आज श्री दत्त जयंती..
मी जेव्हा आपल्या दैवतांचं चार हस्ती शंख-पद्म-चक्र-गदा किंवा तत्सम काहीतरी धारण केलेल्या पारंपारीक रुपाचा अर्थ शोधायचा जेंव्हा प्रयत्न करतो, तेंव्हा बरंच काहीतरी सापडतंय किंवा ती मुर्ती सांगू पाहातेय असं मला नेहेमी वाटतं. कारण ती केवळ एक ठराविक स्वरुपातली मुर्ती किंवा साचेबद्ध प्रतिमा नसून, आपल्या प्राचिन पुर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला त्यांचा काहीतरी महत्वाचा संदेश आहे, असं मला नेहेमी वाटतं. मुर्ती केवळ प्रतिक असतं. त्या प्रतिकामागचा अर्थ आपण घ्यायचा असतो. होतं नेमकं उलटं. आपण मुर्तीत(च) अडकतो, ती काय सांगू पाहातेय याकडे लक्ष देत नाही.
श्री अक्कलकोट स्वामींच्या ओवीरुप चरित्रात श्री दत्त महाराजांचं वर्णन, “चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।” असं केलंय. या श्लोकातील पहिल्या दोन ओळी दत्तगुरुंच्या तसबिरीत प्रत्यक्ष पाहाता येतात. आणि या दोन ओळीच मला ‘श्री दत्तां’चा खरा अर्थ सांगतात असं वाटतं.
चार वेद म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे ज्ञानाचं प्रतिक. पुस्तकांचं वाचन आपल्याला जगभराचंच कशाला, तर ब्रम्हांडाचंही ज्ञान देतं हे मी काही नव्यानं सांगायला नको. ‘चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन ।’ या ओळीत ग्रंथांना ‘श्वान’, म्हणजे कुत्र्याची उपमा दिली आहे. ज्याला एकदा जवळ केलं, की तो आपल्याला कधीच अंतर देत नाही.

कुत्रा हा प्रामाणिकपणाबद्दल प्रसिद्ध आहे. जर, वेद म्हणजे ग्रंथ, ग्रंथ म्हणजे ज्ञान असेल तर, ज्ञान म्हणजे श्वान, जे, ते प्राप्त करणाराशी प्रामाणिक राहातं, त्याच्या रात्रंदिन समिप राहातं, असा अर्थ लावला तर चुकणार नाही. म्हणून त्या मुर्तीला शरण जाऊन कर्मकांडात अडकणं म्हणजे केवळ दगडावर डोकं आपटणं आहे. तसं केल्यानं ‘मोक्ष’ प्राप्त होईल हा आपला गैरसमज आहे. त्यातून हाती लागेल, तो केवळ कपाळमोक्ष(च)..! म्हणून मुर्तीऐवजी ज्ञानाला शरण जाणं आवश्यक आहे. ते ज्ञान आपल्याला कधीच अंतर देणार नाही. ते ‘वसेल समीप रात्रंदिन’..! ज्ञानामुळे अज्ञानापासून मुक्ती मिळते आणि तोच खरा मोक्ष..!
आता खुद्द ‘दत्त’ महाराजांबद्दल. दत्त हा शब्द इंग्रजीत लिहिला असता, तो ‘DATTA’ असा लिहावा लागतो. ह्या इंग्रजी शब्दाकडे नीट पाहा. तो सध्याचा परवलीचा शब्द, ‘DATA’ सारखा वाटतोय का? वाटतोय का म्हणजे काय, तो आहेच तसा. सध्याच्या अंतराळ युगात, ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..!.

इंग्रजी ‘डाटा’ला, मराठीत ‘विदा’ असा प्रतिशब्द आहे. हा ‘विदा’ शब्द पुन्हा ‘वेद’ या शब्दाशी साम्य सांगणारा आहे. म्हणजे पुन्हा, वेद म्हणजे ग्रंथाचं प्रतिक, ग्रंथ म्हणजे ज्ञानाचं प्रतिक आणि ज्ञान म्हणजे पुन्हा ‘डाटा’ म्हणजे दत्त, असा हा प्रवास होतो.
जेंव्हा आपण कंप्युटरसमोर बसून काही विषयांची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तेंव्हा तो एका क्षणात, विषय परस्पर विरोधी असले तरी, तो जगभरातून आपल्यासमोर आणून उभं करतो. या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदातील श्लोकातील नंतरच्या दोन ओळी, ‘ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।’ हेच तर सांगतात. मनासारखा प्रचंड वेग आणि मनासारखंच काही क्षणांत त्रिखंडात विहरुन, त्रिखंडातलं ज्ञान आपल्यासमोर सादर करणं, हे संगणकाला Dat(t)a मुळे शक्य होतं.
दत्तांचं वर्णन करणाऱ्या श्लेकातील आणखी काही ओळी,
“कामधेनू असोनि जवळी ।
हाती धरिली असे झोळी ।
जो पहाता एका स्थळी ।
कोणासही दिसेना ॥”
अशा आहेत. कामधेनू इच्छापूर्तीचं प्रतिक. ग्रंथ आपल्याला मनोवांछित विषयाचं ज्ञान करून देतात. जो ज्ञानाचा उपासक असतो, तो झोळी पसरूनच असतो. तो ज्ञानाचा याचक असतो. ‘याचक’ आणि ‘वाचक’ यातील साम्यही मला हेच सांगते. आणि ज्ञान कोणत्याही एका स्थळी कसं असेल, ते तर यत्र तत्र सर्वत्र पसरलेलं असतं. असं असुनही ते दिसत नाही, शोधावं लागतं, दत्तगुरूंची आळवणी ती हिच..!!
एकदा का ज्ञान प्राप्तीचं ध्यान लागलं, की मग आपण आपण उरत नाही. तना-मनाचं भान हरपतं. अवघ विश्व एकच होऊन, मी तू पणाचा लोप होतो. श्री दत्तांच्या आरतीत उगाच नाही म्हटलंय, की ‘डाटा डाटा ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ अशी समाधी लागायला वेळ लागत नाही आणि असं झालं की, मग आपण, आपोआप मुर्ती आणि कर्मकांडातून बाहेर पडतो आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग धरतो..!
थोडक्यात मला समजलेला दत्तांचा अर्थ म्हणजे ज्ञान.
आजच्या कंम्प्युटर युगात,’Datta’ म्हणजे ‘Data‘ ज्ञान..!
दत्त तारून नेतो की नाही, ते मला सांगता येणार नाही. माझ्या मते तो तसा तारुन नेत नाही. पण Data, Data असं ध्यान सागलं, तर ते मात्र निःसंशय तारुन नेतं. एकदा का Dataचा नाद लागला, की ‘संसारतापे अति शिणलो मी’ अशा निरुत्साही करणाऱ्या भावना कोसो दूर पळतात. काही थकलं भागलं जाणवत नाही. खऱ्या अर्थाने सतत काही तरी नविन समोर आणणारा, ताजंतवाना ठेवणारा गुरु म्हणजे ज्ञान, डाटा..!!
मला जाणवलेले श्री दत्तगुरू असे आहेत असं मी मानतो, तुम्ही मानावं असा माझा आग्रह नाही.
जय जय गुरुदेव dat(t)a..
-नितीन साळुंखे
9321811091
टीप- Data म्हणजे माहिती. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे मला समजतं. परंतु, माहिती म्हणजे ज्ञानाकडे जाणाऱ्या उन्नत मार्गावरची पहिली पायरी आहे, असं मी समजतो.