गिरणगांवातल्या गिरण्या-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!

गिरणगांवातल्या गिरण्या-

प्रस्तावना-

मुंबईची जडण-घडण कसकशी होत गेली याचा अभ्यास करतना, असं लक्षात आलं की, मुंबईला ‘मुंबई’ नांवाचं जगद्विख्यात शहर, जिथे सकाळी उपाशी आलेला कुणीही रात्री झोपताना मात्र उपाशी झोपत नाही, अशी सार्थ ख्याती असलेलं शहर बनवण्यामागे, ज्या तीन मुख्य गोष्टींचा हातभार लागला, त्या म्हणजे, एक, मुंबईचं जगप्रसिद्ध बंदर, दुसरी, सन १८५३ मधे मुंबईत प्रथमच धावलेली प्रवासी रेल्वे आणि तिसरी सन १८५४(१८५६) मधे मुंबईत प्रथमच सुरू झालेली कापडाची गिरण..! यातील बंदर (हे एकच नसून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर बंदरांची माळका होती;पण सोयीसाठी ‘बंदर’ असा एकवचनी शब्द वापरला आहे) वगळता, मुंबईची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो, रेल्वेचा आणि गिरण्यांचा. रेल्वे आणि गिरणी, या दोघींना तर मुंबईच्या गतकाळातल्या अभ्यासकांनी, जगभरातील उद्यमींन्ना आणि देशभरातील कामगारांन्ना आपल्याकडे आकर्षीत करुन घेणाऱ्या ‘हिरॉईन्स’ची’ उपमा दिलेली आहे. त्यातही सहान-मोठं करायचं तर, बंदर आणि रेल्वेच्या मागून आलेल्या ‘गिरणी’बाईंचा वाटा खूप मोठा आहे..!

या गिरणबाईंचं मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यातलं महत्व, मालवणी बोलीतल्या एका म्हणीत सांगायचं तर, ‘आगासली ती मागासली नि पाठसून ईली, ती गुरवार ऱ्हवली’ एवढं आहे..! म्हणजे रेल्वेबाई जरी मुंबईत पहिल्या अवतरलेल्या असल्या तरी, मुंबईची खरी भरभराट झाली, ती तिच्या मागोमाग मुंबईत आलेल्या गिरणबाईंमुळे..! मालवणी बोलीतल्या म्हणतील ‘गुरवार’ या शब्दाचा अर्थ ‘गरोदर’ असा आहे. स्त्रिच्या गर्भार राहाण्याला ‘भरभराट’ असाही एक अर्थ गतकाळात होता आणि मुंबईल्या गिरणधंद्याचा अभ्यास करताना, तो किती योग्य होता, हे देखील माझ्या लक्षात येत गेलं..! मुंबईत गिरण्या आल्या नि पुढच्याकाळात, तिच्या पूर्वी अवतरलेल्या बंदर आणि रेल्वेनी तिला पुरक अशी भुमिका घेतली. १८५४(१८५६) ते १९८२ या जवळपास सवाशेवर्षाच्या कालावधीत, मुंबईच्या नि पर्यायाने देशाच्याही अर्थसत्तेवर अधिराज्य गाजवलं ते गिरण्यांनी, निर्विवाद हे मला समजलेलं सत्य आहे..!

मुंबईत अजुनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत असताना, मुंबईच्या जडण-घडणीत अत्यंत महत्वाचं स्थान असलेल्या गिरणधंद्याकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं होतं. कीं बहूना, मीच तिकडे लक्ष दिलं नव्हतं. मला तो विषय थोडा किचकट वाटत होता. त्याच माझ्या स्मृती साधारण १९७०-७५ नंतरच्या, आणि त्याही मुख्यत्वेकरून संप-दंगली-जाळपोळीच्या असल्याने, मला तो विषय अभ्यासावा, असं मात्र वाटलं नव्हतं. माझ्या या दृष्टीकोनात बदल झाला तो, मला गुरुस्थानी असलेल्या, ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षक, आठ पुस्तकांचे लेखक आणि जागतिक सिनेमावर अधिकारवाणीने भाष्य करणाऱ्या श्री. अशोक राणे यांच्यामुळे..!

त्याचं झालं असं, अशोकजींनी दोन वर्षांपूर्वी ‘एक होतं गिरणगांव’ या विषयावर डॉक्युमेंटरी तयार करण्याचा संकल्प सोडला नि कामाला सुरुवात केली. काम तसं आव्हानात्पक..! म्हणजे किती, तर एक वेळ पुराणकाळातील रामाला शिवधनुष्य पेलवणं तुलनेनं सोपं गेलं असावं, पण राणेसाहेबांनी स्वीकारलेलं हे आव्हान पेलणं अतिशय कठीण आणि घाडसाचं. प्रचंड आणि काटेकोर संशोधन त्यासाठी आवश्यक. ते काम राणेसाहेबांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने सोपवलेलं. त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली. अर्थात, राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीचा विषय ‘गिरणगांव’ हा असला तरी, ते ‘गांवं’ वसायला निमित्त झालेल्या ‘गिरणी’धंद्याचा कालावधी जवळपास सवाशे वर्षांचा आणि मला तर त्यातलं काहीच माहित नाही. त्यामुळे त्याचा मला अभ्यास करणं आलंच. अगदी ‘अ, ब, क, ड,…’ पासून सुरूवात..!

डॉक्युमेंटरीची सुरुवात करताना त्गिरणगांव पाहिलेल्या, अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखतीतून. त्यात प्रत्यक्ष गिरण्यांमधे काम केलेले काही कामगार, काही कामगार नेते, त्याकाळातल्या कामगार संघटनना नि त्यातून जन्मलेल्या राजकीय पक्षांचा उदयास्त अनुभवलेले-अभ्यासलेले काही अभ्यासक, गिरणगांवतले दुकानदार, ज्वेलर्स, खानावळवाल्या स्त्रिया, डॉक्टर्स, तसेच गिरणागांवात ज्यांचा जन्म आणि पुढचा उत्कर्ष झाला असे खेळाडू, नेते, अभिनेते असे सर्व प्रकारचे लोक होते. त्या मुलाखतींच्या दरम्यान माझ्यासमोर गिरण्या, गिरणगांव आणि गिरणगांवकर, त्यांचे आपापसातले संबंध, संघर्ष नि संकर उलगडत गेले आणि राणेसाहेबांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचं मला खऱ्या अर्थानं भान आलं.

ज्या गिरण्यांमुळे गिरणगांव वसलं आणि अगदी इंग्लंडातल्या मॅंचेस्टर, लॅंकेशायरसोबत स्पर्धा करु लागलं आणि त्यातून मुंबई नांवाचं लहानसं बेट जगद्विख्यात झालं, त्याचा कॅनव्हास किती प्रचंड मोठा नि असंख्य कंगोरे असलेला आहे, याची मला जाणीव झाली आणि मी भानावर झालो..! जो विषय मला कधीच आकर्षित करुन घेऊ शकला नाही, त्याचा इतिहास एकाचव्ळी इतका रोमांचक, रोचक, मनोरंजक नि थरारकही असेल असं वाटलं नव्हतं..!

आता मात्र मी मांड ठोकून अभ्यासाला बसलो..! ‘कोविड-१९’च्या लाटांमुळे एप्रिल २०२० ते अगदी आताआतापर्यंतच्या कालावधीत, आम्ही, राणेसाहेबांची टिम, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन शुटींग करण्यामधे फारशी काही प्रगती करु शकलो नव्हतो. त्यामुळे आयताच उपलब्ध झालेला वेळ मी गिरण्याचा अभ्यास करण्यात घालवला.

अभ्यास करायचा, तर समोर पुस्तकं हवीत. मराठीत काही थोडकी पुस्तकं आणि गिरणगांवच्या पार्श्वभुमीवर बेतलेल्या काही कादंबऱ्या वगळल्या, तर गिरण्या आणि त्यामुळे गिरणगांव कसं वसत गेलं याचा वास्तव तपशिल देणारी पुस्तकं नाहीतच;किंवा असल्यास त्याची माहिती माझ्यापर्यंत किंवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मराठीतली मला उपलब्ध झालेली ती सर्व पुस्तकं/कादंबऱ्या मी वाचून काढली. इंग्रजीत मात्र गिरण्या, गिरणगांव, गिरणगांवातली लोकवस्ती व त्यातून उदयाला आलेली तिकडची वैषिष्ट्यपूर्ण संस्कृती इत्यादी विषयांवर, विषयवार केलं गेलेलं बक्कळ लिखाण उपलब्ध आहे. अर्थात यासाठी सर्वविश्वव्यापी इंटरनेटला शरण जावं लागलं. इंटरनेटवर तर ‘अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील दो करांने’ अशी अवस्था व्हावी एवढं विपूल ज्ञानभांडार उपलब्ध आहे. त्यातलीच काही पुस्तकं निवडून ‘ग म भ न..’ गिरवायला सुरुवात केली..!

मी वाचनाची सुरुवात करताना, मुंबई शहरात गिरण्या कसकश्या जन्माला येत गेल्या, त्या कोणत्या परिस्थितीत जन्माला आल्या, त्या कुठे जन्माला आल्या आणि त्यामागची कारणं काय होती इत्यादी विषयाला प्राधान्य दिलं. मुंबईतल्या गिरण्यांचा विविध अंगानी अभ्यास शब्दांकित केलेली शेकडो पुस्तकं आहेत. त्यातली काहीच माझ्या वाचनात आली आणि माझ्या त्या वाचण्यातून मला आकलन झालेला त्यातलाच काही भाग, जो केवळ गिरणगावाशी संबंधित आहे, मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे..!

पुढचेही विषय आहेत, जसे, गिरण्यामंधे काम करायला देशभरातून आलेले चाकरमानी, त्यांची इथे येण्यामागची कारणं, त्यांचं राहाणं-वागणं, त्यांनी आपल्यासोबत मुंबईत आणलेल्या, त्यांच्या त्यांच्या मूळ प्रांतातल्या संस्कृती, प्रथा-परंपरा-भाषा, जेवणा-खाण्याच्या पद्धती, त्यांचे खेळ आणि त्यांचा मुंबईतल्या गिरणगांवात झालेला मनोहारी संगम, त्यातून उगम पावलेले व पुढे जगभर प्रसिद्ध पावलेली ‘गिरणगावी संस्कृती’, त्यातूनच निर्माण झाले गिरणगांवातले गणेशोत्सव, दहिहंडी आदी सण, गिरणी कामगारांच्या युनियन्स, संप आणि त्यातून होणारे राजकारण, त्यांचे आपापसातले संघर्ष इत्यादी. त्याचाही अभ्यास सुरू आहे आणि हे विषय राणेसाहेबांच्या डॉक्यमेंटरीत अधिक विस्ताराने आणि राणेसाहेबांच्या ‘चित्रपटातून गोष्ट सांगण्याच्या’ कौशल्यामुळे अतिशय सुंदरपणे उलगडत जाणार आहे. आणि ते पुढच्या काही काळात आपल्यासमोर येणारच आहे. इथे मात्र या दोन-तीन भागांच्या लेखमालेत माझा मुख्य जोर राहाणार आहे तो, या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, मुंबईतल्या गिरण्या कसकश्या अस्त्तित्वात येत गेल्या, ते सांगण्यावर..!

कोणतीही कृती करण्यामागे काहीतरी निश्चित उद्देश असले पाहिजेत, असं म्हणतात;तसे ह्या माझ्या लिखामागेही माझे दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे, स्मरणरंजन..! मला स्वत:ला माझ्या भुतकाळातल्या स्मृतींमधे अधुनमधून रमायला आवडतं. त्यात गिरण्यांचं गिरणगांव बघत मी लहानाचा मोठा झालेलो. श्री. अशोक राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने, मला त्या गिरण्यांच्या जन्माची कहाणी अभ्यासण्यासाठी अनायासे भुतकाळात फेरफटका मारता आला आणि स्मरणरंजन करता करता, मला पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावं. दुसरा उद्देश म्हणजे, गिरण्यांचा वैभवशाली इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवता यावा. जी पिढी साधारण १९९० नंतर जन्मली आहे, जिला १९८२ साली झालेला गिरण्यांचा अखेरचा व अजुनही अधिकृरित्या मागे न घेतलेल्या संपाची तुटक कहाणी वगळता इतर काही माहिती असण्याची शक्यता नाही, तिला गिरणगांवचं वैभव समजावं, हा..!

माझ्या या देन-तीन भागांच्या लेखात काही माहिती सुटलेली असू शकते. काही पुस्तकं, जी मला उपलब्ध होऊ शकली नाहीत, ती माझ्या वाचनातून सुटलेली असू शकतात. पुढे-मागे ती पुस्तकं उपलब्ध झाल्यास, ती माहिती जोडून हेच लेख सुधारीत स्वरुपात पुन्हा लिहेन..! पण, त्यामुळे या लेखमालिकेतील लेखातल्या माहितीत फारसा फरक पडणार नाही;झालंच तर त्या लेखात जास्तीची माहिती येईल..!

आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर, मुख्य विषयाचं सुतोवाच करतो नि थांबतो.

तुम्हाला माहितेय, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत किती गिरण्या होत्या, ते? एकूण १०३..! होय. याच त्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवणाऱ्या १०३ तालेवार बहिणी. त्यातल्या तीन गिरण्या, मुंबईचं तेंव्हाच विकसित झालेलं एकुलतं एक उपनगर ‘कुर्ला’ येथे होत्या. म्हणजे मुख्य मुंबई शहरात, ज्याची पूर्वीपासून आतापर्यंतची ओळख, बॉम्बे(मुंबई) आयलंड सीटी’ अशीच आहे, एकूण १०० गिरण्या होत्या..!

त्या शंभर गिरण्यांमधल्या ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. गिरणगांव म्हणजे, साधारणत: पूर्वेला माजगाव-शिवडी ते पश्चिमेला महालक्ष्मी-वरळी आणि उत्तरेला परळ-लोअर परळ ते दक्षिणेला भायखळा, एवढा साधारणत: ३५-४० किलोमिटर चौरस क्षेत्रफळाचा भूभाग.

आणि ह्या गिरणगांचं धगधगत हृदय म्हणजे, लालबाग मध्य कल्पून काढलेल्या घोडपदेव, डिलाईल रोड परळ आणि शिवडीला स्पर्ष करत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघाच्या आतला परिसर. ह्या साधारण, उभ्या-आडव्या ४-५ किलोमिटर अंतराच्या व्यासात, म्हणजे ‘गिरणगांवाच्या हृदयात’, गिरणगांवातील एकूण ७० पैकी जास्तीत जास्त गिरण्या होत्या.

त्यांचीच कहाणी पुढील भागात..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

29.05.2021

3 thoughts on “गिरणगांवातल्या गिरण्या-

  1. आताच्या पिढीला माहितीपर लिखाण करत आहात हे खुपच अभिनंदनीय आहे. त्याबद्दल तुमचे आभार ! अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपण हाताळत आहात. सदर लेखमाला लवकरात लवकर वाचायला आवडेल. गिरणगावात बालपण घालवलेले आम्ही आज आठवणी काढून डोळ्यांत पाणी आणतो. ते वैभव गमावले याचे शल्य मनात कायमच राहणार आहे. पण आपण करीत असलेल्या धाडसाने मनाला एक नवीन पालवी फुटली आहे. निश्चितपणे आपण आपल्या लेखणीने त्या पालवीला खतपाणी घालाल यात शंकाच नाही. मीही साधारण गिरणगावातील त्याकाळी असणाऱ्या चाळी आणि त्यांच्या जीवनमानाबद्दल बरेच काही लिहिले आहे. असंख्य जणांनी मलाही डोळ्यांत पाणी आणून त्याबद्दल कौतुकाने फोनवर शाबासकी दिली. मन भरुन आले. लवकरच आपले लेख वाचायला मिळतील या अपेक्षेसहीत धन्यवाद !

    Liked by 1 person

  2. सर खरचं खुप सुंदर आणि उत्कंठा वाढवणारी प्रस्तावना होती, उत्सुकता आहे मुख्य लेखनमालेची.. खरचं आमच्या पिढीला गिरण्या दाखवण्याचं पुण्य फक्त चित्रपटांनी केलं आणि त्या त्या चित्रपटाने त्यांना हवं तसं चित्र रेखाटलं तेच माहीत आहे, खरा इतिहास जाणून घ्यायला नक्की आवडेल.. तुम्ही म्हणालात तस बरचस लिखाण गूगल वर उपलब्ध असेल पण मूलतः आळशी असणाऱ्या आमच्या पिढीला हे जमणे नाही, या फास्ट जमान्यासाठी रेडी टू ईट मटेरियल तयार करत असल्याने तुम्हाला धन्यवाद..!!!

    Liked by 1 person

  3. खूप अभ्यासपूर्ण तसंच ओघवत लिखाण कौशल्य..आवडेल पुढील भाग वाचायला.खूप उत्सुकता आहे. तुम्ही लिहत रहा सरजी, आम्ही वाचत राहू.

    Liked by 1 person

Leave a comment