हिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती?

माझाच एक जुना लेख पोस्ट करतोय. त्यावेळी पुण्यात घडलेल्या श्रीमती घोलेबाई-यादव प्रकरणावरून व्यथित होऊन मी हा लेख लिहिला होता, हे लक्षात असु दे. विषय धर्मसंबंधीत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचावा ही विनंती. ही माझी मतं आहेत, ती आपल्याला स्विकारणं बंधनकारक नाहीत.

हिन्दू धर्म की हिन्दू संस्कृती?

आपल्या सर्वच देशात सध्या हिन्दुत्वाची चर्चा सुरु आहे. मी ही हिन्दुत्वाचा पुरस्कर्ता आहे. मात्र आज मी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि आज गोॅधळलेल्या मनस्थितीत असल्याने, उद्याचे हिन्दूत्वाबद्दलचे माझे विचार नेमके कसे असतील, हे आजच सांगणं अवघड आहे. मला कल्पना आहे, की माझा हा लेख वाचून माझे अनेक मित्र, परिचितांचं माझ्याबद्दल वेगळं मत होण्याची किंवा माझ्याकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी बदलण्याची शक्यता आहे. याची खरी-खोटी कल्पना असुनही माझ्या अल्पशा अभ्यासातून निर्माण झालेल्या विचारांशी मी प्रामाणिक राहाणाचं ठरवून हा लेख लिहित आहे. कृपया आपण माझं म्हणणं तटस्थ बुद्धीने समजून घ्यावं अशी विनंती मी सुरुवातीलाच करतो.

मला स्वत:ला हिन्दूत्व हे धर्मापेक्षा एका प्राचीन समृद्ध संस्कृतीशी संबंधीत विषय आहे असं वाटतं. हिन्दूत्व हे धर्मापेक्षा अधिक विशाल, व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. हिन्दू ही संस्कृती आहे, जीवनशेली आहे. संस्कृती म्हटली, की तिचं बदलतं राहाणं आणि म्हणूनच जिवंत राहाणं मान्य करावं लागतं. जगातील इतर प्राचीन संस्कृती परचक्राच्या वादळात पार नाहीश्या झाल्या, मात्र सर्वात जुनी असणारी त्हिन्दू संस्कृती ही अनेक परकीय/परधर्मिय आक्रमणं पचवून आजंही जिवंत आहे, ती केवळ कालानुरुप बदलल्यामुळेच. परधर्मियांची शेकडो वर्षांची आक्रमणं झेलत, पचवत, वर त्याला आपलंच नांव देत अद्यापही जिवंत असलेली ही जगातील एकमेंव संस्कृती. उदाहरणच द्यायचं झालं, तर मुसलमानी आक्रमकांकडून तिने बुरखा घेतला आणि त्याला ‘डोक्यावरील पदराचं’ आपलं असं खानदानी रुप दिलं, तर ख्रिस्त्यांच्या ‘माऊंट मेरी’ला ‘मोत माऊली’ बनवून आपल्या देवता मंडळात बसवलं. स्वतंत्र धर्म स्थापन करणाऱ्या गौतम बुद्धाला तिने चक्क विष्णूचा नववा अवतार मानलं. आज सरसकट सर्व देवांना लावत असलेली ‘भगवान’ ही उपाधी सर्वप्रथम गौतम बुद्धांसाठी जन्माला घातली गेली होती. ही लवचिकता, सहिषणूता आणि स्विकारर्हता संस्कृतीचा अंगभूत गुण असतो.

अशा आपल्या या महान हिन्दू ‘संस्कृती’ला ‘धर्मा’चा वेष हा नंतर कधीचरी, राजकीय गरज म्हणून चढवला गेला. ‘संस्कृती’चा ‘धर्म’ झाला आणि संस्कृतीचा प्रवाह हळू हळू सुरु संकोचू लागला. आता तर ‘हिन्दू धर्म’ अशी ओळख सर्वच स्तरावर दृढ होऊ लागली आहे. आणि एकदा का संस्कृतीचा धर्म झाला, की मग तिच्यातली लवचिकता संपून ती कठोर, हार्ड होते. तिच्यातली आदानप्रदानाची क्षमता संपून तिचं जीतेपण नाहीसं होतं. ती नियमांच्या कडक बंधनात आणि काटेकोर कृत्रीम आचरणात आवळली जाते. तिचं वाहत्या नदीचं स्वरूप लोप पावून, ती एक डबकं बनून राहाते. तिचा क्षय होणं हे क्रमप्राप्त होतं. हिन्दू संस्कृतीचा धर्म बनण्याच्या या टप्प्यावर मला हिच भिती वाटतेय.

एकदा का धर्म म्हणून एखादी संस्कृती मान्य पावू लागली, की धर्माचे म्हणून जे काही नियम असतात, ते तिला लागू होऊ लागतात. हिन्दूना धर्माची व्याख्या लावून, तो हिन्दू हा धर्म आहे का, हे तपासणं मग आवश्यक होऊ लागतं. मी तोच एक प्रयत्न या लेखात करणार आहे.

कोणत्याही धर्माचे ‘आचार’ आणि ‘विचार’ हे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. या दोन स्तंभांना ‘आचारधर्म’ आणि ‘विचारधर्म’ असं म्हटलं जातं. कोणत्याही धर्माची व्याख्या या दोन मुद्दयांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आचारधर्मात मुख्यत्वेकरून नजरेस दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. यात केशभुषा-वेषभुषा, लग्न-जन्म-मृत्यू समयीचे संस्कार आणि पद्धती, संपत्तीचे वाटप, वारस, प्रार्थनेच्या पद्धती व वेळा, उपासाच्या पद्धती आणि ते किती व कोणते करावेत याचे नियम वैगेरे वैगेरे आणि अशा अनेक गोष्टींचं नियमीकरण केलेलं असतं. थोडक्यात एखाद्या विवक्षित धर्माच्या लोकांनी समाजात कसं वागायला हवं, याची एक चौकट आखली गेलेली असते. या चौकटीला फारशी लवचिकता नसते.

धर्माच्या विचारधर्म या दुसऱ्या व नजरेस न पडणाऱ्या भागात ईश्वर, त्याचं स्वरुप, स्वर्ग-नरक, मृत्यूनंतरचं जीवन, पुनर्जन्म, आत्मा आहे किंवा नाही, सृष्टीचं निर्माण व अंत इत्यादी पारलौकीक बाबींचा विचार केलेला असतो. कुठल्याही धर्माचा डोलारा उभा असतो, तो या विचारांवर. आचार हे त्याचे दृष्य स्वरुप मात्र असतं.

हिन्दु संस्कृतीचा धर्म होण्याच्या टप्प्यावर, मी या संस्कृतीचा पुरस्कर्ता असूनही, मला ती ‘धर्मा’च्या व्याख्येत बसते का, हे तपासावंसं वाटू लागलं. तशी सुरुवात केली आणि सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे मी आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. उद्या माझे या संदर्भातले विचार नक्की कसे राहातील, हे आत्ताच सांगणं मला अवघड आहे.

उभ्या आडव्या पसरलेल्या आपल्या या देशात बहुसंख्य हिन्दू असुनही धर्म म्हणून ‘आचारा’त इतर प्रमुख धर्मांप्रमाणे कुठेही युनिफाॅर्मिटी दिसत नाही. हिन्दूंमधील अनेक जाती-पंथानुसार लग्न-जन्म-मृत्यू यांच्या प्रथा व पद्धती यांत भेद आहे. सण कोणते साजरे करावेत याविषयी साधारण समानता असली, करी ते कसे साजरे करावेत याविषयी वेगवेगळेपण आहे. देशातील विविध प्रांतांनुसार/जातींनुसार वेषभुषेत आणि केशभुषेतही तर आश्चर्य वाटावं इतकं वैविध्य आहे. जगभरातले मुसलमान स्त्री-पुरुष जसे सारख्याच वेषात आणि केशरचनेत, सणांत आणि त्यांच्या साजरीकरणात व इतर धार्मीक प्रथांत सारखेच असतात, तसं काही हिन्दूंमधे आढळत नाही. उलट विविधता ही हिन्दूसंस्कतीची ओळख आहे व इतकी विविधता असूनही ती एकच म्हणून हजारो वर्ष ओळखली जाते. ‘आचारधर्म’ या कसोटीवर हिन्दूत्व हे धर्म म्हणून टिकत नाही असं मला वाटतं. मग हिन्दूत्वाला धर्म म्हणण्याच्या नादात, आचाराची बंधनं येणार का आणि आपण ती मानणार का, हा पुढचा प्रश्न मला पडतो आणि माझं गोंधळलेपण वाढतं.

धर्माचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे ‘विचार’. हा तर धर्माचा गाभा. जगातील इतर प्रमुख धर्मांमधे ‘ईश्वर’ किंवा ‘प्रेषित’ ही कल्पना सुस्पष्ट आहे, त्यात फारसे मतभेद नाहीत. धर्मग्रंथाबातही मतभेद नाहीत. ईश्वराला आणि धर्मग्रंथाला मानणं अनिवार्य असतं आणि कोणत्याही परिस्थितीत देवाची वा धर्मग्रंथाची अवहेलना वा समिक्षा खपवून घेतली जात नाही. हिन्दूंसंस्कृतीतली देवाची संकल्पना मात्र निराकार ते साकार आहे, आहे आणि मुळीच नाही, असल्यास कोणता देव, आस्तिक की नास्तिक, मृत्यूनंतरच जीवन या विषयांवर एकमत नाहीच. ईश्वर आहे असं मानण्याचं स्वातंत्र्य आपल्याला हिन्दू संस्कृती देते तसंच तो न मानण्याचंही स्वातंत्र्य हिच संस्कृती देते. देवाला मानणाराही हिन्दू म्हणून ओळखला जातो तसंच देवाला शिव्या देणाराही, तो नाहीच असं मानणाराही हिन्दूच असतो. तसाच हिन्दूंनी कोणता ग्रंथ ‘धर्मग्रंथ’ मानावा हा ही प्रश्नच आहे. मात्र हिन्दू हा एक धर्म आहे असं मान्य केलं, की मग एकच एक असा देव आणि एकच एक असा धर्मग्रंथ मानणं बंधनकारक होणार आणि मग नक्की कोणता देव आणि कोणता धर्मग्रंथ मानावा, देवाची पुजा पद्धती कशी असावी, याचे नियम अटी होणार का आणि ते कोण करणार आणि ते सर्वांना मान्य होणार का,असे अनेक प्रश्न, उपप्रश्न निर्माण होतात आणि माझा गोंधळ आणखी वाढतो.

थोडक्यात आचार आणि विचार या धर्माच्या मुख्य कसोंट्यांवर, इतर रुढं धर्मांप्रमाणे हिन्दुत्व ‘धर्म’ म्हणून माझ्यासारख्याला गोंधळात टाकतो असं मला वाटतं.

‘आॅनर किलींग’च्या देशभरात घडणाऱ्या घटना असोत की नुकतंच घडलेलं पुण्यातलं खोलेबाई-यादव प्रकरण असो, या घटनांना व्यथित होऊन मला हिन्दूत्वाचा पुनर्विचार करावासा वाटला. हिन्दूंव्यतिरीक्त इतरांच्या दृष्टीने खोलेबाई आणि निर्मला यादव, या दोघीही हिन्दूच. मलाही असंच वाटत होतं. हे सर्व हिन्दूच असल्याचं मात्र ते त्यांनाच मान्य नसावं, असं त्यांनी उचललेल्या पावलांवरून दिसतं. त्या दोघी स्वत:ला हिन्दू समजतात की नाही हे कळायला काही मार्ग नाही, परंतू त्यांच्या त्यांच्या जातीच्या आहेत हे मात्र मान्य करतात. दोघी हिन्दू असूनही त्यांची झालेला जातीची ही विभागणी आणि उच्च-निचतेची भावना इतकी तीव्र आहे, की एकमेकांचा एकमेकांच्या नाईलाजाने झालेला वावरही त्या खपवून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी एकमेकांच्या उपास्य दैवतांतही उच्च-निचतेची समिक्षा केली असं पेपरमधे वाचनात आलं. मग धर्माचा गाभा असलेला ‘देव’ नक्की कोणता, याचंही सर्वांना मान्य होईल असं समाधानकारक उत्तर हिन्दू संस्कृतीला धर्म म्हनणारांनी दिलं पाहिजे.

हिन्दूत्वाला धर्म मानलं, की मग माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहातो तो म्हणजे, परधर्मातील काही लोकांना हिन्दू धर्म स्विकारावासा वाटला, तर ते हा धर्म कसा स्विकारणार, हा..! जेंव्हा असा एखादा हिन्दू धर्मात यायचं म्हणतो, तेंव्हा याला नेमक्या हिन्दूंच्या कोणत्या जातीत स्थानापन्न केलं जावं हे कसं ठरवणार, हा प्रश्न माझ्या मनात लगेच उभा राहातो. कारण जाती व्यवस्था ही हिन्दुंची ओळख आहे, हे आजही दिसणारं चित्र आहे. जातीव्यवस्था कायद्यातून गेली असली तरी, बहुतेकांच्या मनात दिवसें दिवस घट्ट होत चालली आहे, असंच चित्र दिसतं. समजा हिन्दू धर्मात यावसं वाटणाऱ्या त्या एखाद्याला ज्या जातीत स्थानापन्न केलं जाईल, त्या जातीतले लोक त्याला स्विकारतील का, त्यांनी स्विकारलं तरी त्या जातीतलं त्याचं आणि त्याच्या मुलाबाळांचं नेमकं स्थान काय राहील, इतर जातीतले हिन्दू त्याला कसं वागवतील आणि त्याच्याशी कसं वागतील, हे व असे असंख्य प्रश्न मनाला छळू लागतात. लांछनास्पद असली तरी नंतरच्या काळात कधीतरी उदयाला आलेली जातीसंस्था आपल्या संस्कृतीचा भाग झाली आणि तिने हिंन्दूंचं अतोनात नुकसान केलं. हिन्दूंमधेच भिंती उभ्या केल्या आणि हिन्दू म्हणवणाऱ्या धर्माचा एक मोठा हिस्सा डाॅ. बाबासाहेबांसोबत बाहेर पडला. पुन्हा तशी परिस्थिती येणार नाही असं सांगता येत नाही. जातीविरहीत हिन्दू धर्म हिन्दूंना मान्य आहे का, असल्यास मग हिन्दूत्वाला धर्म म्हणनारे जातीसंस्थेचं उच्चाटन, प्रत्यक्षातलं आणि मनातलंही, कसं करणार, असे पुढचे प्रश्नही लगेच समोर उभे ठाकतात.

हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने वर उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. या लेखाचं प्रयोजन केवळ यासाठीच आहे. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे..!

-नितीन साळुंखे
9321811091

आडनांवं आणि जात; ही जोडी फोडणं आवश्यक आहे-

आडनांवं आणि जात; ही जोडी फोडणं आवश्यक आहे-

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं काम असतं, त्याच्या नांवाची पाटी वाचली आणि तो जर नांवावरून आपल्यापैकीच्या जातीचा वाटला, तर कुठेतरी साॅफ्ट काॅर्नर मिळणार अशी आशा निर्माण होते. अर्थात सरकारी कामं नियम आणि ‘काय(तरी)द्या’नं होत असल्यामुळे, प्रत्येक जात कामास येतेच असं नव्हे, पण आपला काॅन्फिडन्स वाढतो किंवा जातभिन्नत्वामुळे कमी होतो नक्की.

आपल्या देशातली आडनांवं हे जात ओळखण्याचं आधार कार्ड आहे असं माझं मत आहे. आडनांव सांगीतलं, की समोरच्याच्या चेहेऱ्यावरच बदललेले सुक्ष्म भाव, आपुलकीचे किंवा उच्च/नीचतेचे, बरंच काही सांगून जातात. अर्थात माझ्या निरिक्षणाशी सर्वजण सहमत असतील असं नव्हे किंवा मनातून सहमत असुनही उघडपणे तसं म्हणणार नाहीत याची मला कल्पना आहे. यात त्यांचा दोष नाही. आपल्याकडचं वातावरणच तसं आहे. उघडपणे एका तत्वाचा पुरस्कार करायचा आणि खाजगीत मात्र नेमकं त्या तत्वाच्या विरुद्ध वागायचं. सर्वजजण असं करतात असं मला म्हणायचं नाही, पण बहुतेकजण, त्यातही सवर्ण जास्त, असं वागतात, असं अनुभवायला येतं

स्वत:च्या जातीसहीत इतर कोणत्याही जातीला नाकारणारे नरपुंगव जर आपल्या देशात खरोखरंच असते, तर मग जातीच्या नांवाखाली लाखों लोकांची संम्मेलनं, निदर्शनं, मोर्चे यशस्वी होताना दिसले नसते. पण तसं होताना दिसतं, सातत्याने सर्वच जातीत होताना दिसतं, याचा अर्थ जात कोणालाच सोडायची नाही असाच होतो माझ्या मते. आडनांवं पाहून आपल्याला त्या त्या विवक्षित जातीच्या कार्यक्रमाची निमंत्रणं फेसुकसारख्या माध्यमांवर येताना म्हणून तर आढळतात. तरुण, उच्च शिक्षित पिढीचा यातील सहभाग हा आश्चर्यकारक आणि म्हणून समाजाच्या दृष्टीने चिंताजनक ठरतो असंही मला वाटतं. तरुणाचं जातीप्रती जागृत असणं हे आरक्षणाशी निगडीत आहे नक्की. आरक्षणही ठेवायचं आणि जाती निर्मुलनाच्या गप्पा मारयच्या, आणि ह्या दोन्ही विरोधी गोष्टी कशा काय एकत्र जमवायच्या ते मात्र सांगायचं नाही. अर्थात आरक्षण हा संपूर्ण वेगळा मुद्दा असल्याने याचा इथं केवळ उल्लेख केला आहे.

काही आडनांव एकापेक्षा अधिक जातीत सारखीच सापडतात. अशा आडनांवाच्या दोन अनोळखी व्यक्ती काही कारणाणं बोलताना आढळल्या, तर अशावेळी त्या एकमेंकाशी अत्यंत सावधगीरीने बोलताना आढळतात. दोन माणसं म्हणून त्या बोलतच नाहीत. समोरच्याचा जातीचा अंदाज घेत (कारण आपण जातीभेद मानत नाही ही आपली सार्वजनिक भुमिका असते ना..!) संभाषण चालू राहातं, पण त्यात जान नसते. पण एकदा का कळलं, की समोरची व्यक्ती आपल्याच जातीची आहे, की मग मात्र जीवाशिवाची गाठ पडल्यासारखं वाटतं आणि मग ते दोघं मिळून आपलं आडनांव इतर जातींनी ‘उचलल्यामुळ’ आपलं कोणं आणि परकं कोण हे कळतच नाही हो, असं चुकचुकत चर्चा पुढे रंगते. पण तेच जर आडनांव सारखं परंतू जात भिन्न असेल, तर मात्र ते संभाषण वेगळ्या पद्धतीनं होतं हे अनुभवणं माझ्याही वाटेला अनेकदा आलेलं आहे.

माझं काही कामानिमित्त अनेकांच्या घरी जाणं होतं. मला इथं कबूल करायला आवडेल, माझे काही मित्र खरंच जातीच्या पलिकडे जाऊन निखळ माणूस बनलेत किंवा ते तसे बनलेत म्हणून माझी त्यांच्याशी जमतं, हे कळत नाही. परंतू मला काही आणसं अशीही भेटतात, ती जातीच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. काही वेळा अश्यांच्या घरी जाणं झालं, तर घरच्या ज्या सदस्यांच्या परिचयाने मी त्यांच्या घरी गेलेलो असतो, ते त्यांच्या घरच्यांशी माझा परिचय करून देतात. या प्रसंगी सर्वांच्याच नसली, तरी माझं आडनांव ऐकल्यानंतरची काही सदस्यांची देहबोली ही पुरशी सुचक असते. शब्दांपेक्षा देहच जास्त बोलतो अशावेळी. अभावाने, परंतू हा अनुभव येतो हे नक्की. असाच एकदा मी माझ्या आॅफिसच्या सवर्ण वरिष्ठांच्या घरी गेलो असता, त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाने, “बाबा, हे xxx आहेत का” असं विचारलेलं मी माझ्या कानाने ऐकलं आहे. खुप वाईट वाटलं तेंव्हा मला, पण एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं, की लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात..वास्तविक माझे हे वरिष्ठ माझ्याशी अत्यंत आपुलकीनं वागायचे पण त्यांच्या घरचा अनुभव मात्र एकदम वेगळा होता.

बऱ्याच जणांना आपल्या आडनांवाचा विविध कारणांनी मोठा अभिमान असतो. उठसुट तो ते दाखवायलाही कमी करत नाहीत. आमचं हे घराणं आणि ते घराणं हे सांगायची एकही संधी अशी लोकं दवडत नाहीत. खरं तर हे आडनांव त्याच्या अनेक पिढ्यांपूर्वी कुणातरीमुळे आपल्याला मिळालेलं असतं. त्यानंतरच्या त्याच्या अनेक पिढ्या आहार, निद्रा, भय, मैथून व या सर्वांसाठी कुठेतरी चाकरी, या पलिकडे गेलेल्या नसतात, पण त्यांना आपल्या आडनांवाचा कोण अभिमान आणि इतरांविषयी तुच्छता वाटतानाही दिसते. असा अभिमान बाळगताना आपण नेमकं कसं वागतोय, याचंही त्यांना भान नसतं. तर काही जणांना आपलं आडनांव नकोसं झालेलं असतं. जातीच्या आधाराने शिक्षण घेऊन आणि पुढे चांगली सरकारी नोकरी मिळवून अनेकजण पुढे गेलेत. हे चांगलं किंवा कसं हा इथे मुद्दा नाही, पण पुढे जाऊन अशांची भोतिक भरभराट झाली, की मग त्यांना आपल्या आडनांवांची लाज वाटू लागते आणि मग असे काही जण त्यांना शोभेल/आवडेल अशी आडनांवं घेतानाही दिसतात.

आडनांव आपली जात चटकन सांगतात. आपलं एखादं आडनांव असणं यात आपलं कर्तुत्व वा आपल्याला लाज वाटण्यासारखं काय असतं, हेच मला कळत नाही. आडनाव पिढीजात चालतं आलं, पडलं, दिलं, मिळालं, रूढ झालं, घडलं, घेतलं, धारण केलं किंवा सोडलं, त्याग केला किंवा पुसून टाकलं याच पद्धतीनं प्राप्त होतं किंवा जातं. बहुसंख्य आडनांव ही पुर्वी कधीतरी आपले पुर्वज करत असलेल्या कामावरून पडली आहेत. पुढे कामाचं स्वरूप बदललं तरी आडनांवं मात्र कायम राहीली आणि ते मग जातवाचक निदर्शक झालं. पुर्वज करत असलेल्या कामावरून आताच्या आधुनिक काळात अभिमान किंवा लाज, स्वत:बद्दल गर्व आणि इतरांबद्दल तुच्छता बाळगण्यात काय अर्थ आहे हे माझ्या लक्षात येत नाही, परंतू हा प्रकार सर्रास घडताना दिसतो. उदा. माझं स्वत:चं आडनांव महाराष्ट्रावर राज्य करून घेलेल्या चालुक्य सम्राटांवरून आलंय असं इतिहास सांगतो. परंतू माझं काहीच कर्तुत्व नसताना मी जर त्याच्या आडनांवाची महत्ती इतरांना सागून जर बडेजाव करू लागलो किंवा इतरांना माझ्यापेक्षा कमी दर्जाचं मानू लागलो, तर ते हास्यास्पदच होईल (आणि त्या मुळ चालुक्याला अपमानास्पद). असंच प्रत्येकाचं असतं याचं भान प्रत्येक व्यक्तीविशेषाने बाळगायला हवं, अन्यथा समाजात आधीच असलेली विषमता आणखी वाढते हे कुणीही सुबुद्ध नागरीक नाकारणार नाही.

आडनांव असणं ही आपली कायदेशीर अपरिहार्यता आहे. पण जर कायद्यात व्यवस्थित सुधारणा करून जर आडनांवांची गरजच नाहीशी केली, तर जातीव्यवस्थेला काही आळा नक्की बसु शकेल. शिवशाहीत कुठे आडनांवं प्रचलित असायची? म्हणजे असावित परंतू ती फार कुणी लावत असावेत असं दिसत नाही. अष्टप्रधान मंडळात तर रामचंद्र नीलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, निराजीपंत रावजी, दत्तोजीपंत त्रिंबक, रामजी त्रिंबक आदी नांवातील दुसरा शब्द आडनांवापेक्षा वडीलांचं नांव असावा असं दिसतं. पेशवे ही पदवी/पद पुढे आडनांव झालं हे ही अनेकांना माहित असावं/नसावं. माहितगारांनी यावर जास्त प्रकाश टाकावा. दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावं वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचं नांव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव. अशाप्रकारे आपल्यालाही नाही का करता येणार याचा विचार करायला हवा. फेसबुकवर बरेच जण हल्ली स्वत:च्या पहिल्या नांवासोबत आडनांव न लिहिता, आईचं व वडीलांचं नांव लिहिताना आढळतात, हे खरंच स्वागतार्ह्य आहे. हेच नेहेमीच्या जीवनातही करता आलं तर जाती निर्मुलनाच्या दिशेने ते एक ठोस पाऊल असेल असं मला वाटतं.

मला कळतंय की हा बालीश विचार आहे, परंतू बालीश विचारातूनही पुढे फार काही घडू शकतं. वर उल्लेख केलेला ‘बाबा, हे xxx आहेत का?” ह्या प्रश्नामुळे माझ्या मनात अनेक वर्ष ठुसठुसत असलेला विषय आज आपल्यासमोर मांडलाय. कुणाला पटेल अथवा पटणार नाही, परंतू यावर निदान चर्चा तरी व्हावी या अपेक्षेनं इथे पोस्ट केलाय.

-नितीन साळुंखे
9321811091

पुस्तकातून समाधीकडे..

‘जागतिक पुस्तक दिना’च्या निनित्ताने-

पुस्तकातून समाधीकडे..

अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही चलाख लोकांनी व्यापारीकरण केल असल्यास त्यात नवल ते काही नाही..!

कोणतीही गोष्ट करायची असेल तर तिच्या स्वतःच्या अशा काही अटीं-शर्ती असतात आणि त्या पूर्ण केल्याशिवाय तो गोष्ट करता येत नाही. योगासने, मेडीटेशनचाही याला अपवाद नाही. योग, मेडीटेशनसाठी फार मोठी जागा आणि साहित्य आवश्यक नसले तरी जिथे या गोष्टी करायच्या असतात तिथले वातावरण मात्र शांत आणि प्रसन्न हवे. मुंबईसारख्या शहरात या दोन गोष्टीचीच जास्त वानवा असते. आणि म्हणून मग महागडी फी भरून एखादा एअर कंडीशन्ड क्लास जॉईन करणं आलं. मुंबई सारख्या शहरात शांत आणि प्रसन्न वातावरण एखाद्या स्प्लिट एसी (विंडो नाही. हा आवाज करतो फार.) असलेल्या जागेतच मिळू शकत. पुन्हा असा क्लास जॉईन करण्यात प्रत्यक्ष मन:शांती मिळवण्याचा भाग किती आणि दुसऱ्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी सांगण्याचा भाग किती ही गोष्ट वेगळी.

मेडीटेशनसाठी सुरुवातीला वेळ लागत असला, तरी एकदा शिकल्यावर पुढे फार वेळ द्यावा लागत नाही. मात्र याला कोणीतरी गुरु लागतो. योग आणि मेडीटेशनसाठीची महत्वाची गरज म्हणजे पायाला अथवा पाठीला रग लागणार नाही असे बैठकीचे योग्य असे आसन घालता येणे. सुखासन, स्वस्तिकासन, अर्ध पद्मासन, पद्मासन अथवा वज्रासन सारखी आसने सरावाशिवाय १५ मिनिटे घालणं माझ्यासारख्याला तसं अवघडच. अशा वेळी होतं काय, की मेडीटेशनपेक्षा सांध्याना अथवा पाठीला लागलेल्या रगीकडेच जास्त लक्ष जातं. देवळात गेल्यावर देवापेक्षा बाहेर काढून ठेवलेल्या चपलेकडे आपलं जास्तं लक्ष असतं ना, तसं. बर, शांत आडवं पडून मेडीटेशन केल्यास, माझ्यासारख्याला झोपच लागण्याची शक्यता, म्हणून तेही टाळण्याकडे माझा ओढा..! योगासन किंवा मेडीटेशन तब्येतीला आणि मनाला कितीही उपकारक असो, परंतु, त्याची तयारी, त्याच्या अटीं-शर्ती वैगेरे गोष्टी पाहता, त्याच्या नादाला लागण्यापेक्षा, तो टाळण्याकडे माझा कल जास्तं असतो. असं केल्यानं महागडी फी आणि त्यासाठीच्या आसनांचा द्राविडी ‘प्राणायाम’ वाचला, हा विचार माझ्यासारख्याला वेगळीच मन:शांती देऊन जातो हा आपला आनुषंगिक फायदा..!(इथे योगगुरू आणि मेडीटेशन वाल्यांचा अपमान करायचा यत्किंचितही हेतू नाही.)

वरील विवेचनासाठी एवढं घडाभर तेल घालण्याच कारण, म्हणजे नुकताच कुठेतरी ‘पुस्तक वाचनाचं सामर्थ्य’ या विषयावरचा माझ्या वाचनात आलेला लेख. पुस्तक वाचनात काय सामर्थ्य असतं, ते मी गेली अनेक वर्ष अनुभवतो आहे. मला जे काही पुढे सांगायचंय ते थोडंसं वेगळं असलं तरी, ते त्या लेखातल्या आशयाशी आणि वरील विवेचनाशी सख्खं नातं सांगणारं आहे.

खरंच, पुस्तकात भन्नाट, आपण कल्पना करू शकणार एवढी सामर्थ्य असतं. पुस्तकातच कशाला, आपल्याला मनापासून करायला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ती ताकद ठासून भरलेली असते. इथे पुस्तकाबद्दल म्हणायचं कारण एवढंच, की मी या ताकदीचा मन:पूत अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो म्हणून तुम्हाला अधिकाराने सांगतोय. पुस्तक ही एक वेगळीच दुनिया आहे. माझ्यासाठी तरी, तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या साऱ्या- साऱ्याचा विसर पाडणारी ही एक मोहक भूल आहे.

मला तर हातात एखादं पुस्तक मिळालं, तर बाकी काही काही नसलं तरी चालतं. साधारणत: रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोसारखी किंवा आता निवडणुका जिंकण्याचा मद चढलेल्या मोदी-शहांसारखामाझी अवस्था होते..! तेंव्हाच्या नीरोची वा सांप्रतच्या मोदी-शहांची रमण्याची कारणं तेवढीशी चांगली नव्हती आणि नाहीत, पण हे उफराटं उदाहरण देण्याचा उद्देश इतकाच की, नीरो फिडलात नि मोदी-शहा निवडणुकांत शिरले, की त्यांचं जसं इतर कुठेच लक्ष नसतं, तसं मी पुस्तकात एकदा शिरलो, की मग आजूबाजूला काय जळतय किंवा शिजतय किंवा वाजतंय याकडे माझं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नसतं, एवढंच दाखवणं हा आहे. (बाकी पुस्तकासारखा सात्विक छंद नि नीरो-मोदी-शहा यांचा माणसांच्या मरणात आनंद घेण्याचा विकृत छंद, यांची तुलना होऊच शकत नाही, याची मला कल्पना आहे..). माझ्या आणि माझ्या पत्नीतल्या वादाचं (खर तर भांडणच ते, पण वाद तत्वासाठी होतात आणि त्यामुळे त्याला आपोआप एक तात्विक मुलामा मिळतो..!) माझं वाचनाचं वेड हे एक महत्वाचं आणि (कदाचित) एकमेवंही कारणं आहे (असावं).

पुस्तकातं वाचन मला सुरुवातीला म्हटलेल्या मेडीटेशनसारखं वाटतं. मेडीटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी एकरूप होण हा असतो हे मला ऐकून माहित आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे. आणि ती समजूत जर खरी असेल , तर मी खात्रीने सांगू शकतो, की पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. अगदी स्वतःला विसरण्याइतकी गहन समाधी लागते. मी ध्यान, योग वैगेरें महत्तमांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणारांना मिळत असेल, त्यापेक्षा मला मिळणारी अनुभूती कणभरही कमी नाही. उलट फायदा एक आहे, की पुस्तक वाचण्यासाठी कोणतीही शांतता, पवित्र वातावरण वैगेरेची काहीच पूर्व अट नाही. पूर्व अट असेल तर ती एकच, आवड हवी. पुस्तकाची आवड असली की भर वाळवंटातही हिमालयातली शांतता आणि शीतलता अनुभवता येते. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव त्या संताना आला असेल तो असेल, पण पुस्तकाशी तादात्म्य पावण्याचा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नसतो. पुस्तकाचा हा अनुभव पुस्तकाचं आणि वाचनाचं वेड असणाऱ्या सर्वांनाच येत असतो. एकदा का पुस्तक वाचायला सुरुवात केली, की हळूहळू त्या पुस्तकाचा विषय आपली पकड घेतो आणि मग आपण, आपण न उरता, त्या पुस्तकातल एक कॅरॅक्टर किंवा त्यातील घटनांचा साक्षीदार कधी बनून जातो हेच कळत नाही. समाधी लागणं, मला वाटतं, यापेक्षा वेगळं नसावं.

मुंबई सारख्या डोक्याला सदोतीत तापच देणाऱ्या शहरात, तर मला पुस्तकाएवढा सच्चा आणि नि:स्वार्थ साथी दुसरा भेटला नाही. कोर्टात आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहणं असो की कोणा येणाराची वाट पाहणं असो, किंवा मग मुंबईच्या लोकल मधला तो गुरांपेक्षाही वाईट दररोजचा प्रवास असो, पुस्तक सोबत असलं, की त्या सगळ्या त्रासाचा क्षणात विसर पडतो. कोर्टातला तो कंटाळवाणा आणि न कळणारा शब्दच्छल, लोकलमधली घामट गर्दी, घर-ऑफिसच टेन्शन या सर्वावर माझ्यासाठी पुस्तक हा जालीम उतारा आहे. सततच टेन्शन, स्ट्रेस वैगेरेमुळे रक्तदाब, मधुमेहसारखे आपल्याकडे मुक्कामाला आलेले भाडेकरू हळूहळू ‘ओनरशिप’चा अधिकार घेऊन कधी बसतात तेच कळत नाही. पुस्तकासारखं व्यसन असेल तर मात्र मुळात ते मुक्कामाला येत नाहीत आणि आले तरी ‘लिव्ह अंड लायसेन्स’धारकासारखे बघा कसे गुमान आपल्या यत्तेत राहतात ते.

मी हे पुस्तकांबद्दल बोलत असलो तरी हा नियम सर्वप्रकारच्या छंदांसाठी लागू आहे. माणसाला छंद हवा, कोणताही चालेल, पण हवा..! मन रमून, एकाग्र होऊन मन:शांतीचा समाधीसारखा अनुभव देणारा छंदांसारखा दुसरा मार्ग नाही. एसी क्लास नको, महागडी फी नको, कुठलीही अवघड आसनं नकोत की कोणताही ड्रेस कोड नको एवढे फायदे छंदांचे असतात. इतर छंदांना कदाचित काही पथ्य पाळावी लागत असतील किंवा पायपिट, कष्ट करावे लागत असतील, माहित नाही, पण पुस्तकाचे असले काहीच चोचले नसतात. अगदी स्मशानातही चीतेवरील असामी व्यवस्थित जळेपर्यंत पुस्तक काढून निवांत वाचत बसता येतं. तसा फार खर्चिकही नाही हा छंद. मुंबईसारख्या शहरात तर रद्दीवाल्यांची दुकान आणि फुटपाथवर कितीतरी पुस्तक एकदम कचरे के भाव मिळतात. कचऱ्यातून मूल्य न करता येणारं अमूर्त सोनं देणारी ही जगातली एकमेव गोष्ट असावी.

शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मन:शांतीची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे समाधी अशी जर समाधीची व्याख्या असेल, तर ती पुस्तक वाचनाला अगदी फिट्ट बसते असं मी खात्रीने म्हणू शकतो..!

-नितीन साळुंखे

9321811091

एकमेकांपासून दूर असलेल्या, एकमेकाला प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या, भेटण्याची शक्यता धुसर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये एका नात्याचा बंध निर्माण होतो त्याला काय नांव द्यावं कळत नाही..काहीतरी गुढ, अनामिक, हवसं वाटणारं आणि हुरहूर लावणारं घडत असतं हे नक्की..

हे नातं फक्त त्या दोघांनाच ठाऊक असतं..आपापल्या ठिकाणी लौकीक बंधनात असूनही त्यांना या अलौकीक नात्याची अनावर ओढ लागते..इथं वय, जात, भाषा आदी बेड्या नसतातंच.. एकमेकांच्या समोर नसूनही एकमेकाचं सुख-दु:ख, राग-लोभ या भावनांची अचूक जाणीव कशी काय होत असावी हे ही कोडंच आहे..इथे एकमेकांचे सुक्ष्म मन-देह एकमेकांना त्यांच्याही नकळत भेटत असावेत काय?

..आणि माय ‘मुंबाई’च्या पोटी माझा पुनर्जन्म झाला…!

..आणि माय ‘मुंबाई’च्या पोटी माझा पुनर्जन्म झाला…!

मुंबई. देशातील अनेकांच्या स्वप्नातलं शहर, तसाच अनेकांची स्वप्नपूर्ती
करणारंही शहर. देशातील कोणत्याही कोपऱ्यातून डोळ्यात स्वप्न आणि मनगटात
जिद्द घेऊन मुंबईत येणाऱ्या कोणत्याही माणसाला, मुंबई आपल्या पदराखाली
घेते. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अबोल मदतही करते. मुंबई
कल्पवृक्षासारखी कल्पनगरी आहे. संपत्ती, समृद्धीची देवता महालक्ष्मी
समुद्रमंथनातून उगम पावली होती, अशी पुराणकथा आहे. मूळ सात बेटांच्या
स्वरूपात असलेली मुंबई नगरीही अशीच समुद्राच्या घुसळणीतून उगम पावली आणि
पाहता पाहता तिने देशाच्या लक्ष्मीचं स्वरूप प्राप्त केलं. मुंबई ही
समुद्रातून आणि समुद्रामुळे उगम पावलेली देशाची लक्ष्मी आहे. तशीच ती
अन्नपूर्णाही आहे. मुंबईच्या आश्रयाला येणारं कोणीही रात्री झोपताना
उपाशी राहत नाही, अशी हिची ख्याती.

‘अनंत हस्ते देस्ता मुंबापुरीने, घेशी किती दो करांनी’ अशी अवस्था मुंबईत
आलेल्या आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असलेल्या कोणाही व्यक्तीची
होते. अनेकांना अनेक रूपाने मुंबई पावली आहे. तिने अनेकांना अनेक गोष्टी
दिल्या आहेत. मला मात्र मुंबईने एक अतिशय आगळी वेगळी भेट दिली आहे, जिची
किंमत पैशांसारख्या नश्वर गोष्टीत करता येणंच शक्य नाही..!

माणूस कितीही मोठा झाला, पैसेवाला झाला तरीही त्याला ओळख नसेल तर त्या
मोठेपणाला काहीच अर्थ उरत नाही. ही ओळख मिळवायचा अनेकजण अनेक पद्धतीने
प्रयत्न करत असतात. त्यासाठी भलेबुरे मार्गही अवलंबत असतात. इतकं करून
त्यापैकी काही जणांना ओळख मिळतेही, ह्या ओळखीला आपण प्रतिष्ठा म्हणूनही
ओळखतो किंवा मिरवतो. ही प्रतिष्ठा खरी किंवा ओढून ताणून आणलेली किंवा
सांप्रतच्या कलियुगात चक्क खोटीही असू शकते. .

ही झाली सार्वजनिक ओळखीची गोष्ट एका माणसाला, अनेक कारणांनी, इतर काही
माणसांनी ओळखणे, ही त्या माणसाची सार्वजनिक ओळख झाली. अशी ओळख आपल्यापैकी
प्रत्येकाला असतेच. ह्या पलीकडील आणखी एक ओळख असते. त्या ओळखीची जाणीव
प्रत्येकाला असतेच असं नाही. पुन्हा ती ओळख काही फार महत्वाची असते,
असंही अनेकांना वाटत नाही. ती म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख पटणे. ‘मला
मुंबईने एक अतिशय आगळी वेगळी भेट दिलीय’ असं मी जे म्हटलं आहे, ते याच
ओळखीबद्दल. मुंबईने माझी मलाच ओळख करून दिली आहे. मी काय करू शकतॊ
ह्याची, मी किती उंच भरारी घेऊन शकतो ह्याची, माझ्यातील क्षमतांची ओळख
मला मुंबईने. आईने जन्म दिला. तिचे उपकार फेडणं अशक्य. तसंच आयुष्याच्या
एका टप्प्यावर मी कोण, कोऽहम् ह्या प्रश्नाचं उत्तर मला एका प्रसन्न
क्षणी मुंबईने दिलं, म्हणून तिच्याही उपकाराची फेड मला अशक्य. मला जन्म
दिला ती माझी आई, तर मला स्वतःचीच ओळख करून देऊन मला नव्याने जन्म दिला,
ती माझी ‘मुंबाई’..!

आपल्याला इतर कुणी ओळखो, वा ना ओळखो, आपण स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं
असत. मी स्वतःला ओळखू शकलो ते मुंबाईमुळे..! हे कस घडलं, ते ही सांगतो.
अश्याच कधीतरी अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळात, माझ्यासमोर गोविंद
मडगावकरांनी लिहिलेलं ‘मुंबईच वर्णन’ हे पुस्तक आलं. अतिशय आकर्षक अश्या
जुन्या मराठीत लिहिलेल्या त्या पुस्तकाने मला अगदी झपाटून टाकलं. मी
अनेकदा त्या पुस्तकाचं वाचन केलं, पण मन भरेना. मग केवळ मुंबई शहर ह्या
विषयावर, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात लिहिल्या गेलेल्या
अनेक पुस्तकांचं वाचन केलं. त्या पुस्तकांतून दिलेल्या खुणांच्या शोधात
मी मुंबईभर भटकत गेलो आणि मडगावकरांच्या पुस्तकात गोठलेल्या १८६२ सालच्या
बोंबेचा शोध, २०१६-१७सालच्या मुंबईत घेत गेलो. १५०हुन अधिक वर्षांच्या
काळात अनेक जुन्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, तर काहींनी आपलं रुपडं
बदललं होत. काळासोबत हे व्हायचंच. असं असलं तरी जुन्याचा काही अंशी वास
त्या ठिकाणी होताच. मला तो जाणवत गेला आणि टाईम मशीनमध्ये बसून मला त्या
काळात गेल्याचा अनुभव येत गेला. तरीही मधला काळाचा पडदा दूर होऊ लागला
आणि मी अनुभवलेलं शब्दांत उतरत गेलं. शब्दांत उतरलेलं मी सोशल मिडीयावर
टाकत गेलो. ते वाचणाराना आवडत गेलं आणि अनेकांनी पुढे मुंबईकडे त्यांची
पाहण्याची दृष्टी बदलत गेल्याच कळवलं. त्यांना आपल्या मुंबईबद्दल वेगळंच
प्रेम निर्माण झालं. ह्या निमित्ताने, मला लिहिता येतं, हा शोध माझा मलाच
लागला आणि ‘कोऽहम्’चं उत्तर मला मिळालं. माझी मला ओळख पटली माझा जणू
पुनर्जन्मच झाला आणि तो मुंबईच्या पोटी झाला..! त्याक्षणी मुंबई माझी,
‘माय मुंबाई’ झाली..!!

मला लिहिता येतं, हा शोध लागला आणि माझी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच
बदलून गेली. आयुष्य सुंदर होतंच, ते अधिक देखणं भासू लागलं. अशा-निराशा,
दुःख-आनंद तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत जात असतात. मी ही त्याला अपवाद
नाही, पण मला पटलेल्त्या या माझ्याच ओळखीमूळे मी त्या पलीकडे पाहायला
शिकलो. हे मुंबईचे माझ्यावरचे उपकारच होते.

मुंबईने मला माझी ओळख पटवली. लिखाण करायला मुंबईने मला असंख्य विषय
पुरवले. त्यावर भरपूर लिखाण केलं. विविध विषयावर केलं, पण त्या लिखाणाचा
केंद्रबिंदू मुंबई होता. मुंबईचा इतिहास, मुंबईच्या गल्ल्या, रस्ते,
देवळं-मशिदी-चर्चेस,, मुंबईला घडवणारी त्याकाळातली माणसं, इतकंच कशाला
मुंबईची टॅक्सी, हातगाडीवरही लिहिलं. लिहिलेलं सोशल मिडीयाच्या
माध्यमातून लोकांसमोर ठेवत गेलो. ‘मुंबाई’चं ऐतिहासिक समृद्धपण इतरांनाही
माहित व्हावं आणि मुंबईच्या लेकरांची तिच्यवरची माया वाढावी, या साठी हा
प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी सफल होतोय, असही माझ्या लक्षात येत गेलं.
मी लिहू शकतो, हा शोध मला ज्या मुंबईमुळे लागला, तिच्यावरच लिहून तिच्या
माझ्यावरच्या अनंत उपकारांची अल्पशी फेड करण्याचा माझा हा प्रयत होता..

आज मी पूर्णपणे मुंबईमय झालेलो आहे. मीच मुंबई आहे अशी माझी भावना आहे.
मुंबई माझी दुसरी आई, माय मुंबाई आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने
मुंबईबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचं आवाहन केलं आणि माझ्या अनावर भावना
शब्दरूपात उतरत गेल्या. म.टा. ने घेतलेली स्पर्ध रद्द झाली किंवा कसे, ते समजलं नाही.
म्हणून साधारण वर्षभर वाट पाहून
त्याच माझ्या भावना
आपल्यासमोर ठेवल्या आहेत..!!

-नितीन साळुंके
9321811091
salunkesnitin@gmail.com

स्वार्थ..

स्वार्थ..

कोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातल्या त्यात एका नात्याला स्वार्थ स्पर्श करत नाही असं म्हणता येईल आणि ते म्हणजे आई आणि मुलातलं नातं. सर्वात नैसर्गीक आणि निरपेक्ष म्हणावं असं हे एकमेंव नातं. बाकी सर्व नाती ‘कुछ रिश्ते मुनाफ़ा नहीं देते, मगर ज़िन्दगी को अमीर बना देते हैं..!’ असं म्हणून फक्त ‘मुनाफा’ हाच हेतू ठेवून झालेली असतात. अगदी मुल आणि आई या नात्यातही स्वार्थ असतोच.।!

मातृत्वाची भावना वैगेरे सर्व सत्य असलं तरी मनुष्याच्या जन्माला त्याच्या आईचा (आणि वडीलांचाही) स्वार्थ कारणीभूत झालेला असतो. (मुलाच्या जन्मापूर्वीचा वडीलांचा स्वार्थ स्पष्ट असल्याने वडील-मुल या नात्यावर मी इथं लिहीलेलं नाही. परंतू ‘आई’ हा विषयच वेगळा असल्याने त्यावर थोडंसं लिहीलय.). एकदा का मुलाचा जन्म झाला की मग आईच्या मनी ‘माझं मुल’ ही निस्वार्थी भावना जन्म घेते आणि मग ती तिच्या शेवटापर्यंत टिकते. पण तो पर्यंत ‘मला आई व्हायचंय’ हा स्वार्थ असतोच. माणसाचा जन्मच असा स्वार्थातून झालेला असल्याने स्वार्थीपणा त्याचा जन्मापासूनचा साथीदार आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही असं मला वाटतं. माकडीन आणि तिने स्वत: बुडत असताना स्वत:चा जीव वाचावा म्हणून पायाखाली घेतलेल्या तिच्याच पिलाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. स्वत:चा जीव वाचावा म्हणून आपल्याच पोराला पायाखाली घेणाऱ्या माकडीनीचेच आपण ‘वंश’, आपण तसेच असायचे. बाकी माणूस हा देवाचा ‘अंश’ वैगेरे आपली अंधश्रद्धा आहे..!!

स्वार्थ नसता तर आता आपण जी काही प्रगती पाहातोय, ती झाली नसती. स्वार्थापोटी गती असते आणि म्हणून प्रगती होते. जे माझं नाही त्याचा विचारही मी करणार नाही ही भावना सर्वच सामान्य मनुष्यमात्रांच्या ठायी असते. तशी भावना, तसा विचार साम्यवादी राजवटींमधे करायला मनाई असते आणि म्हणून तर एके काळी बरोबरीची राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील जनता प्रगतीची नवनविन शिखरं पादाक्रांत करत असताना, रशीयासारखं साम्यवादी राष्ट्र जरी पुढे जाताना दिसत होतं असलं, तरी त्या राष्ट्रातील जनता मात्र अधोगतीकडे जाताना दिसत होती. रशीयन महासत्तेचं ‘महासत्ता’ म्हणून पतन होण्यामागे जी काही अनेक कारणं आहेत, त्यामधे ‘हे तुमचं नसून सरकारचं आहे’ ही त्या देशातील कायद्याने जनतेची करून दिलेली सक्तीची भावना हे ही एक कारण आहे. जे सरकारी असतं ते कोणाचंच नसतं हा आपलाही अनुभव आहे आणि म्हणून मुंबईच्या लोकल गाड्यांमधे घोषणा करावी लागते, की ‘रेल आपकी संपत्ती है, कृपया इसे नुकसान न पहुंचाये’ ती म्हणूणच. रशीयन संघराज्यातील (युनीयन ऑफ सोव्हीएट सोशालिस्ट रिपब्लीक-USSR) जनतेला स्वार्थ अलाऊड नसल्याने त्याची संघराज्य त्याच्यापासून विलग होऊन त्या महासत्तेच पतन झालेलं अलिकडचं सर्वात मोठं आणि ठळक उदाहरण.

स्वार्थ मुळीच वाईट नसतो. वाईट असते ती स्वार्थाची मात्रा. ती जेवढी जास्त, तेवढी वाईट. स्वार्थाची भावना जपताना आपल्यासोबत दुसऱ्याचही भलं कसं होईल ही भावनाही जपली, तर तो स्वार्थ वाईट कसा म्हणता येईल..? माझ्यासहीत दुसऱ्याचंही भलं होवो इतपत मात्रेचा स्वार्थ केंव्हाही चांगलाच. आपल्या देशात तर ‘स्वार्थ मे परमार्थ’ ही म्हणच आहे. पण माझं आणि माझंच भलं होवो ही भावना जेंव्हा बळावू लागते तेंव्हा मात्र ती त्या माणसासाठी आणि तो ज्या समाजाचा घटक असतो, त्या समाजासाठीही धोक्याची घंटी असते. माझं आणि माझंच याचा अर्थ क्रमाने मी, माझं कुटुंब, माझ्या पुढच्या दहा-पंधरा पिढ्या आणि काही नातेवाईक एवढाच घ्याया. मग त्यासाठी दुसरे, त्यांची कुटुंब व त्याच्या पिढ्याही व प्रसंगी देशही बरबाद झाला तरी हरकत नाही असं वाटायला लावेल येवढी ही मात्रा अशा लोकांच्यात मोठ्या प्रमाणात असते. फक्त मलाच किंवा माझ्या मुला-पत्नींला निवडणूकीचं टिकीट मिळावं असं नाटणारे नेते, लाच खाऊन कोणतीही बेकायदेशीर कामं बिनधास्तपणे आणि तत्परतेनेही करणारे सरकारी कर्मचारी-अधिकारी, भेसळ करणारे व्यापारी, विश्वास ठेवणाऱ्याचा गळा बिनदिक्कत कापणारे मित्र, दुसऱ्याच घर विस्कटून स्वतःच घर बांधणारे स्वकीय अशी अनेक माणसं आपल्या आजुबाजूला दिलतात. अशी माणसं वेळ पडल्यास स्वार्थासाठी कोणाचाही आणि कशाचाही सौदा करताना दिसतात.

हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे हल्ली यत्र तत्र सर्वत्र बोकाळलेला अतिस्वार्थवाद..! दुसऱ्याचं घर विस्र्कटून स्वत:चं घर बांधणारांची संख्या वाढताना दिसत आहे. अतिस्वार्थाचं हे प्रॉडक्ट..! स्वार्थ मनुष्याला कळायला लागलं तेंव्हापासून त्याच्यात आहेच. पण तो साधताना दुसऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी पूर्वी घेतली जायची. स्वार्थापोटीच अनेक कामं केली गेली व पुढे ती सर्वांच्याच उपयोगास आली अशी अनेक उदाहरण पूर्वीच्या काळात घडलेली मुंबई शहराच्या जडणघडणीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आली. ब्रिटीशांनी आपल्या देशात रेल्वे व पोस्टासारख्या ज्या अत्यावश्यक सोयी केल्या त्यामागे त्यांच्या सैन्याची जलद हालचाल व वेगाने संपर्क व्हावा याच हेतून. त्याद्वारे या देशावर प्रभावीपणे राज्य करता यावं हा त्यांचा स्वार्थी हेतू त्यात होता. परंतू त्याचे फायदेही त्यांना आपल्या देशातील स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिले व त्याची फळं आपण आजतागायत चाखतो आहोत.

पारतंत्र्यात जे काही करायचं ते देशासाठी हीच भावना होती. होती म्हणजे नैसर्गिकरित्याचं होती. स्वातंत्र्यानंतर स्व-देश निर्माण होताच, कुठंतरी पक्षाप्रती निष्ठा ठेवली जाऊ लागली. पुढं हळुहळु ही निष्ठा व्यक्ती केंद्रीत झाली आणि आता तर ती ‘मी’ आणि ‘माझं’पुरती मर्यादीत झालेली दिसते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा बदल झालेला दिसतो. ‘सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामय:’ पासून ‘अहं भवानि सुखी, अहमसानि निरामय:’ पर्यंतचा अलिकडच्या काळातील हा बदल चिंताजनक आहे. ‘मला काय करायचंय’, ‘मै भला-मेरा काम भला बाकी दुनिया गेली खड्ड्यात’ ही वृत्ती बळावू लागलीय. ‘माझंच नव्हे तर संपूर्ण विश्वाच भल होवो’ असं पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची परंपरा मोठ्या अभिमानाने सांगणारे आपण, एवढे कसे बदललो?

-नितीन साळुंखे

9321811091

मै सूर्य हूं..

मै सूर्य हूं..!!

चलते-चलते इतना थक गया हूँ,
के चल नहीं सकता..
मगर मैं सूर्य हूँ,
संध्या से पहले रुक नहीं सकता..!!

आज सकाळीच हा अर्थगर्भ शेर उगाचंच आठवला आणि मनात अनेक तरंग निर्माण झाले. वरवर उदासीची छाया असणाऱ्या या शब्दांत प्रचंड उर्जा ठासून भरलेली आहे, असं जाणवलं आणि एक नविनच उत्साह तनामनात भरुन आला. शेर सूर्याशी संबंधीत असल्याने, त्यात उर्जेशिवाय आणखी काय मिळणार?

किती खरं म्हणालाय तो अनामिक शायर. न थकता, क्षणभरही विश्रांती न घेता सतत आपल्या गतीने चालणाऱ्या सूर्यापासून कितीतरी गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे. सूर्याचा धर्मच प्रकाशणे आणि दुसऱ्याला कोणताही दुजाभाव न करता उर्जावान करणे हा आहे. वादळ-ढग येवोत, ग्रहणं लागोत किंवा आणखी काही विपरीत होवो, क्षणभर अंधारल्यासारखं होऊन हा सहस्त्ररश्मी आपला पुन्हा आपल्या सहस्त्र हातांनी सर्वाना प्रकाशातं दान देत उभाच. म्हणून तर मला वाटतं भल्या भल्यांना ‘दे माय, धरणी ठाय’ करणारे सर्व ताकदवान ग्रह याच्याभोवती लीन होऊन फेर धरून नाचत असतात, नव्हे सूर्य त्यांना तसा नाचायला लावतो, त्यांच्याही नकळत..

सूर्य ढगाआड जातो, पावसाळ्यात चार चार दिवस दिसत नाही, ग्रहणात टिचभर चंद्र किंवा मुठभर पृथ्वी त्याला गिळण्याचं धारीष्ट्य करतात, परंतू तो सर्वांना पुरून उरतो. घनघोर ढगांआडून किंवा चंद्र-पृथ्वीच्या आडूनही आपला प्रकाश, आपली उर्जा तर समोर फेकतच राहातो. ग्रहणात तर अत्यंत दुर्मिळ आणि तेवढीच प्रखर तेजस्वी असणारी ‘डायमंड’ रिंग तयार होते. या वेळी त्याच्याकडे बघणाऱ्याची दृष्टी दिपतच नाही, तर कायमची जाते येवढं तेज त्याच्यात असतं असं म्हणतात.

‘नारायण’ या शब्दात ‘नर’ हा शब्द नैसर्गिकरित्याच अंतर्भूत असल्याने, ‘नर’ हा ‘नारायणा’चाचत अंश असं म्टलं तर चुकू नये. आणि एकदा का नर हा नारायणाचा अंश हे मान्य केलं, की मग नारायणातली सर्व वैशिष्ट्य आपल्यात आहेतच, हे ही मान्य करावं लागतं. सूर्याचे अंश असणाऱ्या आपल्याला त्याची कवच कुंडलं वारसाहक्कातून आपल्याकडे आली आहेत, हे आपल्यापैकी वरच्या चारओळींतील पहिल्या दोन ओळी म्हणणारे अनेकजण पार विसरूनच जातात, त्यांनी वरच्या चार ओळीतील शेवटच्या दोन ओळी नेहेमी मनावर कोरून ठेवल्या पाहिजेत. चालता चालता थकलेल्यानीच कशाला, शेवटच्या दोन ओळी आपण सर्वांनीच लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतं.

ललाटीच्या वाट्याला आलेलं आयुष्य जगताना, आपल्यासमोर अनेक प्रसंग काळ्याकुट्ट ढगांलारखै अकस्मात येतात. आता सारं सपलं असं वाटायला लावणारी अनेक लहान मोठी ग्रहणं आपल्यालाही लागतात. अशा प्रसंगी अनेकजण हरतात, थकतात आणि काहीतर हताश हतबल होऊन स्वत:लाही अकाली संपवतात. वरचा शेर अशा प्रसंगी धैर्य देतो. संकटांच्या ढगांआडूनही प्रकाशत राहायचं आणि समोरच्या एव्हरी काळ्या क्लाऊडला सिल्व्हर लायनिंग द्यायची ताकद किंवा त्या काळ्याकुट्ट ग्रहणातली प्रखर आणि डोळे दिपवून टाकणारी ‘डायमंड रिंग’ बनवायचं सामर्थ्य त्या तेजोनिधीचे अंश असणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या अंगी असते हे प्रत्येकाने स्वत:ला शिकवण्याची हिच तर वेळ असते. सूर्याप्रमाणेच त्याचेच अंश असणाऱ्या आपल्यालाही झाकोळून टाकण्याची ताकद कोणातच नाही, हा दृढ विश्वास प्रत्येकाने मनात जपायला हवा..

अडचणींच्या वेळी, आयुष्याच्या अवघड वळणांवर आपल्यापैकी अनेकजण ग्रह-ताऱ्यांचा आधार घेत वाट काढायचा प्रयत्न करुन थकतात, थबकतात. समोरच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत असं वाटताना, सूर्याला मध्य ठेवून त्याच्या भोवती फेर धरून फिरणाऱ्या परंतू सूर्याच्या तुलनेत अगदीच क्षीणं ताकद असणाऱ्या ग्रह-ताऱ्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी असे थबकलेले लोक किती खटपटी करताना दिसतात. स्वत: सूर्य असताना सूर्याच्या जवळपासही जाण्याची हिंम्मत नसणाऱ्या शनी, मंगळ, राहू, केतुदी ग्रहांच्या नादी लागण्यापेक्षा स्वत:तल्या सुर्याला ओळखा, असाही संदेश वरील चार ओळी देतात असं मला वाटतं..

सूर्य जीवनरस आहे. तो कधीही सुकत नाही. सूर्य कधीही थकत नाही. आयुष्यातील वळणावळणाची अनवट वाट चालताना कधी कधी चलते-चलते मै इतना थक गया हूँ, असं वाटणं सहाजिकच आहे;मात्र याच वेळी स्वत:ला मगर मैं सूर्य तो हूँ, संध्या से पहले रुक नहीं सकता ह्याची आठवण देत पुढे चालतच राहायचं असतं. ज्योतिषशास्त्रातही एखाद्याचे आयुष्य किती असेल आणि ते कसं जाईल ह्याचा वेध घेताना, त्याच्या कुंडलीतील इतर ग्रहांपेक्षा सुर्य कसा आहे हे बघीतलं जातं, ते बहुदा याचसाठी असावं.

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!!

-नितीन साळुंखे
9321811091

शोध ‘दादर(पश्चिम), मुंबई क्र. ४०० ०२८’चा; व्हाया माहिम..

‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’

शोध ‘दादर(पश्चिम), मुंबई क्र. ४०० ०२८’चा; व्हाया माहिम..

मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतला आजचा सर्वात महत्वाचा भाग असलेल्या ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही. मुंबई शहराचा इतिहास सांगणाऱ्या ‘महिकावतीच्या बखरीत वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नायगांव, परळ, सायन इत्यादींचा उल्लेख आहे.।ब्रिटीशकालीन इतिहासाच्या पुर्वार्धात, वरील ठिकाणांसेबत कुलाबा, माहिम, माजगांव, माटुंगाही येतं, पण ‘दादर’ मात्र कुठंही लागायचं नाही.

मुंबईच्या हृदयस्थानी वसलेल्या, आजच्या ‘दादर’सारख्या अतिमहत्वाच्या भागाचा उल्लेख इतिहासात का नाही, हा कुतुहलमिश्रीत प्रश्न मला नेहेमी पडायचा. हा प्रश्न अधुनमधून मला अस्वस्थ करायचा. पण, धूर दिसतोय म्हणजे आग आहे, या न्यायानं, आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, मग ते तेव्हांही असलं पाहिजे. आणि जुन्या काळातही जर दादर असेल, तर मग ते कुठे आणि कोणत्या स्वरुपात, हा प्रश्नही सहाजिकच समोर उभा राहातो..!

या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना, उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांसोबत तर्कबुद्धीही वापरावी लागेल, हे हळुहळू माझ्या लक्षात येऊ लागलं आणि अशाप्रकारे तथ्य आणि तर्क वापरून, इतिहासातील दादरच्या अस्तित्वासंबंधी मला जे आकलन झालं, तेच आपल्यासमोर ठेवतोय..!

सुरुवात करताना ‘दादर’ या नांवाच्या प्रचलीत व्युत्पत्तीपासून करतो.

स्वत:च्या कपाळावर मुंबई क्रमांक १४ आणि २८ धारण करणाऱ्या मुंबईतल्या या सध्याच्या दादर परिसराला नांव मिळालं, ते ‘दादर म्हणजे जिना’ या अर्थामुळे, अशी एक लोकप्रिय कथा सांगितली जाते. परंतु, ही कथा मुळीच पटण्यासारखी नाही. कारण त्याकाळचं मुंबई शहराचं अस्तित्व होतं, तेच मुळी कुलाब्यापासून भायखळा-माजगांव पर्यंत. त्यामुळे सर्व लोकवस्ती, व्यापार उदीम, सरकारी व सामान्य लोकव्यवहार मर्यादीत होते, ते फोर्टच्या तटबंदीच्या आत आणि तटबंदी बाहेरच्या मैलभरच्या परिघात.

मुंबईच्या इतिहासप्रसिद्ध सात बेटांमधे, चहुबाजुंनी बांध घालून समुद्राच्या दिशेने आत येणारं पाणी अडवण्यापूर्वी ही सातही बेटं सुटी सुटी आणि टेकड्यांच्या स्वरुपात होती. आजही मुंबई शहरातल्या कधीकाळी अस्तित्वात असलेल्या ह्या टेकड्या सौम्य स्वरुपात आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या शिवडी-परळ, वरळी, माजगांव परिसरात फिरताना अनुभवायला येतात. ॲन्टाॅप हिल, मलबार हिल हे परिसर तर आपल्या नांवातच ‘हिल’ धारण करताना आपल्याला सांप्रत काळातंही दिसून येतात. टेकडी आली की, चढ-उतार आलेच. त्यामुळे जुन्या मुंबईच्या प्रत्येक बेटरुपी टेकडीवर चढ-उतार असणारच. चढ-उतार करणं सोपं जावं म्हणून, त्यापैकी प्रत्येक किंवा काही महत्वाच्या टेकड्यांच्या उतारावर पायऱ्या खोदलेल्या असणारच. हे म्हणणं अधिक स्पष्ट करण्यासाठी, मला मुंबईच्या मलबार हिलचं उदाहरण द्यायला आवडेल.

मुंबईची सुप्रसिद्ध सात बेटं

मलबार हिलच्या पूर्व उतारावर, अगदी आजही एक रस्ता आपल्या नांवात ‘सिरी रोड’ हे नांव धारण करुन अस्तित्वात आहे. ‘सिरी रोड’ या नांवातलं ‘सिरी’ हे विशेषण ‘शिडी’ या अर्थाने आलेलं आहे. मलबार हिल हा त्याकाळातल्या (आजच्या काळातल्याही) बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि कुबेरपुत्र/कन्यांच्या निवासाचा परिसर होता. त्याही पूर्वी मलबार हिलवरचं वाळकेश्वर म्हणजे हिन्दूंचं प्रसिद्ध तिर्थस्थळ होतं. आजही तिकडची अनेक देवळं आणि बाणगंगेचा तलाव याची साक्ष देत खडे आहेत. थोडक्यात मुसलमान राजवट, नंतरची पोर्तुगीज सत्ता आणि त्या नंतरच्या ब्रिटिश काळातही मलबार हिल हे अत्यंत महत्याचं ठिकाण होतं. त्यामुळे त्या परिसरात लोकांची सातत्याने ये-जा असे. मलबार हिलवर ये जा करणं किंवा चढ-उतार करणं सोपं जावं म्हणून, टेकडीच्या उतारावर पायऱ्या खणलेल्या होत्या. या पायऱ्यांना लोकबोलीतील ‘शिडी’ असं साधं, सोपं आणि कुणालाही चटकन बोध होईल, असं नांव दिलेलं होतं. काळाच्या ओघात पायऱ्या लुप्त झाल्या आणि त्या जागी वर चढत जाणारी प्रथम कच्ची आणि मग पक्की सडक झाली. तिथल्या ‘शिड्या’ आता नसल्या तरी, नव्याने झालेला ‘रोड’, आपल्या नांवात अजुनही ‘सिरी, अर्थात शिडी’ घट्ट कवटाळून आहे. पायऱ्यांवरून नांव धारण केलेला ‘सिरी रोड’ इतिहासात अजरामर झाला आहे. मग असं असताना, जुन्या काळातलं ‘दादर’ नेमकं कुठे असावं, हेच जिथे ठामपणे सांगता येत नाही, अशा दादरचं नांव ‘जिन्यां’वरून आलंय, ही व्युत्पत्ती पटण्यासारखी नाही.

गिरगाव चौपाटीच्या जरा पुढे, वाळकेश्वर फाट्यावर सुरु होणारा ‘सिरी रोड’

दादरचं नांव ‘जिन्यां’वरुन मिळालं आहे, ही व्युत्पत्ती न पटण्यासाठी आणखी एक उदाहरण आहे. दादर इथले जिने सुप्रसिद्ध असावेत, म्हणून मुंबईतल्या ह्या भागाला दादर नांव मिळालं ही व्युत्पत्ती बरोबर आहे, असं क्षणभर गृहीत धरलं, तर मग दादर या नांवाची आणखीही काही ठिकाणं आहेत. त्यातली काही मला माहित आहेत. त्यातलं एक दादर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात, पेण शहरापासून साधारणत: ७ किलोमिटर अंतरावर आहे. दुसरं एक दादर अलिबाग तालुक्यात चौल गावानजिक आहे. ओळखीसाठी ह्या दादरला चौल-दादर असं म्हणतात. अगदी दादर नसलं तरी, आपल्या नांवांत ‘दादर’ धारण करणारा पाडा, ‘दादर पाडा’, उरण नजिक आहे, तर असाच एक ‘दादरपाडा’ पालघर जिल्ह्यातील केळवे-माहिमजवळ आहे. या शिवाय, महाराष्ट्र-गुजरात सिमेवरच्या दमणगंगा नदीच्या दक्षिण तिरावरचं ‘दादरा-नगर हवेली’ हा केन्द्र शासित प्रदेश तर प्रसिद्धच आहे. ही सर्व ठिकाण नांवात दादर धारण करुन आहेत. मग जर का मुंबईचं दादर नांव ‘जिन्या’वरून आलं असं क्षणभर मानलं, तर मग या इतर ठिकाणी असलेल्या ‘दादर’ची नांव कशी पडली, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘जिना=दादर’ ह्या व्युत्पत्तीत सापडत नाही. सबब, मुंबईचं दादर हे नांव शिडी, जीना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेयरकेस इत्यादी शब्दांनी ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं, हे तर्कदृष्ट्या पटत नाही.

पेणनजीकच दादर आणि उरण नजीकच दादर

आता, जिना अथवा पायऱ्यांमुळे मुंबई-दादर नामक स्थानाचा उगम झाला ही व्युत्पत्ती खोडून काढल्यावर, एकच शक्यता उरते;आणि ती म्हणजे इतिहासातही आजचं दादर, ज्याची दखलही घ्यावीशी वाटू नये अशा नगण्य स्वरुपात अस्तित्वात होतं, ही. दादर अस्तित्वात होतं, तर मग नेमकं कुठं लपलं होतं, याचा शोध घेणं क्रमप्राप्त होतं. सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे, धूर दिसतोय म्हणजे आग आहे, या न्यायानं, आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, मग ते तेव्हांही असलं पाहिजे. पण कुठं?

इतिहासात दडलेल्या दादरचा, वर्तमान काळात शोध घेताना, मी ‘महिकावतीची बखर’ या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. ह्या बखरीत उल्लेख केलेल्या प्रमूख घटना जरी इ.स. ११३८ ते इ.स. १३४८ अशा साधारण २१० वर्षांच्या कालावधीत घडलेल्या असल्या तरी, ही बखर त्यानंतरच्या वेगवेगळ्या काळात लिहिली गेली आहे. बखरीचं लिखाण इ.स. १८१९ मधे समाप्त झालं आणि त्यानंतर जवळपास १०५ वर्षांनी, म्हणजे इ.स.१९२४ मधे राजवाडेंनी त्यावर भाष्य केलं आहे.

दादरचा शोध घेताना ‘महिकावतीची बखर’ आधारभूत घेण्याच कारण म्हणजे, या बखरीत उल्लेख केलेल्या स्थळांचा आणि स्थलनामांचा वर्तमानातील मुंबई शहराशी दाट संबंध आहे. बखरीत उल्लेख केलेली ७-८शे वर्षांपूर्वीची मुंबई शहरातील व उपनगरातील ठिकाणं, त्यांच्या नांवांचा किंचितसा अपभ्रंश होऊन आजही मुंबई शहरात नांदताना दिसतात. उदा. वाळुकेश्वर, भाईखळे, जुहू, आंधेरी इत्यादी. यामधे आजच्या मुंबई शहरातील माहिम व्यतिरिक्त, वाळुकेश्वर आणि भाईखळे अशी केवळ दोन नांवं आहेत, इतर सर्व नांवं साष्टीतली आहेत.

महिकावतीच्या बखरीत दिलेली गावाची तेंव्हाची नांवं

बखरीत या नावांचा उल्लेख आहे याचा अर्थ, ती नांवं बखरपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत असा होतो. नांवं आहेत, मग ती तशी पडण्यामागे काही तरी कारण असणारच, हे बरोबर. पण मग ते कारण, त्याकाळातलं लोकजीवन आणि त्याकाळातल्या लोकभाषेत शोधावं लागेल आणि त्या काळातलं जीवन आणि बोली नेमकी काय होती, हे आता सांगणं अवघड आहे. त्यामुळे त्या नांवाची व्युत्पत्ती, वर्तमानाच्या फुटपट्ट्या लावून शोधण्यात काही अर्थ नाही. बखरीत दादरचा उल्लेख नाही, पण आजच्या दादरच्या आजुबाजूची काही ठिकाणं त्यात आहेत आणि म्हणून केवळ याचसाठी महिकावतीची बखर आधारभूत म्हणून घेतली आहे. बखरीत दिलेली, आजच्या दादरची आजुबाजूची ठिकाणं लक्षात घेऊन, इतिहासील दादरचा नेमका ठिकाणा काय होता, याचा शोध तर्कबुद्धी वापरून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आता दादरचा शेध घेण्यासाठी आपण आजपासून सुमारे आठ-नऊशे वर्ष मागे जाऊन, म्हणजे ‘महिकावतीची बखर’ मधल्या, मुंबईचा राजा ‘प्रताप बिंम्बा’च्या काळाचा धावता आढावा घेऊ.

गुजरातेतल्या अनहिलवाडच्या चालुक्याचा मंडलिक असलेल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंम्बाचा भाऊ प्रताप बिंम्ब, शके १०६०, म्हणजे इसवी सन ११३८ मध्ये, पैठण मार्गे उत्तर कोकणवर स्वारी करून आला. उत्तर कोकण म्हणजे साधारणत: नर्मदेच्या दक्षिण तिरावरल्या, गुजरातेतल्या, दमण पासून ते मुंबईच्या मलबार हिलपर्यंतचा प्रदेश. इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंम्बाने दमणवर स्वारी करुन, दमण सहित चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहिम, वसई पर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला.

नव्याने काबिज केलेल्या प्रदेशात आपल्या मूळ देशातून, म्हणजे गुजरातेहून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी इत्यादी कुळांना आणून वसवलं. पैठणहून काही लोकांना या परिसरात वास्तव्यासाठी निमंत्रण धाडलं. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर प्रताप बिंम्बाने केळवे-माहिमला आपली नविन राजधानी वसवली आणि इसवी सन ११४२ मधे पुढच्या मोहिमेस, म्हणजे वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश सर करण्यास जाण्याची आपल्या सेनापतीस आज्ञा केली. प्रताप बिंम्बाच्या आज्ञेनुसार, त्याच्या सेनापतीने वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश काबिज केल्यावर, राजा प्रताप बिंम्ब मुंबईतल्या माहिम बेटावर पोहोचला आणि तिथे त्याने आपली राजधानी स्थापन केली आणि आपल्या राजधानीस त्याने ‘माहिम’, अर्थात महिकावती असं नांव दिलं. आपण आज जो भाग ‘माहिम’ म्हणून ओळखतो, त्याचा ‘माहिम (महिकावती)’ ह्या नांवाचा पहिला उल्लेख इथेच सापडतो.

बिंम्ब राजा इथे येण्यापूर्वीही मुंबईची बेटं अस्थित्वात होती, निरनिराळ्या काळात अनेक राजघराण्यांनी मुंबई बेटांवर कमी-अधिक काळ राज्यही केलं होतं. परंतु त्या काळात मुंबईच्या सात बेटांची नांवं काय होती, त्याची नोंद मला तरी कुठे सापडली नाही. प्रताप बिम्बाने मुंबईतल्या माहिम बेटावर राजधानी केल्यावर, या बेटाचं नामकरण त्याने ‘माहिम’ असं केलं. मुंबई-माहिम’ इथल्या आपल्या नविन राजधानीच्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी, केळवे-माहीम परिसरातील सोमवंशी-सूर्यवंशी कुळातील अनेक कुटुंबं आणली आणि त्यांना माहिम बेटावर वसवलं. आजही माहिममधे अद्याप टिकून असलेल्या अनेक जुन्या माहिमकरांची गांव आणि नातेसंबंध केळवे-माहिम-पालघर-चिंचणी आणि परिसरात सापडतात, ते यामुळेच.

बिंम्बाने मुंबई-माहिमला आपली राजधानी वसवल्या नंतरच्या काळातही, बिम्बाच्या केळवे-माहिम परिसरातून लोक इथे वस्ती करण्यासाठी येत असावेत. आपापल्या मूळ गांवाशी घट्ट नाळ जुळलेल्या या लोकांनी, माहिम परिसरात वसताना, आपल्या केळवे-माहिम येथील मूळ गांवांची आणि तेथील दैवतांची नांवंही सोबत आणली आणि ती नव्या ठिकाणच्या वस्त्यांना दिली असावीत, असं म्हणता येतं. ती नांवं आजही टिकून असलेली आपल्याला दिसून येतं. राजा प्रताप बिम्बाने आपली जुनी राजधानी केळव्याकडच्या ‘माहिम’चं नांव दिलेलं आहे. ही दोन्ही ठिकाणं समुद्राच्या सानिध्यात आहेत. इथून जवळच ‘धारावी’ आहे, जी विरार पलिकडच्या प्रदेशातही सापडते. किंबहूना मुंबई-माहिम आणि मुंबई-धारावी हे जोड प्रदेशही आहेत. तिकडचं ‘नायगांव’, मुंबईतही पाहायला मिळतं. राजा बिंम्बाची कुलदेवता श्रीशाकंबरी, अर्थात श्रीप्रभादेवी मुंबई-माहिमातच होती. केळवे-माहिम परिसरातली श्रीशितळादेवी मुंबई-माहिमलाही आहे. ह्या काही मोजक्या(च) उदाहरणांवरून, मुंबई-माहिम परिसर ही, केळवे-माहिम परिसराची प्रतिकृती (Replica) होती किंवा आहे, असं अनुमान काढल्यास ते फारसं चुकणार नाही.

पूर्वीच्या राज्यकर्त्यांची ही पद्धतच असावी, असं इतिहासावरून म्हणता येतं. एखाद्या राजाने नवीन ठिकाणी राज्य वसवलं की, आपल्या जुन्या ठिकाणची आणि देवतांची नांव नव्या ठिकाणी वस्ती करताना देण्याची प्रथा असावी. म्हणून तर एकाच नांवाची अनेक ठिकाणं वेगवेगळ्या जागी पाहायला मिळण्याचा अनुभव येतो.

आता, वरच्या हकिकतीशी ‘दादर’चा कसा काय संबंध येतो, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर, तो तसा संबंध तर्कबुद्धी वापरून प्रस्थापित करता येतो. केळवे-माहीम परिसरातील ठिकाणांची नांवं, प्रताप बिंम्बाने मुंबई-माहिम परिसरात दिल्याचं आपण पाहिलं. तोच न्याय लावला तर, आजच्या दादरचं, ‘दादर’ हे नांव कशावरुनही पडलेले नसून, ते इथल्याच एका लहानशा वस्तीचं असावं, असा तर्क सहज करता येतो.

वर आपण पाहिलं की, राजा बिंम्बाने केळवे-माहिम-पालघर भागातली काही कुळं मुंबई-माहिम परिसरात वस्ती करण्यासाठी आणली आणि ही माणसं आपल्यासोबत तिथली नांवं आणि दैवतं घेऊन मुंबई-माहिम परिसरात वसली. या केळवे माहिम-पालघर परिसरात ‘दादरपाडा’ नांवाचा भाग आहे. ह्या दादरपाड्याचं स्थान मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. किनारपट्टीवर वर उत्तरेला माहिमचा समुद्रकिनारा आणि दक्षिणेला केळव्याचा किनारा यांच्या बरोबर मधे, समुद्राची एक लहानशी खाडी आत येते, या खाडीच्या किनाऱ्यावरच दादरपाडा वसलेला आहे आणि या खाडीला ‘दादरपाडा खाडी’ असं नांव आहे. इथून नजिक मांगेलवाडा आहे आणि मांगेलवाड्यापासून थोड्या अंतरावर खालच्या बाजुला श्रीशितळादेवीचं मंदिरही आहे. दादरपाडा माहिम आणि केळवा या दोन ठिकाणांच्या सिमेवर आहे. नेमकी अशीच भौगोलिक ठेवण आणि हिच वैशिष्ट्य मुंबई-माहिमच्या परिसरात असलेली दिसतात आणि मग याच परिसरात कुठेतरी मुंबईतलं मूळ दादर असावं, ह्या तर्काला पुष्टी मिळते.

केळवे-माहीम नजीकचा दादरपाडा

या दादर पाडा भागातील किंवा त्या परिसरातील काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या सोबत आले असावेत व ते माहीम बेटाच्या दक्षिणेच्या टोकाला, म्हणजे आजच्या प्रभादेवी परिसरात वसले असावेत. मुंबई-माहिमचा समुद्रकिनारा आणि शेजारीच असलेली, माहिम आणि वरळी बेटांच्या मधली खाडी, नजिकच असलेलं शितळादेवीचं मंदिर आणि मुंबई-माहिममधे असलेला मांगेलवाडा(आता याचं नांव मांगेलवाडी असं झालं आहे) पाहून, त्यांना या भागाचं, आपल्या मूळ स्थानाशी साम्य दिसलं असावं आणि आपल्या इथल्या वस्तीला, ‘दादर पाडा’ असं आपल्या जुनंच नांव दिलं असावं आणि काळाच्या ओघात, त्या नांवातला ‘पाडा’ गळून आजचं ‘दादर’ झालं असावं, असं म्हटलं तर चुकू नये. मुख्य माहिमच्या वरळीकडच्या दक्षिण सिमेवर वसलेली ही लहानशी पाडा स्वरुपातली दादरची वस्ती असावी असा अंदाज बांधता येतो.

पूर्वी हा मुख्य माहिम बेटाचाच भाग असल्याने, त्याला स्वतंत्र अस्तित्व नसावं. या वस्तीचं आजचं नेमकं ठिकाण (अर्थात नकाशातील जुन्या खुणांचा आधार घेऊन) सांगायचं तर, कबुतरखाना- पोर्तुगीज चर्च ते किर्ती काॅलेजच्या किनारपट्टीच्या आसपासचा किंवा दरम्यानचा हा भाग असावा. इथून अगदी जवळच जवळपास हजार वर्षांचा इतिहास असणारं प्रभादेवीचं स्थान आहे. याच परिसरात पोर्तुगीज चर्च आहे. स्मशानभुनीही जवळच, समुद्रकिनाऱ्यावर आहे. देवालयांचं किंवा स्मशानाचं स्थान वस्तीच्या काहीसं दूर, गांवच्या सिमेवर असतं, हा भाग लक्षात घेतला तर, इथे माहिमची सिमा संपत असावी आणि त्याच्या आसपासच बिंम्बाच्या काळात नविन ‘दादर पाडा’ वसला असावा, असा अंदाज करता येतो. आजच्या एकविसाव्या शतकातही हा परिसर आपलं जुनं स्वरुप बरचसं टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे, असं आज त्या भागाकडे पाहाताना लक्षात येतं.

दादर इथेच असावं, या गृहितकाला आणखी बळकटी मिळण्यासाठी सोबतची आकृती क्र. १ पाहावी. ही आकृती सन १८३८ पर्यंत मुंबईची सातही बेटं, समुद्राच्या दिशेला बांध (embankment) घालून एकमेकांना जोडून झाल्यानंतरची, परंतु रेल्वे सुरू होण्यापूर्वीची आहे. या आकृतीत समुद्राच्या बाजुला घातलेले बांध दिसत आहेत. बांध घालून पाणी आत येणं थांबवलं असलं तरी, मधल्या बराचशा जागांमधे भरणी करायची होती. ज्या काही थोड्या जागांमधे भरणी करुन झाली होती, तिथे थोडीशी शेती(rice fields) होत होती. या शेतांतून बेटांना एकमेकांना जोडणाऱ्या पायवाटा असल्या तरी अद्याप रस्ते व्हायचे होते, हे या आकृतीतून स्पष्ट दिसतं. वरळी आणि माहिमला जोडणाऱ्या बांधावरुन माहिमला येणं सोपं झालं असल तरी, परेलहून माहिमला जायचं तर सायन-धारावी करुन जावं लागत असे. ते कसं, हे अधिक स्पष्ट होण्यासाठी सोबत सन १८९५ सालचा नकाशा दिलाय, तो पाहा.

आणखी एक, नकाशा पाहाताना आपण त्या काळात आहोत, अशी कल्पना करा, मग त्याकाळातलं माहिम आपल्याला अधिक चांगलं समजून घेता येईल व दादरचा शोधही सोपा होईल.

समुद्राला घातलेला बांध दाखवणारी आकृती क्रमांक १

सन १८९५ मधे ‘टाईम्स औफ इंडीया’ने प्रकाशित केलेला मुंबई शहराच्या नकाशा पाहा. हा नकाशा १८९५ मधला आहे, अशी माहिती ‘बोरीबंदरची म्हातारी’, अर्थात टाईम्स औफ इंडीया सांगत असली तरी, तो १८९६ ते साधारण पुढच्या पांच-सात वर्षातला असावा. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, नकाशाच्या अगदी वरच्या बाजुला जो ‘माहिमचा (वांद्रे आणि माहिमला जोडणारा) काॅजवे’ दिसतोय, त्या काॅजवेच्या शेजारीच क्वारंटाईन कॅम्प आहे. हा क्वारंटाईन कॅम्प, सन १८९६सालात मुंबईत प्लेगची साथ आली होती, तेंव्हा प्लेग बाधितांना आणि बाहेरुन मुंबई शहरात येणारांना विलगिकरणात, म्हणजे आयसोलेशनमधे ठेवण्यासाठी बांधला होता.

लाल नकाशा १८९५ चा असून, दुसरा नकाशा १९०९चा आहे. सुस्पष्ट नकाशे पाहण्यासाठी कृपया  https://bit.ly/34oy2W7  आणि https://bit.ly/3laUxnR या लिंक्स क्लिक करावे.

या नकाशात दिसत असलेल्या माहिम काॅजवेपासून आपण खाली दक्षिण दिशेने येणाऱ्या रस्त्याने, ‘लेडी जमशेटजी मार्गा’ने चालत निघालो की, लगेचच आपल्याला सेंट मायकेल चर्च दिसतं आणि चर्चच्या वरच्या अंगाला लागून एक रस्ता आपल्या उजवीकडे गेलेला दिसतो. हा ‘मोरी रोड’. ह्या रस्त्याच्या कोपऱ्यात ‘FBS’ नांव दिलेला एक लहानसा चौकोन दिसतोय. ही त्याकाळातली कस्टम्सची चौकी. सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेटं ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या ताब्यात येण्यापूर्वी, साष्टीतून माहिममार्गे मुख्य मुंबई शहरात येताना, इथे कर भरावा लागत असे. साष्टी ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर हा कर थांबला असला तरी, चौकी तशीच राहिली असावी. आजही सरकारी पिवळ्या रंगात रंगवलेली ही चौकी वा चौकींचा लहानसा समूह आपल्याला मायकेल चर्चच्या समोरच्या बाजुच्या सिग्नलला लागून असलेला दिसू शकेल. चर्च व चौकीला लागून असलेला, आपल्या उजवीकडून जाणारा ‘मोरी रोड’ पुढे ‘धारावी रोड’ बनून, व्हिन्सेंट रोड ओलांडून सायन किल्ल्याकडे गेलेला दिसेल. परळहून माटुंगा-धारावी करत माहिम गांवात पोहोचायचा, त्या काळातला हा एक(च) महत्वाचा मार्ग होता. हा रस्ता सध्या आपण तिथेच सोडून देऊ आणि पुन्हा सेंट मायकेल चर्चपाशी ‘लेडी जमशेटजी रोड’वर येऊ. ह्या नकाशीत दिसणारा ‘लेडी जमशेटजी रोड’ हा दादरचा ठिकाणा शोधण्यासाठी महत्वाचा दुवा असणार आहे, त्यामुळे ह्या रोडचं बोट सोडून चालणार नाही.

माहीम कॉजवेजवळची कस्टमची जुनी चौकी

सेंट मायकेल चर्चहून लेडी जमशेटजी मार्गाने आपण सरळ खाली दक्षिणेच्या दिशेने आपण निघालो की, थोडं पुढे आपल्याला उजव्या हाताला पोस्ट औफिस (PO) लागतं. तसंच पुढे चालत निघालो की, आपल्याला आपल्या डाव्या हाताला, लेडी जमशेटजी रस्त्याला फुटणारा आणि कॅडेल रोडला जाऊन मिळणारा एक रस्ता जाताना दिसतो. हा ‘माहिम बझार क्राॅस रोड’. ह्या रस्त्याची आजची नेमकी ओळख सांगायची तर, वनिता समाज, स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक, हिंदुजा हाॅस्पिटल करत वीर सावरकर मार्गाने माहिमच्या दिशेने आलो की, बाॅम्बे स्काॅटीश शाळेच्या पुढे आपण उजवं वळण घेऊन लेडी जमशेटजी मार्गावर जातो. वीर सावरकर मार्गावर जिथे आपण उजवं वळण घेतो, तिथेच हा मूळ ‘माहिम बझार रोड’ सुरू होतो आणि लेडी जमशेटजी मार्गावर जाऊन मिळतो. हा एक दिशा मार्ग आहे आणि या रस्त्याचं आजचं नांव, ‘शितळादेवी टेम्पल रोड’. हा रस्ता लेडी जमशेटजी मार्गाला जिथे मिळतो, तिथेच एका कोपऱ्यावर ‘अवर लेडी औफ व्हिक्टरीज चर्च’ आणि व्हिक्टोरीया हायस्कूल आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यावर शिकळादेवीचं मंदिर आहे.

या रस्त्याबद्दल चार शब्द अधिक लिहिण्याचं कारण म्हणजे ही जुन्या माहिम गांवाची मूळ हद्द. शिवाय ह्या रस्त्यावर येण्यासाठी कॅडेल रोडवर जिथे आपण उजवं वळण घेतो, तिथेच कोपऱ्यावर, हरी ओम या मुर्ती विक्रिच्या दुकानाच्या मागे ‘मांगेलवाडी’ आहे. मुंबई-माहिम, शितळादेवी ह्या दोन खुणांबरोबरच, ह्याच परिसरात ‘मांगेलवाडी’ असणं, हा एक दादरचा शोध घेतानाचा महत्वाचा पुरावा..!

तसंच पुढे आलो की आपल्याला ‘लेडी हार्डींग्स रोड’ आडवा जातो. हा रस्ता म्हणजे, माटुंगा रोड स्टेशनहून वीर सावरकर (कॅडेल रोड) रोडला जाऊन मिळणारा आजचा ‘टि. के. कटारीया’ मार्ग. हा रस्ता लेडी जमशेटजी मार्गाला जिथे छेदतो, तिथे इशान्य कोपऱ्यात पेट्रोल पंप आहे, अग्नेय कोपऱ्यात काशी विश्वेशराचं पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजुला पूर्वी ‘गोपी टॅन्क’, म्हणजे गोपी तलाव होता. तो पूर्वीच बुजवला असला तरी, त्याचं नांव अद्याप प्रचलित आहे. गोपी टॅन्कच्या समोर, पश्चिमेला एकमजली इमारत आहे आणि त्यात आज ‘आपलं महानगर’चं कार्यालय आहे आणि कटारीया रस्त्याच्या वायव्य कोपऱ्यात ‘शोभा हाॅटेल’ आहे. या परिच्छेदात वर्णन केलेली, लेडी हार्डींग्स रोड आणि गोपी टॅन्क वगळता इतर ठिकाणं नंतरच्या काळातली असल्याने, ती नकाशात सापडणार नाहीत, पण मनात असु देत..!

ह्या चौकातून लेडी जमशेटजी मार्गाने पुन्हा पुढे, रस्त्याच्या आजुबाजूला सर्व मोकळ मैदान दिसेल. त्या मैदानाच्या मोकळ्या जागांत आजचं सिटी लाईट, राजा बढे चौक, शिवसेना भवन आपापल्या जागी ठेवत, नकाशात दिसणाऱ्या ‘बाॅम्बे वुलन’पाशी थोडं थाबा. ही बाॅम्बे वुलन म्हणजे कालची ‘कोहिनूर मिल’ किंवा आजचा ‘कोहिनूर स्क्वेअर’. इथून लेडी जमशेटजी रोड डावं वळण घेऊन पुढे चालू लागतो (आज हा रस्ता दादरचा न. चिं. केळकर रस्ता म्हणून ओळखला जातो) आणि काही अंतर पुढे जाऊन उजव वळण घेतो. ह्या उजव्या वळणावर एक निळ्या रंगाचा चौकोन दिसतोय. हा तेंव्हा तिथे असलेला तलाव. ह्या कालच्या तलावापाशीच पूर्वेकडून येणारा आजचा टिळक पूल थांबतो. हा तलाव बुजवून आजचं प्लाझा थिएटर आणि वीर कोतवाल उद्यान तयार केलं, असं अनुमान काढता येतं. इथून पुन्हा पुढे जात लेडी जमशेटजी मार्ग एका चौकात जांऊन थांबतो. हा चौक म्हणजे आजचा कबुतरखाना किंवा गोल देऊळ.

इथून पुढे आपण खऱ्या अर्थाने ‘दादर पश्चिम’चा शोध घेण्यास सुरूवात करणार आहोत. अर्थात, त्यासाठी लेडी जमशेटजी मार्गा’चं बोट आपण सोडणार नाही आहोत, कारण हाच रस्ता आपल्याला जुन्या दादर रस्त्यावर नेऊन सोडणार आहे.

मुळचं दादर नांवातं गांव इथेच होतं..?

आता पुन्हा नकाशात प्रवेश करु. नकाशात जिथे लेडी जमशेटजी मार्ग समाप्त होतो, तिथेच खाली Distillery दिसतेय. डिस्टीलरीच्या शेजारीच RS अशी अक्षरं दिसतील, ती दादर स्टेशनची. रेल्वे स्टेशन अद्याप तिथेच असलं तरी, डिस्टीलरीच्या जागी आजचं सुप्रसिद्ध ‘कीर्तिकर मार्केट’ उभं आहे. नकाशात दिसत नसला तरी, तिथे समोरच आजचा ‘कबुतरखाना’ आहे. ह्या कबुतरखान्याला एक रस्ता दादर स्टेशननजिकच्या फुलबाजारातून येऊन मिळतो. ह्या रस्त्याचं नांव ‘दादर रोड’. हे नांव नकाशातही वाचता येतंय. आपण ज्याचा शोध घेतोय, त्या ‘दादर’कडे आपल्याला धेऊन जाणारा हा रस्ता.

माहिम काॅजवेपासून सुरू होणाऱ्या लेडी जमशेटजी मार्गाने आपल्याला पार आजच्या कबुतरखान्यानजिकच्या ‘दादर रोड’(त्यावेळी ह्या रस्त्याला ‘दादर मेन रोड’ म्हणत) पर्यंत आणून सोडलं. या रस्त्याकडे जरा लक्षपूर्वक पाहा. हा दादर रोड पूर्वेकडून पश्चिमेकडे आलेला दिसेल. पूर्वेकडै ह्या रस्त्याची सुरूवात होते, ती ‘व्हिन्सेंट रोड’वरून. परेलहून सायनच्या दिशेने जाणारा व्हिन्सेंट रोड म्हणजे, नंतरचा ‘किंग्स वे’ आणि आताचा ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रोड’. परेल टी.टी. वरून सायनच्या दिशेने जाणाऱ्या व्हिन्सेंट रोडला, परेलच्या काहीसं पुढे, नकाशात दिसणाऱ्या टाटा मिल्स आणि गोल्ड मोहोर मिल्सच्या दारात, डावीकडे एक फाटा फुटलेला दिसेल. हा फाटा ‘दादर रोड’ असं नांव धारण करुन, TT आणि BB रेल्वे* लाईन ओलांडून, पश्चिमेकडच्या, वरच्या परिच्छेदात वर्णन केलेल्या कालच्या डिस्टीलरीकडे, म्हणजे आजच्या कबुतरखान्यापर्यंत गेलेला नकाशात दिसेल. मध्य मुंबईतल्या लालबाग-परेलहून इकडे येणारा हा लांबलचक आणि त्याकाळातला एकमेंव रस्ता, आपल्या नांवात ‘दादर’ हे नांव धारण करुन कबुतरखान्यापर्यंत येतो, याचा अर्थ माहिम बेटावरचं ‘दादर’ गांव या ठिकाणीच कुठेतरी वसलं होतं, असाच होतो.

दादरचा कबुतरखाना आणि स्टेशनवरून कबुतरखान्यापर्यंत येणारा जुना ‘दादर रोड’

इथेच वसलं होतं, तर मग कुठे, ते आता पाहू. आता हा परिसर नीट नजरेसमोर आणा. कबुतरखान्याहून पोर्तुगीज चर्चकडे व पुढे आगरबाजार मार्गे समुद्र किनाऱ्यावर दोन रस्सांनी जाता येतं. एक मार्ग भवानी शंकर रोडवरून, ब्राह्मण सेवा मंडळाच्या हाॅलवरून कृष्णाजी वामन चितळे मार्गाने जातो, तर दुसरा एस. के. बोले रोड वरून. भवानी शंकर रोड आणि एस. के. बोले रोड यामधली वस्ती ते आगर बाजार-किनारा याच परिसरात मुळचं दादर होतं, असं अनुमान काढता येतं. कस्तुरचंद इस्टेटच्या समोरच्या बाजुला आजही गांवासारखी मांडणी असलेली वस्ती आहे. या वस्तीत जोशी वाडी आहे. पाटीलवाडी आहे. एस. के. बोले रोडवरून आगरबाजार मार्गे पुढे जाताना धुरू वाडीही आहे. मग ह्याच परिसरात एखादी दादरवाडी किंवा पाडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा ही संपूर्ण वस्तीच, माहिमचा ‘दादरपाडा’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या शक्यतेला पुष्टी देतो, तो इथला जुन्या काळापासून असलेला बाजार. नकाशात दिसणारा, पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारा ‘दादर रोड’, मधल्या रेल्वेलाईनमुळे आज दोन भागात विभागला गेलेला दिसतो आहे. परेलहून दादरला येण्यासाठी असलेला हा तेंव्हाचा एकमेंव रोड. ही पूर्वी लहानशी पाऊलवाट असावी. सन १८५३ ला रेल्वे सुरू झाल्यानंतर हा रस्ता आणि लेव्हल क्राॅसिंग झालं असावं. दोन रेल्वेलाईन मधे आज दिसत असलेलं शंकराचं मंदिर तेंव्हाही तिथे होतं. लोकांच्या वहिवाटीचा हा रस्ता असल्याने, ह्या रस्ता पूर्वेकडच्या बाजुला जिथे रेल्वेलाईनला मिळतो, त्याच कोपऱ्यावर लहान काळ्या चौकोनात ‘Market’ असं लिहिलेलं दिसेल. हे मार्केट तेंव्हा थेट पश्चिमेकडच्या डिस्टीलरीपर्यंत असावं. या रस्त्याची पूर्वेकडची बाजू म्हणजे, आजचा ‘दादासाहेब फाळके रोड’, तर पश्चिमेकडची याची बाजू ‘एम.सी. जावळे रोड’ म्हणून आज ओळखली जाते. आज हा रस्ता पूर्व आणि पश्चिम असा दोन भागांत आणि नांवात वाटला गेला असला तरी, कधीकाळी ह्या रस्त्यावर असलेला बाजार, आजही हा रस्ता आपल्या अंगा-खांद्यावर बाळगून असलेला आपल्याला दिसतो. पूर्व बाजुचा दादर रोड, म्हणजे आजचा ‘दादासाहेब फाळके रोड’ काही काळपूर्वीपर्यंत भारतीय चित्रपट सृष्टीची पंढरी होती. दादासाहेबांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या बोलपटाचं काही शुटींग या रस्त्यावरच्या ‘मथुरा भुवन’ या बंगल्यात केलं होतं. या मथुरा भुवनच्या जागी आता त्याच नांवाची सोसायटी उभी आहे. या रस्त्यावर पुढे रुपतारा, रणजित स्टुडीयो सुरू झाले. आता या रस्त्याची पूर्वेकडची बाजू कपड्यांच्या ठोक बाजाराने भरली आहे, तर पश्चिमेकडे फुलांपासून ते काय हवं ते इथल्या दुकानांतून आणि त्याहीपेक्षा जास्त इथल्या फेरीवाल्यांकडे विकत घेता येत. बाजार नेहेमी लोकवस्तीच्या आधारानेच बहरलेला दिसतो. या बाजाराला आधार म्हणजे इथली वस्तीच असावी आणि तिचं नांव दादर असावं..!

दादर हे माहिममधलं गांव किंवा पाडा किंवा वाडी वर सांगितलेल्या ठिकाणीच वसलेलं असावं, याचा पुरावा इथल्या रेल्वे स्टेशनच्या नांवातही मिळतो. मध्य रेल्वे सुरू झाली ती १८५३ मधे. पश्चिम रेल्वेतर त्या नंतर दहा-पंधरा वर्षांनंतर सुरू झाली. दादरची पश्चिम आणि मध्य रेल्वेवरची दोन्ही स्थानकं ‘दादर’ नांव लेवूनच उभी आहेत. रेल्वे स्थानकांना नांवं देण्याची रेल्वे खात्याची विशिष्ट पद्धत लक्षात घेतली तर, दादर वर लिहिलेल्या ठिकाणी(च) हेतं, या अनुमानाला पुष्टी मिळते.

जुनं दादर रेल्वे स्टेशन

रेल्वे स्टेशनांना नांव देताना, ते स्टेशन जर एखाद्या गांवाच्या कुशीतच वसलं असेल, तर त्या स्टेशनला सरळ त्या गांवाचं नांव दिलं जातं. उदा. विले-पार्ले, अंधेरी, ठाणे, भायखळा किंवा माहिम इत्यादी. जर त्या परिसरातलं मुख्य गांव रेल्वे स्टेशनपासून दूर असेल तर, त्यी स्टेशनला नांव देताना, त्या गांवाचं नांव आणि सोबत ‘रोड’ असा शब्द लिहिण्याची प्रथा आहे. उदा. पश्चिम रेल्वेवरचं ‘माटुंगा रोड’ किंवा ‘खार रोड’ स्टेशन. मुख्य माटुंगा गांव आहे पूर्व दिशेला. मध्य रेल्वेवर ‘माटुंगा’ याच नांवाचं स्टेशनही आहे, कारण ते माटुंगा गांवातच उभं आहे. माटुंगा गांव पूर्वेला असलं तरी, पश्चिमेला नाही. पश्चिमेला माहिम येतं आणि पश्चिम रेल्वेवर माहिमचं, त्याच नांवाचं स्वतंत्र स्टेशनही आहे आणि ते मूळ माहिमच्या कुशीतच वसलेलं आहे. म्हणून पश्चिम रेल्वेवरचं, माहिम नंतरच्या स्टेशनचं नांव ‘माटुंगा रोड’ असं देण्यात आलं आहे. याचा अर्थ ह्या स्टेशनपासून माटुंगा गांवाकडे जाण्याचा रस्ता आहे, असा होतो.

माटुंगा रोड नंतर पश्चिम रेल्वेवर ‘दादर’ येतं. मध्य रेल्वेमार्गावरही दादरच येतं. याचा अर्थ ही स्टेशनं माहिम बेटावरील ‘दादर’ नांवाच्या वस्तीच्या कुशीतच वसलेली आहेत. आणि ही कूस अर्थातच कबुतरखान्याच्या आसपासच येते. म्हणजे मुळचं दादर कबुतरखाना, पोर्तुगीज चर्च ते किर्ती काॅलेजच्या परिसरात वसलेलं असीवं, ह्या अनुमानाला दुजोराच मिळतो.

साधारण १९२५ च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं, याच्या आठवणी सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांनी लिहिल्या आहेत. पेंडसे त्यावेळी भवानी शंकर रोडवरच्या डोंगरेबागेत राहात. त्यांनी १९२५ सालच्या दादरचं केलेलं वर्णन, वर केलेल्या अनुमानाशी मिळतं जुळतं आहे. पेंडसे लिहितात, “१९२५ साली दादरला मोठे रस्ते दोन-तीनच होते. स्टेशनवरुन बाहेर पडलं की, भवानी शंकर रोडपर्यंत जाणारा दादर रोड, सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर रोड आणि माहिम काॅजवेपर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग, हे तीनच मोठे रस्ते. बाकी दादर स्टेशनातून बाहेर पडल्यावर भेट होई, ती पायरस्त्यांचीच. ‘रानडे रोड’ अस्तित्वात नव्हता. गोखले रोड नाॅर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. टिळक ब्रिज नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक वस्ती असल्याने, त्यावर रहदारी अशी नव्हतीच. टिळक ब्रिजच्या शेजारी आता उभ्या असलेल्या छबिलदास शाळेच्या जागी मोकळं पटांगण होतं. ह्या मोकळ्या जागेत मंडप घालून दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव झालेला आठवतो.

हा गणेषोत्सव पुढे सध्याच्या विसावा हाॅटेलच्या जागी होऊ लागला. विसावा हाॅटेलच्या जागी गणपतीचा मांडव आणि स्टेस असे, तर समोरच्या मोकळ्या रस्त्यावर लोकांना बसण्यासाठी जागा. छबिलदास शाळा (त्यावेळचं ‘दादर इंग्लिश स्कूल’) कोहिनूर सिनेमाजवळ लेडी जमशेटजी मार्गाला खेटून उभी होती. दादर स्टेशनातून पश्चिमेला बाहेर पडल्यावर, थेट माहिमपर्यंत दृष्य दिसत असे. मधे काही वस्ती नाहीच. दादर ते माहिम पर्यंतच्या जागेत डबकी, खाजणं असं काहीतरी होतं”. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘आठवणीतील मुंबई’ या लेखात आलेलं हे दादरचं वर्णन, त्यारळचं दादर कबुतरखान्याच्या आसपासच वसलं होतं, हे स्पष्ट करण्यास पुरेसं आहे. कारण इथून पुढचा पार माहिमपर्यंतच्या जागेत फारशी वस्ती नव्हतीच, असं पेंडसेंनी लिहून ठेवलं आहे.

आता, ‘दादर इथेच होतं’ या अनुमानाला पुष्टी देणारा आणखी एक आणि शेवटचा आधार मांडतो. हा आधार आहे पोस्टाचा.

पोस्टल पिन नंबर देताना वाढती वस्ती हा निकष असतो. म्हणजे नविन ठिकाणी वस्ती झाली, की त्या परिसरात अस्तित्वात असलेला पिन नंबर त्या वस्तीलाही लागू होतो. पण ही वस्ती वाढू लागली की, त्या वस्तीपुरता नविन नंबर दिला जातो. नविन वस्ती आणि ही नविन वस्ती ज्या जुन्या वस्तीच्या परिसरात वसते, त्या दोघांचा पिन क्रमांक नेहेमीच ओळीने नसतो, तर त्यात बराच फरक असू शकतो. दादर पश्चिमचा पिन क्रमांक ४०००२८ असा आहे, तर दादर ज्या माहिम बेटावर वसलं आहे, त्या माहिमचा पिन नंबर ४०००१६ असा आहे. याचा सरळ अर्थ असा की, माहिम काॅजवे ते शितळादेवी मंदिरापर्यंतच्या जागेत माहिमची मूळ वस्ती होती. दादर माहिम बेटावरच असल्याने, दादरला स्वतंत्र पिन मिळण्यापूर्वी, दादरचाही पिन १६च असणार.

पुढे रेल्वे स्टेशन, स्टेशनातून मध्य आणि पश्चिम रेल्वेरील कोणत्याही स्टेशनला जाण्याची सुविधा, बाजाराची निकटता, शाळांच्या सोयी इत्यादी कारणांमुळे या परिसरात लोकवस्ती वाढू लागली. मग कालांतराने या परिसराला स्वतंत्र पिनकोड नंबर ४०००२८ असा देण्यात आला असावा. गम्मत म्हणजे, या पिनकोडमधे एकूण सहा पोस्ट औफिसं येतात आणि त्यातलं मुख्य पोस्ट औफिस ‘भवानी शंकर रोड पो.औ.’ हे आहे..आणखी काही पुरावा हवाय?

दादर नांव ‘जिन्यां’वरुन पडलंय की, इथे ‘दादर’ हे नांव धारण करणारं गांव राजा बिंम्बाच्या काळापासूनच इथे हेतं, याचा शेध घेणारा हा लेख थोडासा लांबलाय हे खरं, पण दादर हे नांव मुळचं आहे आणि त्याची सांगितली जाणारी व्युत्पत्ती पटण्यासाररखी नाही, हे दाखवण्यासाठी, अवढं लिखाण आवश्यकच होतं.

—नितीन साळुंखे

9321811091

२ औक्टोबर, २०२०.

टिपा-

 1. दादर पूर्व, मुंबई ४०००१४ ही संपूर्णपणे मानवी निर्मिती आहे आणि ह्या निर्मितीची कहाणी मोठी मनोरंजक आहे. त्यावर मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे, म्हणून त्याचा उल्लेख या लेखात नाही.
 2. आजचा ‘लेडी जमशेटजी रोड’ माहिम काॅजवेपासून सुरू होऊन शिवसेना भवनसमोरच्या गडकरी चौकात थांबतो आणि इथून पुढे तोच रस्ता प्लाझा, वीर कोतवाल उद्यानाला स्पर्श करत, कबुतरखान्यापर्यंत ‘न. चिं. केळकर रोड’ नांव धारण करुन जातो. पूर्वी मात्र माहिम काॅजवे ते कबुतरखाना पर्यंतच्या संपूर्ण रस्त्याचं नांव ‘लेडी जमशेटजी रोड’ असंच होतं आणि हा रस्ता १८४५ सालात बांधण्यात आला होता.
 3. भवानी शंकर रोड, रावबहादूर एस. के. बोले रोड आणि न. चिं. केळकर यांच्या जंक्शनवर असलेलं ‘वटवृक्ष श्री. हनुमान मंदिर, दादर’ हे देवस्थान आहे. या देवळाच्या ठिकाणी पूर्वी मोठं वडाचं झाड होतं. या वडाच्या झाडाखाली मारुतीचं लहानसं मंदीर प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने १९२० सालात बांधण्यात आलं होतं. वर उल्लेख केलेल्या तिन्ही रस्त्यांच्या कडेला तेंव्हा मोठमोठी वडा-पिंपळाची झाडं होती. संदर्भ-vayusutha.in
 4. *TT रेल्वे म्हणजे मध्य रेल्वे व BB म्हणजे पश्चिम रेल्वे. त्याकाळात ह्या दोन्ही रेल्वे त्यांच्या GIP आणि BBCI कंपन्यांच्या नांवांवरपन ओळखल्या जात असत.

संदर्भ-

 1. हा संपूर्ण लेख, ‘दादर’ या नांवाची व्युत्पत्ती, इथे असलेल्या जिन्यापासून झाली आहे, हे पटत नसल्याने लिहिलेला आहे. यासाठी केवळ परस्थितीजन्य वस्तुस्थितीचा आधार घेऊन, तर्कावर लेखातलं गृहितक मांडलेलं आहे.
 2. ‘महिकावतीची बखर’- लेखक वि. का. राजवाडे. मूळ पुस्तक १९२४. वरील तर्कासाठी सदरच्या पुस्तकातील माहिती आधार म्हणून घेतली आहे.
 3. महिकावतीच्या बखरीवर आधारीत राजा बिम्बावरचे माझे दोन लेख वाचण्यासाठी-https://wp.me/p7fCOG-av व https://bit.ly/2Gxhfb6 या लिंक्सवर क्लिक करा.
 4. लेख ‘मी पाहिलेली मुंबई’- श्री. ना. पेंडसे. ‘मुंबई ‘महानगरपालिका मुख्यालय शताब्दी विशेषांक-१९९३’ या स्मरणिकेत हा लेख प्रसिद्ध झालेला आहे.
 5. वरील स्मरणिकेतल्या ‘मुंबईतील चित्रपट सृष्टी’ या भाई भगत यांच्या लेखातून, दादासाहेब फाळके व इतर स्टुडीओंचं वर्णन घेतलं आहे.

चित्तरकथा ‘माहिम कॉजवे’च्या जन्माची.. 

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ या माझ्या आगामी पुस्तकातलं एक प्रकरण-

चित्तरकथा ‘माहीम कॉजवे’च्या जन्माची.. –

सात बेटांच्या ओसाड, रोगट, दुर्लक्षीत मुबईला आजचं जागतिक दर्जाचे अन् जगातल्या महागड्या शहरांपैकी एक शहर बनवण्यामागे अनेकांचा हातभार लागला आहे. यात जिवंतपणीच आख्यायिका बनलेले तत्कालीन देशी लोक आहेत, तसंच परदेशांतून मुंबई ताब्यात घेण्यासाठी, मुंबईवर राज्य करण्यासाठी आलेले परदेशी लोकंही आहेत. या सर्वांनीच आपापल्या परिने मुंबई कशी असावी याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि मुंबईला तसा आकार देण्याच्या प्रयत्न केला होता. हा इतिहास वाचून वा ऐकून आपल्याला माहित असतो. पण मुंबईला आजची ख्याती मिळवून देण्यासाठी, या सर्व महानुभावांनी दिलेल्या आपल्या योगदानासारखंच, मुंबई शहरातील अनेक वास्तूंनी, पुलांवर आणि रस्त्यांनीही महत्वाची भुमिका बजावलेली आहे, हे आपल्या गांवीही नसते.

ज्या काळात ह्या वास्तू वा रस्तेदींचं बांधकामावर केलं गेले, त्या काळातल्या त्यांच्या निर्मात्यांनाही भविष्यात ह्या वास्तू वा रस्ते मुंबई शहराच्या समृद्धीत केवढी प्रचंड मोठी भर घालणार आहेत, याची कल्पना आली होती की नाही, हे आता सांगता येत नाही, पण ह्या रस्त्यांनी मुंबईच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि अर्थातच, आर्थिक स्थित्यंतरात अत्यंत महत्वाच्या भुमिका अबोलपणे बजावलेल्या आहे. यापैकीच एक रस्ता म्हणजे ‘माहिम कॉजवे’ किंवा ‘लेडी जमशेटजी रोड’..!

या रस्त्याचं मुंबईच्या समृद्धीत असलेलं योगदान, त्याचं महत्व आणि महती समजून घेण्यासाठी, आपल्याला मुंबई शहराच्या इतिहासातील ब्रिटिश काळात एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे. त्याशिवाय हा रस्ता मुंबईकरांसाठी का, कसा आणि किती महत्वाचा होता, याची कल्पना आजच्या मुंबईकरांना येणार नाही.

आज जरी आपण मुंबई शहर आणि तिची पूर्व-पश्चिम उपनगरं मिळून तयार होण्याऱ्या प्रदेशाला ‘मुंबई महानगर प्रदेश’ म्हणत असलो तरी, ब्रिटिश काळातील मुंबई शहराची व्याप्ती दक्षिणेच्या कुलाब्याच्या दांडीपासून ते पूर्वेला सायन आणि पश्चिमेला माहिमपर्यंतच होती. माहिम आणि सायन पलीकडील आजच्या वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला ते मुलुंड अशी नांवं धारण करणाऱ्या आजच्या उपनगराच्या (आणि त्या पलिकडीलही) विस्तृत भूप्रदेशाला ‘साष्टी’ असं नांव होत. मुंबईच्या सात बेटांवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आणि वर उल्लेख केलेल्या साष्टीवर प्रथम पोर्तुगिजांचा आणि नंतर मराठ्यांचा अंमल होता. अगदी १८व्या शतकाच्या अखेरपर्यंत अशीच परिस्थिती होती. ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली ती साधारण अठराव्या शतकाच्या मध्याच्या आसपास. इसवी सनाच्या १७३९ मध्ये चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि या बेटांवरचा पोर्तुगीज अंमल संपून मराठ्यांचं राज्य आलं. पुढे काही वर्षांनी सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेट व्यापाराकरिता म्हणून ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली आणि मुंबईने कात टाकायला सुरुवात केली.

वास्तविक मुंबई ब्रिटिशांच्या तांब्यात आली, तेंव्हापासूनच मुंबईची सात बेटं समुद्राच्या बाजूने बांध घालून एकमेकांना जोडून एकसंघ करण्याचे प्रयत्न सुरू होते. सन १६८७ साली ईस्ट इंडीया कंपनीचं मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलवण्यात आलं आणि ह्या प्रयत्नांना गती आली. सन १६९०-९१च्या दरम्यान, गव्हर्नर हॅरीसच्या (Bartholomew Harris) काळात, मुंबई आणि माझंगांव ह्या दोन बेटांमधली उमरखाडी भरणी घालून, ही दोन बेटं जोडली गेली आणि मुंबई एकसंघ करण्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला होता. ह्या कामाला अधिक गती मिळाली, ती १७०१ ते १७०४ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या निकोलस वेटच्या (Nicholas Waite) काळात. आपला कार्यकाळ संपता संपता, सन १७०४ मधे, गव्हर्नर वेटने शिवडी-परळ, परळ-माहिम आणि माहिम-वरळी बेटं, समुद्राच्या बाजूने बांध घालून, समुद्राचे पाणी आत येण्यापासून अडवण्याची योजना हाती घेतली आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी विल्यम आयलबी (William Aislabi) या हुशार इंजिनिअरची नेमणूक केली. विल्यम आयलबी यांने त्याच्यावर सोपवलेलं काम सन १७१२ पर्यंत पूर्ण केलं. मुंबई-माझंगाव-शिवडी-परळ-माहिम-वरळी ह्या बेटांमधे घुसणारं समुद्राचं पाणी बांध घालून बंद केल्याने, ह्या बेटांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली जमिन कंपनीने स्थानिकांना लागवडीसाठी खंडाने दिली.

मुंबई बेट आणि वरळी बेट यामधील पश्चिमेकडील खाडी मात्र बांध घालून अद्याप बंद करण्यात आली नव्हती. ही बाजू इतर बेटांच्या तुलनेत, सर्वात मोठी आणि बांध घालण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. सन १७१५-१७२२ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या चार्लस बून (Charles Boon) याने हे आव्हान स्वीकारण्याचं ठरवलं आणि त्यासाठी २०हजार रुपयांची तरतूद केली. बूनने कॅप्टन एलियस बेट (Elias Bate) या कंपनीच्या इंजिनिअरची नेमणूक केली. एलियस बेटने ९ महिन्यात हे बांधकाम करतो असं सांगून, इसवी सनाच्या १७२१ सालात कामाला सुरुवात केली खरी, पण हा बांध पूर्ण करण्यास त्याला ९ महिन्यांच्या ऐवजी चार वर्ष लागली. अर्थात हे काम होतंही तसं आव्हानात्मकच.

१७२५-२६ सालात हा बांध कसाबसा पूर्ण झाला, पण तो फार टिकला नाही. पुढची जवळपास ५७-५८ वर्ष वरळीचा हा बांध, सातत्याने दुरुस्ती करत कसाबसा टिकवून ठेवण्यात आला. हा बांध आणखी मजबूत करायचं ठरवलं, ते १७७१ ते १७८४ दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या विल्यम हाॅर्नबीने. हाॅर्नबीच्या काळात, सन १७८४च्या सुमारास वरळीचा बांध घालून, सध्याच्या महालक्ष्मीच्या बाजूने पार भायखळा, नागपाडा ते अगदी माजगावपर्यंत येणारे समुद्राचे पाणी कायमस्वरुपी अडवले गेले. त्यामुळे आज आपल्याला जो रेसकोर्स, सरदार पटेल स्टेडियम पासून पुढे पूर्वेला भायखळा, माझगाव पर्यंतचा जो विस्तृत टापू दिसतो तो निर्माण झाला. जवळपास ४०००० बिघे (४०० एकर) नवीन जमीन यामुळे ‘निर्माण’ झाली, असे गोविंद मडगावकरांनी त्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात नोंदले आहे. आज मध्य मुंबई नावाने जो भाग ओळखला जातो तो हा भूप्रदेश..!

मध्य मुंबईत एवढी मोठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच वस्ती-शेती-व्यापार उदीम वाढला. पूर्वी या ठिकाणी उथळ खाजण व दलदलीची जमीन असल्याने नित्यनेमाने होणारी रोगराई आटोक्यातच आली नाही, तर पार संपली. हॉर्नबीने घातलेला हा बांध, ‘वरळीचा बांध’ म्हणून त्या काळात ओळखला जात असे. ह्या बांधावरून रहदारी साठी तयार केलेल्या रस्त्याला, त्यावेळच्या मुंबईकरांनी त्याच्या जन्मदात्याचं, विल्यम हॉर्नबीचं, नांव देऊन त्याचं नामकरण ‘हॉर्नबी व्हेलॉर्ड’ असं केलं. हाच तो महालक्ष्मीहून वरळीच्या नेहरू तारांगणच्या दिशेने, हाजी अली दर्ग्याच्या समोरून जाणारा, ज्याला आपण आज ‘लाला लजपतराय मार्ग’ म्हणून ओळखतो, तो रस्ता.

वरळीचा हॉर्नबी व्हॅलॉर्ड  

सन १७८४ साली घातलेल्या वरळीच्या बांधानंतर, कंपनीने प्रकल्प हाती घेतला तो, कुलाबा बेटं जोडण्याचा. १७९६ मधे लहान कुलाबा व मोठं कुलाबा जोडण्यात आलं. पुढे १८३८ सालात कुलाबा कॉजवे बांधून, कुलाबा मुंबईच्या मुख्य भुभागाशी जोडण्यात आलं. १८३८ पर्यंत मुंबईची सातही बेटं जोडली जाऊन, मुंबई शहर, ‘Bombay Island City’ अस्तित्वात आलं होतं. आजही ह्या भुभागाची सरकारदरबारी असलेली अधिकृत नोंद, ‘मुंबई आयलंड सिटी’ अशीच आहे.

भरणी केल्यानंतर एकसंघ झालेली बॉम्बे आयलंड सिटी 

सन १७१२ ते १७८४ या काळात समुद्रात भरणी करुन निर्माण केलेल्या जमिनीने केलेली मुंबई शहराची होत असलेली भरभराट व त्यामुळे कंपनीची फुगणारी तिजोरी पाहून, कंपनीली साष्टी बेटं मुख्य मुंबईशी जोडून घेण्याची निकड भासू लागली. सन १७७५ मधेच शेजारचं साष्टी बेट कंपनीच्या ताब्यात आलेलं असलं तरी, ते मुंबईला अद्याप जोडलं गेलेलं नव्हतं. पश्चिमेचं माहिम आणि पूर्वेचं सायन ह्या दोघांच्या दरम्यान, उत्तरेला असलेल्या मिठी नदीच्या पूर्व-पश्चिम वाहाणाऱ्या विस्तीर्ण पात्राने मुंबई शहराची उत्तर सीमा रेखली असल्याने, मिठी नदीच्या दक्षिण तीरावरील साष्टीशी संपर्क साधण्याचा, दळणवळणाचा बोटीव्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. साष्टीशी त्वरित संपर्कासाठी मधली खाडी बोटीने पार करून पलीकडे जाण शक्य असलं तरी, सहज शक्य नव्हतं. त्या मुळे साष्टीचा विस्तीर्ण भूप्रदेश मागेच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात येऊनही, मधल्या मिठी नदीच्या विस्तृत पात्रामुळे साष्टीमधील वांद्रे-कुर्ला व त्यापलीकडील परिसराचा विकास करणं शक्य होत नव्हतं.

आता मात्र ब्रिटिशांना या खाडीवर कायमस्वरूपी रस्त्याची किंवा पुलाची निकड भासू लागली आणि बऱ्याच विचारानंतर, सन १७९६ मध्ये कंपनी सरकारने खाडीत (नदीत) भरणी करून रस्ता- कॉजवे- बांधायचा निर्णय घेतला. हा निर्णय झाला तेंव्हा मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन (Jonathan Duncan). जोनाथन डंकनने हा रस्ता बांधण्याचा निर्णय घेऊन लगेचंच कामास सुरुवात केली. परंतु, आर्थिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई तेंव्हाही होती, म्हणून कॉजवेच्या बांधकामास विलंबंही होत होता. तरीही पुढच्या दोन-तीन वर्षात, सन १८०५ साली, सायन आणि कुर्ला जोडणारा हा रस्ता बांधून तयार झाला. त्याकाळच्या रूढ पद्धतीप्रमाणे, गव्हर्नर जोनाथन डंकनचा सन्मान म्हणून या रस्त्याला ‘डंकन-सायन कॉजवे’ असं नांव देण्यात आलं..

निळ्या रंगातला ‘डंकन-सायन कॉजवे’

पुढच्या काळात साष्टीतील ठिकाणं मुंबईची पूर्व उपनगर म्हणून ओळखली जाऊ लागली, त्याची सुरुवात या रस्त्याने केली. हा रस्ता बांधला गेला आणि मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण व त्याही पुढेपासून लोकांची व मालाची आवक व्हायला सुरुवात झाली. मुंबईच्या सुप्रसिद्ध बंदरांची माळका पूर्वेलाच असल्याने, त्यावर आधारित व्यापार-उदीम वाढण्यासाठी हा रस्ता पूरक ठरला. अगदी आताआतापर्यंत कुर्ला- घाटकोपरपासून पुढे मुलुंडपर्यंत असलेल्या लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा ज्या मोठ्मोठ्या जगप्रसिद्ध कंपन्या उदयाला आल्या होत्या, त्या याच रस्त्याच्या बांधकामानुळे. देशातली पहिली रेल्वे या रस्त्याला समांतर धावली, ती याच कारणाने. मोठमोठाल्या कंपन्या आणि ह्या रस्त्याला समांतर जाणारा रेल्वेमार्ग याचा अपरिहार्य परिणाम म्हणून, कुर्ल्यापासूनच्या पुढच्या भागात हळुहळू मानवी वस्ती वाढू लागली. ही वस्ती पुढे मुंबईची ‘पूर्व उपनगरं’ म्हणून ओळख पावली. आज दोन-सवा दोनशे वर्षांनंतर परिस्थिती बदलू लागलेली असली तरी, अगदी आजही पश्चिम उपनगरांपेक्षा, मुंबईची पूर्व उपनगरं जास्त वस्तीची आणि उत्तरेला पार कल्याण-कर्जत वा त्याहीपूढे पहील्यापासूनच वाढलेली दिसतात, ती ही या रस्त्यामुळेच. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे. मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलेला हा पहिला रस्ता.

डंकन कॉजवेमुळे साष्टीतल्या पूर्वबाजूच्या उपनगरांची वाढ होऊ लागली, त्याचवेळी पश्चिम किनारपट्टीच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतता होती. वांद्रे चिमुकलं खेडं होतं. अंधेरी तर जंगलाने वेढलेलं होतं आणि बोरिवली-दहिसर तर कुणाच्याच खिजगणतीत नव्हतं  पुढे जवळ जवळ ३०-३५ वर्ष हिच परिस्थिती राहिली. माहिम हे मुंबई शहरच्या हद्दीतील शेवटचं गांव. माहिमच्या खाडीने, मुंबई शहराला शेजारच्या साष्टीपासून अलग ठेवलं होतं. साष्टी ब्रिटिशांच्या ताब्यात अली होती. पूर्व बाजूला डंकन कॉजवेने ती साष्टीशी जोडलीही गेली होती, मात्र पश्चिमेकडील माहिम आणि वांद्रे यामधील खाडीवर (मिठी नदीवर) पूल बांधून, मुंबई रस्ता मार्गाने पश्चिम साष्टीला जोडावी असं ईस्ट इंडीया कंपनीला वाटलं नव्हतं. किंवा वाटलंही असेल, पण कंपनीने अनेक कारणांनी तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. वास्तविक लोकांची तशी मागणी होती, परंतु, या भागात व्यापार-उदीम आणि मानवी वस्तीही पुर्वेच्या तुलनेने कमी असल्याने कंपनी लोकांची मागणी काही मनावर घेत नव्हती.

मिठी नदी, अर्थात माहीमच्या खाडी किनाऱ्यावरचं निवांत माहीम गाव 

माहिम आणि वांद्रे दरम्यान खाडी असली तरी, ह्या दोन्ही ठिकाणी राहाणारे लोक, अनेक कारणांनी एकमेकांशी जोडलेले होते. काही माहिमकरांची शेतीवाडी वांद्र्यात होती, तर वांद्रेकरांची माहिमात..! अनेकांचे एकमेकांशी नाते संबंध होते. वांद्र्याच्या तलावासमोर असणारी जरीमरी माता आणि टेकडीवर असणारी ‘मोत मावली-माऊंट मेरी’ माहिमवासियांच्या श्रद्धेचा विषय होत्या, तर माहिमचं सेंट मायकेल चर्च, माहिमचा दर्गा, दर्ग्या शेजारची शितळादेवी आणि त्या पलिकडची प्रभादेवी अनेक साष्टीकरांच्या श्रद्धेय देवता होत्या. ह्या कारणांमुळे माहिमची खाडी तरीतून पार करुन इकडून तिकडे अन् तिकडून इकडे जाणारा-येणारांची संख्या अफाट होती. जिवावर उदार होऊन केलेला हा प्रवास कसातरी निभावत असे, पण पावसाळ्यात मात्र तो थेट जिवावरच बेतत असे. दर वर्षीच्या पावसाळ्यात बोटी बुडून आतील माणसं, जनावरं आणि चिजवस्तुंना जलसमाधी मिळण्याची किमान एक तरी घटना घडत असे.

शेवटी अती झालं तेंव्हा, मुंबईतल्या नामवंत अभिजनांनी कंपनी सरकारला साकडे घालून माहिम आणि वांद्रे या दोन टोकं जोडणारा पूल बांधण्यासाठी साकडं घातलं. सन १८३५ च्या सुमारास आढेवेढे घेत कंपनी पूल बांधायला तयार झाली. आदेश सुटले. रॉयल सर्व्हे विभागाने पुलाच्या नियोजित जागेचा सर्व्ह केला, इंजिनिअरींग विभागाने पुलाचे आराखडे तयार केले आणि बांधकामासाठी येऊ शकणाऱ्या रुपये ६७ हजार मात्रच्या खर्चाचं अंदाजपत्रकही बॉम्बे सरकारसमोर मंजुरीसाठी सादर झालं. परंतु, नेमकं त्याच वेळेस कंपनी सरकारसमोर शहर विकासाच्या दृष्टीने इतरही महत्वाची आणि अधिक प्राथमिकता असलेली कामं असल्याने, माहिम कॉजवेच्या बांधकामाचा विषय आपोआप बाजूला पडला. त्याचवेळी मुंबईतलं त्याकाळालं सुप्रसिद्ध वाडीया कुटुंब या रस्त्याला येणाऱ्या खर्चापैकी काही खर्चाचा भार उचलण्यास तयार झाली, मात्र वाडीयांनी देऊ केलेले पैसे कंपनी सरकारला पुरेसे वाटले नाहीत. आणखी दोन वर्षांनी, म्हणजे सन १८३७ मधे मुबईतल्या बानाजी या एका अन्य पारसी कुटुंबाने पुढाकार घेऊन, मुंबईतल्या धनवंतांकडून या पुलाला बांधण्यासाठी लागणारे पैसे जमवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानाही यश आलं नाही. यात आणखी दोन तीन वर्षांचा कालावधी वाया गेला. या दरम्यान पावसाळ्यातले अपघात सुरूच होते.

पुढे साधारण १८४१ पर्यंत ह्या कॉजवेच्या बांधकामाचा विषय रेगाळतच राहिला. १८४१ च्या पावसाळ्यात माहिमहून प्रवासी आणि त्यांच्या गाई-गुरांना वान्द्र्याला घेऊन जाणारी बोट पाण्यात बुडाली आणि त्यात १५ प्रवासी आणि जवळपास तेवढ्याच जनावरांचा जीव गेला. आता मात्र हा कॉजवे व्ह्यायलाच हवा, असं कंपनी सरकारला वाटलं आणि यंत्रणा पुन्हा कामाला लागल्या. पुन्हा सर्व्हे झाला, नव्याने प्लान तयार करण्यात आले. सन १८३५ साली या कॉजवेच्या बांधकामाला येणार असलेला ६७ हजारांचा खर्च, १८४१ सालात दिडपटीने वाढून एक लाख रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला होता. मात्र ह्या वेळेलाही कंपनी सरकारसमोर असलेल्या अधिक महत्याच्या कामांमुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे, या कॉजवेचं बांधकाम लांबणीवर टाकावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली.

पुरेशा निधीअभावी माहिम आणि साष्टीतलं वांद्रे याना जोडणाऱ्या ह्या रस्त्याचं बांधकाम करण्यास सरकार असमर्थ असल्याची कुणकुण लेडी आवाबाई जमशेटजी यांच्या कानावर गेली. दर पावसाळ्यात जीवावर उदार होऊन बोटीतून खाडी ओलांडणाऱ्या माणसांच्या होणाऱ्या जिवितहानीमुळे आवाबाईंना दु:ख वाटतच होतं. यावेळी मात्र केवळ दु:खी होऊन चालणार नाही, तर काही तरी करायला हवं, असं आवाबाईंनी ठरवलं. आपले यजमान जमशेटजींशी चर्ची करुन, आवाबाईंनी त्यांच्यामार्फत, त्या या पुलाच्या बांधकामासाठी येणारा खर्च करण्यास तयार असल्याचं कळवून टाकलं. यावेळेस मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते सर जॉर्ज ॲार्थर (Sir George Arthur). सर जॉर्ज ॲार्थर यांनी लंडनला आवाबाईंचा प्रस्ताव मंजुर केला आणि त्याचा गोषवारा लंडनच्या मुख्यकचेरीला कळवून टाकला. ईस्ट इंडीया कंपनीच्या वतीने मुंबई प्रांताच्या सरकारने आवाबाईंचा प्रस्ताव स्वीकारल्याचं आवाबाईना कळवून, आवाबाईंनी देऊ केलेला कॉजवेच्या बांधकामाच्या खर्चाची रक्कम सरकार जमा करण्याची विनंती आवाबाईंना केली आणि आवाबाईंनी ताबडतोब रुपये १४७००० ची रक्कम सरकार दरबारी जमा केली.

पुढे जाण्यापुर्वी, थोडसं विषयांतर करुन, आवाबाई जमशेटजी जीजीभॉय  यांची थोडीशी माहिती घेणं अगत्याचं ठरेल. जमशेटजी जीजीभॉय  यांच्या पत्नी आवाबाई म्हणजे, त्याकाळच्या मुंबईतले अन्य एक धनाढ्य व्यापारी फ्रामजी नुसेरवानजी बाटलीवाला यांची कन्या. जमशेटजी जीजीभाई हे फ्रामजीच्या बहिणीचे चिरंजीव, म्हणजे भाचे. जमशेटजींची हुशारी आणि तल्लख बुद्धी हेरून, आपल्या या भाच्याचा व्यापारात जम बसावा म्हणून सुरुवातीच्या काळात फ्रामजींनी जमशेटजींना मदत केलेली होती. अंगभूत हुशारी आणि फ्रामजींच्यी मदतीमुळे पुढच्या काळात जमशेटजी मुंबईतले यशस्वी व्यापारी म्हणून ओळख पावले. मुंबईच्या विकासातही जमशेटजी पुढाकार घेऊ लागले होते. केवळ व्यापारी म्हणुनच नाही, तर उदार हृदयाचे समाजसेवक म्हणूनही जमशेटजीं मान्यता पावू लागले होते. आपला हा भाचा आयुष्यात आणखी पुढे जाणार हे फ्रामजींनी ओळखलं आणि आपली कन्या आवाबाई हिचा विवाह जमशेटजींबरोबर लावून दिला. या विवाहात आवाबाईंना ‘स्त्री-धन’ म्हणून फ्रामजींकडून बरीच रक्कम मिळालेली होती आणि स्त्री-धनाच्या रकमेतूनच आवाबाई माहिम कॉजवेच्या बांधकामाचा खर्च करणार होती, पती जमशेटजींच्या पैशांतून नव्हे..!

आता पुन्हा मुख्य कथेकडे येऊ. आवाबाईनी सरकारात रक्कम जमा केल्यावर कंपनी सरकारच्या इंजिनिअरींग खात्याने लगेचच कामाला सुरुवात केली. या पुर्वी पुलाच्या जागेचा सर्व्हे झाला होता. डिझाईनही तयार झालं होतं. त्याच डिझाईनमधे थोडसे बदल करत, चार कमानी असलेल्या पुलाचा अंतिम आराखडा लेफ्टनंट क्राॅफर्ड याने तयार केला. पुलाच्या बांधकामाची जबाबदारी, बॉम्बे  इंजिनिअर्सच्या कॅप्टन क्रुकशॅन्क यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गव्हर्नर ॲार्तरनी हिरवा झेंडा दाखवला आणि दिनांक ८ फेब्रुवारी १८४३ या दिवशी माहिम कॉजवेच्या बांधकामाचा नारळ वाढवण्यात आला. पुलाच्या बांधकामास सुरूवात झाली. पुढच्या दोन वर्षांत माहिम-वांन्द्रे जोडणारा पूल, ‘माहिम कॉजवे’, तयार झाला. मुंबई बेट माहिमच्या बाजूने साष्टीभागातील वांद्र्याशी कायमचं जोडलं गेलं. मुंबईकर आणि साष्टीकर आता एकमेकांकडे दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी, कोणत्याही मोसमांत निर्धास्तपणे जाऊ-येऊ शकणार होते. पण जरा सबूर, कॉजवे बांधून तयार झाला असला तरी, त्याचं उद्धाटन अद्याप व्हायचं होतं.

दिनांक ८ एप्रिल १८४५ ही कॉजवेच्या उद्घाटनाची तारीख मुक्रर झाली. उद्घाटनासाठी गव्हर्नर ॲार्थर यांनी यायचं कबूल केलं. लेडी आवाबाई आणि सर जमशेटजी जीजीभॉय  या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार होते. ईस्ट इंडीया कंपनीचे बडे अधिकारी, मुंबईतले बडे व्यापारी, सैन्याधिकाऱ्यांना निमंत्रणं गेली. उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतसं मुंबईकरांच्या उत्साहाला उधाण येऊ लागलं..!

माहिम कॉजवेच्या उदघाटनाचा सोहळा-

शेवटी तो दिवस उजाडला. माहिम कॉजवेच्या उदघाटनाचा मोठा दिमाखदार सोहळा माहिमच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला होता. किनाऱ्यावरच्या ऐसपैस नारळी बागेत, एका भव्य वटवृक्षाच्या सावलीत पांढरा शुभ्र, आलिशान शामियाना उभारण्यात आला होता. दिवस उकाड्याचे असल्याने, उद्घाटनाची वेळ संध्याकाळी ६ ची ठरवण्यात आली होती असली तरी, त्या दिवशी अगदी सकाळपासूनच, कार्यक्रमाच्या ठिकाणी मोक्याची जागा पटकावण्यासाठी, माहिमच्या दिशेने लोकांची रीघ लागली होती. कुणी चालत, कुणी बैलगाडीतून, कुणी रेकल्यातून, तर कुणी टांग्यातून माहिमच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात सर्वत्र विविध रंगाची आणि अनेक प्रकारची पागोटी आणि पगड्या माहिमच्या दिशेने सरकताना दिसत होत्या. लोकांमधे अमाप उत्साह संचारला होता. जो तो उदघाट्नच्या ठिकाणी मोक्याची लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात होता. असंच काहीसं दृश्य, कॉजवेच्या पलिकडे, वांद्र्याच्या बाजूलाही दिसत होतं.

होता होता दुपारचे तीन वाजले. रस्त्यावर जागोजागी पहाऱ्याला असलेलंन, काहीसं आळसावलेलं पोलीस दल अटेन्शनमध्ये उभं राहू लागलं. मुंबईतल्या खाशा स्वाऱ्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची ही वेळ होती. ईस्ट इंडिया कंपनीचे युरोपियन अधिकारी, मुंबईतले प्रतिष्ठित हिंदू, मुसलमान आणि पारशी व्यापारी आपापल्या राजेशाही बग्ग्यांतून, पालख्यांतून आणि मेण्यांतून, पाहाऱ्यावरच्या पोलिसांचे कडक सॅल्यूट स्वीकारत माहिमला पोहोचू लागले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला लोकांनी एकच गर्दी केली होती.

दुपारी चार वाजेपर्यंत माहिम नावाचं, मुंबई शहराच्या उत्तर टोकावर असणारं, नारळ, ताडी आणि तांदळाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं निवांत खेडं त्या दिवशी माणसांनी अगदी फुलून गेलं होतं. एवढी सारी गर्दी त्या आडबाजूला आलेल्या, समुद्राच्या कुशीत आणि दाट नारळींच्या छायेत शांतपणे पहुडलेल्या खेड्यात प्रथमच मिळत होती. माहिमकर तोंडात बोट घालून ते अप्रूप पाहत होते. त्या दिवशी त्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती;आणि का येऊ नये, आजवर कुणाच्या खिजगणतीत नसलेलं माहिम गांव, त्या दिवशी इतिहासात अजरामर होणार होत. त्या कॉजवेच नावंच मुळी ‘माहिम कॉजवे’ होत..!

संध्याकाळचे चार वाजले. बिगुल वाजला. आता कोणत्याही क्षणी गव्हर्नर कॉजवेच्या ठिकाणी येतील, तेंव्हा शांत बसा-शिस्तीत बसाचा इशारा झाला.। पोलिसांचे कडक युनिफाॅर्ममधले वरिष्ठ अधिकारी रस्त्यात दिसू लागले. परेलचं गव्हर्नमेंट हाऊस ते माहिम कॉजवेपर्यंत ठराविक अंतरावर पहाऱ्यावर असलेल्या पोलीस पार्ट्या सावधानमध्ये खड्या झाल्या.

बरोबर साडेचार वाजता गव्हर्नर गव्हर्नर जॉर्ज ऑर्थर यांची चार घोड्यांची बग्गी परेलच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या गेटमधून रुबाबात बाहेर पडली. गव्हर्नर साहेब बग्गीत स्थानापन्न झाले. गव्हर्नरसाहेबांच्या उजव्या हाताला सर जमशेटजी जीजीभॉय याना सन्मानाने बसवण्यात आलं. गव्हर्नरसाहेबांच्या समोरच्या बाजूला जमशेटजी जीजीभॉय यांचे चिरंजीव कर्सेटजी जमशेटजी आणि गव्हर्नरसाहेबांचे खाजगी सचिव स्थानापन्न झाले. गव्हर्नर साहेबांच्या बग्गीच्या मागे-पुढे, रुबाबदार गणवेशात त्यांचे शरीररक्षक, एस्कॉर्टसचं दळ उमद्या घोड्यांवर सवार होऊन सज्ज होत. मागे बॅन्ड पथक होतं. गव्हर्नर साहेबानी, ‘चलो’चा इशारा दिला आणि लवाजमा तीन मैलावर असलेल्या माहिमच्या दिशेने कॉजवेच्या उदघाटनासाठी जाण्यास निघाला.

पुढच्या अर्ध्या तासात, पांच वाजता, गव्हर्नरसाहेबांचा ताफा माहिमच्या सेंट मायकेल चर्चपाशी पोहोचला. चर्चच्या घंटा निनादू लागल्या. चर्चतर्फे गव्हर्नर जॉर्ज ऑर्थर यांचं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमासाठी आलेले बडे निमंत्रित चर्चपाशी गव्हर्नरसाहेबांची वाट पाहत अगोदरपासूनच उभे होते. आता ह्या निमंत्रितांच्या बग्ग्या गव्हर्नरसाहेबांच्या ताफ्यात सामील झाल्या आणि त्यांना ठरवून दिलेल्या जागी उभ्या राहिल्या.

ताफ्याचं नेतृत्व करण्याचा मान सुरुवातीला, ज्या इंजिनिअरिंग विभागाने ह्या कॉजवेचं बांधकाम केलं होतं, त्या ‘बॉम्बे इंजिनिअरिंग विभागा’च्या प्रमुखाला दिला होता. ह्या विभागाचे प्रमुख कॅप्टन क्रुकशांक ह्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या कॅप्टन मॅरियट ह्यांची बग्गी ताफ्याच्या प्रथम स्थानावर उभी राहिली. त्यांच्यामागे कॉजवेचं डिझाईन ज्या विभागाने केलं होतं, त्या विभाप्रमखाची बग्गी होती. त्यांच्यामागे गव्हर्नरसाहेबांच्या शरीररक्षकांच्या घोडदळाची शस्त्रसज्ज तुकडी, त्या तुकडीच्या मागे गव्हर्नरसाहेबांचं रॉयल बॅण्डपथक, बॅण्डपथकाच्या मागे गव्हर्नरसाहेबांची चार घोड्यांची आलिशान, लालचुटुक बग्गी, त्यामागे शरीररक्षकांची आणखी एक तुकडी आणि त्या मागे घोड्यावर सवार बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कमांडर इन चीफची गाडी आणि त्यामागे एका ओळीने एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य, प्रशासनातले उच्चाधिकारी, लष्करी अधिकारी इत्यादी आपापल्या वाहनात अथवा घोड्यावर सवार होऊन, असा काटेकोर राज शिष्टाचार पळत ताफा माहिम चर्चपासून अगदी काहीच मीटर अंतरावर असलेल्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी निघाला

चर्चवरून गव्हर्नर साहेबांचा ताफा मार्गस्थ झाला, तो शामियान्यात उभारलेल्या व्यासपीठावर न जात, सरळ कॉजवेच्या दिशेने निघाला. शाही बॅण्डपथकाने स्वागताच्या सुरावटी वाजवायला सुरुवात केली. तो क्षण आता अगदी जवळ आल्याची सर्वांची खात्री पटून, सोहळ्यासाठी जमलेल्या मुंबईकरांच्या अंगावर आनंदाचा रोमांच उठला. ताफा माहिम कॉजवेच्या अगदी नजीक आला आणि ज्या क्षणी ताफ्याच्या सर्वात पुढे असलेल्या इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुखाची बग्गी कॉजवेच्या मध्यभागी पोहोचली, त्याच क्षणी इशारा झाला आणि तोफा धडाडल्या. कॉजवेच्या दुसऱ्या टोकाकडे, वांद्र्याला, सज्ज असलेल्या कॅप्टन अनवीनच्या तोफखाना दलाने गव्हर्नरसाहेबाना आणि त्यांच्यासोबतच्या खाशा स्वाऱ्याना तोफांची सलामी दिली. गव्हर्नरांचा शाही ताफा कॉजवे पार करून वांद्र्याला पोहोचला. कॉजवेचं अधिकृत उदघाटन झालं.

वांद्राच्या बाजूला एका प्रशस्त घरात वांद्र्याचा कमांडिंग ऑफिसर, गव्हर्नर आणि सोबतच्या खाश्या स्वाऱ्यांच्या स्वागताला कडक गणवेशात सज्ज होता. त्याच्यासोबत, आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला होता, त्या लेडी आवाबाई जमशेटजी जीजीभाई त्यांच्या कुटुंबीयांसहित तिकडे हजर होत्या. त्यांच्यासोबत बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मडमा आणि पारशी समाजातील व्यापाऱ्यांच्या पत्नी होत्या. जमशेटजी जरी गव्हर्नरांच्या सोबत असले तरी, आजच्या कार्यक्रमाचा खरा मान लेडी आवाबाई जमशेटजींचा होता आणि म्हणून गव्हर्नर जातीने त्यांना भेटण्यासाठी कॉजवे पार करून वांद्र्याला आले होते. गव्हर्नर बग्गीतून पायउतार होऊन, मोठ्या अगत्याने आवाबाईंकडे गेले आणि त्यांना किंचित झुकून अभिवादन केलं. गव्हर्नरांनी आवाबाईंचं अभिनंदन करून, केल्या कामासाठी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे आभार मानले. गव्हर्नर साहेबांनंतर ताफ्यात असलेल्या सर्व महोदयांनी आवाबाईंचे आभार मानून, त्यांचं अभिनंदन केलं. काही क्षण तिथे थांबून, ताफा लेडी आवाबाई व त्यांच्या सोबत तिथे असलेल्या इंग्रज आणि पारशी व्यापाऱ्यांच्या लेडीजना बरोबर घेऊन, पुन्हा माहिमकडे उभारण्यात आलेल्या शामियान्याकडे जाण्यास निघाला.

एव्हाना सहा वाजले होते. वांद्र्याहून लेडी आवाबाईना सोबत घेऊन आलेला गव्हर्नरसाहेबांचा ताफा शामियान्यात पोहोचला. शामियान्याच्या मागच्या बाजूला पाहुण्यांच्या हाय टी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. पांढऱ्या शुभ्र गणवेषातले बेअरा आणि वेटर पाहुण्यांच्या सरबराईसाठी सज्ज होते. आपापल्या अधिकाराप्रमाणे ताफ्यातील प्रत्येकजण त्याच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाला. मधोमध गव्हर्नरसाहेबांची खुर्ची होती आणि त्यांच्या शेजारी जमशेटजी बसले होते. व्यसमीठावर समोर इतर महत्वाचे अधिकारी आणि सन्माननीय लेडीज यांच्या बसण्याची व्यवस्था होती. आता शामियान्यात उपस्थित झालेल्या खाश्या स्वाऱ्यांसाठी हाय टी च्या व्यवस्थेची लगबग चालली होती. पदार्थांच्या नाना त-हा पाहुण्यांच्या जिभेचेला तृप्त करण्यासाठी तयार होत्या. आसमंतात त्या खाण्याचा दरवळ सुटला होता. गव्हर्नर साहेब, जमशेटजी कुटुंब, या कार्यक्रमासाठी सपत्नीक हजार असलेले सैन्याचे उच्चअधिकारी, विविध बड्या हुद्द्यांवरचे नागरी आणि लष्करी अधिकारी, कायदा मंडळाचे सदस्य, मुंबईतले बडे व्यापारी, इत्यादी सारे पाहुणे अल्पोपहारासाठी बसले. पुढच्या अर्ध्या तासात सर्वांचं खाणं-पिणॅ आटोपलं आणि सर्वजण व्यासपिठावर स्थानापन्न झाले.

ठिक साडेसहा वाजता समारंभ सुरु झाला. समोरचा शामियाना आणि त्यापलीकडचा माहिम कॉजवे पार वांद्य्रार्यंत माणसांनी फुलून गेला होता. व्यासपीठावरून पाहताना जिथवर नजर जाईल तिथवर माणसंच माणसं दिसत होती. व्यासपीठावर मध्यभागी गव्हर्नर जॉर्ज ॲार्थर यांची खुर्ची होती. त्यांच्या शेजारी उजव्या हाताला सर जमशेटजी जीजीभॉय  बसले होते. गव्हर्नरांच्या डाव्या हाताला मुंबई इलाख्याचे कमांडर इन चीफ सर टी. एम. मॅकमॅहॉन यांचं आसन होतं. इतर निमंत्रीत त्यांच्या प्रोटोकाॅलनुसार मांडलेल्या खुर्च्यांवर आसनस्थ झाले. व्यासपिठाच्या समोर मांडलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत लेडी आवाबाई जमशेटजी आणि इतर मान्यवर स्त्रियांना सन्मानाने बसवण्यात आलं होतं. बिगुल वाजला. कार्यक्रम सुरु होतोय आणि गव्हर्नरसाहेब बोलायला उभे राहाताहेत याची सूचना झाली आणि सर्वत्र एकंच शांतता पसरली.

गव्हर्नर बोलायला उभे राहिले. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली आणि मागे बसलेल्या सर आणि समोर बसलेल्या लेडी जमशेटजी यांच्याकडे पाहून त्यांनी त्यांना किंचित झुकून अभिवादन केलं आणि भाषणााला सुरुवात केली. गव्हर्नर म्हणाले, “सर आणि लेडी जमशेटजी, मुंबईकरांच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा असलेल्या ह्या माहिम कॉजवेच्या बांधकामात लेडी आवाबाईनी जो पुढाकार घेतला, त्याबद्दल मी स्वतः आणि इथे उपस्थित असलेला प्रत्येक लहान-मोठा मुंबईकर लेडी आवाबाई जमशेटजी आणि जमशेटजी जीजीभॉय  कुटुंबियांचे अत्यंत आभारी आहोत”. एवढं बोलून पुढच्या भाषणात त्यांनी ह्या कॉजवेच्या बांधकामासाठी ईस्ट इंडीया कंपनीने १८३५ कसे प्रयत्न केले, निधीची कमतरता का होती, लेडी आवाबाई आणि सर जमशेटजींनी कॉजवेच्या बांधकामाचा विषय कसा लावून धरला आणि तडीसही नेला इत्यादी इतिहासाचा आढावा घेतला. ह्या कॉजवेच्या बांधकामासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले होते, त्या सर्वाॅचे त्यांनी आभार मानले. गव्हर्नर पुढे म्हणाले की, “लेडी जमशेटजींचे आभार यासाठीही मानावे लागतील, की लेडी केवळ या कॉजवेच्या बांधकामाचा खर्च करुन थांबलेल्या नाहीत, तर या कॉजवेपर्यंत पोहोचण्याचा जो मातीचा रस्ता (approach road) आहे, तो देखील पक्का करावा म्हणून त्यांनी आणखी २० हजार रुपये देऊ केले आहेत. हा रस्ता झाल्याने माहिमवरून कॉजवेपर्यंत जाण्यासाठी मुंबईकरांना कायमचा पक्का रस्ता उपलब्ध होणार आहे. लेडी आवाबाईंच्या सन्मानार्थ आजपासून कॉजवेसहितच्या या रस्त्याचं नांव ‘लेडी जमशेटजी कॉजवे’ असं ठेवण्यात आलं आहे, याची सर्व मुंबईकरांनी नोंद घ्यावी” गव्हर्नरांनी हे जाहिर करताच, जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी हात उंचावून लेडी जमशेटजींच्या नांवाचा जयघोष सुरू केला.

सर्वांना शांत बसण्याची सुचना करुन, आपल्या पुढच्या भाषणात गव्हर्नर साहेबांनी जमशेटजी जीजीभॉय  यांनी मुंबईच्या विकासात दिलेल्या योगदानाचा दीर्घ आढावा घेतला. जमशेटजींनी मुंबईच्या व्यावहारीक आणि सामाजिक कार्यात घेतलेल्या सक्रिय पुढाकाराची पावती म्हणून, इंग्लंडच्या राणीने सर जमशेटजींना ‘नाईट (Knight)चा किताब दिल्याचं गव्हर्नरांनी जाहिर केलं. नाईटहूडचं सन्मान चिन्ह गव्हर्नरांनी जमशेटजींच्या छातीवर सन्मानाने लावलं. त्याबरोबर समोर उपस्थित असलेल्या मुंबईकरांनी जमशेटजींच्या आणि राणीचा एकच जयजयकार करून आपला आनंद व्यक्त केला..!

आपल्या पुढच्या भाषणात गव्हर्नर साहेबांनी सर्व मुंबईकरांच्या वतीने सर आणि लेडी जमशेटजींचे पुन्हा एकदा आभार मानले आणि त्यांनी आपलं भाषण संपवलं.

गव्हर्नर साहेबांच्या भाषणानंतर जमशेटजी जीजीभॉय  यांचं भाषण झालं. भाषणाच्यी सुरुवातीलाच जमशेटजींनी, लेडी जमशेटजींना मुंबईकरांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल, कंपनी आणि गव्हर्नरसाह्बींचे आभार मानले. ह्या कार्यक्रमात, कॉजवेचं बांधकाम ज्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं, ते कॅप्टन क्रुकशॅंक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचं सांगून, त्यांनी क्रुकशॅंक यांचेही आभार मानले. लेडी जमशेटजींनी कॉजवे व जोडरस्त्याच्या बांधकामात किती रस घेतला होता, हे सांगून त्यांनी लेडी जमशेटजींची, ह्या कॉजवेच्या वापरासाठी कोणत्याही मुंबईकराकडून, मग तो गरीब असो की श्रीमंत, शेतकरी असो वा व्यापारी, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा ‘टोल’ कधीही आकारण्यात येऊ नये, अशी सरकारकडे विनंती केल्याचं सांगितलं. जमशेटजींनी हे सांगताच, गव्हर्नर ॲार्थर यांनी मान हलवून त्यासाठी आपली संमती दर्शवली. समोर बसलेल्या मुंबईकरांनी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला..! मुंबईच्या विकासात मी आणि माझं संपूर्ण कुटुंबीय, जी लागेल ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत, असं म्हणून आपली मुंबईप्रती, मुंबईकरांप्रती आणि कंपनी सरकारप्रती आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन जमशेटजींनी आपलं भाषण संपवलं..!

रात्रीचे आठ वाजले होते. कार्यक्रम संपला. गव्हर्नर आणि त्यांचा ताफा परेलच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या दिशेने निघाला. त्यांच्या पाठोपाठ बाकी सारे निघाले. परेलच्या दिशेने निघालेल्या गाड्यांच्या दिव्यांची माळका लांबवर उजळलेली दिसत होती..!

माहिम कॉजवेचं महत्व-

मुख्य मुंबई पश्चिम दिशेने साष्टीशी जोडली गेली ती ८ एप्रिल १८४५ ह्या दिवशी. हा रस्ता झाला आणि मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीच्या आधाराने वसलेल्या लहान लहान गांवांचं रुपांतर हळुहळू उपनगरांमधे व्हायला लागलं. मुंबई वाढू लागली. पहिली वांद्र्यापर्यंत, नंतर अंधेरीपर्यंत आणि आता तर ती पार दहिसरपर्यंत वाढली आहे आणि अजुनही वाढतेच आहे. त्याचं श्रेय संपूर्णपणे ह्या ‘लेडी जमशेटजी कॉजवे’कडे जातं. डंकन कॉजवेमुळे जशी पूर्व उपनगरांची वाढ झाली, तशीच माहिम कॉजवेमुळे पश्चिम उपनगरांची वाढ झाली. यात फक्त एकच ठळक फरक आहे. पूर्वेला कारखानदारी, उद्योग-धंदे फोफवले, तर पश्चिमेला निवासी वस्ती. विस्तिर्ण समुद्रकिनाऱ्यांमुळे असेल कदाचित, पण मुंबईतीले बडे चित्रपट तारे-तारका, उद्योगपती, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱी नामवंत व्यक्तीमत्व, बडे सरकारी अधिकारी व्हाईट काॅलर नोकरदार इत्यादींनी आपल्या निवासासाठी मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या उपनगरांची निवड केलेली पुढच्या काळात दिसून येते. जर हा रस्ता झाला नसता तर, कदाचित तसं होऊ शकलं नसतं असं वाटावं इतकी ह्या कॉजवेची थोरवी आहे. इतकंच काय, तर महाराष्ट्राचा राज्यकारभार जिथून हाकला जातो, ते मंत्रालयही पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या चर्चगेट या पश्चिम रेल्वेच्या पहिल्या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. पश्चिम रेल्वे धावली ती ह्याच रस्त्याच्या चाकात चाकं मिळवून.

मुंबई आणि मुंबईकरांच्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या असलेल्या या कॉजवेच्या बांधकामाचा खर्च उचलताना, त्या कॉजवेला आपलं नांव द्यायला हवं, असा कोणताही हट्ट त्वांनी धरलेला नव्हता वा तशी अटही आवाबाईंनी घातलेली नव्हती. तरीही त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून, त्यावेळच्या मुंबईकरांनी (पक्षी:सरकारने) आवाबाई जमशेटजी जीजीभॉय , अर्थात लेडी जमशेटजी यांच्या सन्मानार्थ म्हणून या रस्त्याला ‘लेडी जमशेटजी कॉजवे’ असं नांव देण्यात आलं आणि आज पावणे दोनशे वर्षांनंतरही हा रस्ता, नांवात किंचित बदल होऊन ‘लेडी जमशेटजी रोड’ याच नांवाने ओळखला जातो.

पश्चिम उपनगरांतून माहिमची खाडी ओलांडून दक्षिण मुंबईला येण्यासाठी अगदा आता आता पर्यंत हा एकमेंव रस्ता होता. या रस्त्याच्या नजिकचा धारावीतून मुंबई शहराकडे जाणारा रस्ता आणि वरळीला जाणारा सी लिंक, ही बांधकामं खूप नंतरची. वांद्रे-वरळी सी लिंकने तर अद्याप वयाची १० -१२ वर्षही पूर्ण केली असतील-नसतील.

सातत्याने १७५ वर्ष मुंबईकरांच्या सेवेत असणारा हा माहिम कॉजवे किंवा लेडी जमषेटजी रोड, मुंबईकरांची अजुनही विनातक्रार अबोलपणे सेवा करत आहे. रोज ह्या रस्त्याने प्रवास करणारांना ह्या रस्त्यातं मुंबईच्या समृद्धीतलं योगदान लक्षात येणार नाही. ते लक्षात येण्यासाठी आणि ह्या कॉजवेवरुन माहिमची खाडी पार करताना, त्याच्या जन्मदात्रीप्रती मनातल्या मनातल्या का होईना, मुंबईकरांनी कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी हा लेखन प्रपंचं..!

-नितीन साळुंखे

9321811091

९ सप्टेंबर, २०२०.

महत्वाच्या टीपा-

 1. आजचा ‘लेडी जमशेटजी मार्ग’ दादरच्या शिवसेनाभवनपासून सुरू होतो, तो माहिम चर्चवरून जात माहिमची खाडी पार करुन थांबतो. इथून पुढे ह्या रसत्याचं नांव ‘स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड)’ असं हेतं. सेना भवन ते माहिमच्या खाडीपर्यंतचा रस्ता आणि त्यापुढील कॉजवे, म्हणजे पूल, हे लेडी जमशेटजी दातृत्वाचं फलित आहे. तसं दर्शवणारी पाटी पुलाच्या पश्चिमबाजुच्या कठड्यावर लावलेली आहे.
 2. या पाटिवर पुलाचा एकूण खर्च रूपये २,०३,८४६ इतका आला असून, त्यापैकी रुपये १,५५,८०० मात्रचा खर्च लेडी जमशेटजी यांनी केल्याचा उल्लेख आहे. ‘गॅझेटीअर ॲाफ बाॅम्बे सिटी ॲन्ड आयलंड’मधेही असाच उल्लेख आहे. मात्र गव्हर्नर जॉर्ज ॲार्थर यांच्या भाषणात पुलासाठी रुपये १,४७,०००/- तर जोड रस्त्यासाठी रुपये २०,०००/- असे एकूण १,६७,०००/-चा उल्लेख आला आहे. खर्च किती हा मुद्दा इथे गौण असून, तो लेडी जमशेटजी यांनी केला होता, हा उल्लेख महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यावं.
 3. माहिम कॉजवेवरून माहिमहून वांद्र्याला जाताना, जिथे कॉजवे, म्हणजे सुरु होतो, तिथेच डाव्या हाताला पुलाच्या कठड्यावर कॉजवेच्या बांधकामाची माहिती देणारी संगमरवरी पाटी आहे. ही पाटी १९४१ साली जेंव्हा मूळ कॉजवेचं रुंदीकरण केलं गेलं, तेंव्हा लावलेली आहे(सोबत त्या पाटीचा मी काढलेला फोटो देत आहे) मूळ पाटी आता कुठे असेल, हे केवळ महानगरपालिका सांगू शकेल. सध्याच्या पाटीवर पुलाच्या उदघाटनाची तारीख केवळ १८४३ असं वर्ष दिलेलं आहे. वास्तविक तत्कालीन शासकीय गॅझेटमधे दिनांक ८ एप्रिल १८४५ रोजी सदरचा कॉजवे जनतेसाठी खुला करण्यात आला, असा उल्लेख आहे. कॉजवेच्या उद्घाटनाची म्हणून तिच तारीख ग्राह्य धरायला हवी.
 4. लेडी जमशेटजी यांनी माहिम कॉजवेच्या बांधकामाचा खर्च का उचलला, याच्यामागची कारणं दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे, आवाबाईंची वांद्र्याच्या जरीमरी मातेवर श्रद्धा होती आणि तिच्या दर्शनाकरिता त्यांना बोटीतून वांद्र्याला खाडी पार करून जावं लागायचं. ते टाळण्यासाठी त्यांनी माहिम कॉजवे बांधला. दुसरी आख्यायिका सांगते कीं, आवाबाईंची वांद्र्याच्या माऊंट मेरीवर, म्हणजे बोलीभाषेतील मोत मावलीवर, श्रद्धा होती आणि आवाबाईना मुलगी झाल्यास, त्या माहिमच्या खाडीवर स्वखर्चाने पूल बांधतील, असा नवस त्या मोत मावलीला बोलल्या होत्या आणि म्हणून त्यांनी कॉजवे बांधला. लेडी जमशेटजी आणि माहिमचा कॉजवे यांच्यातील नातं विशद करताना, वेळोवेळी ही दोन उदाहरणं समोर येतात. मात्र लेडी जमशेदजी यांनी, खाडी ओलांडताना बोटी बुडून गरीब मुंबईकरांची प्राण आणि वित्तहानी होऊ नये, या एकमेव मानवतावादी विचारातून हा कॉजवे बांधण्याचा खर्च उचलला, हे गव्हर्नर ॲार्थर आणि जमशेटजी जीजीभॉय  यांनी त्यांच्या उद्घाटनीय भाषणात जाहिररित्या सांगितलं, ते जास्त खरं आहे. मुंबईतला पारसी समाज धनाढ्य, परोपकारी आणि कनवाळू आहे, याची शेकडो उदाहरणं इतिहासात आणि आजही सापडतात. समाजाकडून कमावलेलं धन सामाजिक कारणांसाठी खर्च करण्याच्या पारसी समाजाच्या परोपकारी मानसिकतेच्या परंपरेशी सुसंगत असंच आवाबाईंचं वागणं होतं.

संदर्भ-

 1. ‘मुंबईचे वर्णन’-गोविंद मडगांवकर, सन १८६२.
 2. ‘मुंबईचा वृत्तांत’ -बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो शिंगणे, सन १८८९. पुनर्मुद्रण १९८०.
 3. ‘स्थल-काल’- डॉ. अरुण टिकेकर, सन २००४.
 4. Gazetteer of Bombay City & Island 1884, Vol. I, p. 365-366 with footnote
 5. Bombay Place-Names and Street-Names; An Excursion Into the by-Ways of the History of Bombay Cit, by Samuel T. Sheppard. P. 91-92
 6. Essay in‘Parsee khabar’ on 10 June 2017. Availbale on internet.
 7. Bombay-The joining of seven islands(1668-1838)- web indianculture.gov.in
 8. Bombay in the days of Queen Anne-Book by Council of the Hakluyt Society -1933- p21.
 9. Journal of Historical Geography – Making Bombay Island:Land Reclamation & Geographical Conceptions of Bombay- 1661-1728. – Essay by Tim Riding.
 10. दिनांक ८ एप्रिल, १८४५ रोजी झालेल्या माहिम कॉजवेच्या उद्घाटनाचा संपूर्ण वृत्तांत, दिनांक १६ जून, १८४५ रोजीच्या लंडन येथे प्रकाशित झालेल्या ‘The Sun’ ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला होता. त्या वृत्तांताचं स्वैर भाषांतर मी वर केलेलं आहे.
 11. माहिम कॉजवेवरचा हा सविस्तर लेख, जन्माने आणि कर्मानेही मुंबईवर नसलेला, परंतु मुंबईवर मनस्वी प्रेम करणारा माझा मित्र, ज्याला मी अद्याप कधीही भेटलेलो नाही, भारत महारुंगडे यांने केलेल्या अमुल्य मदतीशिवाय लिहिणं शक्यच झालं नसतं. भारतने मला जुनी पुस्तकं, संदर्भ, कागदपत्र आणि ‘द सन’चा अख्खा पेपर उपलब्ध करुन दिला. भारतला त्याचे आभार मानलेले कदाचित आवडणार नाहीत, तरीही त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेख मी त्यालाच अर्पण करतो आहे..!
 12. Wikipedia

फोटो क्रेडीट-

फोटो क्र.१- माझे मित्र व ‘Mid-Day’ या इंग्रजी दैनिकाचे प्रिन्सिपाॅल फोटोग्राफार श्री. आशिष राणे यांनी टिपलेला आहे.

फोटो क्र.२ – सन १८५० सालचं विलियम कार्पेन्टर यांनी काढलेलं हे तैलचित्र, पुणेकर असुनही मुंबईवर निस्सिम प्रेम करणारे, मुंबईचे अभ्यासक, लेखक श्री. संभाजी भोसले यांनी उपलब्ध करुन दिलं आहे.

इतर फोटो-इंटरनेटवरून घेतलेले आहेत.

आभार –

मुंबईच्या इतिहासाच्या शोधकामातील माझे सहकारी श्री. सुधीर मोरे, माझा मित्र संतोष(बाळा) माने आणि माहिम कोळीवाड्याचे पाटील श्री. नितीन पाटील यांनी हा लेख लिहिताना मोलाची मदत केली आहे, त्यांचे आभार. तसेच इतिहास लेखनाच्या दृष्टीन् वेळोवेळी मला मोलाच्या सूचना करणारे ज्येष्ठ पत्रकार, श्री. कुमार कदम यांचाही मी आभारी आहे.

माहिम काॅजवेवर आज असलेली पाटी

जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

जन्मकथा गेट वे ऑफ इंडीयानजिकच्या शिव पुतळ्याची..!

गेट वे ऑफ इंडियावरचा, समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला, २१ फुट उंच चबुतऱ्यावर असलेला १८ फुट उंच, ब्रॉन्झमध्ये घडवलेला  महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण अनेकदा पाहिला असेल. त्यावेळचा सर्वात उंच असलेला हा शिव पुतळा, दिनांक २६ जानेवारी १९६१ ह्या दिवशी, म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षात इथे उभारला गेला. ह्या पुतळ्याचे शिल्पकार आहेत कल्याणचे श्री. सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे.

हा किंवा इतर कोणताही पुतळा पाहताना आपण तो फक्त बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्याने आपली तोपर्यंतची सर्वोत्तम कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही आपण फारसा  लक्षात घेत नाही. एवढंच कशाला, त्या पुतळयाच नीट निरीक्षणही करत नाही. शिल्पकाराचं  नांवही कित्येकदा आपल्याला माहित नसतं. इथे मी हे ह्या शिल्पाबद्दल म्हणत असलो तरी, इतर प्रत्येक कलाकृतीबद्दल ते खरं आहे, हा माझा अनुभव आहे. गेट वे ऑफ इंडियानजीकचा अश्वारूढ शिव पुतळा काय किंवा दादरच्या शिवतिर्थावरचा छत्रपतींचा पुतळा काय, त्या पुतळ्याच्या एका हातात घोड्याचा लगाम असेल, तर दुसऱ्या हातात काय आहे, ह्याच  बरोबर उत्तर त्या पुतळ्यांचं नित्य दर्शन घेणाऱ्यानाही देता येईल की नाही, याची मला शंका आहे. तिथे त्या पुतळ्याबद्दल अधिकची काही माहिती कुणाला असेल याची शक्यताच उरत नाही..! प्रस्तुतच्या लेखातील पुतळ्याबाबतही हे खरं आहे.

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याची जन्मकथा मोठी रोमांचक आहे. हा पुतळा घडवणारे शिल्पकार श्री. भाऊ साठें ह्यांना ह्या पुतळ्याचं काम मिळण्यापासून ते, तो पुतळा गेट वे ऑफ इंडियाच्या समोर २१ फूट उंच चबुतऱ्यावर स्थानापन्न होईपर्यंतच्या दीड-दोन वर्षांच्या काळातल्या साऱ्याच घटना स्पर्धेतून येणाऱ्या राजकारणाने, इर्षेने, हेवेदाव्यानी, त्याचबरोबर रोमांचक क्षणांनी भरलेल्या आणि कृतार्थतेने भारलेल्याही आहेत. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे.

त्याकाळातल्या मुंबईतलं हे तो वरचं सर्वात उंचं आणि सर्वात दिमाखदार शिल्प. ह्या शिल्पाच्या प्रसववेदना तुम्हालाही ठाऊक असाव्यात, तुम्ही त्या अनुभवाव्यात आणि पुढच्यावेळी जेंव्हा तुम्ही हा पुतळा पाहायला जाल, तेंव्हा त्या पुतळ्याकडे पाहण्याची दृष्टी तुम्हा सर्वाना यावी ह्यासाठी ह्या लेखाचं प्रयोजन..!

पुतळा जन्माला येण्यापूर्वी.. 

साल होतं १९५९. महिना मे चा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती अद्याप व्हायची होती. गुजरात आणि महाराष्ट्र एकच संयुक्त राज्य होतं. मुंबईसह महाराष्ट्राची मागणी घेऊन आंदोलन जोरात सुरू होतं. १०६ बळी गेले होते आणि हे बळी घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची गच्छंती होऊन, यशवंतराव चव्हाण संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून बसले होते. मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण होईल अशी सुचिन्ह राजकीय क्षितिजावर दिसू लागली होती. आणि कदाचित म्हणूनच त्या मुहूर्तावर मुंबईत एखाद्या मोक्याच्या जागी, महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, असं ठरवलं गेलं असावं. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होताना, देशातलं पहिलं स्वत:चं तख्त, ते ही महाराष्ट्राच्या भुमिवर निर्माण करणाऱ्या शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत स्थापन करणं हे अत्यंत समयोचित होतं..!

मुख्यमंत्री यशवंतरावांनी त्यावेळच्या वजनदार राजकारण्यांचा समावेश असलेली एक पुतळा समिती तयार केली. जून महिन्याच्या आसपास समितीतर्फे मुंबईतल्या व मुंबई बाहेरच्याही नामवंत आणि नवोदित शिल्पकारांना, सरकारने छत्रपतींचा पुतळा बसवण्यासाठी मुक्रर केलेल्या जागांची पाहाणी करुन, पुतळा कसा असेल, त्याचा खर्च काय होईल इत्यादी तपशिल देऊन, पुतळ्याची आपापल्या कल्पनेतली मॉडेल्स आणि त्यासाठी येऊ शकणा-या खर्चाचं अंदाज पत्रक देण्याची विनंती शिल्पकारांना केली.

देशभरातल्या उत्तमोत्तम, नामवंत शिल्पकारांनी या प्रतिष्ठेच्या कामात रस दाखवला होता. त्यात एक शिल्पकार श्री. सदाशिव, अर्थात भाऊ साठेही होते. परंतु पुतळा घडवण्याच्या स्पर्धेत उतरलेले इतर शिल्पकार आणि भाऊ यांच्यात एक फरक होता आणि तो म्हणजे, भाऊ इतर दिग्गज शिल्पकारांच्या तुलनेत नवोदित म्हणावेत असे होते. गाठीशी फारसा अनुभव नाही. वयाने अवघे ३५ वर्षांचे. शरीरयष्टी किरकोळ. प्रथमदर्शी छाप न पडू शकणारी. शिक्षण पुर्ण होऊन जेमतेम १०-११ वर्ष झालेली. मोठं काम करण्याचा फारसा अनुभव नाही. नाही म्हणायला यापूर्वी त्यांना राजधानी दिल्लीतील महात्मा गांधींचा पुतळा बनवण्याचाी संधी मिळालेली होती आणि त्या पुतळ्याची देशपातळीवर वाखाणणीही झालेली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने साठेंनी महाराजांचा पुतळा घडवण्याच्या कामात आत्मविश्वासाने उतरायचं ठरवलं.

आता सरकारने महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या दोन जागा सुचवल्या होत्या, त्या जागांची पाहणी सुरु झाली. कोणत्याही शिल्पाला उठाव येण्यासाठी, ते शिल्प ज्या जागी बसवायचं असतं, त्याच्या आजूबाजूचा परिसर नेपथ्याची भूमिका बजावत असतो. तो शिल्पाला पूरक असला तरच शिल्प उठून दिसते. म्हणून जागा फार महत्वाची. सरकारने सुचवलेल्या दोन जागांपैकी एक जागा होती मलबार हिलच्या माथ्यावरची हॅंगिंग गार्डनची, तर दुसरी होती गेट वे ऑफ इंडीयाची. हॅंगिंग गार्डनची जागा प्रशस्त असली तरी मुख्य शहरापासून काहीशी एका बाजुला होती. दाट झाडीत लपलेली होती. पुन्हा त्या जागेशेजारीच पारशी समाजातील मृतांची अंतिम क्रिया करण्याचा ‘दोखमा’ होता. म्हणून ही जागा सर्वच संबंधितांनी नाकारली. 

त्यामानाने गेट वे ऑफ इंडीयाची दुसरी जागा सर्व दृष्टीने सोयीची आणि उचितही होती. ‘इंडीया गेट’ राजधानी दिल्लीला असलं तरी, मुंबईचं ‘गेट वे ऑफ इंडीया’ भारताचं प्रवेशद्वार समजलं जातं. देश-विदेशातले पाहुणे भारताला भेट देताना, गेट वे ऑफ इंडीया पाहिला नाही तर भारत भेट पूर्ण झाली, असं समजत नाहीत. पाहुणा देशातला असो वा विदेशातला, त्याची पावलं गेट वे ऑफ इंडीयाच्या दिशेने वळतातच वळतात.  शिवाय गेट वे ऑफ इंडीयाच्या समोरच टाटांचं जगप्रसिद्ध ‘ताजमहल’ हे पंचतारांकीत हॉटेल आहे. तिथे उतरणारे पाहुणे जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठीत व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या समोर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं, लढवय्या विराचं, स्व-कर्तुत्वावर हिंन्दवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र-देशातील करारी राजाचं, श्रीमान योग्याचं शिल्प असणं योग्य होईल, असं ठरवून हे मोक्याचं ठिकाणच महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलं. आपल्या देशाविषयी, देशाच्या इतिहासाविषयी आणि या एकमेंवाद्वितीय इतिहासपुरुषाविषयी इतरांच्या मनात आदर,  दरारा, दबदबा निर्माण करणाऱ्या शिवशिल्पासाठी ही जागा सर्वच दृष्टीने योग्य होती. शिवाय पहिलं आरमार बांधणाऱ्या शिवप्रतिमेची समुद्रावर नजर रोखलेली असणंही सर्वथैव योग्य होती.

शिवशिल्पाची जागा ठरली. आता पाळी होती, ती हे शिल्प साकारायची संधी कुणाला मिळणार याची वाट पाहण्याची. त्या काळातले सर्वच दिग्गज शिल्पकार स्पर्धेत उतरले होते. हे काम करण्याची संधी ज्याला मिळेल, त्या शिल्पकाराला देशभरात प्रसिद्धी अन् प्रतिष्ठाही मिळाणार होती आणि त्यामुळेच हे शिल्प घडवण्याचं काम आपल्यालाच मिळावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत होता. आणि इथेच राजकारणाने प्रवेश केला. हे आपल्या देशाचं वैशिष्ट्यच आहे. आपल्याकडची कोणतीही कामं, ‘माणूस कुणाचा’ हे पाहून दिली जातात, तो काय कुवतीचा आहे हे पाहून नाही. तसंच थोड्या फरकाने इथेही घडलं. थोड्या फरकाने म्हणण्याचं कारण इतकंच की, इथे तो पुतळा घडवण्याच्या इच्छेने अन् इर्षेने स्पर्धेत उतरलेल्या शिल्पकारांपेक्षा, ‘माझ्या माणसालाच ते काम मिळालं पाहिजे’ हा राजकारण्यांचा ‘इगो’ मोठा ठरून, पुतळा घडवण्याचं कंत्राट देण्याचा अधिकार असलेल्या ‘पुतळा समिती’च्या मंडळींमध्ये राजकारण घुमू लागलं होतं. त्यांच्या दृष्टीने ते फक्त एक ‘कंत्राट’ होतं आणि ‘कंत्राट ह्या आपल्या देशातील सर्वच राजकारणी – अधिकारीवर्गाच्या आवडत्या शब्दमागून येणाऱ्या राजकारणाने वेग घेतला. सगळेच जण आपापल्या मर्जीतल्या कलावंताला हे काम मिळावं ह्यासाठी एक एक घर पुढे-मागे आणि तिरकेही चालू लागले. 

आपले भाऊ साठे मात्र यात कुठेच नव्हते. त्यांच्या कुणाशी ओळखी नव्हत्या की पुतळा समितीतलं त्यांना कुणी ओळखत नव्हतं. मुंबईत छत्रपतींचा पुतळा बसवण्याचं ठरलं त्या १९५९ सालच्या  दहा-अकरावर्षांपूर्वी, म्हणजे १९४८ सालीच भाऊंचं शिल्पशिक्षण पूर्ण झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला कुठेच काम मिळेना म्हणून, कल्याणला गणपतीच्या मुर्ती घडवण्याच्या  काकांच्या पारंपारीक व्यवसायात उमेदवारी सुरु केली. शास्त्रशुद्ध शिल्पकलेचं शिक्षण घेतलेल्या नंतर त्या कामाचा कंटाळा येऊन भाऊ साठे दिल्लीला गेले. दिल्लीत कुणाची ओळखदेख नाही, अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या दिल्लीतल्या एका स्नेह्याने आसरा दिला.

आसरा तर मिळाला, आता काम मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. पैशांची चणचण होती. बराच काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाचा गणपती बनवण्याचं काम निळालं. दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाच्या या गणेशोत्सवात, दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या सर्वच मराठी व्यक्ती आवर्जून हजेरी लावत असत. तिथेच साठेंची ओळख तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्याशी झाली आणि त्या ओळखीतून साठेंनी त्यांचा अर्ध पुतळा बनवण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली आणि ते काम यशस्वीरित्या पूर्णही केलं. अर्थात हे काम साठेंनी स्वत:हून केलेलं असल्याने, त्यांनी ह्या कामातून पैशांची अपेक्षा ठेवली नव्हती. आपल्या हातातली कला सी. डी. देशमुखांसारख्या सर्वच अर्थाने मोठ्या माणसाच्या दृष्टीस यावी हा हेतू होता. हा हेतू अर्थातच साध्य झाला आणि भाऊंच्या हातातील कला देशमुखांच्या नजरेत भरली.

पुढे दिल्ली नगरपालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचं ठरलं, तेंव्हा झालेल्या स्पर्धेत भाऊ साठेंनी केलेल्या गांधी पुतळ्याच्या दोन फुटी मॉडेलला सर्व संबंधितांनी पसंती दिली आणि ते काम सदाशीव साठेंना मिळाल. गाठीशी प्रचंड कार्य असलेल्या, स्वभावाचे असंख्य पैलू असणाऱ्या महात्मा गांधींची सर्व स्वभाव वैशिष्ट्य एका शिल्पात साकारणं अत्यंत अवघड होतं. परंतु सदाशीव साठेंनी ते शिवधनुष्य लिलया पेललं आणि भाऊंनी घडवलेल्या गांधींच्या ह्या पुतळ्याने, वयाच्या अवघ्या अठ्ठाविशीत असणाऱ्या भाऊ साठेंच्या नावाची कलाविश्वात दखल घेतली गेली. मध्यंतरी कधीतरी यशवंतराव चव्हाण दिल्लीस आले असताना, भाऊंचं हे काम यशवंतरावांच्या नजरेत आलं होतं आणि त्यांनी त्याचवेळेस मुंबईतल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम साठेंना देण्याचं तेंव्हाच निश्चित केलं असावं. अर्थात त्याचं सूतोवाच त्यांनी भाऊंकडे केलं नव्हतं. मात्र त्यांनी मुंबईचा शिव पुतळा घडवण्यासाठी नेमलेल्या समितीकडे भाऊंची शिफारस, भाऊंच्या नकळत केली असावी, असं पुढच्या घटना पाहून म्हणता येईल.  

इकडे पुतळा समितीवरील सदस्यांचं राजकारण जोरात सुरु झालं होत. स्पर्धेतल्या इतर तगड्या स्पर्धकांच्या तुलनेत भाऊ साठे सर्वच दृष्टीने नवखे होते. म्हणून सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. पण साठे स्पर्धेत तर होतेच. त्यात साक्षात मुख्यमंत्र्यांच्या तोंडून भाऊंची स्तुतीही त्यांनी ऐकलेली असावी, त्यामुळे त्यांची थोडीशी का होईना, दखल घेणं भागच होत. पुतळा कमेटीतल्या तत्कालीन सदस्यांनी, साठे स्पर्धेच्या बाहेर जावेत म्हणून जे जे शक्य होतं ते सर्व प्रयत्न केले. गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या बाबतीत साठे इतरांपेक्षा कुठेही कमी नव्हते. दिल्लीच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यात भाऊंची गुणवत्ता सिद्ध झालीच होती. म्हणून तांत्रिक मुद्द्यांवर साठेंचं ‘टेंडर’ फेटाळावं असे प्रयत्न सुरु झाले. साठेंनी सादर केलेल्या पुतळ्याच्या खर्चाच्या अंदाजपत्रकात, अगदी मंडईत भाजीपाल्याचा भाव पाडून मागावा तसा भाव करण्याचाही प्रयत्न केला, जेणेकरून परवडत नाही म्हणून भाऊंनी स्पर्धेतून माघार घ्यावी. पण साक्षात शिवप्रभूंच्या तो पुतळा, त्याचा भाव काय करायचा ह्या विचाराने पुतळा समितीने सुचवलेल्या किमतीत पुतळा बनवायला भाऊ तयार झाले. वास्तविक भाऊंना एवढ्या मोठ्या कामाचा खर्च किती होईल ह्याचा काहीच अंदाज नव्हता. कुणी अनुभवी माणसांना विचारावं, तर ते ही स्पर्धेत उतरलेले. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करताच येत नव्हती. म्हणून त्यांनी अंदाजाने अगदी कमीत कमी खर्चाचं अंदाजपत्रक दिलं होतं. त्यातही खोट काढण्याचा पुतळा समितीचा प्रयत्न कशासाठी आहे, हे भाऊंच्या लक्षात येत होत. साठेंनी समितीने सुचवलेल्या खर्चात पुतळा बनवण्याची तयारी दर्शवली म्हटल्यावर, पुतळा तयार करण्यासाठी लागणारी मुदत समितीने अगदी कमी करून पहिली. साठे त्यालाही तयार होतायत, बधत नाहीत हे पाहून शेवटी जातीचं कार्ड वापरायचाही प्रयत्न केला आणि मग मात्र साठेंनी उद्वीग्न होऊन,  शिवरायांच्या पुतळ्याचं काम करण्याचं नाकारलं आणि ते तडक दिल्लीला निघून गेले. दिल्लीत गेल्यावर साठेंनी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना फोन करून झाल्या गोष्टी सांगितल्या आणि महाराजांचा पुतळा साकारण्याची इच्छा असुनही, पुतळा कमिटीच्या अडवणुकीच्या धोरणामूळे त्यांना ते काम इच्छा असुनही स्विकारता येत नसल्याचं कळवलं.


पुतळा कमेटीचा आडमुठेपणा तोवर यशवंतरावांना माहित नव्हता. ते त्या वेळेस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या कामात व्यग्र होते. साठेंनी मात्र  कर्तव्यबुद्धीने यशवंतरावाना कळवलं होतं, त्यात तक्रारीचा सूर कुठंही नव्हता. यशवंतराव हे ऐकून चकीतच झाले, पण फोनवर काहीच बोलले नाहीत. काही दिवसांनी चक्र फिरली आणि पुतळा कमेटीचे सर्व सदस्य दिल्लीला धावत आले आणि शिवरायांच्या पुतळ्याचं काम तुम्हालाच करायचं आहे, असा समितीचा निर्णय झालेला असून, तुम्ही लगेचच मुंबईला चला, असा आग्रह करू लागले. मग भाऊंनीही फार ताणलं नाही आणि पुतळा बनवण्याचं काम स्वीकारल्याचं त्यांना सांगितलं. यशवंतरावांनीही साठेंना सर्व प्रकारचं सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं. भाऊ साठेंना त्यांच्यतल्या कलागुणांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवण्याचं काम मिळालं आणि खरी परीक्षा सुरु झाली. 

पुतळा जन्माला येताना..

मुंबईचा शिव पुतळा घडवण्याचं कं मिळतंय की नाही याची संदिग्धता असतानाच्या दरम्यानच भाऊंना झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासंबंधी ग्वाल्हेरहून विचारणा झाली होती. अंतर्गत राजकारणामुळे शिवपुतळ्याचं काम आपल्या हातातून गेलं असं गृहीत धरून, झाशीच्या राणीचा पुतळा बनवायचं काम साठेंनी स्वीकारलं होतं आणि आता मुंबईचा शिवपुतळाही त्यांनाच बनवायचा होता. ह्या वेळेस भाऊंचा मुक्काम दिल्लीला होता. ग्वाल्हेरचा राणीचा पुतळा आणि मुंबईचा शिवाजी पुतळा, ह्या दोन दिशांच्या दोन  कामांच्या दृष्टीने सोयीचं व्हावं म्हणून हे दोन्ही पुतळे दिल्लीला न घडवता, कल्याण इथे मध्यवर्ती ठिकाणी घडवायचे असं ठरवलं. कल्याणला राहातं घर असलं तरी तिथं सुसज्ज स्टुडिओ नव्हता. स्टुडिओ उभारण्यापासून सारी तयारी करायची होती. सर्वच कं एकट्याने करणं शक्य नव्हतं, म्हणून भाऊंनी त्यांचे बंधू मोती याना स्टुडिओ उभारण्याचं काम लगेच सुरू करण्याची विनंती केली आणि ते दिल्लीत आपला मुक्काम आटोपता घेण्याच्या दृष्टीने तयारी करायला लागले

दिल्लीला असलेली बारीक सारीक कामं उरकायचा मागे भाऊ लागले. हातात वेळ कमी होता आणि शिव धनुष्य तर यशस्वीपणे पेलायचे होत. म्हणून कल्याणला निघण्याच्या पूर्वी, दिल्ली मुक्कामीच ग्वाल्हेरला राणीच्या पुतळ्याची आणि मुंबईच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रत्येकी अडीच फुटांची मातीची मॉडेल बनवून तयार केली. दिवस पावसाचे होते. मातीची मॉडेल्स सुकायला वेळ लागणार होता. म्हणून वेळेचं नियोजन करण्यासाठी प्राथमिक मॉडेल्स दिल्लीलाच करण्याचा निर्णय घेतला होता.  

कल्याणच्या स्टुडिओचे काम, भाऊंचे बंधू मोती साठे यांच्या देखरेखीखाली जोरात सुरु झालं होतं. त्यावर्षीच्या, म्हणजे १९५९च्या गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर स्टुडिओचं उदघाटन करायचं निश्चित केलं होते आणि त्या दृष्टीने स्टुडिओच्या कामाची आखणी केली होती. मधेच भाऊंनी कल्याणला येऊन स्टुडिओच्या कामाची प्रगती पहिली. स्टुडिओ आकार घेत होत. स्टुडिओच्या रचनेसंबंधी मोतिभाऊना काही अत्यावश्यक सूचना देऊन भाऊ पुन्हा दिल्लीला निघून गेले. दिल्लीला तयार केलेली शिवाजी आणि झाशीच्या राणीच्या पुतळ्याची मातीची मॉडेल एव्हाना सुकली होती.

आता त्या मॉडेल्सना संबंधितांची पसंती आवश्यक होती. म्हणून पुन्हा काहीच दिवसांत महाराजांच्या पुतळ्याचं दिल्लीला तयार केलेलं मॉडेल घेऊन साठे मुंबईस परतले. एव्हाना गणेशचतुर्थीस स्टुडिओचे उदघाटन होऊन गेलं होतं. महाराजांच्या पुतळ्याच्या जन्मकळा सोसण्यासाठी स्टुडिओ सज्ज झाला होता.  

एवढी सगळं होईस्तोवर ऑक्टोबरचा महिना उजाडला होता. दिल्लीहून तयार करून आणलेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या मॉडेलला मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांची मंजुरी आवश्यक असल्याने, संबंधितांच्या पसंतीस मुंबईत घेऊन आले. भाऊंनी तयार केलेलं शिव पुतळ्याचं मॉडेल मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पसंतीस उतरलं. पुतळा समितीच्या सदस्यांनी त्यातही काही बदल सुचवले. समितीने सुचवलेलं काही बदल करण्याचे भाऊंनी मान्य केलं. भाऊंनी तयार केलेले सर्वानी मॉडेल मंजूर केलं आणि त्याबरहुकूम पुतळा घडवण्याच्या का लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मंजुरी भाऊंना मिळाली. 

आता कसोटीची घडी सुरु झाली. साठेंना परिपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिल्पातून समोर उभे करायचे होते आणि त्यासाठी प्रत्यक्ष महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, शिवकालीन इतिहासाचा आणि एकुणच त्या काळाचा अभ्यास आवश्यक होता. भाऊंनी अभ्यासाची सुरुवात केली, ती श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शिव चरित्र’च्या वाचनाने. ह्या पुस्तकाचं त्यांनी सखोल वाचन केलं. बाबासाहेबांनी सुचवलेली आणखीही काही पुस्तकं वाचली. बाबासाहेब तसचं शिवचरीत्राच्या इतर अभ्यसकांशी भरपूर चर्चाही केली. मनात उपस्थीत झालेल्या बारीकसारीक शंकांचं त्यांच्याकडून निरसन करुन घेतलं. महाराज कसे चालत असावेत, कसे बोलत असावेत, प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात त्यांची मन:स्थिती कशी असेल इथपासून ते, महाराजांचा घोडा होता की घोडी, महाराज कोणत्या पद्धतीचा पोशाख वापरात असतील, त्यांची दाढी, मिशी आणि कल्ले असे असावेत इथपर्यंतचे सारे तपशील त्यांच्या चर्चेत येत गेले आणि त्या चर्चेतून महाराजांची आत्मविश्वासाने भरलेला शूर योद्धा, स्वराज्यनिर्माता धीरगंभीर राजा शिवछत्रपतींची प्रतिमा भाऊंच्या मनात आकार घेऊ लागली.

शिव पुतळ्यात गतिमान घोड्यावर आरूढ, हाती तलवार धारण केलेले लढवय्ये शिवछत्रपती महाराज दाखवायचे असल्याने, महाराजांच्या अंगावर नाटक-सिनेमात दाखवतात तश्या सोन्या-रुप्याच्या अलंकारांना फाटा  दिला गेला. नाटक सिनेमात ठिक आहे, पण रणांगणात लढायला जाताना कूणी दाग-दागिने घालून जात नसतात. त्यात ज्या महाराजांचं निम्म्याहून अधिक आयुष्य रणांगणात शत्रूशी लढण्यात गेलय, अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर ती शक्यताही फार उरतही नाही, असा विचार त्या मागे होता. लढवय्या महाराजांच्या हातातली तलवार कशी असावी, देशी धाटणीची की परदेशी, पोर्तुगीज पद्धतीची, ह्यावरही भरपूर संशोधन, चर्चा केली गेली. त्यासाठी महाराजांचे वंशज असलेल्या सातारकर भोसल्यांच्या देवपूजेत असलेल्या तलवारीचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात आला. लंडनला असलेल्या भवानी तलवारीच्या उपलब्ध असलेल्या विविध फ़ोटोंचाही अभ्यास करण्यात आला. शेवटी महाराज वापरात असत तलवार पोर्तुगीज धाटणीची सरळ पात्याची आणि दुहेरी धारेची असावी, असं निश्चित करण्यात आलं.

महाराजांचा पोशाख, त्याकाळच्या प्रचलित मोगली  पद्धतीनुसार नक्की करण्यात आला. उदा. सलवार चोळीच्या खणाच्या कापडाची, चोळण्याप्रमाणे  थोडीशी सैलसरशी दाखवण्याचं निश्चित करण्यात आलं. इतकंच नव्हे तर, महाराजांच्या पायातील  जोडे, तुमान, शेला, दुपट्टा कसे असावेत ह्यासाठी इतिहासातील आधार, म्युझियममध्ये असलेली महाराजांची अस्सल चित्र आणि त्यावरील तज्ञांची  मतं, त्यांच्या सूचना विचारात घेऊन पुतळ्यात दाखवांचं भाऊंनी ठरवलं. 

स्टुडिओत पुतळा घडताना

आता घोडा कसा दाखवा, ह्यावर विचार सुरु झाला. पुतळा अश्वारूढ त्यासाठी भाऊ साठेंनी, ग्वाल्हेरला महादजी शिंद्यांच्या अश्वशाळेत जाऊन तिथले  अश्वतज्ञ सरदार अण्णासाहेब आपटे ह्यांचं मार्गदर्शन घेतलं. तिथल्या अनेक उत्तमोत्तम घोड्याचं, त्यांच्यातल्या प्रत्येक  वैशिष्ट्यांचं,लकबींचं बारकाईने निरीक्षण केलं. मुद्दाम मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन तिथल्याही घोड्यांची बारकाईने पाहणी केली. पुतळ्यात घोड्याची  गतिमानता, चपळाईआणि घोड्यात असलेला अंगभूत नैसर्गिक डौल उतरण्यासाठी असा अभ्यास आवश्यक होता. परिपूर्ण अभ्यासानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मविश्वासाने भरलेलं, विजयी वीराचा डौल असलेलं, गतिमान घोड्याच्या माध्यमातून परिस्थितीवर घट्ट पकड असलेलं, एका सार्वभौम राजाच अश्वारूढ स्वरूप भाऊ साठेंच्या मनात तयार झालं.  

स्टुडिओत पुतळा घडताना

कोणतीही कलाकृती ही ती जन्माला घालणाऱ्या कलावंताच्या मनात तयार व्हावी लागते आणि त्यासाठी कितीही कालावधी लागू शकतो. एकदा का त्या कलाकृतीची प्रतिमा कलावंताच्या मनात साकार झाली, की ती मगच ती त्या त्या कलाकाराच्या  माध्यमातून चित्र-लेखन अथवा शिल्पाच्या माध्यमातून साकार होत जाते. मनात जो पर्यंत एक आकृतिबंध तयार होत नाही, तोवर त्या कलेला दृश्य स्वरूप येत नाही. इथंही तेच झालं. महाराजांची भाऊंच्या मनात उमटलेली प्रतिमा, त्यांनी पहिल्यांदा घडवलेल्या मातीच्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी होती. अधिक आकर्षक होती. म्हणून पुन्हा नवीन मॉडेल तयार करून त्याला संबंधितांची पुन्हा मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. 

महाराजांची भाऊंच्या मनात उमटलेली प्रतिमा मातीच्या मॉडेलमधून साकार होऊ लागली. पहिल्या मॉडेलपेक्षा, हे मॉडेल अनेक अर्थानी वेगळं असणार होत. ह्या मॉडेलचं विस्तारित स्वरूप म्हणजे पुर्णकृती पुतळा असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना अगदी बारीक सारीक तपशील त्यात यावेत यासाठी, महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या वेशात, महाराजांच्याच  अंगकाठीच्या माणसाला स्टुडिओत समोर बसवण्यात आलं. एक उमदा घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात आला आणि महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मातीच मॉडेल करण्यास सुरुवात केली. 

पुढच्या काही दिवसांतच मातीचं नवीन अडीच फुटी मॉडेल तयार झालं. नव्याने तयार केलेलं हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ज्ञांना, जाणकारांना  दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही किरकोळ बदल केले गेले. नव्याने तयार झालेल्या ह्या मॉडेलला संबंधितांची मंजुरी आवश्यक होती. म्हणून सदरचं मॉडेल घेऊन भाऊ पुन्हा मुंबईला आले. मुंबईच्या कौन्सिल हॉलमध्ये, म्हणजे जुन्या विधानभवनाच्या आणि आताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत, मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता, म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं आणि त्यांनी त्यात चुका काढण्यास सुरुवात केली, नाकं मुरडायला सुरुवात केली. हे सारं असुयेपोटी होतं, हे भाऊंना समजत होतं. म्हणून भाऊंनी त्यांच्या शे-यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या  साठेंनी काही प्रतिक्रिया देणं संभवही नव्हतं. 

एवढ्यात यशवंतराव आले. हॉलमध्ये शिरताच समोरच्या अश्वारुढ शिवप्रतिमेला पहाताच, ‘वा, क्या बात है..!’  अशी त्यांची उत्स्फूर्त दाद गेली आणि पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं. आता पुतळा समितीच्या सदस्यांना तक्रार करायला वावच नव्हता. त्या मॉडेलबरहुकूम पुतळा तयार करण्याची विनंती यशवंतरावांनी तिथल्या तिथे केली. भाऊ साठे जिंकले;किंबहुना त्यांचा अभ्यास जिंकला, त्यांचा आत्मविश्वास जिंकला, त्यांची कला जिंकली..!

अशा रीतीने सर्व शिवकथा घडून आता मातीचाच, पण पूर्णाकृती १८ फुटी अश्वारूढ पुतळा घडवण्याचं काम सुरू झालं. प्रत्यक्ष पुतळा घडवण्यापूर्वी त्याचा मातीचा पुतळा बनवून मग त्याचा प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये मोल्ड तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्या मोल्डमधे ब्रॉँन्झचं अथवा आवश्यकतेनुसार इतर धातूंचं ओतकाम करून मगच प्रत्यक्ष पुतळा घडतो. धातूपासून तयार करण्यात येणाऱ्या कोणत्याही पुतळ्यामधे ही प्रक्रिया आवश्यक असते. ही प्रक्रिया खूप लांबलचक, किचकट आणि वेळखाऊ असते. धातूच्ं ओतकाम करण्यासाठी लागणारा प्लास्टर मोल्ड मात्र खूप काळजीपूर्वक तयार करावा लागतो. एकदा का मातीच्या पुतळ्याचा प्लास्टरचा मोल्ड तयार झाला, की मग त्यात काही बदल करता येत नाहीत. म्हणून मातीचा पूर्णाकृती पुतळा करताना सुरुवातीलाच संपूर्ण काळजी घ्यावी लागते.

लहान, अडीच फुटी मॉडेल तयार करणं आणि त्यावरून १८ फुटी उंच, पूर्णाकृती पुतळा घडवणं यात देखील जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मॉडेल नजरेच्या टप्प्यात असतं, तर पुतळा नजरेपासून उंचावर, दूर अंतरावर असतो. त्यामुळे काम करताना ते कसं होतंय हे पाहण्यासाठी प्रत्येकवेळी कमीतकमी २५ फूट दूर जाऊन तो पुतळा पाहावा लागतो. पुन्हा पूर्णाकृती पुतळा घडवताना, एकावेळी पुतळ्याचा चार-पाच फूटांचाच भाग नजरेसमोर असतो आणि त्यामुळे तो भाग, पुतळ्याच्या इतर भागाशी नातं जमावणारा आहे कि बिघडवणारा, हे तिथल्यातिथे पाहता येत नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा दूर अंतरावर जाऊन ते तपासत बसावं लागत. यात खूप वेळ जातो. पुन्हा काही काळाने पूर्णत्वाला जाणारा पुतळा स्टुडिओत जमिनीच्या पातळीवर असला तरी, प्रत्यक्ष त्याच्या जागेवर तो उंच चबुतऱ्यावर असतो आणि तो पाहणारा सामान्य दर्शक जमिनीच्या पातळीवरून तो पाहत असतो. त्यामुळे पुतळा घडवतानाच त्या पुतळ्याच्या प्रमाणबद्धतेत, रचनेत त्यानुसार आवश्यक ते बदल करावे लागतात. म्हणून  कोणताही पुतळा घडवण्याचं काम केवळ यांत्रिकपणे करून चालत नाही, तर तिथे बुद्धीचा संपूर्ण कस लावावा लागतो. शिवाय पुतळ्याचा आकार निर्माण होत असताना, त्याच्या टेक्श्चरचं, म्हणजे पोताचं भानही राखावं लागतं. कोणत्याही शिल्पकारासाठी ह्या अपरिहार्य बाबी असतात.  महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा मातीचा पूर्णाकृती पुतळा घडवताना भाऊ साठेंनाही, अर्थातच, हे भान ठेवावं लागत होतं. शिवप्रभूंच्या पुतळ्यात किंचितही त्रुटी राहू नये ह्याची काळजी ह्याच स्तरावर घेणं आवश्यक होती आणि भाऊ तशी काळजी घेतही होते.  

अनेक व्यवधानं सांभाळत, काळजी घेत मातीच्या पुतळ्याचं काम सुरु होतं. वेळ आपल्या गतीने चालला होता. होता होता १९६०च्या एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुतळ्याचं १८ फुटी ऊंच पूर्णाकृती मॉडेल तयार झालं. पुन्हा एकदा संबंधितांना स्टुडिओत बोलावून त्यांची मंजुरी घेण्यात आली. कारण एकदा का ह्या मॉडेलचा प्लास्टर मोल्ड बनला, की मग त्यात कोणताही बदल करता येणं शक्य नव्हतं. अपेक्षेनुसार सर्वांची मंजुरी मिळाली आणि पुतळ्याचा प्लास्टर मोल्ड तयार करण्याचं काम सुरु झालं. हे काम वेगाने करणं आवश्यक होतं, कारण मे महिन्याचा उन्हाळा सुरु झाला होता. उन्हं जास्त तापली, की पुतळ्याच्या मातीला तडे जाण्याची शक्यता होती. म्हणून मातीच्या पुतळ्याचे प्लास्टर मोल्ड बनवण्याचं काम लगेच हाती घेण्यात आलं आणि पुढच्या महिनाभरात संपूर्ण पुतळ्याच्या विविध भागांचे प्लास्टर मोल्ड तयार झाले आणि आता दुसरीच अडचण दत्त म्हणून समोर उभी राहिली. 

असं नाही की साठें पहिल्यांदाच कुठला पुतळा घडवत होते. एवढं मोठं नसेल, पण विविध माध्यमातून शिल्पाकृती घडवण्याचं काम त्यांनी पूर्वीही केलं होत. ब्रॉंझचेही काही पुतळे त्यांनी बनवले होते. पण ती कामं पुतळ्यांचा प्लास्टर मोल्ड काढेपर्यंतच मर्यादित होती. काढलेल्या मोल्डमध्ये आवश्यक त्या धातूंचं ओतकाम मात्र त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून करून घेतलं होत. हा शिव पुतळा घडवताना गोष्ट वेगळी होती. पूर्वी ज्या व्यक्ती भाऊंनी तयार केलेल्या मोल्ड मध्ये धातूचं ओतकाम करून देत असत, त्या व्यक्ती इथे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या. त्या सर्वासोबत असलेल्या स्पर्धेत यश मिळवून भाऊंनी ह्या शिवपुतळ्याचं काम मिळवलं होतं आणि म्हणून त्यांच्याकडून आता कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करता येत नव्हती. आता जे काही करायचं, ते स्वतःच्या हिमतीवर आणि अनुभवावर. प्लास्टर मोल्डमध्ये पुतळ्याचं धातूचं ओतकामही, त्या प्रकारच्या कामाचा कोणताही अनुभव नसताना स्वतःच करायचं होत. त्यासाठी सुसज्ज फाऊंड्रीची आवश्यकता होती. ती शोधण्यापासून तयारी सुरु कराची होती. 

हा ही अनुभव घेऊन बघू म्हणून, पुतळ्याच्या ओतकामासाठी कुणाची फाऊंड्री उपलब्ध होतेय का, त्याचा शोध घ्यायला भाऊंनी सुरुवात केली. आणि इच्छा तीव्र असली की अनपेक्षित ठिकाणाहूनही मदत मिळते, ह्या उक्तीचा भाऊंना अनुभव आला. भिवंडीचे एक ज्येष्ठ कारखानदार दादासाहेब दांडेकर भाऊ साठेंच्या मदतीला धावले. त्यांची स्वतःची भिवंडीत सुसज्ज फाउंड्री होती. ती त्यांनी भाऊंच्या दिमतीला देऊ केली, मात्र त्यांच्या कारखान्यातील कामगारांना पुतळ्याच्या ओतकामाचा काहीच अनुभव नसल्याने, ते काम मात्र स्वतः भाऊ साठे यांनी करावं, अशी विनंती केली. भाऊंनीही मदतीचा हा हात नाकारला नाही. चुकत माकत, विविध प्रयोग करत का होईना, पण आपण हे काम पूर्ण करू शकू असा आत्मविश्वास साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होताच. भाऊंनी दांडेकरांच्या फाउंड्रीत शिव पुतळ्याच्या प्लास्टर मोल्डमध्ये पुतळ्याचं ओतकाम करण्याचं नक्की केलं. 

भिवंडीच्या कारखान्यात प्लास्टर मोल्ड आणले गेले आणि ओतकामाच्या प्राथमिक कामास सुरुवात झाली. सुरुवातीलाच काही अडचणी लक्षात येऊ लागल्या. सर्वात पहिली अडचण होती, ती कल्याण-भिवंडी-कल्याण ह्या प्रवासाची. कल्याणहून सर्व सहकाऱ्यांसह दररोज कारखान्यात  भिवंडीला येणं आणि दिवसाचं काम संपवून रात्री पुन्हा भिवंडीला परत जाणं आणि ते ही सरकारी एसटीने, म्हणजे तीन-चार तासांचा कालावधी त्यातच जाऊ लागला होता. दुसरी अडचण लक्षात आली, ती गैस सिलिंडरच्या उपलब्धतेची. धातूच्या जोडकामासाठी-वेल्डिंगसाठी- लागणाऱ्या गॅस सिलिंडरची बेगमी तेंव्हा घाटकोपरहून करावी लागत असे. त्याकाळात गॅस एजन्स्या आजच्यासारख्या  गल्लोगल्ली उगवल्या नव्हत्या. शिवाय आवश्यकता असेल तेंव्हा सिलिंडर मिळेलच याची शाश्वतीही नसायची. काम सुरु असताना गॅस मधेच संपला, तर घाटकोपरहून नवीन सिलिंडर येईपर्यंत, तो ही एस्टीनेच, संपूर्ण दिवसाचं काम खोळंबून राहत असे. कधी कधी यात दोन-दोन दिवसही वाया जात असल्याचं लक्षात आलं. तसं फार वेळ झाल्यास एकुणच वेळापत्रक चुकण्याची शक्यता होती. वेळेचं गणित सांभाळण्यासाठी मग एक जुनी, वापरलेली स्टेशनवॅगन खरेदी करण्यात आली आणि मग वरच्या दोन्ही समस्या सुटल्या. प्रवासात वाया जाणारा वेळ वाचून वेळेचं गणित बरंचसं सावरलं गेलं आणि सिलिंडर मागवणं ही सुलभ झालं. अशारितीने पुतळ्याचं ओतकाम मार झालं.  

ओतकामाच्या प्राथमिक प्रयोगास सुरुवात झाली. त्यातही अनंत चुका होत होत्या, अंदाज चुकत होता. बहुमोल वेळ वाया जात होता, पण काही इलाज नव्हता. अनेकांनी आता भाऊंनी कुणातरी ज्येष्ठांची मदत घ्यावी अश्या सूचना केल्या, पण आता भाऊही जिद्दीला उतरले होते. कुणीतरी केलेल्या त्या सूचना भाऊंनी मान्य केल्या असत्या तर, कदाचित पुतळ्याचं काम वेळीच मार्गी लागलं असत, परंतु, सर्व मेहेनत भाऊंनी करूनही त्या मेहेनतीच्या मागे त्या ज्येष्ठ व्यक्तीचंही नांव लागलं असतं. भाऊंना तर ती कलाकृती सर्वस्वी त्यांची असायला हवी होती. शिवाय धातूचं ओतकाम शिकण्याचीही ही नामी संधी होती. म्हणून आता मात्र पुतळ्याच ओतकाम काम आपण स्वतःच  करायचं जिद्दीने भाऊ आणि त्यांचे सहकारी कामाला भिडले. 

प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं, हळू हळू ओतकाम जमू लागलं. आता कामाला वेग आला. तेवढ्यात एक वेगळीच समस्या समोर येऊन उभी राहिली. शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचं काम भिवंडीच्या दांडेकरांच्या कारखान्यात सुरु झालं आहे, ही बातमी बाहेर फुटली. शिव छत्रपती अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत. त्यात त्यांचा तो वरचा सर्वात उंच पुतळा भिवंडीत तयार होतोय, ही बातमी ऐकून अनेकजण पुतळ्याचा तो जन्मसोहळा पाहायला येऊ लागले. त्यात हौशे गवशे तर होतेच, शिवाय परिसरातली प्रतिष्ठित धेंडंही येऊ लागली. त्या त्या सर्वाना सांभाळणं, त्यांचं आदरातिथ्य कारण, त्यांना सर्व माहिती देणं हा नवीनच उद्योग होऊन बसला. त्यात परिसरातल्या शाळांच्या सहलीही तो पुतळा पाहण्यासाठी येऊ लागल्या आणि ते आणखी एक वेगळं काम होऊन बसलं. पण साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातही आनंद मनाला. तो जनताजनार्दनाचा आशीर्वाद मानला आणि वेळी-अवेळी येणाऱ्या त्या अ-तिथींचं प्रेमं स्वागत केलं. त्यांना सर्व माहिती पुरवली. विशेषतः शाळांतून पुतळा पाहायला येणाऱ्या मुलांच्या कुतूहलकडे भाऊंनी विशेष लक्ष दिलं. न जाणो त्यातून उद्याचा शिल्पकार घडणार असेल, तर त्याचं कुतूहल जागृत ठेवलं पाहिजे, असा विचार त्यामागे होता.

आता पुतळ्याच्या कामाने चांगलाच वेग पकडला. पुढचे तीन चार महिने मोठ्या उत्साहाचे गेले. यथावकाश ओतकाम पूर्ण झालं. तयार झालेले पुतळ्याचे विविध भाग जोडण्याचं काम सुरु झालं आणि भाऊंच्या मनातलं ते  १८ फुटी शिवशिल्प साक्षात समोर साकार होऊ लागलं. १९६०च्या डिसेम्बरचा महिना उजाडला. पुतळा गेट वे ऑफ इंडियाच्या समोर २६ जानेवारी १९६१ रोजी स्थानापन्न करायचा होता. आता घाई सुरु झाली. शिवप्रभूंचा चेहेरा, हात, तलवार, म्यान, घोड्याचा लगाम, जिरेटोप, तुरे, गोंडे इत्यादी तुलनेने लहान स्वरूपाची, परंतु अतिशय महत्वाची कामं अद्याप शिल्लक होती. ही कामं जरी लहान स्वरूपाची असली तरी, ती अत्यंत नाजूक असल्याने ती  सोनाराच्या कौशल्याने करणं आवश्यक होतं. म्हणून त्याला वेळही लागत होता. जसजसा डिसेम्बर महिना सरत होता, तसतशी तिकडे मुंबईच्या मंडळींचा रक्तदाब चढत होता. उदघाटनाची तारीख जाहीर झाली होती. पुतळा अद्याप पूर्णपणे तयार झाला नव्हता. पण भाऊ निश्चिंत होते. पुतळा वेळेत पूर्ण होईल ह्याची त्यांना पूर्ण खात्री होती. 

डिसेम्बर संपला आणि जानेवारी उजाडला. जानेवारीच्या सुरुवातीच्या चार-पाच दिवसात पुतळ्याचं उर्वरित कामंही पूर्ण झाली आणि महाराज दक्षिण मुंबईच्या स्वारीला तयार झाले. काही बारीक-सारीक कामं शिल्लक होती, पण ती उरलेल्या चार-दोन दिवसांत पुर्ण करता येण्यासारखी होती. शेवटी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महाराजांचा १८ फुटी देखणा अश्वारूढ पुतळा भिवंडीच्या कारखान्यात उभा राहिला. पुतळ्याकडे पाहताना साठेंच्या नजरेसमोरून गेल्या दोनेक वर्षाचा कालपट सरकत होता. साठेंचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते. केलेल्या श्रमाचं सार्थक होऊन ते शिवप्रभूंच्या रूपात समोर उभं होतं. सर्वानाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं..!

आणि महाराज दक्षिण विजयावर निघाले.. 

आणि थोड्याच वेळात सगळे पुन्हा भानावर आले. आता प्रश्न समोर उभा राहिला तो, हा पुतळा मुंबईला न्यायचा कसा, हा. सुरुवातीला वाटलं होतं, की हा पुतळा रस्तामार्गे मुंबईला सहज घेऊन जाता येईल. पण तेंव्हा पुतळ्याच्या उंचीचा आणि त्यामुळे पुतळ्याच्या वाहतुकीला येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार कुणाच्या मनातच आला नव्हता. ना सरकारी यंत्रणांच्या, ना भाऊंच्या. आता भाऊ आणि त्यांच्याहीपेक्षा सरकारी यंत्रणा जरा जास्तच काळजीत पडली. 

ह्या काळजीमागे कारणही तसंच होतं. कारण भिवंडीहून मुंबईला ते गेट वे ऑफ जाणारा जुना आग्रा रोड त्यावेळेस अत्यंत चिंचोळा होता. शिवाय त्या काळात विद्युतवहनाच्या आणि टेलिफोन्सच्या असंख्य वायरी आता सारख्या जमिनीखालून न जाता, सर्वच ठिकाणी खांबांच्या मदतीने रस्त्यावरून आडव्या जात असत. अशाच वायरी भिवंडी-मुंबई रोडच्या मार्गातही अनेक ठिकाणी डोक्यावरून रस्ता ओलांडून पलीकडे जात होत्या. घोड्यासहितची पुतळ्याची उंची १८ फूट आणि तो ट्रकमधून घेऊन जायचा, तर आणखी त्याची उंची वाढून ती २४-२५ फूट होणार आणि त्या विविध प्रकारच्या वायर्स त्याच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणार हे लक्षात आलं. त्यापेक्षाही मोठी अडचण होती ती भिवंडी-मुंबई रोडवर असणाऱ्या कशेळीच्या पुलाची. तेंव्हा हा पूल उंचीला अत्यंत लहान, जेम तेम १५-१६ फूटांचा होता. त्या खालून ६ फूट उंचीचा ट्रकचा हौदा अधिक त्या हौद्यावरील १८ फूट उंचीचा शिवपुतळा, असे दोन्ही मिळून उंची २५ फूट जाणं तर निव्वळ अशक्य होतं. पुन्हा त्या पुढे असलेला किंग्स सर्कलचा पूलही मोठा अडथळा ठरणार होता. रस्त्यावरुन आडव्या जाणा-या विविध केबल्स आणि हे दोन्ही पूल पुतळ्याला रस्तामार्गे नेण्यात अडचणीचे ठरणार हे लक्षात आलं आणि मग अन्य मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. 

आता एक एक सूचना येऊ लागल्या. कुणी म्हणालं, वसईच्या खाडीतून बोटीने पुतळा थेट गेट वे ऑफ इंडियाला घेऊन जाऊ. पण तसं करायचं म्हटलं तरी, वसईच्या खाडीपर्यंत पुतळा नेताना तो १५-१६ किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याने न्यावाच लागणार होता. त्यासाठीही डोक्यावरून जाणाऱ्या वायर्सचा अडथळा होताच. त्यामुळे जलमार्गाने पुतळा वाहून न्यायची सूचना लगेचच बाद करण्यात आली. कुणीतरी तो हेलिकॉप्टरने न्यावा असंही सुचवलं. हे जरा अतीच झालं, पण सूचना करणाऱ्याच्या मताचा आदर म्हणून त्यावर काहीच मत व्यक्त न करता, ती सूचनाही लगोलग अडगळीत टाकण्यात आली. अनेक सरकारी अधिकारी, वाहतुकीतले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा सुरूच होती. पुतळ्याच्या उदघाटनाची तारीख जवळ येत होती. पुतळा तयार होता, मात्र तो गेट वे ऑफ इंडिया पर्यंत न्यायचा कसा, ह्यावर काही तोडगा सापडत नव्हता.  

अखेर खूप विचारांती पुतळा रस्तामार्गे नेणंच योग्य वाटलं. फक्त तो ट्रकवरून न नेता, आता जशा  सार्वजनिक गणपतीच्या मोठाल्या मूर्ती लोखंडी चाकांच्या ट्रॉलीवर ठेवून ओढत नेतात, तसा महाराजांचा पुतळाही ट्रॉलीवर ठेवून ओढत न्यावा, असं ठरवण्यात आलं. पुन्हा मोजमापं घेण्यात आली.  पुतळ्याची १८ फूट उंची अधिक नऊ इंच व्यासाची चाक लावलेली ट्रॉली मिळून एकूण उंची १९-२० फुटाची होत होती. एवढं करूनही पुतळा रस्त्यातील ओव्हरहेड वायर्स आणि कशेळी व किंग्स सर्कलच्या पुलाखालून सुखरूप पार होईल की नाही याची शंका होतीच. म्हणून साधारण तेवढ्याच उंचीचा बांबू घेऊन, स्त्याने जाऊन रस्त्यात आडवे येणारे पूल आणि वायरी यांची कितपत अडचण येते, हे पाहण्यासाठी साठे आणि त्यांचे काही सहकारी रस्ता मार्गे जीपने निघाले. बांबूच्या साहाय्याने रस्त्यात येऊ शकणाऱ्या सांभाव्य अडथळ्याचं प्रत्यक्ष मोजमाप करताना, पुतळयाला ट्रॉलीवरुन घेऊन जाणंही अडचणीचं आहे, हे लक्षात आलं. तसं केल्यास प्रथम घोड्याचे कान आणि नंतर घोड्यावर सवार महाराजांच्या पुतळ्याचा वरचा भाग कशेळीच्या आणि पुढच्या किंग्स सर्कलच्या पुलाला धडकणार हे लक्षात आलं आणि पुन्हा पुतळ्याच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आत या अडचणींवर मात कशी करायची यासाठी संबंधितांची डोकी पुन्हा भिडली. 

आणि सर्वांच्या विचार विनिमयानंतर एक तोडगा निघाला. घोड्याचे कान आणि महाराजांच्या पुतळ्याच्या कमरेच्या वरचा भाग पुतळ्यापासून वेगळा करावा आणि हे दोन्ही भाग गेट वे ऑफ इंडिया येथे जागेवर जाऊन पुन्हा जोडायचे असं ठरवलं. उर्वरित पुतळा ओढत नेताना, पुतळ्याला काही इजा होऊ नये म्हणून तो ट्रक ऐवजी रोड रोलरने न्यावा असं ठरवलं, जेणे करून एकसारखा मंद वेग, म्हणजे ताशी ४ किलोमिटर मात्रचा, राखला जावा. महाराजांच्या प्रवासासाठी जानेवारीच्या २० तारीख मुक्रर करण्यात आली. दिवस शुक्रवारचा होता. या तारखेची आणि पुतळ्याच्या एकूणच सर्व प्रवासाची, ठाण्याचे त्यावेळचे जिल्हाधिकारी गांगल यांना कल्पना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी ते मुंबई ह्या संपूर्ण प्रवासात महाराजांच्या दिमतीला वाहतूक नियमन आणि सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा देण्या मान्य केलं.  

आता महाराजांच्या पुतळ्याच्या मुंबईवरच्या स्वारीसाठी जय्यत तयारी सुरु झाली. घोड्याचे कान आणि पुतळ्याचा कमरेपासूनच वरचा भाग वेगळा करण्यात आला. उर्वरित पुतळ्याच्या, म्हणजे घोड्याच्या टापांखाली चाकांची लोखंडी ट्रॉली  बसवण्यात आली. भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जाणारा आग्रा रोड त्यावेळेस सिमेंट काँक्रीटचा होता आणि त्याच्या दोन स्लॅब्सच्यामध्ये सांधे होते.  रस्त्याने जाताना, ह्या स्लॅब्सच्या सांध्यावर पुतळा कलंडू नये म्हणून पुतळा ठेवलेल्या लोखंडी ट्रॉलीवर रेतीने भरलेली पोती ठेवावीत असं ठरवलं. एवढं करूनही पुतळा कलंडू लागलाच, तर तोल सावरण्यासाठी पुतळ्याला दोरखंड बांधून, ते दोरखंड धरून पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी दहा-दहा तगड्या जवानांनी चालावं असं ठरवण्यात आलं.  शिवाय सांध्यावरून पुतळा घसरू नये म्हणून जास्तीची खबरदारी म्हणून सांध्यांवर लोखंडी प्लेट्स टाकण्याचंही ठरवलं. पुतळ्याच्या वाहतुकीची सर्व जबाबदारी भिवंडी येथील वाहतूकदार भगवान जोशी यांनी घेतली. सर्व योजना पक्की करून सर्वजण २० जानेवारीच्या दिवसाची वाट पाहू लागले. 

अखेर २० जानेवारी १९६१चा दिवस उजाडला. आज महाराजांची स्वारी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने कूच करणार म्हणून सर्वजण उत्साहात होते. तसेच काहींशी हुरहुरही जाणवत होती. आता काही तासांतच, भाऊ साठे आणि त्यांच्या सहका-यांचा, गेल्या दीडेक वर्षांचा महाराजांचा सहवास संपायची घडी नजीक आली होती. भावना दाटून आल्या होत्या. पण कर्तव्य पार पडायचं होतं. 

रोड रोलर आला. त्या रोलरला पुतळा ठेवलेली ट्रॉली मजबूत दोरखंडानी बांधण्यात आली. पुतळ्याच्या मागून आणि पुढून जाण्यासाठी दोन ट्रक मागवण्यात आले होते. पुढच्या ट्रकमध्ये महाराजांच्या पुतळ्याचा कमरेपासून वेगळा करण्यात आलेला भाग झाकून ठेवण्यात आला. रस्त्याच्या सांध्यांमध्ये अंथरण्याच्या लोखंडी प्लेट्सही ह्या ट्रक मध्ये ठेवण्यात आल्या. त्या ट्रकच्या मागे भाऊ आणि त्यांचे सहकारी त्यांच्या स्टेशनवॅगनमध्ये बसले. त्यांच्या मागे रोड रोलर आणि त्याला बांधलेला पुतळा ठेवण्यात आला. रस्त्याने जाताना पुतळ्याचा तोल जाऊ नये म्हणून पुतळ्याला जोडलेले जाड दोरखंड धरून पुतळ्याच्या दोन्ही बाजूनी १०-१० मावळे उभे राहिले. मागच्या ट्रकमध्ये रोड रोलरच्या इंजिनासाठी लागणारा कोळसा आणि इतर आवश्यक साहित्य ठेवण्यात आलं. शिवाय लवाजम्याच्या पुढे आणि मागे वाहतूक नियमन आणि संरक्षणासाठी दोन सुसज्ज पोलीस व्हॅन्स तैनात करण्यात आल्या. आता कोणत्याही क्षणी महाराजांचा काफिला निघण्यास सज्ज झाला. 

२० जानेवारीला महाराज मुंबापुरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत, ही बातमी भिवंडी पासून मुंबईपर्यंत वाऱ्यासारखी पसरली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी प्रचंड मोठा जनसमुदाय जमा झाला होता. महाराजांना कुर्निसात करण्यासाठी जमलेली, महाराजांवर प्रेम करणारी महाराजांची रयत होती ती..! 

बरोबर दुपारी चार वाजता नारळ वाढवून महाराजांच्या काफिल्याने प्रवासाला सुरुवात केली आणि आभाळ फाटून जाईल एवढा मोठा जयजयकार दुमदुमला. फुलांच्या वर्षावात लोकांचा राजा आस्ते कदम दख्खनच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागला.. ! 

अत्यंत धीम्या गतीने, जयजयकाराच्या जल्लोषत महाराजांचा लवाजमा थाटामाटाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. थोड्याच वेळात संध्याकाळ होऊन अंधार पडणार होता. काळोखातून जाताना रस्ता नीट दिसावा म्हणून गॅसच्या बत्त्या सोबत घेतल्या होत्या. महाराजांच्या सेवेत असलेल्या एवढ्या सर्व जणांची जेवणखाण्याची व्यवस्था ठाण्याच्या हद्दीत करावी असं ठरवलं होतं आणि ती रसद पुरवण्याची जबाबदारी ठाण्यातील काही जणांनी स्वेच्छेने घेतली होती. भिवंडी ते कशेळीचा पूल एवढं, अवघं ८ किलोमीटरचं अंतर कापायला लावाजम्याला रात्रीचे आठ वाजले. आणखी दोन तासांनी रात्री १० वाजता महाराजांच्या लवाजम्याने ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला. 

रात्री १० वाजता ठाण्याच्या कलरकेम कंपनीपाशी महाराजांचा काफिला रात्रीच्या भोजनासाठी थांबला. तंबू ठोकले गेले. डेरे पडले. रसद वेळेवर पोहोचती झाली होती. स्वाऱ्यांनी भोजन केले. भोजनानंतर थोडी विश्रांती घेऊन, ताफा पुन्हा दक्षिण दिशेने निघाला. मुलुंडला पोहोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. हा वेळ असतो मुंबईच्या बाहेर पडणाऱ्या मालमोटारींच्या वर्दळीचा. अशा वेळी महाराजांच्या काफिल्यांने  चिंचोळ्या रस्त्याने पुढे मार्गक्रमणा करणं, वाहतुकीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचं नसल्याचा सल्ला सोबतच्या पोलिसांनी दिला. म्हणून मुलुंडला ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीच्या दारात रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याच्या कडेला मंडळींचा डेरा पडला. इतक्या रात्रीही परिसरातील जनता महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन व्हावं म्हणून जमलेली होतीच. महाराजांच्या काफिल्यातल्या माणसांना जमेल तशी मदत करायला धडपडत होती. महाराजांचा जयजयकार अविरत सुरूच होता. 

पुढची मार्गक्रमणा दुसऱ्या दिवशी, म्हणजे २१ जानेवारीला संध्याकाळपासून सुरु होणार होती. हा संपूर्ण दिवस विश्रांतीत आणि काही किरकोळ दुरुस्ती करण्यात गेला. पुतळ्याला जोडलेला रोड रोलर कोळशाच्या इंजिनावर चालत असल्याने, त्याचा वेग खूपच मंद होता. आता तो बदलून, त्याच्या ऐवजी डिझेल इंजिनावर चालणारा दुसरा रोड रोलर जोडण्यात आला. ट्रॉलीच्या लोखंडी चाकांची काही दुरुस्ती करणं आवश्यक झालं होतं, ती ही संध्याकाळपर्यंत उरकून घेण्यात आली. वाहतुकीच्या वर्दळीचा अंदाज घेऊन रात्री ९ वाजता जेवणखाण आटोपून खाशा स्वाऱ्या पुन्हा मुंबईच्या दिशेने चालू लागल्या. रस्त्याच्या दोहो बाजूनी लोकांची गर्दी जमलेली होतीच. पुतळा झाकलेला असला तरी, लोकांना तो महाराजांचा पुतळा आहे, एवढं पुरेसं होत. महाराजांचा जयजयकार सुरु होता. भांडुपच्या नजीक येताच ट्रॉलीच्या चाकांची पुन्हा दुरुस्ती करावी लागली. ती रस्त्यावर उभ्या उभ्याच करून घेण्यात आली. पुन्हा प्रवास सुरु झाला. कोळशावर चालणारा रोलर बदलून डिझेलवर चालणारा रोलर जोडल्याने, ताफ्याचा वेगही काहीसा वाढला होता. रात्रभर प्रवास करून पुतळा २२ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास मुंबई शहराच्या हद्दीत, सायनला, पोहोचला. आता महाराज खऱ्या अर्थाने मुंबापुरीच्या वेशीवर आले होते. 

२२ जानेवारीचा दिवस रविवारचा होता. रविवारचा त्यामूळे मुंबईच्या रस्त्यावरची वाहतूक अगदीच मंदावलेली होती. आता पुतळा कहिश्या वेगाने पुढे जाऊ लागला. किंग्स सर्कलच्या पुलाखालून लवाजमा विनासयास पार झाला. पुतळ्याची भव्य मिरवणूक जसजशी दादरच्या दिशेने सरकू लागली, तसतशा रस्त्याच्या दुतर्फा लोकांच्या झुंडीच्या झुंडी महाराजांचा काफिला पाहण्यासाठी जमू लागल्या. रस्त्यावर, रस्त्याशेजारच्या इमारतींच्या गॅलरींमधून माणसंच माणसं दिसत होती. फुलं उधळली जात होती. महाराजांचा एकच जयजयकार सुरु होता. वातावरणात सारा जल्लोष दाटला होता. मिरवणूक आस्ते कदम आपल्या मुक्कामाच्या दिशेने पुढे सरकत होती. दादर टी. टी. पार करून परेल पोयबावडी, लालबाग, भायखळा, जे जे हॉस्पिटल, महम्मद अली मार्ग, बोरीबंदर मार्गे पुतळा आणि सोबतचा ताफा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला आपल्या पोहोचला आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला. महाराज सुखरूप मुक्कामावर पोहोचले. एक मोठी जबाबदारी, वाटेत काहीही अडथळा न येता पार पडल्याचं समाधान सर्वांच्या चेहे-यावर दाटून आलं.

एक मोठा ऐतिहासी प्रवास सुखरूप संपला होता. साठे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यानी हाती घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामाचा, अंतिम पूर्ततेचा, सार्थकतेचा क्षण आता दृष्टीच्या टप्प्यात आला होता. आता वाहतुकीसाठी सूटा केलेला पुतळा पुन्हा जोडून, त्याच्यासाठी उभारलेल्या चबुतऱ्यावर बसवण्याचं मोठ्या जबाबदारीचं काम तेवढं उरलं होत आणि ते पुढच्या दोन दिवसांत पूर्ण करायचं होतं. त्यामुळे पुतळ्याचा भिवंडी ते मुंबई हा प्रवास संपलेला असला तरी, श्वास घ्यायला उसंत नव्हती. पुढच्या तयारीला लागणं भाग होतं. 

तासभर विश्रांती घेऊन पुन्हा सर्व मंडळी कामाला लागली. पुतळ्याचे सुटे केलेले भाग जोडण्याचं काम, पुतळा जमिनीवर असतानाच करणं भाग होतं. एकदा का पुतळा २१ फूट उंच चबुतऱ्यावर बसवला, की मग काहीच करता येणं शक्य होणार नव्हतं. म्हणून पुतळा जोडण्याचं काम लगेचच हाती घेण्यात आला. हे काम रात्रभरात संपवणं आवश्यक होत, कारण दुसऱ्या दिवशी पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यासाठी क्रेन यायची होती.   

पुतळ्याचे सुटे भाग जोडायला सुरुवात झाली. जोडून झालेल्या भागांचे फिनिशिंग करण्यात आले. चबुतऱ्याच्या तिन्ही बाजूनी बांबूंच्या परांती अगोदरच बांधण्यात आल्या होत्या, जेणेकरून चबुतऱ्यावर पुतळा फिक्स करणाऱ्या कारागिरांना वर-खाली जाता यावं. जवळपास संपूर्ण रात्र पुतळ्यावर शेवटचा हात मरण्यात सरली. ह्यात सरली. पहाटेच्या सुमारास महाराजांचा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर आरूढ व्हायला सज्ज झाला. 

पुतळा, २१ फूट उंच चबुतऱ्यावर क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे चढवण्याची जबाबदारी मुंबईच्या मे. हसनभाई जेठा ह्या कंपनीने घेतली होती. २३ तारखेला सकाळी क्रेन हजर झाली. पुन्हा एक तांत्रिक अडचण उभी राहिली. पुतळा २१ फुटाच्या भव्य चबुतऱ्यावर चढवायचा, तर क्रेनला कमीत कमी ६० लांबीचा बूम (क्रेनचा दांडा) लागणार होता. हसनभाईंनी आणलेल्या क्रेनचा बूम २० फुटाचाच होत. मग जास्तीची आणखी दोन बूम मागवण्यात आली. ती मजबुतीने जोडण्याचं काम सुरु झालं. इकडे भाऊ आणि त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून, काही तपशील राहिला तर नाही ना, ह्याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होते. एकदा का पुतळा चबुतऱ्यावर बसवला, की मग काहीच करता येणार नव्हतं. म्हणून आताच सर्व काळजी घेणं आवश्यक होतं. शेवटी म्यान, तलवार, जिरेटोप, गोंडे, तुरे जगाच्या जागी बसवून पुतळा चबुतरा पादाक्रांत करण्यास होण्यास तयार झाला. तिकडे पुतळ्याला चबुतऱ्यावर चढवण्यास क्रेनही सज्ज झाली होती. संध्याकाळचे चार वाजले होते. 

त्या प्रचंड क्रेनचा ६० फुट लांब बूम ऊंच आकाशात तयारीने उभा राहिला. त्या अवजड धुडाच्या शेजारी महाराजांचा १८ फुटी पुतळा अगदी एवढासा वाटत होता. सभोवताली हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो नाही, हजारो माणसं जमली होती. वातावरणात एकच उत्साह दाटला होता. पुतळा क्रेनला काळजीपूर्वक बांधण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री, पुतळा समितीचे सदस्य, इतर वरिष्ठ सहकारी महाराजांना सलामी देण्यासाठी जातीने उपस्थित होते. क्रेन पुतळा चबुतऱ्यावर ठेवण्यास सज्ज झाली होती.  भाऊंच्या घरची सर्व मंडळी, सहकारी, मित्रपरिवार हा नेत्रदीपक क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी जमला होता. गेले दीड वर्ष चालू असलेल्या एका महापर्वाची आणि भाऊंच्या आयुष्यातील एक उत्कट प्रवासाची यशस्वीपणे सांगता करणारा क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला होता. भाऊ आणि त्यांच्या सहका-यांनी  घेतलेल्या अविरत श्रमाचं फळ समोर उभं होत. सर्वांच्या चेहेऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते. पण तरीही सर्व सावध होते. पुतळा क्रेनला व्यवस्थित बांधला आहे की नाही, तो नीट वरती चढवला जाईल की नाही, ही धाकधूक उरात होती. हसनभाईंच्या कौशल्यावर सर्वांचाच विश्वास होता. तरीही सर्व सुरळीत पार पडावं म्हणून सारेजण देवाचं नांवही घेत होते. 

क्रेनला बांधलेला पुतळा प्रथम दोन-तीन फूट वर उचलून सर्व काही ठाक ठीक असल्याची खात्री केली गेली. पुतळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई ह्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं आणि त्याचक्षणी क्रेनने हळुहळू पुतळा वर उचलायला सुरुवात केली. भाऊंना सुरुवातीपासून साथ देणारे भाऊंचे बंधू मोती आणि त्यांचे सहकारी अगोदरच पुतळा व्यवस्थित ओढून घेण्यासाठी चबुतऱ्यावर चढून सज्ज होते. पुतळा हळूहळू वर जाऊ लागला. सर्व व्यवस्थित सुरु होत, तरीही पुतळा हवेत लटकताना पाहून भाऊंच्या पोटात खड्डा पडला होता. पुढच्या काही मिनिटातच चबुतऱ्यावर अगोदरच सज्ज हाऊन उभ्या असलेल्या मोती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतळा चबुतऱ्यावर काळजीपूर्वक ओढून घेतला. पुतळा चबुतऱ्यावर व्यवस्थित ठेवला गेला. वरुन मोतिने ‘ऑल वेल’चा इशारा केला आणि परिसरात एकच जयघोष निनादला, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..!’ तो दिवस होता २३ जानेवारीचा. 

आता शेवटचं, पण तेवढंच महत्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे पुतळ्याला चबुतऱ्यावर सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने मजबुतीने बसवणं. ते काम करण्याची जबाबदारी घेतली होती, भाऊंचे इंजिनिअर मामाद्वय देवधर बंधू यांनी. आता सारी सूत्र देवधर बंधूंनी हाती घेतली. २३ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पुतळा सिमेंट काँक्रीटने चबुतऱ्यावर घट्ट बसवण्यात आला. पुतळा अगदी मजबुतीने चबुत-याशी जोडला गेल्याची पुन्हा पुन्हा खात्री करून, सर्वजण खाली उतरले. जमिनिवर उतरुन पुतळ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकुन सर्व काही ठिक असल्याची पुन्हा एकदा खात्री केली आणि एक महत्वाचं काम संपल्याच्या समाधानाने सर्वजण मुक्कामावर परतले. 

२४ जानेवारीचा दुसरा दिवस चबुत-यावर चढून पुतळ्याची शेवटची फिनिशिंग, रंगकाम (oxidizaton) आदी करण्यात पार पडला. तो दिवस पुन्हा पुन्हा परातीवर चढून सर्व काही ठाक ठीक आहे ना, ह्याची पुन्हा पुन्हा खात्री करण्यात गेला. काही करायचं राहिलं असल्यास, ते ठीक करण्याची ही शेवटची संधी होती. 

अंधार पडला. पुतळ्याच्या चोहोबाजूनी मोठमोठाल्या प्रखर लाईट्सच्या प्रकाशात बारीक सारीक कामं सुरु होती. एकीकडे समोरच्या बाजूला २६ जानेवारीच्या उदघाट्नचीही तयारी होत होती. मंडप बांधला जात होता. पुतळ्याच्या समोर उभं राहून भाऊ पुतळ्याचं निरीक्षण करत होते. चबुता-याच्या चारी बाजूने फिरून सर्वकाही व्यवस्थीत असल्याची खात्री करून घेत होते. इतक्यात भाऊंचा एक सहकारी धापा टाकत आला आणि पुतळा चबुतऱ्यावर हलल्यासारखा वाटतो आहे, असं सांगू लागला. भाऊंच्या काळजाचा ठोकाच चुकला. खरं तर देवधरमामांनी इंजिनीयरींगमधलं आपलं सर्व कौशल्य पणाला लावून पुतळा चबुतऱ्यावर घट्ट बसवला होता. पुतळा हलण्याची वा पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याची त्यांनी खात्रीही दिली होती. मग हा माणूस असं का सांगतो आहे, हे पाहण्यासाठी भाऊ धावतच त्याच्यासोबत गेले. त्याने पुतळ्याकडे बोट दाखवलं आणि खरंच, पुतळा हलल्यासारखा वाटत होता. विश्वास बसत नव्हता, पण दिसत मात्र तसंच होतं. भाऊंच्या पोटात गोळाच आला. भाऊ डोळे फाडून पुन्हा पुन्हा बघू लागले आणि एकदम लक्षात आलं की, पुतळा हलत नसून, गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रावरून येणाऱ्या भणाणत्या वाऱ्याने, पुतळ्याच्या चोहोबाजूनी लावलेल्या परांतीं कंप पावत आहेत. त्यामुळे पुतळा हालत असल्याचा भास होत होता. पुतळा स्थिरच होता, हलत होत्या, त्या बांबूच्या परांती. तो एक दृष्टीभ्रम होता, पण काही क्षण काळजाचे ठोके चुकवून गेला होता. शंकेला वाव नको म्हणून रातोरात  पुतळ्याच्या पायाला (बेसला) जास्तीची खबरदारी म्हणून अधिक मजबूत पोलादाच्या पट्ट्या तयार करून वेल्ड करून टाकल्या. पुतळा चारी बाजूने कनाती लावून झाकून ठेवला.. 

पुतळ्याची निर्मिती करण्यापासून ते शेवटाला पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न होईपर्यंतच्या काळात भाऊंच्या मनःस्थितीला असंख्य हेलकाव्यातून जावं लागलं होतं, त्याची आता सुखकर सांगता झाली होती. मुंबईच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं चिरंतन स्मारक उभं राहीलं होतं. भाऊंचं नांव शिव प्रभूंच्या या शिल्पाशी कायमचं जोडलं गेलं. भाऊ धन्य धन्य झाले. ऊर भरून आला. आता वाट पाहायची, ती दोन दिवसांनी होणाऱ्या औपचारिक अनावरणाच्या सोहळ्याची. 

२६ जानेवारीचा दिवस उजाडला. आज पुतळ्याचं अनावरं. पहाटेपासूनच गेट वे ऑफ इंडियाचा परिसर लोकांनी फुलून गेला होता. मुंगीलाही शिरायला वाव नव्हता. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन होता. त्यानिमीत्ताने म-हाठी भूमीत स्वत:चं राज्य निर्माण करणा-या शिवकल्याण राजाचं, छत्रपती शिवरायांच्या शिल्पाचं आज अनावरण होणार आणि त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याच्या भावनेनं हजारोंच्या संख्येने महाराजांची रयत जमली होती. अवघ्या वातावरणात पवित्र चैतन्य भरून राहिलं होतं. उंच चबुतऱ्यावर विराजमान झालेल्या महाराजांच्या दर्शनाची रयत उत्कंठतेने वाट पाहत होती. महाराजांच्या नावाचा जयजयकार होत होत. ढोल-ताशे वाजत होते. सनया निनादत होत्या. तूता-या फुंकल्या जात होत्या..!

व्यासपीठावर खाश्या स्वाऱ्या जमू लागल्या. आपापल्या पदाचा प्रोटोकॉल काटेकोरपणे सांभाळत सर्व मान्यवर आपापल्या आसनावर विराजमान होऊ लागले. वातावरणात एकाच उत्साह दाटला होता. इतक्यात गगनभेदी तुतारी निनादली. महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, आचार्य अत्रे आले. आचार्य अत्रेंचं जनतेने घोषणांच्या गजरात स्वागत केलं आणि ते सहाजिकच होतं. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. कहीच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले. त्यांचंही जोरदार घोषणांनी स्वागत झालं. राज्यपाल महोदय आले. मान्यवरांच्या स्वागताचे हार-तूरे झाले. 

पुतळ्याचा अनावरण समारंभ सुरु झाला, तसे यशवंतराव आजूबाजूला पाहू लागले, त्यांना भाऊ साठे कुठेच दिसेनात. पण भाऊ कसे दिसावेत? भाऊंना कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रणच नव्हतं. भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय, सहकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते, ते शासनाने वर्तमानपत्रातून आम जनतेला दिलेल्या जाहीर निमंत्रणाच्या आधारे. दूर, एका कोपऱ्यात उभे राहून भाऊ हा हृद्य सोहळा डोळ्यात साठवून घेत होते.

झाला प्रकार यशवंतरावांच्या लक्षात आला. त्यांनी ध्वनिक्षेपकावरून भाऊंना तातडीने व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. प्रसंगाचं ऐतिहासिक महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन, वैयक्तिक मान-अपमान बाजूला ठेवून, गर्दीतून वाट काढत भाऊ व्यासपीठावर पोहोचले. यशवंतरावांनी दोन पावलं पुढे येऊन प्रेमाने भाऊंचं स्वागत केलं. व्यासपीठावर भाऊंसाठी सन्मानाने खुर्ची ठेवली गेली. भाऊंचा यथोचित सत्कार केला गेला. पुढचा कार्यक्रम सरकारी रीतीप्रमाणे थाटात पार पडला. शिंगांच्या, तुताऱ्यांच्या आणि सनई चौघड्यांच्या निनादात  पुतळ्याचं अनावरण झालं आणि वातावरणात एकाच घोषणा उठली, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’..!

पुतळ्याच्या उदघाटनाचं छायाचित्र.. दिनांक २६ जानेवारी १९६१. 

कोणाबद्दलही भाऊंच्या मनात कटुता नव्हती. त्यांचं कर्तृत्व, सर्वांपेक्षा उच्च स्थानी, २१ फूट उंच चबुतऱ्यावर सन्मानाने विराजमान झालं होतं..!  भाऊ भावनाविवश झाले होते. डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. भाऊंना त्यांचं आयुष्य कृतार्थ झाल्यासारखं वाट्लं. त्यांच्या अवघ्या आयुष्याचं सार्थक झालं होतं..!

 – नितीन साळुंखे 

9321811091

26.08.2020

टिपा – 

 1. आज ह्या गोष्टीला ५९ वर्ष झाली. चालू वर्ष हे महाराजांच्या ह्या पुतळ्याचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. शिल्पकार भाऊ आज ९४ वर्षांचे आहेत. कल्याणला आपल्या ‘शिल्पालया’त कुटुंबियांसमवेत राहातात. देश-विदेशात भाऊंनी घडवलेलत्यांच्या हातून जी काही कलासेवा घडली, त्यात ते समाधानी आहेत. 
 2. सदरचा लेख व ह्यातली काही छायाचित्र  भाऊंनी लिहिलेल्या, ‘आकार;जन्मकथा शिल्पांची’ ह्या पुस्तकातील ‘गेट वे ऑफ इंडियाचा शिवपुतळा’ ह्या प्रकरणावर आधारित आहे. ह्या पुस्तकांत भाऊंनी घडवलेल्या इतरही शिल्पांची जन्मकथा आहे. आपण सर्वानी हे पुस्तक अवश्य वाचावं. 

 श्री. सदाशिव साठे, अर्थात भाऊ   

विशेष आभार – 

१. शिवपुतळ्याचे रंगीत फोटो, गावदेवी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजीव अर्जुन सावंत यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात उपलब्ध करून दिले आहेत. श्रीयुत सावंत साहेबांचे आभार 

२. माझे पोलिस अधिकारी मित्र श्री. सईद बेग, ह्यांनी माझी भाऊंच्या बंधूंची आणि चिरंजीवांची दूरध्वनी भेट घालून दिली, त्यांचेही आभार. 

३. भाऊंचे चिरंजीव श्री. श्रीरंग साठे ह्यांनी भाऊंचा जीवन परिचय आणि सध्याचं छायाचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल, त्यांचे आभार. 

4.  श्री. सदाशिव साठे, अर्थात भाऊंच्या ‘शिल्पालय’ला भेट देण्यासाठी कृपया संपर्क साधावा –  

Sriranga Sadashiv Sathe,

Sathe Wada, Gandhi Chowk, 

Kalyan West, Dist Thane 

Email: mail@shilpalay.org 

Web: http://www.Shilpalay.org 

Call: 9820487397

भाऊंचा जीवनपरिचय आणि त्यांनी केलेलं सर्व काम  www. shilpalay.org ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

5. २६ जानेवारीचा पुतळ्याच्या उदघाटनाचा फोटो माझे मित्र आणि जुन्या मुंबईचे अभ्यासक श्री. भरत गोठोसकर (खाकी टूर्स) ह्यांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना सादर फोटो indianhistorypics on twitter ह्या ट्विटर हॅण्डलवर मिळाला. 

– नितीन साळुंखे 

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणांची ओळख करुन देणाऱ्या माझ्या पुस्तकातील  हा लेख थोडा वेगळा आहे. माझ्या इतर लेखातल्या कथेंप्रमाणे, ह्या लेखातली कथा पोर्तुगीज, ब्रिटिश काळातली नसून, स्वातंत्र्योत्तर काळातली आहे. पण असं असूनही ह्या कथेला मला या ह्या पुस्तकात स्थान द्यावसं वाटलं, ते दोन कारणांमुळे. पाहिलं कारण हे, की ही कथा स्वातंत्र्योत्तर काळातली असली तरी ती १९६१ सालची आहे. आपला जगण्याचा वेग इतका अफाट होत गेला आहे की, गेला क्षण हा इतिहासच असतो. मग ही तर साठ वर्षांपूर्वीची घटना आहे. म्हणजे ती निश्चितच इतिहासाचा भाग आहे आणि पुन्हा तो मुंबईशी निगडीत आहे.

पुतळ्याचे आजचे फोटो सौजन्य श्री. राजीव अर्जुन सावंत, सहाय्यकपोलीस उपायुक्त, गावदेवी विभाग.