नितीन अनंत साळुंखे – परिचय

नांव- नितीन अनंत साळुंखे,

पत्ता- मुंबई ४०००६८

फोन- 9321811091

मेल- salunkesnitin@gmail.com

मूळ कोकणातलं. सिंधुदुर्ग जिल्हा.

वाचनाचा छंद. स्वत:चा पुस्तक संग्रह.

विशेषत: माहितीपर, वैचारिक, स्थानिक इतिहास, चरित्र, प्रवासवर्णनं इत्यादी पुस्तकांचं वाचन.

ब्लॉगर आहे. nitinsalunkheblog.wordpress.com हा माझा स्वत:चा ब्लाॅग आहे. एकूण २६ देशांत माझं लेखन वाचलं जातं..

सन २०१७-१८, १८-१९ आणि १९-२० अशी सलग तीन वर्ष ‘एबीपी माझा’ या वाहिनीची ‘ब्लॉग माझा’ ह्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला बक्षिस मिळालं आहे..

महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्र, साप्ताहिकं यातून माझ्या आवडीचा नि अभ्यासाचा विषय असेल तर, ते ही लिखाण करतो.

मुंबईचा इतिहास, खास करुन पोस्ट मोहमेडन पिरियड, हा जिव्हाळ्याचा आणि म्हणून लिखाणाचाही विषय. ‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ ह्या याच विषयावरील पुस्तकातं लेखन सुरू आहे. यात संशोधनाच्या अंगाने जाणारे लेख आहेत.

प्रसंगपरत्वे राजकीय आणि वैचारिक लेखन करतो.

इतर कुणाला त्यांचं आत्मकथनात्मक लेखन करायचं असेल तर, शब्दांकन करतो. नुकतंच एका निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पुस्तक लिहून हातावेगळं केल.

सध्या मुंबईतील गिरण्या, १९८२ परियंतचं गिरणगांव आणि त्यात राहाणार् गिरणगांवकरांवर वाचन सुरू आहे. त्यावर लिखाणही चालू आहे..

माझं मनोगत-

मी का लिहितो..

‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.

तसं सांगण्यासारखं तर प्रत्येकाकडे काही न काही असतं आणि ते सारखंच इंटरेस्टींग असतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पट काणत्याही चित्तथरारक कादंबरी किंवा चित्रपटापेक्षा तसूभरही कमी नसतो असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात आलेले अनुभव, मी भोगलेलं किंवा उपभोगलेलं जगणं, मला माणूस म्हणून जगताना, नागरिक म्हणून वावरताना, ग्राहक म्हणून किंवा नातेसंबंधातल्या विविध भुमिका बजावताना आलेले तेवढेच विविध अनुभव मला कुणाशी तरी शेअर करावेसे वाटतात, म्हणून मी लिहितो. मी लिहू शकतो, कोणताही आडपडदा न ठेवता आणि कुणाचाही मुलाहीजा न राखता मी लिहू शकतो, बाकीचे लिहू शकत नाहीत, म्हणून मी लिहितो. हाच काय तो फरक. गंम्मत म्हणजे मी जे लिहितो, ते माझं वाचणारांशी बऱ्याच टक्क्यांनी रिलेट होत असतं, असा मला गेल्या चार-पाच वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ एकच, व्यक्ती लहान असो की मोठी, गरीब असो की श्रीमंत, आयुष्य जगताना आणि जगण्यातल्या विविध भुमिका बजावताना येणारे अनुभव सर्वांचे सारखे, युनिव्हर्सल असतात, फरक असलाच तर फक्त तपशिलातला. उदा. कोणत्याही स्तरातल्या अथवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातल्या गांवात राहाणाऱ्या नवरा-बायकोंचा एकमेंकांबद्दलचा अनुभव सारखाच असतो;किंवा आपल्या देशात सरकारी अधिकाऱ्यांचा, एक नागरिक म्हणून आपल्या कुणालाही येणारा अनुभव सारखाच असतो. हे सारं मला कुणाला तरी सांगावसं वाटतं म्हणून मी लिहितो.

वर म्हटल्याप्रमाणे, सांगण्यासारखं तर प्रत्येकाकडे काही न काही असतं आणि ते सारखंच इंटरेस्टींग असतं. माझ्यासोबत एक राजु नांवाचा मुलगा काम करायचा. दारू आणि जुगार एवढंच त्याचं आयुष्य. परंतू हे दुर्गूण म्हणावेत, तर तो टोकाचा प्रामाणिक. यालाही सारखं काहीतरी सांगायचं असायचं. परंतू एका बेवड्याचं काय ऐकायचं, म्हणून ड्रिंक्स घेणारी प्रामाणिकमाणसं त्याला टाळायची. बरं, त्याचं सांगणं म्हणजे अगदी लहानसहान गोष्टी असायच्या. जसं आज मी लावलेला आकडा लागला आणि मला पैसे मिळाले, त्या पैशांने म्हातारीला(पक्षी-आईला) एक मोबाईल दिला किंवा आज मला अमुकतमूक माणसाने मला पैसे दिले आणि त्या पैशांच्या मी माझ्या चाळीतल्या मुलांना वह्या कशा वाटल्या वागेरे वैगेरे. त्याचा आनंद त्या सांगण्यातंच असायचा, पण ऐकायला कुणी नसायचं. माझंही बऱ्याचदा असंच व्हायचं किंवा होतं. मलाही कुणालातरी काहीतरी सांगायचं असायचं, पण ऐकायला कुणाकडे वेळच नसायचा. अशा वेळी राजू दारू पिऊन रस्त्यावर बडबडायचा, तर मी लिहायचो. राजुला त्याच्या मनातलं बोलण्यासाठी दारुची धुंदी लागगायची, तर माझी लिहण्यातच तंद्री लागायची, म्हणून मी लिहायला लागलो.

इतरांचं माहित नाही, परंतु सोशल मिडियावरचं माझं लिहिणं म्हणजे माझा मी माझ्याशीच केलेला संवाद असतो. मला सतावणारे परंतू इतरांना बावळट वाटणारे प्रश्न, मला वाटत असलेली भिती, खंत, मला आलेले अनुभव माझ्यासमोरच मांडण्यासाठी मी लिहितो. मला सापडलेली उत्तरं तपासून पाहाण्यासाठीही मी लिहितो. हा आत्मसंवाद असतो. तुकोबांनी सांगीतलंय ना, “तुका म्हणे होय मनासी संवाद, पुलाचि वाद आपणासि..” अगदी तसंच..!

‘मनासी संवाद..’ असला म्हणजे, वेगळं कौन्सिलिंग लागत नाही, वायफळ आणि वाळुत मुतल्यासारख्य चर्चा नकोत, वाद नकोत की काही नको. माझं लिहिणं म्हणजे माझ्या मनाचं रिसायकलिंग किंवा ओव्हरहाॅलिंग असतं. असं केलं की मग स्वत:चीच स्वत:शी, स्वत:च्या मनाशी घट्ट मैत्री होत जाते आणि मग एकटेपणा अजिबात जाणवत नाही. वेगळे योग-प्राणायाम करायला लागत नाहीत. कुणीतरी म्हटलंय ना, की आपणच आपले फ्रेन्ड, फिलाॅसाॅफर, गाईड असतो म्हणून, ते जे कुणीतरी म्हलंय, ते नेमकं अशावेळी अनुभवायला येतं. स्मार्ट फोनच्या जमान्यात आपण इकडे बसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी क्षणात संवाद साधू शकतो आणि आपण तसं करतही असतो. अनेकजण जवळच्या माणसांना कारणपरत्वे भेटत असतात. आपल्याकडे वेळ नाहीय, तो स्वत:लाच भेटायला. लिहण्यातून मला माझ्यातल्या मला भेटता येतं. मला वाटतं, लिहिणंच कशाला, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कुणाही प्रत्येकाची हिच भावना असावी, मी लिहून तसं करतो एवढंच..!

गेली चार-पाच वर्ष मी सातत्याने लिहितोय. मी राजकीय-सामाजिक विषयांवरही लिहित असलो तरी, माझा ओढा मुंबई शहराच्या इतिहासाकडे अधिक आहे. मुंबईबद्दल, मुंबईच्या इतिहासाबद्दल माझ्या मनात जबरदस्त कुतूहल आहे. ह्या कुतूहलाचं बीज माझ्या मनात पेरलं गेलं, त्याला कारणीभूत झाले ‘दैनिक लोकसत्ता’चे माजी संपादक डॉक्टर अरुण टिकेकर. नेमकं साल कोणतं ते आता आठवत नाही, पण १९९२-९३चं असावं, डॉक्टर टिकेकरांची ‘जन-मन’ आणि ‘स्थल-काल’ नावांची लेखमाला त्यावेळी रविवारच्या लोकसत्तेत प्रसिद्ध व्हायची. मुंबईच्या गत तीन-चारशे वर्षांच्या वाटचालीत महत्वाची भुमिका बजावलेली विविध ऐतिहासिक स्थळ, मुंबई शहराला घडवणारी देशी-विदेशी (ह्यात ब्रिटिश जास्त हे ओघानेच येतं) व्यक्तिमत्व, इथले रस्ते आणि त्यांचा मुंबईच्या जडणघडणीत असलेला वाटा, इथल्या इमारती, गाड्या-घोडे इत्यादींची अत्यंत सुंदर आणि नेमक्या शब्दांत डाॅक्टर टिकेकर त्या सदरांतून माहिती देत असत. आपल्या लिखाणातून वाचकांच्या डोळ्यांसमोर तो काळ अक्षरक्ष: जिवंत उभा करण्याचं सामर्थ्य टिकेकरांच्या शब्दांत होतं. मी भान विसरून ते सारं वाचायचो, कल्पनेतच त्या काळात जाऊन मी तो काळ जगायचो, ती ठिकाणं अनुभवायचे. त्याच वेळी मी ठरवलं होत की, पुढे कधीतरी संधी मिळताच टिकेकरांनी वर्णन केलेल्या त्या ठिकाणांना भेटी द्यायच्या, मुंबईचा आपण आपल्या नजरेने शोध घ्यायचा, म्हणून..!

तशी संधी मला त्यानंतर जवळपास २५ वर्षांनी मिळाली. एव्हाना मी नोकरीतून मुक्त होऊन पूर्णवेळ वाचन आणि जमल्यास लेखन या माझ्या छंदांना देण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान, माझं वाचनाचं वेड माहित असलेला माझा मित्र अजित दुखंडेने मला, इसवी सनाच्या १८६२ सालात गोविंद नारायण मडगांवकर यांनी लिहिलेलं, ‘मुंबईचे वर्णन‘ हे पुस्तक भेट म्हणून दिलं. सन १८५९-६०च्या दरम्यानच्या मुंबईचं, मुंबईतल्या माणसांचं, त्या माणसांनी बनवलेल्या इमारतींचं, रस्त्यांचं, पुतळ्यांचं नि बागा-कारखान्यांचं मडगावकरांनी त्याकाळच्या मराठी भाषेच्या वळणात ज्या पद्धतीनं वर्णन आणि विश्लेषण केलंय, त्याला तोड नाही. डाॅक्टर टिकेकरांच्या लेखमालेतून नुसतीच ओळख झालेली मुंबई, मडगांवकरांच्या पुस्तकातून मला उरोउरी भेटली. त्या भेटीतून मुंबईच्या नि माझ्यातल्या घट्ट नात्याची ओळख पटली आणि मग मात्र मी पूर्ण मुंबईमय झालो..

धर्मग्रंथ वाचावा त्याच श्रद्धेने, परंतु डोळसपणे मी मडगांवकरांच्या पुस्तकाची पारायणं केली. पुस्तकानेही मला वेड लावलं आणि मला आतून जाणवलं की, डाॅक्टर टिकेकरांनी माझ्या मनात पेरलेल्या आणि गेली २५ वर्ष सुप्तावस्थेत असलेल्या बिजाला अंकूर फुटायची वेळ आता आलेली आहे. मडगावकरांचं पुस्तक वाचून, जुन्या मुंबईवरील आणखी वाचन करण्याची उर्मी माझ्या मनात दाटून आली आणि वर्तमानातील मुंबईत, काळाच्या दीर्घ माऱ्याला तोंड देत अद्यापही टिकून असलेल्या जुन्या काळातल्या मुंबईच्या काही पाऊलखुणा शिल्लक आहेत का आणि असल्यास त्या कोणत्या परिस्थितीत आहेत, याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.

सुरुवात करताना, मुंबईवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या जास्तीच्या वाचनापासून केली. मुंबईवर विविध काळातल्या विविध लेखकांनी प्रचंड प्रमाणावर लेखन केलंय. ह्यातलं बरंचसं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं आहे आणि ते बहुतेक सर्व इंग्रजीत आहे. मराठीतही मुंबईवर लेखन झालंय, पण त्याच प्रमाण खूपच कमी आहे. त्यातही, काही अपवाद वगळता, फारशी विस्तृत माहिती मिळत नाही. तरीही ती पुस्तकं मी मिळवून वाचली आणि जास्तीच्या संदर्भासाठी मी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचा सदस्य झालो. एशियाटिक सोसायटीत मुंबई ह्या विषयावरची इंग्रजीतली अनेक पुस्तक मला वाचायला, अभ्यासायला मिळाली. मुंबईवरच्या पुस्तकांचं वाचन करताना, ह्या विषयाचा एकूण आवाका आणि माझे एकूण इतर व्याप लक्षात घेऊन, माझा मुंबईवरचा अभ्यास, मुंबई शहरापुरता, म्हणजे कुलाब्यापासून पश्चिम बाजूस माहीम आणि पूर्व बाजूस सायन इथपर्यंतच मी मर्यादित ठेवला. काळाचा विचार करता, पोर्तुगीजांकडून मुंबईची बेटं १६६१ साली आंदण म्हणून जेंव्हा ब्रिटिशांकडे आली तेंव्हा पासून, ते साधारण आपल्या स्वातंत्र्यपर्यंतचा कालावधी मी अभ्यासाकरीता घेतला. माझ्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासाचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या हौशी अभ्यासकासाठी ह्या मर्यादा आखून घेणं आवश्यक होत.

विविध पुस्तकातून जुन्या मुंबईचा शोध घेताना, मुंबई शहारातील म्युझियम्सना भेटी देणं साहजिकच होत. ह्यापूर्वी म्युझियमच्या आणि माझा संबंध लहानपणीच काय तो आला होता. काळा घोडा नजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमबद्दल त्यामुळे माहिती होती, पण बालपणीच्या ह्या म्युझियम भेटीमागे ज्ञानार्जनापेक्षा सहलीचा आनंद घेणे एवढाच हेतू होता. आता मात्र मी म्युझियम सजगतेने पाहायला सुरुवात केली. मुंबईच्या राणी बागेत भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आहे आणि तिथे जुनी मुंबई उलगडून दाखवणाऱ्या अनेक वस्तू-शिल्पे आहेत हे मला ह्याच वेळी समजलं. भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर ब्रिटिश कालीन मुंबईवर अधिकार गाजवणाऱ्या आणि त्याकाळात मुंबईच्या फोर्ट भागात नाक्या नाक्यावर बसवलेल्या अनेक इंग्रजांचे पुतळे हारीने मांडून ठेवलेलं आढळले आणि मला पुस्तकातून माझ्या वाचनात आलेली जुनी मुंबई प्रत्यक्षात भेटायला सुरुवात झाली.

भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर ठेवलेल्या पुतळ्यांमध्ये मला राणी व्हिक्टोरियाचा, आता उन्हा -पावसाच्या माऱ्याने विद्रुप झालेला, परंतु कधीकाळी देखणा असलेला संगमरवरी पुतळा दिसला आणि पुस्तकात वाचलेली ह्या पुतळ्याची आठवण जागी झाली. राणी व्हिक्टोरियाच्या हा पुतळा चर्चगेट नजीकच्या सीटीओच्या मागे, म्हणजे आता जो टाटा कम्युनिकेशन्सचा (पूर्वीचं विदेश संचार लिमिटेड)उंच टॉवर उभा आहे, बरोबर त्या जागी होता. पण जुन्या पुस्तकातून पाहिलेल्या तिच्या पुतळ्याच्या चित्रात, एक शोभिवंत कलाकुसर केलेला संगमरवरी मखरही पाहिलेलं मला आठवत होतं. तो काही मला इथे दिसेना. मी म्युझियममध्ये चौकशी केली, पण त्यांनाही सांगता येईना. मग मी तो मखर कुठे असेल या दिशेने शोध घ्यायला सुरुवात केली. पुढे बऱ्याच काळाने इंटरनेटवर मुंबईवरचा लेख वाचताना, व्हिक्टोरियाच्या तो मखर जुहू येथे एका उद्योगपतीच्या बंगल्यात असल्याचं समजलं. लगेच तिथे गेलो, पण तिथे तो नव्हता. शोध सुरूच राहिला आणि अचानक एके दिवशी मला तो मखर मुंबईच्या नेपियन सी रस्त्यावरच्या एक आधुनिक इमारतीच्या दर्शनी भागावर असल्याचं कळलं आणि मी तो लगेच पाहूनही आलो. जुन्या मुंबईचा पुस्तकायुन वाचलेला, चित्रातून पाहिलेला अस्सल तुकडा, असा मला रस्त्यावर सापडला आणि माझ्या लक्षात आलं, की मुंबई शोधायची असेल तर, केवळ पुस्तक वाचून भागणार नाही, म्युझियमना भेटी देऊनही ती मिळणार नाही, तर डोळे उघडे ठेऊन रस्त्यातून फिरल्यासच ती सापडू शकेल. आणि मी मुंबईचा शोध तिच्या रस्त्यावर उतरून घ्यायला सुरुवात केली आणि जुनी मुंबई माझ्या डोळ्यासमोर, मधला काळाचा जाड पडदा दूर करून येऊन उभी राहू लागली.

त्याच दरम्यान कधीतरी मुंबईत अजुनही अस्तित्वात असलेल्या ब्रिटीश कालीन माईलस्टोन्सची माहिती देणारा एक लेख माझ्या वाचनात आला. त्यातील एक माईलस्टोन माझ्या नेहेमीच्या रस्त्यावर, दादरच्या आंबेडकर मार्गावर असलेल्या चित्रा सिनेमासमोर असल्याचं समजलं. लगेच तिथे गेलो अगदीच दुर्लक्षित आणि बेवारस स्थितीत असलेला तो मुंबईच्या गेल्या दोन-अडीचशे वर्षांतील बदलांचा ऐतिहासिक मूक साक्षीदार पाहून मला भरून आलं. त्याच्यासमोर उभा राहिलो आणि दादरच्या आंबेडकर रोडवरची प्रचंड वाहतूक माझ्या समोरून आपोआप नाहीशी झाली. कडेला घनदाट झाडी असलेला, तेंव्हाही आता एवढाच रुंद असलेला आंबेडकर रोड नाहीसा होऊन त्याजागी ब्रिटिश काळातला व्हिन्सेंट रोड मला दिसू लागला. बग्गीतून जाणारे विदेशी लाटसाहेब आणि देशी व्यापारी, बैलगाडीतून जाणारे एतद्देशीय त्या रस्त्यावरून जाताना मला दिसू लागले. त्यावेळची साधी, तरीही मनाला मोहवणारी मुंबई मला दिसू लागली. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. मला टाईम मशिनमधून दोन-अडिचशे वर्षांचा उलटा प्रवास केल्याचा अनुभव आला. असाच अनुभव मला पुढे सायन, आर्थर रोड, दादरच्या कबुतर खान्याजवळचा माईलस्टोन्स पाहताना आला.

त्या माईलस्टोन्सवर असलेला चर्चगेटच्या सेंट थॉमस ह्या १८१८ साली बांधकाम पूर्ण झालेल्या चर्चचा उल्लेख पाहुन मी त्या चर्चला भेट दिली. तिथे तर मुंबईच्या इतिहासाला वैभवशाली बनवणारे अनेक ब्रिटिश दिग्गज चिरनिद्रा घेत असल्याचं मला समजलं. त्यातलादेणारा, तो ही चर्चमध्ये, देणार हा मला माहित असलेला एकमें ख्रिश्चन मानून. एकमनव त्याची समाधी ह्या चर्चमध्ये आहे असा उल्लेख मला अन्य एका पुस्तकांतही सापडला होता, ती मी प्रत्यक्ष पहिली. जोनाथन डंकन, ज्याने मुंबई उपनगराशी रास्ता मार्गाने जोडण्याचा सर्वात पहिला यशस्वी प्रयत्न केला. तो रस्ताही त्याने श्रमदानातून बांधून घेतला होता आणि खर्च वसूल करण्यासाठी त्या रस्त्यावर टोलही बसवला होता. हा देशातला पहिला टोल रोड. ऐतिहासिक महत्वाचा हा एकेकाळचा हमरस्ता, आज दिनवाणा होऊन एका बाजुला पडलेला अजुनही पाहाता येतो. मी पाहिला. त्यावरुन अदबीने चार पावलं चाललोही.

गव्हर्नर म्हणून डंकनचं वास्तव्य ज्या इमारतीत होतं, ती देखणी इमारत ह्या चर्चपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वेळ मिळाला तशी ह्या इमारतीही भेट दिली. याच इमारतीत डंकनचं निधन झालं होतं. आज वडापाव, सॅडविच आणि चहाच्या ठेल्यांनी वेढलेली फोर्टमधली ही देखणी इमारत म्हणजे, त्या काळचं ‘गव्हर्नमेट हाऊस’, म्हणजे आजच्या भाषेत ‘राजभवन’,होतं. त्याचा अभ्यास करताता मला समजलं की, मलबार हिलवर असलेलं ‘राजभवन’ धरून मुंबईत एकून पांच राजभवन(गव्हर्नमेंट हाऊस’) आहेत आणि त्यातील चार तर आजही सर्वांना पाहाता येतात, हे समजलं आणि त्या चारही वास्तूंमधे मी फिरुन आलो. ती राजकीय खलबतं, हल्ले आणि तहनाम्याच्या चर्चा आणि कारस्थानही ऐकलेल्या तिथल्या भिंतींवर हात फिरवला. तो काळ नजरेसमोर आणला. त्या काळात क्षणभर वापरूनही आलो.

मुंबईच्या आणि देशाच्याही औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या जमशेटजी नुसेवानजी टाटा यांच्या फोर्टमधल्या मूळ घरावरून लाखो मुंबईकर दररोज ये जा करतात. मी ही करायचो. पण ते टाटांचं घर आहे हे मला एका पुस्तकातून समजलं आणि नंतर माझी त्या घराकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. तिथूनच पुढे काही मीटर्सवर त्यांचा पुत्र नवल टाटा यांचं हवेली सारखं प्रशस्त घर आहे, ते ही मला सापडलं. मी इथे गेलो. माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखी असणाऱ्या त्या दोन्ही वास्तू नव्या दृष्टीने डोळे भरून पाहिल्या. त्या समोरच्या रस्त्यावरून जाणारी टाटांची, पहिल्या भारतीयाची देशातील पहिली मोटरगाडीही मला दिसू लागली.

जोनाथन डंकन, राजभवन किंवा जमशेदजी टाटा ही केवळ काही उदाहरण झाली. पुढे मी मुंबईतील ऐतिहासिक अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. ती ती ठिकाणं, मधला तीन-चारशे वर्षांचा काळाचा पडदा कल्पनेनं दूर करून, त्या त्या काळात कल्पनेनेच जाऊन पाहण्याचा, अनुभवण्याचा नवाच छंद मला जडला. त्यात मुंबईची प्राचीन देवस्थान आहेत, दर्गे आहेत, चर्च आहेत, रस्ते आहेत, गल्ल्या आहेत, पूल आहेत आणि मुंबईच्या कुशीत, तीन-चारशे वर्षांपूर्वीच पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्य आजच्या काळातही टिकवून जगणारं एक अक्ख गावही आहे. ही सर्व माहिती अनेक पुस्तकांतून दिलेली आहे, पण मुंबई पुस्तकांतून आणि म्युझियममधून मला जेवढी समजली, त्याहीपेक्षा ती प्रत्यक्ष त्या त्या जागेवर जाऊन पाहिल्यानंतर कितीतरी पटीने जास्त चांगली समजली. किंबहुना, अखंड मुंबई शहर हेच एक मोठं पुस्तक आणि खुल्या आभाळाखालच संग्रहालय आहे, मुंबई खुल्या आसमानाखाली जेवढी चांगली समजते, तेवढी पुस्तकाच्या उघडलेल्या पानातून आणि बंदिस्त वस्तुसंग्रहालयातून समजत नाही, मी हे मुंबईविषयी बोलत असलो तरी, हे आपल्या देशातील प्रांतांना, ठिकाणांना, शहरांना सारखंच लागू असलेलं समीकरण आहे. इतिहास पुस्तकातून वाचता येतो, संग्रहालयातून त्याचे काही जीर्ण तुकडे पाहताही येतात. पण इतिहास साक्षात अनुभवायचा असेल तर, त्या त्या ठिकाणांना भेटी देण्याला पर्याय नाही..!

मी पाहिलेल्या मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांचा मला आलेला अनुभव मी शब्धबद्ध करत गेलो आणि तो पुस्तकी संदर्भासहित सोशल मीडियावर लोकांसाठी टाकत गेलो. त्याला प्रचंड म्हणावा असा प्रतिसाद मला मिळाला. माझ्या लेखांतून उल्लेख केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्याचही मला अनेकांनी कळवलं. मुंबईच्या इतिहासात रस निर्माण होऊन, अनेकांनी त्या इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केल्याचाही मला आवर्जून सांगितलं. रोज पाहण्यात येणारी मुंबईतली काही ठिकाण, पायाखालचा एखादा रोजचा रस्ता, एखाद देऊळ ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे हे लोकांना समजलच नाही तर, त्यांना त्याच महत्वच समजणार नाही आणि एखाद्या गोष्टीच महत्वच समजलं नाही तर त्याविषयीचा अभिमान निर्माण तरी कसा होणार?

एक उदाहरण सांगतो. परेलच्या चौकात, जिथे आज महानगरपालिकेच्या एफ विभागाचं कार्यालय आहे, त्या चौकाला ‘मडकेबुवा चौक‘ असं नांव दिल आहे. ह्या ठिकाणाला आदल्या पिढीचे लोक ‘परेल पोयबावडी‘ किंवा ‘परेल टीटी‘ म्हणून ओळखायचे. मुंबईतील वाहतुकीचा मुख्य साधन घोडागाड्या, बैलगाड्या असतानाच्या काळात इथे त्या गाडयांना जुंपलेल्या घोडयाना किंवा बैलांना पाणी पाजायचं हे ठिकाण होत. त्याच्या समोरच्या बाजूला पारेलच ट्राम टर्मिनस होत, जिथून ट्राम परतीचा प्रवास सुरु करत सत. आजच्या पिढीपैकी किती जाणं हे माहित असेल या बषांकाचं आहे. आज त्या चौकात नांव ‘मडकेबुवा चौक आहे. एका महत्वाच्या चौकाला ज्यांचं नांव दिलाय, ते मडकेबुवा कोण होते, त्यांचं चरित्र काय, त्यांनी मुंबई शहरासाठी नेमकं काय केलाय, हे किती मुंबईकरांना माहित आहे? दहा पैकी आठ जणांना ते माहित असण्याची शक्यताच नाही. आता जे माहीतच नाही, त्याविषयी प्रेम, आपुलकी कशी काय निर्माण होणार.? मग तसं प्रेम, आपुलकी निर्मण होणासाठी काय करावं लागेल? तर काही भव्यदिव्य करायची गरज नाही. एक लहानशी पाटी, जीवर त्या ठिकाणचा इतिहास संक्षिप्त पद्धतीने लिहिला गेलाय, अशी तिचे लावली तरी मोठं काम होण्यासारखं आहे. फोर्ट मधल्या काळा घोड्याची अशी माहिती तिथे दिल्याने, त्या ठिकाणाचं वेगळेपण लोकांना माहित होऊ लागलय आणि त्यांची त्या ठिकाणाकडे पाहायची दृष्टीच बदलून गेलेली मी अनुभवलं आहे.

पाश्चिमात्य देशात इतिहास कितीही काळाकुट्ट असला तरी तो निगुतीने सांभाळला जातो. तो इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तिथल्या वैयक्तिक, सरकारी आणि संस्थापातळीवर यशस्वी प्रयत्नही केला जातो. येणाऱ्या पिढयांना आपल्या भूमीचा, निदान आपण राहतो त्या ठिकाणचा इतिहास, तो घडवणाऱ्या आपल्या पूर्वजांची कर्तबगारी माहित असेल तर आणि तरच त्या पिढीची इतिहासाशी नाळ जोडली जाऊ शकते आणि आपल्या देशाविषयी, भूमीविषयी, प्रांताविषयी वा अगदी शहराविषयीही तिच्यात अभिमान निर्माण होऊ शकतो. परदेशातून असे करण्यात तिथल्या अभ्यासकांचा,साहित्यिकांचा, कलावंतांचा आणि अगदी सरकारचाही प्रयत्न सुरु असतो. आपल्याकडे त्याविषयी उदासीनताच दिसते.

तसं आपल्याकडेही इतिहासाचं लेखन होतं, नाही असं नाही. पण ते बरंचसं इंग्रजी भाषेत असतं किंवा मग कुठल्यातरी ग्रंथालयातील कपाटाची शोभा आणि धूळ वाढवीत असतात. सामान्य लोकांना समजेल अशा लोकभाषांमधे इतिहासाचं फारसं लिखाण होत नाही, काही तुरळक सन्माननीय अपवाद सोडले तर, मराठीत तसे फारसे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. नवीन पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देण्याची जबाबदारी आपण आणि म्हणून नवीन पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी काहीच कल्पना नसते आणि ज्याची काही कल्पनाच नाही, त्याचा अभिमान निर्माण व्हायचा तरी कसा, याचा विचारही कुणी करताना दिसत नाही.

मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात, परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही..आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो.. धर्मशाळेबाबत अशी कोणतीच भावना कोणाच्या मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय.।.

इथल्या रस्त्यावरून चालताना सहज म्हणून पायाने उडवलेला दगडही त्याच्या उरात इतिहास जपून आहे. तो माहित नसतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि आपल्या शहराबद्दल आपल्या उरात प्रेम निर्माण होत नाही. ते व्हावं असं वाटत असेल तर, आपल्यापैकी प्रत्येकाने इथला इंच न इंच सजग नजरेने पहिला पाहिजे. आणि ज्यांना ह्याबद्दल माहिती आहे, ती त्यांनी लोकांच्या भाषेत उपलब्धही करून दिली पहिले. तर आणि तरच आपल्या शहराबद्दल प्रेम निर्माण होऊ शकेल.

आपली मुंबई हे एक खुलं पुस्तक आणि खुल्या आभाळाखालच एक म्युझियम आहे. फक्त तए पुस्तक आणि म्युझियम पाहण्याची दृष्टी खुली हवी.. !! तशी दृष्टी देण्याचं काम लोकभाषेत लिहिणाऱ्या इतिहासकारांचं आहे, लेखकांचं आहे आणि शासनाचंही आहे.

म्हणुन तर मी लिहितो..!

-@नितीन साळुंखे

9321811091

2 thoughts on “नितीन अनंत साळुंखे – परिचय

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s