लेखाच्या पहिल्या भागात आपण वाचलं की,
२४ फेब्रुवारी १९४४ रोजी इंग्लंडहून निघालेलं ‘एस. एस. फोर्ट स्टांयकीन’ जहाज ३० मार्चला कराची बंदरात पोहोचलं होतं. कराची बंदरात बोटीतलं काही सामान उतरवून झाल्यानंतर रिकामी झालेल्या जागेत, नव्याने भरल्या जाणाऱ्या सामानाकडे पाहून कॅप्टन नायस्मिथ प्रथम हतबुद्धच झाला. त्याच्या हतबुद्धतेची जागा नंतर चिडीने आणि मग असहाय्यतेने घेतली. चरफडत राहण्याखेरीज तो काहीच करू शकत नव्हता. असं काय होतं त्या सामानात?
पुढे…
कराची बंदरात बोटीतलं काही सामान उतरवून झाल्यानंतर रिकामी झालेल्या जागेत, नव्याने भरल्या सामाना जाणाऱ्या सामानात कापसाच्या ८७ हजार गासड्या, ३०० टनापेक्षा जास्त कच्च गंधक (Raw Sulphar), १० हजारापेक्षा जास्त इमारती लाकडाचे मोठे ओंडके, मोठ्या प्रमाणावर राळ (Resin), १०० पिंप भरून तेल, विविध धातूचं भंगार आणि तांदळाच्या पोती. हे कमी की काय म्हणून मासळीपासून बनवलेलं खत. ह्याची तर प्रचंड दुर्गंधी सुटली होती. हे सर्व समान भरलं गेलं बोटीतल्या दारूगोळ्याच्या आसपास. कापसाच्या गासड्या तर नेमक्या स्फोटकं असलेल्या कप्प्यातच ठेवल्या गेल्या.
आधीच प्रचंड प्रमाणावर दारूगोळ्याचा साठ असलेल्या बोटीत, कापूस, तेल, रेझिन, लाकूड इत्यादी अतिशीघ्र ज्वालाग्राही समान भरले जात असल्यचे पाहून नायस्मिथ खवळला. त्याने त्याचा विरोध प्रकट केला. त्याचा विशेष विरोध होता, तो कापसाच्या ८७ हजार गासाड्यांना. नेमक्या दारूगोल्यांच्या साठ्यावर ठेवल्या गेलेल्या ह्या गासड्या, एप्रिल-मे महिन्यामधल्या कडक उन्हामुळे आणि बोटीच्या इंजिनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने पेट घेण्याची मोठी शक्यता होती. त्यात बोटीचं इंजिन वाफेवर चालणारं कुरकुरत होतंच. त्याचा स्फोट झाला तर, कापूस आणि दारुगोळा एकदम पेट घेऊन, खणात होत्याचं नव्हतं होण्याची दाट शक्यता होती. बोटीवरचा एकहीजण वाचणार नव्हता. सर्व माहित असूनही ही आत्महत्या करण्यास भाग पाडण्यासारखंच होतं हे. बोटीवर आधीच असलेल्या तीव्र ज्वालाग्राही सामानची संपूर्ण माहिती असताना, तुम्ही कापूस, तेल आणि लाकूड ह्या बोटीवर कसं काय भरू शकता, असा सवाल त्याने कराचीतील अधिकाऱ्यांना केला. नायस्मिथच्या विरोधाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून कराचीतील अधिकाऱ्यांनी त्याला, युद्ध काळातल्या त्याच्या जबाबदारीची आठवण करून दिली. त्याच्या समाधानासाठी बोटीवर दिवस-रात्र पहारा देण्यासाठी गार्डस देण्यात आले आणि त्याला कराची बंदर सोडण्याचा आदेश दिला गेला.
३० मार्चला कराचीत पोहोचलेली बोट, ९ एप्रिलच्या सकाळी मुंबईच्या दिशेने निघाली. बोटीवरचं स्फोटक वातावरण कमी होतं म्हणून की काय, फोर्ट स्टायकीनला ज्या ताफ्यासोबत मुंबईपर्यंत जायचं होतं, तो ताफा होता इराणच्या आखातातून तेल घेऊन आलेल्या तेलवाहू जहाजांचा (Oil Tankers). आता हा चालता बॉम्ब, सोबतच्या तेलवाहू जहाजासोबतं, कडक उन्हातून, खुल्या समुद्रातून दीड-दोन हजार मैलावरच्या मुंबईकडे घेऊन जाणं, म्हणजे कोणत्याही क्षणी मृत्यूला कवटाळण्याची तयारी ठेवण्यासारखंच होतं. त्यात शत्रू बोटींकडून होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता होतीच. पण ही जोखीम पार पडावीच लागणार, याची सर्वाना खात्री झाली. त्यात बोटीवरच्या मच्छीच्या खताचा कुजलेला वास सर्वत्र भरून राहिला होता. तो प्रकारही कमी जीवघेणा नव्हता. त्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या उलट्यांनी जहाजावरचे सर्वच अधिकारी-कर्मचारी हैराण झाले होते. मुंबईपर्यंतचा प्रवास सुखरूप पार पडो, यासाठी जहाजावरील सर्वांनी आपापल्या दैवताचा धावा सुरु केला.
सुदैवाने वाटेत काही विघ्न न येता, १२ एप्रिलच्या पहाटे फोर्ट स्टायकीन मुंबई बंदरच्या बाहेर दाखल झालं आणि नांगर टाकून त्याला बंदरात ओढून नेणाऱ्या ‘पायलट’ बोटीची वाट पाहू लागलं.

खरं तर, जहाज मुंबई बंदरात पोहोचल्यापासूनच एकामागोमाग एक चुका होऊ लागल्या होत्या. चुकांची मालिकाच सुरू झाली. काहीतरी चुकतंय, हे कॅप्टन नायस्मिथच्या ध्यानात येत होतं, पण तो ही फारसं काही करु शकत नव्हता.
ज्या बोटीवर दारुगोळा आणि स्फोटकं असतात, त्या बोटींनी बंदरात पोहोचल्यावर लाल रंगाचा झेंडा (Red Flag किंवा Bravo Flag) फडकवायचा असतो, असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. ह्या लाल निशाणाचा अर्थ असतो, ‘I am taking on, discharging, or carrying Dangerous Cargo’. जहाजावर लाल रंगाचा झेंडा दिसला की, जहाजावर धोकादायक समान आहे, असा संकेत (Signal), बंदरातील अधिकाऱ्यांना मिळतो आणि त्या जहाजातलं साहित्य रिकामी करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. फोर्ट स्टांयकिनवर असा लाल झेंडा नसल्याने, पहाटेच मुंबई बंदराच्या बाहेर नांगर टाकून उभ्या असलेल्या फोर्ट स्टांयकिनची तत्काळ दखल बंदर अधिकाऱ्यांकडून घेतली गेली नाही. ही पहिली चूक.

सकाळी १०-१०.३०च्या दरम्यान जेंव्हा बंदरावरील अधिकारी फोर्ट स्टायकिनची कागदपत्र तपासण्यासाठी पोहोचले, तेंव्हा त्यांना ह्या जहाजात स्फोटकं असल्याचं लक्षात आलं आणि मग मात्र त्यांनी, कॅप्टन नायस्मिथला ‘Grave Urgency’ प्रमाणपत्र दिलं आणि त्याचं जहाज धक्क्याला लावायची परवानगी दिली. Grave Urgencyप्रमाणपत्राचा अर्थही साधारण तोच असतो, जो Red Flag चा असतो, परंतु, ह्या जहाजावरील समान त्वरित उतरवून घेणं गरजेचं आहे, असा जास्तीचा अर्थ ह्या प्रमाणपत्राचा होतो. हे प्रमाणपत्र प्राप्त होताच, फोर्ट स्टायकिनला लगेच ‘व्हिक्टोरिया डॉक’मधील, क्रमांक १ च्या धक्क्यावर आणण्याचे आदेश दिले गेले. मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर जवळपास चार-पांच तासांनी, सकाळी साधारण ११.३० वाजता, जहाज त्याला मिळालेल्या आदेशानुसार व्हिक्टोरिया डॉकचा धक्का क्रमांक १ (Berth No. 1) येथे लागलं.

फोर्ट स्टायकीन धक्क्याला लागलं खरं, पण बराच वेळ त्याच्याकडे कुणीच फिरकलं नाही. बोटीवरचं सामान त्वरीत उतरवणं गरजेचं होतं, हे माहित असुनही त्या दिशेने कोणतीच हालचाल होताना दिसेना. धक्क्यावर कुणीही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. कॅप्टन नायस्मिथ आणि त्याचा क्रू जहाजावरच असहाय्यपणे ताटकळत उभे होते. जहाजातली जोखीम जास्तीत जास्त लवकर उतरवून घेणं आवश्यक होतं. जसाजसा वेळ जात होता, तसतसा त्यांचा धीर सुटत चालला होता. जहाजावर ‘रेड फ्लॅग’ नसल्याने, शेजारी उभ्या असलेल्या जहाजांतील माल उतरवून घेणाऱ्या हमालांसाठी ते नेहेमीसारखंच एक जहाज होतं. त्यांच्या हाततलं चालू काम आटोपल्यानंतरच ते फोर्ट स्टायकीनकडे वळणार होते.
शेवटी एकदाचे बंदरावरचे जबाबदार अधिकारी फोर्ट स्टायकीनवर पोहोचले. धक्यावरच्या अजस्त्र क्रेन्स हलवून, त्या जहाजाच्या शेजारी आणून ठेवण्यात आल्या. बोटीवरच्या सामानाचे स्टोवेज प्लान्सची तपासणी करुन, बोटीतलं कोणतं सामान पहिलं उतरवायचं, त्याची नायस्मिथसोबत चर्चा केली. बोटीवर असलेल्या कापसाच्या गासड्या आणि तेलाची पिंप पहिली उतरवून घ्यायचं ठरवण्यात आलं. त्याचवेळी बोटीच्या समुद्राकडील बाजूकडून बोटीतली स्फोटकं आणि दारुगोळा उतरवून घेण्याचंही ठरलं.
इथे थोडसं विषयांतर करुन, बोटीवरील स्फोटकं समुद्राकडील बाजूने उतरवून घेण्याचं का ठरलं, ते पाहू. सन १९३९ मधे जेंव्हा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली, तेंव्हा कोणत्याही प्रकारचा दारुगोळा आणि स्फोटकं, कोणत्याही परिस्थितीत बंदरावर उतरवून घेण्यासाठी मनाई हुकूम जारी करण्यात आला होता. त्याऐवजी, अशी स्फोटकं घेऊन येणाऱ्या बोटी, दूर समुद्रात उभ्या कराव्यात आणि त्या बोटींवरील दारुगोळा लहान लहान बोटींमधे (Lighters) उतरवून घ्यावा आणि मग तो टप्प्या टप्प्याने, त्याच लहान बोटींतून गरज लागेल तसा बंदरावर आणला जावा, असा नियम करण्यात आला होता. ह्या नियमातं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. मोठ्या बोटींवरील सर्वच दारुगोळा बंदरात उतरवला आणि त्याचा स्फोट झाल्यास अथवा बंदरावर शत्रूने हल्ला केल्यास, मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी असलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन, बंदराचं आणि त्या परिसरात असलेल्या इतर जहाजांचं नुकसान होऊ नये, यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. ह्या नियमामूळे काही वेळ वाया जात असला तरी, सुरक्षिततेसाठी तो आवश्यक होता. पण जसजसं युद्ध जवळ येत गेलं, तस तसा हा नियम शिथिल करण्यात आला होता. वेळ महत्वाचा होता. म्हणून स्फोटकं आणणाऱ्या मोठ्या बोटीना धक्क्यापर्यंत येण्याची परवानगी देण्यात आली होती. फक्त स्फोटकं उतरवताना, ती धक्क्यावर न उतरवता, बोटीच्या समुद्राकडील बाजूला उतरवून घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
तर, फोर्ट स्टायकीनवरील दारुगोळा समुद्राकडील बाजून उतरवून घेण्याचं मात्र त्यासाठी ज्या लहान बोटी आणि बार्ज लागणार होते, ते दुसऱ्या दिवशीच, म्हणजे २४ तासांनंतरच उपलब्ध होऊ शकणार होते. कॅप्टन नायस्मिथ आणि जहाजाच्या फर्स्ट ऑफिसरने स्फोटकं लगेच उतरवून घेणं गरजेचं असल्याने, ती पहिली उतरवावीत असं बंदर अधिकाऱ्यांना परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिकडे साफ दुर्लंक्ष करण्यात आलं आणि २४ तास थांबावंच लागेल, असं शांतपणे सांगण्यात आलं.
बोटीवरची स्फोटकं उतरवून घ्यायला उशिर होत होता, ही दुसरी चूक घडली..! ही चूक अत्यंत गंभीर होती.
दरम्यानच्या काळात बोटीवरील इतर सामान उतरवून घेण्यास सुरुवात झाली होती. बोटीत सामान ठेवण्यासाठी असलेल्या पांच कप्प्यांपैकी, पहिला आणि दुसरा कप्पा रिकामा करण्याचं काम सुरु झालं. सर्वात पाहिलं तेलाने भरलेली पिंप धक्क्यावर उतरवण्यास सुरुवात झाली. त्याच्यासोबतच मासळीचं, भयानक दुर्गंधी येणारं खत उतरवण्यास सुरुवात झाली.
इकडे माल उतरवून घेण्याची घाई चालली असतानाच, तिकडे बोटीचा चीफ इंजिनिअर अलेक्स गो ला भेटायला Ministry of War Transport चा अधिकारी फोर्ट स्टायकीनवर आला. बोटीच्या इंजिनाच्या दुरुस्तीबाबत त्याची आणि अलेक्स्ची चर्चा झाली आणि त्याने अलेक्सला इंजिनाची दुरुस्ती करून घेण्यास परवानगी दिली. परवानगी मिळताच अलेक्स आणि त्याची टीम बोटीचं इंजिन दुरुस्तीच्या कामासाठी इंजिनरूम मध्ये पोहोचली आणि इंजिनाचा एक एक भाग सुटा करू लागली. इंजिनच खोलल्यामुळे, बोटीचा आणि इंजिनाचा संबंध तुटला आणि बोट एक इंचही पुढे-मागे हलू शकण्याची शक्यता मावळली. ही चौथी आणि गंभीर चूक झाली होती. पण ह्याला चुक म्हणताही येत नव्हती. अलेक्स त्याचं काम करत होता. पुढच्या मोठ्या प्रवासाला निघण्याआधी बोतीच्म इंजिन तंदुरुस्त असणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याने रीतसर परवानगी घेतली होती. असं असलं तरीही, पुढे जे काही घडणार होतं, त्यासाठी, बोटीचं इंजिन कार्यरत नसणं, ही बाब देखील कारणीभूत ठरणार होती.
दुसरा दिवस उजाडला. १२ एप्रिलला बंदरात आलेल्या बोटीवरचा बराचसा माल अजून बोटीवरच पडून होता. बोटीच्या २ क्रमाकाच्या कप्प्यात असलेल्या सोन्याच्या पोलादी पेट्यांना मात्र अजून हात लावलेला नव्हता. जो पर्यंत रिझर्व बँकेचे अधिकारी बोटीवर येऊन, त्याची तपासणी करत नाहीत, तोपर्यंत सोन्याने भरलेल्या ३० पेट्या खाली उतरवता येणार नव्हत्या. काही वेळात रिझर्व बँकेचे अधिकारी बोटीवर पोहोचले. त्यांनी सर्व पेट्या जहाजावर खोलून तपासणी केल्याखेरीज उतरवून घेणार नाही, असं जाहीर केलं. आता पंचाईत झाली. रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलादाच्या पेट्या जहाजावरच उघडायच्या तर, त्यासाठी वेल्डिंग मशीन आणावं लागणार होतं. आणि जहाजावर प्रचंड प्रमाणात स्फोटकं असल्याने, वेल्डिंग मशीनचा वापर करता येणार नव्हता. रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची मागणी मान्य करण्यास, कॅप्टन नायस्मिथ आणि बंदर अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. वेल्डिंग मशीनमुळे जहाजावर असलेल्या स्फोटकं आणि दारुगोळ्याचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे, त्यांच्या निदर्शनास आणून दिले. म्हणून बोटीवरची स्फोटकं उतरवून झाल्यानंतर, सोन्याचा साठा असलेल्या सीलबंद पेट्या, रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष उघडायच्या असं ठरवलं गेलं
परंतु स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लहान बोटी आणि बार्ज १३ एप्रिलच्या दुपारपर्यंत आलेल्याच नव्हत्या आणि तो धोकादायक माल तसाच बोटीत पडून होता.
पुढे जी काही घटना घडायची होती, त्याची ही नांदी होती..!
(क्रमश:)
-नितीन साळुंखे
9321811091
टीप-
या लेखमालेतील तीनही भागांचे संदर्भ आणि स्फोट झाल्यानंतरच्या दिवसांत तेंव्हाच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणं, लेखाच्या तिसऱ्या, म्हणजे शेवटच्या भागात वाचायला मिळतील. तिसरा भाग येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होईल.
–
खूप उत्कंठा जागवणारी माहिती.लेख चलचित्रा सारखा आहे. अप्रतिम.
LikeLiked by 1 person
सर, अजून शेवटचा भाग यायचा बाकी आहे…तो जास्त इंटरेस्टींग आहे..
LikeLike
अत्यंत अभ्यास पूर्ण माहिती
LikeLiked by 1 person