‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?


‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?

मुंबईच्या दक्षिण-मध्या विभागातील ‘माजगांव’ या भागाच्या नांवाच्या जन्माबद्दल माझ्या मनात सुरुवातीपासूनच कुतुहल होतं. हे नांव या विभागाला कसं प्राप्त झालं असावं, याचा मी मला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांच्या मदतीने, माझ्यापरिने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे नांव कसं पडलं त्या विषयी सध्या प्रचलित असलेल्या व्युत्पत्तींचाही या लेखात विचार केलेला आहे. नवीन व्युत्पत्ती मांडताना तर्काचा उपयोग केलेला आहे. त्यातून मला पटलेली नवीन व्युत्पत्ती आपल्यासमोर मांडलेली आहे. परंतु त्या विषयाकडे जाण्यापुर्वी, माजगांवच्या इतिहासातून एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे.

ह्या लेखात, वर म्हटल्याप्रमाणे, प्रथम माजगांवच्या इतिहासाची थोडक्यात उजळणी करुन, नंतर ते नांव कसं पडलं असावं, याची चर्चा केली आहे.

इतिहासातलं माजगांव दक्षिण मध्य मुंबईतलं एक महत्वाचं ठिकाण. एकेकाळी मुख्य मुंबई बेटाची उत्तर हद्द माजगांवला लागुनच होती. मध्ये फक्त उमरखाडीचं पात्र. आता ह्या ठिकाणी डोंगरी भाग असला तरी, त्या काळी हो माजगांवचाच भाग होता.

हळू हळू ह्या माजगांवचं महत्व कमी होऊ लागलं आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतले जुने मुंबैकर ‘वाडीया’तून अवतरले असले तरी, आद्य मुंबैकरांनी ‘भाऊच्या धक्या’वरून मुंबैत प्रवेश केला होता. भाऊचा धक्का आणि माजगांव म्हणजे आई-पोराचे नातं. भाऊच्या धक्क्याचा उंबरा ओलांडून पोटासाठी मुंबईत आलेल्या चाकरमान्यांनी पुढे मुंबैच्या औद्योगिक क्षेत्रात जान आणली आणि मुंबई देशाचं बडं औद्योगिक केंद्र बनवलं. ह्याचं बरचसं श्रेय माजगांवचं.

भाऊचा धक्का..

त्या काळात पैशाची निर्मिती ह्या भागात होत होती. ह्या संपत्ती निर्माणाचं मुख्या यंत्र होतं इथल्या गोद्या. मुख्य मुंबईच्या अगदी कुशीतला हा भाग गोद्यांचा. मुंबई शहरातल्या वाडी बंदर, फ्रिअर बंदर (लोकभाषेत ‘फेर बंदर’ ), प्रिन्सेस डॉक, विक्टोरिया डॉक, इत्यादी महत्वाच्या गोद्या अजूनही इथेच आहेत. देशाच्या काना-कोपऱ्यातून नाना तऱ्हेचा कच्चा माल मुंबईत यायचा, तो इथेच. आणि मुंबैतल्या गिरण्या-कारखान्यांचून पक्का होऊन पुन्हा परदेशी जायचा, तो ही इथुनच. मुंबईचा ‘माजगाव डॉक’ तर आपल्या नावातच ‘माजगांव’ मिरवतोय. एकेकाळी ह्या गोद्यांमध्ये जगभरातून माल इथे यायचा आणि मग तो मुंबईभर जायचा, मुंबई शहरची औद्योगिक चाकं फिरायची, ती इथून येणाऱ्या मालाच्या इंधनावर. तिथून पैशांची, संपत्तीची निर्मिती व्हायची. आज इथली आवक जावक मंदावलीय. एकेकाळी मुख्यत: गोदी आणि गिरणी कामगारांची वस्ती असलेला हा भाग आता हळूहळू उच्चभ्रू होऊ लागलाय.

माजगांव मला माहित होतं. तिकडे जाणं-येणंही होतं. तिथे अजुनही टिकून असलेल्या ‘म्हातारपाखाडी’ नावाच्या गांवात मी जाऊन आलो होतो. अजुनही सोळाव्या शतकातच थांबलेलं आहे, असं वाटायला लावणारं ते गांव, त्याच्या हद्दीत शिरताच आपल्यालाही त्या काळात आपसूकपणे घेऊन जातं. ताडवाडी, नारळवाडी, अंजीरवाडी, सिताफळवाडी अशी अस्तल देशी नांव धारण करणाऱ्या लहान-मोठ्या वाड्यांचं माजगांव, मुंबईसारख्या महानगराच्या पोटातलं एक शांत-सुंदर गांव होतं. होतं म्हणजे आता-आतापर्यंत होतं. आता विकासाच्या भस्मासूराची काळी छाया त्यावरही पडू लागलीय..!

म्हातारपाखाडी गांवातलं एक टुमदार घर

इतिहासाच्या पुस्तकात माजगांव मला पहिल्यांदा भेटलं ते, पोर्तुगिज आमदानीतील मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना. सन १५३३-३४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शाह यांने मुंबईची सात बेटं पोर्तुगिजांच्या ताब्यात दिली आणि तेंव्हापासून माजगांव मुंबईच्या इतिहासात सापडत जातं.

अर्थात त्यापुर्वीही माजगांव आता आहे तिथेच होतं, मात्र त्याचा उल्लेख सापडत नाही. १३ व्या शतकातल्या राजा बिंबाच्या काळातल्या ‘महिकावतीची बखरी’त माहिमचा उल्लेख आहे. परळचा आहे, भायखळ्याचा आहे आणि वाळकेश्वराचाही आहे, मात्र माजगांवचा नाही. त्यांनतर मुंबईवर असलेल्या मुसलमानी अंमलातही माजगांवचा उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो ठळकपणे येतो, तो पोर्तुगिज आणि त्यानंतरच्या ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या काळात..!

मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेलं इतिहासातलं माजगांव जेंव्हा पोर्तुगिजांच्या ताब्यात आलं, तेंव्हा ते होतं मात्र अत्यंत टुमदार. समुद्रात पाय सोडून बसलेल्या छोटेखानी टेकड्या, खडकाळ समुद्रकिनारा, आंब्यांची आणि नारळीची घनदाट झाडी असं त्याचं साधारण स्वरूप होतं. मुंबईच्या सातही बेटांवरचे मूळ रहिवासी जसे कोळी, तसे माजगांवचे मूळ रहिवासीही कोळीच. राजा बिंबासोबत आलेले काही भंडारी, आगरी, तर तुरळक प्रमाणात मुसलमान. मुख्य धंदा मासेमारी. थोडीशी भातशेती. आंब्या-नारळाची लागवड. माजगांवचे आंबे फार प्रसिद्ध होते असं म्हणतात. असंही म्हणतात की, एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर अशी वर्षातून दोनदा फळं देणारी आंब्यांची झाडं माजगांवात होती. अजुनही त्यातली काही टिकून असावीत.

पोर्तुगीजांच्या ताब्यात आलेल्या मुंबईच्या, कुलाब्याची दोन बेटं वगळता, पांचही बेटांवरची जमिन पोर्तुगीज राजाने, पोर्तुगीज कुटुंबांना, चर्चना अथवा सैन्यात विशेष मर्दुमकी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना वार्षिक अथवा त्रैवार्षिक भाडे पट्ट्याने दिलेली होती. तसंच माजगावबाबतही झालं होतं. मात्र मुंबईची इतर बेटं आणि माजगांवचं बेट, यात दोन मोठे फरक होते. पहिला म्हणजे इतर बेटांवरची जमीन अनेक जणांमध्ये विभागून भाड्याने दिली होती. तर माजगावचं संपूर्ण बेटच सन १५४७-४८ मधे कॅप्टन अंतोनिओ पेसो (Antonio Pessoa) या सैन्याधिकाऱ्याला भाड्याने दिलेलं होत. दुसरा फरक म्हणजे, इतर बेटांवरच्या जमिनी सारखी माजगांव बेटाची भाडेपट्टी वार्षिक अथवा ठराविक मुदतीची नसून, ती वंशपरंपरागत मालकीने अंतोनिओ पेसो ला दिलेली होती. संपूर्ण बेटच वंशपरंपरागत भाड्याने दिलेलं मुंबईतलं माजगाव हे एकमेंव बेट.

अंतोनिओ पेसोने या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्याच्या आवारात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या दैनिक पूजेसाठी लहानसं ‘चॅपल’ बांधलं. सण १५४८ पासूनचा पुढच्या काळात माजगांवात असलेल्या कोळी, भंडारी आणि आगरी लोकांबरोबरच इथे पोर्तुगिजांचीही भर पडली. ते संख्येने फार नव्हते, पण ‘ख्रिश्चन’ होते. राज्यकर्ते असल्यामुळे त्यांची हुकूमत बेटावर चालत होती. इथे असलेल्या स्थानिक कोळी-भंडारी आणि आगरी यांचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचं काम या काळात सुरू झालं. माजगवतल्या त्या काळातल्या प्रजेवर हळूहळू पोर्तुगीज प्रभाव वाढू लागला. राज्यकर्त्यांचा प्रभाव प्रजेच्या सर्वच अंगावर पडतो. तसा तो हळूहळू इथेही पडला. धर्मांतरं घडली, धर्म बदलल्याने इथल्या रहिवाशांना नवीन पोर्तुगीज पद्धतीची नावं -आडनावं मिळाली. तिथल्या मूळ रहिवाशांच्या खाण्यात आणि पेहेरावातही त्या अनुषंगाने बदल झाला, क्रॉस-चर्च उभी राहू लागली.

‘ख्रिश्चनां’ची संख्या जशी वाढू लागली, तशी पेसोच्या घराच्या आवारातलं चॅपल पूजेसाठी अपुरं पडू लागलं. म्हणून त्या ठिकाणी सन १५९६ मध्ये चर्च बांधण्यात आलं. १५४८ मध्ये बांधलेलं चॅपल आणि त्याच जागी १५९६ मध्ये बांधलेलं चर्च म्हणजे, आज भायखळ्याला दिसणाऱ्या ‘सेंट ग्लोरिया चर्च’चं मूळ स्थान. सन १९११-१२ च्या दरम्यान भायखळ्याला सध्या दिसणाऱ्या जागी ‘सेंट ग्लोरिया चर्चचं स्थानांतर झालं त्यालाही १०० वर्ष होऊन गेलीत.

माजगांवचं मूळ ग्लोरिया चर्च..
भायखळ्याचं ग्लोरीया चर्च

मूळच्या चॅपलची जागा १९१० मध्ये पोर्ट ट्रस्टने ताब्यात घेतली आणि त्या जागेवर १९२४ साली ठिकाणी ‘अँडरसन हाऊस’ नांवाचं पोर्ट ट्रस्ट अधिकाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात आली. आजही ही इमारत तिथे उभी आहे. तिच्या सोबतीला ‘सागर-दर्शन’, ‘सागरिका’ आणि तृष्णा १ व २ अशा इमारती कालांतराने बांधल्या गेल्या. अंतोनिओ पेसोने बांधलेल्या चॅपलमधला ‘क्रॉस’ सध्या, ‘अँडरसन हाऊस’पासून जवळच असलेल्या ‘चर्च स्ट्रीट’ या रस्त्यावर उभा आहे. हा क्रॉस १९२६ साली या ठिकाणी हलवला गेला.

मुंबईच्या इतर बेटांच्या तुलनेत माजगावचा इतिहास फार मोठा आहे. इतका मोठा आणि महत्वाचा आहे की, १९७६ साली आणल्या गेलेल्या ‘दी बोंबे सीटी लँड रेव्हेन्यू अॅक्ट’ मध्ये ‘माजगाव इस्टेट’ आणि तिची वंशपरंपरागत मालकी यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलेलं आहे. या मोठ्या इतिहासाचा संपूर्ण आढावा या लेखात घेता येणं शक्य नाही आणि या लेखाचा तो उद्देशही नाही.

इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर, ‘माजगांव’ हे नांव या बेटाला/भागाला कसं प्राप्त झालं असावं, ते सांगणं आहे. आता तिकडे वळू.

या भागाला ‘माजगांव’ नांव कसं मिळालं, त्याबद्दल दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पहिली म्हणजे, इथे मिळणाऱ्या विपूल माश्यांमुळे या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ म्हणत आणि या मत्स्य ग्राम शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे ‘मच्छ ग्राम’, ‘मासे गांव’ आणि शेवटी ‘माजगांव’ असं नांव रुढ झालं, ही..!

दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते, ती म्हणजे ‘माझं गांव’ या शब्दप्रयोगापासून या बेटाला ‘माजगांव’ हे नांव पडलं. वर वर पाहाता या दोन्ही व्युत्पत्ती पटण्यासारख्या आहेत आणि त्या जनमाणसात रुढही झाल्या आहेत. मात्र थोढा अधिक विचार केला असता, त्या तेवढ्याशा बरोबर नाहीत, असं लक्षात येते. मला असं का वाटतं, ते एक एक करुन सांगतो.

पहिली व्युत्पत्ती सांगते की, या बेटावर मासे मुबलक मिळत किंवा हा कोळ्यांचा गांव म्हणून या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ म्हणत आणि तेच नांव कालांतराने ‘माजगांव’ म्हणून प्रचलित झालं. ही व्युत्पत्ती विचारांती पटण्यासारखी नाही. कारण मुंबईच्या सर्वच बेटांवर मूळ वस्ती कोळ्यांचीच होती आणि मुख्य धंदा मासेमारी होता. मग त्या बेटांनाही ‘मत्स्य ग्राम’ किंवा तत्सम नांव न पडता मुंबई, परळ, माहिम, वरळी अशी वेगवेगळी नांव का पडली, ह्याचं उत्तर सापडत नाही.

ही व्युत्पत्ती न पटण्याचं दुसरं कारण म्हणजे, कोणत्याही ठिकाणाला नांव कशावरुनही प्राप्त होवो, ते असतं तिथल्या रहिवाशांच्या भाषेतलं किंवा बोलीतलं. मग ते त्या ठिकाणच्या एखाद्या वैशिष्ट्यावरून पडलेलं असो किंवा आणखी कशावरुनही. ‘मत्स्य ग्राम’ हा शब्द संस्कृत. माजगांवातली मूळ वस्ती जर कोळ्यांची असेल (आणि ती होतीच) तर ते संस्कृत कसं बोलत असतील, हा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणच्या कोळ्यांची स्वतःची अशी बोली आहे. आजही ती बोली बोलली जाते. मग त्यांनी स्वतःच्या गांवाला स्वतःच्या भाषेतला शब्द न योजता, त्यांना ज्या भाषेचा गंधही नाही, त्या भाषेतला शब्द आपल्या गांवाला का दिला असावा, असाही प्रश्न उभा राहातो.

बरं, अन्य कुणी या बेटाला ‘मत्स्य ग्राम’ असा शब्द दिला असं गृहित धरलं तर, मग कुणी, असाही प्रश्न निर्माण होतो. संस्कृत ही शिक्षित लोकांची भाषा आणि १३ व्या शतकात जे शिक्षित लोक राजा बिंबासोबत माहिमला आले, त्यांची वस्ती होती ती मुख्यत्वे माहीम आणि परळ बेटावर. या बेटांवरही कोळी आणि मासेमारी होतीच. मग या बेटांना त्यांनी ‘मत्स्य ग्राम’ असं नांव का दिलं नाही, या प्रश्नाचंही उत्तर मिळत नाही.

माहिमचा राजा बिंबाची कथा सांगणाऱ्या ‘महिकावतीची बखर’ या पुस्तकात परळचा उल्लेख आहे. भायखळ्याचा आहे. वाळकेश्वरचा आहे. साष्टीतल्या वांद्र्याचा आहे. जुहू-वेसाव्याचाही आहे. मात्र माजगांवचा नाही. नाही म्हणायला या बखरीत मुंबई, ठाणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील एकूण ३९६ गांवांची नावं दिली आहेत, त्यात २६३ व्या क्रमांकावर ‘माजगांव’चा उल्लेख आहे. पण ते माजगांव नेमकं कुठलं, ते दिलेलं नाही.

वरच्या परिच्छेदात ‘ते माजगांव नेमकं कुठलं’ असं जे म्हटलंय, त्वामागे कारण आहे. कारण महाराष्ट्रात ‘माजगांव’ नांव धारण करणारी एकूण ‘चार गांवं आहेत. सातारा जिल्ह्यातल्या चाफळ नजिक एक माजगांव आहे. , कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात दुसरं माजगांव आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातही एक माजगांव आहे. रत्नागिरी जिल्हा-तालुका यातंही एक माजगांव आहे. महिकावतीच्या बखरीत उल्लेख केलेलं माजगांव, हे मुंबईतलं की या चार गावापैकी, ते नक्की करता येत नाही.

‘माजगांव’ हे नांव ‘मत्स्य ग्राम’ या शब्दापासून आलं, असं क्षणभर गृहित धरलं तर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांतील तीनही ‘माजगांवां’चा समुद्राशी आणि म्हणून त्यात मिळणाऱ्या मासळीशी दुरान्वयेही संबंध नाही. मग ती नांवं कशी काय पडली, या प्रश्नावर निरुत्तर व्हावं लागतं. नाही म्हणायला रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘माजगांवा’ला संशयाचा फायदा देता येईल. पण तिथेही ‘मत्स्य ग्राम’ ते ‘माजगांव’ हा प्रवास पटत नाही. सबब, मुंबईतल्या माजगा्वचं नांव ‘मत्स्य ग्राम’ या शब्दापासून आलंय, हे मला पटत नाही.

माजगांव या नावाबद्दल दुसरी व्युत्पत्ती समोर येते ती, ‘माझं गांव’ या शब्दाची. पण हे अजिबातच पटण्यासारखं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापला गांव प्रिय असतो आणि दर वेळी आपण आपल्या गांवाचा उल्लेख ‘माझं गांव’ असाच करत असतो. म्हणून काही आपल्या गांवाचं नांव ‘माझ गांव’ असं होत नाही. त्यामुळे ह्या व्युत्पत्तीकडे समशेल दुर्लक्ष करणं योग्य..!

मुंबईतल्या ‘माजगांव’ हे नांव कसं प्राप्त झालं असावं, याचा शोध घेताना, ते नक्कीच ‘मत्स्य ग्राम’, ‘माझा गांव’ या शब्दांवरून आलेलं नसून, त्यामा काही तरी वेगळी गोष्ट वा गोष्टी कारणीभूत आल्या असाव्यात याबद्दल माझी खात्री पटत चालली, ती मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या वाचनामुळे.

मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांतून ‘माजगांव’चा उल्लेख यायला सुरुवात होते, ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरु झाला त्या काळापासून. म्हणजे सन १५३४ पासून मुंबईच्या इतिहासात माजगांव ठळकणे येत जातं. ह्या बहुतेक सर्वच पुस्तकांचं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं असल्याने, ती अर्थातच, इंग्रजी भाषेतलू आहेत. त्या पैकी एखाद-दुसऱ्या पुस्तकाता अपवाद वगळता, इतर साऱ्या पुस्तकांतून ‘माजगाव’ या शब्दाची स्पेलिंग, ‘MAZAGON ( मराठी उच्चार माझागॉन, माझागोन, माझगोन असे होऊ शकतात)’ अशी केली गेलेली आहे. ही पुस्तकं वाचताना, त्यात आलेल्या ‘माजगांव’च्या स्पेलिंगकडे सुरुवातीला माझं लक्ष गेलं नाही. ती सवयीने मी ‘माझगाव’ किंवा ‘माजगाव’ अशीच वाचत होतो. पण पुढे पुढे ही स्पेलिंग माझं लक्ष वेधून घेऊ लागली.

सुरुवातीला ही स्पेलिंगची चूक असावी असा वाटत होतं. पण जेंव्हा माझ्या वाचनात १९१४ साली डी. आर. वैद्य यांनी लिहिलेलं ‘दी बोंबे सीटी लँड रेव्हेन्यू अक्ट’ हे १८७६ साली आणल्या गेलेल्या जमीन महसूल कायद्यावरचं पुस्तक आलं, आणि त्या पुस्तकातला माजगावचा उल्लेख ‘MAZAGON’ असा केलेला दिसला, तेंव्हा मात्र माझं कुतूहल अधिक जागृत झालं. इतर पुस्तकातलं ठिक आहे. तिथे चूक झालेली असू शकते आणि पुढे त्या चुकीची पुनरावृत्तीही झालेली असू शकते. पण हे पुस्तक कायद्याचं आहे. त्यातली माहिती अधिकृत आहे आणि म्हणून ती गांभीर्याने घ्यायला हवी आहे. कायद्याचं पुस्तक लिहिताना, अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून, प्रत्येक शब्दाची काटेकोरपणे तपासणी आणि योजना केली जाते. ह्या पुस्तकातही ‘माजगांव’ची स्पेलिंग MAZAGON अशी केलेली पाहून, मला त्या स्पेलिंगमधेच ‘माजगांव’ या नावाचं उगमस्थान असावं असं वाटू लागलं आणि मी त्या दृष्टीने विचार करू लागलो.

अधिकची खात्री करावी म्हणून मी भारत सरकारच्या ‘माजगाव डॉक लिमिटेड’ या उक्रमाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि माजगांव शब्दाची स्पेलिंग तिथे तशी केली आहे, ते तपासलं. तर तिथेही MAZAGON हिच स्पेलिंग आढळली. ही भारत सरकारची संस्था आहे. तिच्या नावातही अशी चूक असूच शकत नाही. ‘माजगाव’ या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल गूढ वाढतच चाललं. म्हणून वरच्या दोन उदाहरणातील MAZAGON ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, हे इंटरनेटच्या माध्यमातून शोधायला सुरुवात केली.

आणि जसजसा मी हो शोध घेत गेलो, तसतसा mazagon ह्या शब्दाचा उगम आणि त्याचा पोर्तुगीजांशी असलेला घट्ट संबंधही उलगडत गेला. असा संबंध असणं अगदीच शक्य होतं. कारण पोर्तुगिजांची आपल्यावर काही काळ सत्ता होती. राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पेहेरावाचा, खाद्य संस्कृतिचा प्रभाव प्रेजेवर पडतच असतो. नवीन वसाहत केल्यास, त्या वसाहतीस आपली नांवं देणं किंवा तिकडची जुनी नांवं बदलून आपल्या भाषेतील वा संस्कृतितील नांव देणं, हे जगभरात घडत आलंय. उत्तरेत मुघल सत्तेचा प्रभाव तिकडच्या शहरा-गांवांच्या नांवावर पडलेला आपल्याला दिसतो. आपल्या शेजारच्या गोव्याच्या भाषेवरही पोर्तुगिज संस्कृतीचा प्रभाव आपल्याला आजंही जाणवतो. गोव्यातलं ‘वास्को’ शहराचं नांव पोर्तुगिजांनीच ठेवलेलं आहे. तसाच Mazagon या ‘माजगांव’च्या नांवावरही पोर्तुगिजांशी असलेला संबंध मला शोधाअंती उलगडत गेला.

हा संबंध पाहण्यासाठी आपल्याला आफ्रिका खंडाकडे मोर्चा वळवावा लागेल. उत्तर आफ्रिकेत मोरोक्को नावाचा एक देश आहे. ह्या देशाच्या उत्तर-पश्चिम भागात एक प्रदेश आहे. हा प्रदेश मुळचा ‘बर्बेर (Berber)’ नामक तिथल्या जमातींचा. तिकडचे आदिवासीच ते. त्या जमातींना ‘बर्बर’ हे नांव ग्रीकांनी बहाल केलेलं होतं. बर्बर या शब्दाचा साधारण अर्थ ‘जे ग्रीक नाहीत ते’ किंवा ‘Non Greek’ असा होतो. कोणत्याही आदिवासींप्रमाणे, ह्या बर्बरच्याही अनेक टोळ्या होत्या आणि त्यापैकी प्रत्येकाला वेगळी नावही होती.ग्रीकांच्या प्रभावामुळे त्यांचा सामुहीक उल्लेख ‘बर्बर’ असा केला जाई. आपण नाही का आपल्या देशातल्या दक्षिणेकडच्या राज्यांतील लोकांचा सरसकट उल्लेख ‘मद्रासी’ म्हणून करतो, तसा. ग्रीकांप्रमाणे इतर काही परकीय लोकांनीही ह्या बर्बरना वेगवेगळी नांवं दिलेली होती. त्यापैकी Amazigh, Mazyes, Maxyes, Mazaces, Mazax ही त्यापैकी काही. ह्या परदेशी प्रभावाखाली येऊन बर्बर लोकही स्वतः:चा उल्लेख Imazighen किंवा Mazigh असा करीत. बर्बर असो वा वर दिलेली चार-पांच नांवं असोत, त्याचा अर्थ ‘आदिवासी’ किंवा ‘मूळ निवासी’ असा आपण घेऊ.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी, म्हणजे साधारण १५०२ मध्ये युरोपातील पोर्तुगीज दर्यावर्दी जेंव्हा व्यापारासाठी नवीन भुमीच्या शोधात भारताच्या दिशेने निघाले होते, तेंव्हा त्यांनी त्यांना वाटेत लागलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशातील पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशावर आपला पहिला कब्जा केला. इथे राहणाऱ्या आणि स्वतःचा उल्लेख Imazighen असा करणाऱ्या बर्बराची भुमी त्यांनी ताब्यात घेतली हे लोक आपल्या स्वतःची ओळख Maziyen किंवा Mazighen अशी करुन देतात, हे लक्षात घेऊन त्या जागेचं नामकरण पोर्तुगिजांनी Mazighen असे केलं. हे नांव लिहितांना मात्र Mazagan, Mazagao असं केलं.

एखाद्या जागेच्या प्रत्यक्ष नांवात आणि ते नांव लिहिण्यात परतीयांकडून फरक पडतच असतो. नांवाचा उच्चार ऐकण्यात झालेल्या फरकामुळे लिखाणात बदलतो. आपल्याकडचं ‘शिव’चं नाही का पोरंतुगिजांनी ‘सायन’ केलं. पुढे सायन म्हणूनच प्रचलीत झालं, ते आजतागायत तसंच आहे. तसलाच हा प्रकार उत्तर आफ्रिकेतही घडला आणि जगाच्या नकाशावर पहिलं ‘Mazagao’ किंवा ‘Mazagan’ अवतरलं ते पुढची २६७ वर्ष टिकलं. पोर्तुगीज भाषेत Mazagao किंवा Mazagan या शब्दाचा स्वीकारला गेलेला अर्थ म्हणजे, बार्बाराची किंवा मूळ निवासींची भूमी.

या प्रदेशावर पोर्तुगिजांनी सन १७६९ पर्यंत, म्हणजे साधारण २६७ वर्ष राज्य केलं. सन १७६९ मधे ही पोर्तुगिज वसाहत मोरोक्कोचा सुलतान मोहोम्मद बिन अब्देल्ला (Mohommad Bin Abdallah ) ह्यांने पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतल्यावर, ह्या शहरचे नांव ‘Al Jadida” असे करण्यात आले. तोवर, म्हणजे तब्बल २६७ वर्ष तो भाग Mazagao किंवा Mazagan म्हणून ओळखला जात होता.

खरी गंमत पुढेच आहे. १७६९ मध्ये मोरोक्कोतून झालेल्या हकालपट्टीनंतर पोर्तुगीजांनी, शेजारीच खाली दक्षिणेस असलेल्या ब्राझीलची किनारपट्टी जवळ केली आणि तिथल्या अमेझॉन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर आपली नवीन वसाहत थाटली. त्यांनी या नवीन वसाहतीचं नांव ठेवलं ‘Nova de Mazagao’. म्हणजे ‘नवीन माझगाव’. आहे ना गंमत? ब्राझीलच्या ‘अमापा (Amapa)’ या राज्यात हे शहर आहे. आपण ते नकाशावर पाहू शकता.

मधल्या मोरोक्कोमधे आपली वसाहत थाटल्यानंतर, पोर्तुगीजांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे गोवा, कालिकत असे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर, इसवी सन १५३४ मधे मुंबईची बेटं त्यांच्या ताब्यात आली. ह्

या सात बेटांपैकी आकाराने वरळीच्या बेटाखालोखाल असलेलं माजगाव बेट, माहीमच्यासोबतीने त्यांचं मोठं प्रभाव क्षेत्र बनलं. ह्या छोटेखानी बेटावरचे मूळ निवासी कोळी, भंडारी, आगरी लोक पाहून, त्यांना मोरोक्कोच्या Maziyen किंवा Mazighen लोकांसोबत साम्य जाणवलं असावं आणि म्हणून त्यांच्या समजुतीप्रमाणे ह्या बेटालाही त्यांनी Mazagan, Mazagao. फक्त या शब्दातला ‘a’ जाऊन कधीतरी त्याजागी ‘o’ आला असावा आणि त्यातून Mazagon शब्द तयार झाला असावा. तोच शब्द पुढे मुंबईवरच्या इंग्रजी पुस्तकांतून कायम झाला असावा आणि मराठीत तो ‘माझगांव’ म्हणून आला असावा.

‘माजगांव डॉक’ मधला ‘Mazagon’ काय किंवा आपण लिहित असलेला ‘Mazagao (माजगांव)’ काय, दोघांचाही अर्थ एकच, इथल्या मूळ लोकांचा प्रदेश..!

मोरोक्को, मुंबई आणि ब्राझील या तिन्ही ठिकाणची, समुद्राच्या सानिध्यात वसलेली, शहरं किंवा ठिकाणं ‘माझगाव’ या एकाच नांवाची असावीत, हे त्या नांवांचा आणि पोर्तुगिजांचा असलेला संबंध दाखवीत नाहीत काय?

मुंबईच्या ‘माझगांव’चं नांव अशा पद्धतीने पोर्तुगिजांकडून बहाल केलं गेलेलं असून, त्या नावाचा आणि संस्कृत ‘मत्स्य ग्राम’ किंवा ‘मच्छ गाम’ किंवा ‘माझा गांव’ या शब्दाशी काहीच संबंध नाही, असं मला वाटतं.

©️नितीन साळुंखे

9321811091

19.03.2022

महत्वाच्या टीप-

1. माजगांवचं नांव जर पोर्तुगीजांनी दिलं असेल तर, मग मुंबईच्या इतर बेटांवरही त्यांचं राज्य होत. मग त्या बेतानं त्यांनी आपली नावं का दिली नाहीत, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि तो पडायलाच हवा. या प्रश्नाचंही समाधानकारक उत्तर देता येतं..!

पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या सात बेटांपैकी मुंबई, माहीम आणि माजगांव अशा फक्त तीन बेटांवर पोर्तुगिजांचा जास्त वावर होता. त्यातल्या माजगांवच्या नांवाची कथा आपण वर पहिलीच आहे.

दुसरं महत्वाचं बेट होतं माहीम. माहिममधेच त्यांनी १५३३-३४ मध्ये बांधलेलं, मुंबईतलं सर्वात पाहिलं ‘सेंट मायकेल’ चर्च आहे. मोहीमच नांव न बदलण्यामागे किंवा माहीमला त्यांचं नाव न देण्यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे, माहीम हे इसवी सनाच्या तेरा-चोदाव्या शतकापासूनच प्रस्थापित झालेलं नांव होत.

राजा बिंबाची तर माहीम ही राजधानीच होती. त्यानंतर आलेल्या मुसलमानी राजवटीतही माहीम महत्वाचं ठिकाण होतं. हिंदू कालखंडातलं ‘श्रीप्रभादेवी’ मंदिर आणि त्यानंतरच्या मुसलमान राजवटीतला ‘माहीमचा दर्गा’ ह्या त्या प्राचीन राजवटींच्या खुणा आहेत. आजही त्या पाहाता येतात. पूर्वीपासून प्रस्थापित असलेल्याठिकाणाचं नांव बदलण्याचं किंवा नव्याने आपलं नांव देण्याचं काहीच कारण नव्हतं.

तिसरं बेट म्हणजे मुख्य मुंबई बेट. मुंबईचं मुंबईचं मराठीतलं ‘मुंबई’ हे नांव मुंबईची ग्रामदेवता ‘श्रीमुंबादेवी’च्या नांवावरुन आलं असलं तरी, तिचं जुनं इंग्रजी नांव ‘Bombay’ ही पोर्तुगीजांची देणगी आहे, हे एव्हाना सर्वमान्य झालेलं आहे.

मुंबईच्या सुरक्षित बंदराकडे पाहूनत्यांनी ह्या बेटाला ‘Bom Baia’ असं त्यांच्या भाषेत म्हटलं. पोर्तुगीज भाषेत ‘Bom’ म्हणजे ‘उत्तम’ आणि ‘Baia’ म्हणजे ‘बे’ किंवा ‘खाडी’ किंवा ‘बंदर’.माजगांवप्रमाणे Bombay हे नांव देखील पोर्तुगीजांनी दिलेलं आहे.

2. लेखात उल्लेख असलेल्या अंतोनिओ पेसो या माजगांवच्या जमिनदारांच्या वंशवृक्षाची एक फांदी आजही आहे आणि ती आपल्या मुळांचा विविध बाजुने शोध घेत असते. त्यांच्या शोधकार्याची माहिती जिज्ञासूंना Miguel of Mazagon: A merchant from 18th-century Bombay who negotiated an Anglo-Portuguese deal या ठिकाणी वाचायला मिळू शकेल.

3. ‘Berbers’, मोरोक्को आणि ब्राझिल या दोन देशातल्या ‘Mazagao’ बाबत पुष्कळ माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आपण ती जरूर वाचावी.

4. आता यातून एक नवीन प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील ‘माजगांव’ नांवाची ती तीन-चार गांव आहेत, ती कशावरुन आली? मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर तिकडे जाऊनच शोधावं लागेल..प्रत्येक ‘माजगांव’ची व्युत्पत्ती वेगळी असू शकते.

संदर्भ – 

1. Gazetter of Bombay City & Island, Volume II, Section History;Portuguese Period- S.M. Edwards- Published in 1909-

2. Origin of Bombay- 1900- J. Garsan Da Kunha.

3. Bombay Mission History; with a special Study of the Padroado Question.-by BY ERNEST R. HULL, S. J.(Society of Jesus).

4. Bombay in the Days of Queen Anne, Being an Account of the Settlement- by John Burnell

5. Website- History of Gloria Church.

6. विशेष आभार- श्री. डेनिस बाप्टीस्टा, म्हातारपाखाडी-माजगांव आणि श्री. विद्याधर राणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट.

2 thoughts on “‘माजगांव’ हे नांव आलं कुठून?

  1. छान माहिती… अभ्यास करून लिहिली आहे .. आपलं अभिनंदन 👍

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s