देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आपण..
आपल्या देशाने ब्रिटिशांशी लढून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळवलं, याचा आपल्याला कोण अभिमान असतो, नाही? पण या लढ्याविषयी, त्यात भाग घेतलेल्या व प्रसंगी प्राणाचं बलिदान दिलेल्यांविषयी आपल्याला फारच कमी माहिती असते.
आपण भारतीय फारच उत्सव प्रेमी असतो. अनेक उत्सव आपण साजरे करत असतो. त्यापैकीच ‘स्वातंत्र्यदिन’ हा देखील एक उत्सव बनून राहिला आहे. त्यातलं गांभिर्य पार हरवलं आहे..स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करताना, ते स्वातंत्र्य, १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या काळात किती जणांच्या बलिदानावर आधारलेलं आहे, हे मात्र आपण विसरतो.
आपल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती नेहरु, गांधी, मौलाना आझाद आणि अशीच काही आणखी नांवं या पलिकडे जात नाही. पण या लढ्यात अनेक सामान्य माणसांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, हे आपल्या गांवीही नसतं..!
हे लिहिण्याचं कारण म्हणजे, कालच मला अचानक सापडलेली, १८५७ ते १९४७ या दरम्यान झालेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या विरांची माहिती असलेली डिक्शनरी..!
सहज म्हणून ही डिक्शनरी चाळताना जी माहिती माझ्या समोर आली, ती आश्चर्य कारक होती. आपल्याला, दिनाॅक १२ डिसेबर १९३० साली परदेशी मालाच्या ट्रकखाली स्वतःला झोकून देऊन, हुतात्मा झालेल्या ‘बाबु गेनुं’विषयी ऐकून का होईना, पण माहिती असते. परंतु, आणखी एका बाबु गेनुंने, ‘छोडो भारक’ आंदोलनात दिनांक १३ सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांची गोळी छातीवर झेलून हौतात्म्य पत्करलेलं असतं, हे कुठे आपल्याला माहित असतं..!


या डिक्शनरीतील नांव A या इंग्रजी अक्षरापूसून सुरू होऊन Z या अक्षराने संपतात. A अक्षराने सुरू होणाऱ्यी नांवात साधारणतः दिड-दोनशे नांवं आहेत आणि त्यातली अर्धी अधिक अब्दुल, अबिद, अली, अहमद इत्यादी मुसलमानांची नांवं आहेत. देशात सध्या मुसलमानांविषयी जी द्वेषभावना जाणूनबुजून निर्माण केली जात आहे आणि देशवासीय त्या विखारी भावनेच्या आहारी जात आहेत, हे चांगलं नाही. ह्या देशाच्या स्वातंत्र्यात सर्वांचा समान वाटा आहे, हे अशी पुस्तकं वाचताना समजत जातं. म्हणून अशी पुस्तकं वाचायला हवीत.

अक्कल गहाण ठेवून ‘राजकीय धर्मांध’ बनत चाललेल्या ह्या आपल्या देशबांधवांनी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुसलमानांसहित सर्व धर्माच्या लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, याची माहिती करुन घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक हुतातम्याचं नांव, त्यीचं राहाण्याचं ठिकाण, बलिदानाचं ठिकाण व कारण इत्यादी माहिती ८-१० ओळीत यात दिलेला आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली ही डिक्शनरी, एकूण पांच खंडात आहे. त्यातला तिसरा खंड महाराष्ट्र, गुजरात आणि सिंध प्रांतातील स्वातंत्र्य विरांची माहिती देणारं आहे. सर्वांनी हे उत्सुकतेपोटी वाचणं आवश्यक आहे.
माझ्याकडे या तिसऱ्या खंडाची पीडीएफ आहे. कुणाला हवी असल्यास त्यांनी आपल्या व्हाट्सॲप क्रमांकावरुन, माझ्या व्हाट्सअॅप 9321811091 या क्रमांकावर मेसेज पाठवल्यास, त्यांना मी ही प्रत त्वरीत पाठवू शकेन.
-नितीन साळुंखे
9321811091
