दादरचा टिळक ब्रिज व कोतवाल गार्डन-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

दादरचा टिळक ब्रिज व कोतवाल गार्डन-

टिळक ब्रिज-

दादरचा टिळक ब्रिज. गेल्या पाच-सहा वर्षाचा त्याचा नि माझा सहवास. गेली पाच-सहा वर्ष मी रोज सकाळ-संध्याकाळ या ब्रिजवरून ये-जा करतो. टिळक ब्रिज, त्यावरुन अखंड वाहाणारी, सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी. पुलावर होणारं ते सततचं ट्राफिक जाम, पहाटेच्या वेळी पुलावर भरणाऱ्या भाजी-पाल्याच्या घाऊक बाजारानंतर, पुलाच्या फुटपाथवर सकाळच्या वेळी होणारा तो भाजी-पाल्याचा चिखल आणि गेली काही वर्ष त्याची सततची चाललेली डागडुजी हे माझ्या नित पाहाण्यातलं दृष्य. हे सर्व पाहून मला या पुलाच्या क्षमतेविषयी कौतुकच वाटत आलंय. आपण आधुनिक काळात बांधत असलेले पुल बांधायला वीस-पंचवीस वर्ष लागत असली तरी, तो पडायला दोन-पांच वर्ष पुरेशी असतात, हा आपला अनुभव. त्यात हा कितीतरी वर्ष जुना पुल, अजूनही सक्षमपणे कार्यरत आहे, हे पाहून त्याच्याविषयी व तो बांधणाऱ्यांविषयी, माझ्या मनात कौतुक आणि कृतज्ञता अशा दोन्ही भावना दाटून येतात..!

हा पूल कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल हा प्रश्न नेहेमिच माझ्या मनात येत असे. पण येत असे नि जात असे, एवढंच होत असे. या पुलाची जन्मकहाणी शोधावी, असं काही वाटलं नव्हतं. शोधण्यासाठी नकळतपणे कारणीभूत ठरले, ते माझे दादरनिवासी स्नेही डॉ. अविनाश वैद्य..!

डॉ. वैद्यंशी गप्पा मारताना या पुलाचा विषय हमखास येत असे. रेल्वेचे अभ्यासक असणाऱ्या डॉक्टरांना या पुलाचं भारी कौतुक. तो लहानपणापासून त्यांचा सवंगडी असल्याने, त्यांना ही माहिती हवी होती. पण काही केल्या त्यांना हा पूल कधी व का बांधला, याची माहिती मिळत नव्हती. इंग्रजी अमलात बांधलेस्या इतर पुलांवर, त्या पुलांची माहिती देणारी पाटी असते. तशी या पुलावर कधी त्यांच्या पाहाण्यात आली नाही. माझ्याही पाहाण्यात आली नव्हती आणि नाही. डॉ. वैद्य यांनी हा विषय माझ्या डोक्यात सोडला.

हा पूल कधी बांधला, याची इतर काही जाणकारांकडे चौकशी केली असता, सन १९२० च्या पुढेच, असं उत्तर मिळायचं. सन १९२० च्या पुढेच का, याचं उत्तरही मजेशीर असायचं. टिळक १९२० साली वारले आणि ज्या अर्थी या पुलाला टिळकांचं नांव दिलंय, त्या अर्थी हा पूल १९२० सालानंतर बांधला गेलाय, असा त्या उत्तरांमागचा तर्क असायचा. तसं असेलं तर मग, इंग्रजी अंमलात बांधल्या गेलेल्या, मुंबैतल्या इतर पुलांना-रस्त्यांना जशी करी रोड ब्रिज, आर्थर रोड ब्रिज, कॅरोल ब्रिज वा ग्रॅंट रोड, सॅंडहर्स्ट रोड अशीइंग्रज गव्हर्नरांची-अधिकाऱ्यांची नांवं आहेत, तसं नांव या पुलाला न देता, भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचं नांव का दिलं गेलं असावं, हा नविनच प्रश्न समोर उभा राहायचा आणि चिळक ब्रिज नेमका कधी व कुणी बांधला, हा मूळ प्रश्न बाजुला पडायचा..!

टिळक पुलाचा उल्लेख काही लेखांमधून माझ्या वाचनात आला होता, पण तो केवळ संदर्भ म्हणून. उदा. साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी, त्यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात लिहिल्या आहेत. सदरचा लेख, ‘मुंबई महानगरपालिके’च्या इमारतीस शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत मी वाचला होता. श्री. ना. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम कॉजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. #टिळकब्रिजनुकताचतयारझाला_होता”. पेंडशाच्या लेखातील हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं..!

वर लिहिल्याप्रमाणे, अनेकांच्या बोलण्यात येणारं, टिळक ब्रिजच्या बांधकामाचं वर्ष १९२० च्या पुढेच, असा उल्लेख आता, पेंडसेंच्या लेखामुळे सन १९२५ पर्यंत मर्यादीत झाला. म्हणजे, दादरचा टिळक पूल १९२० ते १९२५, अशा पांच वर्षांच्या काळात बांधला गेला असावा, हे स्पष्ट होतं. तरीही, नेमका कधी, हा प्रश्न उरतोच आणि त्याचं उत्तर शोधायच्या मागे मी लागलो आणि हाती येत गेली अतिशय मनोरंजक माहिती…!

ती माहिती मात्र माझ्या पुस्तकातच वाचावी लागेल बरं का..!

तो पर्यंत, माझ्या ब्लॉगवर https://wp.me/p7fCOG-e2 ‘दादर’विषयी जाणून घ्या

‘कितीक वर्सान लागलो आंगाक,मालवनी मुलकामधलो न्हिमरो वारो..!’

‘कितीक वर्सान लागलो आंगाक,
मालवनी मुलकामधलो न्हिमरो वारो..!’

दोन दिवसांसाठी म्हणून गेलेलो आम्ही, म्हणजे मी आणि ही, तब्बल सहा दिवस तिथे राहून आजच परतलो. अर्थात, माझ्या गांवी मी त्यातला जेमतेम दिड दिवसच राहीलो, आणि उर्वरीत दिवस मालवणात गुजरले..!

मी मालवण प्रथमच पाहिलं. किंबहूना मी मालवण पाहायचं ठरवूनच तिथे गेलो होतो. माझ्या गांवी जायचं, हे फक्त निमित्त होतं.

मी कायमचा मुंबैकर. अगदी जन्मापासून ते आजपर्यंत..! तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी विविध ठिकाणी अर्ज करताना, ‘कायमचा पत्ता’ असा एक रकाना असायचा. तिथे मात्र गांवचा पत्ता लिहिला जायचा. ते ही वडील सांगायचे म्हणून. ते सांगत, “मुंबई काही आपली कायमची नाही. आपण इथले भाडेकरु. आपला कायमचा पत्ता गांवचा आहे, तो लिहावा.”! तसा पत्ता मी लिहायचो. तात्पर्य, माझा नि गांवाचा संबंध तेोवर पत्त्यापुरताच होता. नंतर गांवी जाणं झालं, ते एखाद-दुसऱ्या वेळीच. इसवी सनाच्या २००८ नंतर मात्र सातत्याने गांवी जात राहीलो. अर्थातच कामानिमित्त. पण एवढं करुनही माझा नि गांवचा बहुतकरुन संबंध राहीला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात असलेल्या माझ्या गांवापुरताच..!

एवढं सगळ सांगण्याचं कारण असं की. अगदी क्वचितच जाणं झालं असल्यामुळे असेल कदाचित, पण मला माझ्या गांवाची तेवढीशी ओढ नाही. पण, आमच्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, मी पूर्वी कधीही न पाहिलेल्या मालवणची मात्र प्रचंड ओढ आहे. आणि ही ओढं आजची नाही, तर लहानपणापासूनची आहे. ही ओढ का निर्माण झाली, हे नेमकं सांगता येत नाही, पण माझ्या लहानपणी मला लाभलेल्या मालवणी शेजारामुळे असावा, असं मात्र मला वाटतं..!

लहानपणी बहुतेक सर्व शेजार मालवणी भाषीक. त्यांची गांवं वेगवेगळी, पण बोली मात्र मालवणीच. समोरची वेंगुर्लेकरांची कुमुची आई, त्यांच्या उजव्या बाजुला तावडे, तर डाव्या हाताला तळेकर. पुढे एक घर सोडून चव्हाण. माझ्या सख्ख्या शेजाराला सावंत, खोत, राणे, मिठबावकर. चाळीच्या दुसऱ्या शेड्याला पांचाळ, लब्दे. मागच्या बाजुला बोरकर. हे गोव्याचे. आपसात कोंकणी बोलणारे, पण आम्हा शेजाऱ्यांशी मात्र मालवणी. बोरकरांच्या शेजारी दळवी, त्यांच्या बाजुला मोडक. परिसरातला मित्र परिवारही केरकर, खराडे, धुरी, राणे इतियादी. परब, सनये, नारकर, कदम, नाईक, डिसोझा, फर्नांडीस, मेस्त्री, कोलते, पवार, आंगणे इत्यादीं आजुबाजूच्या प्रत्येक चाळीत होतेच. या पैकी प्रत्येकजण आपापल्या नोकरी-व्यवसायात शुद्ध मराठी बोलत असला तरी, आमच्यातला संवाद मालवणीतूनच व्हायचा. माझा जन्म, शिक्षण, सासुरवाड सर्व काही मुंबईतलं असुनही आणि मी गांवी फारसा कधी गेलो नसुनही मला मालवणी बोली बऱ्यापैकी, अगदी तिच्या हेलांसकट, बोलता येते. त्याचं कारण माझा हा मालवणी भाषिक शेजार. मला ‘मालवण’ या शब्दाने भुरळ घातली, ती तेव्हापासून..!

माझे हे शेजारी प्रसंगानुरूप आपापल्या गांवी जात असतं. अर्थात ‘गांवी जात’ हा प्रमाण भाषेतला शब्दप्रयोग झाला. ते मात्र ‘मुलकात’ जात असत. त्यामुळे, मुलुक म्हणजे मालवण, हे नविनच समिकरण त्या वयात डोक्यात बसलं. थोडक्यात मालवणी बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं गांव ‘मालवण’ असतं, असा माझा पक्का समज झाला होता. माझा गोंधळ तेंव्हा वाढे, जेंव्हा माझे वडील, आपलं गांव कोल्हापुर जिल्ह्यात आहे असं सांगत. पुढे तरुणपणी नोकरीच्या अर्जांवर ‘कायमच्या पत्त्या’च्या रकान्यात मी ‘मु.पो. खांबाळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर’ असं लिहित असल्याचं मला आताही आठवतं. पण माझी आई-वडील, घरी येणारे नातेवाईक बोलताना मात्र मालवणीच बोलत. गांव कोल्हापूर व भाषा मालवणी, हे काय नक्की काय प्रकरण आहे, हे मला त्या काळात उमजत नसे. कुणाला विचारण्याची सोयही नसे. प्रश्न विचारण्याची प्रथा नाही तरी आपल्यात नाहीच. असो.

पुढे थोडा (राजकीय दृष्ट्या)जाणता झाल्यावर मला समजलं की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मालवण हा एक तालुका आहे, म्हणून. तोवर माझा समज मालवण म्हणजे सिंधुदुर्ग असाच होता. पण तो एका मोठ्या जिल्ह्यातला, लहानसा भुप्रदेश आहे, हे समजूनही माझं मालवणविषयीचं आकर्षण बिलकूल आटलं नाही. उलट ते आणखी गडद झालं.

त्याला कारण म्हणजे, विविध कारणांनी माझ्या संपर्कात आलेली, मला माहित झालेली लेखन, काव्य, नाट्य, शिल्प, चित्र इत्यादी विविध क्षेत्रात उंची गाठलेली कलावंत मंडळी. यातील बहुसंख्य मालवणी होती. कलावंतच कशाला, अनेक निमित्तांनी आयुष्यात आलेल्या व नंतर माझ्याच झालेल्या माझ्या जवळपास सर्वच मालवण्यांमधे काहीतरी वेगळेपणा होता. बुद्धी तल्लख, जीभ काहीशी तिखट, पण आतल्या हुशारीचा हंध देणारी आणि कोणत्याही गोष्टीला असणाऱ्या आणि कुणालाही दिसणाऱ्या तीन मितींच्या पलिकडच्या अनेक मिती सहजपणे पाहाण्याचू दृष्टी असलेल्या मालवणी माणसांबद्दल, माझं कुतुहल दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. मालवणी मुलखात (माझ्या मते संपूप्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे ‘मालवणी मुलुख’) जन्माला येणारं प्रत्येक पोर हातात काही तरी कला व अंगात नाना कळा घेऊन जन्माला येतं, हा माझा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत चालला आणि मालवणी माती बरोबरच, मालवणी माणसांबद्दल माझी ओढ अधिक गहिरी होत गेली..!

तर, माझ्या मनात, त्याची अशी खास जागा असणारं असं हे मालवण पाहाण्याचा, व त्या भुमित दोन-तीन दिवस का होईना, राहाण्याचा योग वयाच्या ५६व्या वर्षी आला. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वैभववाडीला माझ्या गांवी जाण्याचं निमित्त करुन, मी थेट पोहोचलो तो मालवणात. एरवी गांवी कधी जाणं झालं, तर माझं कणकवलीत जाणं होतं. कणकवलीतील माझ्या मित्रांना, समविचारी लोकांना भेटणं, हा त्यामागे उद्देश असतो. पण कणकवलीच्या गडनदीची वेस ओलांडून, माझ्या मनात घर करून असलेल्या मालवणच्या दिशेने जाण्याची वेळ वा संधी कधी आली नव्हती. म्हणून यंदा गांवाहून थेट मालवणात जाण्याचं ठरवलं व तसं केलंही..!

फक्त जाता जाता रस्त्यात, वागद्यात माझे मित्र विजय उपाख्य विजय सावंत यांची यांती त्यांच्या घरात लहानशी भेट घेतली.तिथेच माझा आणखी एक उत्तम कवि असलेला मित्र दिपक पटेकर याची अचानकच भेट झाली. व्हि. के व दिपक यांच्याशी आणखी गप्पा मारण्याची तीव्र इच्छा असुनही, वेळे अभावी फार थांबता आलं नाही. तसंच कणकवलीतले माझे आणखी एक स्नेही श्री. उदय पंडीत यांनी, त्यांनी त्यांच्या घरी येण्याचं दिलेलं निमंत्रणही मला वेळेअभावीच स्वीकारता आले नाही.. मालवण मला साद घालत होतं..!

रात्री ९ वाजता मालवणात पोहोचलो. मालवणात माझे (माझे म्हणजे, मी व माझ्या ‘ही’चे. ही अर्धांगी असल्याने, दोघांचाही उल्लेख ‘माझे’मधे आहे, हे समजून घ्यावे, ही विनंती) पालक होते, माझे मित्र नितीन वाळके. नितीन वाळकेंना मी यापूर्वी फक्त एकदाच भेटलो होतो. ते ही काही मिनिटांपुरता. पण असं असलं तरी, आमची ओळख तशी दाट. सायीसारखी घट्ट व तशीच स्निग्धही. ही ओळख होती विचारांची. गेली काही वर्ष आम्ही काही समविचारी लोक सोशल मिडीयातून एकमेकांशी जोडले गेलो होतो. त्यातील कित्येकांना आजही पाहिलेलं नाही किंवा प्रत्यक्ष भेटलेलो नव्हतो/नाही. नितीनजी त्यापैकीच एक. मी मालवणला येतोय म्हटल्यावर, माझ्यापेक्षा जास्त उत्साह नितीनजींना झाला. त्यांनी तिकडे सर्व तयारी करुन ठेवली.

पुढच्या तीन दिवसांत नितीनजी व त्यांची सखी ‘टाटा टिआगो’ आमच्यासोबत होती. प्रथम डोळे भरून मालवण पाहून घेतलं. कुठेतरी वाचलेल्या व लक्षात पाहिलेल्या, (बहुतेक) कवी आ. ना. पेडणेकरांच्या कवितेतल्या दोन ओळी, ‘कितीक वर्सान लागलो आंगाक, मालवनी मुलकामधलो न्हिमरो वारो’ मी अनुभवल्या. अजुनही शहरीकरणाच्या खरजेचा स्पर्श न झालेलं मालवण, स्वच्छ, सुंदर व टुमदार वाटलं. दिवस श्रावणातल्या पावसाचे असल्याने की काय म्हणून, मालवण मला एखाद्या सुस्नात, ग्रामिण सैंदर्ववतीसारखं भासलं. मुंबईसारख्या शहरातल्या टावरांच्या जंगलातून आल्यामुळे, मालवणची बाजारपेठ पाहाताना मला चित्रपटाचा सेट पाहातोय की काय, असंच वाटत होतं. फळ्याफळ्यांचे दरवाजे असलेली लहानशी दुकानं. त्यात निवांत बसलेले व तेवढेच समाधानी दिसणारे मालक, दुकानांवर लावलेल्या जुन्या पद्धतीच्या वळणदार अक्षरांतल्या त्या पाट्या, इटुकले रस्ते आणि त्या रस्त्यावरची ‘कोविड’ची शांतता..!

नितीनजींनी मालवण शहरही आपलेपणानं दाखवलं. समजावून सांगितलं. माडा-आंब्यांच्या वाडीत लपलेली, लाल कौलांची टुमदार घरं, नेटकं अंगण, डोक्यावर दाट, गडद हिरव्या रंगाच्या झाडांचे मोर्चेल असलेले रस्ते. मी हे पाहाताना, ते तीन दिवसात समजून घेताना, एवढं हरवून गेलो की फोटो काढयचंच विसरलो. असंही कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी गेलं, की फोटो काढण्याच्या मी विरोधात आहे. ते दृष्य डोळ्यांना मनसोक्त पिऊन घ्यावं. हृदयात हळुहळू उतरवत न्यावं. पुन्हा त्या सुंदर दृष्याच्या पार्श्वभुमीवर आपलं चित्र, कॅमेऱ्याच्यी भिंगावर उपटसुंभासारखं उमटवायलाही मला नकोसं वाटतं (माझा अर्ध अंग नेमकं विरुद्ध विचार करतं). मालवणातही मी तेच केलं. त्यात नितीनजींसारखा बोलका जाणकार सोबत असल्याने संपूर्ण मालवण नीट अनुभवता आलं. संपूर्ण मालवण शहर, समुद्र किनारा मी अगदी अक्षपाद पद्धतीने, म्हणजे पायांत डोळे ठेवून पाहिलं. ज्या मातीची मला लहानपणापासून ओढ होती, त्या मातीला स्पर्श करुन मला काय वाडलं, हे मला शब्दांत नाही सांगता यायचं..! आणि हे सर्व घडून आलं, ते मित्रवर्य नितीन वाळकेंमुळे.

आता मी अधिर झालो होतो, ते मालववचणातल्या माझ्या सुहृदांना भेटण्यासाठी. पहिल्यांदा भेट दिली ती ‘बॅ. नाथ पै सेवांगणा’त असलेल्या ‘साने गुरूजी वाचन मंदिरा’ला. पहिल्यांदा तिथे असलेल्या हजारो पुस्तकांना भेटलो. पुस्तकं पाहिली, की मला कुणीतरी अगदी जवळचं भेटल्याचा भास होतो. मन तरल होतं. काळजी-विवंचना तेवढ्या काळापुरत्या अदृष्य होतात. तसंच तेंव्हाही झालं. त्यात, ते ग्रंथालंय चालवणाऱ्या, तिथल्या तेवढ्याच जाणकार व्यक्तींशी गप्पा झाल्या. पुस्तकांवर लहानशी चर्चाही झडली.

तिथेच श्रीमती चारुशीला देऊळकरांची भेट झाली. चारुशीलांशी माझा तसा परिचय होता, तो सामाजिक जाणीवांतून, त्यांनी केलेल्या प्रगल्भ लिखाणामुळे. त्या दिवशी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यांच्या त्या छोटेखानी कुडीतली विद्वत्ता, त्यांच्या साधेपणातही उजळून दिसत होती. त्याचं ठिकाणी जिल्ह्यातले मालवणस्थित कवी रुजारीयो उपाख्य बाबला पिंटोंशीही भेट झाली. पिंटोंच्या कवितांशी मी परिचित होतो. पण, सहाफुटी रांगड्या उंचीची, तेवढ्यात रांगड्या समुद्राशी दिवसरात्र खेळण्याची ताकद राखणारी, समुद्र नांगरणारी ही व्यक्ती एवढ्या तरल आणि आशयघन कविता करते, यावर दोन क्षण विश्वासच बसेना..अनेकदा आपल्याला विचाराने परिचित असलेल्या व्यक्तींचं, त्यांना कधी प्रत्यक्ष न भेटल्याने, आपल्या मनात एक कल्पनाचित्र उभं राहातं. परंतु, त्या व्यक्तींना प्रती अक्ष पाहाताना, ते चित्र एकदम वेगळ्याच असतात, असं लक्षात येतं. मला व्हाट्सॲपवर असलेल्या ‘डिपी’ पाहाण्याची फारशी सवय नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत हे अनेकदा घडतं, तसंच यावेळीही घडलं..!

नंतरची भेट झाली, ती डॉ. सुमेधा नांईक यांची. ती भेट थेट त्यांच्या कॉलेजातच झाली. तशा सोशल मिडीयावर आम्ही विविध विषयावर खूप चर्चा केलेल्या असल्या तरी, डॉ. नाईकांनाही प्रथमच भेटत होतो. खूप वर्षांनी कुठल्यातरी कॉलेजमधे जाण्याची त्या निमित्ताने संधी मिळाली. ‘कोरोना’मुळे कॉलेजात मुलांची वर्गळ नव्हती. परंतु, प्राध्यापक वर्ग मात्र सगळा हजर होता. डॉ. नाईक यांनी आपुलकीने माझा सर्वांशी परिचय करुन दिला. माझ्या मनातल्या ‘प्राध्यापका’च्या चित्राला छेद देणाऱ्या त्या तरुण प्राध्यापक व प्राध्यापिकां भेटून खूप छान वाटलं. लांब गंभीर चेहेरा नाही, कपाळावर विद्वत्तेच्या खोलआठ्या नाहीत की दुर्मुखलेपण नाही. तरुण, सळसळत्या विचारांचे आणि चर्चेसाठी कोणत्याही विषयांचे बंधन नाही, असे ते प्राध्यापक पाहून व त्यांच्याशी बोलून, येत्या पिढीचं वैचारीक भवितव्य तरी उज्वल आहे, अशी खात्री पटली..तिथेच माझे मित्र प्रा. हसन खान यांची अवचितच भेट झाली. काही हासभास नसताना झालेली आपल्या माणसाची भेट, मनाला अधिक आनंद देऊन जाते. पर्यावरण, निसर्ग यात रमणऱ्या, आपुलकीनं वागवचणाऱ्या हसन खान यांना भेटून मला अधिकच आनंद झाला. माझ्या आणखी एक वैचारीक स्नेही श्रीमती मेघना जोशीमॅडमही तिथेच जोशीही भेटल्या. किंबहुना त्या, त्यांच्या यजमानांसोबत मला भेटण्यासाठी मुद्दाम आल्या होत्या. मुख्याध्यापक पदावरून नुकत्याच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या जोशीबाई, आजही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत असतात. आपल्या लेखनातून मुलांचा बौद्धिक विकास करत असतात. डॉ. सुमेधा नाईक, त्यांचा सहकारी अध्यापकवर्ग आणि कॉलेजच्या प्राचार्य, या सर्वांनी आमचं हृद्यय स्वागत केलं..!

मुळचे मुंबैतले, पण आता मालवणात स्थाईक झालेले माझे अन्य एक मित्र श्री. प्रभाकर वाळवे यांची भेट झाली. प्रभाकरजींचं बीच रिसॉर्ट मालवणच्या चिवळा बीचवर आहे. ‘ट्रॉपीकल कबाना’ नांवाचं हे छोटेखानी रिसॉर्ट, अतिशय सुरेख, छोटेखानी आणि अगदी किनाऱ्याला लागून आहे. मला ते पाहाण्याची उत्सुकता होती. या वेळी जमलं नाही, पण पुढच्या वेळी मात्र मी तिथे राहायचं ठरवलं.

मालवणातल्या डॉ. विवेक रेडकरांचीही भेट झाली. ही त्यांची व माझी दुसरी भेट. पहिल्या भेटीत, हा माणूस डॉक्टर-लेखक आहे, की लेखक-डॉक्टर, हा मला पडलेला प्रश्न, त्यांच्या या दुसऱ्या भेटीत जास्तच कठीण झालं. डॉक्टर रेडकरांच्या बोटांत रोग्यांना बरं करायचं कौशल्य आहे. त्याहीपेक्षा अधिक कौशल्याने त्यांची बोटं शब्दांशी खेळतात. आरोग्याचे कडू घोट, डॉक्टर रेडकर विनोदाच्या आंबट-गोड आवरणातून कधी देतात, ते समजत नाही. मी आरोग्यावरचं कोणतंही लेखन वाचत नाही. उगाच घाबरवतं असलं लेखन. पण डॉक्टरांचं, ‘आरोग्याचं पोस्टमॉर्टेम’ हे पुस्तक, त्याला अपवाद आहे. मी आजवर पाहिलेल्या व वाचलेल्या एकमेंव पुस्तकापैकी ते पहिलं व शेवटचं..! असं लेखन करण्यासाठी केवळ निष्णात डॉक्टर असून चालत नाही, तर तेवढंच कुशल लेखकही असावं लागतं..डॉ. विवेक रेडकरांमधे डॉक्टर की लेखक, की लेखक की डॉक्टर असा, या दोन्हीमधली सीमारेषा ओळखता न येण्याजोगा संयोग झालेला मला दिसतो..

नितीनजी आम्हाला सावंतवाडी-कुडाळलाही घेऊन गेलो. आंबालीतली पर्यटनस्थळं तर त्यांनी आम्हाला दाखवलीच, पण दोन अतिशय महत्वाच्या तरुणांची भेटही त्यांनी घडवून आणली. गेली १५ वर्ष पश्चिम घाटतल्या जंगलात फुलपाखरांवर संशोधन करणारा हेमंत ओगले व त्याच ठिकाणी सापांच्या विषावर संशोधन करणारा वरुण सातोसे. ऐन उमेदीत हे दोन तरुण, भौतिक आमिषांना बळी न पडता तिथं संशोदन करतायत, हे पाहून मला कौतुक वाटलं.

आंबोलीतून परतताना माझे आणखी एक स्नेही डॉ. जयेंद्र परुळेकरांची भेट घेतली. हे लहान मुलांचे तज्ञ डॉक्टर. पण डॉक्टर कमी व समाजसेवक जास्त. डॉक्टर पेडीयाट्रीकमधले तज्ञ असल्याने, मुलांपेक्षा, पोरकटपणाने वागणारा सद्यस्थितीतला समाज व त्यावरचे उपाय, यावरच चर्चा झाली. तिथून येताना अस्मिता मॅडमना भेटलो. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मॅडमशी, वेळे अभावी फार गप्पा मारता आल्या नाहीत, याची रुखरुख लागली. अशीच रुखरुख सुविधा तिनईकरांच्य भेटीची लागली. मॅडम अवचितच रस्त्यात भेटल्या. त्यांनी घरी यायचं निमंत्रणही दिलं. मात्र त्यांच्याकडे जाता आलं नाही..!

आमचा मालवणचा मुक्काम संपत आला. नितीनजींसोबत कुडाळ रेल्वे स्टेशनवर जाण्यास निघालो आणि रस्त्यातच नितीनजींना ‘कोकण नाऊ’ वाहिनीच्या विजय शेट्टींचा फोन आला. जाता जाता आमच्या हस्ते, त्यांच्या चॅनेलने आयोजित केलेल्या भजन स्पर्धेतं उद्घाटन करून आम्ही मुंबईला जावं, असा निरोप मिळाला. विजय शेट्टी म्हणजे, वर ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलाय, त्या, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उंची गाठलेल्या व्यक्तींना आणि अशाच इतरही काही व्यक्ती, ज्यांना भेटण्याची इच्छा असुनही मला भेटता आलं नाही, अशा व्यक्तींना मला भेटवणारे महानुभाव. विजय शेट्टी नसते तर, या व्यक्ती माझ्या आयुष्यात कदाचित आल्याही नसत्या. त्यामुळे विजय शेट्टींना भेटणं आवश्यकच होतं..विजय शेट्टींना भेटल्याशिव माझी मालवण मुलुखगिरी पूर्ण होणं श्क्यच नव्हतं..

विजय शेट्टींना भेटलो. त्यांच्या विनंतीनुसार मी व माझ्या पत्नीने भजन स्पर्धेचं उद्घाडन केलं व आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो..

माझी ही मालवण भेट ज्यांच्यामुळे कायमची आठवणीत राहिल अशी झाली, त्या नितीन वाळकेविषयी मी कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर तो कृतघ्नपणा होईल. त्या चार दिवसात सकाळचा नाश्ता ते रात्रीचं जेवण, आमचं सर्वत्र फिरणं, नितीनजींसोबत झालं. नव्हे, त्यांनी ते प्रेमाने केलं. हल्लीच्या दिवसांत, कोण कोणासाठी इतकं करतं हो?

बरं नितीनजी काही हलक्यात घेण्याची गोष्ट नाही. अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या ‘चैतन्य’ नांवाची हॉटेल साखळी यशस्वीरित्या चालवणारे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे सचिव, जिल्ह्यातल्या समाजकारणातही तेवढेच कार्यरत असणारे श्री. निकीन वाळकेंनी, या चार दिवसात आपली सर्व कामं बाजुला ठेवून, आपला पूर्ण वेळ आम्हाला दिला. त्यांचे आभार मानणं जरी त्यांना आवडणार नसलं, तरी ते मानणं माझं कर्तव्य आहे. त्यांच्यामुळे मालवणचो न्हिमरो वारो आम्ही मन:पूत आमच्या अंगाखांद्यावर खेळू दिल्…!

धन्यवाद नितीनजी..!!

-नितीन साळुंखे
०५.०९.२०२१
9321811091

शिर्षकाच्या ओळी कवी आ. ना. पेडणेकरांच्या कवितेतल्या आहेत..!