‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने..

‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

‘मुलाच्या जडणघडणीत आईचं स्थान काय?’ असा प्रश्न जर का कुणी मला विचारला, तर विचारणाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय, अशी शंका आपल्याला येईल. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे, ज्या मुलाचं अस्तित्वच जिच्यामुळे शक्य झालं, तिचं त्या मुलाच्या जडणघडणीत स्थान काय हा प्रश्नच मुर्खपणाचा आहे असं आपल्याला वाटलं तर त्यात नवल नाही..।

आई नसती तर मुलंही नसतं, एवढं हे सरळ आहे. जडणघडण हा जन्माला आल्यानंतरचा विषय आहे. जन्म महत्वाचा. तो देणारी स्त्रीच असते. जडणघडण हा नंतरचा विषय. त्यातही स्त्रीचा वाटा मोठा.

कोणत्याही जीवनात्राच्या बाबतीत हे जेवढं सत्य आहे, तेवढंच ‘मुंबई शहरा’च्या बाबतीतही सत्य आहे, असं मी म्हटलं तर पटेल तुम्हाला?

नाही ना?

मग हा लेख वाचा. अगदी शेवटपर्यंत वाचा आणि मग ठरवा.

‘मुंबईच्या जडणघडणीत महिलांचे योगदान’ या विषयावर जेंव्हा मला लेख लिहावासा वाटला, तेंव्हा नेमकं काय लिहावं, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आणि त्याहीपेक्षा गहन प्रश उभा राहिला, तो म्हणजे, कोणत्या काळातील महिलांच्या योगदानावर लिहावं हा..! या पैकी कोणत्या काळातील महिलांच्या योगदानावर लिहावं, ह्या प्रश्नच उत्तर सापडलं की मग काय लिहावं हा प्रश्न आपोआप सुटतो.

मुंबई शहराची काय किंवा आपली काय, जडण-घडण हा विषय इतिहासाशी संबंधित. त्यात आपल्या सर्वसामान्यांचं इतिहासच ज्ञान आणि त्याची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरु होते आणि १९४७ साली प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीपाशी येऊन संपते. या काळाच्या अगेमागेही इतिहास घडलेला असतो, हे माझ्यासहित बहुसंख्य लोकांच्या लक्षातही येत नाही. अर्थात, छत्रपतींचा कार्यकाल ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातही अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. इतिहासाने त्यांची नोंदही घेतली आहे आणि त्यांच्यापैकी अनेकजणींविषयी आपल्याला माहितीही असते. परंतु त्या सर्व महिलांच्या कर्तुत्वाच्या केंद्रस्थानी, केवळ ‘मुंबई’ अशी कुठेही नसते. आणि मला तर फक्त मुंबई शहरा आणि महिला यांच्यातल्या ‘आई-मुला’सारख्या नात्यावर लिहायचं आहे. म्हणजे माझ्या लिखाणात येणाऱ्या इतिहासाचा काळ, छत्रपतींच्या अगोदरचा काही काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा बराचसा काळ येणार हे ओघानेच येतं. कारण मुंबई जगाला माहित होऊ लागली, ती या कालावधीतच. म्हणून माझ्या लिखाणासाठी कालनिश्चिती झाली, आणि काय लिहावं हा माझ्यासमोर उभा ठाकलेला प्रश्न सुटला.

मुंबई शहर आणि त्याच्या घडणीत महिलांचं योगदान या विषयावर लिहायला सुरुवात करताना, मी विचारात घेतलेला काळ १६६० ते १९६०, असा तीनशे वर्षाचा आहे. त्यातही ताजी घटना प्रथम आणि जुन्या घटना नंतर, अशा पद्धतीने लिहिणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचला, तरच महिला आणि मुंबई शहर, यांचं आई-मुलाचं नातं समजून येईल..!

मुंबईच्या इतिहासातली तुलनेने ताजी घटना मला आठवते, ती म्हणजे, १९५५ ते १९६०च्या दरम्यानचा ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’. हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील जनतेने दिला, पण या लढ्यात मुंबईतील सामान्य महिलांनी जो पुढाकार घेतला होता, त्याला इतिहासात तोड नाही..

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. परंतु, सत्ताधाऱ्यांशी होणारा महाराष्ट्राचा संघर्ष काही संपला नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या काही काळात देशाने भाषावार प्रांतरचना स्वीकारली. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला अन्याय आला. गोवा, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर इत्यादी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील, परंतु, मराठी भाषक जनता बहुसंख्येने असलेले प्रदेश, कर्नाटकच्या हवाली करण्यात आले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आणि पैसेवाल्या शेठजींना मुंबई नामक दुभती गाय आपल्या दावणीला बांधलेली हवी होती. आणि या कारणासाठी मुंबई महाराष्ट्राला नाकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. प्रथन गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करुन त्यांचं एकच द्विभाषिक राज्य करावं असा प्रस्ताव आला. नंतर मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवून, गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या ‘त्रिराज्य योजने’च्या प्रस्तावाचं घोडं पुढे दामटण्यात आलं. पुढे तर मुंबई केंद्रशासित करण्याच्या हालचाली दिल्ली दरबारी सुरु झाल्या. काही झालं तरी मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, असा चंगच दिल्लीश्वरांनी बांधला होता.

मुंबई ज्यांने आपल्या रक्ता-मांसानं घडवली होती, तो कामगार, जो गोऱ्या राज्यकर्त्यांशी दोन हात करताना घाबरला नव्हता, तो कामगार आता ‘संयुक्त महाराष्ट्र कृति समिती’च्या नेतृत्वाखाली आपल्याच सरकारविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या समितीचं नेतृत्व सेनापती बापट, एस.ए. डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी नेते करत होते आणि त्यांच्या जोडीला शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील यांची रक्त सळसवणाऱ्या बुलंद ललकाऱ्या मुंबईच्या गल्ल्या आणि महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत घुमू लागल्या होत्या..! नेत्यांची भाषणं आणि शाहीरांच्या तेज वाणीने, मुंबई आणि महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती पेटून उठली होती. त्यात पुरुष होतेच, पण स्त्रियाही मागे नव्हत्या..!!

दिनांक १६ जानेवारी १९५६ ला पंतप्रधान पंडित नेहरूंनी केंद्रशासित करण्याचा निर्णय आकाशवाणीवरून ऐकवला आणि त्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत सर्वत्र लोक रस्त्यावर उतरू लागले. मुंबईत बंद पाळला गेला. दादर, नायगाव, पोयबावडी(परळ), लालबाग, डिलाईल रोड, घोडपदेव, माझगांव इथला अवघा गिरणगाव आणि त्याच्या दक्षिणेकडच्या गिरगावमधले विद्यार्थी, कामगार, तरुण-वृद्ध, पुरुष आणि स्त्रियाही रस्त्यावर उतरल्या. महत्वाच्या नेत्यांची सरकारने धरपकड केली होती. लोक रस्त्यावरून हटेनात म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले. एक आठवडाभर हा पोलिसी अत्याचार मुंबईत सुरु होता. केवळ मुंबईच नाही तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव, कारवार इकडेही लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या आठवडाभराच्या कालावधीत ७४ लोक गोळ्या लागून ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकूण १०६ लोक (काही ठिकाणी १०५, तर काही ठिकाणी १०७ असा उल्लेख येतो) हुतात्मा झाले.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

साधारणत: सन १९५४ ते १९६० अशी पांच-सहा वर्ष चाललेल्या या लढ्याला बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, श्रीपाद.डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील इत्यादींसारख्या कणखर नेत्यांच नेतृत्व लाभलं होत. त्यांना साथ होती शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील इत्यादी पहाडी आवाजाच्या शाहिरांची. एस.जी सरदेसाई, के. एन. जोगळेकर, गुलाबराव गणाचार्य, नाना पाटील, एस. जी. पाटकर. कृष्णा देसाई, दिनू रणदिवे, अशोक पडबिद्री इत्यादीही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची खिंड लढवत होते. इथपर्यंत हा सर्व पुरुषी लढा वाटतो.

पण तसं नव्हतं. या आंदोलनातला सर्वसामान्य आणि गरीब घरातील स्त्रियांचा सहभाग खूप मोठा होता आणि तो सुरुवातीपासूनच होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतलेल्या तारा रेड्डी, प्रमिला दंडवतेंच्या, कुसुम रणदिवे, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर इत्यादी रणरागीणीनी तर प्रसिद्धच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, तुलनेनं कमी माहित असलेल्या, मालती नगरकर, बायजी पाटील, यामिनी चौधरी, पार्वतीबाई भोर, इंदुताई कुळकर्णी, गिरीजा कदम, मनोरमा हंगल इत्यादीसारख्या इतरही मध्यमवर्गीय महिला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढल्या होत्या.

या व्यतिरिक्त, सर्वात कमाल केली होती, ती गिरगांव आणि गिरणगावातल्या सामान्य गृहिणीनी. गरीब, मध्यमवर्गातून आलेल्या या महिलानी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असामान्य धैर्य दाखवले होते. यांच्या नावांची नोंद इतिहासात असेल, नसेल. नसण्याचीच शक्यता जास्त. त्या नावासाठी लढल्या नव्हत्याच मुळी. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती काही झाल तरी महाराष्ट्राचीच राहील, या ध्येयाने ला अनामिक लढवय्या स्त्रिया लढ्यात उतरल्या होत्या. “निघाले मराठे वीर, संयुक्त महाराष्ट्राच्या वेडात..त्यांना देण्यास साथ, उतरल्या विरांगना मैदानात”, ही उक्ती अक्षरक्ष: त्या जगत होत्या. गिरगांव-गिरणगावातली प्रत्येक चाळ हा किल्ला बनला होता इथे केवळ त्यांची साथ नव्हती, तर मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यातील, चाळी चाळीतील किल्ले हा महिला जातीने लढल्या होत्या.. दादर-नायगावपासून ते थेट भायखळा-गिरगांवपर्यंतची एक एक चाळ समितीचा किल्ला बनली होती.

नायगावची इस्माइल बिल्डिंग, करी रोडची हाजी कासम चाळ, काळाचौकीतल्या चाळी, लालबागची गणेश गल्ली, काळेवाडी, आंबेवाडी, दाभोळकर अड्डा, कोंबडी गल्ली, बोगद्याची चाळ, गॅस कंपनी लेन अशी किती नावे सांगणार? येथून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची लढ्याची सूत्रे हलत होती.

१६ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान सरकारने केलेल्या गोळीबारात, विशेषत:, लालबाग परळच्या ‘लक्ष्मी कॉटेज’ व ‘कृष्णनगर’च्या महिलांनी आपल्या असामन्य धैर्याने आणि शौर्याने स्त्री-शक्तीची जाणीव करून दिली. या चाळींना गराडा घालून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला, लाठीचार्ज केला. स्त्रिया व मुले खोल्यांमध्ये बेशुद्ध पडू लागली. समोर स्त्री आहे की पुरुष, हे न पाहाता, पोलीस दंडुका चालवू लागले. यावेळी स्त्रिया तान्ह्या मुलांना कडेवर घेऊन बाहेर आल्या. पोलिसांना त्यांनी घेरले. ‘भेकडांनो असे कोंडून काय मारता, असे उघड्यावर मारा, आम्ही मुंबईसह महाराष्ट्रासाठी मरायला तयार आहोत’, असं म्हणत त्या पोलिसांचं कडं तोडून पुढे होऊ लागल्या. पोलिसांनी वेढा अधिकच आवळला. पण शेवटी त्या महिलांच्या हिमतीपुढे पोलिसांचा नाइलाज झाला. त्यांना कारवाई थांबवावी लागली. पोलिसांनी निघून जावे लागले.

शेवटी लोकांच्या मागणीपुढे सरकार झुकले. दिनांक १ मे १९६० या दिवशी, १०६ जणाच्या बलिदानाने बेळगाव, कारवर, निपाणी वगळून परंतु, मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई महाराष्ट्राची राहिली. महाराष्ट्राची राजधानी झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात या महिलांची कामगिरी कायम लक्षात राहील, अशी झाली. मुंबई शहरासाठी आणि पर्यायाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी, महिलांनी दिलेले हे अलीकडच्या इतिहासातील अमुल्य योगदान. मुंबई महाराष्ट्राची झाली, त्यात या स्त्रियांचा वाटा खूप मोठा आहे..!

हुतात्मा स्मारक

चर्चगेटच्या ‘हुताद्मा स्मारका’वर शेतकरी आणि कामगार असे दोन पुतळे आहेत. त्या जोडीला शेतकरीन आणि कामगारनीचे पुतळे असाचला हरकत नव्हती, असं आपलं मला वाटतं.

आता थोडं मागे जाऊ. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपूर्वी, मुंबई शहरातील कामगारांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता, तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात. आणि त्यांना तेवढीच समर्थ साथ लाभली होती, ती सर्वसामान्य स्त्रियांची..!

देशाच्या स्वातंत्र्यसाठी संपूर्ण देशातीलच जनतेने लढा दिला होता. प्रसंगी प्राणांचं बलिदानही दिलं होतं. परंतु, ब्रिटिशांच्या राजसत्तेला शेवटचा मोठा आणि निर्णायक धक्का दिला तो महात्मा गांधींनी. तो ही मुंबईतून. दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ह्या दिवशी, मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानातून ‘चले जाव’ आणि ‘करेंगे या मरेंगे’ हे दोन स्फूर्तिदायक मंत्र स्वातंत्र्य लढ्याला दिले आणि अख्खा देश पेटून उठला. ह्या लढ्याचा केंद्रबिंदू मुंबई शहर होता. संपूर्ण देशातून कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकांचे थवेच्या थवे मुंबईत येऊ लागले होते. ग्रांट रोडचं ‘काँग्रेस हाऊस’ देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी फुलून गेलं होत. राहायची कोणतीही सोय नाही. पण, त्याची पर्वा होती कुणाला..! लोक मिळेल तिथे आपली पथारी टाकत होते. रोज नविन कार्यकर्ते सामील होत होते. जिथे राहायची काहीच सोय नाही, तिथे ह्या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याचे काय होत असेल, ह्याची कल्पनाच केलेली बरी. पण त्याचीही तमा होती कुणाला..!

अश्या वेळी मुंबईकर गृहिणी पुढे आल्या. चाळीतील, आणि ऐश्वर्यसंपन्न बंगल्यांतुनही अन्नपूर्णा मदतीला धावल्या. लालबाग-परळ भागातून मराठमोळ्या बायका पदर खोचून पुढे आल्या. मलबार हिल वरील उच्चभ्रू पारशींनी आणि भाटिया गुजराती बायका धावून आल्या. त्यांच्यातळे जात-पात, पंथ-धर्म-भाषा, गरीब-श्रीमंत हे सारे भेद आपोआप गाळून पडले. आता त्या फक्त माता होत्या. भरणं पोषण करणाऱ्या भारतमातेचं प्रतिकच जणू..! या माऊलींनी काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला. मशीद बंदरातून गाड्या भरभरून आटा, तांदूळ, साखर, गहू इत्यादी धान्य येऊन पडू लागलं. भायखळ्याच्या भाजी बाजारातून भाज्यांच्या गाड्याच्या गाड्या भरून येऊ लागल्या. कुणाला किंमत चुकवण्याचा किंवा विनंती करण्याची गरजच पडली नाही. सारी माणसे ‘चले जाव’ ह्या मंत्राने झपाटलेली होती.

‘चले जाव’ आंदोलनात निघालेला महिलांचा प्रचंड मोर्चा

काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघरात २४ तास चूल धगधगत होती. कानात हिऱ्याच्या कुडी घालणाऱ्या श्रीमंत पारशी मेहेरबाई, गुजराती कमलबेन, यांच्यासोबत, गिरगाव-गिरणगावातल्या कमलाबाई, सखुबाई आणि साळुबाई मांडीला मांडी लावून पोळ्या लाटत होत्या. अगणित कार्यकर्त्यांच्या स्वयंपाकाचा घाणा दिवसरात्र चालवत होत्या. उष्ट्या-खरकट्या भांड्यांचा रगाडा उचलत होत्या. सर्व भेदभाव गळून पडले होते. केवळ स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य ह्याच एकमेव ध्येयाने सर्व झपाटले होते होते. सैनिक लढत असले तरी त्यांच्या पोटाला घालणाऱ्या ह्या स्त्रियांची नोंद इतिहासात कितपत आहे कुणास ठाऊक. नसण्याचीच शक्यता जास्त..! मुंबई शहरातल्या स्त्रियांनी, अगदी मुंबईसाठी नसलं तरी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं हे अनामिक योगदान..!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्या स्वातंत्र्यासाठी देशभरातील स्त्री-पुरुषांनी आपलं योगदान दिलं. अनेकांनी बलिदानही केलं. त्या खेचून आणलेल्या स्वातंत्र्यात, मुंबई शहरातील या अनामिक स्त्रियांचंही अल्पसं का होईना, पण योगदान आहे..! रामसेतूतलं खारीचं महत्व नजरेआड कसं करता येईल?

आता आणखी थोडं मागे जाऊ. आणखी मागे म्हणजे, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जवळपास १०२ वर्ष मागे. या कथेच्या नायिका आहेत, पारशी समाजात जन्मलेल्या श्रीमती आवाबई जमशेटजी जीजीभाई..!

पारशी समजात जन्मलेल्या बहुतेक सर्व स्त्री-पुरुषांनी मुंबई शहराच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलेलं आहे. तरीही लेडी जमशेटजीं या पारशी महिलेचं महत्व थोडं वेगळं आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याच्या आधाराने, वांद्र्यापासून पुढे दहिसरपर्यंत वसत गेलेल्या, पश्चिम उपनगरांच्या जन्माला, लेडी आवाबई जमशेटजी त्यांच्याही नकळत कारणीभूत झालेल्या आहेत.माहिम हे मुंबईचं शेवटचं बेट आणि साष्टीतलं पहिलं बेट वांद्रे यांना एकमेकापासून माहिमची खाडी विभागत होती. आजही विभागते आहे. पण त्याकाळातलं खाडीचं पात्र आजच्या तुलनेत जास्त रुंद आणि खोल होतं. या दोन्ही ठिकाणच्या लोकांना, दोन्ही बेटांमधे ये-जा करण्यासाठी पूर्वी लहान होड्या वापरल्या जात. एरवी ही वाहतूक सुरळीत चालत असे, पण पावसाळ्यात मात्र परिस्थिती कठीण होत असे. आधीच मुंबईचा पाऊस आणि त्यात उधाणलेला समुद्र यामुळे ही खाडी ओलांडणाऱ्या बोटींना अपघात होऊन मनुष्य आणि जनावरांची हानी होणं हे ठरलेलंच असे. इथे पुल बांधण्याची लोकांची अनेक वर्षांची मागणी असुनही सरकार तिकडे दुर्लक्ष करत होतं. पुरेसा निधी नसल्याची कारणं देत होतं.

अशावेळीच आवाबाई यांना दरवर्षीच्या पावसाळ्यात नाहक होणारी मनुष्यबानी सहन न होऊन, माहिमच्या खाडीवर स्वखर्चाने पुल बांधण्यास त्या तयार असल्याचा प्रस्ताव सरकारला दिला. आवाबाईंशी चर्चा करुन सरकारने तसा पुल बांधण्याची मान्यता दिली आणि आवाबाईंनी १८४३ मधे मधे तो पुल बांधायला सुरुवात केली.

आवाबाईंनी स्वखर्चाने बांधलेला पुल, माहिम कॉजवे’, ८ एप्रिल, १८४५ रोजी लोकांसाठी खुला झाला. आता लोकांना वर्षभरातल्या कोणत्याही मोसमात माहिमची खाडी ओलांडून ये-जा करणं सोपं आणि सुरक्षित झालं. मनुष्यहानी थांबली.

माहिम कॉजवे

तत्पुर्वी सन १८०५ साली, सायन या मुंबई शहराच्या शेवटच्या ठिकाणाला साष्टीतल्या कुर्ल्याला जोडणारा ‘सायन कॉजवे’ तयार होऊन वापरातही आला होता. हा रस्ता त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर सर जोनाथन डंकन यांच्या प्रयत्नातून बांधला गेला होता. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ त्या रस्त्याचे नांव ‘डंकन कॉजवे’ असं देण्यात आलं होतं. माहिम कॉजवे बांधण्याच्या ४० वर्ष अगोदर हा रस्ता बांधल्यामुळे, कुर्ल्यापासून पुढची उपनगरं तेंव्हाच वसली होती. तिथला व्यापार उदीम, लोकवस्ती वाढू लागली होता. पुढच्या काळात साष्टीतील कुर्ल्यापासूनची पुढची ठिकाणं, मुंबईची पूर्व उपनगरं म्हणून ओळखली जाऊ लागली.

तसाच प्रकार आवाबाईंनी बांधलेल्या माहिमच्या कॉजवेमुळे झाला. त्यांनी माहिमच्या खाडीवर पूल बांधल्याने, लोकांना ये-जा करण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध झाला. लोकांची रहदारी वाढली आणि त्यामुळे वांद्र्यापासून पुढे हळहळू लोकवस्तीही वाढू लागली. व्यापार वाढू लागला. मुंबईची पश्चिम उपनगरं जन्मास येऊ लागली. वांद्रे, खार, सांताक्रुझ व पुढच्या परिसरातील वस्ती हळूहळू वाढू लागली..!

पारशी समाजाने जवळपास मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. परंतु आवाबाईंच्या कार्याचं वैषिष्ट्य म्हणजे, मुंबई शहराच्या पश्चिम उपनगराच्या वाढीसाठी, त्या नकळत कारणीभूत झाल्या. म्हणून त्यांनी मुंबई शहारतसाठी दिलेल्या या योगदानाचा विशेष उल्लेख या लेखात करणं मला आवश्यक वाटलं..!

आता या लेखाचा महत्वाचा भाग सुरु होतो. इतका महत्वाचा की, ही स्त्री नसती तर, कदाचित वर उल्लेख केलेल्या, सन १९५६ ते १९६० च्या दरम्यानचं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, त्या अगोदरचा सन १८५७ ते १९४७ हा ९० वर्षाचा भारताचा स्वातंत्र्य लढा, सन १८४५ चा आवाबाईचा ‘माहिम कॉजवे’ इत्यादी घटना घडल्याच नसत्या. मुळात मुंबई, आजच्या मुंबईसारखी झाली असती, की तिचं दुसरंच काहीतरी अधिक चांगलं किंवा अधिक वाईट घडलं असतं, हे सांगता येणं अवघड असलं तरी, तिचं आजचं स्वरुप मात्र निश्चितच दिसलं नसतॅ, एवढं मात्र नक्की सांगता येईल..!

ह्या स्त्रीया रुपाने, आताच्या ठाणे जिल्ह्यातील, वसई प्रांताचा, कुणाच्याही फारश्या खिजगणतीत नसलेला एक ओसाड, दुय्यम भुभाग असलेल्या मुंबईचं भाग्य फळफळलं. तिच्या निमित्ताने उजेडात आलेली मुंबई, पुढच्या दोन-अडिचशे वर्षात जगातील आघाडीच्या शहरांपैकी एक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आली.

कोण होती ही स्त्री..? आपली उत्सुकता फार न ताणता, प्रथम तिचं नांव सांगतो..!

ती होती कॅथरीन ब्रॅगान्झा. इन्फन्टा ऑफ पोर्तुगाल. अर्थात, पोर्तुगालचा राजा चौथ्या जॉनची कन्या. पोर्तुगालची राजकन्या आणि इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्ल्सची पत्नी:क्वीन ऑफ इंग्लंड..!!

कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा; क्वीन ऑफ इंग्लंड

मुळात मुंबई हे दुर्लक्षित बेट, शहर म्हणून इतिहासात पुढे येत, तेच १६६० साला नंतर. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांचा विवाह ठरतो. दिनांक २३ जून १६६१ मधे या दोघांच्या विवाहाचा करार होतो आणि त्या करारानुसार, मुंबई बेट आणि बंदर (Port and Island of Bombay) आंदण म्हणून इंग्लंडच्या ताब्यात देण्याचं ठरतं आणि त्याच क्षणी एक ओसाड बेट असलेल्या मुंबईचं भाग्य बदलण्याची सुरुवात होऊ लागते. जागतिक पटलावर मुंबईची ओळख होण्याचे सुप्त संकेत मिळू लागतात..!

कॅथरीन आणि चार्ल्सच लग्न होताना, मुंबई व इतर सहा बेटं पोर्तुगीज साम्राजाच्या हिस्सा होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीज अंमल सुरु झाला तो साधारण १५०५ च्या आसपास. १५३४ सालात मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात आली, पण त्या पूर्वीच त्यांचं बस्तान बसलं होतं, ते मुख्यतः वसईच्या परिसरात. वसई हे पोर्तुगीजांच्या प्रशासकीय आणि लष्करी कारभाराच मुख्य ठाणं होतं. मुंबई द्विप-कल्पातल्या सात बेटांपैकी, माहिम हे बेट वसईतल्या पोर्तुगिजांचं दुय्यम, परंतु महत्वाचं बेट होतं आणि या माहिमची मुंबई एक ‘डिपेन्डन्सी’ होती. बंदर म्हणून मुंबई उत्तम होती, हे पोर्तुगिजही जाणत होते. म्हणून तर त्यांनी, उत्तम नैसर्गिक बंदर असलेल्या ‘मुंबई’ या एकाच बेटाला, ‘Bom Baia’, म्हणजे उत्तम खाडी किंवा Bay असं नांव दिलं होतं. या नांवाचा पुढे अपभ्रंश होत, मुंबईचं नांव Bombay असं स्थिर झाल (मुंबादेवीवरुन प्राप्त झालेलं ‘मुंबई’ हे नांव आणि पोर्तुगिजांनी दिलेलं ‘बॉम बेईआ’ ह्या नांवात साधर्म्य असणं, हा योगायोगच..!). पण तरीही त्यांनी मुंबई बेटाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं. किंबहुना माहीम वगळता मुंबई व इतर पाच बेट, ही पोर्तुगीजांच्या दृष्टीने फारशी महत्वाची नव्हती.

जन्मजात उत्कृष्ट नाविक असलेल्या पोर्तुगिजांना मुंबई बंदरातं महत्व पुरेपूर समजलं होतं असलं तरी, त्यांचा व्यापार उदीम आणि राज्य वसई परिसरात सामावलेलं असल्यानं, त्यांचं मुंबई द्विपसमुहाकडे तसं दुर्लक्षच होत होतं. इथली सर्वच बेटांवरील जमिनी त्यांनी विविध पोर्तुगिज कुटुंबांना भाड्याने दिली होती. या लोकांनीच आपापल्या बेटांचं संरक्षण करण्याची अटं त्यांनी या भाडेकरुना घातली होती. त्यामुळेही असेल कदाचित, पोर्तुगिज सत्तेकडून मुंबई व तिची इतर सहा बेटं, इतकी दुर्लक्षित राहिली होती की, मुंबईच्या किल्ल्यावर, सन १६२६ च्या ऑक्टोबर महिन्यात, दिनांक १३ ते १५ असे तीन दिवस ब्रिटीश आणि डचांनी केलेल्या एकत्रित हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीही पोर्तुगिज सैनिक तिथे उपलब्ध नव्हता. सतत तीन दिवस ब्रिटिश आणि डचांनी मुंबई बेटावर लुटालुट आणि जाळपोळ करत अनिर्बंध धुमाकूळ घातला होता.

या हल्ल्यादरम्यानच पोर्तुगिजांनी फार लक्ष न दिलेलं मुंबई बेट आणि बंदर ब्रिटिशांच्या, विशेषतः ईस्ट इंडीया कंपनीच्या, नजरेत भरलं होतं. हे सुरक्षित बंदर काही करुन आपल्या ताब्यात असायला हवं, असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांनी त्या दिशेने खूप प्रयत्नही सुरू केले. अगदी नगद मोजून पैसे मोजून मुंबई आणि इतर सहा बेटं विकत घ्यायचीही तयारी दर्शवली, पण चतुर पोर्तुगिज त्यांना दाद देत नव्हते. परंतु शेवटी पोर्तुगाल आणि इंग्लंड यां दोन्ही देशांची परिस्थितीने अशी काही असहाय्यता निर्माण केली की, दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज भासू लागली आणि त्यातूनच सन १६६० मध्ये ब्रिटीश राजपुत्र-प्रिन्स ऑफ वेल्स-दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगिज राजकन्या कॅथरीन ब्रॅगान्झा यांचा विवाह करण्याचा घाट घातला गेला. या विवाहात पोर्तुगिजांकडून चार्ल्सला हुंडा म्हणून ५ लाखाची पोर्तुगिज चलनातली रोख रक्कम ( ही रक्कम काही पुस्तकातून वेगवेगळी दिलेली आहे), आफ्रिका खंडातल्या मोरोक्को या देशातलं ‘टॅंजिअर’ हे शहर आणि ‘मुंबई’ बेट देण्याचं ठरलं. या बदल्यात ब्रिटिशांनी पोर्तुगिजांना डचांविरुद्धच्या लढाईत सहाय्य करावं, अशा अटी असलेला कॅथरीन-चार्ल्सच्या विवाहाचा करार -Marriage Treaty – दिनांक २३ जून १६६१ रोजी करण्यात आला.

इंग्लंड आणि पोर्तुगीजांमध्ये झालेल्या विवाहाच्या करारनुसार, दिनांक २१ मे १६६२ या दिवशी चार्ल्स आणि कॅथरीन या दोघांचा इंग्लंडमध्ये विवाह संपन्न झाला आणि करारानुसार दिनांक १८ फेब्रुवारी १८६५ या दिवशी मुंबई ब्रिटिशांची झाली (अर्थात, पोर्तुगिजांनी मुंबई सहजासहजी ब्रिटिशांच्या ताब्यात दिली नाही. करार झाल्यापासून पुढची तब्बल चार वर्ष पोर्तुगिजांनी मुंबई ताब्यात देण्यासाठी ब्रिटिशांना झुंजवलं होतं) आणि इथून पुढे आज दिसणाऱ्या अत्याधुनिक मुंबईची पायाभरणी होण्यास सुरुवात झाली.

पुढच्या तीनच वर्षात, म्हणजे दिनांक २७ मार्च १६६८ रोजी, इंग्लंडचा राजा चार्ल्स याने मुंबई ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीला भाड्याने दिली. आणि पुढच्या काहीच काळात मुंबईत ब्रिटीश कायद्यानुसारचं प्रशासन आणि न्यायव्यवस्था सुरु झाली. गोदी सुरू केली. जमिनिंचं व्यवस्था लावली. टांकसाळ सुरु केली. ईस्ट इंडीया कंपनीची सुरतेतली वखार मुघल, पोर्तुगिज यांच्या सुरतेतल्या वावरामुळे असुरक्षित वाटू लागली होती. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील छाप्यामुळे त्या असुरक्षेत आणखीणच भर पडली. पुढच्या काळात आपलं हित आणि व्यापार सुरतेत धोक्यात येऊ शकतो असा विचार करुन, सन १६८७ मधे ईस्ट इंडीया कंपनीने आपले सुरतेचे मुख्यालय मुंबई इथे हलवलं. आणि पुढच्या काही दशकातच मुंबईचा प्रवास ब्रिटिश साम्राज्याची पूर्व्कडील राजधानी होण्याच्या दिशेने सुरु झाला.

ब्रिटिशांनी मुंबईच्या फोर्ट विभागाची आखणी, त्यांची राजधानी म्हणूनच केली होती. तिथल्या भव्य-देखण्या इमारती, लांब-रुंद रस्ते व फुटपाथ, रस्त्याच्या कडेची झाडं असं सार काही त्यामुळेच निर्माण झालं होतं. आपण अजुनही त्याचा उपभोग घेतो आहोत. मुंबईची ओळख म्हणून ‘गेट वे ऑफ इंडीया’चं चित्र आजदेखील दाखवलं जातं. हे गेट केवळ मुंबईत प्रवेशाचच प्रतिक नाही;तर भारत देशाकडे जायचाही तो मार्ग आहे, याचंही ते प्रतिक आहे. देशाच्या पोटात शिरायचा या इवल्याश्या मुंबैमधून जातो आणि त्यासाठी कारणीभूत ठरली ती, कॅथरीन..! कॅथरीन, द इन्फन्टा ऑफ पोर्कुगाल..!

म्हणूनच, मुंबई शहराच्या इतिहासातली कॅथरीन ऑफ ब्रॅगान्झा एकमेंव महत्वाची महिला. ‘एकमेंव महत्वाची महिला’ असं म्हणण्याचं कारण इतकंच की, जर तिचा विवाह ब्रिटिश राजाशी झालाच नसता, तर मुंबईची बेटं ब्रिटिशांकडे आलीच नसती आणि तशी ती आलीच नसती आणि ती तशी आलीच नसती तर..? तर कदाचित आजच्या स्वरुपातली, देशाची लक्ष्मी आणि मुंबैकरांची अन्नपूर्णा असलेली आपली मुंबई उदयाला आलीच नसती..!

मुंबईच्या बाबतीत कॅथरीनचं महत्व म्हणजे, तिच्या लग्नात तिचा हुंडा म्हणून मुंबईप्रमाणेच मोरोक्कोमधलं ‘टॅजिअर’ हे ठिकाणही पोर्तुगिजांकडून ब्रिटिशांना देण्यात आलं होतं. परंतु पुढे काही काळतच त्यांना हे बेट सोडून द्यावं लागलं होतं. तिच्या लग्नात पाच लाख क्रुसेडोंची रोख रक्कमही देण्याचं ठेरलं होतं. मात्र ती ही रक्कम पूर्ण दिली गेली नाही. पैशांच्या चणचणीत असलेल्या कॅथरीनच्या नवऱ्याला, म्हणजे दुसऱ्या चार्ल्सला लग्नानंतर काहीच काळात, त्यांच्या ताब्यात असलेलं ‘डंकर्क’ हे सुप्रसिद्ध ठिकाण फ्रेन्चांना विकावं लागलं होतं. म्हणून इंग्लंडमधे कॅथरीन-चार्ल्सच्या लग्नानंतरच्या काही काळातच, लंडनकरांनी हेटाळणीच्या सुरात, ‘Three sights to be seen Dunkirk, Tangier, and a Barren Queene’ अशा अक्षरात रंगवलेली कमान लावली होती.

यातला Barren Queen हे शब्द, कॅथरीनने हुंड्यात आणलेल्या इतर दोन गोष्टी ब्रिटिशांना मिळाल्याच नाहीत आणि मिळालेलं मुंबई हे ओसाड बेट होतं. म्हणजे राणीने कागदावर भरभक्कम हुंडा आणला असं दिसत असलं तरी, प्रत्यक्षात हातात काहीच मिळालं नव्हतं. या अर्थाने आले आहेत. म्हणून ती बॅरन क्वीन.

परंतु बॅरन क्वीन म्हणून प्रथम हेटाळलं गेलेलं ‘पोर्ट ॲंड आयलंड ऑफ बॉम्बे’ हे एकमेंव ठिकाण मात्र ब्रिटिशांकडे टिकून राहिलं. नुसतं टिकूनच राहिलं नाही, तर ते प्रथम ब्रिटिशांना आणि नंतर आपल्याला फळलं. त्याने दोघांनाही भरभरून दिलं. अजुनही देते आहे..!

कॅथरीनला उद्देशून लिहिलेले गेलेले बॅरन क्वीन हे शब्द, दुर्दैवाने भविष्यातही खरे ठरले. तीच वैयाक्स्तिक आयुष्य तेवढं सुखकर नव्हत. नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा, पोटी धरलेला गर्भ न टिकण ही तिची दु:ख होती. तिचे चार गर्भपात झाले. ती ब्रिटनच्या गादीला वारस देऊ शकली नाही..नवरा चार्ल्सच्या निधानंतर ती माहेरी पोर्तुगालला निघून गेली आणि तिथेच तिचा अंत झाला.

‘लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते’ ह्या बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळीसारखी, ‘आजच्या मुंबईसाठी, कॅथरीन सासरी गेली’ असं वाटावं अशी तिच्या ‘प्रेम विरहीत’ लग्नाची (होय. हे एक loveless marriage किंवा ‘राजकीय तडजोड’ होती.) कहाणी आहे. त्यामुळे, ‘मुंबईसाठी महिलांचं योगदान काय’, या प्रश्नाचं उत्तर, मुंबई उजेडात आली, तिच मुळी एका महिलेमुळे. असं असताना मुंबईतलं महिलांचं योगदान काय, हा प्रश्नच मला फिजूल वाटतो..!

आणि हो, एक गंम्मत सांगायचीच राहिली. आजचं आपलं लोकप्रिय पेय  ‘चहा’ हे प्रथम मुंबईत आणण्यासाठी आणि नंतर मुंबैसाहित देशभरात लोकप्रिय होण्यासाठी कॅथरीनच कारणीभूत झालेली आहे..!

कॅथरीन सोबतच तिला समकालीन असलेल्या आणखी एका स्त्रीचा उल्लेख मला टाळता येणार नाही. ती म्हणजे ‘दोना इग्नेस डी मिरांडा’ ही..! ही डोम रोड्रीगो डी मोन्सोन्टो याची विधवा. मोन्सोन्टो याचं निधन झाल्यावर, मुंबई बेट ही त्याची ‘प्रोपार्ती इग्नेस्च्या नांवे झाली. मालमत्तेच्या मालकीच्या कागदपत्रात इग्नेसचा उल्लेख, ‘लेडी ऑफ द आयलंड (Senhora da Illha) असा केलेला होता.

हिचं महत्व तसं काहीसं दुय्यम असलं तरी, महत्वाचं आहे. ही स्त्री तशी दुर्लक्षितच राहीली आहे. हिच्याविषयी फारशी माहितीही मिळत नाही. माझ्या दृष्टीने हिचं महत्व म्हणजे, पोर्तुगिजांची मुंब ब्रिटिशांच्या ताब्यात गेली, ती हिच्या साक्षीने आणि हिच्याच घरात. ही संपूर्ण मुंबई बेटाची त्या वेळची वंशपरंपरागत मालकीण होती आणि तिचं राहातं घर म्हणजे, मुंबईचा सुप्रसिद्ध ‘फोर्ट’. किल्ला. बॉम्बे कॅसल..!

दिनांक १८ फेब्रुवारी १६६५ रोजी दोना इग्नेस मिरांडा यांच्या या घरात, मुंबई बेटं पोर्तुगिजांकडून इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा समारंभ झाला(ह्या घराला इथे घर जरी म्हटलं असलं तरी, १६६१ मधे मस्कतच्या अरबांनी, मुंबई बेटावर केलेल्या हल्ल्यात हे घर उध्वस्त झालं होतं. नंतरच्या काळातही याची फार दुरुस्ती केली गेली नव्हती. वर छप्पर असलेल्या चार पडक्या भिंती, त्या भिंतीवरच्या चार जुनाट तोफा आणि खालची जमिन एवढाच ऐवज उरला होता). ‘मुंबई आता ब्रिटिशांची झाली’ याचं प्रतिक म्हणून, याच घराच्या आवारातले दगड आणि माती पोर्तुगिज अधिकाऱ्यांनी, मुंबईचा नवनियुक्त ब्रिटिश गव्हर्नर हंफ्रे कूकच्या हातात ठेवली.इग्नेस मिरांडाच्या त्या जुनाट घराचंच रुपांत पुढे ब्रिटिशांनी त्यांच्या जगप्रसिद्ध किल्ल्यात-फोर्टमधे-केलं. आज त्या फोर्टचे काही अवशेष, एशियाटीक लायब्ररीच्या मागच्या बाजूच शिल्ल्क आहेत. परंतु, तो भाग नौसेनेच्या ताब्यात असल्याने, ते कुणाला पाहाता येत नाहीत. असं असलं तरी, ‘फोर्ट, मुंबई ४००००१’ या त्या परिसराच्या पत्त्यात अजुनही अस्तित्वात आहे.

दोना इग्नेस मिरांडा यांचा उल्लेख करण्याचं कारण एवढंच की, मुंबई बेट आणि त्यावरचं मिरांडा बाईंचं घर ताब्यात घेण्यापुर्वी, पोर्तुगिजांनी ते घर तिच्या इच्छे विरुद्ध ताब्यात घेऊ नये अशी अट घातली होती. तिच्या मृत्युपर्यंत सदरचं घर तिच्या ताब्यात राहील आणि तिच्या पश्चात तिच्या वारसांकडून ते घर, त्या वारसांची इच्छा असल्यास, त्यांना योग्य तो मोबदला देऊनच ताब्यात घ्यावं, असंही त्या अटीत म्हटलं होतं. परंतु मिरांडाबांईंनी फारसे आढेनेढे न घेता किल्ल्यावरील आणि मुंबई बेटावरील आपला अधिकार आणि ताबा, ब्रिटिशांनी जो मोबदला दिला, त्या बदल्यात सोडून दिला.

हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे, मुंबईच्या इतर चार बेटांवरच्या नागरिकांनी, मुंबईची बेटं, पोर्तुगिजांकडून इंग्रजांकडे जाण्यास जितका कडवा विरोध केला होता, तितका मिरांडाबाईंनी केलेला दिसत नाही. तत्कालीन मुंबईकरांच्या त्या विरोधाची कारणंही होती आणि ती त्यांच्या आणि त्या काळाच्या दृष्टीने बरोबरही होती. मात्र प्रस्तुत लेखाचा तो विषय नसल्याने, त्यावर उहापोह करणं स्थानोचित होणार नाही..।

जर मिरांडाबाईंचं घर ब्रिटिशांना ताब्यात मिळालंच नसतं तर, मुंबईचा सुप्रसिद्ध ‘फोर्ट’ अन्यत्रच कुठेतरी उभा राहिला असता आणि कदाचित मुंबईच्या इतिहासाला वेगळंच वळण मिळालं असतं..! शेवटी स्थानमहात्म्यही असतंच की..!!

येताना थोडंसं वेगळं. स्त्री शक्ती बाबतचं . विशेषतः श्रद्धावान मुंबैकरांसाठी..!

ह्या लेखाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत उल्लेख केलेल्या स्त्रिया, त्यांच्या नांवांची इतिहासात नोंद असेल किंवा नसेल, प्रत्यक्षात होऊन गेलेल्या आहेत. या पुढच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या स्त्री शक्ती मात्र अजुनही अस्तित्वात आहेत, असं प्रत्येक श्रद्द्धावान मुंबईकरांना वाटतं. त्यांच्या मनात त्यांना असीम श्रद्धेचं स्थान आहे. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय, मुंबईच्या जडण घडणीत महिलांचं स्थान काय’ ह्या लेखाला पूर्णत्व येणार नाही.

असं मानतात की, समुद्राने वेढलेल्या या बेटांवर, किनारपट्टीच्या आधाराने पहिली वस्ती झाली, ती मासेमारी करुन उदर निर्वाह करणाऱ्या कोळ्यांची. मुंबईच्या सात बेटांमधलं, आकाराने मोठ असलेल बेट म्हणजे ‘मुंबई’. या मुंबई बेटावर वस्ती केलेल्या कोळ्यांचं दैवत असलेल्या ‘मुंबादेवी’वरून ‘मुंबई हे नांव प्राप्त झालं, अशी बहुसंख्य मुबैकरांची श्रद्धा आहे..!

श्रीमुंबादेवी

अतिशय प्राचिन असलेलं मुंबादेवी हे दैवत, समस्त मुंबईकरांचं ग्रामदैवत आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात तिच्या नांवाची ओटी आवर्जून भरली जाते. लग्न झाल्यानंतर मुंबईकर नवीन जोडपं मुंबादेवीच दर्शन घेतंच घेतं. मुंबादेवी मुंबईची रक्षणकर्ती आहे, पोषणकर्ती आहे, अशी बहुसंख्य मुंबईकरांची श्रद्धा आहे.

महाराष्टार्तील प्रत्येक ठिकाणी एकेका दैवताची सत्ता असते. तशी मुंबईवर सत्ता चालते, ती श्रीमुंबादेवीची. मुंबादेवी ही मुंबईची सम्राज्ञी. तिने तिच्या, महालक्ष्मी, प्रभादेवी, शितलादेवी या इतर बहिणींना, प्रत्येक बेटावर आणि बेटवासियांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी इलाखे वाटून दिले आहेत. महालक्ष्मीची हद्द प्रभादेवीला संपते आणि प्रभादेवीची हद्द शितलादेविला..!

या व्यतिरिक्त या चौघा बहिणींनी, त्यांच्या आणखी धाकट्या बहिणींना लहान लहान इलाखे वाटून दिले आहेत. त्यात काळबादेवी, वाळकेश्वरची गुंडीदेवी, गिरगावातली गांवदेवी, वरळी कोळीवाड्याची गोलफादेवी इत्यादी. स्त्री कुळात जन्म घेतलेल्या ह्या अयोनिज देवता मुंबईच्या रक्षणकर्त्या आहेत, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची श्रद्धा आहे. त्या आहेत म्हणून आपणही आहोत, असं बहुतेक सर्वच श्रद्धाळु मुंबैकर मानतात..!

तसे मुंबईत पुरुष कुळातले देवही आहेत. जसे घोडपदेव, ताडदेव, परळचा बारादेव इत्यादी. पण ते बिचारे, ह्या ‘देविराज्यात’ आपापल्या देवळातच शांत बसून आहेत. त्यांची सत्ता त्या रावळापुरतीच. अहो, महाराष्ट्रातली पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर इत्यादी मोठ्या शहरांच्या मांदियाळीत, ‘मुंबई’ ही एकमेंव ‘ती’ आहे. मुंबई घडली ती स्त्रियांमुळेच, या साठी दुसरा अन्य पुरावा कशाला हवा..!

मुंबईच्या काय किंवा भारताच्या काय किंवा जगाच्या काय, इतिहासाच्या बखरींमधे महत्वाचं स्थान दिलं गेलंय ते पुरुषांना. इतिहासासाठी असलेला इंग्रजी शब्द ‘His-story’ हा तेच दर्शवतो. इतिहास म्हणजे His Story असेल, तर त्यात Her ला स्थान नाहीच. असं असलं तरी, इतिहासावर आपला ठसा उमटवणाऱ्या त्या पुरुषांना जन्म देणाऱ्या आणि घडवणाऱ्या स्त्रियाच होत्या, हे विसरुन कसं चालेल. त्या नसत्या तर, इतिहास घडवणारे म्हापुरुष जन्माला तरी आले असते काय?

शिवरायांचं अस्तित्व जिजाऊंमुळे(च) होतं, हे एकदा मान्य केल्यावर, मुंबईच्या इतिहासात काय किंवा जगातल्या इतर कुठल्याही प्रांताच्या इतिहासात काय, ‘स्त्रियांचं योगदान काय’ हा प्रश्न अप्पलपोटा वाटू लागतो नाही?

-नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

08.03.2022

One thought on “‘मुंबई आणि तिला घडवणाऱ्या स्त्रीया’

  1. कल्पनाशक्तीच्या बाहेर माहिती मिळाली.
    .
    हा लेख लिहीण्यासाठी किती दिवस लागले?
    प्रचंड मेहनत,सुक्ष्म अभ्यास………अचाट सर..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s