शिष्य व्हा, गुरु ठायी ठायी आहेत..

शिष्य व्हा, गुरु ठायी ठायी आहेत..

गुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले प्रत्यक्ष गुरू. पण अप्रत्यक्ष, अपरिचित गुरू तर अगणीत असतात. ते देतच असतात, आपण किती घेतो आणि आपल्या वाटेला आलेला शिष्य धर्म कसा निभावतो याचा विचार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं गरजेचं ठरतं..

आमच्या मुंबईसारख्या शहरात रोज सकाळी कामासाठी बाहेर पडल्यापासून शिकायची सुरुवात होते. नेहेमीच्या बसचा कंडक्टर, बसमधूल प्रवासी, रिक्शावाला, लोकल प्रवासातील सहप्रवासी -यात प्रथम वर्गातले वेगळे आणि द्वितिय वर्गातले वेगळे-, नाक्या नाक्यावर लागलेले ‘काविळ’ झालेल्या तथाकथीत समाजसेवक, नेते यांचे बॅनर्स, रस्त्याने चालताना दिसणारी अगणित माणसं हे सारे सारे मला कसं वागावं आणि कसं वागू नये याचं अप्रत्यक्ष शिक्षण देत असतात. त्यांच्याकडून मी बरच काही शिकत असतो आणि स्वत:त ते मला देत असलेल्या अप्रत्यक्ष शिकवणीनुसार माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही बरीच सुधारणा अद्याप व्हायची बाकी आहे, याचा साक्षात्कार पुन्हा हेच चक्र दुसऱ्या दिवशी फिरताना होतो. साक्षात्कार आणि गुरूचा संबंध मला असा रोज नव्याने अनुभवायला मिळतो आणि मग मी दररोज या गुरुंच्या नव्याने प्रेमात पडत जातो..

अशाच एका रिक्शावाल्याने आपलं उदरभरण करणाऱ्या साधनाकडे, म्हणजे एखादा हातगाडीचा ठेला असो वा पानपट्टीची टपरी असो वा एखादं काॅर्पोरेट आॅफिस असो व अगदी हमाली असो, कसं पाहावं हे शिकवलं. त्याने त्याच्या रिक्शाला ‘चक्क ATM’ असं नांव दिलं होतं. जगातल्या सर्व ग्रंथांचा कीस पाडूनही रिक्शासाठी इतकं समर्पक नांव सुचलं नसतं, जे त्या सामान्य माणसाला सुचलं होतं. प्रेम असलं की असं छान छान सुचतं. आपले पोट भरणाऱ्या साधनाकडे प्रेमाने पाहावं हे त्या जेम तेम शिकलेल्या उत्तरप्रदेशी रिक्शावाल्याने मला शिकवलं. एका टॅक्सीवाल्याने गाडीचा हाॅर्न हा जनावरांना मागून येणाऱ्या गाडीपासून सावध करण्यासाठी असतो, माणसांसाठी नसतो, हे शिकवलं;वर ‘आजकल तो मन्सा न होने पर भी हारन बजाना पडता है साहब, क्या करे, आदमी जानवरसे भी बदतर हो गया है’ असं त्याचं अनुभवसिद्ध ज्ञानही साध्या सोप्या शब्दात दिलं. राजकारणी-भ्रष्ट अधिकारी समाजात कसं वागू नये याची शिकवण तर सकाळ संध्याकाळ देत असतात, ते ही गुरुच..!!

असं रोज काही ना काही आपल्याला शिकवून मला माझ्या शिष्यधर्माची सातत्याने याद दिलवणारे सर्वच मला गुरुस्थानी वाटतात. ‘मला समजते ते सर्व काही नाही’ हे माझं आवडतं वाक्य अशाच गुरुंची मला मिळालेली मोलाची शिकवण आहे. हे गुरू मला सातत्याने जमिनीवर राहाण्यास मदत करत असतात..

दररोज भेटणाऱ्या या सर्व गुरुंसारखाच पुस्तकं हा माझा महत्वाचा गुरू. सदा सर्वकाळ माझी संगत करणारा. लोक मुद्दाम टाईम अॅडजस्ट करून, आजुबाजूला जाहिरात करत ‘सत्संग’ करायला जातात. अलिकडे तर सत्संग हा स्टेटस सिंम्बीॅल झालाय हे पेप्रात येणाऱ्या जाहिरातींवरून समजतं. पण पुस्तकाचा सत्संग करायला कुठंही जावं लागत नाही. तेच बिचारं माझ्या झोळीत (पक्षी सॅकमधे. मी झोळीच वापरतो, म्हणून मी झोळी म्हणालो) निवांत बसून माझा संग करत सोबत प्रवास करत असतं. सोबत एखादं पुस्तक आहे ही भावनाच किती आश्वासक असते, हे ज्याने अनुभवलंय त्यांनाच कळेल. सतत सोबत करणारा, अबोल मार्गदर्शन करणारा पुस्तक हा एकमेंव गुरू. कोणतीही बंधनं नाहीत की बंधं नाहीत, व्रत नाही की सोहळे नाहीत की काहीच अवजड प्रथा-परंपरा नाहीत.

आपण कल्पना करू शकणार नाही एवढं सामर्थ्य या गुरुत आहे. मी माझ्या गुरुच्या या सामर्थ्याचा मन:पूत अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो. तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या साऱ्या- साऱ्याचा विसर पाडून क्षणात समाधी अवस्थेत नेणारा हा विलक्षण गुरु आहे. मेडीटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी स्वतःशी एकरूप होणं हा असतो, हे मला ऐकून माहित आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे. आणि ती समजूत जर खरी असेल, तर मी खात्रीने सांगू शकतो, की पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. मी ध्यान, योग, अध्यात्म यांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणारांना मिळत असेल, त्यापेक्षा मला पुस्तकातून मिळणारी अनुभूती त्या पेक्षा कणभरही कमी नाही. पुन्हा या गुरूशी रमणाम होण्यासाठी कोणतीही विशिष्ट जागा, उदबत्तीचा सुगंधी धूर, मंद प्रकाशयोजना, गूढ गंभीर स्वरातले मंत्रोच्चार किंवा आणखी काही इत्यादी कशाचीही गरज भासत नाही. पुस्तक गुरूशी एकरूप होऊन, त्या गुरूच्या हृदयीचे माझ्या हृदयी येण्यासाठी गर्दीचा रस्ता, रेल्वेचा फलाट, उडप्याच हॉटेल किंवा अगदी स्मशानही चालतं. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव होऊन गेलेल्या त्या संताना आला असेल तो असेल, पण या गुरूशी तादात्म्य पावण्याचा माझा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नाही. समाधी लागणं, मला वाटतं, यालाच म्हणत असावेत..!!.

या गुरुचं वैशिष्ट्य म्हणजे, याने ‘मी सर्वज्ञानी नाही’’ याची जाणीव माझ्यात सतत तेवत ठवली. एक पुस्तक वाचून मला काहीतरी समजतंय न समजतंय, तोवर दुसर त्याच विषयावरचं, परंतु वेगळी मांडणी असणारं पुस्तक हातात पडतं आणि ‘आपल्याला काही समजत नाही’ ही जाणीव आणखी तीव्र होते. मला वाटतं, आपल्याला काही समजत नाही किंवा आपल्याला जे जे समजतं असं वाटतं, ते सर्व काही नसतं, ही भावना आपल्यात निर्माण करून, ज्ञानाच्या दिशेने आणखी चार पावलं नेऊन आपली विचार शक्ती विकसित करणारा पुस्तकासारखा अन्य दुसरा गुरु नाही.

माझ्यातलं शिष्यत्व सतत जागतं ठेवणारा अनुभव हा माझा आणखी एक गुरु. कोणताही गुरु माणसाला शहाणा करतो, असं आपण म्हणतो. अनुभवाच्या बाबतीतही हे आपण म्हणू शकतो. ‘म्हणू शकतो’ हा शब्द प्रयोग करण्यामागे, अनुभवाने माणूस शहाणा होतोच असं नाही, हा अनुभव आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण म्हणूनच ठीक आहे. अन्यथा प्रत्यक्षात पुढच्यासही ठेच आणि मागच्यासही ठेचच, हा अनुभव आपल्याला वारंवार आला नसता. सध्या तर इथे आपण दुसऱ्याच्या सोडाच, स्वतःला लागलेल्या ठेचेतूनही काही शिकावयास तयार नाहीत, हे वारंवार सिद्ध होतंय. इथे गुरु चुकत नाही, तर शिष्य या नात्याने आपण चुकतो. गुरु मोठा असेल, तर शिष्यही त्याच तयारीचा लागतो. इथे कस लागतो तो आपल्यातल्या शिष्याचा. सध्याच्या सर्वत्र अविश्वास भरून राहिलेल्या काळात तर गुरूपेक्षा शिष्याची जबाबदारी खूप वाढलेली आहे. मोबाईलवर येणारे परंतु बुद्धीला न पटणारे मेसेजेस, नेत्यांच्या कोलांट उड्या, धार्मिक आणि जातीय उन्माद, आपल्या सर्वांच्यातच निर्माण झालेले पैशांचे अतोनात महत्व आणि त्यातून लयाला गेलेली माणुसकी ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वानुभावाच्या कसोटीवर घासून त्या प्रमाणे आपलं वर्तन करायची आपण शिष्य म्हणून आपली जबाबदारी आहे. खऱ्या-खोट्याची शहानिशा कशी करावी, हे अनुभव शिकवतच असतो, आपण शिकत नाही ह्याची खंत आहे.

येत्या मंगळवारी, म्हणजे १६ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. ह्या दिवशी गुरूच महात्म्य सांगणारे, गुरुकडून काहीतरी शिकलो म्हणून गुरुचे उपकार स्मरणाऱ्या हजोरो मेसेजेसचा धुंवाधार पाउस पडणार. पण गुरूने दाखवलेल्या मार्गावर त्यापैकी कितीजण चालताहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर पदरी निराशाच पडेल याविषयी मला तरी शंका नाही. आपण आजवरच्या आयुष्यात जे जे काही शिकलो, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही चांगलं शिकवलं त्या शिकवणुकी प्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हीच खरी गुरुदक्षिणा असेल.असं केलं तरच त्या गुरुपौर्णिमेला अर्थ..!!

गुरुपौर्णिमा हा केवळ शुभेच्छा (ह्या का देतात हे मला अद्याप समजलेलं नाही. एकाने तर गेल्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्याही शुभेच्छा दिल्या होत्या.) देण्याचा दिवस नाही, तर आपल्यापैकी प्रत्येक शिष्याने अंतर्मुख होऊन, आपण ज्या ज्या गुरुकडून जे जे काही शिकलो त्या प्रमाणे आपण स्वत: वागतो आहोत का, याचा विचार करण्याचा, आपल्यातलं. शिष्यत्व सतत जागतं आहे का हे तपासण्याचा दिवस आहे, अस मी समजतो..!!

-नितीन साळुंखे
9321811091
१३.०७.२०१९

प्रसिद्धी- ‘दै. रामप्रहर’, पनवेल-रायगड, रविवार दिनांक १४ जुलै, २०१९

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र-

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र-

महत्वाचं- ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापिठात (IGNOU)’ ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरु करणार, अशी बातमी आल्यापासून, तसा अभ्यासक्रम सुरू करावा की करु नये, ही चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर, मी सन २०१७ मधे एका वर्तमानपत्रासाठी लिहिलेला लेख, मला इथे पोस्ट करावासा वाटतो..!

सदर लेख मी तीन वर्षांपूर्वी लिहिलेला आहे आणि या तिन-एक वर्षात माझ्या विचारांत अमुलाग्र बदल झालेला आहे, ही गोष्ट हा लेख वाचाताना लक्षात ठेवावी, ही विनंती.

गत चार-पांच वर्षांपासून मी देव आणि धर्म या गोष्टींपासून खूप लांब गेलेलो आहे. किंबहूना मी या दोन्ही गोष्टी निरुपयोगी (काही लोकांच्या स्वार्थासाठी मात्र अतीव उपयोगी) आहेत, या निष्कर्षाप्रती आलेलो असून, मी या दोन्ही गोष्टी ठामपणे नाकारलेल्या आहेत. मात्र ‘ज्योतिष’ ह्या विषयासंबंधात मात्र मी स्वत:ही संभ्रमात आहे. ज्योतिषाची सांगड देव-धर्माशी घातली जाते व या लेखावरून, माझे वरचे विधान विसंगत वाटू शकते, म्हणून हा खुलासा करणं मला आवश्यक वाटतं..!

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र-

ज्योतिष ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषचाचं चर्वण करून करून चोथा झालाय अगदी. तरी पुन्हा पुन्हा नव्याने हा विषय चर्चिला जातोच. जो विषय चर्चेत असतो, त्या विषयाची लोकांना एकतर आवड असते किंवा नपड तरी असते. दोन्ही संदर्भात चर्चा ही होतेच. परंतू मी थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयांवर बोलणार आहे.

लिहीण्याची सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छीतो, की मी उगाच टिका करायची म्हणून किंवा एखाद्या विषयाची बाजू घ्यायची म्हणून घेत नाही, तसंच कोणत्याही विषयावर मी उगाच बोलायचं म्हणूनही बोलत नाही, तो माझा स्वभाव नाही. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ या संतवचनावार माझा विश्वास आहे. ज्या विषयाची बाजू घ्यायची किंवा ज्यावर टिका करायची, तर त्या विषयाचा मनाचं समाधान होईपर्यंत अभ्यास करून, मगच बाजू घ्यावी किंवा टीका करावी असं मला वाटतं.

ज्योतिषशास्त्राचंही तसंच आहे, मी सन १९८९ पासूनच मी या शास्त्राचा अभ्यासक आहे आणि या शास्त्राचा माझा अभ्यास अजुनही सुरुच आहे. याचा अर्थ ज्योतिषशास्त्रावर टिका करण्यास वा त्याची बाजू घेण्यास मी पात्र आहे असं मी समजतो. या शास्त्रावर टिका करणाऱ्यांपैकी शेकडा शंभर जणांचा या शास्त्राचा अभ्यास नसतो. दुसरे बोलतात म्हणून आपण बोलायचं आणि आपण पुरोगामी असल्याचं दाखवायचं, असा सर्व प्रकार आहे. मी मात्र जवळपास २६-२७ वर्ष अभ्यास करून मला जे आकलन झालं त्या आधारे मी पुढील गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. या शास्त्रावरची ही टिकाही नाही किंवा बाजूही घेतलेली नाही.

सुरुवात करताना ‘ज्योतिषशास्त्र’ या शब्दातील ‘शास्त्र’ या शब्दाविषयी बोलू. ‘शास्त्र’ हा शब्द आपल्या कुणाच्याही कानी पडला की, आपल्या डोळ्यांसमोर चटकन दिसतं ते ‘विज्ञान’..! सामान्य जीवनात आपण शास्त्र ह्या शब्दाची सांगड विज्ञान ह्या शब्दाशी घातली आहे. परंतु ‘ज्योतिष’ शब्दाच्या पुढच्या ‘शास्त्र’ ह्या शब्दाचा आणि विज्ञानाचा तसा काहीच संबंध नाही(त्यातला गणिती भाग वगळून). ज्योतिषशास्त्रातला शास्त्र हा शब्द विंज्ञानाशी संबंधीत नसून, ‘धर्मशास्त्रा’शी संबंधीत आहे. आणि म्हणून ज्योतिषशास्त्र व विज्ञान याची तुलना संभवत नाही.

दुसरं म्हणजे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांतील नेमक्या फरकाबद्दल थोडं बोलू. या दोघांतील सीमारेषा अत्यंत पुसट आहे आणि ती सीमा कोणती, हे सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्यावर किंवा मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यावर अवलंबून असते. एखाद्या देवळात जाऊन एखाद्याचं भलं झालं, तर त्या देवळातला तो देव त्या एखाद्याच्या अत्यंत श्रद्धेचा भाग बनतो, तर त्याची श्रद्धा ही दुसऱ्या एखाद्याच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा असते, कारण त्याला तो अनुभव आलेला नसतो. थोडक्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सबजेक्टीव्ह, वैयक्तिक अनुभवावरून ठरवायच्या टर्म्स आहेत असं म्हणतां येईल. आणखी एक उदाहरण देतो. हे उदाहरण अनेकांच्या भावना दुखावणारं असू शकेल याची मला कल्पना आहे, तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक अगदी स्पष्ट समजावून सांगण्यासाठी ते उदाहरण नाईलाजाने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यांच्या भावना दुखावतील, त्यांची मी आधीच क्षमा मागतो.

आपला बाप कोण, आई दाखवते तो, हा आपल्या सर्वांच्याच श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग असतो. बहुसंख्यांच्या बाबतींत हे खरंही असतं. तरीही इथे पुरावा दाखवा म्हणून सांगितलं जात नाही. नीट विचार केला, तर ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नव्हे काय? भावनेचा प्रश्न असल्यानं इथं कोणी पुरावा मागत नाही. पण तुरळक का होईना अशी उदाहरणं समाजात दिसतात, की एखाद्या मुलाचा बाप, ते मुल ज्याचं नांव बाप म्हणून लावते, तो असतोच असं नाही. परंतु त्या मुलाच्या दृष्टीने तोच त्याचा बाप असतो. ही त्या मुलाची श्रद्धा असते, तर खरं काय आहे त्याची माहिती असणाऱ्यांच्या दृष्टीने ती त्या मुलाची अंधश्रद्धा असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेची व्याख्या अशी व्यक्तीपरत्वे बदलत असते. म्हणून श्रद्धा नसलेल्यानी श्रद्धा असलेल्यावर टिका करताना सारासारविचारबुद्धीने करायला हवी. एखाद्या गोष्टीवरील श्रद्धेमुळे कुणाचं नुकसान होतं नसेल, तर उगाच अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून बोंब मारण्यात काही हंशील नाही. ज्योतिष हा असाच भावनेचा आणि म्हणून श्रद्धेचा प्रश्न आहे, ती अंधश्रद्धा आहे म्हणून उगाच बोलण्यात काय हशील..!

आता ज्योतिषशास्त्राविषयी. ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. किंबहुना ज्योतिषाचा आधार कधी ना कधी घेतला नाही, असा मनुष्य सापडणं दुर्मिळ. ज्यांना याचा अनुभव येतो, त्यांची यावर श्रद्धा बसते आणि ज्यांना येत नाही ते याला थोतांड म्हणतात. ज्योतिष हे असं औषध आहे, की जे भरल्या पोटावर कधीच खाल्लं जात नाही. हे रिकामी पोटीच घ्यायचं औषध आहे. तरी गंम्मत अशी, रिकामं पोट भरण्यासाठी ज्योतिष शास्त्राचं औषध घेतलेलेच, मग पोट भरलं, की ज्योतिष हे थोतांड आहे असं सांगत फिरतात. हे म्हणजे अन्नछत्रात जेवल्यावर जेवण अळणी होतं म्हणून नांवं ठेवण्यासारखं झालं.

आता रिकामी पोट म्हणजे काय, ते ही स्पष्ट करणे गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना उद्या माझ्या ताटात काय पडणार आहे इथपासून, ते मुळात पडणार तरी आहे की नाही इथपर्यंतंची शाश्वतता नसते, ते म्हणजे रिकामी पोट. थोडक्यात अशाश्वत, अस्थिर किंवा अनस्टेबल आयुष्य जगणाऱ्यांसाठी ज्योतिष हे व्हिटामिनसारखं किंवा इंजेक्शनसारखं काम करतं. उद्या काय घडणार आहे, याचं कुतुहल माणसाला फार पुरातन काळापासून आहे. या कुतुहलाचा शोध हे शास्त्र घेतं. अज्ञाताचा शोध घेणं हा माणसाचा आवडतां खेळ आहे. या खेळातूनच आजची आपली प्रगती झाली आहे. ‘चंद्र हवा मजं’ असा हट्ट धरलेल्या प्रभु रामचंद्राला थाळीतल्या चंद्राच्या प्रतिबिंबावर समाधान मानावं लागलं होतं, तर आज त्याच्या चंद्रावर माणसांच्या वसाहती करण्याच्या गोष्टी चालल्यात. चंद्राची पाण्यातली प्रतिमा ते प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवणं, हा मानवानं अज्ञाताच्या शोधातूनच गाठलेला टप्पा आहे. अर्थात यासाठी विज्ञानाचा आधार घेतला गेला. ज्योतिषशास्त्राचा तारतम्याने आणि विज्ञानाच्या श्रद्धेने आधार घेतला की अनेक बाबतीत चंद्राच्या शोधासारखेच उत्तम अनुभव येऊ शकतात. चंद्र पादाक्रांत करण्यासाठी विज्ञान कामाला येते, तर उद्या माझ्या नशिबात काय आहे हे शोधण्यासाठी ज्योतिष कामाला लागते. विज्ञान चंद्राचा पत्ता अचूक देतं, तर ज्योतिष नशिबातल्या भाकरीच्या चंद्राच्या प्राप्तीचा अंदाज देतं. विज्ञान हे सर्टन असतं, तर ज्योतिष हे अनसर्टनिटीचं शास्त्र असतं.

ज्यांच्या जीवनात स्थैर्य-विशेषकरून आर्थिक स्थैर्य- शांतता आहे असे लोक ज्योतिष शास्त्राला नांवं ठेवताना आढळतात. असे लोक सहसा पैसेवाले, हुद्देवाले असल्यानं, त्यांना ‘उद्या’ची फिकीर नसते. त्यांच्या मताचा समाजावर प्रभावही असतो. ते ज्योतिषशास्त्रावर टिका करतात म्हणून मग इतरही करतात. परंतु ज्यांच्या जीवनात वा व्यवसायात ‘अनसर्टनिटी’, उद्याची काळजी असते, अशा व्यक्ती मात्र ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. यांत हातावर पोट असणारे, निम्न स्तरातलं आयुष्य जगणारे, जुगारी, राजकारणी, चित्रपट व्यावसायीक या सारख्या व्यक्ती येतात. राजकारण, चित्रपट या सारख्या व्यवसायांत हमखास यशाची खात्री कुणालाच देतां येत नाही व म्हणून ज्योतिषशास्त्र अशा व्यवसायांत असणाऱ्यांना मोठा मानसिक आधार ठरतं व त्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करतं. हातावर पोट असणाऱ्यांचंही असंच अस्थैर्य त्यांना या शास्त्राचा आधार घेण्यास प्रवृत्त करतं. जुगाराचंही तसंच. बाकीचे जुगार सोडून द्या पण लग्न हा एक जुगार समजला जातो व तसा तो असतोही. म्हणून अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित लोकंही पत्रिका जमल्याशिवाय लग्नाला उभे राहात नाहीत. अगदी प्रेमविवाह करणारे कित्येक प्रेमवीर शेवटच्या क्षणाला पत्रिका बघण्याचा हट्ट धरतात. थोडक्यात उद्याच्या पोटात काय दडलंय, याचा वेध घेण्याचं काम ज्योतिष शास्त्र करतं. मनाला उभारी देण्याचं काम करणारं हे शास्त्र आहे. म्हणून मी या शास्त्राला व्हिटामिन्स किंवा इंजेक्शन असं म्हणतो.

ज्योतिषशास्त्र हे कल्पनेवर आधारीत शास्त्र आहे. कोणत्याही इतर शास्त्रापेक्षा हे जास्त वैयक्तिक आहे. कुंडलीतली बारा घरे, बारा राशी आणि बारा ग्रह यांच्या परम्युटेशन-काॅम्बिनेशनचा अर्थ लावून ज्योतिष सांगीतलं जातं. हा अर्थ समोरच्या व्यक्तीचं लिंग आणि वय पाहून सांगीतला जातो. इतर कोणत्याही शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राचे बेसिक नियम आणि व्याख्या सारख्याच असल्या, तरी त्यांचं अॅप्लिकेशन मात्र लिंग-वयपरत्वे बदलत असतं. उदा. मंगळ आणि शुक्र या ग्रहांची युती जर एखाद्या कुंडलीत असेल, तर या दोन्ही ग्रहांचे गुणधर्म अधिक ते ज्या घरात आहेत त्या घरावरून पाहील्या जाणाऱ्या गोष्टी यांचं मिश्रण करून सांगीतलं जातं. मंगळ हा पुरुष तर शुक्र हा स्त्री ग्रह मानला गेला आहे. तसंच शुक्र जलतत्वाचा तर मगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह. हे मिश्रण वर्णन करण्यासाठी कमालीची तरल कल्पनाशक्ती लागते. शुक्र हा अत्यंत रसिक, रोमान्स, शृंगारीक, भावनाप्रधान ग्रह समजला जातो तर मंगळ हा ग्रह गती, वेग, वासना, संताप तीव्रतेचा कारक समजतात. आता यांचं काॅम्बिनेशन कसं होईल, तर शुक्राच्या शृंगारीकतेला मंगळाच्या गतीची साथ मिळून, ती रसिकता केवळ वासनापूर्तीपर्यंतच मर्यादीत राहाते. रणांगणाचा राजा असलेला मंगळ, बेडरुमही रणांगणासारखीच वापरतो.

आता मंगळ-शुक्राचं हे किंवा असं फळ देताना समोरच्या व्यक्तीचं वय पाहावं लागतं. वर उल्लेखलेली फळं कुमार वयाच्या किंवा वयाची ६० ओलांडलेल्याला देऊन कसं चालेल? ही फळं तारुण्यावस्थेतील लोकांना देता येतील. स्त्रीयांना पुरषांसारखी फळ देता येत नाहीत, तर त्याना द्यायची फळं बऱ्यातदा पुरुषांच्या फळांच्या विपरीत असतात. इतर शास्त्रांपेक्षा ज्योतिषशास्त्र वेगळं ठरतं, ते इथंच. इतर शास्त्राचे नियम हे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. ते सर्वांना समान लागू होतात.

ज्योतिषशास्त्रातले नियम तेच असले तरी ते लागू करताना मात्र लिंग आणि वयपरत्वे लागू करावे लागतात आणि म्हणून याची टवाळीच जास्त होताना दिसते. हे तारतम्य ज्योतिषाने बाळगायचं असतं, नाहीतर बदनाम शास्त्र होतं. ह्या शास्त्राचा आवाका अत्यंत मोठा आहे, मी इथं थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय. आपल्याला समजलं नाही, तर तो दोष माझा.

आता मी या शास्त्राला इंजेक्शन का म्हणतो ते सांगतो आणि लेखाचा समारोप करतो. हरलेल्या, खचलेल्या मनाला ‘आणखी थोडा प्रयत्न कर आणि थोडी कळ राढं, भविष्य उज्वल’ आहे असा धिर देणारं हे शास्त्र आहे. माणूस त्या आशेवर प्रयत्न करत दिवस काढतो व पुढे तो यशस्वी होतोही. हे यश अर्थातच प्रयत्न आणि इच्छाशक्तीचं फळ असतं आणि ही इच्छाशक्ती जागृत करायचं काम ज्योतिषशास्त्र करतं. इंजेक्शन हे जसं थकलेल्या आजारी शरीराला लगेच उभं करतं आणि एकदा का शरीर उभं राहीलं, की त्याचा काॅन्फिडन्स आपोआप वाढतो व नंतर ते आपलं काम सहज करू शकतं. मग ते जगतं नेहेमीच्या अन्नावर. तसंच ज्योतिषाचं आहे. खचलेल्या मनाला काॅन्फिडन्स देण्याचं काम ज्योतिष करतं आणि एकदा का तो आला की पुढचं काम सोप असतं. इंजेक्शन शरीर उभं करतं, तर ज्योतिष मन उभं करत. शरीर एकदा का उभं राहीलं की मग इंजेक्शनची गरज लागत नाही, तसंच एकदा का मनाने उभारी घेतली, की सारखा ज्योतिषाच्या आधाराची गरज नसते. तशी ती सारखी घेऊही नये. काही गोष्टी जशा घडतील तशा घडू द्याव्यात. पण नाही, माणसं चुकतात ती नेमकी इथंच, ती एका अनुभवावरून त्याच्या नादी लागतात आणि उठ-सुट ज्योतिषाकडे धावतात आणि मग लबाड ज्योतिषी त्यांचा गैरफायदा घेतात आणि मग या पवित्र व्यवसायाचा ‘धेदा’ होतो व नंतर हा लोकांच्या हेटाळणीचा भाग होतो.

ज्योतिषाचा आधार जरूर घ्यावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये. इंजेक्शन कुठं कोण रोज घेतं?

-नितीन साळुंखे
9331811091
05.07.2017