मुंबईतली मराठी भाषा-

मुंबईतली मराठी भाषा-

माझं आजवरचं संपूर्ण आयुष्य मुंबईतच गेलंय. मुंबईत सर्वच आधुनिक सुखसोयी (त्या त्या काळातल्या) सुरुवातीपासूनच उपलब्ध असल्याने, मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या कोणत्याही मुंबईकराला मुंबई सोडून इतर प्रांतात जायची पाळी फारशी कधी येत नाही;त्यामुळे मुंबई बाहेरचं जग आणि तिथे राहाणाऱ्या माणसांचं जगणं, त्यांचं सांस्कृतिक, सामाजिक व भाषाविश्व त्याला फारसं अनुभवायला मिळत नाही. इतर मुंबईकरांचं माहित नाही, पण मला मात्र ही उणीव सातत्याने जाणवत राहाते.

मला विविध प्रांतातल्या भाषा आणि बोलींचं लहानपणापासून आकर्षण आहे. मुंबईत जन्म झाल्याने, कानावर सातत्याने पडत आलं ते मराठी. त्यातही मालवणी बोली प्रामुख्याने मी ऐकत आलो. त्यानागचं कारणही अगदी उघड आहे. १८५३ च्या एप्रिल महिन्यात मुंबईतली पहिली प्रवासी रेल्वे धावली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईतली पहिली कापड गिरणी सुरू झाली. ह्या दोन महत्वाच्या घटनांनी भविष्यातल्या औद्योगिक मुंबईचा पाया घातला, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं आणि त्यात तथ्यही आहे. प्रवासाची स्वस्त सोय आणि रोजगाराची हमी मिळाल्यानंतर देशभरातल्या श्रमिकांनी मुंबईचा रस्ता सुधरला. त्यातही सुरुवात झाली, ती कोकणातून..!

कोकण भौगोलिकदृष्ट्या मुंबईला जवळचं. किंबहुना मुंबई हा कोकणाचाच हिस्सा. त्यात रेल्वे अवतरणापूर्वीपासूनच कोकण मुंबईशी जलमार्नाने जोडलेलं असल्याने, मुंबईत पहिला कामगार अवतरला तो कोकणातून आणि मग त्यात सातत्याने वाढच होऊ लागली. हा कामगार येताना आपली भाषा तर घेऊन आलाच, परंतु संस्कृतीही घेऊन आला. आपापल्या गांव-शीववाल्यांच्या सोबतीने तो मुंबईत राहू लागला. त्यातून मालवणी, रत्नागिरीकर, चिपळूणकडचे बाले, आणि नंतर आलेले घाटावरचे घाटी अशा मराठी मातीतल्याच, परंतु विविध ठिकाणच्या लोकांच्या वस्त्या मुंबईत, त्यातही गिरणगांवात, होऊ लागल्या. माझं मूळ मालवणी मुलखातलं आणि मुंबईतलं आजोळ लालबागातलं असल्याने, माझ्या आजुबाजूला मालवणी बोलणारीच माणसं जास्त करुन होती आणि परिणामी लहानपणापासूच ती बोली कानावर पडू लागली व मला आपोआप बोलता येऊ लागली..! तेंव्हा मला मालवणी हीच मुंबईची भाषा आहे असं वाटायचं. म्हणजे हा पगडा एवढा होता की, एखादा घाटी स्वरात बोलू लागला की तो कुणीतरी वेगळा आहे, असं वाटायचं..!

पुठे थोडा मोठा झाल्यावर हिन्दीची ओळख झाली. याचं श्रेय, अर्थातच, हिन्दी सिनेमांचं. तरीही तोवर मुंबईतली सर्वसामान्य संपर्काची भाषा विविध बोलींतील, परंतु मराठीच होती. येता-जाता रस्त्यात, दुकानांतून, रेल्वे-बसमधून प्रवास करताना मराठी कानावर पडणं अगदी सहजचं होतं. अगदी गुजराती दुकानदार, फेरीवाले भैयाही मराठीतून बोलत असत. मराठीतून बोललेलं त्यांना व्यवस्थीत समजतही असे. मुंबईतल्या व्यवहाराची भाषा मराठीच होती. अगदी पारसी, गुजराती गिरणीमालक आणि गिरण्यांमधे काम करणारे इतर भाषक अधिकारीही मोडकं-तोडकं का होईना, ‘घाटी’भाषा बोलत असत (मराठीसाठी ‘घाटी’ असंच बोललं जाई तेंव्हा) . ही परिस्थिती गत शतकातल्या नवव्या दशकापर्यंत कायम होती.

९०च्या दशकात मुंबईतल्या कापड गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईचा मराठी तोंडवळा हळुहळू बदलू लागला. मुंबईतलं मराठीपण टिकवून ठेवण्याचं मोठं श्रेय गिरण्या आणि त्यात तीन पाळ्यांत राबणाऱ्या गिरणी कामगाराचं होतं. तोच विस्थापित होऊ लागला आणि मुंबईतलं मराठीपण हरवू लागलं. गिरण्यांच्या जागी रोजगाराची नवनवीन साधनं उपलब्ध होऊ लागली आणि मुंबईत देशातील विविध भागांतून रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. प्रवासाच्या अधिक चांगल्या सोयी, कोणत्याही राबत्या हाताला काम मिळण्याची खात्री, तंत्रज्ञानात वेगाने झालेली प्रगती यात मराठी माणूस स्वतःला बसवू न शकल्याने, तो हळुहळू मुंबईच्या बाहेर फेकला जाऊ लागला.

त्याचवेळेस मुंबईतील जागांचे भाव अस्मान छेदून जाऊ लागले. मुंबईतल्या लहान जागांना सोन्याचा भाव मिळू लागला आणि खोलीच्या एका खणात आपल्या मोठ्या कुटुंबासहीत राहाणारा मुंबईकर, मुंबईच्या बाहेर भाईंदर-विरार आणि ठाण्याच्या पलिकडील डोंबिवली-कल्याणच्या प्रशस्त ब्लॉकात स्थलांतरीत होऊ लागला. त्याच्या मुंबईतल्या एकखणी खोलीचा ताबा गुजराती-मारवाडी धंदेवाल्यांनी सहजपणे घेतला. मुंबई कॉस्मोपॉलिटन होऊ लागली आणि मुंबईतली आणि मुंबईची संपर्क भाषा हिन्दी होऊ लागली किंवा झाली.

एव्हाना मुंबईत गुजराती व्यापाऱ्यांसोबतच मारवाडी समाजाचा शिरकाव झाला होता. मुंबईत पुर्वीपासूनच असलेल्या उत्तरेतले भैये, गुजराती आणि काही मारवाडी व्यापाऱी यांची दुसरी-तिसरी पिढी व्यापारात उतरली होती. गिरण्यांच्या धुरांड्यांची जागा राक्षसी किंमतीचे टोलजंग टॉवर्स घेऊ लागले होते. यात फ्लॅट्स खरेदी करणारे बहुतेक सर्व परप्रांतीय धनाढ्य होते. त्यांना मुंबईशी आणि इथल्या मराठीशी फार काही देणं घेणं नव्हतं. पुर्वीसारखी मराठी गिऱ्हाईकही राहिली नव्हती. मुंबईतल्या शिल्लक मराठी जणांची परिस्थितीही काही फार वेगळी राहिली नव्हती. त्यांचीही कॉन्व्हेन्ट शिक्षित पिढी तरुण झाली होती. या पिढीचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असल्याने, त्यांना मराठीचं प्रेम होतं, पण या भाषेचा फार काही गंध नव्हता. त्यांची इंग्रजीही मार्क मिळवण्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघंही हिन्दीचाच आधार घेऊ लागले होते.

गुजराती भाषकांची संख्याही मुंबईत वाढू लागल्याने, गुजरातीही कानावर पडू लागली होती. गुजराती ही ‘व्यापाराची’ भाषा. मी काही काळ बॅंकेत नोकरी केली होती. बॅंकेचे बहुसंख्य ‘कस्टंबर’ गुजराती असत, पण बॅंकेचा कारभार (आणि धोरणही) शंभर टक्के मराठी भाषेत होता. गुजराती ग्राहक आमच्याशी मराठीच, परंतु गुज्जू टोनमधे बोलत. ते ‘गुर्जरी मराठी’ ऐकायला वाटेही छान. ते आपसांत मात्र गुजराती भाषेत बोलत. त्यांचं बोलणं कानावर पडत असे. अंधेरीचा माझा शेजारही बराचसा गुजराती भाषक होता. त्यांचं बोलणं-कम-भांडणं सातत्याने कानावर पडत असल्यामुळे, मला सवयीने गुजराती समजुही लागलं होतं. गुजराती शेजारी आमच्याशी संपर्क साधताना मात्र आवर्जून मराठीत बोलत असत. पण पुढे पुढे त्यांनी आणि आम्हीही हिंदीचा आधार घेऊ लागलो. मुंबईतल्या बऱ्याच मराठी माणसांना उत्तम गुजराती बोलता येते. असं असलं तरी, सर्वसमान्यपणे मुंबईतली संपर्कभाषा हिन्दी झाली होती.

मुंबईतली मराठी भाषा अंतर्प्रवाहाप्रमाणे टिकून राहीली, ती प्रामुख्याने सरकारी कार्यालयांतून, बीएस्टीच्या बसमधून आणि पोलिस खात्यातून. सरकारी मराठी म्हणजे, उत्तम मराठी येणाऱ्या माणसाच्याही काळजात घडकी भरण्याचा प्रकार. ते नस्ती, कार्यात्मक प्राधिकार, ज्ञापन आणि असे अनेक विचित्र शब्द कानावर पडले की नको ते मराठी, त्यापेक्षा इंग्रजीच बरं अशी परिस्थिती होते. पण ही झाली सरकारी कागदावरची भाषा. सरकारी कार्यालयातील बोली मात्र सामान्य मराठीच होती. अजुनही आहे. सरकारी कर्मचारी-अधिकारी बोली भाषेतली मराठी बोलतात. बीएस्टीच्या बसमधे अजुनही मराठीचंच राज्य आहे. पोलीस खात्याशी सामान्य माणसांचा फारसा संबंध येत नाही ( आणि येऊही नये. तिथे ‘खलरक्षणाय सदनिग्रहणाय’ हा प्रकार असतो), परंतु ‘खाकी’ची बोली मात्र अस्तल गावरान मराठीच (शिव्यांसहीत) आहे. पोलिसांबद्दल बोलायचं तर, मुंबैत राहाणाऱ्या आणि कोणतीही भाषा बोलणाऱ्या सामान्य माणसाचा संबंध येतो तो, वाहतुक पोलीसाशी. वाहतुक पोलीस तर मराठीत बोलतोच आणि समोरच्यालाही मराठीच बोलायला लावतो. कधी संधी मिळाली तर, वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यातला रस्त्यावरचा सं’वाद’ जरूर ऐकावा. अगदी ऐकण्यासारखाच असतो..!

रिक्षा-टॅक्सीचालक बहुसंख्य हिंदी भाषक आहेत. त्यांना मराठी समजते. काहीजण बोलायचा प्रयत्नही करतात. मात्र मराठी पॅसेंजर रिक्षा-टॅक्सीवाल्यांशी बोलताना, उगाच पत्त्याचा घोळ होऊन आपण भलत्याच मार्गाला जाऊ नये म्हणून, त्याच्याशी हिंदीतच बोलणं पसंत करतात.

वरील व्यवस्था वगळता मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे लोकल ट्रेन. ही धावती-‘बोलती’ लहानशी मुंबईच आहे. मुंबईच्या उत्तर दिशेला पश्चिम रेल्वेवर भाईंदर-विरार आणि मध्य रेल्वेवर कल्याण-डोंबिवली आणि त्याही पलिकडे एव्हाना बहुसंख्य मराठी माणूस विस्थापित झालेला आहे. ह्या मुंबैकारांच्या निवसाचं ठिकाण तिकडे असलं तरी, त्याला नोकरी-व्यवसायानिमित्त अजूनही यावं लागतं, ते प्रामुख्याने मुंबईतच. सकाळी दक्षिण दिशेला ऑफिसात जाण्यासाठी आणि संध्याकाळी उत्तरेतल्या घराकडे परतण्यासाठी त्याच्या प्रवासाचं मुख्य साधन म्हणजे लोकल. मुंबईची ही लोकल गाडी मुंबईची नाडी आहे. ती मुंबई(करांच्या)च्या ‘प्रकृती’चा अचूक अंदाज देते. मुंबई ओळखायची असेल, तर ह्या लोकल गाडीतल्या ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’चा कानोसा घ्यावा. ह्या लोकलमधले आपापसातले वाद-संवाद आणि मोबाईलवरचं संभाषण ऐकताना जगात काय घडतंय आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे इथे अगदी ‘लाईव्ह’ समजत.

ह्या लोकल ट्रेनमध्ये मुंबईत मराठी भाषा शिल्लक  आहे की नाही आणि कितपत आहे, याचा अंदाज बरोबर मिळतो. माझं निरीक्षण आहे की, लोकल ट्रेनमध्ये अजुनही १० मधल्या ६ जणाच्या तोंडून मराठीच्या विविध बोली ऐकू येतात. लोकलमधला सह प्रवाशाशी होणारा संवाद आणि/किंवा वाद सुरु होताना हिन्दीतच होतो. पण बऱ्याचदा होतं काय की, समोरचाही मराठी आहे याचा काही वेळातच अंदाज येऊन तो वाद-संवाद पुढे मराठीत सुरू होतो. मला तर प्रवासात हे अनेकदा जाणवलेलं आहे. हा ‘प्रवासी मराठी माणूस’ मुंबईतील आपापल्या कार्यालयातूनही मराठीत बोलतना मला अनेकदा आढळलेला आहे. आपण मराठीतून संवाद साधायचा प्रयत्न केल्यास, आपल्याला मिळणारा प्रतिसादही मराठीत असतो, हे देखील अनुभवायला येत असतं. मला तरी हे आश्वासक वाटतं.

मुंबईत कायमचा राहाणाऱ्या मराठी माणसाचा टक्का घटला असला तरी, सकाळी साधारण १० ते संध्याकाळी ७-८  वाजपर्यंत मुंबईतला मराठी भाषेचा वावर बऱ्यापैकी असतो..! या वेळेव्यतिरिक्त ही मराठीची लेकरं लॉजिंग-बोर्डींगचंच स्वरुप आलेल्या वसई-ठाणे खाडीपलिकडील साष्टीत आपापल्या घरट्यात जाऊन तिकडचा मराठी टक्का टिकवण्याचा करत असतात..!

मुंबईत मराठी टिकून आहे, ते आणखी एका ठिकाणी जाणवतं. डॉक्टरकडे. डॉक्टर गुजराती, मारवाडी, पंजाबी की आणखी कुणीही असो, तो तपासणी करता आलेला रुग्ण जर मराठी असेल, तर त्याशाशी तो मराठीच बोलतो. आजारपणात संबंध (आणि गाठही) थेट जीवाशीच असल्याने, खास मराठी भाषेतच (किंवा त्या त्या भाषेतच) वर्णन करता येतात असे काही जे आजार किंवा लक्षणं असतात, ती नीट कळण्यासाठी डॉक्टर्स पेशंटच्या भाषेचाच आधार घेतात. मराठी पेशंट असेल तर डॉक्टर्स आवर्जून मराठीतच बोलतात. ह्यात तरुण-प्रौढ असे सगळेच डॉक्टर आले. वकीलबाबू मात्र इंग्रजीचा झगा उतरवायला सहसा तयार होत नाहीत. तरी कनिष्ठ न्यायलयात मात्र बऱ्यापैकी मराठीचा बोली कारभार चालतो. तिथले न्यायमपर्तीही मराठीत बोलतात आणि सामनेवाल्यालाही बोलू देतात..

एकुणात काय, तर मुंबईतला मराठी माणूस बऱ्यापैकी कमी झालेला आहे हे सत्य असलं तरी, त्याची भाषा असलेली मराठी मात्र अजुनही मुंबईत बऱ्यापैकी जम टिकवून आहे, असं माझं अनुभवांती झालेलं मत आहे. हा जम अधिक घट्ट करण्यासाठी आपण आवर्जून मराठीत बोलायला मात्र हवं

-नितीन साळुंखे

माझं पुस्तक प्रकाशनासाठी तयार झालंय…

पुस्तकाची थोडक्यात ओळख –

हे पुस्तक म्हणजे मुंबई शहराचा इतिहास नाही. तर मुंबईत भटकताना मला दिसलेल्या किंवा मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना माझं कुतूहल जागृत केलेल्या काही वास्तू, पुतळे, रस्ते, पुल यांच्याबद्दलचं लिखाण आहे. ह्या पुस्तकात त्या गोष्टींच्या इतिहासाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हाती जे काही गवसलं, तेच ह्या पुस्तकात संदर्भांसहित मांडलेल आहे.

हे लेखन सूत्रबद्ध नाही. माझ्यासमोर जशा गोष्टी येत गेल्या तशा इथे मांडलेल्या आहेत. ह्यातमाहीमच्या कॉजवेची जन्मकथा आहे, तशीच फोर्टमध्ये कोणे एके काळी असलेल्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याची रंजक कहाणीही आहे. महालक्ष्मी मंदिर, प्रभादेवी यांचा इतिहास वाचता येईल, त्याचप्रमाणे दादरचा टिळक पूल आणि मुंबईत आलेल्या पहिल्या गुजराती व्यापाऱ्याची कथाही आहे. आपल्यासाठी नवीन माहिती देणाऱ्या अशा बऱ्याच रंजक कथा या पुस्तकात आहेत. ह्या सर्व गोष्टींनी मिळून मुंबई शहर घडवलं आहे. अशा लहानमोठ्या गोष्टीच शहराचा इतिहास घडवत असतात.

मुंबईच्या रस्त्यावरून चालताना सहज म्हणून पायाने उडवलेला दगडही त्याच्या उरात इतिहास जपून आहे. तो माहित नसतो म्हणून त्याची किंमत कळत नाही आणि आपल्या शहराबद्दल आपल्या उरात प्रेम निर्माण होत नाही. तो माहित व्हावा आणि त्यामुळे मुंबई शहराविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण व्हावं ह्या हेतूने केलेला हा माझा पहिला प्रयत्न आहे.

Blurb of the book