मी अनुभवलेला, ‘आणखी एक मोहेंजो दारो’ डॉक्युमेंटरी जन्माला येतानाचा प्रवास.. !

माझं मनोगत

ज्येष्ठ चित्रपट समिक्षक, जागतिक सिनेमाचे अभ्यासक, उत्कृष्ट कथा-पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि माझे स्नेही श्री. अशोक राणे यांनी, मुंबईच्या गिरणगांवातील लयाला जात असलेल्या किंवा लयाला गेलेल्या समृद्ध संस्कृतीवर तयार केलेल्या ‘आणखी एक मोहेंजो दारो’, इंग्रजीत ‘Yet Another Mohenjo Daro’ या जवळपास तीन-साडेनीन तासांच्या डॉक्युमेंटरीत मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होतो. माझ्यासाठी जवळपास तीन-एक वर्षांचा प्रवास अत्यंत आनंददायी होता. ह्या तीन वर्षांनी मला जे काही दिलं, ते कधीही विस्मरणात जाऊ शकत नाही. गेल्या कितीतरी वर्षात एवढं समृद्ध जगणं मी अनुभवलेलं नव्हतं, ते या तीन वर्षांत अनुभवलं.

तीन वर्षांचा हा प्रवास आनंददायी असला तरी, सोपा नव्हता. अनेक अडचणीचा आम्हाला सामना करावा लागला. त्यात कोविड-१९ चा २०२० चा दीर्घ आणि २०२१ चा अंशतः लॉकडाऊन, त्यामुळे लोकांना भेटण्यावर, चित्रिकरणावर आलेली बंदी, कोरोनामुळे ज्यांचे अनुभव चित्रबद्ध करायचे, असे अनेक जाणते गिरणगांवकर जग सोडून गेलेले, अशा अनेक अडचणी सामोऱ्या येत गेल्या. तरीही त्यातून मार्ग काढत आम्ही पुढे जात राहीलो, ते केवळ अवघा गिरणगांव आमच्या सोबत समर्थपणे उभा राहीला म्हणूनच.

कोरोनामुळे लादली गेलेली बंधनं, त्या विक्षिप्त आजारामुळे प्रत्येकाच्या जीवाला निर्माण झालेला धोका, संशयाचं वातावरण इत्यादी सर्व बाजुला ठेवून गिरणगांवकर आमच्यासोबत पहाडासारखे उभे राहिले. म्हणूनच ही डॉक्युमेंटरी तयार होऊ शकली. डॉक्युमेंटरीचे निर्माते श्री. राजेश व गायत्री पेडणेकर, लेखक जयंत पवार आणि दिग्दर्शक अशोक राणे असले तरी, ही डॉक्युमेंटरी तयार होऊ शकली, त्यात सिंहाचा वाटा गिरणगांव आणि गिरणगांवकरांचा आहे.

ह्या डॉक्युमेंटरीच्या प्रवासात काही गोष्टी ओळखीने शेक्य झाल्या, तर काही मैत्रीने. काही गोष्टी होण्यासाठी आमची अगदी थेट ओळख नसली तरी मित्रांच्या ओळखीने शक्य होऊ शकल्या. मात्र डॉक्युमेंटरीचा बराचसा भाग ‘हरवलेल्या गिरणगांवावर अशोक राणे डॉक्युमेटरी बनवतायत’ हे ऐकूनच शक्य झाला. ‘अशोक राणे’ हे नांव परवलीच्या शब्दासारखं कामाला आलं. अनेक बंद दालनं त्यामुळे आपोआप उघडली गेली. तिथे मैत्रीची वा ओळखीची फार गरजच लागली नाही. आमच्या डॉक्युमेंटरीसाठी एखादी गोष्ट आवश्यक आहे असं म्हणायची खोटी, की काहीच वेळात आमच्यासमोर ती हजर होत असे. मग ती वस्तू असो, वास्तू असो की व्यक्ती असो. ती ही स्वतःची पदरमोड करुन. कुठेही ‘पैसे’ हा रुक्ष विषय आड आला नाही. किंबहुना कुणाची तशी अपेक्षाच नव्हती. गिरणगांवाने आपल्या घरचंच कार्य असल्यासारखं या प्रकल्पात भाग घेतला होता. हे घडलं, ते केवळ लोप होत चाललेल्या गत काळातल्या गिरणगांवाविषयी असलेल्या जिव्हाळ्यामुळे आणि आम्ही ते जपून ठेवू इच्छितोय, हे समजल्यामुळे..!

गिरणगांकरांनी, मग तो गिरणगांवात आता राहाणारा असो की नाईलाजाने गिरणगांव सोडून बाहेर राहायला गेलेला असो, डॉक्युमेंटरीच्या या प्रवासात आम्हाला केलेली मदत नसती तर, १८५४ ते १९८२ असा जवळपास १००-१२५ वर्षाचा गिरणगावाचा जन्म, उत्कर्ष आणि लोप आम्हाला चित्रबद्ध करता येणं अवघड होतं. त्यातील काहींच्या आठवणी पुढच्या काही लेखांतून जागवण्याचा माझा प्रयत्न आहे.

काय नाही या डॉक्युमेंटरीत. गिरण्यांत काम केलेल्या आणि आता हयात असलेल्या गिरणी कामगारांच्या, आता ज्यांचं वय वर्ष ६५ ते ८५ च्या दरम्यान आहे अशांच्या मुलाखती-आठवणी, हयात असलेले गिरणी कामगार नेते, गिरणी कामगारांचे संप आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष यांचा अभ्यास करणारे जागतिक कीर्तीचे अभ्यासक यांच्या मुलाखती, १९४७ च्या स्वातंत्र्यात आणि १९६० च्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात गिरणी कामगारांनी बजावलेली महत्वपूर्ण भुमिका, गिरणगांवात जपला जाणारा धार्मिक आणि जातीय बंधुभाव, तिकडचा कबड्डीसारखे (हुतुतु) लोकप्रिय खेळ. गिरणगांवने जन्माला घातलेली आणि पुढे जगभरात नांवारुपाला आलेली कामगार रंगभुमी, त्यातून पुढे आलेले मराठमोळे कलावंत, गिरणगांवातील नाटकांच्या तालमी, पडद्यावरचे पिच्चर आणि त्यात होणारी रडारड, राडे, दादागिरी, सुराबाजी, राजकारण, दिवाळीत सामुहीक फराळ करण्याचं दृष्य, चाळीतली प्रेमप्रकरणं, एकमेकांना निरोप देण्याची ती सांकेतीक भाषा, त्या काळातली लग्न इत्यादी इत्यादी.

शिवाय गिरणगांवातील त्या लाकडी एकमजली चाळी, तिथलं जीवन, ठराविक वेळी सार्वजनिक नळाला येणाऱ्या पाण्यासाठी होणारी बायकांची ‘नळावरची भांडणं’, नोकरीसाठी शिड्याने ‘हुंबय’ला येणाऱ्यांच्या मुक्कामाची ‘झिलग्यां’ची किंवा ‘बैठकी’ची खोली, त्यातल्या प्रत्येकाचा एका ट्रंकेत मावणारा सौंसार, या शिड्या झिलग्यांसाठी खानावळी चालवणाऱ्या स्त्रिया, त्यांच्याकडे खानावळीला असणाऱ्या बाप्यांनी तिला केलेली भावबीज, भावबीजेच्या साडीची वाजत गाजत त्यांनी काढलेली मिरवणूक, या शिड्या गिरण कामगारांनी मनोरंजनातून जन्मला घातलेले आणि पुढच्या काळात खास ‘गिरणगांवी संकृती’ म्हणून प्रसिद्धीस आलेले तमाशा, खेळे, भारुडं, नमन, दशावतार, भजनं, उभी भजनं, बाल्या डान्स, जात्यावरच्या पहाटेच्या ओव्या, पाळणा इत्यादी, ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सव, दहिहंडी, होळीसारखे सण-उत्सव इत्यादीप्रमाणे त्या काळातलं जे जे शक्य झालं ते ते दाखवण्याचा किंवा शब्दांतून उभं करण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या गिरणगांवाला रसरसून जगण्याला कंगोरेच इतके आहेत की, सुमारे सवाशे-दिडशे वर्षांचा हा प्रवास केवळ अडीच-तीन तासांच्या मर्यादीत डॉक्युमेटरीमध्ये उभा करणं, हे अत्यंत अवघड काम. परंतु, ते साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ह्या डॉक्युमेटरीत केला आहे. कृतकृत्यतेची भावना अंगभर भरून राहीलीय. तरीही काहीतरी सुटलं, ही भावना आहेच. पण कुठंतरी थांबावं लागतंच नाही का?

आता थोडं डॉक्युमेंटरीच्या नांवाविषयी.

ह्या डॉक्युमेंटरीचं नांव ‘आणखी एक मोहेंजो दारो’. इंग्रजीत ‘Yet Another Mohenjo Daro’.. हडप्पा आणि मोहेंजो दारो ह्या अदमासे साडेचार-पांच हजार वर्षांपूर्वी सिंधु नदीच्या खोऱ्यात नांदलेल्या दोन महान संस्कृती. अत्यंत प्रगत. इतक्या प्रगत संस्कृती अचानक लयाला कश्या गेल्या ह्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु त्या लयाला गेल्या, हे सत्य आहे.

आपल्या गिरणगांवाचंही तसंच झालंय. १८५४ साली सुरु झालेल्या पहिल्या गिरणीनंतरच्या काही काळात, गिरण्यांत काम करणाऱ्या कामगारांनी वसवलेलं हे गिरणगांव. कोकण, घाट, देशाचा उत्तर भाग इथून गिरण्यामधे मिळणाऱ्या रोजगाराने तिथल्या लोकांना मुंबईत खेचून आणलं. विविध ठिकणांहून आलेले हे गरीब गिरण कामगार सुरुवातीला येतांना एकेकटे आले असले तरी त्यांनी येताना आपापल्या भागातील आपापली भाषा, प्रथा, परंपरा, संस्कृती, सण, उत्सवही सोबत आणले आणि पुढच्या काळात या सर्वांचं एक मनोहारी मिश्रण या गिरणगांवात नांदू लागलं. इथले लोक गरीब होते, पण सांस्कृतीक दृष्ट्या अत्यंत श्रीमंत होते. ही श्रीमंती सण-उत्सवांच्या काळात गिरणगांवात मुक्त हस्ते उधळली जायची. त्यात माझा-तुझा, आपला-परका असा भेदभाव नव्हता. त्यात सर्वांचा समान सहभाग असायचा.

सार्वजनिक गणेशोत्सव, धयकाला (दहीहंडी) हे कोकण्यांनी प्रथम गिरणगांवात आणले आणि मग ते अवघ्या मुंबईचे झाले. भारुडं, तमाशे, पवाडे इत्यादी घाटवरुन गिरणगांवात आले आणि सर्वच गिरणगांवाने ते आपले केले. एकेकाळी गिरणगांवात कव्वाली फार प्रसिद्ध होती. ही गिरणगांवात आणली उत्तर प्रदेशातून गिरणीत राबण्यासाठी आलेल्या कसबी मुसलमान विणकरांनी. मग ती सगळ्या गिरणगावाची झाली. अशी कित्येत उदाहरणं सांगता येतील. मुळच्या ह्या सण-उत्सवावर इकडच्या खास गिरणगांवच्या कामगार संस्कृतीचे संस्कार होत गेले आणि मग ते गिरणगांवचे म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

गरीबी हा इथे राहाणाऱ्या सर्वांसाठीच लघुत्तम साधारण विभाजक होता. श्रीमंत होते, ते ठेट टाटा नि बिर्लाच. मध्यमवर्गाचा उदय अद्याप व्हायचा होता. धर्म नि जात आपापल्या घरापुरतीच मर्यादीत होती. कोकणी असो, घाटी असो, भैया असो की मुसलमान, अकदा का तो मुंबयच्या गिरणीत कामाला लागला, की त्याचा धर्म नि जात एकच. कामगार. ह्या कामगारांनी वसवलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण गांव, गिरण्यांच्या १९८२ च्या अभूतपूर्व संपानंतर हळहळू लयाला जाऊ लागलं. तो संप गिरणगांचा काळ ठरला. त्या संपाने इथला कामगार विस्थापित झाला, संपला. गिरणगांवही संपू लागला. आता तर गिरणगांव केवळ जुन्या पिढीच्या स्मृतींतही पुसट होऊ लागलाय. नवीन पिढ्यांना तर या सुंदर गांवाची कितपत माहिती असेल, ते सांगताही यायचं नाही.

मोहंजो दारो संस्कृती का नष्ट झाली, त्याची कारणं अजुनही स्पष्ट झालेली नाहीत. पण एकेकाळी तिथे एक समृद्ध संस्कृती नांदत होती, हे मात्र माहित झालंय. गिरणगांवचंही तसंच झालंय. गिरणगांवच्या लयामागे १९८२ चा संप हे मोठं कारण असलं तरी, ते एकमेंव कारण नाही. अनेक कारणं त्यासाठी देता येतील. त्यातील काही स्पष्ट आहेत, तर अनेक अस्पष्ट आहेत. कसंही असलं तरी गिरणगांवात एकेकाळी गरीब गिरणी कामगारांनी उभी केलेली श्रीमंत संस्कृती नांदत होती, हे मात्र खरं आहे.

ही डॉक्युमेंटरी करायचं जेंव्हा ठरलं, तेंव्हा पटकथेसाठी अशोकजींच्या नजरेसमोर एकच नांव आलं. जयंत पवार. जयंत पवारांचं आयुष्य गिरणगांवाचं हृदय म्हणता येईल अशा लालबागमधे गेलेलं. शिवाय त्यांनी स्वतः काही काळ गिरणीत कामही केलेलं. गिरणगांवचे सर्व पैलू त्यांना माहित होते. किंबहुना ते स्वतः त्यांचा भाग होते. त्यामुळे ह्या विषयावरच्या डॉक्युमेंटरीला न्याय देण्यासाठी, उत्तम कथालेखक-नाटककार असलेल्या जयंत पवारांइतकी पात्र व्यक्ती असूच शकत नव्हती, असं अशोकजींना वाटलं तर त्यात नवल नाही.

पटकथेवर पहिली चर्चा करण्यासाठी अशोकजी जयंतरावांच्या ऑफिसात भेटले. डॉक्युमेंटरीत येणारं गिरणागांव आणि आणि त्याचा विस्तिर्ण पट लक्षात घेऊन जयंतरावांच्या तोंडून, “अशोक अरे हे आधुनिक मोहेंजो दारोच आहे रे आणि आपण याक्षणी जिथे बसून ही चर्चा करतोय, ते अशाच एका मिलच्या थडग्यावर बसून.।”असे उद्गार सहजपणे निघून गेले आणि त्याच क्षणी अशोकजींना डॉक्युमेंटरीचं झाली होती. नांव मिळालं. आणखी एक मोहेंजो दारो. ‘अशोकजींची आणि जयंतरावांची ती भेट कमला मिल कंपाऊंड ‘मधल्या जयंतरावांच्या ऑफिसात झाली होती. पुढे अशोकजींनी ह्या नांवाबद्दल ज्या अनेक जाणकारांशी चर्चा केली, त्या सर्वांना हे नांव आवडलं. त्याहीपेक्षा जास्त पटलं.

ह्या डॉक्युमेंटरीत गिरणगांच्या लयामागील कोणत्याही कारणांची चर्चा किंवा मिमांसा केलेली नाही. कधीकाळी गिरणगांवात अस्तित्वात असलेल्या त्या संस्कृतीच्या आठवणी जागवण्याचा मात्र निश्चितच प्रयत्न केलेला आहे..म्हणूनही या चं नांव ‘आणखी एक मोहेंजो दारो’ असं ठेवलंय..!!

आता ही डॉक्युमेंटरी जवळपास तयार होत आलीय. निर्मितीनंतरचे आवश्यक संस्कार सुरु आहेत. ते ही लवकरच संपतील. माझी ही लेखमाला पूर्ण होईपर्यंत आपली ही डॉक्युमेंटरी पूर्ण झालेली असेल. ते ही आम्ही सर्वांना कळवूच. आणि दाखवूही

२०१८ ते आता २०२२ पर्यंतच्या चार वर्षांचा , ह्या डॉक्युमेंटरीच्या ‘मेकींग’चा प्रवास मी काही लेखांमधून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण किती लेख होतील, ते आताच सांगता येणार नाही. आठवेल तसं लिहित जाणार आहे.

यातला पहिला लेख लवकरच आपल्यासमोर येईल..!!

क्रमश:

-नितीन साळुंखे

9321811091

30.05.2021