‘एस. एस. (सप्लाय शिप) फोर्ट स्टायकिन’ – भाग १ /३
शुक्रवार दिनांक १४ एप्रिल १९४४ ची नेहेमीसारखीच शांत दुपार. स्थळ सिमला*, वेधशाळा. वेधशाळेतील नेहेमीची काम चालू होती. दिवसभरात काही विशेष घडलेलं नव्हतं. दुपारचे चार वाजलेले होते. पुढच्या दोनेक तासात, दिवसभराची नेहेमीची काम आटोपून घराकडे जायची वेळ होणार होती. कर्मचाऱ्यांची लगबग चालली होती. सवयीने तिथे लावलेल्या असंख्य यंत्राच्या तबकड्यांवर कर्मचारी अधून मधून नजर टाकून, सर्व आलवेल असल्याची खात्री करत होते. एकुणात रुटीनमधे काही वेगळं घडलेलं नव्हतं.
चार वाजून सहा मिनिट झाली आणि अचानक वेधशाळेत बसवलेल्या भूकंपमापक यंत्राचा (Seismograph) काटा जोरात हलू लागला. वेधशाळेतले अधिकारी सावध झाले. कुठेतरी दूर अतिशय तीव्र भूकंप झाला होता. अधिक तपशिलात गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की यंत्रावर नोंद झालेल्या त्या भूकंपाचं केंद्र, सिमल्यापासून दूर साधारण दीड-दोन हजार किलोमीटर अंतरावर कुठेतरी असावं. ते जमिनीवर किंवा समुद्रातही असू शकत होतं. पण नेमकं कुठे, ते कळण्याची त्या यंत्रात सोय नव्हती. कळलं फक्त एवढचं की, तो अतिशय तीव्र असा भूकंप असावा.
पुढच्या दहा-पंधरा मिनिटात, वेधशाळेचे कर्मचारी यंत्रावर नुकत्याच नोंद झालेल्या भूकंपाची माहिती वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये नोंदवण्यात गुंतले. तेवढ्यात पुन्हा, सहा वाजून वीस मिनिटांनी, आणखी एका मोठ्या भूकंपाची नोंद यंत्र घेऊ लागलं. हा भूकंप पहिल्यापेक्षा कितीतरी मोठ्या तीव्रतेचा असावा. सेस्मोग्राफचा काटा अंगात आल्यासारखा घुमू लागला होता. यंत्राच्या डायलवरचे आकडे त्याला अपुरे पडत होते. वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना भयंकराची चाहूल लागली. हे भूकंपापेक्षा काहीतरी वेगळ घडतंय हे आणि एवढंच फक्त सिमला वेधशाळेला समजलं. आता जी नोंद झाली, ती भुकंपाची आहे की धरणीभंगाची, याता त्यांना अंदाज येत नव्हता. आणि ते जे काही झालं आहे, ते नेमकं कुठे, याचा काहीच अंदाज त्यांना येत नव्हता. साधारण २ हजार किलोमीटर परिघात काहीतरी मोठी घटना घडली असावी, एवढं आकलन त्यांना झालं.
वेधशाळेतल्या जुन्या कर्मचाऱ्यांना १९३५ साली क्वेट्टात झालेल्या ( सध्या पाकिस्तान) भूकंपाची आठवण झाली. रिश्टर स्केलवर ७.७ दाखवणाऱ्या त्या भूकंपात साधारण ५०-६० हजार माणसं मृत्यू पावली होती. त्याहीपुर्वीचा मोठा भूकंप झाला होता, तो जपान मध्ये. तो ८.८ रिश्टर स्केलचा होता. पण त्यापेक्षा आता जे काही घडत होतं, ते जास्त भयानक असल्याची आशंका त्यांच्या मनात आली. कारण आता जे दोन धक्के त्यांच्या वेधशाळेने नोंदवले, ते, तोवर नोंदवलेल्या रिश्टर स्केलच्या पुढे जाणारे होते. म्हणजे जे काही झालं आहे, ते महाभयंकर असलं पाहिजे. पुन्हा, क्वेट्टाचा भूकम जेमतेम दीड-पावणेदोन मिनिटांचा होता. तर आता १५-२० मिनिटांच्या कालावधीत जे काही घडत होत, त्याने किती विध्वंस झाला असावा, ह्याची कल्पनाही ते करू शकत नव्हते.
नेमकं काय घडलं असावं, त्याचा अंदाज येत नव्हता. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. इंग्लंड युद्धात सामील होते. भारत ब्रिटीशांची वसाहत. एखादा मोठ्या क्षमतेचा बॉम्ब टाकला गेला, की दुसरं काही घडलं, हे त्या दूर एका कोपऱ्यात असलेल्या वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना समजेना.
१९४४ चा फेब्रुवारी महिना. स्थळ इंग्लंड. लिव्हरपूलमधील ‘मेर्सी (Mersey)’ नदीवरील ‘बर्कनहेड (Birkenhead)’ बंदरात, ७१४२ टनी, ४२४ फुट लांबीचं, ‘एस. एस. फोर्ट स्टायकीन ( S. S. Fort Stikin)’ नांवाचं मालवाहू जहाज उभं होतं. कॅनडामधील (ब्रिटीश कोलंबिया) ‘प्रिन्स रुपर्ट ड्राय डॉक’ मध्ये बांधण्यात आलेल्या ह्या जहाची नोंदणी लंडनमध्ये झालेली होती. ह्या जहाजाची मालकी ब्रिटीश सरकारची होती. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्याने, हे जहाज युद्धोपयोगी साहित्याच्या वाहतुकीसाठी, दोस्त राष्ट्रांच्या War Shipping Administration द्वारा आरक्षित करण्यात आलं होतं.

जहाज व्हाया कराची मुंबईला जायला निघालं होतं. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. भारतावर जपानच्या आक्रमणाचं सावट घोघावत होतं. युद्ध इंफाळपर्यंत येऊन ठेपलं होतं. त्यामुळे बहुतेक जहाजं युद्धसाहित्याची ने-आण करण्यात गुंतलेली होती. फोर्ट स्टायकीन जहाजातही विविध युद्धोपयोगी साहित्य भरण्याची लगबग चालली होती. लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग, वेगवेगळ्या क्षमतेचे बॉम्ब्स, बंदुकांच्या गोळ्या, हत्यारं, भू आणि पाणसुरुंग, गंधक आणि अतिशय संहारक क्षमतेचा, जवळपास १४०० टन वजन भरेल इतका दारुगोळा ह्या जहाजावर चढवला जात होता.
दारुगोळ्याव्यतिरिक्त जहाजावर १० लाख पौंड (१९४४ चे १० लाख पाउंड्स बरं का..!) किमतीच्या आणि जवळपास ३८२ किलो वजनाच्या अस्सल सोन्याच्या विटाही (खरं तर १०० आणि ५० ग्रामची बिस्किटं) चढवल्या जात होत्या. हे सोनं बँक ऑफ इंग्लंडकाढून भारताच्या रिझर्व बँकेत जमा करण्यासाठी पाठवलं जात होत. सोनं पॅकिंग करताना विशेष काळजी घेतली होती. १२ किलो ७०० ग्राम वजन सोन्याच्या विटांची एक पेटी, अशा एकूण ३० लाकडाच्या पेट्यांमधे सोनं ठेवलं होतं. जास्तीची काळजी म्हणून ह्या लाकडी पेट्या, पोलादाच्या ३० मजबूत पेट्यांमध्ये पॅक करून, त्या पेट्या वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आल्या होत्या.
समान ठेवण्यासाठी बोटीत एकूण पाच मोठे कप्पे होते. जहाजात ठेवण्यात येणाऱ्या सामानाचं वजन विभागलं जाऊन, जहाजाचा तोल सांभाळला जावा ह्या हेतून ती विभागणी केलेली होती. सोन्याच्या पोलादी पेट्या दोन क्रमांकाच्या कप्प्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्याच कप्प्यात २०० टनाचा दारुगोळा ठेवण्यात आला. ज्याची विध्वंसक क्षमता जास्त आहे, असा १२० टन वजनाचा दारुगोळा पहिल्या आणि आणखी एक हजार टन दारुगोळा चौथ्या कप्प्यात ठेवण्यात आला. बाकीचे बोंब, बंदुका, गोळ्या, लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग कप्पा क्रमांक एक ते पाच मध्ये विखरून ठेवण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कप्प्यात, शिल्लक असलेल्या जागेत इतर समान लादण्यात आले.
एस. एस. फोर्ट स्टायकीन जहाजाचा ४५ वर्षाचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ (A. J. Naismith) जहाजावर लादल्या जाणाऱ्या सामानावर काळजीपूर्वक लक्ष ठेवून होता. जहाजाच्या स्टोवेज प्लानमधे (कुठे काय सामान ठेवलंय ते दर्शवणारा नकाशा) त्याची नोंद करत होता. जहाजात भरल्या जाणाऱ्या सामानाचं स्वरुप आणि प्रमाण पाहून त्याला थोडी चिंता वाटत होती. अर्थात, स्फोटकं आणि दारुगोळा लादलेलं जहाज घेऊन दूर दूरच्या बंदरांत जायची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती. परंतु या खेपेस दारुगोळा, अति विध्वंसक स्फोटकं मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली होती. शिवाय ४०० किलोच्या आसपास भरेल एवढं शुद्ध सोनंही जहाजावर लादण्यात आलं होतं. ही मोठीच जोखीम होती.
यापुर्वीही त्याने फोर्ट स्टायकीनसोबत, जगभरातल्या बंदरात चार वाऱ्या केल्या होत्या. ह्या जहाजाची त्याला खडानखडा माहिती होती. अतिशय सर्वसाधारणसं दिसणारं ते जहाज, होतं मात्र अत्यंत विश्वासार्ह. ज्यावर अगदी बिनधास्त विसंबून राहावं असं, त्याचं लाडकं जहाज होतं ते. आजवरच्या प्रवासात जहाजाने कधीही धोका दिल्याचा त्याचा अनुभव नव्हता. निर्जीव मशिन असलं म्हणून काय झालं, तिच्यावर जीव लावला, की ते मशिनही आपल्यावर जीव लावतं, हा अनुभव आपण आजही घेतोच. मग नेहेमीच प्राणाशी गाठ असणाऱ्या समुद्रावर बाराही महिने संचार करणाऱ्या त्या लोकांचा, ज्या मशिनच्या आधारे ते समुद्रावर जातात, त्या मशिनवर जीव असणं स्वाभाविकच म्हणायला हवं.
परंतु दिवस युद्धाचे असल्याने. जर्मन यू-बोटींचा आणि जपानी विनाशिकांचा आणि पाणबुड्यांचा महासागरात संचार होता. त्यापासून सावधगिरी बाळगत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याने ठासून भरलेलं आणि सोनं असलेलं ते जहाज, जवळपास ४ हजार नॉटिकल्स मैलाच्या अंतरावर असलेल्या मुंबंईपर्यंत घेऊन जायचं म्हणजे काळजी वाटणं सहाजिकच होतं..
दारुगोळ्याची वाहतूक नायस्मिथसाठी नेहेमीचीच होती. मात्र या वेळेला जहाजावर केवळ दारुगोळाच नव्हता, तर मोठ्या प्रमाणावर सोनं होतं. अर्थात, ह्या जहाजावर सोनं जातंय, हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहिती होतं. पण न जाणो, ती बातमी शत्रुच्या गोटाला कळली तर, शत्रू काही करुन नायस्मिथच्या जहाजावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. युद्धाच्या दिवसात एखाद्या देशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं नष्ट करण्याने, युद्धाचं पारडं फिरवता येणं शक्य होतं. शत्रू ती संधी कधीही सोडणार नाही. फोर्ट स्टायकीनचा कॅप्टन नायस्मिथ या काळजीने जास्त घेरला होता.
जहाजाचा चीफ इंजिनिअर होता अलेक्स गो ( Alex Gow). जहाजाच्या राक्षसी इंजिनवर ह्याची हुकुमत होती. प्रचंड मोठ्या आकाराचीआणि असंख्य पायपांचं गुंतागुंतीचं जंजाळ असणाऱी इंजिन रुम म्हणजे अलेक्सचं साम्राज्य. इंजिन सतत खेळतं (म्हणजे धावतं) ठेवण्याची जबाबदारी अलेक्सची होती. केवळ इंजिनच नव्हे तर, जहाजाला लागणारं इंधन, विजेसाठी लागणारा डायनामो, रेडीओ सिस्टीम इत्यादीची जबाबदारीही अलेक्स आणि त्याच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची होती. मात्र तो ही ह्या खेपेला जरा चिंतेत होता. युद्ध साहित्याची सातत्याने वाहतूक करावी लागल्यामुळे, इंजिनाची आवश्यक ती देखभाल (सर्व्हिसिंग) करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नव्हता. काही किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याने बोटीच्या कप्तानाला आणि इतर संबंधीत अधिकाऱ्यांना तसं सांगणाचा प्रयत्न केला, परंतु बोटीवरचं सामान तातडीने ठिकाणावर पोहोचवणं गरजेचं असल्याने, अलेक्सला सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. सल्ला कसला, आदेशच तो. बोटीची धुरा युद्धखात्याकडे असल्याने, त्या काळात त्यांचे सल्ले म्हणजे आदेशच असायचे. पर्यायच नसल्याने अलेक्सने, लिव्हरपूल ते मुंबई, व्हाया कराची ह्या ट्रिपमधेच जेंव्हा केंव्हा संधी मिळेल, तेंव्हा इंजिनाची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याचं त्यांने ठरवलं होतं. शक्त झाल्यास पोर्ट तौफिकमधे, एडनला, कराचीत, नाहीतर मग मुंबईत पोहोचल्यावर..!
जहाजाचा प्रवास फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजिक असलेल्या बास्कच्या आखातातून (Bay of Biscay किंवा Basque) खाली दक्षिणेला जाऊन, युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणाऱ्या आणि अटलांटींक आणि भुमध्य समुद्राला जोडणाऱ्या जिब्राल्टर स्ट्रेट (जिब्राल्टर रॉक) पार करुन, पुढे सुएझच्या कालव्यातून निघून, लाल समुद्रातील येमेन-ओमानच्या आखातात जायचं आणि तिथून पुढे प्रथम कराची आणि मग मुंबई बंदरात शेवट, असा होणार होता.
त्याकाळच्या पद्धतीनुसार फोर्ट स्टायकीन एकटं जाणार नव्हतं, तर अनेक मालवाहू जहाजांचा एक काफिला सोबतच निघणार होता. सोबत संरक्षक बोटीही असणार होत्या. त्या काफिल्यातली फोर्ट स्टायकीनची जागा नक्की होती. फक्त फोर्ट स्टायकीनने एका रांगेत न जाता, रांगेपासून फटकून थोडं डाव्या अथवा उजव्या बाजूने पोहायचं होतं. जहाजांचा हा बेडा जाताना, जर्मन यू-बोटींना फोर्ट स्टायकीनवरील विध्वंसक मालाचा सुगावा लागून, त्यांना त्याच्यावर हल्ला केलाच, त्याच्यात ठासून भरलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन इतर जहाजांना नुकसान पोहोचू नये, ह्यासाठी फोर्ट स्टायकीनने रांगेत न जाता, रांगेपासून काही अंतर राखून प्रवास करायचा होता.
फोर्ट स्टायकीन आणि बेड्यातली इतर जहाजं जिब्राल्टर स्ट्रेटपर्यंत एकत्रच प्रवास करणार होती. जिब्राल्टर पासपाशी पोहोचल्यानंतर, काफिल्यातल्या काही बोटी उजवीकडे वळून, दक्षिण दिशेला असलेल्या आफ्रिकेतल्या काही बंदरांवर जाणार होत्या, तर फोर्ट स्टायकीन आणि उर्वरीत बोटी आशिया खंडाच्या दिशेने कूच करणार होत्या..!
२४ फेब्रुवारी, १९४४ या दिवशी सकाळी काफिला आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी एकत्रच निघाला. हवामान चांगलं नव्हतं. पाऊस पडत होता. कडाक्याचा गारठा होता. पाऊस आणि धुक्यामुळे दृष्यमानताही कमी होती. वास्तवीक अशा वातावरणात सामुद्री प्रवास करत नसत. पण युदंधकाळात अशा गोष्टींचा विचार केला जात नाही. इंग्लंड लढाईत उतरलेलं होतंच. विविध आघाड्यांवर लढत असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला वेळेत रसद पोहचवणं गरजेचं असतं. म्हणून खराब हवामानाचा धोका पत्करुन जहाजांच्या कप्तानांनी आपापली जहाजं समुद्रात लोटली होती.
पुढचे दोन दिवस हवामान खराबच होतं. जहाजांचा बेडा सावधगिरीने पुढे चालला होता. जर्मन बोटींवर नजर ठेवावी लागत होती. पाऊस, धुकं आणि थंडीमुळे ते अवघड होत होतं. समुद्रही खवळलेला होता. पण त्यातूनही मार्गक्रमणा सुरु होती.
निघाल्यापासून तिसऱ्या दिवशी थोडी उघडीप मिळाली. पुढे तीन-चार दिवस सर्वच शांत होतं. आकाश निरभ्र झालं होतं समुद्रही शांत होता. समुद्रात काही जर्मन बोटी संचार करत नाहीत ना, यावर नजर ठेवणं एवढाच काम उरलं होतं. जहाजावर सारे निश्चिंत होते.
पण हा निश्चिंतपणा फार काळ टिकला नाही. वर आकाशात लांबून विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. विमानं नजरेस पडत नव्हती, तरी सगळेच सावध झाले. एवढ्यात विमानं दिसू लागली. एकूण सहा विमानं घिरट्या घालताना दिसु लागली. नक्की कोणाची विमानं आहेत, ते कळत नव्हतं. तरीही सावधगिरी म्हणून संरक्षक बोटीवरील विमानविरोधी तोफा आकाशाच्या दिशेने रोखल्या गेल्या. परंतु काहीच झालं नाही. त्या विमानांनी काही वेळ घिरट्या घातल्या आणि ती आकाशात गडप झाली. बोटीवरील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बोटींचा ताफा पुढच्या प्रवासाला निघाला.
इंग्लंडहून निघतानाच ठरल्याप्रमाणे, जिब्राल्टर स्ट्रेटपाशी जहाजांचा ताफा दोन गटांत विभागला गेला. इथून काही जहाजं आफ्रिका खंडातल्या देशांतील बंदरात जाण्यासाठी वळल्या, तर फोर्ट स्टायकीन आणि उर्वरित इतर जहाज, सुवेझ कालव्याच्या दिशेने निघाली.
सुवेझ कालव्यापर्यंतचा पुढचा टप्पा जवळपास हजार मैलांचा आणि बारा-पंधरा दिवसांचा होता. हा टप्पा मात्र निर्विघ्नपणे पार पडला. जर्मन बोटींची अथवा पाणबुड्यांची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. डोक्य्वर घिरट्या घालणारी विमानंही नजरेश पडत नव्हती. ह्या हजार मैलांच्या प्रवासात, बाहेर युद्ध सुरु आहे की काय, याची शंका यावी, असंच वातावरण होतं. तरीही फोर्ट स्टायकीनवरील अधिकारी आणि कर्मचारी सावध होते आणि बेचैनही होते. आपण एक प्रचंड मोठ्या बॉम्बवर बसून प्रवास करीत आहोत, याचा विसर पडलेला नव्हता. चीफ इंजिनिअर अलेक्स गो, बोटीचं इंजिन मधेच बंद पडू नये यासाठी मनातल्या मनात येशूची आळवणी करत होता. परंतु मनातली घालमेल आपल्या चेहेऱ्यावर दाखवत नव्हता. जिथे पहिली संधी मिळेल, तिथे इंजिनाची बारीक-सारीक सुरुस्ती करयची त्याने ठरवलं होतं.
आणखी काही दिवसांनी ‘पोर्ट सैद’ आलं आता हा काफिला सुवेझ कालव्यात प्रवेश करणार होता. सुवेझ कालवा पार करण्यासाठी, जहाजांच्या बेड्याला, त्यांचा नंबर येईपर्यंत काही काळ वाट पहावी लागली. जेवढा वेळ जात होता, तेवढा वेळ अलेक्स अस्वस्थ होत होता. बोटीचं इंजिन त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं.

थोड्याच वेळात जहाजांच्या ताफ्याला सुवेझ कालव्यात प्रवेश करण्याची वर्दी मिळाली. सुवेझ कालवा पार करून जहाजं, कालव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या ‘पोर्ट तौफिक’ येथे आली. इथे काही काळ फोर्ट स्टायकीन इंधन घेण्यासाठी थांबणार होतं.
बोट पोर्ट तौफिक येथे पोहोचली. बोटीवर इंधन भरून होईपर्यंत, कॅप्टन नायस्मिथने बोटीवरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतेय की नाही, याची तपासणी केली. अलेक्सने बोटीच्या इंजिनावर नजर फिरवली. अजून पर्यंत तरी सर्व आलवेल असल्याचं दिसत होतं. परंतु मोठी दुरुस्ती आणि इंजिनाची सर्व्हिसिंग करावीच लागणार होती. इथून पुढे बोट, लाल समुद्र पार करून, येमेन देशातल्या ‘एडन’ बंदरात थांबणार होती. पुढचा थांबा होता कराची बंदराचा. या प्रवासात फोर्ट स्टायकीन सोबतीला, आणखी एक ब्रिटीश मालवाहू जहाज असणार होतं. बाकीची जहाजं इथेच थांबणार होती. एडनवरून कराची जवळपास ५०० मैलांवर होतं. ह्या प्रवासात काही विघ्न आलं नाही तर, हा प्रवास एकूण सहा-सात दिवसांचा होता.
पोर्ट तौफिक मध्ये इंधन घेऊन निघालेल्या फोर्ट स्टायकीनने, दिनांक २४ मार्चला एडनला स्पर्श केला. त्याच दिवशी तिने एडन सोडलं आणि ती कराचीच्या दिशेने निघाली. कराचीचा थांबा मोठा होता. फोर्ट स्टायकीन दोन-तीन दिवस कराची बंदरात थांबणार होती. बोटीमधलं बरचसं समान कराचीला उतरवण्यात येणार होतं.
३० मार्चला बोट कराची बंदरात पोहोचली. धक्क्यावारचे अधिकारी बोटीवर आले. बोटीत ठेवलेल्या सामानाचा आराखडा (Stowage Plan- बोटीमध्ये कोणतं समान कुठे ठेवलं आहे, ते दर्शवणारा आराखडा) त्यांनी तपासून, कराची बंदरात उतरवण्यात येणाऱ्या मालाची पडताळणी केली आणि धक्क्यावर उभ्या असलेल्या मजुरांना, समान उतरवून घेण्याचा इशारा केला.

मजुरांची टोळी कामाला लागली. इंग्लंडहून आलेले लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे लहान मोठे सुटे भाग उतरवण्यात आले. बोटीवरील दारुगोळा, स्फोटकं आणि सोनं वगळता, बाकी इतर सर्व समान कराची बंदरात उतरवण्यात आलं. बोट बरीचशी रिकामी झाली. चीफ इंजिनिअर अलेक्स गो, बोटीच्या इंजिनाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता, परंतु त्याला कराची बंदरातील अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. कारण काही कारणाने दुरुस्ती रखडली, तर ते चालण्यासारखं नव्हतं. बोटीतला दारुगोळा आणि सोनं मुंबईला वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. म्हणून बोटीच्या इंजिनाच्या देखभालीसाठी परवानगी देण्यास बंदर अधिकाऱ्यांनी नकार दिला होता.
बोटीवरील बरचसं समान उतरवून, धक्क्यावर उभ्या असलेल्या ट्रक्स आणि रेल्वेच्या वाघीणींमध्ये भरून युद्ध आघाडीवर रवानादेखील केलं गेलं. बोटीवरील जवळपास निम्म्याहून अधिक बोजा कमी झाल्यामुळे, कॅप्टन नायस्मिथ थोडा निश्चिंत झाला होता. वजन कमी झाल्याने, बोटीचा वेग वाढणार होता आणि मुंबईला लवकरात लवकर पोहोचता येणार होतं. अलेक्स गोला देखील मुंबईला कधी एकदा पोहोचतो आणि जहाजाचं इंजिन खोलून त्याची दुरुस्ती करतो, असं झालं होतं.
आता फक्त दीडहजार मैलांचा प्रवास शिल्लक होता आणि मग एकदम आराम. गेले पावणेदोन महिने समुद्रावर असलेले जहाजावरील खलाशी, अधिकारी आणि कर्मचारी मुंबईची वाट पाहत होते. त्याशिवाय त्यांची मोकळीक होणार नव्हती.
परंतु, ३० मार्चला कराची बंदरात पोहोचलेलं फोर्ट स्टायकीन, पुढचे तब्बल १० दिवस कराची बंदरातच होतं. इतके दिवस कराची बंदरात थांबावं लागण्यामागे एक कारण होतं आणि ते होतं, कार्चीत उतरवल्या गेलेल्या सामानामुळे, बोटीवर निर्माण झालेली मोकळी जागा.
बोटीवरचं बरचसं समान उतरवलं गेल्यामुळे, बोटीवर जवळपास ३ लाख घनफूट जागा मोकळी झाली होती. त्यामुळे मुंबईपर्यंतच्या प्रवासात बोटीचा वेग वाढून आपण लवकर मुंबईला पोहोचणार याचा सर्वाना आनंद होत होता. अर्थात प्रत्येकाच्या आनंदाची करणं वेगळी होती. कॅप्टन नायस्मिथ बोटीवर असलेली सोन्याच्या आणि मोठ्याप्रमाणावर असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याच्या जबाबदारीतून मोकळा होणार होता. चीफ इंजिनिअर अलेक्स बोटीच्या इंजिनाची दुरुस्ती आणि देखभाल निवांतपणे करता येईल म्हणून खुशीत होता. खलाशी ‘जीवाची मुंबई’ करता येईल म्हणून खुश होते. बोटीवर स्फोटके असल्याने, गेले पावणेदोन महिने त्यांना साधी सिगारेटही ओढता आली नव्हती. कप्तानाने सिगारेट आणि दारूवर सक्त बंदी घातली होती. मुंबईत पोहोचल्यावर त्यांना ते करता येणार होतं, म्हणून ते खुश होते. तिकडे रिझर्व बँकेचे अधिकारी सोन्याचा साठा येणार म्हणून खुश होणार होते, तर सैन्य अधिकारी त्यांना मोठ्याप्रमाणावर बंदुका, दारुगोळा आणि स्फोटकं, विमानांचे व जहाजांचे सुटे भाग मिळणार म्हणून ते खुश होणार होते. पण ही ख़ुशी फार काळ टिकणार नव्हती.
दिनांक ३ एप्रिलच्या सकाळी ९ वाजता, पुन्हा कराची बंदारावारचे अधिकारी बोटीवर पोहोचले आणि बोटीवर रिकाम्या झालेल्या जागेत आणखी काही समान लादून ते मुंबईला पाठवण्यात यायचं आहे, याची वर्दी त्यांनी कॅप्टन नायस्मिथला दिली. कप्तानाने हे ऐकताच, त्याचा आनंद कुठल्याकुठे गायब झाला. त्याची जागा संतापाने घेतली. इंग्लंडहून निघताना त्याला, कराची बंदरात नव्याने माल घ्यायचं आहे, हे कुणीच सांगितलं नव्हतं. त्याने त्याचा निषेध कराची बंदरातील अधिकाऱ्यांकडे नोंदवला आणि समान चढवून घेण्यास नकार दिला. परंतु त्याच्या विरोधाला न जुमानता, कराची बंदरातील अधिकाऱ्यांनी बोटीत माल चढवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरु असल्याने, कुठल्याही बोटीवरची एक फुट जागादेखील मोकळी जाऊ द्यायची नाही, अशी वरून आज्ञा असल्याचे आणि त्याचं पालन बोटीच्या काप्तनालाही करावे लागेल, असे नायस्मिथला सांगितले.
कॅप्टन नायस्मिथ संतापाने धुसमुसत असतानाच, बोटीतील रिकाम्या जागेत भरावयाच्या सामांच्या गाड्या धक्क्यावर येऊन उभ्या राहिला त्यातलं सामान बघून नायस्मिथ हतबुद्धच झाला. त्याच्या रागाची जागा, प्रथम चिडीने आणि नंतर असहाय्यतेने घेतली. तो काहीच करू शकत नव्हता. आता तो स्वतःवरच चिडला होता.
असं काय होतं त्या सामानात?
(क्रमश:)
-नितीन साळुंखे
९३२१८११०९१
salunkesnitin@gmail.com
*महत्वाची टीप-
या भागाच्या अगदी सुरुवातील जो ‘सिमला वेधशाळेचा’ उल्लेख आहे, ती वेध शाळा प्रत्यक्षात सिमला इथली नसून, पुणे इथली असावी. ‘पुणे वेधशाळा’ या नांवाने ती आपल्याला माहित आहे.
सिमला ही ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी असल्याने, बऱ्याच सरकारी संस्था सिमला इथुनही कार्यरत होत्या. वेधशाळाही त्यापैकीच एक. ही वेधशाळा दिनांक २० जुलै १९२८ रोजी पुणे येथे हलवण्यात आली होती. ही वेधशाळा सिमल्याहून पुणे येथे हलवलेली असल्याने, तिला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हणत. किंबहुना ती सिमला ऑफिस या नांवानेच पुणेकरांना परिचित होती/आहे. स्फोट झाला त्या वेळी सिमला येथे वेधशाळा कार्यान्वित नव्हती.
सदरची माहिती लेख लिहिल्यानंतर माझ्या नजरेस आल्याने, मूळ लेखात न देता ‘महत्वाची टीप’ म्हणून देत आहे.