मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-
दादरचा टिळक ब्रिज व कोतवाल गार्डन-
टिळक ब्रिज-
दादरचा टिळक ब्रिज. गेल्या पाच-सहा वर्षाचा त्याचा नि माझा सहवास. गेली पाच-सहा वर्ष मी रोज सकाळ-संध्याकाळ या ब्रिजवरून ये-जा करतो. टिळक ब्रिज, त्यावरुन अखंड वाहाणारी, सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी. पुलावर होणारं ते सततचं ट्राफिक जाम, पहाटेच्या वेळी पुलावर भरणाऱ्या भाजी-पाल्याच्या घाऊक बाजारानंतर, पुलाच्या फुटपाथवर सकाळच्या वेळी होणारा तो भाजी-पाल्याचा चिखल आणि गेली काही वर्ष त्याची सततची चाललेली डागडुजी हे माझ्या नित पाहाण्यातलं दृष्य. हे सर्व पाहून मला या पुलाच्या क्षमतेविषयी कौतुकच वाटत आलंय. आपण आधुनिक काळात बांधत असलेले पुल बांधायला वीस-पंचवीस वर्ष लागत असली तरी, तो पडायला दोन-पांच वर्ष पुरेशी असतात, हा आपला अनुभव. त्यात हा कितीतरी वर्ष जुना पुल, अजूनही सक्षमपणे कार्यरत आहे, हे पाहून त्याच्याविषयी व तो बांधणाऱ्यांविषयी, माझ्या मनात कौतुक आणि कृतज्ञता अशा दोन्ही भावना दाटून येतात..!
हा पूल कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल हा प्रश्न नेहेमिच माझ्या मनात येत असे. पण येत असे नि जात असे, एवढंच होत असे. या पुलाची जन्मकहाणी शोधावी, असं काही वाटलं नव्हतं. शोधण्यासाठी नकळतपणे कारणीभूत ठरले, ते माझे दादरनिवासी स्नेही डॉ. अविनाश वैद्य..!
डॉ. वैद्यंशी गप्पा मारताना या पुलाचा विषय हमखास येत असे. रेल्वेचे अभ्यासक असणाऱ्या डॉक्टरांना या पुलाचं भारी कौतुक. तो लहानपणापासून त्यांचा सवंगडी असल्याने, त्यांना ही माहिती हवी होती. पण काही केल्या त्यांना हा पूल कधी व का बांधला, याची माहिती मिळत नव्हती. इंग्रजी अमलात बांधलेस्या इतर पुलांवर, त्या पुलांची माहिती देणारी पाटी असते. तशी या पुलावर कधी त्यांच्या पाहाण्यात आली नाही. माझ्याही पाहाण्यात आली नव्हती आणि नाही. डॉ. वैद्य यांनी हा विषय माझ्या डोक्यात सोडला.
हा पूल कधी बांधला, याची इतर काही जाणकारांकडे चौकशी केली असता, सन १९२० च्या पुढेच, असं उत्तर मिळायचं. सन १९२० च्या पुढेच का, याचं उत्तरही मजेशीर असायचं. टिळक १९२० साली वारले आणि ज्या अर्थी या पुलाला टिळकांचं नांव दिलंय, त्या अर्थी हा पूल १९२० सालानंतर बांधला गेलाय, असा त्या उत्तरांमागचा तर्क असायचा. तसं असेलं तर मग, इंग्रजी अंमलात बांधल्या गेलेल्या, मुंबैतल्या इतर पुलांना-रस्त्यांना जशी करी रोड ब्रिज, आर्थर रोड ब्रिज, कॅरोल ब्रिज वा ग्रॅंट रोड, सॅंडहर्स्ट रोड अशीइंग्रज गव्हर्नरांची-अधिकाऱ्यांची नांवं आहेत, तसं नांव या पुलाला न देता, भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांचं नांव का दिलं गेलं असावं, हा नविनच प्रश्न समोर उभा राहायचा आणि चिळक ब्रिज नेमका कधी व कुणी बांधला, हा मूळ प्रश्न बाजुला पडायचा..!
टिळक पुलाचा उल्लेख काही लेखांमधून माझ्या वाचनात आला होता, पण तो केवळ संदर्भ म्हणून. उदा. साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी, त्यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात लिहिल्या आहेत. सदरचा लेख, ‘मुंबई महानगरपालिके’च्या इमारतीस शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत मी वाचला होता. श्री. ना. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम कॉजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. #टिळकब्रिजनुकताचतयारझाला_होता”. पेंडशाच्या लेखातील हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं..!
वर लिहिल्याप्रमाणे, अनेकांच्या बोलण्यात येणारं, टिळक ब्रिजच्या बांधकामाचं वर्ष १९२० च्या पुढेच, असा उल्लेख आता, पेंडसेंच्या लेखामुळे सन १९२५ पर्यंत मर्यादीत झाला. म्हणजे, दादरचा टिळक पूल १९२० ते १९२५, अशा पांच वर्षांच्या काळात बांधला गेला असावा, हे स्पष्ट होतं. तरीही, नेमका कधी, हा प्रश्न उरतोच आणि त्याचं उत्तर शोधायच्या मागे मी लागलो आणि हाती येत गेली अतिशय मनोरंजक माहिती…!
ती माहिती मात्र माझ्या पुस्तकातच वाचावी लागेल बरं का..!
तो पर्यंत, माझ्या ब्लॉगवर https://wp.me/p7fCOG-e2 ‘दादर’विषयी जाणून घ्या
