‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’
शोध ‘दादर(पश्चिम), मुंबई क्र. ४०० ०२८’चा; व्हाया माहिम..
मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतला आजचा सर्वात महत्वाचा भाग असलेल्या ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही. मुंबई शहराचा इतिहास सांगणाऱ्या ‘महिकावतीच्या बखरीत वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नायगांव, परळ, सायन इत्यादींचा उल्लेख आहे.।ब्रिटीशकालीन इतिहासाच्या पुर्वार्धात, वरील ठिकाणांसेबत कुलाबा, माहिम, माजगांव, माटुंगाही येतं, पण ‘दादर’ मात्र कुठंही लागायचं नाही.
मुंबईच्या हृदयस्थानी वसलेल्या, आजच्या ‘दादर’सारख्या अतिमहत्वाच्या भागाचा उल्लेख इतिहासात का नाही, हा कुतुहलमिश्रीत प्रश्न मला नेहेमी पडायचा. हा प्रश्न अधुनमधून मला अस्वस्थ करायचा. पण, धूर दिसतोय म्हणजे आग आहे, या न्यायानं, आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, मग ते तेव्हांही असलं पाहिजे. आणि जुन्या काळातही जर दादर असेल, तर मग ते कुठे आणि कोणत्या स्वरुपात, हा प्रश्नही सहाजिकच समोर उभा राहातो..!
या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना, उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांसोबत तर्कबुद्धीही वापरावी लागेल, हे हळुहळू माझ्या लक्षात येऊ लागलं आणि अशाप्रकारे तथ्य आणि तर्क वापरून, इतिहासातील दादरच्या अस्तित्वासंबंधी मला जे आकलन झालं, तेच आपल्यासमोर ठेवतोय..!
सुरुवात करताना ‘दादर’ या नांवाच्या प्रचलीत व्युत्पत्तीपासून करतो.
स्वत:च्या कपाळावर मुंबई क्रमांक १४ आणि २८ धारण करणाऱ्या मुंबईतल्या या सध्याच्या दादर परिसराला नांव मिळालं, ते ‘दादर म्हणजे जिना’ या अर्थामुळे, अशी एक लोकप्रिय कथा सांगितली जाते. परंतु, ही कथा मुळीच पटण्यासारखी नाही. कारण त्याकाळचं मुंबई शहराचं अस्तित्व होतं, तेच मुळी कुलाब्यापासून भायखळा-माजगांव पर्यंत. त्यामुळे सर्व लोकवस्ती, व्यापार उदीम, सरकारी व सामान्य लोकव्यवहार मर्यादीत होते, ते फोर्टच्या तटबंदीच्या आत आणि तटबंदी बाहेरच्या मैलभरच्या परिघात.
मुंबईच्या इतिहासप्रसिद्ध सात बेटांमधे, चहुबाजुंनी बांध घालून समुद्राच्या दिशेने आत येणारं पाणी अडवण्यापूर्वी ही सातही बेटं सुटी सुटी आणि टेकड्यांच्या स्वरुपात होती. आजही मुंबई शहरातल्या कधीकाळी अस्तित्वात असलेल्या ह्या टेकड्या सौम्य स्वरुपात आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या शिवडी-परळ, वरळी, माजगांव परिसरात फिरताना अनुभवायला येतात. ॲन्टाॅप हिल, मलबार हिल हे परिसर तर आपल्या नांवातच ‘हिल’ धारण करताना आपल्याला सांप्रत काळातंही दिसून येतात. टेकडी आली की, चढ-उतार आलेच. त्यामुळे जुन्या मुंबईच्या प्रत्येक बेटरुपी टेकडीवर चढ-उतार असणारच. चढ-उतार करणं सोपं जावं म्हणून, त्यापैकी प्रत्येक किंवा काही महत्वाच्या टेकड्यांच्या उतारावर पायऱ्या खोदलेल्या असणारच. हे म्हणणं अधिक स्पष्ट करण्यासाठी, मला मुंबईच्या मलबार हिलचं उदाहरण द्यायला आवडेल.

मलबार हिलच्या पूर्व उतारावर, अगदी आजही एक रस्ता आपल्या नांवात ‘सिरी रोड’ हे नांव धारण करुन अस्तित्वात आहे. ‘सिरी रोड’ या नांवातलं ‘सिरी’ हे विशेषण ‘शिडी’ या अर्थाने आलेलं आहे. मलबार हिल हा त्याकाळातल्या (आजच्या काळातल्याही) बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि कुबेरपुत्र/कन्यांच्या निवासाचा परिसर होता. त्याही पूर्वी मलबार हिलवरचं वाळकेश्वर म्हणजे हिन्दूंचं प्रसिद्ध तिर्थस्थळ होतं. आजही तिकडची अनेक देवळं आणि बाणगंगेचा तलाव याची साक्ष देत खडे आहेत. थोडक्यात मुसलमान राजवट, नंतरची पोर्तुगीज सत्ता आणि त्या नंतरच्या ब्रिटिश काळातही मलबार हिल हे अत्यंत महत्याचं ठिकाण होतं. त्यामुळे त्या परिसरात लोकांची सातत्याने ये-जा असे. मलबार हिलवर ये जा करणं किंवा चढ-उतार करणं सोपं जावं म्हणून, टेकडीच्या उतारावर पायऱ्या खणलेल्या होत्या. या पायऱ्यांना लोकबोलीतील ‘शिडी’ असं साधं, सोपं आणि कुणालाही चटकन बोध होईल, असं नांव दिलेलं होतं. काळाच्या ओघात पायऱ्या लुप्त झाल्या आणि त्या जागी वर चढत जाणारी प्रथम कच्ची आणि मग पक्की सडक झाली. तिथल्या ‘शिड्या’ आता नसल्या तरी, नव्याने झालेला ‘रोड’, आपल्या नांवात अजुनही ‘सिरी, अर्थात शिडी’ घट्ट कवटाळून आहे. पायऱ्यांवरून नांव धारण केलेला ‘सिरी रोड’ इतिहासात अजरामर झाला आहे. मग असं असताना, जुन्या काळातलं ‘दादर’ नेमकं कुठे असावं, हेच जिथे ठामपणे सांगता येत नाही, अशा दादरचं नांव ‘जिन्यां’वरून आलंय, ही व्युत्पत्ती पटण्यासारखी नाही.

दादरचं नांव ‘जिन्यां’वरुन मिळालं आहे, ही व्युत्पत्ती न पटण्यासाठी आणखी एक उदाहरण आहे. दादर इथले जिने सुप्रसिद्ध असावेत, म्हणून मुंबईतल्या ह्या भागाला दादर नांव मिळालं ही व्युत्पत्ती बरोबर आहे, असं क्षणभर गृहीत धरलं, तर मग दादर या नांवाची आणखीही काही ठिकाणं आहेत. त्यातली काही मला माहित आहेत. त्यातलं एक दादर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात, पेण शहरापासून साधारणत: ७ किलोमिटर अंतरावर आहे. दुसरं एक दादर अलिबाग तालुक्यात चौल गावानजिक आहे. ओळखीसाठी ह्या दादरला चौल-दादर असं म्हणतात. अगदी दादर नसलं तरी, आपल्या नांवांत ‘दादर’ धारण करणारा पाडा, ‘दादर पाडा’, उरण नजिक आहे, तर असाच एक ‘दादरपाडा’ पालघर जिल्ह्यातील केळवे-माहिमजवळ आहे. या शिवाय, महाराष्ट्र-गुजरात सिमेवरच्या दमणगंगा नदीच्या दक्षिण तिरावरचं ‘दादरा-नगर हवेली’ हा केन्द्र शासित प्रदेश तर प्रसिद्धच आहे. ही सर्व ठिकाण नांवात दादर धारण करुन आहेत. मग जर का मुंबईचं दादर नांव ‘जिन्या’वरून आलं असं क्षणभर मानलं, तर मग या इतर ठिकाणी असलेल्या ‘दादर’ची नांव कशी पडली, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘जिना=दादर’ ह्या व्युत्पत्तीत सापडत नाही. सबब, मुंबईचं दादर हे नांव शिडी, जीना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेयरकेस इत्यादी शब्दांनी ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं, हे तर्कदृष्ट्या पटत नाही.


पेणनजीकच दादर आणि उरण नजीकच दादर
आता, जिना अथवा पायऱ्यांमुळे मुंबई-दादर नामक स्थानाचा उगम झाला ही व्युत्पत्ती खोडून काढल्यावर, एकच शक्यता उरते;आणि ती म्हणजे इतिहासातही आजचं दादर, ज्याची दखलही घ्यावीशी वाटू नये अशा नगण्य स्वरुपात अस्तित्वात होतं, ही. दादर अस्तित्वात होतं, तर मग नेमकं कुठं लपलं होतं, याचा शोध घेणं क्रमप्राप्त होतं. सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे, धूर दिसतोय म्हणजे आग आहे, या न्यायानं, आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, मग ते तेव्हांही असलं पाहिजे. पण कुठं?
इतिहासात दडलेल्या दादरचा, वर्तमान काळात शोध घेताना, मी ‘महिकावतीची बखर’ या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. ह्या बखरीत उल्लेख केलेल्या प्रमूख घटना जरी इ.स. ११३८ ते इ.स. १३४८ अशा साधारण २१० वर्षांच्या कालावधीत घडलेल्या असल्या तरी, ही बखर त्यानंतरच्या वेगवेगळ्या काळात लिहिली गेली आहे. बखरीचं लिखाण इ.स. १८१९ मधे समाप्त झालं आणि त्यानंतर जवळपास १०५ वर्षांनी, म्हणजे इ.स.१९२४ मधे राजवाडेंनी त्यावर भाष्य केलं आहे.
दादरचा शोध घेताना ‘महिकावतीची बखर’ आधारभूत घेण्याच कारण म्हणजे, या बखरीत उल्लेख केलेल्या स्थळांचा आणि स्थलनामांचा वर्तमानातील मुंबई शहराशी दाट संबंध आहे. बखरीत उल्लेख केलेली ७-८शे वर्षांपूर्वीची मुंबई शहरातील व उपनगरातील ठिकाणं, त्यांच्या नांवांचा किंचितसा अपभ्रंश होऊन आजही मुंबई शहरात नांदताना दिसतात. उदा. वाळुकेश्वर, भाईखळे, जुहू, आंधेरी इत्यादी. यामधे आजच्या मुंबई शहरातील माहिम व्यतिरिक्त, वाळुकेश्वर आणि भाईखळे अशी केवळ दोन नांवं आहेत, इतर सर्व नांवं साष्टीतली आहेत.





महिकावतीच्या बखरीत दिलेली गावाची तेंव्हाची नांवं
बखरीत या नावांचा उल्लेख आहे याचा अर्थ, ती नांवं बखरपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत असा होतो. नांवं आहेत, मग ती तशी पडण्यामागे काही तरी कारण असणारच, हे बरोबर. पण मग ते कारण, त्याकाळातलं लोकजीवन आणि त्याकाळातल्या लोकभाषेत शोधावं लागेल आणि त्या काळातलं जीवन आणि बोली नेमकी काय होती, हे आता सांगणं अवघड आहे. त्यामुळे त्या नांवाची व्युत्पत्ती, वर्तमानाच्या फुटपट्ट्या लावून शोधण्यात काही अर्थ नाही. बखरीत दादरचा उल्लेख नाही, पण आजच्या दादरच्या आजुबाजूची काही ठिकाणं त्यात आहेत आणि म्हणून केवळ याचसाठी महिकावतीची बखर आधारभूत म्हणून घेतली आहे. बखरीत दिलेली, आजच्या दादरची आजुबाजूची ठिकाणं लक्षात घेऊन, इतिहासील दादरचा नेमका ठिकाणा काय होता, याचा शोध तर्कबुद्धी वापरून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आता दादरचा शेध घेण्यासाठी आपण आजपासून सुमारे आठ-नऊशे वर्ष मागे जाऊन, म्हणजे ‘महिकावतीची बखर’ मधल्या, मुंबईचा राजा ‘प्रताप बिंम्बा’च्या काळाचा धावता आढावा घेऊ.
गुजरातेतल्या अनहिलवाडच्या चालुक्याचा मंडलिक असलेल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंम्बाचा भाऊ प्रताप बिंम्ब, शके १०६०, म्हणजे इसवी सन ११३८ मध्ये, पैठण मार्गे उत्तर कोकणवर स्वारी करून आला. उत्तर कोकण म्हणजे साधारणत: नर्मदेच्या दक्षिण तिरावरल्या, गुजरातेतल्या, दमण पासून ते मुंबईच्या मलबार हिलपर्यंतचा प्रदेश. इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंम्बाने दमणवर स्वारी करुन, दमण सहित चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहिम, वसई पर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला.
नव्याने काबिज केलेल्या प्रदेशात आपल्या मूळ देशातून, म्हणजे गुजरातेहून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी इत्यादी कुळांना आणून वसवलं. पैठणहून काही लोकांना या परिसरात वास्तव्यासाठी निमंत्रण धाडलं. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर प्रताप बिंम्बाने केळवे-माहिमला आपली नविन राजधानी वसवली आणि इसवी सन ११४२ मधे पुढच्या मोहिमेस, म्हणजे वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश सर करण्यास जाण्याची आपल्या सेनापतीस आज्ञा केली. प्रताप बिंम्बाच्या आज्ञेनुसार, त्याच्या सेनापतीने वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश काबिज केल्यावर, राजा प्रताप बिंम्ब मुंबईतल्या माहिम बेटावर पोहोचला आणि तिथे त्याने आपली राजधानी स्थापन केली आणि आपल्या राजधानीस त्याने ‘माहिम’, अर्थात महिकावती असं नांव दिलं. आपण आज जो भाग ‘माहिम’ म्हणून ओळखतो, त्याचा ‘माहिम (महिकावती)’ ह्या नांवाचा पहिला उल्लेख इथेच सापडतो.
बिंम्ब राजा इथे येण्यापूर्वीही मुंबईची बेटं अस्थित्वात होती, निरनिराळ्या काळात अनेक राजघराण्यांनी मुंबई बेटांवर कमी-अधिक काळ राज्यही केलं होतं. परंतु त्या काळात मुंबईच्या सात बेटांची नांवं काय होती, त्याची नोंद मला तरी कुठे सापडली नाही. प्रताप बिम्बाने मुंबईतल्या माहिम बेटावर राजधानी केल्यावर, या बेटाचं नामकरण त्याने ‘माहिम’ असं केलं. मुंबई-माहिम’ इथल्या आपल्या नविन राजधानीच्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी, केळवे-माहीम परिसरातील सोमवंशी-सूर्यवंशी कुळातील अनेक कुटुंबं आणली आणि त्यांना माहिम बेटावर वसवलं. आजही माहिममधे अद्याप टिकून असलेल्या अनेक जुन्या माहिमकरांची गांव आणि नातेसंबंध केळवे-माहिम-पालघर-चिंचणी आणि परिसरात सापडतात, ते यामुळेच.
बिंम्बाने मुंबई-माहिमला आपली राजधानी वसवल्या नंतरच्या काळातही, बिम्बाच्या केळवे-माहिम परिसरातून लोक इथे वस्ती करण्यासाठी येत असावेत. आपापल्या मूळ गांवाशी घट्ट नाळ जुळलेल्या या लोकांनी, माहिम परिसरात वसताना, आपल्या केळवे-माहिम येथील मूळ गांवांची आणि तेथील दैवतांची नांवंही सोबत आणली आणि ती नव्या ठिकाणच्या वस्त्यांना दिली असावीत, असं म्हणता येतं. ती नांवं आजही टिकून असलेली आपल्याला दिसून येतं. राजा प्रताप बिम्बाने आपली जुनी राजधानी केळव्याकडच्या ‘माहिम’चं नांव दिलेलं आहे. ही दोन्ही ठिकाणं समुद्राच्या सानिध्यात आहेत. इथून जवळच ‘धारावी’ आहे, जी विरार पलिकडच्या प्रदेशातही सापडते. किंबहूना मुंबई-माहिम आणि मुंबई-धारावी हे जोड प्रदेशही आहेत. तिकडचं ‘नायगांव’, मुंबईतही पाहायला मिळतं. राजा बिंम्बाची कुलदेवता श्रीशाकंबरी, अर्थात श्रीप्रभादेवी मुंबई-माहिमातच होती. केळवे-माहिम परिसरातली श्रीशितळादेवी मुंबई-माहिमलाही आहे. ह्या काही मोजक्या(च) उदाहरणांवरून, मुंबई-माहिम परिसर ही, केळवे-माहिम परिसराची प्रतिकृती (Replica) होती किंवा आहे, असं अनुमान काढल्यास ते फारसं चुकणार नाही.
पूर्वीच्या राज्यकर्त्यांची ही पद्धतच असावी, असं इतिहासावरून म्हणता येतं. एखाद्या राजाने नवीन ठिकाणी राज्य वसवलं की, आपल्या जुन्या ठिकाणची आणि देवतांची नांव नव्या ठिकाणी वस्ती करताना देण्याची प्रथा असावी. म्हणून तर एकाच नांवाची अनेक ठिकाणं वेगवेगळ्या जागी पाहायला मिळण्याचा अनुभव येतो.
आता, वरच्या हकिकतीशी ‘दादर’चा कसा काय संबंध येतो, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर, तो तसा संबंध तर्कबुद्धी वापरून प्रस्थापित करता येतो. केळवे-माहीम परिसरातील ठिकाणांची नांवं, प्रताप बिंम्बाने मुंबई-माहिम परिसरात दिल्याचं आपण पाहिलं. तोच न्याय लावला तर, आजच्या दादरचं, ‘दादर’ हे नांव कशावरुनही पडलेले नसून, ते इथल्याच एका लहानशा वस्तीचं असावं, असा तर्क सहज करता येतो.
वर आपण पाहिलं की, राजा बिंम्बाने केळवे-माहिम-पालघर भागातली काही कुळं मुंबई-माहिम परिसरात वस्ती करण्यासाठी आणली आणि ही माणसं आपल्यासोबत तिथली नांवं आणि दैवतं घेऊन मुंबई-माहिम परिसरात वसली. या केळवे माहिम-पालघर परिसरात ‘दादरपाडा’ नांवाचा भाग आहे. ह्या दादरपाड्याचं स्थान मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. किनारपट्टीवर वर उत्तरेला माहिमचा समुद्रकिनारा आणि दक्षिणेला केळव्याचा किनारा यांच्या बरोबर मधे, समुद्राची एक लहानशी खाडी आत येते, या खाडीच्या किनाऱ्यावरच दादरपाडा वसलेला आहे आणि या खाडीला ‘दादरपाडा खाडी’ असं नांव आहे. इथून नजिक मांगेलवाडा आहे आणि मांगेलवाड्यापासून थोड्या अंतरावर खालच्या बाजुला श्रीशितळादेवीचं मंदिरही आहे. दादरपाडा माहिम आणि केळवा या दोन ठिकाणांच्या सिमेवर आहे. नेमकी अशीच भौगोलिक ठेवण आणि हिच वैशिष्ट्य मुंबई-माहिमच्या परिसरात असलेली दिसतात आणि मग याच परिसरात कुठेतरी मुंबईतलं मूळ दादर असावं, ह्या तर्काला पुष्टी मिळते.

या दादर पाडा भागातील किंवा त्या परिसरातील काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या सोबत आले असावेत व ते माहीम बेटाच्या दक्षिणेच्या टोकाला, म्हणजे आजच्या प्रभादेवी परिसरात वसले असावेत. मुंबई-माहिमचा समुद्रकिनारा आणि शेजारीच असलेली, माहिम आणि वरळी बेटांच्या मधली खाडी, नजिकच असलेलं शितळादेवीचं मंदिर आणि मुंबई-माहिममधे असलेला मांगेलवाडा(आता याचं नांव मांगेलवाडी असं झालं आहे) पाहून, त्यांना या भागाचं, आपल्या मूळ स्थानाशी साम्य दिसलं असावं आणि आपल्या इथल्या वस्तीला, ‘दादर पाडा’ असं आपल्या जुनंच नांव दिलं असावं आणि काळाच्या ओघात, त्या नांवातला ‘पाडा’ गळून आजचं ‘दादर’ झालं असावं, असं म्हटलं तर चुकू नये. मुख्य माहिमच्या वरळीकडच्या दक्षिण सिमेवर वसलेली ही लहानशी पाडा स्वरुपातली दादरची वस्ती असावी असा अंदाज बांधता येतो.
पूर्वी हा मुख्य माहिम बेटाचाच भाग असल्याने, त्याला स्वतंत्र अस्तित्व नसावं. या वस्तीचं आजचं नेमकं ठिकाण (अर्थात नकाशातील जुन्या खुणांचा आधार घेऊन) सांगायचं तर, कबुतरखाना- पोर्तुगीज चर्च ते किर्ती काॅलेजच्या किनारपट्टीच्या आसपासचा किंवा दरम्यानचा हा भाग असावा. इथून अगदी जवळच जवळपास हजार वर्षांचा इतिहास असणारं प्रभादेवीचं स्थान आहे. याच परिसरात पोर्तुगीज चर्च आहे. स्मशानभुनीही जवळच, समुद्रकिनाऱ्यावर आहे. देवालयांचं किंवा स्मशानाचं स्थान वस्तीच्या काहीसं दूर, गांवच्या सिमेवर असतं, हा भाग लक्षात घेतला तर, इथे माहिमची सिमा संपत असावी आणि त्याच्या आसपासच बिंम्बाच्या काळात नविन ‘दादर पाडा’ वसला असावा, असा अंदाज करता येतो. आजच्या एकविसाव्या शतकातही हा परिसर आपलं जुनं स्वरुप बरचसं टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे, असं आज त्या भागाकडे पाहाताना लक्षात येतं.
दादर इथेच असावं, या गृहितकाला आणखी बळकटी मिळण्यासाठी सोबतची आकृती क्र. १ पाहावी. ही आकृती सन १८३८ पर्यंत मुंबईची सातही बेटं, समुद्राच्या दिशेला बांध (embankment) घालून एकमेकांना जोडून झाल्यानंतरची, परंतु रेल्वे सुरू होण्यापूर्वीची आहे. या आकृतीत समुद्राच्या बाजुला घातलेले बांध दिसत आहेत. बांध घालून पाणी आत येणं थांबवलं असलं तरी, मधल्या बराचशा जागांमधे भरणी करायची होती. ज्या काही थोड्या जागांमधे भरणी करुन झाली होती, तिथे थोडीशी शेती(rice fields) होत होती. या शेतांतून बेटांना एकमेकांना जोडणाऱ्या पायवाटा असल्या तरी अद्याप रस्ते व्हायचे होते, हे या आकृतीतून स्पष्ट दिसतं. वरळी आणि माहिमला जोडणाऱ्या बांधावरुन माहिमला येणं सोपं झालं असल तरी, परेलहून माहिमला जायचं तर सायन-धारावी करुन जावं लागत असे. ते कसं, हे अधिक स्पष्ट होण्यासाठी सोबत सन १८९५ सालचा नकाशा दिलाय, तो पाहा.
आणखी एक, नकाशा पाहाताना आपण त्या काळात आहोत, अशी कल्पना करा, मग त्याकाळातलं माहिम आपल्याला अधिक चांगलं समजून घेता येईल व दादरचा शोधही सोपा होईल.

सन १८९५ मधे ‘टाईम्स औफ इंडीया’ने प्रकाशित केलेला मुंबई शहराच्या नकाशा पाहा. हा नकाशा १८९५ मधला आहे, अशी माहिती ‘बोरीबंदरची म्हातारी’, अर्थात टाईम्स औफ इंडीया सांगत असली तरी, तो १८९६ ते साधारण पुढच्या पांच-सात वर्षातला असावा. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, नकाशाच्या अगदी वरच्या बाजुला जो ‘माहिमचा (वांद्रे आणि माहिमला जोडणारा) काॅजवे’ दिसतोय, त्या काॅजवेच्या शेजारीच क्वारंटाईन कॅम्प आहे. हा क्वारंटाईन कॅम्प, सन १८९६सालात मुंबईत प्लेगची साथ आली होती, तेंव्हा प्लेग बाधितांना आणि बाहेरुन मुंबई शहरात येणारांना विलगिकरणात, म्हणजे आयसोलेशनमधे ठेवण्यासाठी बांधला होता.


लाल नकाशा १८९५ चा असून, दुसरा नकाशा १९०९चा आहे. सुस्पष्ट नकाशे पाहण्यासाठी कृपया https://bit.ly/34oy2W7 आणि https://bit.ly/3laUxnR या लिंक्स क्लिक करावे.
या नकाशात दिसत असलेल्या माहिम काॅजवेपासून आपण खाली दक्षिण दिशेने येणाऱ्या रस्त्याने, ‘लेडी जमशेटजी मार्गा’ने चालत निघालो की, लगेचच आपल्याला सेंट मायकेल चर्च दिसतं आणि चर्चच्या वरच्या अंगाला लागून एक रस्ता आपल्या उजवीकडे गेलेला दिसतो. हा ‘मोरी रोड’. ह्या रस्त्याच्या कोपऱ्यात ‘FBS’ नांव दिलेला एक लहानसा चौकोन दिसतोय. ही त्याकाळातली कस्टम्सची चौकी. सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेटं ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या ताब्यात येण्यापूर्वी, साष्टीतून माहिममार्गे मुख्य मुंबई शहरात येताना, इथे कर भरावा लागत असे. साष्टी ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर हा कर थांबला असला तरी, चौकी तशीच राहिली असावी. आजही सरकारी पिवळ्या रंगात रंगवलेली ही चौकी वा चौकींचा लहानसा समूह आपल्याला मायकेल चर्चच्या समोरच्या बाजुच्या सिग्नलला लागून असलेला दिसू शकेल. चर्च व चौकीला लागून असलेला, आपल्या उजवीकडून जाणारा ‘मोरी रोड’ पुढे ‘धारावी रोड’ बनून, व्हिन्सेंट रोड ओलांडून सायन किल्ल्याकडे गेलेला दिसेल. परळहून माटुंगा-धारावी करत माहिम गांवात पोहोचायचा, त्या काळातला हा एक(च) महत्वाचा मार्ग होता. हा रस्ता सध्या आपण तिथेच सोडून देऊ आणि पुन्हा सेंट मायकेल चर्चपाशी ‘लेडी जमशेटजी रोड’वर येऊ. ह्या नकाशीत दिसणारा ‘लेडी जमशेटजी रोड’ हा दादरचा ठिकाणा शोधण्यासाठी महत्वाचा दुवा असणार आहे, त्यामुळे ह्या रोडचं बोट सोडून चालणार नाही.

सेंट मायकेल चर्चहून लेडी जमशेटजी मार्गाने आपण सरळ खाली दक्षिणेच्या दिशेने आपण निघालो की, थोडं पुढे आपल्याला उजव्या हाताला पोस्ट औफिस (PO) लागतं. तसंच पुढे चालत निघालो की, आपल्याला आपल्या डाव्या हाताला, लेडी जमशेटजी रस्त्याला फुटणारा आणि कॅडेल रोडला जाऊन मिळणारा एक रस्ता जाताना दिसतो. हा ‘माहिम बझार क्राॅस रोड’. ह्या रस्त्याची आजची नेमकी ओळख सांगायची तर, वनिता समाज, स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक, हिंदुजा हाॅस्पिटल करत वीर सावरकर मार्गाने माहिमच्या दिशेने आलो की, बाॅम्बे स्काॅटीश शाळेच्या पुढे आपण उजवं वळण घेऊन लेडी जमशेटजी मार्गावर जातो. वीर सावरकर मार्गावर जिथे आपण उजवं वळण घेतो, तिथेच हा मूळ ‘माहिम बझार रोड’ सुरू होतो आणि लेडी जमशेटजी मार्गावर जाऊन मिळतो. हा एक दिशा मार्ग आहे आणि या रस्त्याचं आजचं नांव, ‘शितळादेवी टेम्पल रोड’. हा रस्ता लेडी जमशेटजी मार्गाला जिथे मिळतो, तिथेच एका कोपऱ्यावर ‘अवर लेडी औफ व्हिक्टरीज चर्च’ आणि व्हिक्टोरीया हायस्कूल आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यावर शिकळादेवीचं मंदिर आहे.
या रस्त्याबद्दल चार शब्द अधिक लिहिण्याचं कारण म्हणजे ही जुन्या माहिम गांवाची मूळ हद्द. शिवाय ह्या रस्त्यावर येण्यासाठी कॅडेल रोडवर जिथे आपण उजवं वळण घेतो, तिथेच कोपऱ्यावर, हरी ओम या मुर्ती विक्रिच्या दुकानाच्या मागे ‘मांगेलवाडी’ आहे. मुंबई-माहिम, शितळादेवी ह्या दोन खुणांबरोबरच, ह्याच परिसरात ‘मांगेलवाडी’ असणं, हा एक दादरचा शोध घेतानाचा महत्वाचा पुरावा..!
तसंच पुढे आलो की आपल्याला ‘लेडी हार्डींग्स रोड’ आडवा जातो. हा रस्ता म्हणजे, माटुंगा रोड स्टेशनहून वीर सावरकर (कॅडेल रोड) रोडला जाऊन मिळणारा आजचा ‘टि. के. कटारीया’ मार्ग. हा रस्ता लेडी जमशेटजी मार्गाला जिथे छेदतो, तिथे इशान्य कोपऱ्यात पेट्रोल पंप आहे, अग्नेय कोपऱ्यात काशी विश्वेशराचं पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजुला पूर्वी ‘गोपी टॅन्क’, म्हणजे गोपी तलाव होता. तो पूर्वीच बुजवला असला तरी, त्याचं नांव अद्याप प्रचलित आहे. गोपी टॅन्कच्या समोर, पश्चिमेला एकमजली इमारत आहे आणि त्यात आज ‘आपलं महानगर’चं कार्यालय आहे आणि कटारीया रस्त्याच्या वायव्य कोपऱ्यात ‘शोभा हाॅटेल’ आहे. या परिच्छेदात वर्णन केलेली, लेडी हार्डींग्स रोड आणि गोपी टॅन्क वगळता इतर ठिकाणं नंतरच्या काळातली असल्याने, ती नकाशात सापडणार नाहीत, पण मनात असु देत..!
ह्या चौकातून लेडी जमशेटजी मार्गाने पुन्हा पुढे, रस्त्याच्या आजुबाजूला सर्व मोकळ मैदान दिसेल. त्या मैदानाच्या मोकळ्या जागांत आजचं सिटी लाईट, राजा बढे चौक, शिवसेना भवन आपापल्या जागी ठेवत, नकाशात दिसणाऱ्या ‘बाॅम्बे वुलन’पाशी थोडं थाबा. ही बाॅम्बे वुलन म्हणजे कालची ‘कोहिनूर मिल’ किंवा आजचा ‘कोहिनूर स्क्वेअर’. इथून लेडी जमशेटजी रोड डावं वळण घेऊन पुढे चालू लागतो (आज हा रस्ता दादरचा न. चिं. केळकर रस्ता म्हणून ओळखला जातो) आणि काही अंतर पुढे जाऊन उजव वळण घेतो. ह्या उजव्या वळणावर एक निळ्या रंगाचा चौकोन दिसतोय. हा तेंव्हा तिथे असलेला तलाव. ह्या कालच्या तलावापाशीच पूर्वेकडून येणारा आजचा टिळक पूल थांबतो. हा तलाव बुजवून आजचं प्लाझा थिएटर आणि वीर कोतवाल उद्यान तयार केलं, असं अनुमान काढता येतं. इथून पुन्हा पुढे जात लेडी जमशेटजी मार्ग एका चौकात जांऊन थांबतो. हा चौक म्हणजे आजचा कबुतरखाना किंवा गोल देऊळ.
इथून पुढे आपण खऱ्या अर्थाने ‘दादर पश्चिम’चा शोध घेण्यास सुरूवात करणार आहोत. अर्थात, त्यासाठी लेडी जमशेटजी मार्गा’चं बोट आपण सोडणार नाही आहोत, कारण हाच रस्ता आपल्याला जुन्या दादर रस्त्यावर नेऊन सोडणार आहे.
मुळचं दादर नांवातं गांव इथेच होतं..?
आता पुन्हा नकाशात प्रवेश करु. नकाशात जिथे लेडी जमशेटजी मार्ग समाप्त होतो, तिथेच खाली Distillery दिसतेय. डिस्टीलरीच्या शेजारीच RS अशी अक्षरं दिसतील, ती दादर स्टेशनची. रेल्वे स्टेशन अद्याप तिथेच असलं तरी, डिस्टीलरीच्या जागी आजचं सुप्रसिद्ध ‘कीर्तिकर मार्केट’ उभं आहे. नकाशात दिसत नसला तरी, तिथे समोरच आजचा ‘कबुतरखाना’ आहे. ह्या कबुतरखान्याला एक रस्ता दादर स्टेशननजिकच्या फुलबाजारातून येऊन मिळतो. ह्या रस्त्याचं नांव ‘दादर रोड’. हे नांव नकाशातही वाचता येतंय. आपण ज्याचा शोध घेतोय, त्या ‘दादर’कडे आपल्याला धेऊन जाणारा हा रस्ता.
माहिम काॅजवेपासून सुरू होणाऱ्या लेडी जमशेटजी मार्गाने आपल्याला पार आजच्या कबुतरखान्यानजिकच्या ‘दादर रोड’(त्यावेळी ह्या रस्त्याला ‘दादर मेन रोड’ म्हणत) पर्यंत आणून सोडलं. या रस्त्याकडे जरा लक्षपूर्वक पाहा. हा दादर रोड पूर्वेकडून पश्चिमेकडे आलेला दिसेल. पूर्वेकडै ह्या रस्त्याची सुरूवात होते, ती ‘व्हिन्सेंट रोड’वरून. परेलहून सायनच्या दिशेने जाणारा व्हिन्सेंट रोड म्हणजे, नंतरचा ‘किंग्स वे’ आणि आताचा ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रोड’. परेल टी.टी. वरून सायनच्या दिशेने जाणाऱ्या व्हिन्सेंट रोडला, परेलच्या काहीसं पुढे, नकाशात दिसणाऱ्या टाटा मिल्स आणि गोल्ड मोहोर मिल्सच्या दारात, डावीकडे एक फाटा फुटलेला दिसेल. हा फाटा ‘दादर रोड’ असं नांव धारण करुन, TT आणि BB रेल्वे* लाईन ओलांडून, पश्चिमेकडच्या, वरच्या परिच्छेदात वर्णन केलेल्या कालच्या डिस्टीलरीकडे, म्हणजे आजच्या कबुतरखान्यापर्यंत गेलेला नकाशात दिसेल. मध्य मुंबईतल्या लालबाग-परेलहून इकडे येणारा हा लांबलचक आणि त्याकाळातला एकमेंव रस्ता, आपल्या नांवात ‘दादर’ हे नांव धारण करुन कबुतरखान्यापर्यंत येतो, याचा अर्थ माहिम बेटावरचं ‘दादर’ गांव या ठिकाणीच कुठेतरी वसलं होतं, असाच होतो.

इथेच वसलं होतं, तर मग कुठे, ते आता पाहू. आता हा परिसर नीट नजरेसमोर आणा. कबुतरखान्याहून पोर्तुगीज चर्चकडे व पुढे आगरबाजार मार्गे समुद्र किनाऱ्यावर दोन रस्सांनी जाता येतं. एक मार्ग भवानी शंकर रोडवरून, ब्राह्मण सेवा मंडळाच्या हाॅलवरून कृष्णाजी वामन चितळे मार्गाने जातो, तर दुसरा एस. के. बोले रोड वरून. भवानी शंकर रोड आणि एस. के. बोले रोड यामधली वस्ती ते आगर बाजार-किनारा याच परिसरात मुळचं दादर होतं, असं अनुमान काढता येतं. कस्तुरचंद इस्टेटच्या समोरच्या बाजुला आजही गांवासारखी मांडणी असलेली वस्ती आहे. या वस्तीत जोशी वाडी आहे. पाटीलवाडी आहे. एस. के. बोले रोडवरून आगरबाजार मार्गे पुढे जाताना धुरू वाडीही आहे. मग ह्याच परिसरात एखादी दादरवाडी किंवा पाडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा ही संपूर्ण वस्तीच, माहिमचा ‘दादरपाडा’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या शक्यतेला पुष्टी देतो, तो इथला जुन्या काळापासून असलेला बाजार. नकाशात दिसणारा, पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारा ‘दादर रोड’, मधल्या रेल्वेलाईनमुळे आज दोन भागात विभागला गेलेला दिसतो आहे. परेलहून दादरला येण्यासाठी असलेला हा तेंव्हाचा एकमेंव रोड. ही पूर्वी लहानशी पाऊलवाट असावी. सन १८५३ ला रेल्वे सुरू झाल्यानंतर हा रस्ता आणि लेव्हल क्राॅसिंग झालं असावं. दोन रेल्वेलाईन मधे आज दिसत असलेलं शंकराचं मंदिर तेंव्हाही तिथे होतं. लोकांच्या वहिवाटीचा हा रस्ता असल्याने, ह्या रस्ता पूर्वेकडच्या बाजुला जिथे रेल्वेलाईनला मिळतो, त्याच कोपऱ्यावर लहान काळ्या चौकोनात ‘Market’ असं लिहिलेलं दिसेल. हे मार्केट तेंव्हा थेट पश्चिमेकडच्या डिस्टीलरीपर्यंत असावं. या रस्त्याची पूर्वेकडची बाजू म्हणजे, आजचा ‘दादासाहेब फाळके रोड’, तर पश्चिमेकडची याची बाजू ‘एम.सी. जावळे रोड’ म्हणून आज ओळखली जाते. आज हा रस्ता पूर्व आणि पश्चिम असा दोन भागांत आणि नांवात वाटला गेला असला तरी, कधीकाळी ह्या रस्त्यावर असलेला बाजार, आजही हा रस्ता आपल्या अंगा-खांद्यावर बाळगून असलेला आपल्याला दिसतो. पूर्व बाजुचा दादर रोड, म्हणजे आजचा ‘दादासाहेब फाळके रोड’ काही काळपूर्वीपर्यंत भारतीय चित्रपट सृष्टीची पंढरी होती. दादासाहेबांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या बोलपटाचं काही शुटींग या रस्त्यावरच्या ‘मथुरा भुवन’ या बंगल्यात केलं होतं. या मथुरा भुवनच्या जागी आता त्याच नांवाची सोसायटी उभी आहे. या रस्त्यावर पुढे रुपतारा, रणजित स्टुडीयो सुरू झाले. आता या रस्त्याची पूर्वेकडची बाजू कपड्यांच्या ठोक बाजाराने भरली आहे, तर पश्चिमेकडे फुलांपासून ते काय हवं ते इथल्या दुकानांतून आणि त्याहीपेक्षा जास्त इथल्या फेरीवाल्यांकडे विकत घेता येत. बाजार नेहेमी लोकवस्तीच्या आधारानेच बहरलेला दिसतो. या बाजाराला आधार म्हणजे इथली वस्तीच असावी आणि तिचं नांव दादर असावं..!
दादर हे माहिममधलं गांव किंवा पाडा किंवा वाडी वर सांगितलेल्या ठिकाणीच वसलेलं असावं, याचा पुरावा इथल्या रेल्वे स्टेशनच्या नांवातही मिळतो. मध्य रेल्वे सुरू झाली ती १८५३ मधे. पश्चिम रेल्वेतर त्या नंतर दहा-पंधरा वर्षांनंतर सुरू झाली. दादरची पश्चिम आणि मध्य रेल्वेवरची दोन्ही स्थानकं ‘दादर’ नांव लेवूनच उभी आहेत. रेल्वे स्थानकांना नांवं देण्याची रेल्वे खात्याची विशिष्ट पद्धत लक्षात घेतली तर, दादर वर लिहिलेल्या ठिकाणी(च) हेतं, या अनुमानाला पुष्टी मिळते.

रेल्वे स्टेशनांना नांव देताना, ते स्टेशन जर एखाद्या गांवाच्या कुशीतच वसलं असेल, तर त्या स्टेशनला सरळ त्या गांवाचं नांव दिलं जातं. उदा. विले-पार्ले, अंधेरी, ठाणे, भायखळा किंवा माहिम इत्यादी. जर त्या परिसरातलं मुख्य गांव रेल्वे स्टेशनपासून दूर असेल तर, त्यी स्टेशनला नांव देताना, त्या गांवाचं नांव आणि सोबत ‘रोड’ असा शब्द लिहिण्याची प्रथा आहे. उदा. पश्चिम रेल्वेवरचं ‘माटुंगा रोड’ किंवा ‘खार रोड’ स्टेशन. मुख्य माटुंगा गांव आहे पूर्व दिशेला. मध्य रेल्वेवर ‘माटुंगा’ याच नांवाचं स्टेशनही आहे, कारण ते माटुंगा गांवातच उभं आहे. माटुंगा गांव पूर्वेला असलं तरी, पश्चिमेला नाही. पश्चिमेला माहिम येतं आणि पश्चिम रेल्वेवर माहिमचं, त्याच नांवाचं स्वतंत्र स्टेशनही आहे आणि ते मूळ माहिमच्या कुशीतच वसलेलं आहे. म्हणून पश्चिम रेल्वेवरचं, माहिम नंतरच्या स्टेशनचं नांव ‘माटुंगा रोड’ असं देण्यात आलं आहे. याचा अर्थ ह्या स्टेशनपासून माटुंगा गांवाकडे जाण्याचा रस्ता आहे, असा होतो.
माटुंगा रोड नंतर पश्चिम रेल्वेवर ‘दादर’ येतं. मध्य रेल्वेमार्गावरही दादरच येतं. याचा अर्थ ही स्टेशनं माहिम बेटावरील ‘दादर’ नांवाच्या वस्तीच्या कुशीतच वसलेली आहेत. आणि ही कूस अर्थातच कबुतरखान्याच्या आसपासच येते. म्हणजे मुळचं दादर कबुतरखाना, पोर्तुगीज चर्च ते किर्ती काॅलेजच्या परिसरात वसलेलं असीवं, ह्या अनुमानाला दुजोराच मिळतो.
साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी लिहिल्या आहेत. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. त्यांनी १९२५ सालच्या दादरचं केलेलं वर्णन, वर केलेल्या अनुमानाशी मिळतं जुळतं आहे. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम काॅजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नाॅर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. टिळक ब्रिज नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक वस्ती असल्याने, त्यावर रहदारी अशी नव्हतीच. टिळक ब्रिजच्या शेजारी आता उभ्या असलेल्या छबिलदास शाळेच्या जागी मोकळं पटांगण होतं. ह्या मोकळ्या जागेत मंडप घालून दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव झालेला आठवतो.
हा गणेषोत्सव पुढे सध्याच्या विसावा हाॅटेलच्या जागी होऊ लागला. विसावा हाॅटेलच्या जागी गणपतीचा मांडव आणि स्टेस असे, तर समोरच्या मोकळ्या रस्त्यावर लोकांना बसण्यासाठी जागा. छबिलदास शाळा (त्यावेळचं ‘दादर इंग्लिश स्कूल’) कोहिनूर सिनेमाजवळ लेडी जमशेटजी मार्गाला खेटून उभी होती. दादर स्टेशनातून पश्चिमेला बाहेर पडल्यावर, थेट माहिमपर्यंत दृष्य दिसत असे. मधे काही वस्ती नाहीच. दादर ते माहिम पर्यंतच्या जागेत डबकी, खाजणं असं काहीतरी होतं”. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात आलेलं हे दादरचं वर्णन, त्यारळचं दादर कबुतरखान्याच्या आसपासच वसलं होतं, हे स्पष्ट करण्यास पुरेसं आहे. कारण इथून पुढचा पार माहिमपर्यंतच्या जागेत फारशी वस्ती नव्हतीच, असं पेंडसेंनी लिहून ठेवलं आहे.
आता, ‘दादर इथेच होतं’ या अनुमानाला पुष्टी देणारा आणखी एक आणि शेवटचा आधार मांडतो. हा आधार आहे पोस्टाचा.
पोस्टल पिन नंबर देताना वाढती वस्ती हा निकष असतो. म्हणजे नविन ठिकाणी वस्ती झाली, की त्या परिसरात अस्तित्वात असलेला पिन नंबर त्या वस्तीलाही लागू होतो. पण ही वस्ती वाढू लागली की, त्या वस्तीपुरता नविन नंबर दिला जातो. नविन वस्ती आणि ही नविन वस्ती ज्या जुन्या वस्तीच्या परिसरात वसते, त्या दोघांचा पिन क्रमांक नेहेमीच ओळीने नसतो, तर त्यात बराच फरक असू शकतो. दादर पश्चिमचा पिन क्रमांक ४०००२८ असा आहे, तर दादर ज्या माहिम बेटावर वसलं आहे, त्या माहिमचा पिन नंबर ४०००१६ असा आहे. याचा सरळ अर्थ असा की, माहिम काॅजवे ते शितळादेवी मंदिरापर्यंतच्या जागेत माहिमची मूळ वस्ती होती. दादर माहिम बेटावरच असल्याने, दादरला स्वतंत्र पिन मिळण्यापूर्वी, दादरचाही पिन १६च असणार.
पुढे रेल्वे स्टेशन, स्टेशनातून मध्य आणि पश्चिम रेल्वेरील कोणत्याही स्टेशनला जाण्याची सुविधा, बाजाराची निकटता, शाळांच्या सोयी इत्यादी कारणांमुळे या परिसरात लोकवस्ती वाढू लागली. मग कालांतराने या परिसराला स्वतंत्र पिनकोड नंबर ४०००२८ असा देण्यात आला असावा. गम्मत म्हणजे, या पिनकोडमधे एकूण सहा पोस्ट औफिसं येतात आणि त्यातलं मुख्य पोस्ट औफिस ‘भवानी शंकर रोड पो.औ.’ हे आहे..आणखी काही पुरावा हवाय?
दादर नांव ‘जिन्यां’वरुन पडलंय की, इथे ‘दादर’ हे नांव धारण करणारं गांव राजा बिंम्बाच्या काळापासूनच इथे हेतं, याचा शेध घेणारा हा लेख थोडासा लांबलाय हे खरं, पण दादर हे नांव मुळचं आहे आणि त्याची सांगितली जाणारी व्युत्पत्ती पटण्यासाररखी नाही, हे दाखवण्यासाठी, अवढं लिखाण आवश्यकच होतं.
—नितीन साळुंखे
9321811091
२ औक्टोबर, २०२०.
टिपा-
- दादर पूर्व, मुंबई ४०००१४ ही संपूर्णपणे मानवी निर्मिती आहे आणि ह्या निर्मितीची कहाणी मोठी मनोरंजक आहे. त्यावर मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे, म्हणून त्याचा उल्लेख या लेखात नाही.
- आजचा ‘लेडी जमशेटजी रोड’ माहिम काॅजवेपासून सुरू होऊन शिवसेना भवनसमोरच्या गडकरी चौकात थांबतो आणि इथून पुढे तोच रस्ता प्लाझा, वीर कोतवाल उद्यानाला स्पर्श करत, कबुतरखान्यापर्यंत ‘न. चिं. केळकर रोड’ नांव धारण करुन जातो. पूर्वी मात्र माहिम काॅजवे ते कबुतरखाना पर्यंतच्या संपूर्ण रस्त्याचं नांव ‘लेडी जमशेटजी रोड’ असंच होतं आणि हा रस्ता १८४५ सालात बांधण्यात आला होता.
- भवानी शंकर रोड, रावबहादूर एस. के. बोले रोड आणि न. चिं. केळकर यांच्या जंक्शनवर असलेलं ‘वटवृक्ष श्री. हनुमान मंदिर, दादर’ हे देवस्थान आहे. या देवळाच्या ठिकाणी पूर्वी मोठं वडाचं झाड होतं. या वडाच्या झाडाखाली मारुतीचं लहानसं मंदीर प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने १९२० सालात बांधण्यात आलं होतं. वर उल्लेख केलेल्या तिन्ही रस्त्यांच्या कडेला तेंव्हा मोठमोठी वडा-पिंपळाची झाडं होती. संदर्भ-vayusutha.in
- *TT रेल्वे म्हणजे मध्य रेल्वे व BB म्हणजे पश्चिम रेल्वे. त्याकाळात ह्या दोन्ही रेल्वे त्यांच्या GIP आणि BBCI कंपन्यांच्या नांवांवरपन ओळखल्या जात असत.
संदर्भ-
- हा संपूर्ण लेख, ‘दादर’ या नांवाची व्युत्पत्ती, इथे असलेल्या जिन्यापासून झाली आहे, हे पटत नसल्याने लिहिलेला आहे. यासाठी केवळ परस्थितीजन्य वस्तुस्थितीचा आधार घेऊन, तर्कावर लेखातलं गृहितक मांडलेलं आहे.
- ‘महिकावतीची बखर’- लेखक वि. का. राजवाडे. मूळ पुस्तक १९२४. वरील तर्कासाठी सदरच्या पुस्तकातील माहिती आधार म्हणून घेतली आहे.
- महिकावतीच्या बखरीवर आधारीत राजा बिम्बावरचे माझे दोन लेख वाचण्यासाठी-https://wp.me/p7fCOG-av व https://bit.ly/2Gxhfb6 या लिंक्सवर क्लिक करा.
- लेख ‘मी पाहिलेली मुंबई’- श्री. ना. पेंडसे. ‘मुंबई ‘महानगरपालिका मुख्यालय शताब्दी विशेषांक-१९९३’ या स्मरणिकेत हा लेख प्रसिद्ध झालेला आहे.
- वरील स्मरणिकेतल्या ‘मुंबईतील चित्रपट सृष्टी’ या भाई भगत यांच्या लेखातून, दादासाहेब फाळके व इतर स्टुडीओंचं वर्णन घेतलं आहे.