त्यांचंही जोरदार घोषणांनी स्वागत झालं. राज्यपाल महोदय आले. मान्यवरांच्या स्वागताचे हार-तूरे झाले. 

पुतळ्याचा अनावरण समारंभ सुरु झाला, तसे यशवंतराव आजूबाजूला पाहू लागले, त्यांना भाऊ साठे कुठेच दिसेनात. पण भाऊ कसे दिसावेत? भाऊंना कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रणच नव्हतं. भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय, सहकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते, ते शासनाने वर्तमानपत्रातून आम जनतेला दिलेल्या जाहीर निमंत्रणाच्या आधारे. दूर, एका कोपऱ्यात उभे राहून भाऊ हा हृद्य सोहळा डोळ्यात साठवून घेत होते.

झाला प्रकार यशवंतरावांच्या लक्षात आला. त्यांनी ध्वनिक्षेपकावरून भाऊंना तातडीने व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. प्रसंगाचं ऐतिहासिक महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन, वैयक्तिक मान-अपमान बाजूला ठेवून, गर्दीतून वाट काढत भाऊ व्यासपीठावर पोहोचले. यशवंतरावांनी दोन पावलं पुढे येऊन प्रेमाने भाऊंचं स्वागत केलं. व्यासपीठावर भाऊंसाठी सन्मानाने खुर्ची ठेवली गेली. भाऊंचा यथोचित सत्कार केला गेला. पुढचा कार्यक्रम सरकारी रीतीप्रमाणे थाटात पार पडला. शिंगांच्या, तुताऱ्यांच्या आणि सनई चौघड्यांच्या निनादात  पुतळ्याचं अनावरण झालं आणि वातावरणात एकाच घोषणा उठली, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’..!

पुतळ्याच्या उदघाटनाचं छायाचित्र.. दिनांक २६ जानेवारी १९६१. 

कोणाबद्दलही भाऊंच्या मनात कटुता नव्हती. त्यांचं कर्तृत्व, सर्वांपेक्षा उच्च स्थानी, २१ फूट उंच चबुतऱ्यावर सन्मानाने विराजमान झालं होतं..!  भाऊ भावनाविवश झाले होते. डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. भाऊंना त्यांचं आयुष्य कृतार्थ झाल्यासारखं वाट्लं. त्यांच्या अवघ्या आयुष्याचं सार्थक झालं होतं..!

 – नितीन साळुंखे 

9321811091

26.08.2020

टिपा – 

 1. आज ह्या गोष्टीला ५९ वर्ष झाली. चालू वर्ष हे महाराजांच्या ह्या पुतळ्याचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. शिल्पकार भाऊ आज ९४ वर्षांचे आहेत. कल्याणला आपल्या ‘शिल्पालया’त कुटुंबियांसमवेत राहातात. देश-विदेशात भाऊंनी घडवलेलत्यांच्या हातून जी काही कलासेवा घडली, त्यात ते समाधानी आहेत. 
 2. सदरचा लेख व ह्यातली काही छायाचित्र  भाऊंनी लिहिलेल्या, ‘आकार;जन्मकथा शिल्पांची’ ह्या पुस्तकातील ‘गेट वे ऑफ इंडियाचा शिवपुतळा’ ह्या प्रकरणावर आधारित आहे. ह्या पुस्तकांत भाऊंनी घडवलेल्या इतरही शिल्पांची जन्मकथा आहे. आपण सर्वानी हे पुस्तक अवश्य वाचावं. 

 श्री. सदाशिव साठे, अर्थात भाऊ   

विशेष आभार – 

१. शिवपुतळ्याचे रंगीत फोटो, गावदेवी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजीव अर्जुन सावंत यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात उपलब्ध करून दिले आहेत. श्रीयुत सावंत साहेबांचे आभार 

२. माझे पोलिस अधिकारी मित्र श्री. सईद बेग, ह्यांनी माझी भाऊंच्या बंधूंची आणि चिरंजीवांची दूरध्वनी भेट घालून दिली, त्यांचेही आभार. 

३. भाऊंचे चिरंजीव श्री. श्रीरंग साठे ह्यांनी भाऊंचा जीवन परिचय आणि सध्याचं छायाचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल, त्यांचे आभार. 

4.  श्री. सदाशिव साठे, अर्थात भाऊंच्या ‘शिल्पालय’ला भेट देण्यासाठी कृपया संपर्क साधावा –  

Sriranga Sadashiv Sathe,

Sathe Wada, Gandhi Chowk, 

Kalyan West, Dist Thane 

Email: mail@shilpalay.org 

Web: http://www.Shilpalay.org 

Call: 9820487397

भाऊंचा जीवनपरिचय आणि त्यांनी केलेलं सर्व काम  www. shilpalay.org ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

5. २६ जानेवारीचा पुतळ्याच्या उदघाटनाचा फोटो माझे मित्र आणि जुन्या मुंबईचे अभ्यासक श्री. भरत गोठोसकर (खाकी टूर्स) ह्यांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना सादर फोटो indianhistorypics on twitter ह्या ट्विटर हॅण्डलवर मिळाला. 

– नितीन साळुंखे 

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणांची ओळख करुन देणाऱ्या माझ्या पुस्तकातील  हा लेख थोडा वेगळा आहे. माझ्या इतर लेखातल्या कथेंप्रमाणे, ह्या लेखातली कथा पोर्तुगीज, ब्रिटिश काळातली नसून, स्वातंत्र्योत्तर काळातली आहे. पण असं असूनही ह्या कथेला मला या ह्या पुस्तकात स्थान द्यावसं वाटलं, ते दोन कारणांमुळे. पाहिलं कारण हे, की ही कथा स्वातंत्र्योत्तर काळातली असली तरी ती १९६१ सालची आहे. आपला जगण्याचा वेग इतका अफाट होत गेला आहे की, गेला क्षण हा इतिहासच असतो. मग ही तर साठ वर्षांपूर्वीची घटना आहे. म्हणजे ती निश्चितच इतिहासाचा भाग आहे आणि पुन्हा तो मुंबईशी निगडीत आहे.

पुतळ्याचे आजचे फोटो सौजन्य श्री. राजीव अर्जुन सावंत, सहाय्यकपोलीस उपायुक्त, गावदेवी विभाग. 

11 thoughts on “जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

  1. *मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-*

   *दादरचा टिळक ब्रिज-*

   दादरचा टिळक पूल नेमका कधी व का बांधला, याची खात्रिशीर माहिती कुठे मिळत नव्हती. ‘टिळक पुला’चा उल्लेख काही लेखांमधून माझ्या वाचनात आला होता, पण तो केवळ संदर्भ म्हणून. उदा. साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी, त्यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात लिहिल्या आहेत. सदरचा लेख, ‘मुंबई महानगरपालिके’च्या इमारतीस शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत मी वाचला होता. श्री. ना. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम कॉजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. “टिळक ब्रिज नुकताच तयार झाला होता”, असा उल्लेख श्री. नांच्या लेखात मला आढळला आणि त्या लेखातला हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं आणि शोधलीही..!

   *अतिशय मनोरंजक असणारी, तीच संपूर्ण कहाणी वाचण्यासाठी, कृपया माझ्या ब्लाॉगला 👇भेट द्यावी, ही विनंती-*

   https://wp.me/p7fCOG-gA

   *-©️नितीन साळुंखे*
   9321811091
   25.11.2021

   Like

 1. Khupach sunder lekhan,sarva ghatana tapshilwar lihilyamule Purna chitra dolyasamor disale.
  Murtikar Kalyan che aslyamule khupach vachanat interested hoto.Tasech te mazya khup parichayache aahet.Thanks for sharing.

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s