
वाचायलाच हवं असं पुस्तक..!
‘सिनेमा पाहाणारा माणूस’ – अशोक राणे
अशोक राणे यांनी गेल्या ५० वर्षात देशविदेशात भरपूर प्रवास केला आहे. तरूणपणी जेव्हा मुंबईतल्या लोकलचा पास काढायची बोंब होती, तेव्हा त्यांनी रेल्वेचं सर्क्युलर तिकिट काढून (तेव्हा तोी२७५/- रूपये होती) देशभर भटकंती करण्याचा प्रस्ताव मित्रांसमोर ठेवला. त्यांच्यासकट कुणाकडेच एवढे पैसे नव्हते म्हणून त्यांनी सुधारीत प्रस्ताव मांडला – ट्रक्सवाल्यांकडून फुकट लिफ्ट मागत भटकायचं”. मित्रांनी चेष्टा केली. पण यांनी पुढचंच सुचवलं की, मुंबई ते रोम विमानाचं स्वस्त तिकिट मिळतं ते घ्यायचं आणि रोमपासून सुरू करून सर्व युरोपियन देशात हिंडायचं. मित्र म्हणाले, हा वेडा आहे.
पण पुढे सिनेमाचं बोट धरून हा जगभर इतका हिंडला की, अभिनेता विजय कदम ज्याला त्याला सांगू लागला की, “अधुनमधून भारतात येण्यासाठी याच्याकडे भारताचा व्हिसा आहे” म्हणून.. ! विजय तेंडुलकरांनी तर याला एकदा विचारलंच की, “तुझी बॅग उचलायला कुणी सोबत लागत नाही का?”.
अशोक राणे जगभर हिंडले, पण त्यांनी क्वचितच टुरिस्ट पोईंटस पाहिले असतील. त्यांनी जे जग पाहिलं ते विलक्षण आहे. त्यांनी एकदा लिहिलं होतं की, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी आपल्या डिक्शनरीतून ‘महत्वाकांक्षा’ हा शब्द काढून टाकला. त्यांचा एक पत्रकार मित्र अस्वस्थ झाला. अशोक राणे यांनी त्याला सांगितलं की, तशी एक महत्वाकांक्षा आहे आणि ती म्हणजे जगातल्या एकूण एक देशात जायचं आहे आणि तिथल्या माणसांशी त्यांच्या भाषेत बोलायचं आहे…
…’ सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक लिहिणारे राणे, ‘जग पाहणारा माणूस ‘ हे पुस्तक कधी लिहिताहेत याची आता प्रतिक्षा आहे..!
पुस्तक -‘सिनेमा पाहाणारा माणूस’ (दुसरी आवृत्ती)
२०२१ सालचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेतं पुस्तक.
लेखक – अशोक राणे
प्रकाशक -संधिकाल प्रकाशन.
किंमत – रु. 1,000/- •
सवलत मुल्य – र. 800/-+पोस्टेज
पुस्तकासाठी नितीन साळुंखे यांच्याशी 9321811091* या क्रमांकावर संपर्क साधावा.
-नितीन साळुंखे.