घोडपदेव, व्हाया काळाचौकी आणि फेरबंदर..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

घोडपदेव, व्हाया काळाचौकी आणि फेरबंदर..!

घोडपदेव. मुंबईच्या माजगांव परिसरातला घट्ट लोकवस्तीचा एक भाग. आता बदलत चालली असली तरी, एकेकाळी ही वस्ती अंगमेहेनतीची कामं करणाऱ्या गिरणी कामगार, गोदी आणि रेल्वे कामगारांची. शेजारधर्म निष्ठेने पाळणाऱ्या एक-दोनमजली देखण्या लाकडी चाळींची. चिंचोळ्या गल्ल्यांची आणि हृदयाने श्रीमंत असलेल्या गरीबांची..!

असं हे घोडपदेव वसलंय, माजगाव ह्या पोर्तुगिज काळापासून प्रसिद्ध असलेल्या भागात. त्यामुळे घोडपदेवची माहिती सांगताना, त्यात माजगांवचं डोकावणं अपरिहार्यच. घोडपदेवची माहिती सांगताना, वाटेत लागणाऱ्या आणि मला माहित असणाऱ्या ठिकाणांचीही आपण थोडक्यात ओळख करून घेत घेत शेवटी घोडपदेवला जाऊ.

एकेकाळच्या श्रमिकांच्या वस्तीचा हा तुकडा, आज गगनचुंबी इमारती नि वेगळ्याच दिसणाऱ्या माणसांनी हा भाग भरून जाऊ लागलाय.

पूर्वेला माजगांव डॉक आणि समुद्र, दक्षिण दिशेला मांडवी, पश्चिमेला भायखळा तर उत्तरेला लालबाग ह्या माजगांवच्या हद्दी. उत्तरेकडची हद्द म्हणजे, चिंचपोकळी स्टेशनहून पूर्व दिशेच्या कॉटन ग्रीन स्टेशनला जाणारा ‘दत्ताराम लाड मार्ग’. म्हणजे पूर्वीचा ‘काळाचोकी रोड’. हे ‘काळाचौकी’ नांवं कसं पडलं असावं, याचं मला लहानपणापासून कुतूहल आहे. अद्याप याची समाधानकारक व्युत्पत्ती मला सापडलेली नाही. पण या विभागाचतली जुनी वैशिष्ट्य लक्षात घेऊन काही तर्क मात्र नक्की केलेला आहे.

इथून जवळच समुद्र किनाऱ्यावर लकडी बंदर, रेती बंदर अशी विविध बंदरं आहेत. त्या त्या बंदरावर उतरणाऱ्या त्या त्या प्रकारच्या मालावरुन ती नांवं आली आहेत. तसंच या ठिकाणी उतरणाऱ्या कोळशावरुन नांव पडलेलं ‘कोळसा बंदर’ही आहे. इंग्रजीत ‘कोल बंदर’. लालबागच्या पेरू कम्पाऊंडपाशी पूर्वी गॅस कंपनी होती. या कंपनीत कोळशापासून गॅस तयार केला जायचा आणि पाईपद्वारे पुरवलाही जायचा. गॅस कंपनीच्या जागेवर आता ‘गुंदेचा गार्डन’ नांवाचा निवासी वसाहत उभी आहे.

हा परिसर कापड गिरण्यांचा. ह्याचं नांवच गिरणगांव. ह्या गिरण्यांना कोळसा लागत असे. कोळशाचा घरगुती वापरही हेत असे. गॅस कंपनी, गिरण्या आणि घरगुती वापरासाठी लागणारा कोळसा ह्या कोल बंदरावर उतरत असे. बंदरावर येणाऱ्या कोळशाची नोंद करण्यासाठी, पूर्वी कधीतरी इथे चौकी असावी. सातत्याने काळ्या कोळशाशी येणाऱ्या संपर्कामुळे ती ‘काळा चौकी’ झाली असावी..! अर्थात हे मी तर्काने शोधलेलं उत्तर.

काळाचौकी हे नांव कसं पडलं ह्याची उकल करताना, एस. एम. एडवर्ड त्याच्या, ‘Bombay place-names and street-names; an excursion into the by-ways of the history of Bombay City ‘ ह्या पुस्तकात म्हणतो की, ह्या रस्त्यावर असलेल्या पोलीस स्टेशनबाहेरचा रस्ता डांबरी होता म्हणून तिला काळाचौकी म्हणत. ही व्युत्पत्ती पटण्यासारखी नाही. कारण डांबरी सडक आणखीही काही ठिकाणी होती असू शकेल, मग तिकडची नांव ‘काळा’ शब्दावरून सुरु होणारी का नाहीत, याचं उत्तर मिळत नाही. असो.

काळाचौकी पोलीस ठाणे

तर, जुन्या काळाचौकी रोडवरून, म्हणजे आताच्या दत्ताराम लाड मार्गावरून आपण पोलिस स्टेशनच्या दिशेने निघालो की, आपल्या उजव्या हाताला काही अंतरावर आपल्याला फेरबंदर भाग लागतो.

‘फेर बंदर’ ह्या नावात ‘फेर’ आणि ‘बंदर’ असे एक इंग्रजी आणि दुसरा ‘मराठी असे दोन शब्द आहेत. यातला ‘बंदर’ हा मराठी शब्द आहे, तर ‘फेर’ हा शब्द इंग्रजी. ‘फेर’ हा शब्द मुळात ‘फ्रिअर (Frere)’ असा आहे. सर बार्टल फ्रिअर (Sir Bartle Frere), जे सन १८६२ ते १८६७ अशी पाच वर्ष मुंबंई प्रांताचे गव्हर्नर होते, त्यांच्या स्मरणार्थ हे नांव दिलं गेलं आहे. मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी फोडून मुंबई शहराला (फोर्ट विभागाला) मोकळं केलं, ते या गव्हर्नरने. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर असलेली टेकडी, घेडपदेव हिल फोडून तिच्या दगडआणि मातीने माजगांव नजिकच्या समुद्रात भरणी घालून जी ‘माजगांव इस्टेट’ तयार करण्यात आली, तिला ‘फ्रिअर बंदर’ असं नांव देण्यात आलं. साधारणतः वाडी बंदरपासून ते दारुखान्यापर्यंतचा भाग म्हणजे फ्रिअर बंदर. सामान्यांच्या भाषेत फेर बंदर.

फेर बंदरचं देवालय. इथे पूर्वी तीन दिवसांची जत्र भरत असे. म्हाडाने बांधलेल्या गिरणी कामगारांच्या वसाहतीसमोरच हे मंदिर आहे.

तानाजी मालुसरे रोड (जुनं नांव अल्बर्ट रोड) आणि रामभाऊ भोगले मार्ग जिथे एकमेकाला मिळतात, तिथे कोपऱ्यावरच ‘नवीन बावन चाळ’ आहे. बावन चाळीच्या समोरच ‘छाप्रा मॅन्शन’ नांवाची अत्यंत देखणी, परंतु आता मोडकळीला आलेली जुनी वास्तू आहे. फेर बंदर विभाग इथून सुरू होतो, तो ‘न्यू हिन्द मिल’पाशी संपतो आणि घोडपदेव सुरु होतं. बावन चाळीपासून सुरु होणाऱ्या रामभाऊ भोगले रोडवरून, पलिकडे असलेल्या बॅ. नाथ पै मार्गावरच्या घोडपदेव मंदिरात जाता येतं. रामभाऊ भागले रोडचं जुनं नांव ‘घोडपदेव रोड’..!.

फेर बंदरवरुन घोडपदेवला जाताना वाटेत आपल्याला गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या उंच इमारतींचा समूह लागतो. या इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत, ती पुर्वीच्या ‘न्यू हिन्द मिल’ची जागा. न्यू हिन्द मिलचं खरं नांव ‘न्यू कैसर ए हिन्द मिल’. ‘न्यू कैसर ऐ हिन्द मिल’ हे लांबलचक नांव मिरवणाऱ्या गिरणीचं त्याही पुर्वीचं नांव होतं, ‘नरसी मिल’. नरसी मिलचं नांव न्यू कैसर ए हिन्द झालं तरी, या गिरणीत काम करणारे कामगार ह्या गिरणीला ‘नरसु मिल’ असंच म्हणायचे.’नरसी मिलचे’ मालक कोण होते तुम्हाला माहित आहे? नाही ना? नसण्याचीच शक्यता जास्त. तर, ह्या नरसी मिलचे मालक होते, केशवजी नाईक (नायक). हो. तेच ते. गिरगावला चाळी बांधलेले. केशवजी नाईकांच्या चाळीवाले. जिथे १८९३ सालात खुद्द लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. केशवजी नाईक आपल्याला माहित असतात, ते गिरगावच्या चाळीमुळे आणि किथे सुकु झालेल्या पहिल्या गणेषोत्सवामुळे. पण ते केवळ चाळवाले नव्हते, तर मुंबईच्या गिरणी धन्द्यातलं ते एक बडं प्रस्थ होतं.

न्यू हिन्द मिल, म्हणजे केशवजी नाईकांच्या ‘नरसी मिल’ची जागा. ह्या जागेत म्हाडाने गिरणी कामगारांसाठी इमारती बांधल्या आहेत.

केशवजी नायकांचा विषय निघालाच आहे तर, या परिसरातल्या त्याच्या मालकीच्या आणखी एका गिरणीची माहितीही देतो.

फेरबंदर परिसरातल्या, आताच्या तुकाराम भिमजी कदम मार्गावर (जुना ‘चिंचपोकळी रोड’ किंवा नुसताच ‘पोकळी रोड’) इंडीया युनायटेड मिल्स क्र. १ आणि २’ होत्या. होत्या म्हणजे, त्या इमारती आणि आवार अजुनही तिथे आहे. इथेच आता महानगरपालिकेतर्फे ‘गिरणी संग्रहालय’ उभारण्याचं काम सुरू आहे. तर, ह्या इंडीया युनायटेड मिलचं सर्वात पहिलं नांव होतं, ‘अलेक्झांड्रा मिल’. ही गिरणी १८६८ सालात जमशेटजी टाटांनी सुरु केली होती. अलेक्झांड्रा मिलच्या ठिकाणी ही अगोदर ‘चिंचपोकळी ऑईल मिल’ नांवाची तेलाची गिरण होती. टाटांनी ती जागा विकत घेतली आणि तेलाच्या गिरणीचं रुपांतर अलेक्झांड्रा मिलमधे केलं. . १८७२ मधे टाटांकडून ही केशवजी नायकांनी विकत घेतली. ही मिल चांगली चालवून मिळालेल्या नफ्यातून त्यानी, सन १८७६ सालात आपण वर वाचलेली नरसी मिल सुरू केली होती. नरसी हे त्यांच्या मुलाचं नांव.

गिरणी कामगाराच्या इमारती असलेल्या ‘न्यू हिन्द मिल’चा, म्हणजे नरसु मिलचा भाग ओलांडला, की आपण प्रवेश करतो घोडपदेव परिसरात. घोडपदेवाचं मंदिरही इथून जवळच असलेल्या ‘बॅ. नाथ पै मार्गा’वर आहे. ‘बॅ. नाथ पै मार्गा’चं जुनं नांव ‘रे रोड. या नांवाचं रेल्वे स्टेशनही त्या रस्त्यावर आहे.असं हे माजगांव एकेकाळी शांत सुंदर गांव होतं. पोर्तुगीज काळात हे गांव खूपच भरभराटीला आलेलं होतं. मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माजगांवात मुंबई बेटाच्या खालोखालची लोकसंख्या होती. ह्या बेटावरची मुख्य वस्ती, मुंबईतल्या इतर बेटांप्रमाणेच कोळी आणि भंडारी यांची. भंडारी ताडा-माडाच्या आणि भाताच्या लागवडीत, तर कोळी मासेमारीत गुंतलेले. माज्गावचे आंबेही फार प्रसिद्ध होते एके काळी.

माजगांव हे नांवच पडलंय मुळी ‘मच्छगाम’ या अर्थाच्या शब्दावरुन म्हणे. माजगांवच्या समुद्रात मासळी मुबलक मिळायची. फक्त मुंबंईतच मिळणारा मासा ‘बोंबील’ याच समुद्र किनाऱ्यावर गावायचा. केवळ ‘बॉम्बे’तच गांवणारा आणि लहान आकाराच्या ‘ईल’ माशासारखा दिसणारा म्हणून तो ‘बॉम्बे~ईल’, ‘बोंबिल’, अशी त्या नांवाची व्युत्पत्ती..!

माजगाव हे टेकड्यांचही गांव. माजगांव हिल, छिनाल टेकडी आणि नौरोजी हिल, या टेकड्या कधीकाळी उभ्या होत्या. या टेकड्या गेल्या कुठे? तर त्या तिथेच आहेत. फक्त उभ्याच्या आडव्या झाल्यात. या टेकड्यांच्या पायाशी कधीतरी पलिकडचा समुद्र खेळत असे. आताचा बॅ. नाथ पै मार्ग, म्हणजे जुना ‘रे रोड’ या ठिकाणापर्यंत समुद्राची व्याप्ती होती. १८९० ते १९२० च्या दरम्यान या टेकड्या तोडून, त्याच्यातून मिळालेल्या दगडा-मातीची समुद्रात भरणी केलेली आहे. त्या भरणीवरच वाडीबंदरपासून दारुखान्यापर्यंतची विविध बंदरं उभी आहेत.

वरच्या परिच्छेदात तुम्ही ‘छिनाल टेकडी’ हे नांव वाचून दचकला असाल ना? तर, ते त्या टेकडीचं मूळ नांव नव्हे. त्या टेकडीचं खरं नांव ‘सिग्नल हिल’. समुद्रातुन येणाऱ्या जहाजांना संधेस देण्याची काही तरी व्यवस्था या टेकडीवर असावी, म्हणून ती सिग्नल हिल. ह्या ‘सिग्नल’चं भाषांतर स्थानिक जनतेने ‘सिनाल’ केलं व नंतर ते ‘छिनाल’ असं लेकप्रिय झालं. आताही अनेक लोक, विशेषतः रिक्शा आणि टॅक्सीवाले, सिग्नलला ‘सिंगल’ बोलतात, तसं तेंव्हा ते छिनाल झालं. फ्रिअर बंदरचं नाही का फेर बंदर झालं, अगदी तसंच. सिग्नल हिलच्या जागी आता ‘रे रोड स्मशानभुमी’ आहे आणि स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘सिग्नल हिल अव्हेन्यू’ असं नांवही आहे. रस्त्याच्या नांवात टेकडी अद्याप शिल्लक आहे..!

माजगांवची भंडारवाडा हिल अजुनही उभी आहे. या टेकडीच्या माथ्यावर महापालिकेचा बगीचा तर पोटात वॉटर रिझर्वॉयर आहे.
माझगाव हिल या टेकडीवर एके काळी ‘बेल्वडेर’ नांवाची ब्रिटिश अधिकाऱ्याची बंगली होती. त्याच्या पत्नीचं, एलिझाबेथ ड्रेपरचं, तिच्या प्रियकराशी सूत जुळतं आणि ती एका रात्री दोरखंडाच्या सहाय्याने ह्या टेकडीचा उभा कडा उतरून खाली उभ्या असलेल्या बोटीतून पळून जाते, अशी ती कथा. आता ती टेकडी नाही. ही टेकडी म्हणजे भंडारवाडा हिलचा पूर्व उतारावरच एक टोक..

भंडारवाडा हिलवर उभं राहिलं की, कधी काळी अख्खी मुंबई व पलिकडची साष्टी नजरेच्या टप्पात यायची, अशी आठवण जेम्स कॅम्पबेल याने ‘चार्म्स ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्याच्या त्या लेखाचं नांवच मुळी ‘Panorama of Bombay from Bhandarwada Hill’ असं आहे. आता मात्र आजुबाजुच्या गगनचुंबी इमारतींमधे ह्या टेकडीला शोधावं लागतं..!

ज्या टेकडीमुळे, माजगांवच्या उत्तर भागाला ‘घोडपदेव’ हे नांव प्राप्त झालंय, त्या ‘घोडपदेव हिल’ची आणि हे नांव कसं पडलं त्याची कथा सांगतो आणि हा लेख संपवतो.

आज साधारणत: घोडपदेव मंदिरापासून ते न्यू हिन्द मिलचा परिसर म्हणजे पूर्वीची घोडपदेव हिल. आजची डी.पी. वाडी (धाकु प्रभुची वाडी) ह्या हिलच्या जागेवरच उभी आहे. माजगावची उत्तर हद्द म्हणजे घोडपदेव टेकडी. पुढे परळ आणि माजगावला विभागणारी लहानशी खाडी होती.

आजच्या माजगावापासून घोडपदेवपर्यंत पूर्वी कोळी आणि भंडाऱ्यांची वस्ती होती. हे इथले मूळ पुरुष. भंडारी समाज ताडा-माडाच्या आणि भातशेतीच्या लागवडीत, तर कोळी मासेमारीच्या. इथल्या समुद्रात मुबलक मासळी मिळत असे.

समुद्र घोडपदेव टेकडीच्या पायापर्यंत होता त्याकाळी इथे जी टेकडी उभी होती, त्या टेकडीच्या माथ्यावरचा एक दगड बाहेर आला होता. लांबून त्याचा आकार घोड्याच्या मुखासारखा दिसत असे. माजगावचे कोळी जेंव्हा माझगांवपासून दूर खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आणि मासेमारी करून परत येत, तेंव्हा ही टेकडी आणि तिच्यावरचा तो घोड्याच्या तोंडासारखा दिसणारा दगड त्यांना दिसू लागला, की घर जवळ आल्याचा त्यांना आनंद होत असे. आपणही बाहेरगांवी जाऊन परत येताना घराजवळ आलो आणि गाडीतून आपल्याला ओळखीच्या खुणा दिसू लागल्या की, घरी न पोहोचताही आपल्याला घरी पोहोचल्यासारखं वाटून आनंद होतो ना, अगदी तसाच आनंद त्या कोळ्यानाही होत असे. दररोज मृत्यूशी गाठ असणारा कोळी समाज निसर्गाला देव मानतो, हे काही नवीन नाही. निसर्गपूजक असणाऱ्या कोळ्यांनी त्या दगडाला देव मानून, त्याचा आकार घोड्याच्या तोंडासारखा दिसतो म्हणून ‘घोडपदेव’ असं नांव दिलं असावं, अशी एक व्युत्पत्ती सागितली जाते. तशी ती पटण्यासारखी आहे.
कोळीच कशाला, आधुनिक काळातले आपणही एखाद्या दगडात किंवा झाडाच्या बुंध्यात गणपतीचा किंवा शिवलिंगाचा आकार दिसला, की त्याचा देव करून टाकतो, तसंच तेंव्हाही झालं असाव.

परंतु, ‘मुंबईचा वृत्तांत’ ह्या बाळकृष्ण आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे ह्यांनी १८९३ सालात लिहिलेल्या पुस्तकात, ‘घोडपदेव’ ह्या नावाबद्दल शंका उपस्थित करून, त्याचं उत्तरही दिलं आहे. लेखक लिहितात, ‘ह्या जागेस घोडपदेव म्हणण्याचे कारण असे दिसते की, लांबून पाहण्याबरोबर ह्या डोंगरीची आकृती घोड्याच्या आकाराची दिसते, असे कित्येक म्हणतात. पण, वास्तविक तिथे खडक मात्र आहे. तेंव्हा अर्थात ह्यांस ‘खडकदेव’ हे नांव चांगले शोभेल..!’  १८९३ मध्ये पुस्तक लिहिलेल्या लेखकाचं मत, हा खडकदेव म्हणून जास्त शोभेल, असं आहे.

लेखकाने ही टेकडी पाहिलेली असावी. कारण पुस्तक जरी १८९३ मधे प्रसिद्ध झालेलं असलं तरी, त्यातील लिखाणाची जमवाजमव त्यापुर्वीपासून चालू असणार. पुन्हा, घाडपदेव हिल १८९३ ते १९०८ च्या दरम्यान तोडण्यात आली. याचा अर्थ लेखकाने पुस्तक लिहिलं, त्या काळात ती तिथे असली पाहिजे आणि म्हणून लेखक सांगतात त्यानुसार तो ‘खडकदेव’ असा पाहिजे. घोडपदेव नाही.

जुन्या इंग्रजी पुस्तकांतूनही ह्याचा उल्लेख ‘Khadk Dev (Rock God)’ असा येतो. मग ह्या ‘खडकदेव’चं रुपांतर किंवा नामांतर ‘घोडपदेव’ कसं झालं, हा प्रश्न पडतो..! प्रश्नाचं उत्तर तर्काने सापडू शकतं. टेकडीच्या माथ्यावरच्या त्या दगडाला खडक देव म्हणोत वा घोडप देव, त्याचा संबंध कोळी समाजाशी होता, हे नक्की. असं असेल तर, कोळी लोकांसाठी कोकण किनारपट्टीवर ‘घोरपी’ असा एक शब्द आहे. टेकडीवर दिसणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला कोळी खडकदेव म्हणतात, हे लक्षात आल्यावर, ह्या देवाला समुद्रात जाणारे कोळी भजतात, म्हणून तो घोरप्यांचा देव, अर्थात ‘घोरप देव’, असा तर्क केल्यास चुकणार नाही.

गंमत म्हणजे मुंबई शहरावर लिहिल्या गेलेल्या काही जुन्या इंग्रजी पुस्तकातून, ह्या देवाचा उल्लेख ‘Ghorup Dev’ असाच आहे. ‘घोरपदेव’ मधल्या ‘र’ अक्षराचा उच्चार, काळाच्या ओघात ‘ड’ असा होऊन, घोडपदेव असा झाला असणार, हे जास्त पटण्यासारखं आहे.

पुढे ती टेकडी समोरच्या माझगांव इस्टेटमधे गडप झाली. तिथे बंदरं आली. ‘घोडपदेव हिल’मधली हिल गेली असली तरी, घोडपदेव नांव मात्र राहीलं. घोडपदेवाच्या मंदिरामुळे चिरंतन झालं.

नाथ पै मार्गावरचं घोडपदेव मंदिराचं प्रवेशद्वार

बॅ. नाथ पै मार्गावरच्या मंदिरात तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला दगडाच्या आकाराचा देव दिसेल. देवाच्या आजूबाजूला साधारण मोदकाच्या आकाराचे शेंदूर फसलेले बरेच लहान-मोठे दगड दिसतात. हे कदाचित समुद्राच्या लाटाच प्रतिक असावं. तळाच्या समुद्राच्या लाटांतून टेकडीवरचा घोडपदेव उगम पावला आहे, असंच ते पाहताना वाटतं.
एकदा फेरी मारा तिकडे.

नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
19.01.2022


संदर्भासाठी पुस्तकं-

1. The Origin of Bombay – Garsan Da Kunha

2. Bombay place-names and street-names; an excursion into the by-ways of the history of Bombay City – Samuel T. Shepphard

3. मुंबईचा वृत्तांत – बाळकृष्ण आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे
4. स्थल-काल – डॉ. अरुण टिकेकर
5. Indian Textile Journal – 1854 to 1954 – published by Bombay Mill Owbers Associatin.6. Bombay; Story of The Island City – Pusalkar & Dighe.

6. Rise of Bombay- S. M. Edwards

घोडपमंदिराचा गाभारा.
श्रीदेव घोडपदेव

24 thoughts on “घोडपदेव, व्हाया काळाचौकी आणि फेरबंदर..!

  1. घोडपदेवच्या जाफरभाई कानजी चाळीत माझे बालपण गेले. खुपच छान माहिती दिलीत. पुर्वीची माणसे आणि आत्ताची यांच्यात खूप फरक पडला आहे. आता या चाळीवर टॉवर उभा राहिला आहे. हिरजी भोजराज चाळीनेही कात टाकली आहे. त्या चाळीतील केशवराव बोरकर हे ब्रिटिश काळातील दादा त्यांना घोडपदेवचे रहिवासी आबा म्हणूनच ओळखत. त्यांच्या कडे येणारे त्याकाळातील पुढारी, मंत्री आम्ही जवळून पाहिले आहेत. घोडपदेवचा इतिहासच समजून घेण्यासारखा आहे.
    विस्तृत माहिती दिलीत त्या बद्दल आपले धन्यवाद.

    Liked by 1 person

    1. धन्यवाद सर.. तुमच्याकडे काही जास्तीची माहिती असेल तर मला पाठवा. माझ्या पुस्तकात ती घेता येईल.

      हा लेख तुमच्या परिचितांना पाठवा. त्यांनाही माहिती होऊ दे..

      Like

  2. छान……… आपला लेख आवडला ,आपण जिथे राहतो तिथे मुळात काय होत आणि हि माहिती आपण अभ्यास करून त्याचा शोध घेऊन
    जे लिखाण केलात,,, फार छान.
    स्वातंत्र्य लढ्यात टिळक, आगरकर, सावरकर यांना मुंबईत डोंगरी जेल मध्ये ठेवले होते आणि हा इतिहास आपण नवीन पिढीसमोर ठेवले तर बरे होईल, चुकीचा ईतिहास त्यांच्या समोर प्रसार माध्यमांनी ठेवले जातात.
    जय श्री राम!!!

    Like

  3. खुप छान आणि विस्तृत माहिती.माझा जन्म देखील फेरबंदर
    मधील हिरोजी भोजराज चाळीत झाला.त्याकाळी फेरबंदर खुप गजबजलेलं असायचं.एखाद्या वाहनचालकाला वाहन चालवणे देखील मुश्किल व्हायचं.सायकलस्वार तर सायकलवरून उतरून हातानेच सायकल चालवत न्यायचा.अशा खुप आठवणी मनात जाग्या होतात.

    Liked by 1 person

    1. धन्यवाद जी..!
      यापेक्षा विस्तृत माहिती माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

  4. माझ्या जन्मभुमीचा माहितीवजा लेख आवडला. नरसु मिलच्या समोर असलेल्या रावजी सोजपाळ चाळीत आमचे बालपण गेले.
    गिरण्यांचे भोंगे एकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. आयुष्याचा सुरूवातीचा काळ जेथे व्यतीत केला तेथेच आयुष्याचा सरता काळ घालवावा याच उद्देशाने नरसु मिल येथल्या म्हाडा वसाहतीत पुनरागमन केले आहे. चाळींच्या ठिकाणी आता टोलेजंग टाॅवर्स उभे राहात आहेत, परंतु चाळींच्या जीवनातील मजा पुन्हा येणे नाही. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी!!!!

    Liked by 1 person

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.
      संपर्कात राहा..!

      Like

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

  5. अप्रतिम लेख . अतिशय दुर्मिळ माहिती संकलन , लेखामुळे आपल्या विभागाची महत्वपूर्ण माहिती मिळीली . धन्यवाद व पुढील लिखणासाठी शुभेच्छा

    Liked by 1 person

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

  6. खूप छान उपयुक्त माहिती, या घोडपदेव मध्येच माझा जन्म झाला
    घोडपदेव विषयी आधी थोडीफार माहिती होती, त्यांत अधिक माहिती मिळाली, घोडपदेव मंदिरा संदर्भात मी श्री अशोक बोरकर यांच्या सहकार्याने १२ गाण्यांची सी. डी तयार केली आहे काळाचौकी, फेरीवाले बंदर विषयी अधिक माहिती मिळाली,,,, खूप खूप धन्यवाद!!

    Liked by 1 person

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

  7. खुप सुंदर,
    घोडपदेव परिसर श्री घोडपदेव ,श्री सिध्देश्वर,श्री कापरेश्वर या देवतांच्या अधिष्ठानाने पावन झालेला आहे .

    Liked by 1 person

    1. धन्यवाद सर..!
      या विभागाची यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला माझ्या आगामी पुस्तकात वाचायला मिळेल.

      Like

  8. मुंबईच्या इतिहासाचा बारकाइने अभ्यास केलेला आहे.
    प्रत्येक वास्तुची प्रमाणासकट उल्लेख असल्या मुळे
    हा ब्लॉग इतिहासावर संशोधन साठी महत्वपूर्ण ठरेल.

    Liked by 1 person

  9. खूपच सुंदर लेख, राहत असलेल्या जागेचा इतिहास साधारण ३२ वर्षानंतर कळला याच समाधान. अप्रतिम लेखणी.

    Liked by 1 person

Leave a comment