एकमेकांपासून दूर असलेल्या, एकमेकाला प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या, भेटण्याची शक्यता धुसर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये एका नात्याचा बंध निर्माण होतो त्याला काय नांव द्यावं कळत नाही..काहीतरी गुढ, अनामिक, हवसं वाटणारं आणि हुरहूर लावणारं घडत असतं हे नक्की..
हे नातं फक्त त्या दोघांनाच ठाऊक असतं..आपापल्या ठिकाणी लौकीक बंधनात असूनही त्यांना या अलौकीक नात्याची अनावर ओढ लागते..इथं वय, जात, भाषा आदी बेड्या नसतातंच.. एकमेकांच्या समोर नसूनही एकमेकाचं सुख-दु:ख, राग-लोभ या भावनांची अचूक जाणीव कशी काय होत असावी हे ही कोडंच आहे..इथे एकमेकांचे सुक्ष्म मन-देह एकमेकांना त्यांच्याही नकळत भेटत असावेत काय?
मुंबई. देशातील अनेकांच्या स्वप्नातलं शहर, तसाच अनेकांची स्वप्नपूर्ती करणारंही शहर. देशातील कोणत्याही कोपऱ्यातून डोळ्यात स्वप्न आणि मनगटात जिद्द घेऊन मुंबईत येणाऱ्या कोणत्याही माणसाला, मुंबई आपल्या पदराखाली घेते. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अबोल मदतही करते. मुंबई कल्पवृक्षासारखी कल्पनगरी आहे. संपत्ती, समृद्धीची देवता महालक्ष्मी समुद्रमंथनातून उगम पावली होती, अशी पुराणकथा आहे. मूळ सात बेटांच्या स्वरूपात असलेली मुंबई नगरीही अशीच समुद्राच्या घुसळणीतून उगम पावली आणि पाहता पाहता तिने देशाच्या लक्ष्मीचं स्वरूप प्राप्त केलं. मुंबई ही समुद्रातून आणि समुद्रामुळे उगम पावलेली देशाची लक्ष्मी आहे. तशीच ती अन्नपूर्णाही आहे. मुंबईच्या आश्रयाला येणारं कोणीही रात्री झोपताना उपाशी राहत नाही, अशी हिची ख्याती.
‘अनंत हस्ते देस्ता मुंबापुरीने, घेशी किती दो करांनी’ अशी अवस्था मुंबईत आलेल्या आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असलेल्या कोणाही व्यक्तीची होते. अनेकांना अनेक रूपाने मुंबई पावली आहे. तिने अनेकांना अनेक गोष्टी दिल्या आहेत. मला मात्र मुंबईने एक अतिशय आगळी वेगळी भेट दिली आहे, जिची किंमत पैशांसारख्या नश्वर गोष्टीत करता येणंच शक्य नाही..!
माणूस कितीही मोठा झाला, पैसेवाला झाला तरीही त्याला ओळख नसेल तर त्या मोठेपणाला काहीच अर्थ उरत नाही. ही ओळख मिळवायचा अनेकजण अनेक पद्धतीने प्रयत्न करत असतात. त्यासाठी भलेबुरे मार्गही अवलंबत असतात. इतकं करून त्यापैकी काही जणांना ओळख मिळतेही, ह्या ओळखीला आपण प्रतिष्ठा म्हणूनही ओळखतो किंवा मिरवतो. ही प्रतिष्ठा खरी किंवा ओढून ताणून आणलेली किंवा सांप्रतच्या कलियुगात चक्क खोटीही असू शकते. .
ही झाली सार्वजनिक ओळखीची गोष्ट एका माणसाला, अनेक कारणांनी, इतर काही माणसांनी ओळखणे, ही त्या माणसाची सार्वजनिक ओळख झाली. अशी ओळख आपल्यापैकी प्रत्येकाला असतेच. ह्या पलीकडील आणखी एक ओळख असते. त्या ओळखीची जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. पुन्हा ती ओळख काही फार महत्वाची असते, असंही अनेकांना वाटत नाही. ती म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख पटणे. ‘मला मुंबईने एक अतिशय आगळी वेगळी भेट दिलीय’ असं मी जे म्हटलं आहे, ते याच ओळखीबद्दल. मुंबईने माझी मलाच ओळख करून दिली आहे. मी काय करू शकतॊ ह्याची, मी किती उंच भरारी घेऊन शकतो ह्याची, माझ्यातील क्षमतांची ओळख मला मुंबईने. आईने जन्म दिला. तिचे उपकार फेडणं अशक्य. तसंच आयुष्याच्या एका टप्प्यावर मी कोण, कोऽहम् ह्या प्रश्नाचं उत्तर मला एका प्रसन्न क्षणी मुंबईने दिलं, म्हणून तिच्याही उपकाराची फेड मला अशक्य. मला जन्म दिला ती माझी आई, तर मला स्वतःचीच ओळख करून देऊन मला नव्याने जन्म दिला, ती माझी ‘मुंबाई’..!
आपल्याला इतर कुणी ओळखो, वा ना ओळखो, आपण स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं असत. मी स्वतःला ओळखू शकलो ते मुंबाईमुळे..! हे कस घडलं, ते ही सांगतो. अश्याच कधीतरी अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळात, माझ्यासमोर गोविंद मडगावकरांनी लिहिलेलं ‘मुंबईच वर्णन’ हे पुस्तक आलं. अतिशय आकर्षक अश्या जुन्या मराठीत लिहिलेल्या त्या पुस्तकाने मला अगदी झपाटून टाकलं. मी अनेकदा त्या पुस्तकाचं वाचन केलं, पण मन भरेना. मग केवळ मुंबई शहर ह्या विषयावर, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांचं वाचन केलं. त्या पुस्तकांतून दिलेल्या खुणांच्या शोधात मी मुंबईभर भटकत गेलो आणि मडगावकरांच्या पुस्तकात गोठलेल्या १८६२ सालच्या बोंबेचा शोध, २०१६-१७सालच्या मुंबईत घेत गेलो. १५०हुन अधिक वर्षांच्या काळात अनेक जुन्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, तर काहींनी आपलं रुपडं बदललं होत. काळासोबत हे व्हायचंच. असं असलं तरी जुन्याचा काही अंशी वास त्या ठिकाणी होताच. मला तो जाणवत गेला आणि टाईम मशीनमध्ये बसून मला त्या काळात गेल्याचा अनुभव येत गेला. तरीही मधला काळाचा पडदा दूर होऊ लागला आणि मी अनुभवलेलं शब्दांत उतरत गेलं. शब्दांत उतरलेलं मी सोशल मिडीयावर टाकत गेलो. ते वाचणाराना आवडत गेलं आणि अनेकांनी पुढे मुंबईकडे त्यांची पाहण्याची दृष्टी बदलत गेल्याच कळवलं. त्यांना आपल्या मुंबईबद्दल वेगळंच प्रेम निर्माण झालं. ह्या निमित्ताने, मला लिहिता येतं, हा शोध माझा मलाच लागला आणि ‘कोऽहम्’चं उत्तर मला मिळालं. माझी मला ओळख पटली माझा जणू पुनर्जन्मच झाला आणि तो मुंबईच्या पोटी झाला..! त्याक्षणी मुंबई माझी, ‘माय मुंबाई’ झाली..!!
मला लिहिता येतं, हा शोध लागला आणि माझी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. आयुष्य सुंदर होतंच, ते अधिक देखणं भासू लागलं. अशा-निराशा, दुःख-आनंद तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत जात असतात. मी ही त्याला अपवाद नाही, पण मला पटलेल्त्या या माझ्याच ओळखीमूळे मी त्या पलीकडे पाहायला शिकलो. हे मुंबईचे माझ्यावरचे उपकारच होते.
मुंबईने मला माझी ओळख पटवली. लिखाण करायला मुंबईने मला असंख्य विषय पुरवले. त्यावर भरपूर लिखाण केलं. विविध विषयावर केलं, पण त्या लिखाणाचा केंद्रबिंदू मुंबई होता. मुंबईचा इतिहास, मुंबईच्या गल्ल्या, रस्ते, देवळं-मशिदी-चर्चेस,, मुंबईला घडवणारी त्याकाळातली माणसं, इतकंच कशाला मुंबईची टॅक्सी, हातगाडीवरही लिहिलं. लिहिलेलं सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवत गेलो. ‘मुंबाई’चं ऐतिहासिक समृद्धपण इतरांनाही माहित व्हावं आणि मुंबईच्या लेकरांची तिच्यवरची माया वाढावी, या साठी हा प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी सफल होतोय, असही माझ्या लक्षात येत गेलं. मी लिहू शकतो, हा शोध मला ज्या मुंबईमुळे लागला, तिच्यावरच लिहून तिच्या माझ्यावरच्या अनंत उपकारांची अल्पशी फेड करण्याचा माझा हा प्रयत होता..
आज मी पूर्णपणे मुंबईमय झालेलो आहे. मीच मुंबई आहे अशी माझी भावना आहे. मुंबई माझी दुसरी आई, माय मुंबाई आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने मुंबईबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचं आवाहन केलं आणि माझ्या अनावर भावना शब्दरूपात उतरत गेल्या. म.टा. ने घेतलेली स्पर्ध रद्द झाली किंवा कसे, ते समजलं नाही. म्हणून साधारण वर्षभर वाट पाहून त्याच माझ्या भावना आपल्यासमोर ठेवल्या आहेत..!!
कोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातल्या त्यात एका नात्याला स्वार्थ स्पर्श करत नाही असं म्हणता येईल आणि ते म्हणजे आई आणि मुलातलं नातं. सर्वात नैसर्गीक आणि निरपेक्ष म्हणावं असं हे एकमेंव नातं. बाकी सर्व नाती ‘कुछ रिश्ते मुनाफ़ा नहीं देते, मगर ज़िन्दगी को अमीर बना देते हैं..!’ असं म्हणून फक्त ‘मुनाफा’ हाच हेतू ठेवून झालेली असतात. अगदी मुल आणि आई या नात्यातही स्वार्थ असतोच.।!
मातृत्वाची भावना वैगेरे सर्व सत्य असलं तरी मनुष्याच्या जन्माला त्याच्या आईचा (आणि वडीलांचाही) स्वार्थ कारणीभूत झालेला असतो. (मुलाच्या जन्मापूर्वीचा वडीलांचा स्वार्थ स्पष्ट असल्याने वडील-मुल या नात्यावर मी इथं लिहीलेलं नाही. परंतू ‘आई’ हा विषयच वेगळा असल्याने त्यावर थोडंसं लिहीलय.). एकदा का मुलाचा जन्म झाला की मग आईच्या मनी ‘माझं मुल’ ही निस्वार्थी भावना जन्म घेते आणि मग ती तिच्या शेवटापर्यंत टिकते. पण तो पर्यंत ‘मला आई व्हायचंय’ हा स्वार्थ असतोच. माणसाचा जन्मच असा स्वार्थातून झालेला असल्याने स्वार्थीपणा त्याचा जन्मापासूनचा साथीदार आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही असं मला वाटतं. माकडीन आणि तिने स्वत: बुडत असताना स्वत:चा जीव वाचावा म्हणून पायाखाली घेतलेल्या तिच्याच पिलाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. स्वत:चा जीव वाचावा म्हणून आपल्याच पोराला पायाखाली घेणाऱ्या माकडीनीचेच आपण ‘वंश’, आपण तसेच असायचे. बाकी माणूस हा देवाचा ‘अंश’ वैगेरे आपली अंधश्रद्धा आहे..!!
स्वार्थ नसता तर आता आपण जी काही प्रगती पाहातोय, ती झाली नसती. स्वार्थापोटी गती असते आणि म्हणून प्रगती होते. जे माझं नाही त्याचा विचारही मी करणार नाही ही भावना सर्वच सामान्य मनुष्यमात्रांच्या ठायी असते. तशी भावना, तसा विचार साम्यवादी राजवटींमधे करायला मनाई असते आणि म्हणून तर एके काळी बरोबरीची राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील जनता प्रगतीची नवनविन शिखरं पादाक्रांत करत असताना, रशीयासारखं साम्यवादी राष्ट्र जरी पुढे जाताना दिसत होतं असलं, तरी त्या राष्ट्रातील जनता मात्र अधोगतीकडे जाताना दिसत होती. रशीयन महासत्तेचं ‘महासत्ता’ म्हणून पतन होण्यामागे जी काही अनेक कारणं आहेत, त्यामधे ‘हे तुमचं नसून सरकारचं आहे’ ही त्या देशातील कायद्याने जनतेची करून दिलेली सक्तीची भावना हे ही एक कारण आहे. जे सरकारी असतं ते कोणाचंच नसतं हा आपलाही अनुभव आहे आणि म्हणून मुंबईच्या लोकल गाड्यांमधे घोषणा करावी लागते, की ‘रेल आपकी संपत्ती है, कृपया इसे नुकसान न पहुंचाये’ ती म्हणूणच. रशीयन संघराज्यातील (युनीयन ऑफ सोव्हीएट सोशालिस्ट रिपब्लीक-USSR) जनतेला स्वार्थ अलाऊड नसल्याने त्याची संघराज्य त्याच्यापासून विलग होऊन त्या महासत्तेच पतन झालेलं अलिकडचं सर्वात मोठं आणि ठळक उदाहरण.
स्वार्थ मुळीच वाईट नसतो. वाईट असते ती स्वार्थाची मात्रा. ती जेवढी जास्त, तेवढी वाईट. स्वार्थाची भावना जपताना आपल्यासोबत दुसऱ्याचही भलं कसं होईल ही भावनाही जपली, तर तो स्वार्थ वाईट कसा म्हणता येईल..? माझ्यासहीत दुसऱ्याचंही भलं होवो इतपत मात्रेचा स्वार्थ केंव्हाही चांगलाच. आपल्या देशात तर ‘स्वार्थ मे परमार्थ’ ही म्हणच आहे. पण माझं आणि माझंच भलं होवो ही भावना जेंव्हा बळावू लागते तेंव्हा मात्र ती त्या माणसासाठी आणि तो ज्या समाजाचा घटक असतो, त्या समाजासाठीही धोक्याची घंटी असते. माझं आणि माझंच याचा अर्थ क्रमाने मी, माझं कुटुंब, माझ्या पुढच्या दहा-पंधरा पिढ्या आणि काही नातेवाईक एवढाच घ्याया. मग त्यासाठी दुसरे, त्यांची कुटुंब व त्याच्या पिढ्याही व प्रसंगी देशही बरबाद झाला तरी हरकत नाही असं वाटायला लावेल येवढी ही मात्रा अशा लोकांच्यात मोठ्या प्रमाणात असते. फक्त मलाच किंवा माझ्या मुला-पत्नींला निवडणूकीचं टिकीट मिळावं असं नाटणारे नेते, लाच खाऊन कोणतीही बेकायदेशीर कामं बिनधास्तपणे आणि तत्परतेनेही करणारे सरकारी कर्मचारी-अधिकारी, भेसळ करणारे व्यापारी, विश्वास ठेवणाऱ्याचा गळा बिनदिक्कत कापणारे मित्र, दुसऱ्याच घर विस्कटून स्वतःच घर बांधणारे स्वकीय अशी अनेक माणसं आपल्या आजुबाजूला दिलतात. अशी माणसं वेळ पडल्यास स्वार्थासाठी कोणाचाही आणि कशाचाही सौदा करताना दिसतात.
हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे हल्ली यत्र तत्र सर्वत्र बोकाळलेला अतिस्वार्थवाद..! दुसऱ्याचं घर विस्र्कटून स्वत:चं घर बांधणारांची संख्या वाढताना दिसत आहे. अतिस्वार्थाचं हे प्रॉडक्ट..! स्वार्थ मनुष्याला कळायला लागलं तेंव्हापासून त्याच्यात आहेच. पण तो साधताना दुसऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी पूर्वी घेतली जायची. स्वार्थापोटीच अनेक कामं केली गेली व पुढे ती सर्वांच्याच उपयोगास आली अशी अनेक उदाहरण पूर्वीच्या काळात घडलेली मुंबई शहराच्या जडणघडणीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आली. ब्रिटीशांनी आपल्या देशात रेल्वे व पोस्टासारख्या ज्या अत्यावश्यक सोयी केल्या त्यामागे त्यांच्या सैन्याची जलद हालचाल व वेगाने संपर्क व्हावा याच हेतून. त्याद्वारे या देशावर प्रभावीपणे राज्य करता यावं हा त्यांचा स्वार्थी हेतू त्यात होता. परंतू त्याचे फायदेही त्यांना आपल्या देशातील स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिले व त्याची फळं आपण आजतागायत चाखतो आहोत.
पारतंत्र्यात जे काही करायचं ते देशासाठी हीच भावना होती. होती म्हणजे नैसर्गिकरित्याचं होती. स्वातंत्र्यानंतर स्व-देश निर्माण होताच, कुठंतरी पक्षाप्रती निष्ठा ठेवली जाऊ लागली. पुढं हळुहळु ही निष्ठा व्यक्ती केंद्रीत झाली आणि आता तर ती ‘मी’ आणि ‘माझं’पुरती मर्यादीत झालेली दिसते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा बदल झालेला दिसतो. ‘सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामय:’ पासून ‘अहं भवानि सुखी, अहमसानि निरामय:’ पर्यंतचा अलिकडच्या काळातील हा बदल चिंताजनक आहे. ‘मला काय करायचंय’, ‘मै भला-मेरा काम भला बाकी दुनिया गेली खड्ड्यात’ ही वृत्ती बळावू लागलीय. ‘माझंच नव्हे तर संपूर्ण विश्वाच भल होवो’ असं पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची परंपरा मोठ्या अभिमानाने सांगणारे आपण, एवढे कसे बदललो?