टाईम मशिन..
श्री. अशोक राणेसर तयार करत असलेल्या ‘एक होतं गिरणगांव’ या डॉक्युमेंटरीसाठी, जुन्या संदर्भांच्या शोधात होतो. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विसाव्या शतकात गिरणगांवात बहरात आलेल्या, कामगार रंगभुमिवरच्या जुन्या व त्या काळात गाजलेल्या नाटकांच्या पुस्तकांचा माग काढत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलयाच पोहोचलो होते.
तिथे तर अलिबाबाची गुहाच समोर उघडी झाला. वसंत जाधव, वसंत दुदवडकर, आबासाहेब आचरेकर, ला. कृ. आयरे, कवि झेंडा, आत्माराम सावंत इत्यादी कामगार रंगभुमी गाजवलेल्या अनेक नाटककारांची अस्तल पुस्तकं पाहायला मिळाली. त्यात त्यावेळचे दुर्मिळ फोटोही मला सापडले, जे आमच्या डॉक्युमेंटरीसाठी अतिशय आवश्यक होते.
त्यातल्याच ‘पैजेचा विडा’ या, नाट्यकार जगदीश दळवींनी सन १९५३ सालात लिहिलेलं पुस्तक सापडलं. या पुस्तकात मला एक पत्ता सापडला. हा पत्ता होता, ‘जयवंत आणि कंपनी’, परळ, मुंबई १२, हा! ही फर्म त्याकाळात नाटकांसाठी लागणारे ऐतिहासिक, पौराणिक कपडे, पगड्या, जिरेटोप, चिलखतं, तलवारी आदी वस्तू भाड्याने देत असे..!
आता हा पत्ता होता १९५३ सालातला. ती कंपनी, तिचे मालक पांडुरंग गोविंद परब आणि त्यांचं कुटुंब सांप्रतच्या काळात त्या पत्त्यावर अस्तित्वात असेल की नाही, असल्यास त्याकाळातलं त्यांनी टिकवून ठेवलं असेल की नाही, अशी प्रश्नांची माळका समोर उभी राहिली. मुंबईत मराठी माणसाचं संपत चाललेलं अस्तित्व, मुंबई गिळंकृत करत चाललेला पुन:’विकासाचा’ काळकभिन्न राक्षस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या वस्तू जपून ठेवण्यातली आपल्या समाजाची एकूणच उदासिनता लक्षात घेता, माझ्यासमोर हे प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच होतं. पण म्हटलं, प्रयत्न तर करू, मिळाल तर घबाड मिळेल, नाही मिळाल्यास नविन माणसांना भेटल्याचा आनंद तर मिळेलच मिळेल. फेरी काही अगदीच फुकट जाणार नाही.

मी आणि माझ्या शोधमोहिमेतले नेहेमीचे मित्र श्री सुधीर मोरेंसोबत पत्ता शोधत काल संध्याकाळी त्या जागी गेलो. आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. ‘जयवंत आणि कंपनी’ आता ६७ वर्षांनंतर अस्तित्वात नसली तरी, ती चालवणाऱ्या परब यांचं कुटुंब त्याच खोलीत अजुनही राहात होतं. फ्लॅट, ब्लॉकच्या सांसर्गिक विषाणूपासून त्यांनी स्वत:ला यशस्वीरित्या वाचवलं होतं.
तिच दहा बाय दहाची जुनी खोली, खाली जुन्या काळातली दगडी फरशी, जुनाट, पण चकचकीत पॉलिश केलेली लाकडी कपाटं आणि त्या कपाटात खच्चून भरलेले तेच ते जुन्या जमान्यातले नाटकातले कपडे. सगळं नजरेसोर पाहून आम्ही हरखूनच गेलो. त्या खोलीत शिरताच, भोवतालचं आधुनिक जग लुप्त पावलं आणि आम्ही एकदम विसाव्या शतकाच्या मध्यावरच्या गिरणगांवात पोहोचलो. मी टाईम मशिनमधे शिरलो. गिरण्यांचे भोंगे कानात घुमू लागले. त्या खोलीतल्या एकुलत्या एक खिडकीतून दिसणारा पलिकडचा अजस्त्र, श्रीमंती टॉवर नाहीसा होईन, तिथे मला धुर ओकणारी गिरणीची चिमनी दिसू लागली. रस्त्यावरची लेंग्या-झब्ब्यातल्या गिरण कामगारांची लगबग दिसू लागली. वेळ संध्याकाळची होती. पहिली पाळी संपवून आलेल्या गिरण कामगारांची मनोरंजनाची ही वेळ. त्या मनोरंजनातला नाटक हा अविभाज्यभाग. नाटकाची तालिम नजरेसमोर तरळू लागली. लहानपणी गणपतीच्या मांडवात पाहिलेली ती नाटकं डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागली. नांदी ऐकू येऊ लागली. शिवाजी, संभाजी, जिजाऊ नजरेसमोर साकारू लागले. रणांगणावर यवनांसोबत लढणारे महाराजांन मला दिसू लागले, तलवारींचा खणखणाट, घोड्यांच्या टापा नि हत्तींचा चित्कार कानात घुमू लागले..!
ते जुने कपडे हातात घेताच, माझ्या मनाने गिरणगांवातल्या त्या सोनेरी गत इतिहासाशी थेट नात जोडून घेतलं होतं. खोलीच्या मालकीणबाई चहा घेऊन आल्या होत्या. त्यांची अवस्थाही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. मी भानावर आलो. सन १९५३मधला पत्ता शोधत, २०२१ साली कुणीतरी येईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यांना त्याचंच त्यांना अप्रुप वाटत होतं. त्यांचेही डोळे भरून आले होते.
मालक, त्यांना जीवापाड जपलेला तो एकेक अमुल्य कपडा निगुतीने काढून दाखवत होते. कामगार रंगभुमीवरच्या कितीतरी महान नट-नट्यांनी अंगावर मिरवलेले ते कपडे हळुवारपणे हाताळताना, मी नकळतच त्या काळात गेलो होतो. ‘जयवंत आणि कंपना’ आता अस्तित्वात नाही; नाटकासाठी कपडे भाड्याने देण्याचा व्चवसायही बंद करुन कैक वर्ष झालीयत. मात्र त्या कंपनीच्या मालकाच्या वंशजांनी ती आठवण मात्र जीवापाड जपली होती. आणि म्हणून आम्हाला ती अनुभवता आली..!
इथे येऊन दोन तास झाले होते. भानवर येऊन वर्तमानात आलो. इतिहासाचा निरोप घ्यायची वेळ आली. जाता जाता महाराजांचा जिरेटोप डोक्यावर घालून पाहायची इच्छा झाली. मी तो हातातही घेतला, पण डोक्यावर घालायला मन धजेना. नाटकातला असला म्हणून काय झालं, तो महाराजांचा जिरेटोप होता. तो परिधान करायची माझी काहीच पात्रता नाही, हे लक्षात घेऊन मी तो बाजुला ठेवला.
औरंगजेबाची पगडी मात्र मी घालून पाहिली.
तेंव्हाचाच हा फोटो..!
-नितीन साळुंखे
06.08.2021
