डॉक्युमेंटरीत माझा सहभाग नक्की होतो..
ही गोष्ट साधारण २०१८ साल संपता संपतानाची. एके दिवशी श्री. अशोक राणेंचा मला फोन आला. तसा आमचा एकमेकाला अधुमधून फोन असायचाच. ख्याली-खुशाली विचारणं, एकमेकांच्या आवडलेल्या लिखाणावर बोलायचं, नवीन काय वाचायला हवं, पाहायला हवं एवढं बोलण व्हायचं. आताचा फोनही तसाच होता. पण, मुंबईच्या ‘गिरणगांवा’वर एक डॉक्युमेंटरी तयार करायची मनात चाललंय, असं मला अशोकजीं जेंव्हा सांगितलं, तेंव्हा त्यांनी न विचारताच, ही डॉक्युमेंटरी तयार करताना मलाही त्यात सहभागी व्हायला आवडेल, असं सांगून टाकलं.
मी सांगितलं खरं, पण अशोकजींसारखी जागतिक सिनेमात वावरणारी मातब्बर व्यक्ती मला कितपत संधी देईल आणि दिली(च), तर मी ती निभावू शकेन की नाही, याची मला शंका होती. पुन्हा डॉक्युमेंटरी आणि चित्रपट यांची जातकुळी वेगळी असली तरी, या दोन्ही गोष्टी बनवण्याची प्रक्रिया एकच असते, हे अगदीच सामान्य म्हणावं एवढं(च) ज्ञान मला होतं. त्यात चित्रपट आणि नाटक पाहाणं या दोन्ही प्रकारांची मला तेवढीशी आवड नव्हती. पण, चित्रपट बनवणे आणि नाटक बसवणे, या दोन प्रकारांविषयी माझ्या मनात थोडं कुतुहल होतं. कुमार वयात मालवण्यांच्या काही हौशी नाटकांच्या तालमी आणि तरुणपणी काही चित्रपटांचं चित्रिकरण पाहिलेलं असल्याने, लहनपणीच्या त्या कुतुहलाचं रुपांतर आकर्षणात झालं होतं. पण ते तेवढंच. त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेण्याची संधी मिळाली नव्हती. आजवर करत आलेल्या खर्डेघाशीत तशी शक्यताही नव्हती. एखाद्या गोष्टीचं आकर्षण असणं आणि त्या गोष्टीविषयी थोडीतरी माहिती असणं, या दोन भिन्न बाबी आहेत, हे मला कळत होतं. तरीही माझे अत्यंत आवडते लेखक असलेल्या अशोकजींसोबत काम करण्याची संधी मिळावी आणि डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कामात अशोकजींनी मला सोबत काम करण्याची संधी द्यावी असं मात्र मला मनापासून वाटत होतं.
असं वाटण्यामागे आणखीही एक कारण होतं. डॉक्युमेंटरीचा विषय. गिरणगांव. पूर्वेला माजगांव-शिवडी ते पश्चिमेला वरळीपर्यंत आणि दक्षिणेला भायखळा ते उत्तरेला परळपर्यत विस्तार असलेला भाग म्हणजे ‘गिरणगांव’. गिरणगाव अस्तित्वास येण्यास सुरुवात झाली, ती साधारण एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकापासूनच. १८५४ साली मुंबईच्या ताडदेव भागात मुंबईतली पहिली कापडगिरणी सुरु झाली. सुरुवातीला सुरु झालेल्या चार कापडगिरण्या ताडदेव भागातच उदयाला आल्या होत्या. मुंबईतली पाचवी आणि गिरणगावातली पहिली कापडगिरणी, ‘Royal Spinning & weaving Co. Ltd.’ सुरु झाली, ती दिनांक ८ ऑगस्ट १८६० या दिवशी लालबागला. गिरणगावच्या जन्मास कारणीभूत झालेली ही पहिली गिरणी. इतर सर्व गिरण्यांप्रमाणे ही गिरणीही आता बंद झालेली असली तरी, ती आजही आपल्याला पाहाता येते. ती गिरणी म्हणजे, दादर टी.टी.हून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने फोर्टला जाताना, लालबाग मार्केटला अगदी लागून असलेली, ‘दिग्विजय मिल’. दिग्विजय मिलचं धुरांडं धूर ओकू लागलं नि पुढच्या ६०-७० वर्षात जवळपास पन्नासएक गिरण्या माजगांव-वरळी आणि परळ भायखळा भागात धडाधड सुरू झाल्या. दिग्विजय मिलने जन्म दिलेल्या गिरणगावाचं पालन पोषण केलं, नांवा-रुपास आणलं, ते ह्या गिरण्यांनी मिळून.

या गिरण्यांमधे काम करायला आलेला पहिला कामगार मुंबईत आला, तो कोकणातून. कोकण पूर्वीपासूनच जलमार्गाने आणि रस्त्याने मुंबईशी जोडलेलं असल्याने, इतरांच्या तुलनेत कोकण्यांना मुंबई गाठणं जास्त सोप होतं. त्यामुळे गिरण कामगारांची पहिली फळी मुंबईत अवतरली, ती कोकणातून. नंतरच्या काळात जसजसा खंडाळ्याचा घाट ओलांडून घाटावर रेल्वेचा विस्तार होत गेला, तसतसा घाटावरुन आणि देशाच्या इतर भागातुनही कामगार गिरणगांवात येऊ लागला. विविध भागातून आलेल्या अठरापगड जातींच्या कष्टकऱ्यांची गर्दी गिरणगांवात झाली. परंतु कोकणातून आलेल्या आद्य कामगारांमुळे गिरणगांवाचा चेहेरा प्रामुख्याने कोकणीच राहीला.
गिरण्यांमधे काम करायला आलेल्या ह्या कामगारांच्या पहिल्या दोन पिढ्या मुंबईबाहेर, आपापल्या मुलकात जन्मलेल्या होत्या. ते जन्माने मुंबईकर नव्हते. हे आद्य गिरण कामगार मुंबईत येताना आपापलं कुटुंब गांवाकडे ‘सौंसार’ करण्यास ठेवून, रोजगारासाठी शिड्यानेच मुंबईत आले होते. गिरणीत काम करायचं, मिरगाच्या टायमाला शेतीकामासाठी आणि होळी-गणपतीच्या सणांना माघारणीला आणि पोराबाळांना भेटण्यासाठी गावाकडे जायचं हा त्यांचा शिरस्ता.
सुरुवातीला वीज नसल्याने, गिरण्या सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत चालत. अंधार झाला, की गिरणीतलं कामकाज बंद होई. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने, जास्त तास काम चाले, तर हिवाळ्यात आणि पावसांत नेमकं उलट होत असे. दिनांक २ ऑगस्ट १९११ पासून मुंबईत ‘टाटा कंपनी’ची वीज उपलब्ध होऊ लागली आणि १९१२-१३ पासून ती वीज गिरण्यांपर्यंत पोहोचू लागली. विजेवर चालणारी पहिली कापड गिरणी होण्याचा मान लालबागच्या ‘फिन्ले मिल’ने मिळवला. त्यानंतरच्या काहीच काळात मुंबईतल्या एकूण २६ गिरण्या विजेवर चालू लागल्या. त्यातल्या बहुसंख्य गिरणगावातल्या होत्या. गिरण्या विजेवर सुरु चालू लागल्या आणि गिरण्यांमध्ये दिवसाचे २४ तास चालू राहणारी ‘पाळी’ पद्धती अवतरली. पहिली, दुसरी आणि तिसरी पाळी सुरु झाल्यामुळे, जादा कामगारांची गरज भासू लागली आणि कोकण आणि इतर ठिकाणाहूनही कामगार मोठ्याप्रमाणावर मुंबापुरीच्या दिशेने निघाले.

मुंबईत आलेल्या ह्या गिरण कामगारांनी मुंबईत राहण्यासाठी गावच्या मंडळाची अथवा त्यांच्यासारख्याच शिड्या गाववाल्याची, एक-दोन मजली लाकडी चाळीतील एका खणाची खोली जवळ केली. त्यात आपापल्या पाळीनुसार १५-२० जणांनी राहायचं. कोकणी-मालवणी लोक ह्या खोल्यांना ‘झिलग्यांची खोली’ म्हणत, तर घाटावरचे लोक ‘बैठकीची खोली’ म्हणत. एकट्याने राहणाऱ्या ह्या गिरणी कामगारांची पोटाची सोय भागवण्यासाठी, सुप्रसिद्ध ‘खानावळ’ ही संस्था ह्याच काळात उदयाला आली. खानावळ चालवणाऱ्या बाई ज्या भागातून मुंबईत आल्या, त्या भागातली चव तिच्या जेवणात उतरू लागली आणि ती चव भावणारी माणसं तिच्याकडे खानावळी म्हणून जेवायला जाऊ लागली. ‘कोकणे, भात बोकणे’ रत्नागिरी-मालवणकडची खानावळ बघत, तर ‘घाटी, बरबाट चाटी’ एखाद्या घाटणीने चालवलेली खानावळ जवळ करीत. चवबदल म्हणून अधूनमधून इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असंही होत असे.
मुंबईत आलेले हे कामगार एकेकटे आलेले असले तरी, ते येताना आपापली भाषा, आपापल्या प्रथा-परंपरा, नेसण्याच्या-जेवणाच्या पद्धती, सण-समारंभ-उत्सव घेऊनच आले होते. फावल्या वेळेत किंवा सुटीच्या दिवशी भजन-कीर्तन किंवा आपापल्या गावाकडच्या सवईनुसार लेझीम, भारुड, व्यायाम इत्यादी माध्यमातून स्वत:चं आणि सोबत्यांचं मनोरंजन करून घ्यायचं हा दिनक्रम. पुढच्या काळात ह्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांच वा सण-उत्सवांचा एक मनोहारी मिलाफ गिरणगावात झाला. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून गिरणगावातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहता येतं.
मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ सालात गिरगावतल्या केशवजी नाईक चाळीत साजरा झाला. त्यानंतरचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला तो थेट गिरणगावात १९२० सालात, लालबागच्या चिंचपोकळी सावजानिक गणेशोत्सव मंडळात. लालबागचा भाग मुख्यत्वेकरून कोकणी-मालवणी लोकांचा. आधीच कोणताही उत्सव उत्साहाने साजरा करण्यात पटाईत असलेल्या कोकणी-मालवण्यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला नसता तरच नवल..! केवळ सहभाग घेवून थांबतील तर ते कोकणी कसले, त्याला त्यांनी आपला चेहेरा दिला. सुरुवातीच्या काळात ते दहा दिवस भजन, कीर्तन, दशावतारी नाटकं, गावच्या मंडळाने बसवलेली हौशी नाटकं ह्यांची धूम असे. ह्या गणेशोत्सवात भाग घेण्यासाठी मग घाटावरची माणसंही त्यात सामील होऊ लागली. त्यांनी येताना त्यांच्या पट्टयातलं नमन-सोंगी-भारुड आणलं, लेझीम, लाठी-काठी-बनाती, दांडपट्टा इत्यादी मैदानी खेळ आणले. पुढे पुढे घाटावरच्या लेझीमला तर कोकण्यांचा पुढाकार असलेल्या गणपतीच्या मिरवणुकीत अग्रभागी मान मिळाला. अगदी आजही गिरणगावातल्या सार्वजनिक गणपतीच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझीम लागतेच. लाल मातीच्या आखाड्यात लंगोट लावून घुमने आणि गोटीबंद शरीर कमावणे हा खास देशावरच्या लोकांचा छंद. पुढे तोच ‘व्यायामशाळे’च्या माध्यमातून गिरणगावात स्थिरावला. ती गिरणगावाची ओळखही बनली. ‘चर्चा’ हा खास कोकणी गुण. तो गणेशोत्सवातल्या व्याख्यानाच्या माध्यमातून अख्ख्या गिरणगावाने आपलासा केला.
गिरण्यांमध्ये काम करायला आलेल्या ह्या कामगारांत मुसलमान, भैय्या, तेलुगु असे लोकही होते. त्यांचे त्यांचे सण-उत्सव ते उत्साहाने साजरे करीत असत. भय्यांचे ‘बिरहा’, ‘रामलीला’, ‘दंगल’, तर मुसलमानांच्या ‘कव्वाली’ असे कार्यक्रमही चालत. अर्थात भय्या आणि मुसलमान यांची संख्याही कमी असल्याने, त्या कार्यक्रमांचा तेवढा बोलबाला नसे. कसंही असो, उत्सव कोणाचाही असो, त्यात गिरणगावातील सर्व जाती-धर्मियांचा समान सहभाग असे. त्यातूनच एकमेकांच्या प्रथा-परंपरांचा सुरेख संगम ह्या उत्सवातून झालेला दिसे. तिच गिरणगांवाची ओळखही बनली. ‘ये बारा गावच्या, बारा व्हयवाटीच्या म्हाराजा, आज तुजा लेकरु तुज्यासमोर गारांना घालता हां…’ ह्या मालवणी गाऱ्हाण्याशिवाय परेल-लालबागच्या कोकण्यांचा गणपती तर ऐकायचाच नाही, पण ‘डीलाय रोड’च्या (हा शब्द चुकलेला नाही. नांव ‘Delisle Road’ असं असलं तरी ‘डीलाय रोड’च) घाटावरच्या लोकांचा गणपतीही ऐकत नसे. गणपती कोणाचाही असो, ‘गाराना व्हयाच’ हा आग्रह असायचाच. कोणत्याही दोन विभिन्न संस्कृतीतून आलेले समाज जेंव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्यांचा एकमेकांच्या संस्कृतींचा संघर्ष होतो आणि कालांतराने मिलाफ होतो. गिरणगावात संघर्ष झालाच नाही. झाला तो थेट देखणा मिलाफच. तीच गिरणगावची संस्कृती.
सुरुवातीला एकट्याने येऊन गिरण्यांत राबणाऱ्या आणि गिरण्यांच्या आधाराने गिरणगावात स्थिरावलेल्या ह्या कामगारांनी पुढे आपापली गांवाकडची कुटुंब मुंबईत आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची मुलं गिरणगावातच जन्म घेऊ लागली. खऱ्या अर्थाने ज्यांना ‘मुंबैकर’ म्हणता येईल, ते हेच खरे मुंबंईकर..! सुरुवातीला ह्या आद्य मुंबईकरांना जन्म देणाऱ्या आवशींची बाळंतपणं होत, ती आपापल्या घरांतून. सुईणीच्या मदतीने. त्यात अनेकदा बाळ किंवा/आणि बाळंतीण अशा दोघांनाही जीव गमवावा लागत असे. कामगारांच्या गिरण्यांमध्ये दांड्या होत. कामगारांची (आणि गिरणीची) ही अडचण लक्षात घेऊन, ‘बॉम्बे डाईंग मिल’चे मालक सर नेस वाडीया यांनी, सन १९२६ मधे आपल्या दिवंगत आई-वडीलांच्या स्मृत्यर्थ, त्यावेळचं मुंबई राज्य सरकार आणि मुंबई नगरपालिका यांच्या सहकार्याने खास बाळंतपणाचं हॉस्पिटल सुरू केलं. हेच ते परळचं सुप्रसिद्ध ‘नौरोसजी वाडीया मॅटर्निटी हॉस्पिटल’. नांव लांबलचक असलं तरी ते मुंबैकरांमधे प्रसिद्ध होतं, ते ‘वाडीया हॉस्पिटल’ किंवा नुसतंच ‘वाडीया’ म्हणून..!
‘वाडीया’च्या उल्लेखाशिवाय गिरणगावच्या ‘संस्कृती’ला पूर्णत्व येत नाही. आपल्या पूर्वजांनी साकार केलेल्या त्या सर्वसमावेशक ‘गिरणगाव संस्कृती’चा वारसा, ‘वाडिया’ जन्म घेतलेल्या नवीन वंशजांनी पुढे ४०-५० वर्ष समर्थपणे सुरु ठेवला. केवळ सुरूच ठेवला नाही, तर त्यात वाढ करून तो अधिक समृद्ध केला.
१९३० सालापासुन पुढच्या ४-५ दशकांत जन्मलेल्या गिरणगावकरांनी, आपला पहिला श्वास गिरणगावातल्या ‘वाडीया’तच घेतलेला आहे. त्या पहिल्या श्वासातून, फुफ्फुसाच्या मार्गाने त्यांच्या मना-शरिरात घुसून बसलेलं ते गिरणगांव, पुढे अनेक कारणांनी, अनेक गांवाची हवा खाऊन आणि पाणी पिऊनही बाहेर पडायला तयार होत नाही. ! अस्मादिकाही त्यातलेच.
गिरणगावात जन्मलेला मुंबईकर ‘गिरणगाव’ हा शब्द ऐकताच, अगदी मेलेला असला तरी, तिरडीवरून उठून उभा राहील आणि जुन्या गजाली सांगायला लागेल, अशी त्या शब्दाची जादू आहे. मग मी तर जिता-जागता आहे. माझाही पहिला श्वास गिरणगावच्या गिरणगावातलाच आहे. वयाच्या ५ ते १० वर्षांपर्यंतचं, उतरत्या काळातलं गिरणगाव, न कळत्या वयातलं मी थोडसं पाहिलेलं आहे. आई-मामा-मावश्यांच्या गजालींतून ऐकलेलं आहे. त्यातून माझ्या मनात घर करून बसलेली गिरणगावची ती संस्कृती, गिरण्यांच्या १९८२च्या संपानंतर हळूहळू नामशेष होत गेल्याची वेदना माझ्यातही आहे. असा ‘मी’, राणेसाहेब ‘गिरणगावावर‘ डॉक्युमेंटरी तयार करताहेत हे ऐकूनच उत्तेजित झाला नसतो, तरच नवल. म्हणून लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, “गिरणगांवा’वर एक डॉक्युमेंटरी तयार करायची मनात पक्क होतंय”, असं मला अशोकजीं जेंव्हा सांगितलं, तेंव्हा त्यांनी न विचारताच, त्या डॉक्युमेंटरीच्या प्रवासात माझा सहभाग नोंदवून टाकला.
असेच काही दिवस गेले आणि २०१९च्या मध्यावर मला अशोकजींचा फोन आला. “मुंबईच्या गिरणगांवच्या लोकसंस्कृतीवर डॉक्युमेंटरी बनवायचं निश्चित केलेलं आहे आणि तुला या डॉक्युमेंटरीच्या कामात भाग घ्यायचा आहे, तुझ्यासाठी एक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तयारी कर. बाकी नंतर बोलू”, एवढं बोलून फोन संपला. अशोकजींनी मला डॉक्युमेंटरीच्या कामात सहभागी करुन घेतल्याचा, त्याच्यासोबत काम करायला मिळणार याचा आनंद, लठ्ठ रकमेची लॉटरी लागण्यासारखाच होता. पण त्याचबरोबर थोडं दडपणही आलं. दडपण अशासाठी की, माझ्यासाठी नेमकी काय जबाबदारी निश्चित केलीय, याबद्दल ते काहीच बोलले नव्हतं. ती काय असावी, या विचाराने तोडा ताण आला होता. डॉक्युमेंटरी/फिल्म कशी तयार होते त्याबद्दल आकर्षण असलं तरी, ती कशी तयार करतात याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण तशा तांत्रिक प्रकारची जबाबदारी अशोकजी काही मला देणार नाहीत, असं मला खात्रीने वाटत होतं. मग दुसरी कसली जबाबदारी असावी, याचा विचार मी करु लागलो.
ते लवकरच स्पष्ट झालं. अशोकजींनी माझ्यावर ‘संशोधना’ची जबाबदारी सोपवली होती. हे तर माझ्या आवडीचंच काम होतं. गिरणगावाविषयी हाती लागेल ती माहिती, लेख, कात्रणं मी वाचताच असतो. त्यामुळे अशोकजींनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मला सोपीच जाणार होती.
पण, ते तेवढं सोपं जाणारं नव्हतं, हे मला नंतर समजलं. त्याविषयी पुढील भागात..!
–नितीन साळुंखे
9321811091
१०.०६.२०२२
नितीनजी, दोन्ही लेख खूपच छान, ओघवत्या भाषेत लिहिलेत. वाचताना मजा आली. डाॅक्यूमेंट्री संपूर्ण झाल्यावर त्याची लिंक नक्की पाठवावी, धन्यवाद !
LikeLiked by 1 person
नितिन जी,आपला ब्लॉग साक्षात चित्रपटा सारखा नजरे समोरून सरकत जातो. आपल्या देशाची संस्कृतिची झलक यात दिसते. हे सगळं अद्भुत आहे.
LikeLiked by 1 person
काय भारी वाटतेय…..( मालवण्यावर कोल्हापूरी संस्कार) एखाद्या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी कधीकधी पडदा किलकिला होऊन रंगमंचावर असलेल्या लगबग पाहून जे कुतूहल वाटतं, तेच वाटतेय हे वाचून.
LikeLiked by 1 person
Chhan वाडिया चा इतिहास रंजक.
LikeLiked by 1 person