पुस्तकाची थोडक्यात ओळख –
हे पुस्तक म्हणजे मुंबई शहराचा इतिहास नाही. तर मुंबईत भटकताना मला दिसलेल्या किंवा मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना माझं कुतूहल जागृत केलेल्या काही वास्तू, पुतळे, रस्ते, पुल यांच्याबद्दलचं लिखाण आहे. ह्या पुस्तकात त्या गोष्टींच्या इतिहासाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हाती जे काही गवसलं, तेच ह्या पुस्तकात संदर्भांसहित मांडलेल आहे.
हे लेखन सूत्रबद्ध नाही. माझ्यासमोर जशा गोष्टी येत गेल्या तशा इथे मांडलेल्या आहेत. ह्यात ‘माहीमच्या कॉजवे’ची जन्मकथा आहे, तशीच फोर्टमध्ये कोणे एके काळी असलेल्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याची रंजक कहाणीही आहे. महालक्ष्मी मंदिर, प्रभादेवी यांचा इतिहास वाचता येईल, त्याचप्रमाणे दादरचा टिळक पूल आणि मुंबईत आलेल्या पहिल्या गुजराती व्यापाऱ्याची कथाही आहे. आपल्यासाठी नवीन माहिती देणाऱ्या अशा बऱ्याच रंजक कथा या पुस्तकात आहेत. ह्या सर्व गोष्टींनी मिळून मुंबई शहर घडवलं आहे. अशा लहान–मोठ्या गोष्टीच शहराचा इतिहास घडवत असतात.
मुंबईच्या रस्त्यावरून चालताना सहज म्हणून पायाने उडवलेला दगडही त्याच्या उरात इतिहास जपून आहे. तो माहित नसतो म्हणून त्याची किंमत कळत नाही आणि आपल्या शहराबद्दल आपल्या उरात प्रेम निर्माण होत नाही. तो माहित व्हावा आणि त्यामुळे मुंबई शहराविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण व्हावं ह्या हेतूने केलेला हा माझा पहिला प्रयत्न आहे.
