चित्तरकथा ‘माहिम कॉजवे’च्या जन्माची.. 

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ या माझ्या आगामी पुस्तकातलं एक प्रकरण-

चित्तरकथा ‘माहीम कॉजवे’च्या जन्माची.. –

सात बेटांच्या ओसाड, रोगट, दुर्लक्षीत मुबईला आजचं जागतिक दर्जाचे अन् जगातल्या महागड्या शहरांपैकी एक शहर बनवण्यामागे अनेकांचा हातभार लागला आहे. यात जिवंतपणीच आख्यायिका बनलेले तत्कालीन देशी लोक आहेत, तसंच परदेशांतून मुंबई ताब्यात घेण्यासाठी, मुंबईवर राज्य करण्यासाठी आलेले परदेशी लोकंही आहेत. या सर्वांनीच आपापल्या परिने मुंबई कशी असावी याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि मुंबईला तसा आकार देण्याच्या प्रयत्न केला होता. हा इतिहास वाचून वा ऐकून आपल्याला माहित असतो. पण मुंबईला आजची ख्याती मिळवून देण्यासाठी, या सर्व महानुभावांनी दिलेल्या आपल्या योगदानासारखंच, मुंबई शहरातील अनेक वास्तूंनी, पुलांवर आणि रस्त्यांनीही महत्वाची भुमिका बजावलेली आहे, हे आपल्या गांवीही नसते.

ज्या काळात ह्या वास्तू वा रस्तेदींचं बांधकामावर केलं गेले, त्या काळातल्या त्यांच्या निर्मात्यांनाही भविष्यात ह्या वास्तू वा रस्ते मुंबई शहराच्या समृद्धीत केवढी प्रचंड मोठी भर घालणार आहेत, याची कल्पना आली होती की नाही, हे आता सांगता येत नाही, पण ह्या रस्त्यांनी मुंबईच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि अर्थातच, आर्थिक स्थित्यंतरात अत्यंत महत्वाच्या भुमिका अबोलपणे बजावलेल्या आहे. यापैकीच एक रस्ता म्हणजे ‘माहिम कॉजवे’ किंवा ‘लेडी जमशेटजी रोड’..!

या रस्त्याचं मुंबईच्या समृद्धीत असलेलं योगदान, त्याचं महत्व आणि महती समजून घेण्यासाठी, आपल्याला मुंबई शहराच्या इतिहासातील ब्रिटिश काळात एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे. त्याशिवाय हा रस्ता मुंबईकरांसाठी का, कसा आणि किती महत्वाचा होता, याची कल्पना आजच्या मुंबईकरांना येणार नाही.

आज जरी आपण मुंबई शहर आणि तिची पूर्व-पश्चिम उपनगरं मिळून तयार होण्याऱ्या प्रदेशाला ‘मुंबई महानगर प्रदेश’ म्हणत असलो तरी, ब्रिटिश काळातील मुंबई शहराची व्याप्ती दक्षिणेच्या कुलाब्याच्या दांडीपासून ते पूर्वेला सायन आणि पश्चिमेला माहिमपर्यंतच होती. माहिम आणि सायन पलीकडील आजच्या वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला ते मुलुंड अशी नांवं धारण करणाऱ्या आजच्या उपनगराच्या (आणि त्या पलिकडीलही) विस्तृत भूप्रदेशाला ‘साष्टी’ असं नांव होत. मुंबईच्या सात बेटांवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आणि वर उल्लेख केलेल्या साष्टीवर प्रथम पोर्तुगिजांचा आणि नंतर मराठ्यांचा अंमल होता. अगदी १८व्या शतकाच्या अखेरपर्यंत अशीच परिस्थिती होती. ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली ती साधारण अठराव्या शतकाच्या मध्याच्या आसपास. इसवी सनाच्या १७३९ मध्ये चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि या बेटांवरचा पोर्तुगीज अंमल संपून मराठ्यांचं राज्य आलं. पुढे काही वर्षांनी सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेट व्यापाराकरिता म्हणून ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली आणि मुंबईने कात टाकायला सुरुवात केली.

वास्तविक मुंबई ब्रिटिशांच्या तांब्यात आली, तेंव्हापासूनच मुंबईची सात बेटं समुद्राच्या बाजूने बांध घालून एकमेकांना जोडून एकसंघ करण्याचे प्रयत्न सुरू होते. सन १६८७ साली ईस्ट इंडीया कंपनीचं मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलवण्यात आलं आणि ह्या प्रयत्नांना गती आली. सन १६९०-९१च्या दरम्यान, गव्हर्नर हॅरीसच्या (Bartholomew Harris) काळात, मुंबई आणि माझंगांव ह्या दोन बेटांमधली उमरखाडी भरणी घालून, ही दोन बेटं जोडली गेली आणि मुंबई एकसंघ करण्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला होता. ह्या कामाला अधिक गती मिळाली, ती १७०१ ते १७०४ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या निकोलस वेटच्या (Nicholas Waite) काळात. आपला कार्यकाळ संपता संपता, सन १७०४ मधे, गव्हर्नर वेटने शिवडी-परळ, परळ-माहिम आणि माहिम-वरळी बेटं, समुद्राच्या बाजूने बांध घालून, समुद्राचे पाणी आत येण्यापासून अडवण्याची योजना हाती घेतली आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी विल्यम आयलबी (William Aislabi) या हुशार इंजिनिअरची नेमणूक केली. विल्यम आयलबी यांने त्याच्यावर सोपवलेलं काम सन १७१२ पर्यंत पूर्ण केलं. मुंबई-माझंगाव-शिवडी-परळ-माहिम-वरळी ह्या बेटांमधे घुसणारं समुद्राचं पाणी बांध घालून बंद केल्याने, ह्या बेटांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली जमिन कंपनीने स्थानिकांना लागवडीसाठी खंडाने दिली.

मुंबई बेट आणि वरळी बेट यामधील पश्चिमेकडील खाडी मात्र बांध घालून अद्याप बंद करण्यात आली नव्हती. ही बाजू इतर बेटांच्या तुलनेत, सर्वात मोठी आणि बांध घालण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. सन १७१५-१७२२ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या चार्लस बून (Charles Boon) याने हे आव्हान स्वीकारण्याचं ठरवलं आणि त्यासाठी २०हजार रुपयांची तरतूद केली. बूनने कॅप्टन एलियस बेट (Elias Bate) या कंपनीच्या इंजिनिअरची नेमणूक केली. एलियस बेटने ९ महिन्यात हे बांधकाम करतो असं सांगून, इसवी सनाच्या १७२१ सालात कामाला सुरुवात केली खरी, पण हा बांध पूर्ण करण्यास त्याला ९ महिन्यांच्या ऐवजी चार वर्ष लागली. अर्थात हे काम होतंही तसं आव्हानात्मकच.

१७२५-२६ सालात हा बांध कसाबसा पूर्ण झाला, पण तो फार टिकला नाही. पुढची जवळपास ५७-५८ वर्ष वरळीचा हा बांध, सातत्याने दुरुस्ती करत कसाबसा टिकवून ठेवण्यात आला. हा बांध आणखी मजबूत करायचं ठरवलं, ते १७७१ ते १७८४ दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या विल्यम हाॅर्नबीने. हाॅर्नबीच्या काळात, सन १७८४च्या सुमारास वरळीचा बांध घालून, सध्याच्या महालक्ष्मीच्या बाजूने पार भायखळा, नागपाडा ते अगदी माजगावपर्यंत येणारे समुद्राचे पाणी कायमस्वरुपी अडवले गेले. त्यामुळे आज आपल्याला जो रेसकोर्स, सरदार पटेल स्टेडियम पासून पुढे पूर्वेला भायखळा, माझगाव पर्यंतचा जो विस्तृत टापू दिसतो तो निर्माण झाला. जवळपास ४०००० बिघे (४०० एकर) नवीन जमीन यामुळे ‘निर्माण’ झाली, असे गोविंद मडगावकरांनी त्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात नोंदले आहे. आज मध्य मुंबई नावाने जो भाग ओळखला जातो तो हा भूप्रदेश..!

मध्य मुंबईत एवढी मोठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच वस्ती-शेती-व्यापार उदीम वाढला. पूर्वी या ठिकाणी उथळ खाजण व दलदलीची जमीन असल्याने नित्यनेमाने होणारी रोगराई आटोक्यातच आली नाही, तर पार संपली. हॉर्नबीने घातलेला हा बांध, ‘वरळीचा बांध’ म्हणून त्या काळात ओळखला जात असे. ह्या बांधावरून रहदारी साठी तयार केलेल्या रस्त्याला, त्यावेळच्या मुंबईकरांनी त्याच्या जन्मदात्याचं, विल्यम हॉर्नबीचं, नांव देऊन त्याचं नामकरण ‘हॉर्नबी व्हेलॉर्ड’ असं केलं. हाच तो महालक्ष्मीहून वरळीच्या नेहरू तारांगणच्या दिशेने, हाजी अली दर्ग्याच्या समोरून जाणारा, ज्याला आपण आज ‘लाला लजपतराय मार्ग’ म्हणून ओळखतो, तो रस्ता.

वरळीचा हॉर्नबी व्हॅलॉर्ड  

सन १७८४ साली घातलेल्या वरळीच्या बांधानंतर, कंपनीने प्रकल्प हाती घेतला तो, कुलाबा बेटं जोडण्याचा. १७९६ मधे लहान कुलाबा व मोठं कुलाबा जोडण्यात आलं. पुढे १८३८ सालात कुलाबा कॉजवे बांधून, कुलाबा मुंबईच्या मुख्य भुभागाशी जोडण्यात आलं. १८३८ पर्यंत मुंबईची सातही बेटं जोडली जाऊन, मुंबई शहर, ‘Bombay Island City’ अस्तित्वात आलं होतं. आजही ह्या भुभागाची सरकारदरबारी असलेली अधिकृत नोंद, ‘मुंबई आयलंड सिटी’ अशीच आहे.

भरणी केल्यानंतर एकसंघ झालेली बॉम्बे आयलंड सिटी 

सन १७१२ ते १७८४ या काळात समुद्रात भरणी करुन निर्माण केलेल्या जमिनीने केलेली मुंबई शहराची होत असलेली भरभराट व त्यामुळे कंपनीची फुगणारी तिजोरी पाहून, कंपनीली साष्टी बेटं मुख्य मुंबईशी जोडून घेण्याची निकड भासू लागली. सन १७७५ मधेच शेजारचं साष्टी बेट कंपनीच्या ताब्यात आलेलं असलं तरी, ते मुंबईला अद्याप जोडलं गेलेलं नव्हतं. पश्चिमेचं माहिम आणि पूर्वेचं सायन ह्या दोघांच्या दरम्यान, उत्तरेला असलेल्या मिठी नदीच्या पूर्व-पश्चिम वाहाणाऱ्या विस्तीर्ण पात्राने मुंबई शहराची उत्तर सीमा रेखली असल्याने, मिठी नदीच्या दक्षिण तीरावरील साष्टीशी संपर्क साधण्याचा, दळणवळणाचा बोटीव्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. साष्टीशी त्वरित संपर्कासाठी मधली खाडी बोटीने पार करून पलीकडे जाण शक्य असलं तरी, सहज शक्य नव्हतं. त्या मुळे साष्टीचा विस्तीर्ण भूप्रदेश मागेच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात येऊनही, मधल्या मिठी नदीच्या विस्तृत पात्रामुळे साष्टीमधील वांद्रे-कुर्ला व त्यापलीकडील परिसराचा विकास करणं शक्य होत नव्हतं.

आता मात्र ब्रिटिशांना या खाडीवर कायमस्वरूपी रस्त्याची किंवा पुलाची निकड भासू लागली आणि बऱ्याच विचारानंतर, सन १७९६ मध्ये कंपनी सरकारने खाडीत (नदीत) भरणी करून रस्ता- कॉजवे- बांधायचा निर्णय घेतला. हा निर्णय झाला तेंव्हा मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन (Jonathan Duncan). जोनाथन डंकनने हा रस्ता बांधण्याचा निर्णय घेऊन लगेचंच कामास सुरुवात केली. परंतु, आर्थिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई तेंव्हाही होती, म्हणून कॉजवेच्या बांधकामास विलंबंही होत होता. तरीही पुढच्या दोन-तीन वर्षात, सन १८०५ साली, सायन आणि कुर्ला जोडणारा हा रस्ता बांधून तयार झाला. त्याकाळच्या रूढ पद्धतीप्रमाणे, गव्हर्नर जोनाथन डंकनचा सन्मान म्हणून या रस्त्याला ‘डंकन-सायन कॉजवे’ असं नांव देण्यात आलं..

निळ्या रंगातला ‘डंकन-सायन कॉजवे’

पुढच्या काळात साष्टीतील ठिकाणं मुंबईची पूर्व उपनगर म्हणून ओळखली जाऊ लागली, त्याची सुरुवात या रस्त्याने केली. हा रस्ता बांधला गेला आणि मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण व त्याही पुढेपासून लोकांची व मालाची आवक व्हायला सुरुवात झाली. मुंबईच्या सुप्रसिद्ध बंदरांची माळका पूर्वेलाच असल्याने, त्यावर आधारित व्यापार-उदीम वाढण्यासाठी हा रस्ता पूरक ठरला. अगदी आताआतापर्यंत कुर्ला- घाटकोपरपासून पुढे मुलुंडपर्यंत असलेल्या लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा ज्या मोठ्मोठ्या जगप्रसिद्ध कंपन्या उदयाला आल्या होत्या, त्या याच रस्त्याच्या बांधकामानुळे. देशातली पहिली रेल्वे या रस्त्याला समांतर धावली, ती याच कारणाने. मोठमोठाल्या कंपन्या आणि ह्या रस्त्याला समांतर जाणारा रेल्वेमार्ग याचा अपरिहार्य परिणाम म्हणून, कुर्ल्यापासूनच्या पुढच्या भागात हळुहळू मानवी वस्ती वाढू लागली. ही वस्ती पुढे मुंबईची ‘पूर्व उपनगरं’ म्हणून ओळख पावली. आज दोन-सवा दोनशे वर्षांनंतर परिस्थिती बदलू लागलेली असली तरी, अगदी आजही पश्चिम उपनगरांपेक्षा, मुंबईची पूर्व उपनगरं जास्त वस्तीची आणि उत्तरेला पार कल्याण-कर्जत वा त्याहीपूढे पहील्यापासूनच वाढलेली दिसतात, ती ही या रस्त्यामुळेच. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे. मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलेला हा पहिला रस्ता.

डंकन कॉजवेमुळे साष्टीतल्या पूर्वबाजूच्या उपनगरांची वाढ होऊ लागली, त्याचवेळी पश्चिम किनारपट्टीच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतता होती. वांद्रे चिमुकलं खेडं होतं. अंधेरी तर जंगलाने वेढलेलं होतं आणि बोरिवली-दहिसर तर कुणाच्याच खिजगणतीत नव्हतं  पुढे जवळ जवळ ३०-३५ वर्ष हिच परिस्थिती राहिली. माहिम हे मुंबई शहरच्या हद्दीतील शेवटचं गांव. माहिमच्या खाडीने, मुंबई शहराला शेजारच्या साष्टीपासून अलग ठेवलं होतं. साष्टी ब्रिटिशांच्या ताब्यात अली होती. पूर्व बाजूला डंकन कॉजवेने ती साष्टीशी जोडलीही गेली होती, मात्र पश्चिमेकडील माहिम आणि वांद्रे यामधील खाडीवर (मिठी नदीवर) पूल बांधून, मुंबई रस्ता मार्गाने पश्चिम साष्टीला जोडावी असं ईस्ट इंडीया कंपनीला वाटलं नव्हतं. किंवा वाटलंही असेल, पण कंपनीने अनेक कारणांनी तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. वास्तविक लोकांची तशी मागणी होती, परंतु, या भागात व्यापार-उदीम आणि मानवी वस्तीही पुर्वेच्या तुलनेने कमी असल्याने कंपनी लोकांची मागणी काही मनावर घेत नव्हती.

मिठी नदी, अर्थात माहीमच्या खाडी किनाऱ्यावरचं निवांत माहीम गाव 

माहिम आणि वांद्रे दरम्यान खाडी असली तरी, ह्या दोन्ही ठिकाणी राहाणारे लोक, अनेक कारणांनी एकमेकांशी जोडलेले होते. काही माहिमकरांची शेतीवाडी वांद्र्यात होती, तर वांद्रेकरांची माहिमात..! अनेकांचे एकमेकांशी नाते संबंध होते. वांद्र्याच्या तलावासमोर असणारी जरीमरी माता आणि टेकडीवर असणारी ‘मोत मावली-माऊंट मेरी’ माहिमवासियांच्या श्रद्धेचा विषय होत्या, तर माहिमचं सेंट मायकेल चर्च, माहिमचा दर्गा, दर्ग्या शेजारची शितळादेवी आणि त्या पलिकडची प्रभादेवी अनेक साष्टीकरांच्या श्रद्धेय देवता होत्या. ह्या कारणांमुळे माहिमची खाडी तरीतून पार करुन इकडून तिकडे अन् तिकडून इकडे जाणारा-येणारांची संख्या अफाट होती. जिवावर उदार होऊन केलेला हा प्रवास कसातरी निभावत असे, पण पावसाळ्यात मात्र तो थेट जिवावरच बेतत असे. दर वर्षीच्या पावसाळ्यात बोटी बुडून आतील माणसं, जनावरं आणि चिजवस्तुंना जलसमाधी मिळण्याची किमान एक तरी घटना घडत असे.

शेवटी अती झालं तेंव्हा, मुंबईतल्या नामवंत अभिजनांनी कंपनी सरकारला साकडे घालून माहिम आणि वांद्रे या दोन टोकं जोडणारा पूल बांधण्यासाठी साकडं घातलं. सन १८३५ च्या सुमारास आढेवेढे घेत कंपनी पूल बांधायला तयार झाली. आदेश सुटले. रॉयल सर्व्हे विभागाने पुलाच्या नियोजित जागेचा सर्व्ह केला, इंजिनिअरींग विभागाने पुलाचे आराखडे तयार केले आणि बांधकामासाठी येऊ शकणाऱ्या रुपये ६७ हजार मात्रच्या खर्चाचं अंदाजपत्रकही बॉम्बे सरकारसमोर मंजुरीसाठी सादर झालं. परंतु, नेमकं त्याच वेळेस कंपनी सरकारसमोर शहर विकासाच्या दृष्टीने इतरही महत्वाची आणि अधिक प्राथमिकता असलेली कामं असल्याने, माहिम कॉजवेच्या बांधकामाचा विषय आपोआप बाजूला पडला. त्याचवेळी मुंबईतलं त्याकाळालं सुप्रसिद्ध वाडीया कुटुंब या रस्त्याला येणाऱ्या खर्चापैकी काही खर्चाचा भार उचलण्यास तयार झाली, मात्र वाडीयांनी देऊ केलेले पैसे कंपनी सरकारला पुरेसे वाटले नाहीत. आणखी दोन वर्षांनी, म्हणजे सन १८३७ मधे मुबईतल्या बानाजी या एका अन्य पारसी कुटुंबाने पुढाकार घेऊन, मुंबईतल्या धनवंतांकडून या पुलाला बांधण्यासाठी लागणारे पैसे जमवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानाही यश आलं नाही. यात आणखी दोन तीन वर्षांचा कालावधी वाया गेला. या दरम्यान पावसाळ्यातले अपघात सुरूच होते.

पुढे साधारण १८४१ पर्यंत ह्या कॉजवेच्या बांधकामाचा विषय रेगाळतच राहिला. १८४१ च्या पावसाळ्यात माहिमहून प्रवासी आणि त्यांच्या गाई-गुरांना वान्द्र्याला घेऊन जाणारी बोट पाण्यात बुडाली आणि त्यात १५ प्रवासी आणि जवळपास तेवढ्याच जनावरांचा जीव गेला. आता मात्र हा कॉजवे व्ह्यायलाच हवा, असं कंपनी सरकारला वाटलं आणि यंत्रणा पुन्हा कामाला लागल्या. पुन्हा सर्व्हे झाला, नव्याने प्लान तयार करण्यात आले. सन १८३५ साली या कॉजवेच्या बांधकामाला येणार असलेला ६७ हजारांचा खर्च, १८४१ सालात दिडपटीने वाढून एक लाख रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला होता. मात्र ह्या वेळेलाही कंपनी सरकारसमोर असलेल्या अधिक महत्याच्या कामांमुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे, या कॉजवेचं बांधकाम लांबणीवर टाकावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली.

पुरेशा निधीअभावी माहिम आणि साष्टीतलं वांद्रे याना जोडणाऱ्या ह्या रस्त्याचं बांधकाम करण्यास सरकार असमर्थ असल्याची कुणकुण लेडी आवाबाई जमशेटजी यांच्या कानावर गेली. दर पावसाळ्यात जीवावर उदार होऊन बोटीतून खाडी ओलांडणाऱ्या माणसांच्या होणाऱ्या जिवितहानीमुळे आवाबाईंना दु:ख वाटतच होतं. यावेळी मात्र केवळ दु:खी होऊन चालणार नाही, तर काही तरी करायला हवं, असं आवाबाईंनी ठरवलं. आपले यजमान जमशेटजींशी चर्ची करुन, आवाबाईंनी त्यांच्यामार्फत, त्या या पुलाच्या बांधकामासाठी येणारा खर्च करण्यास तयार असल्याचं कळवून टाकलं. यावेळेस मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते सर जॉर्ज ॲार्थर (Sir George Arthur). सर जॉर्ज ॲार्थर यांनी लंडनला आवाबाईंचा प्रस्ताव मंजुर केला आणि त्याचा गोषवारा लंडनच्या मुख्यकचेरीला कळवून टाकला. ईस्ट इंडीया कंपनीच्या वतीने मुंबई प्रांताच्या सरकारने आवाबाईंचा प्रस्ताव स्वीकारल्याचं आवाबाईना कळवून, आवाबाईंनी देऊ केलेला कॉजवेच्या बांधकामाच्या खर्चाची रक्कम सरकार जमा करण्याची विनंती आवाबाईंना केली आणि आवाबाईंनी ताबडतोब रुपये १४७००० ची रक्कम सरकार दरबारी जमा केली.

पुढे जाण्यापुर्वी, थोडसं विषयांतर करुन, आवाबाई जमशेटजी जीजीभॉय  यांची थोडीशी माहिती घेणं अगत्याचं ठरेल. जमशेटजी जीजीभॉय  यांच्या पत्नी आवाबाई म्हणजे, त्याकाळच्या मुंबईतले अन्य एक धनाढ्य व्यापारी फ्रामजी नुसेरवानजी बाटलीवाला यांची कन्या. जमशेटजी जीजीभाई हे फ्रामजीच्या बहिणीचे चिरंजीव, म्हणजे भाचे. जमशेटजींची हुशारी आणि तल्लख बुद्धी हेरून, आपल्या या भाच्याचा व्यापारात जम बसावा म्हणून सुरुवातीच्या काळात फ्रामजींनी जमशेटजींना मदत केलेली होती. अंगभूत हुशारी आणि फ्रामजींच्यी मदतीमुळे पुढच्या काळात जमशेटजी मुंबईतले यशस्वी व्यापारी म्हणून ओळख पावले. मुंबईच्या विकासातही जमशेटजी पुढाकार घेऊ लागले होते. केवळ व्यापारी म्हणुनच नाही, तर उदार हृदयाचे समाजसेवक म्हणूनही जमशेटजीं मान्यता पावू लागले होते. आपला हा भाचा आयुष्यात आणखी पुढे जाणार हे फ्रामजींनी ओळखलं आणि आपली कन्या आवाबाई हिचा विवाह जमशेटजींबरोबर लावून दिला. या विवाहात आवाबाईंना ‘स्त्री-धन’ म्हणून फ्रामजींकडून बरीच रक्कम मिळालेली होती आणि स्त्री-धनाच्या रकमेतूनच आवाबाई माहिम कॉजवेच्या बांधकामाचा खर्च करणार होती, पती जमशेटजींच्या पैशांतून नव्हे..!

आता पुन्हा मुख्य कथेकडे येऊ. आवाबाईनी सरकारात रक्कम जमा केल्यावर कंपनी सरकारच्या इंजिनिअरींग खात्याने लगेचच कामाला सुरुवात केली. या पुर्वी पुलाच्या जागेचा सर्व्हे झाला होता. डिझाईनही तयार झालं होतं. त्याच डिझाईनमधे थोडसे बदल करत, चार कमानी असलेल्या पुलाचा अंतिम आराखडा लेफ्टनंट क्राॅफर्ड याने तयार केला. पुलाच्या बांधकामाची जबाबदारी, बॉम्बे  इंजिनिअर्सच्या कॅप्टन क्रुकशॅन्क यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गव्हर्नर ॲार्तरनी हिरवा झेंडा दाखवला आणि दिनांक ८ फेब्रुवारी १८४३ या दिवशी माहिम कॉजवेच्या बांधकामाचा नारळ वाढवण्यात आला. पुलाच्या बांधकामास सुरूवात झाली. पुढच्या दोन वर्षांत माहिम-वांन्द्रे जोडणारा पूल, ‘माहिम कॉजवे’, तयार झाला. मुंबई बेट माहिमच्या बाजूने साष्टीभागातील वांद्र्याशी कायमचं जोडलं गेलं. मुंबईकर आणि साष्टीकर आता एकमेकांकडे दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी, कोणत्याही मोसमांत निर्धास्तपणे जाऊ-येऊ शकणार होते. पण जरा सबूर, कॉजवे बांधून तयार झाला असला तरी, त्याचं उद्धाटन अद्याप व्हायचं होतं.

दिनांक ८ एप्रिल १८४५ ही कॉजवेच्या उद्घाटनाची तारीख मुक्रर झाली. उद्घाटनासाठी गव्हर्नर ॲार्थर यांनी यायचं कबूल केलं. लेडी आवाबाई आणि सर जमशेटजी जीजीभॉय  या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार होते. ईस्ट इंडीया कंपनीचे बडे अधिकारी, मुंबईतले बडे व्यापारी, सैन्याधिकाऱ्यांना निमंत्रणं गेली. उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतसं मुंबईकरांच्या उत्साहाला उधाण येऊ लागलं..!

माहिम कॉजवेच्या उदघाटनाचा सोहळा-

शेवटी तो दिवस उजाडला. माहिम कॉजवेच्या उदघाटनाचा मोठा दिमाखदार सोहळा माहिमच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला होता. किनाऱ्यावरच्या ऐसपैस नारळी बागेत, एका भव्य वटवृक्षाच्या सावलीत पांढरा शुभ्र, आलिशान शामियाना उभारण्यात आला होता. दिवस उकाड्याचे असल्याने, उद्घाटनाची वेळ संध्याकाळी ६ ची ठरवण्यात आली होती असली तरी, त्या दिवशी अगदी सकाळपासूनच, कार्यक्रमाच्या ठिकाणी मोक्याची जागा पटकावण्यासाठी, माहिमच्या दिशेने लोकांची रीघ लागली होती. कुणी चालत, कुणी बैलगाडीतून, कुणी रेकल्यातून, तर कुणी टांग्यातून माहिमच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात सर्वत्र विविध रंगाची आणि अनेक प्रकारची पागोटी आणि पगड्या माहिमच्या दिशेने सरकताना दिसत होत्या. लोकांमधे अमाप उत्साह संचारला होता. जो तो उदघाट्नच्या ठिकाणी मोक्याची लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात होता. असंच काहीसं दृश्य, कॉजवेच्या पलिकडे, वांद्र्याच्या बाजूलाही दिसत होतं.

होता होता दुपारचे तीन वाजले. रस्त्यावर जागोजागी पहाऱ्याला असलेलंन, काहीसं आळसावलेलं पोलीस दल अटेन्शनमध्ये उभं राहू लागलं. मुंबईतल्या खाशा स्वाऱ्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची ही वेळ होती. ईस्ट इंडिया कंपनीचे युरोपियन अधिकारी, मुंबईतले प्रतिष्ठित हिंदू, मुसलमान आणि पारशी व्यापारी आपापल्या राजेशाही बग्ग्यांतून, पालख्यांतून आणि मेण्यांतून, पाहाऱ्यावरच्या पोलिसांचे कडक सॅल्यूट स्वीकारत माहिमला पोहोचू लागले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला लोकांनी एकच गर्दी केली होती.

दुपारी चार वाजेपर्यंत माहिम नावाचं, मुंबई शहराच्या उत्तर टोकावर असणारं, नारळ, ताडी आणि तांदळाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं निवांत खेडं त्या दिवशी माणसांनी अगदी फुलून गेलं होतं. एवढी सारी गर्दी त्या आडबाजूला आलेल्या, समुद्राच्या कुशीत आणि दाट नारळींच्या छायेत शांतपणे पहुडलेल्या खेड्यात प्रथमच मिळत होती. माहिमकर तोंडात बोट घालून ते अप्रूप पाहत होते. त्या दिवशी त्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती;आणि का येऊ नये, आजवर कुणाच्या खिजगणतीत नसलेलं माहिम गांव, त्या दिवशी इतिहासात अजरामर होणार होत. त्या कॉजवेच नावंच मुळी ‘माहिम कॉजवे’ होत..!

संध्याकाळचे चार वाजले. बिगुल वाजला. आता कोणत्याही क्षणी गव्हर्नर कॉजवेच्या ठिकाणी येतील, तेंव्हा शांत बसा-शिस्तीत बसाचा इशारा झाला.। पोलिसांचे कडक युनिफाॅर्ममधले वरिष्ठ अधिकारी रस्त्यात दिसू लागले. परेलचं गव्हर्नमेंट हाऊस ते माहिम कॉजवेपर्यंत ठराविक अंतरावर पहाऱ्यावर असलेल्या पोलीस पार्ट्या सावधानमध्ये खड्या झाल्या.

बरोबर साडेचार वाजता गव्हर्नर गव्हर्नर जॉर्ज ऑर्थर यांची चार घोड्यांची बग्गी परेलच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या गेटमधून रुबाबात बाहेर पडली. गव्हर्नर साहेब बग्गीत स्थानापन्न झाले. गव्हर्नरसाहेबांच्या उजव्या हाताला सर जमशेटजी जीजीभॉय याना सन्मानाने बसवण्यात आलं. गव्हर्नरसाहेबांच्या समोरच्या बाजूला जमशेटजी जीजीभॉय यांचे चिरंजीव कर्सेटजी जमशेटजी आणि गव्हर्नरसाहेबांचे खाजगी सचिव स्थानापन्न झाले. गव्हर्नर साहेबांच्या बग्गीच्या मागे-पुढे, रुबाबदार गणवेशात त्यांचे शरीररक्षक, एस्कॉर्टसचं दळ उमद्या घोड्यांवर सवार होऊन सज्ज होत. मागे बॅन्ड पथक होतं. गव्हर्नर साहेबानी, ‘चलो’चा इशारा दिला आणि लवाजमा तीन मैलावर असलेल्या माहिमच्या दिशेने कॉजवेच्या उदघाटनासाठी जाण्यास निघाला.

पुढच्या अर्ध्या तासात, पांच वाजता, गव्हर्नरसाहेबांचा ताफा माहिमच्या सेंट मायकेल चर्चपाशी पोहोचला. चर्चच्या घंटा निनादू लागल्या. चर्चतर्फे गव्हर्नर जॉर्ज ऑर्थर यांचं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमासाठी आलेले बडे निमंत्रित चर्चपाशी गव्हर्नरसाहेबांची वाट पाहत अगोदरपासूनच उभे होते. आता ह्या निमंत्रितांच्या बग्ग्या गव्हर्नरसाहेबांच्या ताफ्यात सामील झाल्या आणि त्यांना ठरवून दिलेल्या जागी उभ्या राहिल्या.

ताफ्याचं नेतृत्व करण्याचा मान सुरुवातीला, ज्या इंजिनिअरिंग विभागाने ह्या कॉजवेचं बांधकाम केलं होतं, त्या ‘बॉम्बे इंजिनिअरिंग विभागा’च्या प्रमुखाला दिला होता. ह्या विभागाचे प्रमुख कॅप्टन क्रुकशांक ह्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या कॅप्टन मॅरियट ह्यांची बग्गी ताफ्याच्या प्रथम स्थानावर उभी राहिली. त्यांच्यामागे कॉजवेचं डिझाईन ज्या विभागाने केलं होतं, त्या विभाप्रमखाची बग्गी होती. त्यांच्यामागे गव्हर्नरसाहेबांच्या शरीररक्षकांच्या घोडदळाची शस्त्रसज्ज तुकडी, त्या तुकडीच्या मागे गव्हर्नरसाहेबांचं रॉयल बॅण्डपथक, बॅण्डपथकाच्या मागे गव्हर्नरसाहेबांची चार घोड्यांची आलिशान, लालचुटुक बग्गी, त्यामागे शरीररक्षकांची आणखी एक तुकडी आणि त्या मागे घोड्यावर सवार बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कमांडर इन चीफची गाडी आणि त्यामागे एका ओळीने एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य, प्रशासनातले उच्चाधिकारी, लष्करी अधिकारी इत्यादी आपापल्या वाहनात अथवा घोड्यावर सवार होऊन, असा काटेकोर राज शिष्टाचार पळत ताफा माहिम चर्चपासून अगदी काहीच मीटर अंतरावर असलेल्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी निघाला

चर्चवरून गव्हर्नर साहेबांचा ताफा मार्गस्थ झाला, तो शामियान्यात उभारलेल्या व्यासपीठावर न जात, सरळ कॉजवेच्या दिशेने निघाला. शाही बॅण्डपथकाने स्वागताच्या सुरावटी वाजवायला सुरुवात केली. तो क्षण आता अगदी जवळ आल्याची सर्वांची खात्री पटून, सोहळ्यासाठी जमलेल्या मुंबईकरांच्या अंगावर आनंदाचा रोमांच उठला. ताफा माहिम कॉजवेच्या अगदी नजीक आला आणि ज्या क्षणी ताफ्याच्या सर्वात पुढे असलेल्या इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुखाची बग्गी कॉजवेच्या मध्यभागी पोहोचली, त्याच क्षणी इशारा झाला आणि तोफा धडाडल्या. कॉजवेच्या दुसऱ्या टोकाकडे, वांद्र्याला, सज्ज असलेल्या कॅप्टन अनवीनच्या तोफखाना दलाने गव्हर्नरसाहेबाना आणि त्यांच्यासोबतच्या खाशा स्वाऱ्याना तोफांची सलामी दिली. गव्हर्नरांचा शाही ताफा कॉजवे पार करून वांद्र्याला पोहोचला. कॉजवेचं अधिकृत उदघाटन झालं.

वांद्राच्या बाजूला एका प्रशस्त घरात वांद्र्याचा कमांडिंग ऑफिसर, गव्हर्नर आणि सोबतच्या खाश्या स्वाऱ्यांच्या स्वागताला कडक गणवेशात सज्ज होता. त्याच्यासोबत, आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला होता, त्या लेडी आवाबाई जमशेटजी जीजीभाई त्यांच्या कुटुंबीयांसहित तिकडे हजर होत्या. त्यांच्यासोबत बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मडमा आणि पारशी समाजातील व्यापाऱ्यांच्या पत्नी होत्या. जमशेटजी जरी गव्हर्नरांच्या सोबत असले तरी, आजच्या कार्यक्रमाचा खरा मान लेडी आवाबाई जमशेटजींचा होता आणि म्हणून गव्हर्नर जातीने त्यांना भेटण्यासाठी कॉजवे पार करून वांद्र्याला आले होते. गव्हर्नर बग्गीतून पायउतार होऊन, मोठ्या अगत्याने आवाबाईंकडे गेले आणि त्यांना किंचित झुकून अभिवादन केलं. गव्हर्नरांनी आवाबाईंचं अभिनंदन करून, केल्या कामासाठी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे आभार मानले. गव्हर्नर साहेबांनंतर ताफ्यात असलेल्या सर्व महोदयांनी आवाबाईंचे आभार मानून, त्यांचं अभिनंदन केलं. काही क्षण तिथे थांबून, ताफा लेडी आवाबाई व त्यांच्या सोबत तिथे असलेल्या इंग्रज आणि पारशी व्यापाऱ्यांच्या लेडीजना बरोबर घेऊन, पुन्हा माहिमकडे उभारण्यात आलेल्या शामियान्याकडे जाण्यास निघाला.

एव्हाना सहा वाजले होते. वांद्र्याहून लेडी आवाबाईना सोबत घेऊन आलेला गव्हर्नरसाहेबांचा ताफा शामियान्यात पोहोचला. शामियान्याच्या मागच्या बाजूला पाहुण्यांच्या हाय टी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. पांढऱ्या शुभ्र गणवेषातले बेअरा आणि वेटर पाहुण्यांच्या सरबराईसाठी सज्ज होते. आपापल्या अधिकाराप्रमाणे ताफ्यातील प्रत्येकजण त्याच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाला. मधोमध गव्हर्नरसाहेबांची खुर्ची होती आणि त्यांच्या शेजारी जमशेटजी बसले होते. व्यसमीठावर समोर इतर महत्वाचे अधिकारी आणि सन्माननीय लेडीज यांच्या बसण्याची व्यवस्था होती. आता शामियान्यात उपस्थित झालेल्या खाश्या स्वाऱ्यांसाठी हाय टी च्या व्यवस्थेची लगबग चालली होती. पदार्थांच्या नाना त-हा पाहुण्यांच्या जिभेचेला तृप्त करण्यासाठी तयार होत्या. आसमंतात त्या खाण्याचा दरवळ सुटला होता. गव्हर्नर साहेब, जमशेटजी कुटुंब, या कार्यक्रमासाठी सपत्नीक हजार असलेले सैन्याचे उच्चअधिकारी, विविध बड्या हुद्द्यांवरचे नागरी आणि लष्करी अधिकारी, कायदा मंडळाचे सदस्य, मुंबईतले बडे व्यापारी, इत्यादी सारे पाहुणे अल्पोपहारासाठी बसले. पुढच्या अर्ध्या तासात सर्वांचं खाणं-पिणॅ आटोपलं आणि सर्वजण व्यासपिठावर स्थानापन्न झाले.

ठिक साडेसहा वाजता समारंभ सुरु झाला. समोरचा शामियाना आणि त्यापलीकडचा माहिम कॉजवे पार वांद्य्रार्यंत माणसांनी फुलून गेला होता. व्यासपीठावरून पाहताना जिथवर नजर जाईल तिथवर माणसंच माणसं दिसत होती. व्यासपीठावर मध्यभागी गव्हर्नर जॉर्ज ॲार्थर यांची खुर्ची होती. त्यांच्या शेजारी उजव्या हाताला सर जमशेटजी जीजीभॉय  बसले होते. गव्हर्नरांच्या डाव्या हाताला मुंबई इलाख्याचे कमांडर इन चीफ सर टी. एम. मॅकमॅहॉन यांचं आसन होतं. इतर निमंत्रीत त्यांच्या प्रोटोकाॅलनुसार मांडलेल्या खुर्च्यांवर आसनस्थ झाले. व्यासपिठाच्या समोर मांडलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत लेडी आवाबाई जमशेटजी आणि इतर मान्यवर स्त्रियांना सन्मानाने बसवण्यात आलं होतं. बिगुल वाजला. कार्यक्रम सुरु होतोय आणि गव्हर्नरसाहेब बोलायला उभे राहाताहेत याची सूचना झाली आणि सर्वत्र एकंच शांतता पसरली.

गव्हर्नर बोलायला उभे राहिले. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली आणि मागे बसलेल्या सर आणि समोर बसलेल्या लेडी जमशेटजी यांच्याकडे पाहून त्यांनी त्यांना किंचित झुकून अभिवादन केलं आणि भाषणााला सुरुवात केली. गव्हर्नर म्हणाले, “सर आणि लेडी जमशेटजी, मुंबईकरांच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा असलेल्या ह्या माहिम कॉजवेच्या बांधकामात लेडी आवाबाईनी जो पुढाकार घेतला, त्याबद्दल मी स्वतः आणि इथे उपस्थित असलेला प्रत्येक लहान-मोठा मुंबईकर लेडी आवाबाई जमशेटजी आणि जमशेटजी जीजीभॉय  कुटुंबियांचे अत्यंत आभारी आहोत”. एवढं बोलून पुढच्या भाषणात त्यांनी ह्या कॉजवेच्या बांधकामासाठी ईस्ट इंडीया कंपनीने १८३५ कसे प्रयत्न केले, निधीची कमतरता का होती, लेडी आवाबाई आणि सर जमशेटजींनी कॉजवेच्या बांधकामाचा विषय कसा लावून धरला आणि तडीसही नेला इत्यादी इतिहासाचा आढावा घेतला. ह्या कॉजवेच्या बांधकामासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले होते, त्या सर्वाॅचे त्यांनी आभार मानले. गव्हर्नर पुढे म्हणाले की, “लेडी जमशेटजींचे आभार यासाठीही मानावे लागतील, की लेडी केवळ या कॉजवेच्या बांधकामाचा खर्च करुन थांबलेल्या नाहीत, तर या कॉजवेपर्यंत पोहोचण्याचा जो मातीचा रस्ता (approach road) आहे, तो देखील पक्का करावा म्हणून त्यांनी आणखी २० हजार रुपये देऊ केले आहेत. हा रस्ता झाल्याने माहिमवरून कॉजवेपर्यंत जाण्यासाठी मुंबईकरांना कायमचा पक्का रस्ता उपलब्ध होणार आहे. लेडी आवाबाईंच्या सन्मानार्थ आजपासून कॉजवेसहितच्या या रस्त्याचं नांव ‘लेडी जमशेटजी कॉजवे’ असं ठेवण्यात आलं आहे, याची सर्व मुंबईकरांनी नोंद घ्यावी” गव्हर्नरांनी हे जाहिर करताच, जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी हात उंचावून लेडी जमशेटजींच्या नांवाचा जयघोष सुरू केला.

सर्वांना शांत बसण्याची सुचना करुन, आपल्या पुढच्या भाषणात गव्हर्नर साहेबांनी जमशेटजी जीजीभॉय  यांनी मुंबईच्या विकासात दिलेल्या योगदानाचा दीर्घ आढावा घेतला. जमशेटजींनी मुंबईच्या व्यावहारीक आणि सामाजिक कार्यात घेतलेल्या सक्रिय पुढाकाराची पावती म्हणून, इंग्लंडच्या राणीने सर जमशेटजींना ‘नाईट (Knight)चा किताब दिल्याचं गव्हर्नरांनी जाहिर केलं. नाईटहूडचं सन्मान चिन्ह गव्हर्नरांनी जमशेटजींच्या छातीवर सन्मानाने लावलं. त्याबरोबर समोर उपस्थित असलेल्या मुंबईकरांनी जमशेटजींच्या आणि राणीचा एकच जयजयकार करून आपला आनंद व्यक्त केला..!

आपल्या पुढच्या भाषणात गव्हर्नर साहेबांनी सर्व मुंबईकरांच्या वतीने सर आणि लेडी जमशेटजींचे पुन्हा एकदा आभार मानले आणि त्यांनी आपलं भाषण संपवलं.

गव्हर्नर साहेबांच्या भाषणानंतर जमशेटजी जीजीभॉय  यांचं भाषण झालं. भाषणाच्यी सुरुवातीलाच जमशेटजींनी, लेडी जमशेटजींना मुंबईकरांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल, कंपनी आणि गव्हर्नरसाह्बींचे आभार मानले. ह्या कार्यक्रमात, कॉजवेचं बांधकाम ज्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं, ते कॅप्टन क्रुकशॅंक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचं सांगून, त्यांनी क्रुकशॅंक यांचेही आभार मानले. लेडी जमशेटजींनी कॉजवे व जोडरस्त्याच्या बांधकामात किती रस घेतला होता, हे सांगून त्यांनी लेडी जमशेटजींची, ह्या कॉजवेच्या वापरासाठी कोणत्याही मुंबईकराकडून, मग तो गरीब असो की श्रीमंत, शेतकरी असो वा व्यापारी, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा ‘टोल’ कधीही आकारण्यात येऊ नये, अशी सरकारकडे विनंती केल्याचं सांगितलं. जमशेटजींनी हे सांगताच, गव्हर्नर ॲार्थर यांनी मान हलवून त्यासाठी आपली संमती दर्शवली. समोर बसलेल्या मुंबईकरांनी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला..! मुंबईच्या विकासात मी आणि माझं संपूर्ण कुटुंबीय, जी लागेल ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत, असं म्हणून आपली मुंबईप्रती, मुंबईकरांप्रती आणि कंपनी सरकारप्रती आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन जमशेटजींनी आपलं भाषण संपवलं..!

रात्रीचे आठ वाजले होते. कार्यक्रम संपला. गव्हर्नर आणि त्यांचा ताफा परेलच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या दिशेने निघाला. त्यांच्या पाठोपाठ बाकी सारे निघाले. परेलच्या दिशेने निघालेल्या गाड्यांच्या दिव्यांची माळका लांबवर उजळलेली दिसत होती..!

माहिम कॉजवेचं महत्व-

मुख्य मुंबई पश्चिम दिशेने साष्टीशी जोडली गेली ती ८ एप्रिल १८४५ ह्या दिवशी. हा रस्ता झाला आणि मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीच्या आधाराने वसलेल्या लहान लहान गांवांचं रुपांतर हळुहळू उपनगरांमधे व्हायला लागलं. मुंबई वाढू लागली. पहिली वांद्र्यापर्यंत, नंतर अंधेरीपर्यंत आणि आता तर ती पार दहिसरपर्यंत वाढली आहे आणि अजुनही वाढतेच आहे. त्याचं श्रेय संपूर्णपणे ह्या ‘लेडी जमशेटजी कॉजवे’कडे जातं. डंकन कॉजवेमुळे जशी पूर्व उपनगरांची वाढ झाली, तशीच माहिम कॉजवेमुळे पश्चिम उपनगरांची वाढ झाली. यात फक्त एकच ठळक फरक आहे. पूर्वेला कारखानदारी, उद्योग-धंदे फोफवले, तर पश्चिमेला निवासी वस्ती. विस्तिर्ण समुद्रकिनाऱ्यांमुळे असेल कदाचित, पण मुंबईतीले बडे चित्रपट तारे-तारका, उद्योगपती, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱी नामवंत व्यक्तीमत्व, बडे सरकारी अधिकारी व्हाईट काॅलर नोकरदार इत्यादींनी आपल्या निवासासाठी मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या उपनगरांची निवड केलेली पुढच्या काळात दिसून येते. जर हा रस्ता झाला नसता तर, कदाचित तसं होऊ शकलं नसतं असं वाटावं इतकी ह्या कॉजवेची थोरवी आहे. इतकंच काय, तर महाराष्ट्राचा राज्यकारभार जिथून हाकला जातो, ते मंत्रालयही पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या चर्चगेट या पश्चिम रेल्वेच्या पहिल्या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. पश्चिम रेल्वे धावली ती ह्याच रस्त्याच्या चाकात चाकं मिळवून.

मुंबई आणि मुंबईकरांच्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या असलेल्या या कॉजवेच्या बांधकामाचा खर्च उचलताना, त्या कॉजवेला आपलं नांव द्यायला हवं, असा कोणताही हट्ट त्वांनी धरलेला नव्हता वा तशी अटही आवाबाईंनी घातलेली नव्हती. तरीही त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून, त्यावेळच्या मुंबईकरांनी (पक्षी:सरकारने) आवाबाई जमशेटजी जीजीभॉय , अर्थात लेडी जमशेटजी यांच्या सन्मानार्थ म्हणून या रस्त्याला ‘लेडी जमशेटजी कॉजवे’ असं नांव देण्यात आलं आणि आज पावणे दोनशे वर्षांनंतरही हा रस्ता, नांवात किंचित बदल होऊन ‘लेडी जमशेटजी रोड’ याच नांवाने ओळखला जातो.

पश्चिम उपनगरांतून माहिमची खाडी ओलांडून दक्षिण मुंबईला येण्यासाठी अगदा आता आता पर्यंत हा एकमेंव रस्ता होता. या रस्त्याच्या नजिकचा धारावीतून मुंबई शहराकडे जाणारा रस्ता आणि वरळीला जाणारा सी लिंक, ही बांधकामं खूप नंतरची. वांद्रे-वरळी सी लिंकने तर अद्याप वयाची १० -१२ वर्षही पूर्ण केली असतील-नसतील.

सातत्याने १७५ वर्ष मुंबईकरांच्या सेवेत असणारा हा माहिम कॉजवे किंवा लेडी जमषेटजी रोड, मुंबईकरांची अजुनही विनातक्रार अबोलपणे सेवा करत आहे. रोज ह्या रस्त्याने प्रवास करणारांना ह्या रस्त्यातं मुंबईच्या समृद्धीतलं योगदान लक्षात येणार नाही. ते लक्षात येण्यासाठी आणि ह्या कॉजवेवरुन माहिमची खाडी पार करताना, त्याच्या जन्मदात्रीप्रती मनातल्या मनातल्या का होईना, मुंबईकरांनी कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी हा लेखन प्रपंचं..!

-नितीन साळुंखे

9321811091

९ सप्टेंबर, २०२०.

महत्वाच्या टीपा-

 1. आजचा ‘लेडी जमशेटजी मार्ग’ दादरच्या शिवसेनाभवनपासून सुरू होतो, तो माहिम चर्चवरून जात माहिमची खाडी पार करुन थांबतो. इथून पुढे ह्या रसत्याचं नांव ‘स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड)’ असं हेतं. सेना भवन ते माहिमच्या खाडीपर्यंतचा रस्ता आणि त्यापुढील कॉजवे, म्हणजे पूल, हे लेडी जमशेटजी दातृत्वाचं फलित आहे. तसं दर्शवणारी पाटी पुलाच्या पश्चिमबाजुच्या कठड्यावर लावलेली आहे.
 2. या पाटिवर पुलाचा एकूण खर्च रूपये २,०३,८४६ इतका आला असून, त्यापैकी रुपये १,५५,८०० मात्रचा खर्च लेडी जमशेटजी यांनी केल्याचा उल्लेख आहे. ‘गॅझेटीअर ॲाफ बाॅम्बे सिटी ॲन्ड आयलंड’मधेही असाच उल्लेख आहे. मात्र गव्हर्नर जॉर्ज ॲार्थर यांच्या भाषणात पुलासाठी रुपये १,४७,०००/- तर जोड रस्त्यासाठी रुपये २०,०००/- असे एकूण १,६७,०००/-चा उल्लेख आला आहे. खर्च किती हा मुद्दा इथे गौण असून, तो लेडी जमशेटजी यांनी केला होता, हा उल्लेख महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यावं.
 3. माहिम कॉजवेवरून माहिमहून वांद्र्याला जाताना, जिथे कॉजवे, म्हणजे सुरु होतो, तिथेच डाव्या हाताला पुलाच्या कठड्यावर कॉजवेच्या बांधकामाची माहिती देणारी संगमरवरी पाटी आहे. ही पाटी १९४१ साली जेंव्हा मूळ कॉजवेचं रुंदीकरण केलं गेलं, तेंव्हा लावलेली आहे(सोबत त्या पाटीचा मी काढलेला फोटो देत आहे) मूळ पाटी आता कुठे असेल, हे केवळ महानगरपालिका सांगू शकेल. सध्याच्या पाटीवर पुलाच्या उदघाटनाची तारीख केवळ १८४३ असं वर्ष दिलेलं आहे. वास्तविक तत्कालीन शासकीय गॅझेटमधे दिनांक ८ एप्रिल १८४५ रोजी सदरचा कॉजवे जनतेसाठी खुला करण्यात आला, असा उल्लेख आहे. कॉजवेच्या उद्घाटनाची म्हणून तिच तारीख ग्राह्य धरायला हवी.
 4. लेडी जमशेटजी यांनी माहिम कॉजवेच्या बांधकामाचा खर्च का उचलला, याच्यामागची कारणं दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे, आवाबाईंची वांद्र्याच्या जरीमरी मातेवर श्रद्धा होती आणि तिच्या दर्शनाकरिता त्यांना बोटीतून वांद्र्याला खाडी पार करून जावं लागायचं. ते टाळण्यासाठी त्यांनी माहिम कॉजवे बांधला. दुसरी आख्यायिका सांगते कीं, आवाबाईंची वांद्र्याच्या माऊंट मेरीवर, म्हणजे बोलीभाषेतील मोत मावलीवर, श्रद्धा होती आणि आवाबाईना मुलगी झाल्यास, त्या माहिमच्या खाडीवर स्वखर्चाने पूल बांधतील, असा नवस त्या मोत मावलीला बोलल्या होत्या आणि म्हणून त्यांनी कॉजवे बांधला. लेडी जमशेटजी आणि माहिमचा कॉजवे यांच्यातील नातं विशद करताना, वेळोवेळी ही दोन उदाहरणं समोर येतात. मात्र लेडी जमशेदजी यांनी, खाडी ओलांडताना बोटी बुडून गरीब मुंबईकरांची प्राण आणि वित्तहानी होऊ नये, या एकमेव मानवतावादी विचारातून हा कॉजवे बांधण्याचा खर्च उचलला, हे गव्हर्नर ॲार्थर आणि जमशेटजी जीजीभॉय  यांनी त्यांच्या उद्घाटनीय भाषणात जाहिररित्या सांगितलं, ते जास्त खरं आहे. मुंबईतला पारसी समाज धनाढ्य, परोपकारी आणि कनवाळू आहे, याची शेकडो उदाहरणं इतिहासात आणि आजही सापडतात. समाजाकडून कमावलेलं धन सामाजिक कारणांसाठी खर्च करण्याच्या पारसी समाजाच्या परोपकारी मानसिकतेच्या परंपरेशी सुसंगत असंच आवाबाईंचं वागणं होतं.

संदर्भ-

 1. ‘मुंबईचे वर्णन’-गोविंद मडगांवकर, सन १८६२.
 2. ‘मुंबईचा वृत्तांत’ -बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो शिंगणे, सन १८८९. पुनर्मुद्रण १९८०.
 3. ‘स्थल-काल’- डॉ. अरुण टिकेकर, सन २००४.
 4. Gazetteer of Bombay City & Island 1884, Vol. I, p. 365-366 with footnote
 5. Bombay Place-Names and Street-Names; An Excursion Into the by-Ways of the History of Bombay Cit, by Samuel T. Sheppard. P. 91-92
 6. Essay in‘Parsee khabar’ on 10 June 2017. Availbale on internet.
 7. Bombay-The joining of seven islands(1668-1838)- web indianculture.gov.in
 8. Bombay in the days of Queen Anne-Book by Council of the Hakluyt Society -1933- p21.
 9. Journal of Historical Geography – Making Bombay Island:Land Reclamation & Geographical Conceptions of Bombay- 1661-1728. – Essay by Tim Riding.
 10. दिनांक ८ एप्रिल, १८४५ रोजी झालेल्या माहिम कॉजवेच्या उद्घाटनाचा संपूर्ण वृत्तांत, दिनांक १६ जून, १८४५ रोजीच्या लंडन येथे प्रकाशित झालेल्या ‘The Sun’ ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला होता. त्या वृत्तांताचं स्वैर भाषांतर मी वर केलेलं आहे.
 11. माहिम कॉजवेवरचा हा सविस्तर लेख, जन्माने आणि कर्मानेही मुंबईवर नसलेला, परंतु मुंबईवर मनस्वी प्रेम करणारा माझा मित्र, ज्याला मी अद्याप कधीही भेटलेलो नाही, भारत महारुंगडे यांने केलेल्या अमुल्य मदतीशिवाय लिहिणं शक्यच झालं नसतं. भारतने मला जुनी पुस्तकं, संदर्भ, कागदपत्र आणि ‘द सन’चा अख्खा पेपर उपलब्ध करुन दिला. भारतला त्याचे आभार मानलेले कदाचित आवडणार नाहीत, तरीही त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेख मी त्यालाच अर्पण करतो आहे..!
 12. Wikipedia

फोटो क्रेडीट-

फोटो क्र.१- माझे मित्र व ‘Mid-Day’ या इंग्रजी दैनिकाचे प्रिन्सिपाॅल फोटोग्राफार श्री. आशिष राणे यांनी टिपलेला आहे.

फोटो क्र.२ – सन १८५० सालचं विलियम कार्पेन्टर यांनी काढलेलं हे तैलचित्र, पुणेकर असुनही मुंबईवर निस्सिम प्रेम करणारे, मुंबईचे अभ्यासक, लेखक श्री. संभाजी भोसले यांनी उपलब्ध करुन दिलं आहे.

इतर फोटो-इंटरनेटवरून घेतलेले आहेत.

आभार –

मुंबईच्या इतिहासाच्या शोधकामातील माझे सहकारी श्री. सुधीर मोरे, माझा मित्र संतोष(बाळा) माने आणि माहिम कोळीवाड्याचे पाटील श्री. नितीन पाटील यांनी हा लेख लिहिताना मोलाची मदत केली आहे, त्यांचे आभार. तसेच इतिहास लेखनाच्या दृष्टीन् वेळोवेळी मला मोलाच्या सूचना करणारे ज्येष्ठ पत्रकार, श्री. कुमार कदम यांचाही मी आभारी आहे.

माहिम काॅजवेवर आज असलेली पाटी