दादरचं कोतवाल गार्डन आणि तेथील पहाटेचे भाजीवाले –

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा –

दादरचं कोतवाल गार्डन आणि तेथील पहाटेचे भाजीवाले –

दादरचा टिळक ब्रिज पश्चिमेकडे ज्या ठिकाणी उताराला लागतो, त्या उतारावरच महानगरपालिकेचं ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान’ आहे. अर्थात ह्या उद्यानाला वीर भाई कोतवाल याचं नांव दिलं गेलं ते खूप नंतर. दिनांक ३ मार्च १९४७ रोजी भरलेल्या तत्कालीन नगरपालिकेच्या सभेत, नगरपालिकेच्या विशेष समितीने, ‘दादरच्या टिळक ब्रिजच्या पश्चिम उतारावर असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे नांव ‘वीर हुतात्माभाई कोतवाल’ असे करावे हा ठराव मंजूर केला आणि तेंव्हापासून हे उद्यान ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान’ म्हणून ओळखू जाऊ लागले (1). परंतु तत्पूर्वी हे उद्यान, सुरुवातीचा काही काळ, ‘दादर ओव्हर ब्रिज पार्क’ आणि नंतर ‘दादर टिळक ब्रिज गार्डन’ या नावाने नगरपालिकेच्या दफ्तरात नोंदवलेले होते.

ह्या उद्यानाचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. पण त्यासाठी थोड मागे जाऊन पाहणं आवश्यक आहे.

ही गोष्ट आहे साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीची. सन १८९६ साल संपता संपता मुंबई शहरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला आणि हां हां म्हणता पुढच्या चार-दोन वर्षात त्यात हजारो माणसे मृत्युमुखी पडली. सरकार खडबडून जागे झाले आणि उपाययोजना करण्याच्या मागे लागले. औषधोपचार वैगेरे सुरु केले होतेच, पण सरकारने प्लेग कमिटी बनवून प्लेगच्या प्रदुर्भावामागे असलेली कारणे शोधून काढण्यचे ठरवले. त्यात अस्वच्छता, सांडपाण्याचा निचरा न होणं ही मुख्य कारणं पुढे आली. सरकारने त्या कारणांचं निराकारण करण्यासाठी, ‘दी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट (BIT)’ स्थापन करून लगेचंच शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. प्लेग ही त्याकाळात आलेली महामारीच होती, पण मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भावही नित्याचा होता. दरवर्षी मलेरीयाने शेकडो माणसं मृत्युमुखी पडत असत. मलेरियामागेही मुख्य कारण होतं, सांडपाण्याचा योग्य तो निचरा न होणं आणि त्या साचून राहिलेल्या सांडपाण्यात होणारी डासांची पैदास. थोडक्यात आता आलेला प्लेग काय किंवा नित्याचा मलेरिया काय, त्या मागे अस्वच्छता आणि त्यातून डांस-उंदीर-घुशींची पैदास होत राहाण आणि त्यातून रोगराईचा प्रसार होणं, हे मोठं कारण होतं.

मुंबईत सुरु झालेल्या गिरण्यांमुळे, मुंबईची ओळख जरी औद्योगिक शहर अशी बनत चालली असली तरी, मुंबईत अजूनही शेती होतं होती. शेती होत असल्यामुळे मुंबईत विहिरी आणि लहान मोठी तळी तर शेकड्यांनी होती. ह्या विहिरी आणि तळ्यांच्या आजूबाजूची पाणथळ, दलदलसम जागा म्हणजे डास-उंदीर-घुशींची आवडती ठिकाणं. तत्कालीन नगरपालिकेने उंदीर-घुशी आणि डासांचा बंदोबस्त करावा म्हणून ह्यातील बहुतेक तळी बुजवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामागे आणखीही एक कारण होत. ते म्हणजे मुंबईत सुरु झालेली नळ-पाणी योजना.

विहार, तुळशी आणि तानसा पाणी योजना सुरु होण्यापूर्वी मुंबईतल्या लोकांची पाण्याची गरज भागवली जात असे ती, मुख्यतः विहिरी आणि ठिकठिकाणी असलेल्या तळ्यांच्या माध्यमातून. औद्योगिकरणामुळे सतत वाढणाऱ्या मुंबईची तहान भागवण्यास पुढे पुढे ह्या विहिरी आणि तळी अपुरी पडू लागली. म्हणून ब्रिटीश सरकारने मुंबईनजीकच्या गावांत धरणं बांधून, तिथून मोठमोठ्या पाईपलाईन्सच्या माध्यमातून मुंबईत पाणी आणण्याची योजना आखली आणि ती कार्यान्वित केली. या योजनेचा पहिला टप्पा साकारला, तो ‘विहार योजने’चा. ही योजना १८६०-६१च्या सुमारास कार्यान्वित झाली आणि पुढच्या काहीच वर्षात तुळशी, पवई आणि तानसा इत्यादी पाणी योजना मुंबईत सुरु झाल्या. विसाव्या शतकाच्या प्रारंभाच्या दोनेक दशकातच मुंबईत नळाने पाणी येण्यास सुरुवात होऊ लागली आणि पुढे हळूहळू मुंबईकर नागरिकांचं, पाण्यासाठी असणारं विहिरी आणि तलावांवरचं अवलंबित्व कमी होऊ लागलं(2).

मुंबईत सुरु झालेली नळपाणी योजना, त्यानंतर तलाव-विहिरींची भासेनाशी झालेली गरज, अस्वच्छतेमुळे नेहेमीच उद्भवत असणाऱ्या मलेरिया, प्लेग वैगेरे आजारामुळे, सरकारने मुंबई शहरातील तलाव बुजवण्याचे ठरवून, त्याजागी उद्यानं, मैदानं तसेच सरकार आणि नगरपालिकेची सार्वजनिक कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. मुंबई शहरात ठिकठिकाणी असलेले तलाव बुजवून त्याठिकाणी सार्वजनिक उपयोगाच्या जागा निर्माण करण्यीस सुरुवात केली. घेतले. आपल्या डोळ्यासमोरची अशी नेहेमीची उदाहरणं सांगायची तर, माहीमच्या ‘श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरा’च्या सानिध्यात असलेला, ‘सिटी लाईट’ सिनेमाच्या समोरचा  ‘गोपी टॅंक’ बुजवून, त्यावर मार्केट बांधलं. गोपी टॅंक बुजवला गेला असला तरी, शिवाजी पार्क नॉर्थवरून, माहिम मार्केटला जाणाऱ्या रस्त्याच्या नांवात आजंही ‘गोपी टॅंक रोड’ टिकून आहे. तिथुनच थोड्या अंतरावर असलेल्या, माहीमच्या ‘श्रीशितलादेवी मंदिरा’च्या समोरच्या बाजूस असलेला लहानसा तलाव बुजवून, त्याजागी ‘पोस्ट ऑफिस’ बांधलं. ते आजही पाहाता येतं. ‘श्रीसिद्धिविनायक मंदिरा’च्या समोर असलेला ‘नर्दुल्ला टॅंक’ बुजवून तिथे बगीचा तयार केला, तर दादर पूर्वेला असलेल्या ‘नायगाव टॅंक’मध्ये भरणी करून तिथे ‘फायर ब्रिगेड स्टेशन’साठी जागा उपलब्ध करून दिली.

आपल्या दादरला असलेलं ‘वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान’ असंच एका तलावाच्या जागेवर उभारलेले आहे.

आताच्या ‘वीर कोतवाल उद्याना’च्या जागेवर पूर्वी ‘हंसाळी टॅंक’ होता. मुंबईतल्या इतर तलावांप्रमाणे, हा तलावही तसा खूप जुना. तेंव्हाच्या दादरची मुख्य वस्ती होती, ती पोर्तुगीज चर्चच्या आसपास. आताचा ‘कबुतरखाना’ म्हणजे तेंव्हाच्या दादरचा मध्यबिंदू होता आणि आताचा टिळक पुल ही उत्तरेकडची हद्द होती(3). आज कोतवाल उद्याना समोर असलेला ‘आर. के. वैद्य’ रस्ता, त्या काळी ‘हंसाळी टॅंक लेन’ म्हणून ओळखला जात असे. शिवाजी पार्कनजीक असलेल्या समुद्रावर त्याकाळी चिटपाखरुही फिरकत नसल्याने, संध्याकाळी सूर्यास्तानंतर किनाऱ्यावर जाण्यास लोक घाबरत असत. त्यामुळे त्यातल्या त्यात निवांतपणे एकत्र येऊन गप्पा मारण्याचं ठिकाण म्हणजे ह्या हंसाळी तलावाचा काठ होता.

आज हा तलाव अस्तित्वात नाही. अगदी माहिमच्याच गोपी टॅंकप्रमाणे, तो रस्त्याच्या किंवा त्या परिसराच्या नांवातही अस्तित्वात नाही. पण या तलावाची एक खूण इथे आजही अस्तित्व टिकवून आहे. त्या खुणेचा इतिहास माहित नसल्याने, कधीकाळी या ठिकाणी तलाव अस्तित्वात होता, हे आपल्या लक्षातही येत नाही.

तुम्ही दादरला येता-जाता, कधीतरी कोतवाल उद्यानावरुन ये-जा केली असेल. या उद्यानाच्या शेजारी, ‘प्लाझा सिनेमा’च्या अगदी समोर असलेल्या वाहतुक बेटावर तुम्ही एका भाजीवाल्याचा सुरेख पुतळ्यावर आपली कधीतरी नजर गेली असेलच. त्या पुतळ्याकडे पाहून, हा पुतळा इथे कशासाठी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. किंवा नसेलही. तसा प्रश्न पडण्याचं काहीच कारण नाही. कारण या परिसराशी परिचित असणाऱ्या प्रत्येकाला, या ठिकाणी भल्या पहाटेपासून ताज्या भाज्या ठोक भावात विक्री करण्याचा उद्योग चालतो, हे माहित असतं. त्यामुळे, त्या परिसराची खूण म्हणून हा पुतळा इथे उभारला गेला असावा, असा अंदाज आपण तो पुतळा पाहून मनातल्या मनात बांधतो. आपण तसा अंदाज बांधला असेल, तर तो काही अगदीच चुकीचा होणार नाही.

कोतवाल उद्यानाच्या परिसरात दररोज पहाटे भरणारा भाजी बाजार, तसा दादर स्टेशनपासून दूर आहे. पुन्हा तो पुलावर आहे. तसाच तो पुलाच्या खाली, सेनापती बापट मार्गावरही आहे. दादरच्या टिळक पुलावरुन सेनापती बापट मार्गावर जाणासाठी, पिलाझा सिनेमाला लागुनच एक दगडी जीना आहे. तिथून खाली उतरलं, की थेट आपण रेल्वेलाईन शेजारच्या भाजी बाजारातच पोहोचतो. हा देखील मोठा भाजी बाजार आहे. प्लाझा सिनेमाच्या मागेही मंडई आहे. ही मंडई ज्या जागेवर आहे, तिथे पुर्वी भांडारे नांवाच्या व्यक्तीचं ‘श्रीनंद थिएटर’ होतं (4). थिएटर पत्र्याचं व अस्थायी स्वरुपाचं होतं, पण त्यात बालगंधर्व, पु. ल. देशपांडे वैगेरेंसारख्या दिग्गजांनी या थिएटरच्या रंगमंचावर अदाकारी केली होती. आज या ठिकाणीही भाजी बाजार आहे. या भाजीबाजाराच्या पलिकडे, थेट सेनापती बापट मार्गापर्यंत मळे आणि शेतीवाड्या होत्या

कोतवाल उद्यानाचा परिसरातला भाजी बाजार, तिथून जवळच असणारा नि टिळक पुलाच्या खाली, रेल्वेमार्गाच्या लगतच्या ‘सेनापती बापट मार्गा’वरचा भाजी बाजार, प्लाझा सिनेमामागची मंडई, ही ठिकाण अगदी एकमेंकाला लागून आहेत. मधला टिळक पुल जर क्षणभरासाठी डोळ्यांसमोरून अदृष्य केला, तर हा एकाच विशाल भाजी बाजाराचा भाग असल्याचं आपल्या लक्षात येईल..! हा जो भाजी बाजारााचा विशाल भाग आहे, हिच कोतवाल उद्यानाच्याजागी, कधीकाळी अस्तित्वात असलेल्या ‘हंसाळी तलावा’ची खूण आहे.

दादरला बीबीसीआय रेल्वे (BB & CI Railway- आजची पश्चिम रेल्वे) आणि जीआयपी रेल्वे (GIP Railway- आजची मध्य रेल्वे) अशा दोन्ही कंपन्यांच्या रेल्वेलाईन्स एकत्र येत असल्याने, दादर पुर्वीपासूनच महत्वाचं ठिकाण होतं. लालबाग-परळनंतरची सर्वात मोठी वस्ती होती, ती दादर पश्चिमेला. त्यामुळे इथे पहिल्यापासुनच बाजाराचं ठिकाण होतं. दादरच्या टिळक पुलावरच्यी आणि पुलाखालच्या भाजी बाजाराची मुळं इथे सापडतात.

दिनांक १६ एप्रिल १८५३ या दिवशी बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे धावली आणि मुंबईचा विस्तार होण्यास सुरुवात झाली. मुख्य मुंबईत धडाधड गिरण्या सुरू होत होत्या आणि त्या भागात असलेली शेती त्या गिरण्यांखाली गडप होत होती. मुख्य मुंबईची लोकसंख्या वाढत होती व त्याचं प्रमाणात त्या लोकसंख्येची भाजी-दुधाची मागणीही वाढत होती. मुंबईतील लागवडीखालील जमिन कमी कमी होत गेल्याने, मुंबईतील लोकांना भाजी-तरकारी पुरवण्याची जबाबदारी दादर-माहिम परिसरातील आणि त्या पलिकडील उपनगरांतील मळेवाल्यांवर आली होती.

साधारण १८६७ च्या आसपास मुंबईत पहिली विरार लोकल सुरु झाली. वसई-विरारवरून दादरला लोकलने भाजी आणण्याची प्रथा तेंव्हापासून सुरु झाली असावी. भल्या पहाटेच मुंबईच्या दूरवरच्या उपनगरांतून, म्हणजे वसई-विरारहून, पहाटेच्या पहिल्या लोकल गाडीने येणारे भाजीवाले, तेंव्हा त्यांना ‘वसईवाले’ अस सर्रास म्हटल जायचं, या तलावाच्या काठावर एकत्र येत. सोबत आणलेली भाजी-फळे हंसाळी तलावाच्या पाण्यात स्वच्छ धूत आणि नंतर त्याची विक्री करत (5).

सन १९२० च्या आसपास हा तलाव बुजवला गेला. तिथे कधीकाळी तलाव होता, हे देखील अनेकांना माहित नाही. टिळक पुलाविषयी माहिती मिळवता मिळवता, अवचितच ही अनमोल माहिती माझ्या हाती लागली आणि कोतवाल उद्यानाच्या परिसरात होणाऱ्या भाजी विक्रीचं, मला पडलेलं गूढ उलगडलं. तलाव धरणीच्या पोटात गडप झाला असला तरी, त्या ठिकाणी होणाऱ्या पहाटेची भाजी विक्रीच्या स्वरुपात तो तलाव, ‘हंसाळी टॅंक’, इतिहासात लुप्त झालेल्या आपल्या पाऊलखुणा, जवळपास १००-१५० वर्ष अबोलपणे टिकवून आहे..! प्लाझा सिनेमासमोरच्या ट्राफिक आयलंड वर त्या भाजीवाल्याचं प्रतीकात्मक शिल्प उभारून, महापालिकेनेही त्या १००-१५० वर्षांच्या हिरव्यागार परंपरेचा उचित सन्मान केला आहे, अस म्हणता येईल..!

या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मुंबई शहरातील इतर तलावांप्रमाणे, ’हंसाळी टॅंक’ही बुजवला. तलाव बुजवण्यासाठी परिसरात असलेल्या सोराब मिल (नंतरची रुबी मिल), कोहिनूर मिल, कस्तुरचंद मिल आदी गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जाळलेल्या कोळशाचा राखेचा मोठ्याप्रमाणावर उपयोग केला गेला होता. कोळशाच्या राखेमुळे बुजवलेल्या तलावाच्या जागी जे मैदान तयार झाले, त्याच्या मातीचा रंग काळा दिसत असे. त्यामुळेदादरकर नागरिकांनी त्या मैदानाचे नांव ‘काळे मैदान’ असे ठेवले..! (6).

हा तलाव जेंव्हा बुजवण्यात आला, तेंव्हा टिळक ब्रिज अस्तित्वात नव्हता. त्याचा कागदावर जन्म होत होता. पुलाच्या पश्चिम बाजूचा उतार खूपच पुढे जात होता. म्हणून हंसाळी तलावाची भरणी करताना, ती पुलाच्या उताराशी जुळेल एवढी उंच करण्यात आली. आजही आपण जर नीट निरीक्षण केलं, तर लक्षात येईल की, दादरचा टिळक ब्रिज हा इतर ब्रिज सारखा रस्त्याला मिळालेला नसून, रस्ताच थोडा उंच होऊन पुलाच्या उताराला भेटायला गेला आहे. याच कारणाने, कोतवाल गार्डन नेहेमीसारखं जमिनीच्या समपातळीत नसून, ते उतारावर वसलेलं आहे. त्याला कारण टिळक ब्रिजच्या आराखड्यांमध्ये, ब्रिज उतरवण्यासाठी केलेला बदल. नगरपालिकेने हे गार्डन तयार केलं, तेच मुळी ‘टेरेस गार्डन’ प्रकाराने..!

सन १९२५ मधे टिळक ब्रिज वाहतुकीला खुला केला गेला (टिळक ब्रिजची संपूर्ण जन्मकहाणी माझ्या टिळक ब्रिजविषयीच्या लेखात वाचता येईल), तेंव्हा बुजवलेल्या हंसाळी तलावाच्या जागी केवळ मैदान होते. टिळक ब्रीजचही नामकरण अद्याप व्हायचं होत. टिळक ब्रीजच तेंव्हाच नांव होत, ‘दादर ओव्हरब्रीज’. म्हणून या ब्रिजच्या पश्चिम उतारावर असलेल्या या मैदानाला, त्याच्या मातीच्या रंगावरून लोकांनी दिलेलं नांव ‘काळे मैदान’ असं असलं तरी, सरकारी दफ्तरात याची नोंद ‘दादर ओव्हरब्रिज रिक्रिएशन ग्राउंड’ असं होतं. टिळक ब्रिजचं ‘टिळक ब्रिज’ अस नामकरण १९२८-२९ सालात झाल. तेंव्हाही हे मैदानाच होतं. तिथे बाग तयार करण्यात आली नव्हती.

हे काळे मैदान लोकांमध्ये खूपच लोकप्रिय होते. लोकांची एकमेकांना भेटण्याची ही जागा होती. ह्या ठिकाणी लहान सभाही होत असत. याच्या खुणा आजही दिसून येतात. दादरचं कोतवाल उद्यान अनेक ग्रामस्थ मंडळाच्या वार्षिक सभांच, अनेकांच्या गाठी-भेटीच ठिकाण आहे, त्याला असा इतिहास आहे.

याच काळे मैदानावर, १९२६ सालात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी महाराष्ट्रातला सर्वात पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला होता (7).

दिनांक २० जून १९२८ या दिवशी नगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर करून, या मैदानाच्या जागेवर बगीचा आणि लोकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला. अशी बाग आणि सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी रुपये १९,९८९/- मात्रच्या खर्चाची, ‘मे. मार्सलॅंड प्राईस ॲंड कंपनीची लिमिटेड’ निविदा मंजूर करण्यात आली आणि पुढच्या वर्षभरात टिळक ब्रिजच्या उतारावरच्या त्रिकोणाकृती ‘काळे मैदाना’त एक सुरेख बगिचा तयार करण्यात आला आणि या बगिच्याला ‘दादर ओव्हर ब्रिज गार्डन’ असे नांव देण्यात आले. १ मार्च १९३० या दिवशी हे गार्डन सार्वजनिक वापरासाठी खुलं करण्यात आलं (8).

तत्पुर्वी, १९२९ या वर्षात दादर ओव्हरब्रीजचं नामकरण ‘टिळक ब्रिज’ असं करण्यात आल्यावर, नगरपालिकेचे सदस्य पांडुरंग गणेश सहस्त्रबुद्धे यांनी, टिळक ब्रिजच्या पश्चिम उतारावर केलेल्या बगिच्याला ‘टिळक रिक्रिएशन ग्राउंड’ किंवा ‘टिळक बाग’ असे नांव द्यावे आणि त्या मैदानाच्या मध्यभागी, लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा पुर्व दिशेला तोंड करून बसवावा, अशी सूचना केली (9).

‘दादर ओव्हर ब्रिज गार्डन च नामकरण ‘टिळक ब्रिज गार्डन’ अस कराव ही सहस्त्रबुद्धेंची सूचना बहुदा मंजूर झाली असावी. कारण दिनांक ३१ मे, १९३० रोजी नगरपालिका उद्यान विभागाच्या अधीक्षकांनी, नगरपालिकेच्या कमिशनराना लिहिलेल्या पत्रात, या जागेचा उल्लेख ‘Tilak Bridge Garden near the Dadar Overbridge’ असा उल्लेख आहे (10) टिळकांचा अर्पुधपुतळाही त्या ठिकाणी बसवण्यात आला होता. परंतु साधारण १९४७-४९ या काळात तो तिथून हलवला गेला असावा, अशी माहिती पूर्वी त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी मला दिली. आता तो पुतळा नेमका कुठे आहे, याची निश्चित माहिती मिळत नाही. बागेत तशी कोणतीही पाटी/पुतळा किंवा त्याची खूण दिसून येतं नाही.

दादर ओव्हर ब्रिज गार्डन, अर्थात ‘टिळक ब्रिज गार्डन’ थोड्याच अवधीत लोकप्रिय झालं. १९३० सालात ह्या बागेत व्यायामाची नगरपालिकेतर्फे उपकरणं बसवण्यात आली.  ‘Tilak Bridge garden is becoming very popular and the sets of Gymnasium Apparatus fixed therein are a source of very popular attraction to children of the locality’ असा उल्लेख नगरपालिकेच्या १९३०-३१ च्या प्रशासकीय अहवालात वाचायला मिळतो(11).

अशी ही, आज प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या, परंतु पहाटेच्या भाजी बाजाराच्या रुपाने आजही जिवंत

असलेल्या, दादरच्या ‘हंसाळी टॅंक’ची आठवण. कधी त्याबाजुला जाणं झालं, तर मधली १०० वर्ष आणि त्या दरम्यान झालेला विकास नजरेआड करून, मनातल्या मनात त्या तलावाचं दर्शन जरूर घ्यायला विसरू नका..!

-नितीन साळुंखे

9321811091

19.10.2021

टिपा-

  1. मुंबई महानगरपालिका तेंव्हा ‘नगरपालिका’ असल्याने, तिचा उल्लेख ‘नगरपालिका’ असा केला आहे.
  2. ज्या पांडुरंग गणेश सहस्त्रबुद्धे यांनी, पुलावरच्या बागेस ‘टिळक बाग’ असं नांव द्यावं अशी सुचना नगरपालिकेस केली होती, त्या पांडुरंग गणेश सहस्त्रबुद्धे यांच्या पत्नी इंदिराबाई पांडुरंग सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ, १९३० सालात कोतवाल गार्डनमधे पाणपोयी उभारण्यात आली होती. ती आजही त्या ठिकाणी पाहाता येते. महानगरपालिका ह्या पाणपायीचं नुतनीकरण करणार असल्याचं ऐकलं. त्या वेळेस पां. ग. सहस्त्रबुद्धे व इंदिराबाई सहस्त्रबुद्धे यांची थोडक्यात माहिती असलेली पाटी महापालिका त्या ठिकाणी लावेल, अशी अपेक्षा आहे.

संदर्भ-

(१) ‘The Bombay Chronicle’ dt. 22 Feb., 1947; page 2. (ह्या वर्गमानपत्रात, ३ मार्च १९४७ रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या सभेत मताला येणाऱ्या विषयांची यादी दिली आहे.)

(2). Essay on ‘Water Supply Projects and Water Distribution System, Operation and Maintenance’ available on web.

(3) ‘मी व दादरचे सार्वजनिक जीवन’-लेखक राजाराम केशव उपाख्य आर. के. वैद्य.; पृष्ठ १३ ते १७.

(4) ‘तोच मी’- प्रभाकर पणशीकर; पृष्ठ १०५.

(5) ‘बहुरंगी बहुढंगी दादर’ – संपादक प्रकाश कामत- प्रकाशक ‘दादर सार्वजनिक वाचनालय’

(6) ‘Recognising & Preserving the Historic Identity of Dadar West’ – Essay by Mr. Vineet Datye.

(7) ‘माझी जीवनगाथा’- प्रबोधनकार ठाकरे आत्मकथन.

(8) Review of the Standing Committee of the Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year 1928-29’Page 8, 150, 155,

(9) – The Bombay Chronicle’, दिनांक १५ मार्च १९२९, पृष्ठ ५.

(10) & (11)– Letter No. G/270-A of 1930-31 from The Superintendent, Municipal Gardens to The Municipal Commissioner dated 31 May, 1930. Published in Administration Report of the Municipal Commissioner for the City of Bombay for the year 1929-30 on page No. 209.