मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..!
गिरणगांवातल्या गिरण्या-
(भाग चौथा)
देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी
सन १८५४ मधे, ताडदेव येथील कावसजी नानाभॉय दावर यांच्या व मुंबईतल्याही पहिल्या गिरणीची, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ची, पायाभरणी झाली आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं, हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता पुढे-
मुंबईत गिरणी उभी करणं, हे कावसजींच धाडसंच होतं. कारण संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटीश/युरोपीयन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या, ५ लाख रुपयांच्या भाडवलाची उभारणीही मुंबईतल्या ५० धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वत:ला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही. पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नविन उपद्व्याप उताणा पडला तर, थेट रस्त्यावरच यायची पाळी, अशी सर्व परिस्थिती..! या परिस्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडसं नव्हे तर काय..! धाडसी तर कावसजी होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे होता, तो दुर्दम्य आत्मविश्वास..! त्या आत्मविश्वासातूनच धोका पत्करणं हे कदाचित त्यांच्या स्वभावात उतरलं असावं आणि त्यातूनच त्यानी या व्यवसायात शिरकाव केला असावा. नफा होईल की तोटा, तोटा झाल्यास, पुढे काय करायचं, याचा फारसा विचार त्यांनी केला नसावा..! धाडसी माणसं परिणामांचा असा विचार करत बसत नसतात, जे होईल ते नंतर पाहू, असा विचार करुन ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतात, मग त्यातून जे होईल ते होवो..! कावसजींनी त्यांच्या कृतीतून हेच दाखवून दिलं..!!
आणि पुढच्या वर्षभरातच कावसजींना त्यांनी पत्करलेल्या धोक्याचं भरभरून फळ मिळालं. कावसजींची ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ ही गिरणी कल्पनेपलिकडे यशस्वी झाली. त्याने कावसजींचा आत्मविश्वास दुणावला व लगेचंच त्यांनी, ताडदेव येथे आपल्या पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण, ‘दी बॉम्बे थ्रॉस्टल मिल(The Bombay Throstle Mill)’ उभारण्याचं जाहीर करुन कामास सुरुवात केली. सन १८५७ मधे ‘बॉम्बे थ्रॉस्टल (उच्चार-थ्रॉटल) मिल’ कार्यान्वित झाली. कावसजींची आणि मुंबई शहरातलीही ही दुसरी गिरणही जोमात सुरू आणि ‘पारशी तिकडे सरशी’ ही म्हण खरी झाली.
कावसजींच्या मुंबईतल्या या दोन गिरण्यांनी मुंबईत व देशात भविष्यात फोफावलेल्या गिरणी धंद्याचा पाया घातला. नविन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की, सन १८५४(१८५६) ते १८५७ मधे कावसजींच्या दोन गिरण्या सुरू झाल्यानंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १८६० पर्यंत, खुद्द मुंबईत ९ गिरण्यांची यंत्र धडधडायला लागली. हिच संख्या ४० वर्षांत ८४ इतकी झाली तर त्यापुढच्या पंचवीस वर्षात, म्हणजे १९२५ सालापर्यंत ती ९७ एवढी झाली. याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या ३३७ एवढी प्रचंड होती. सन १८५४ ते १९२५ पर्यंतच्या साधारण ७० वर्षांत देशभरात एकूण ३३७ कापड गिरण्या सुरू झाल्या याचा अर्थ, दर वर्षाला ४ गिरण्या होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांमागे एक गिरणी देशभरात कुठे न कुठे सुरू होत होती..!
शहरात ६ आणि उपनगर कुर्ला येथे १, अशा ७ गिरण्या सुरू झाल्या. सन १८६० सालात, मुंबई शहर व कुर्ला येथे मिळून एकूण ९ असलेल्या गिरण्यांची संख्या, पुढच्या १५ वर्षांत वाढून २८ झाली आणि तिच संख्या, एकोणीसावं शतक संपताना, म्हणजे सन १९०० सालात वाढून ८४ इतकी झाली. सन १९२५ मधे मुंबई व कुर्ला मिळून एकूण ९७ गिरण्या मुंबईत सुरू झाल्या. हे श्रेय, अर्थातच, सन १८५४ साली मुंबईतली पहिली गिरण काढणाऱ्या कावसजी नानाभॉय दावर यांचं..!
कावसजींनी सुरू केलेल्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ नंतर देशात गिरणीधंदा फोफावला असला तरी, कावसजींच्यापुर्वीही काही उद्योगी लोकांनी देशात कापड गिरणी सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्या बहादूर लोकांचे प्रयत्न फसले असतील किंवा त्यांना परिस्थितीने हवी तशी साथ दिली नसेल, पण त्यांचे प्रयत्न निश्चितच महत्वाचे होते. त्यांच्या त्या प्रयत्नांची गाथा आपल्याला थोडक्यात का होईना, पण माहित असणं आवश्यक आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय मुंबईत सुरु झालेल्या गिरण्यांच महत्व आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे कावसजींच्या व त्यानंतर मुंबईत सुरू झालेल्या गिरण्यांचा प्रवास कसकसा होत गेला, ते पाहाण्यापूर्वी आपण, देशात कापड गिरणी स्थापन करण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्याची थोडक्यात माहिती घेऊ..!
देशात कापड गिरणी सुरू करण्याचा सर्वात पहिला प्रयत्न झाला, तो सन १८१७-१८ मधे, आजच्या पश्चिम बंगालमधील (तेंव्हाचा Bengal Province), कलकत्त्यातहून (आजचा कोलकाता) २०-२५ किलोमिटर दूर असलेल्या, हुबळी नदीच्या काठावर असलेल्या ‘बावरीया’ या गांवात..! भारतातून कच्चा कापूस इंग्लंडला जातो व त्याचं कापड तयार होऊन पुन्हा भारतात परत येतो. त्यापेक्षा इथेच गिरणी टाकून तसं कापड तयार करण्याचा प्रयत्न केला, अगदी त्यासाठी गिरणी व त्यातील यंत्रसमुग्रीचा खर्च धरला तरी, ते प्रकरण २०-२५ टक्के स्वस्त ठरू शकते, असा हिशोब काही ब्रिटीश व्यावसायिकांनी केला आणि ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ या देशातल्या सर्वात पहिल्या कापड गिरणीची स्थापना केली..!
देशातल्या या पहिल्या गिरणीची माहिती घेण्यासाठी थोऽऽडं मागं जावं लागेल. ‘फोर्ट ग्लॉस्टर’ हा नांवाप्रमाणे किल्लाच. मुळातली ही डच इस्टेट. ‘युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ईन इंग्लंड’ (हे ‘ब्रिटीश ईस्ट कंपनीचं’ भावंड) या कंपनीच्या कॅप्टन अलेक्झांडर काईड (Kyd) या अधिकाऱ्याने दिनांक १ जुलै, १७९० मधे ही इस्टेट खरेदी केली. ही इस्टेट पुढे काही ब्रिटीश व्यापाऱ्यांनी गिरणी सुरू करण्यासाठी म्हणून खरेदी केली आणि त्यात असलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर’ या किल्ल्याचं रुपांतर, सन १८१७-१८ मधे, कापड गिरणीत करुन, तिला ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ असं नांव दिलं.

किल्ल्याचं रुपांतर गिरणीत केल्यामुळे, या गिरणीची बांधणी कारखान्यासारखी नसून, युरोपातल्या एखाद्या किल्ल्यासारखीच, परंतु घडीव दगडांच्या ऐवजी भाजक्या विटांची होती. भिंती तीन-तीन फूट जाडीच्या. शिवाय भिंतींना बाहेरून मजबूत कॉलम्सचा आधार. विचित्र पद्धतीची बांधणी असलेली ही गिरणी सुरू झाली अन् पुढच्या आठ-दहा वर्षातच बंदही पडली. ही गिरणी बंद होण्याचं कारण मात्र मजेशीर आहे. ते कारण म्हणजे, या गिरणीला जो परवाना (लायसन्स किंवा चार्टर) बंगाल सरकारने दिला होता, त्यात कापड गिरणी सोबतच, कॉफीचा मळा, डिस्टीलरी (फक्त रम तयार करण्याचा कारखाना), फाऊंड्री, तेलाचं गाळप आणि पेपर मिल सुरू करण्याचीही अट घालण्यात आली होती. त्यातला कॉफीचा मळा तर अगदी मस्टच होता. गिरणी धंद्याच्या अगदी विरुद्ध स्वरुपाचे व्यवसाय करणं भाग पडल्याने(च) असेल, पण तो द्राविडी प्राणायम न झेपल्याने सदर गिरणी बंद पडली, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे..!
ही गिरणी बंद होण्याची आणखीही काही कारणं काही अभ्यासक देतात. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे, ही गिरणी सुरू करण्यासाठी निवडलेलं चुकीचं ठिकाण. हे ठिकाण मुख्य शहर असलेल्या कलकत्त्यापासून २०-२५ किलो मिटर लांब होतं, शिवाय नदीच्या पलिकडे होतं. कलकत्त्याहून इथं यायचं म्हणजे पहिला रस्त्याने प्रवास व नंतर ‘डींगी’तून (लहान होडी) नदी ओलांडायची आणि तेव्हा गिरणी दिसणार. त्यावर तोडगा म्हणून जवळपासच्या गांवातले कामगार घ्यावेत, तर त्या शहरापासून दूरच्या गांवात योग्य ते कामगार मिळण्याची वानवाच असावी. त्यावर तोडगा म्हणून, ह्या गिरणीच्या मालकांनी आपला मायदेश इंग्लंड आणि स्कॉटलंड येथून तंत्रज्ञ, सुपरवायझर आणि कामगारही आणले. गिरणीत काम करायचं आणि तिथेच राहायचं. असं बरेच दिवस चाललं, पण कलकत्ताचं हवामान त्या थंड प्रदेशातील कामगारांना न झेपल्याने, ते मृत्युमुखी पडले आणि (कदाचित) तज्ञ कामगार नसल्याने, शेवटी गिरणीचीही तिच गत झाली.
या मिलच्या आवारात एक ख्रिश्चन दफनभुमी आहे. त्यात १५ थडगी आहेत. त्यातील १३ कबरींवरच्या पाट्या गहाळ झाल्या आहेत, मात्र दोन थडग्यांवरच्या पाट्या शाबूत असून, त्या वाचता येतात. त्यातील एका पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिल्समधील एक असिस्टंट जेम्स लॅंग याला, १४जुलै १८३५ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यू समयी त्याचं वय ३६ होतं; तर दुसऱ्या पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिलनधले अन्य एक असिस्टंट मिस्टर जास स्टिवनसन यांती पत्नी एलेन आणि त्यांची लहान मुलगी या दोघांनाही दिनांक १७ ऑगस्ट १८३७ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यूसमयी एलेनचं वय २३ वर्ष, तर तिच्या मुलीचं वय अवघ्या ५ दिवसांचं होतं..!

‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ आठ-दहा वर्षातच बंद पडली. पुढे तिच गिरणी, सन १८३२-३३ मधे ‘बावरीया कॉटन मिल्स (Bowreah Cotton Mills)’ या नांवाने सुरू झाली. ही गिरणी मात्र पुढे व्यवस्थित चालू राहिली.
भारतात सुरू झालेली ही सर्वात पहिली कापड गिरणी काही काळातच बंद पडलेली असली तरी, ती सुरू करण्याचं धाडस करणाऱ्या आणि त्यात काम करण्यासाठी आपला मायदेश सोडून इथे आलेल्या व आपल्या कर्मभुमीतच तरुण वयात देह ठेवणाऱ्या त्या कामगारांप्रती आपल्याला कृतज्ञ राहायला हवं..!
आणि हो, एक सांगायचंच राहिलं..! भारतात सुरू झालेल्या, ‘फोर्ट ग्लॉस्टर मिल्स’ या सर्वात पहिल्या कापड गिरणीत, युरोपियन का होईना, महिला कामगार पहिल्या दिवसापासून कामाला होत्या. त्या अर्थानेही ही गिरणी पहिली ठरते..!
या नंतरचा, देशात कापड गिरणी सुरू करण्याचा दुसरा प्रयत्न झाला, तो सन १८२८ मधे थेट देशाच्या दक्षिण टोकावर, पॉंडेचेरीमधे..!
त्याची कहाणी पुढच्या पाचव्या भागात..!!
-©️नितीन साळुंखे
9321811091
17.06.2021
टिपा-
1. लेखात माहिती दिलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल्स’ बाबत फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. जी काही त्रोटक माहिती मिळाली, त्यातही संगती लागत नाही. पुन्हा, ‘फोर्ट ग्लॉस्टर’ पहिली की, ‘बावरीया’ पहिली यात तज्ञांमधे मतभेद आहेत. पण वरीलपैकी कोणतीही गिरणी पहिली असली तरी, देशातील पहिली गिरणी स्थापन करण्याचा मान बंगाल प्रांताला जातो, यावर मात्र तज्ञांचं एकमत आहे. आपणही तेवढंच ध्यानात घ्यावं, ही विनंती.
2. ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन’ मिल्सच्या जागेतच ‘बावरीआ’ गिरणी सुरु झाली, कि त्याच मिलच्या आवारात दुसर्या इमारतीत सुरु झाली, ह्या विषयी संभ्रम आहे. परंतु ‘बावरीआ’ मिलची इमारत स्वतंत्र असावी असा कयास करता येतो. फोर्ट ग्लॉस्टरच्या किल्ल्यासारख्या इमारतीत नव्याने गिरणी स्थापन करण्याचा वेडेपणा कुणी करणार नाही. म्हणून कदाचित ह्या दोन इमारतींना, काही ठिकाणी, ‘नॉर्थ मिल’ आणि ‘साऊथ मिल’ अस म्हटलं असावं.
3. ”फोर्ट ग्लॉस्टर’ गिरणीचे व्यवस्थापक/मालक ‘मे. फर्गसन ॲंड कंपनी’ हे होते आणि त्यांना ती गिरणी व सोबतची कॉफी मळा, डिस्टीलरी, तेलाची व पेपरची गिरण व्यवस्थित सांभाळता न आल्याने, देशातली ही पहिली गिरण दिवाळखोरीत गेली, असं भारतातील कापड गिरण्यावर अभ्यास केलेले मान्यवर तज्ञ मॉरीस डेव्हीड मॉरीस यांनी म्हटलंय.
संदर्भ-
1. Bombay Industries;The Cotton Mills- A review of the progress of the textile industries in Bombay from 1850-1928 & the present constitution- S. M. Rutnagur, 1928, pages- 8 to 10, 22 & 23;
2. The Emergence of An Industrial Labour Force in India; A Study of Bombay Cotton Mills, 1854-1947 – Morris David Morris, pages-22-26; notes on pages 22 & 23;
3. The Indian Textile Journal; Special Souvenir Number to mark the Centenary of the Cotton Textile Industry in India- 1854-1954; Edited by Jal S. Rutnagur, Pages – 6, 7, 108-110, 117-121, 125, 126; या लेखातले फोटो याच पुस्तकातून घेतले आहेत.
4. The Indian Textile Journal; Jubilee Souvenir-1890 to 1940; pages- 18,19;
5. Cotton Mill Industry in Bengal- Mukul Gupta. Issued by Government of Bengal, Department of Industries, Bulletin No. 75; year 1937; Pages-2 to 4, 12,13 & 67;
6. The Cotton Industry of India;Prospect & Retrospect- K. L. Govil -1937.