सुभाषितांचं खोटेपण..

सुभाषितांचं खोटेपण..

मी लहानपणापासून असं ऐकत आलोय की, ‘मनापासून केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळतं’. कर्मयोगात ‘काम करत राहा, फळाची इच्छा धरू नका’ असा उपदेश केलेला आहे. ही दोन विरुद्ध अर्थ ध्वनीत करणारी सुभाषितं, वेगवेगळ्या परिस्थितीत माणसाच्या मनाची समजूत घालण्यासाठी तयार केलेली आहेत, अशी माझी आजवरच्या माझ्या व इतरांच्याही अनुभवातून ठाम समजूत होत चाललेली आहे.

माणूस मनापासून काम करतो तेच मुळी मनोवांछीत फळ मिळावं म्हणून. घाम गाळण्याचं काम मरू दे, साधी बिन कष्टाची देवपुजाही मनात फळाची अपेक्षा धरून केली जाते, हे कुणी नाकारणार नाही. माणूस देवळात काय, ‘काय बाबा कसा आहेस, बरं चाललंय ना’ असं म्हणून देवाची विचारपूस करायला निश्चितच जात नाही. तो देवळात जातो तो, ‘इडा पिडा टळो आणि मी मागितलेलं मिळो’ ही इच्छा धरूनच. एकदा का मनापासून केलेल्या कामाचं मनाप्रमाणे फळ मिळालं, की पुढचं कर्म करायला त्याला आणखी बळ येतं, हे देखील सर्वांना मान्य होईल..

फळ अपेक्षित नसेल तर, माणसानं काम करावंच कशाला? समजा केलंच, तर काम करण्यासाठी पोटातून जी उर्जा यावी लागते आणि ती उर्जा येण्यासाठी त्यात काहीतरी जे ढकलावं लागतं, ते फुकट मिळत नाही. काम करायचं, ते मुळात पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी, जो प्रश्न काम करुन फळ मिळालं तरच सुटू शकतो. अशा परिस्थितीत फळाची अपेक्षा न धरता केलेल्या कामात, पोटाचं काय करायचं, हे कुठे कोणी सांगितलेलं माझ्या वाचनात आलेलं नाही. पुन्हा त्या वचनावर विश्वास ठेवून कृती केली आणि पुढे बऱ्याच काळाने फळ मिळालं(च) तर मधल्या काळाची भरपाई कुणी आणि कशी करायची, हा प्रश्न आहेच. दात असताना चणे मिळायला हवेत, बोळकं झाल्यावर मिळून काय उपेग?

मनापासून केलेल्या कामाचं फळ मिळालं नाही, की मग हे वरचे सगळे उदेश प्रसंगानुरूप आठवून स्वत:च्या मनाची समजूत घालत बसायची, एवढ्यासाठीच ह्या उपदेशांचं प्रयोजन असावं असं मला आताशा वाटत चाललंय..! या पार्श्वभुमीवर खरं सुभाषित ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ हेच असावं.

मनापासून केलेल्या कामाचं मधूर फळ मिळतंच मिळतं, हे सुभाषित आठवत मन लावून काम करायचं आणि ते ‘मन’भर काम समाप्त झाल्यानंतर मिळणारं कणभर फळ पाह्यलं, की मग दुसरं सुभाषित, ‘करम किये जा फल की इच्छा मत कर ऐ इन्सान’ असं म्हणत, स्वत:च्या मनाची समजूत घालून, ‘मनापासून केलेल्या कामाचं फळ मिळतं’ हे पहिलं सुभाषित आठवत स्वत:ला पुन्हा नवीन कामाला जुंपून घ्यायचं आणि पुन्हा काही काळाने दुसरं सुभाषित आठवत, पुन्हा मनाची समजूत घालायत बसायचं, हेच चक्र चालू असताना आजुबाजूला दिसतं. मी चुकत असेन कदाचित, पण माझा अनुभव मात्र असाच आहे.

व्यवहारी जगात सुभाषितांप्रमाणे वागणारांच्या नशीबी सोटाच येतो. सुभाषितं ही कालनिर्णयप्रमाणे भितीवरीच शोभतात, हा वागण्यात नाही. वरची दोन्ही सुभाषितं, स्वार्थी माणसांनी भोळ्या माणसांच्या मनाच्या समजुतीसाठी तयार केलेली असावीत, असं माझ्या वाटण्यावरची माझी श्रद्धा अधिक पक्की होऊ लागते..!

-नितीन अनंत

9321811091

14.05.2019

Advertisements

मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स-

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा –

मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स-

मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता. ‘४ मर्यादित’चा तो संपूर्ण रूट माझा पाठ झाला होता. आजही मी कधी संधी मिळाल्यास, त्या रुटवरून प्रवास करतो. फक्त बसच्या ऐवजी मोटरसायकलने. आता हा रूट आपलं रुपडं बदलत चाललाय, पण तो अजूनही मला माझं लहानपण काही क्षणांसाठी मिळवून देत असतो.

पुढे मी जेंव्हा एकट्याने प्रवास करायला सुरुवात केली, तेंव्हा मग बसच्या ऐवजी ट्रेनने प्रवास करू लागलो. लालबागला मामाकडे जाताना दादरला उतरून मार्ग बदलायचा आणि करी रोड किंवा चिंचपोकळीला उतरायचं. मामाच्या घरापासून चिंचपोकळी स्टेशन अगदी जवळ, पण कधीतरी मामाकडे ‘भारतमाता’ समोरच्या कोपऱ्यावरच्या ‘श्रीकृष्ण दुग्धालया’तून काहीतरी खाऊ घेऊन जाण्याची आईची आज्ञा असे, तेंव्हा करी रोडला उतरायचं आणि श्रीकृष्णला भेट देऊन पुढे मामाच्या घरी जायचं..! आता ‘भारतमाता’ तिथेच असली तरी, ‘श्रीकृष्ण’ मात्र किटायर झालंय..

तेंव्हापासूनच चिंचपोकळी आणि करी रोडचं एक वैशिष्ट्य माझ्या मनात ठसलं होतं, ते म्हणजे त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून वरच्या रस्त्यावर बाहेर पडण्यासाठी असलेले रॅम्प्. असा रॅम्प दादरच्या मध्य रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवरही होता. आहे. गम्मत म्हणजे दादर स्टेशन बाहेरच्या पश्चिमेच्या बाजूला, दक्षिण टोकाला असलेल्या फुलबाजाराच्या दारात असणाऱ्या पुलावर लोकांना चढण्यासाठीही रॅम्प होता. आता हा अस्तंगत होऊन तिथे जिना आलाय.

पुढे माझ्या फिरण्याची कक्षा रुंद झाल्यावर, तसाच रॅम्प, पश्चिम रेल्वेवरच्या माटुंगा रोड स्टेशनावरही आत आणि बाहेरच्या रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी असलेला माझ्या लक्षात आलं होत. हार्बर रेल्वेवेवर जाण्याचा प्रसंग आजवरच्या आयुष्यात अगदीच कमी आला, त्यामुळे तिकडच्या स्टेशनांवर असे रॅम्प आहेत की नाही याची मला माहित नाही, परंतु हार्बर आणि मध्य रेल्वेला वरच्या मजल्यावर काटकोनात सांधणाऱ्या सँडहर्स्ट रॉड या दुमजली स्टेशनावरही असा रॅम्प असल्याचं मला पुढे कधीतरी दिसलं. कुर्ल्याला आणि लोअर परेललाही असावा कदाचित, माहित नाही. . ही मोजकी स्टेशन वगळता मला इतरत्र कुठल्याही स्टेशनवर असे रॅप्स दिसलेले नाहीत किंवा असल्यास ते मी पाहिलेले नाहीत.

आणखी एका प्रकारचे लहान रॅम्प जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्मवर असायचे. प्लॅटफॉर्मच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना, आठ-दहा फुटांवर रुळांच्या पातळीत उतरणारे रॅम्प सगळ्याच स्टेशनांवर असायचे, ते आता नष्ट झाले आहेत. हे रॅम्प नष्ट झाल्याने, पूर्वी मला सुताराच्या फरशीच्या धारे सारखे वाटणारे प्लॅटफॉर्म आता लांब जास्त आणि रुंद कमी असणाऱ्या

आयताकार चौकोनी ठोकळ्यांसारखे दिसतात.

जिने बांधण्याचा साधा सोपा पर्याय असूनही, हे असे चढते आणि उतरते रॅम्प का बांधले असावेत, हा प्रश्न माझ्या मनात तेंव्हा पासून मुक्कामाला होता. असे अनेक बिनकामाचे (म्हणजे पैसे मिळवण्यास अगदीच निरुपयोगी असणारे) प्रश्न माझ्या मनात भाड्याने राहत असतात. माझ्या मनात अश्याच भाडेकरूंनी अधिकृत घर बांधलेली आहेत. परवाच त्यापैकी एक भाड्याने राहायला असलेला प्रश्न – ‘चहा; ‘तो’ कि ‘ती’ – हा माझ्यापुरता सोडवून त्याला त्याच हक्ाकच घर मिळवून दिल होत. त्याचा प्रश्न सुटला आणि ‘काही मोजक्याच स्टेशनांवरच्या ह्या रॅम्प्सचं प्रयोजन कायं’, हा प्रश्न, ‘माझीही अडचण सोडावं म्हणत’ हट्टाला पेटला. हा प्रश्न हट्टाला पेटला त्याला कारण असं झालं की, मी हल्ली माझ्या कामानिमित्त माटुंगा रोड स्टेशनला जवळपास दररोज उतरतो. ह्या स्टेशनवर उतरण्यासाठी आणि बाहेरच्या रस्त्यावरही जाण्यासाठी दोन स्वतंत्र रॅम्प्स होते. होते म्हणजे अजूनही आहेत. परंतु ह्या स्टेशनवर नवीन ब्रिज बांधल्याने, प्लॅटफॉरवरून वरच्या पुलाजकडे जाणारा वांद्रे टोकाकडचा रॅम्प प्रवाश्यांसाठी बंद करण्यात आला आहे. हा मजबूत रॅम्प काही दिवसांत आपल्या नजरेआड होऊन, त्याजागी भविष्यात कधीही पडू शकणारा जिना बांधला जाण्याची शक्यता आहे. माटुंग्याला बाहेरच्या पश्चिमेकडल्या रस्त्यावर उतरणारा रॅम्पवमात्र अजून वापरात आहे.

भविष्यात वर उल्लेख केलेल्या स्टेशनांवरचे रॅम्पही असेच नजरेआड होऊ शकतात. हे ऐतिहासिक रॅम्प नजरेआड होण्याच्या पूर्वी, अपंगांची सोय पाहाणं आतासारखं कायद्याने आवश्यक नसतानाही, ते त्याकाळात बांधण्याची आवश्यकता मुळात का पडली असावी, ह्या माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधणं मला आवश्यक वाटलं.

हा असा प्रश्न पाडण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ते काही मोजक्याच स्टेशनांवर आहेत. दादर-करी रॉड-चिंचपोकळी-सँडहर्स्ट रॉड या चौकोनाटाळ्या स्टेशनवर हे रॅम्प्स दिसतात. बाकी उर्वरित सर्व स्टेशनांवर आपल्या नेहेमीच्या परिचयाचे जिने आहेत

कुठल्याही वाहतुकीच्या मार्गावरचे रॅम्प्स, वाहनात सामानाची चढ उत्तर करणे सोयीचे जावे यासाठी असतात, त्याचसाठी ती इथेही असावेत, हे याचं सोप्प उत्तर. वर उल्लेख केलेली ठिकाण पूर्वीच्या गिरणगावातली आहेत. त्यामुळे तिथे सामानाची चढ उत्तर होत असणारच. परंतु यातील सँडहर्स्ट रॉड आणि दादर ही स्टेशन वगळता, करी रोड, चिंचपोकळी आणि माटुंगा रोड ही स्टेशन काही मालाची चढ उत्तर करण्यासाठी फारशी प्रसिद्ध नव्हती. मग इथे रॅम्प्स का, ह्या प्रश्नाचं उत्तर, वरच्या सोप्या उत्तरापलीकडे जाऊन शोधण्याखेरीज पर्याय उरत नाही.

मुंबईचा अभ्यास करताना (पक्षी;मुंबईवरील वाचन करताना. मी अभ्यास करतो हे अनेक तज्ञांच्या पचनी पडत नसल्याने, ‘वाचन करताना’ असा या कंसात खुलासा केला आहे), एक ही सर्व जुनी स्टेशन्स. सुरुवातीच्या काळात बांधली गेलेली. आणखी एक गोष्ट माझ्या सतत लक्षत येत होती, ती ही, की हा सर्व भाग बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या, श्रीमंत पारशी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या आणि एतद्देशीय कामकऱ्यांच्या निवासाचा भाग होता. सर्व व्यापार मुंबई फोर्टमध्ये मर्यादित असल्याने, मोकळी जागा म्हणावी असा हाच परिसर होता. मुंबईच्या गव्हर्नरनेही आपला प्रासाद फोर्टातुन परळला हलवला होता. ब्रिटिश मरिनमधल्या बुखानन नांवाच्या एका बड्या अधिकाऱ्याचा ‘चिंट्झपुगली’ नांवाचा भव्य बंगला चिंचपोकळी स्थानकाच्या परिसरात होता आणि त्यावरूनच ‘चिंचपोकळी’ ह्या स्टेशनचं नामकरण झालं आहे, अशी माहिती डॉ. अरुण टिकेकरांनी त्यांच्या ‘स्थल-काल’ या पुस्तकात दिली आहे. ब्रिटिश गव्हर्नरच एक वीकएंड हाऊस सायनच्या किल्ल्यासमोरच्या डोंगरावर होत, अशीही माहिती डॉ. टिकेकरांनी दिली आहे. माटुंगा स्टेशनच्या पश्चिमेला डेव्हिड ससूननी बांधलेली ब्रिटिशकालीन उद्योग शाळा आहे. चिंचपोकळीच्या पश्मिमेला आर्थर रोडचा तुरुंग तर पूर्वेला भायखळ्याच्या डोंगरीच्या तुरुंग, ह्याच परिसरात हॉस्पिटल्सही मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यातली बरीचशी ब्रिटिशकालीन आहेत. बड्या अधिकाऱ्यांचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा निवासी भाग असल्याने, त्या अधिकाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आपल्या घरापासून फोर्टमधल्या आपल्या कार्यालयात जाण्यासाठी किंवा फोर्टातल्या अधिकाऱ्यांना या परिसरात जाण्या-येण्यासाठी रेल्वे सोयीची असावी आणि रेल्वेत बसण्यासाठी जाताना, आपल्या घरापासून रेल्वेच्या डब्यापर्यंत आपला आणि आपल्या पदाचा आब सांभाळत घोड्यावरून किंवा पालखी-मेण्यांतून थेट प्लॅटफाॅर्मवर जाणं येणं शक्य व्हावं यासाठी, ह्या मोजक्याच स्टेशनांवर ते रॅम्प बांधले असावेत, असं उत्तर मला विचारांती सापडत. ह्या सर्व स्टेशनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे सर्व प्लॅटफार्म्स दुहेरी आहेत. एकाच प्लॅटफाॅर्मवर दोन बाजुंना अप आणि डाऊनला जाणाऱ्या गाडीत बसणं सोयीचं आहे. दोन्ही दिशांना जाणाऱ्या गाड्यांपर्यंत जाण्याचा उद्देश एकाच रॅम्पमधे साध्य होतो.

या स्टेशनांवरचे मोठे रॅम्प खाश्या स्वाऱ्यांसाठी आणि सर्वच फलाटाच्या दोन्ही बाजूंच्या टोकानावर असलेले लहान, रुळांमधे उतरणारे रॅम्पस सामानाची चढ उत्तर करण्यासाठी असावेत. रेल्वेच्या माल डब्यांचं प्रयोजन त्याचसाठी, गाडीच्या दोन बाजूच्या दोन टोकांवर, ड्राइव्हर आणि गार्डच्या निकट असत, ते त्याचमुळे असावं. आजही ते तसंच आहे.

आता घोडे-पालख्या गेल्या. आरामाचं महत्व जाऊन, व्यायमाचं(जबरदस्तीच्या) महत्व वाढलं. त्यामुळे रॅम्प्स संपत आले आणि जिने आले. पुन्हा कालचक्र फिरलं आणि आराम नसला तरी, सोय होणं महत्वाचं वाटलं आणि आता सरकते जीने आले. तरीही इतिहात तसं का होतं, ह्याची उत्सुकता मला होती. ‘बिना कारन कोई बात नही होती’ यावर माझा विश्वास असल्याने, त्याकाळात तसं का होतं ह्याचं उत्तर शोधण्याचा मी केलेला हा एक (माझ्यापुरता)प्रामाणिक प्रयत्न..!!

ही माहिती कुठे नोंदलेली आहे की नाही, त्याची मला माहिती नाही, परंतु ‘काही स्टेशनांवरच रॅम्प्स का’, या प्रश्नाचं माझ्या तर्कबुद्धीने दिलेलं हे उत्तर आहे. त्याचा खरे-खोटेपणा तरासायचं काम मी तुमच्या तर्कबुद्धीवर सोडतो आणि थांबतो..

-©️नितीन साळुंखे

9321811091

09.05.2019

फोटो सौजन्य-

1. इंटरनेट

2. माझा मित्र भरत लालगे

चहा ‘तो’ की ‘ती’?

चहा ‘तो’ की ‘ती’?

‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो, पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. मला ‘चहा; तो की ती’चं उत्तर मिळालं की नाही, ते माहित नाही, पण विचार करायला लावणारी बरीच माहिती मात्र मिळाली. बहुसंख्यांच्या मते चहा पुल्लिंगी आहे, तर चहाला स्त्रिलिंगी समजणारे अल्पमतात आहे.

माझ्या मनात हा प्रश्न उभा राहाण्याचं कारण म्हणजे, मी अगदी मला समजायला लागल्यापासून आमच्या मुंबईच्या घरी ‘ती चहा’ असंच ऐकत म्हणत आलोय. माझ्या मुंबईतल्या मित्र-परिवाराच्या, नातेवाईकांच्या घरातही मी चहाचा उल्लेख स्त्रिलिंगीच ऐकत आलोय. माझ्या मनात चहाचा लिंग बदल झाला, तो मी बॅंकेत नोकरीला लागल्यावर.

माझी बॅंक पुण्याची. मी जरी मुंबंईच्या शाखेत नोकरीला होतो तरी, बॅंकेतले बहुतेक अधिकारी आणि काही कर्मचारी पुण्यातले होते. बॅंकेत मी चहाचा उल्लेख पुल्लिंगी होताना ऐकला आणि माझ्या मनात हा गोंधळ सुरू झाला. मी अनेकांना हा प्रष्न विचारला. पण त्यातील बहुतेकांनी बहुतेकवेळा,”पी ना xxx गपचूप”, अशीच किंया याच अर्थाची उत्तरं दिलं. उरलेल्यांनी मी कामातून गेलेली केस आहे अशा नजरेने माझ्याकडे पाहिलं. मला वाटतं, मी आज हा प्रश्न विचारल्यावर आपल्यापैकी अनेकांनीही माझ्याबद्दल असाच विचार केला असेल आणि तो काही अगदीच चुकीचा आहे असं म्हणता येत नाही. मला असे रिकामटेकडे प्रश्न बरेच पडत असतात..असो. चहाला हे लोक ‘तो’ का म्हणतात हे मला समजलं नाही.

मग मी स्वत:च याचं उत्तर शोधायचा प्रयत्न सुरू केला. माझी आई देवगडची. मालवणी भाषेत बोलणारी. मालवणीत चहा स्त्रिलिंगी. आणखी एक, मालवणी मुलकात चहा बऱ्याचदा खाल्ला जातो, पिला जात नाही. ‘चाय खातं वायच’ हा कोणत्याही वेळी कोणीही कोणालाही विचारावा असा प्रश्न. या प्रश्नाला सहसा ‘नाही’ असं उत्तर मिळत नाही. तर, मालवणीत चहा स्त्रिचं रुप घेऊन येते. मग माझ्या आईच्या बोलण्यातून ती मराठीतही स्त्री होऊनच अवतरलू. मी ओळखत असलेल्या बहुतेक सर्वच मालवणी जनतेत मला चहा स्त्री रुपातच आढळली. काल माझ्या चतु:शब्दी प्रश्नावर आलेल्या कमेंटमधेही हेच आढळून आलं. थोडक्यात मी असं गृहीतक मांडलं, की मालवणीत बाईच्या जन्माला गेलेली चहा, मालवणीतून मराठीत येताना, स्त्री बनूनच आली असावी. हे बरचसं पटण्यासारखं होतं (अर्थात मलाच..!).

पण मग माझ्या सासुरवाडीतही चहा स्त्रीलिॅगीच आहे. माझी सासुरवाडी रत्नागिरीतल्या देवरुखची. गांवातही शुद्ध मराठीतच बोलणारी. नाही म्हणायला त्यांच्यापैकी काहीजणांच्या बोलण्यात ‘नाही’ शब्दाला ‘न्हवं’ असा घाटाची जवळीक सांगणारा शब्द येतो आणि जुन्या स्त्रीया स्वत:साठी ‘येतो’, ‘जातो’, ‘खातो’ अशी पुरुषासाठीची क्रियापदं वापरताना मला दिसल्या, पण ते अपवादात्मकच. पण इकडेही चहा मात्र ‘ती’च होती. मालवणीत चहा स्त्रिलिंगी, म्हणून मालवणी माणसाच्या मुखातून मराठीतही चहा ‘ती’ म्हणूनच अवतरली, हे पटतंय न पटतंय तोच, शुद्ध मराठीत बोलणाऱ्या माझ्या सासुरवाडीच्या लोकांतही चा ‘ती’च का, असा प्रश्न माझ्या डोक्यात उभा राहीला आणि पुन्हा मी गोंधळलो.

माझ्या त्या पोस्टवर बऱ्याचजणांनी जरी ‘तो’च्या बाजूने मतदान केलेलं असलं तरी, व्यवहारीक जीवनात मला नेहेमी ‘ती’ चहाच भेटलेली (‘भेटणं’ हा शब्द अनेकजण सरसकट ‘मिळालं’ या अर्थाने वापरताना दिसतात. ‘भेटते’ती व्यक्ती, ‘मिळतं’ ती वस्तू किंवा हरवलेलं काही, अशा ढोबळ अर्थाने हे दोन शब्द आहेत. मी या लेखात ‘चहा’ला एक व्यक्ती मानतोय म्हणून ‘भेटलेली’ असा शब्द वापरलाय)आहे. मग मी याचं उत्तर स्वत:च शोधायचं ठरवलं..स्वत:च म्हणजे स्वत:ची कल्पनाशक्ती ताणून..!!

माझ्या मते चहा महिलाच असावी. चहा हे उत्तेजक पेय आहे असं सगळे म्हणतात आणि सर्वत्र सहज उपलब्ध असलेली सर्वच उत्तेजक पेयं स्त्रिलिंगीच आहेत. उदा. काॅफी, बियर, दारू इत्यादी. या पेयांचं नांव जरी उच्चारलं, तरी पुरुष, मग तो कोणत्याही वयाचा असो, उत्तेजीत होतो. तसाच तो स्त्रीयांचा उल्लेख जरी झाला, तरी उत्तेजीत होतोच. तसं स्त्रियांचं उत्तेजक पेयांच्या बाबतीत होत नसावं. पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांचं तसं होतं की नाही, ते मला सांगता येत नाही. होत असलं तरी पुरुषांइतकं सातत्य त्यात नसावं. तस्मात चहा स्त्रीच असावी.

आपला समाज पुरुषप्रधान असल्याने उत्तेजना किंवा स्फुर्ती, या चीजा पुरुषांना आवश्यक असतात, असं समजलं जातं. स्त्रियांच्या तुलनेत पुरूष असतातही जास्त चहाभोक्ते. मी स्वत: चहा कितीही वेळ आणि दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी सहज आणि आनंदाने पिऊ शकतो. पिऊ शकतो कशाला, पितोही. असेच अनेक चहाप्रेमी मला माहित आहेत.

मला केवळ चहाच नाही, तर चहाची वेळ झाल्यावर एक अनावर हुरहूर लागून राहाते. लहानपणी आई दुपारी ३-३.३० ला चहा करायची. दुपारी शाळेतून आल्यावर जेवून झोपायची माझी सवय अद्यापही कायम आहे. बॅंकेच्या नोकरीत असतानाही मी दुपारी तास-दोन तास झोपायचो(मीच कशाला सगळेच झोपायचे. कारण बॅंक सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन वेळात भरायची. मधले दोन-तीन तास जेवणाची सुट्टी..!) लहानपणी चहाची वेळ झाली की, आपसूक जाग यायची. आई स्टोव्ह पेटवण्याच्या आवाजाची चाहूल घेत अंथरुणात पडून राहायचं. स्टोव्ह पेटल्याचा फरफर आवाज आला की चहाची पहिली हाळी मिळायची. मग स्टोव्हवर अॅल्युमिनियमच्या लहानश्या ताटलीत तंबाखू भाजल्याचा उग्र दरवळ घरभर घुमायचा. (तंबाखूची मशेरी हे त्या काळच्या मालवणी स्त्रीयांचं व्यवच्छेदक लक्षण). आता पुढची पाळी चहाची ह्याची आता खात्री व्हायची. तोवर अंथरुणातच पडून राहायचं.

आईचं मुखमार्जन झालं, की मग चहाच्या पातेल्याचा तो चीरपरीचित आवज कानी पडायचा. अगदू त्याच आकाराचं किंवा त्याच प्रकारचं पातेलं असलं तरी, कानाला चहाचं पातेलं आणि तशाच प्रकारचं दुसरं पातेलं, यातला फरक ठळकपणे जाणवायचा. एकदा का तो स्वर्गीय आवाज ऐकली, की मग अंगभर जो काय उत्साह संचारायचा, त्याचं वर्नणं करणं केवळ अशक्य..! कितीही कोलाहल असू देत, आईच्या चहाच्या भांड्याचा तो कोलाहलाच्या मानाने क्षीण असलेला आवाज बरोबर माझ्या कानाचा वेध घ्यायचा. तो आवाज अजुनही कानात घुमतोय. तो आवाज ऐकला की आता लगेच चहा प्यायला मिळणार या आनंदाने मग अंथरुणातून उठून तडक चहाला बसायचं.

ही माझी बालपणाची सवय अद्यापही कायम आहे. नंतर काॅलेजच्या कॅंन्टीनमधल्या चहाची किणकीण इतर भांड्यांच्या आवाजातूनही मला स्पष्टपणे ऐकू यायची. आॅफिसात येणाऱ्या चहाव्ल्याच्या किटलीवरून तो रोजचा चहावाला की दुसराच कोणी हे देखील मला बरोबर ओळखता येतो. अर्थात हे फक्त चहाच्या बाबतीतच होतं, इतर बाबतीत नाही.

प्रेयसीची चाहूल घेणं आणि चहाची ‘चा’हूल घेणं मला सारखंच हुरहूर लावणारं वाटतं. प्रेयसीचा आवाज किंवा पायरव कितीही कलकलातून ऐकायला येतोच. तो आवाज ऐकल्यावर लागणारी एक अनामिक हुरहूर, लवकरच आपली भेट होणार याच्या आनंदाने अंगभर दाटून येणारा उत्साह..! एवढं होऊन ती प्रत्यक्ष भेटल्यावरचा आनंद आणि न भेटल्यास होणारी चिडचीड मला चहाबाबतही अनुभवायला येते.

चहाच्या संदर्भातही माझी भावना प्रेयसीपेक्षा कमी नाही. ‘ती’च्याचहाच्या नुसत्वा उल्लेखानेही मन मोहरुन येते. एक वेगळीच तरतरी येते. चेहेरा लाल गोरा होतो. अगदी तस्संच मला चहामुळे होतं. फरक एकच. चहा सारखी प्यावीशी वाटते. प्यायला मिळतेही. (वयाने वाढलो तरी) प्रेयसीही सारखी यावीशी वाटते, पण येत नाही (बघतही नाही म्हणा कुणी हल्ली, येणं दूरच राहीलं). येवढा एक जालीम फरक सोडला, तर चहा आणि प्रेयसी सारखीच. म्हणून मला तरी चहा ‘ती’ असावी असं वाटतं..

-नितीन साळुंखे

9321811091

06.05.2019

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी;एक चिंतन-

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी;एक चिंतन-

वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा तो जास्त ‘देशीय’ असतो आणि म्हणून तर प्रांतीय आंदोलने महाराष्ट्राच्या मातीत दीर्घकाळ यशस्वी होवू शकत नाहीत. ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले’ ही भावना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजतागायत उराशी जपलेली आहे. आणि जेंव्हा जेंव्हा राष्ट् अडचणीत येतं, तेंव्हा तेंव्हा राष्ट्राच्या हाकेला प्रथम ओ जातो तो महाराष्ट्राचाच.

अश्या ह्या कडव्या राष्ट्राभिमानी महाराष्ट्राचा मानभंग केलेला मात्र महाराष्ट्राची माती कधीच खपवून घेत नाही. याचा अर्थ असा नाही, की ती उठसुट आपल्या हक्कासाठी पेटून उठते. मराठी माती वाट पाहाते, अन्याय झाला असल्यास, करणाराला तो निवारणाची संधी देते. अगदी शिशुपालासारखे शंभर अपराध भरल्यानंतरच ती प्रतिकाराला सिद्ध होते ती मात्र सोक्षमोक्ष लावायचाच या जिद्दीने. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रास्त मागणीत दुजाभाव होतो आहे हे लक्षात येताच मराठी माणसाने स्वत:चे प्राण देऊन त्याचा प्रतिकार केला आणि स्वत:वर अन्याय होऊ दिला नाही.

असा हा कडवा राष्ट्राभिमानी मराठी माणूस आपली मातृभाषा मराठीसाठी आग्रही का होत नाही हेच कळत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत, मराठीजनच आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यामाच्या शाळेत घालण्यासाठी वाटेल ते करत आहेत. मुलांना इंग्रजी संभाषण यावं यासाठी घरी-दारी त्याच्याशी आग्रहाने इंग्रजीत संवाद करत आहेत. इंग्रजीच का, सर्वच भाषा बोलायला आल्या पाहिजेत असं माझंही ठाम मत आहे पण याचा अर्थ असा नव्हे की त्यासाठी मातृभाषा मराठीचा त्याग करायला(च) हवा.

मराठी माणसाचा आपला जो कडवा देशाभिमान, जी वैभवशाली सांस्कृतिक आणि महान सामरीक परंपरा आहे ना, ती आपसुकपणे आणि सहजतेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मातृभाषा हे एकमेंव उपलब्ध साधन आहे हे आपल्याला समजत का नाहीय? आपली ‘मराठी’भाषा मेली तर तो देशाच्या बरोबरीने कोणतही संकट झेलण्यासाठी छाती पुढे ताणून उभा राहीलेला महाराष्ट्र पुन्हा दिसणार नाही अशी मला चिंता वाटते. मुलांना मराठी भाषाच समजली नाही तर नसानसांत स्फुल्लिंग चेतवणाऱ्या कविता, रक्त सळसळवणारे शाहीरांचे पोवाडे, स्फुर्ती देणारी भाषणे-व्याख्याने मराठी मुलांच्या मनाला कशी भिडणार?

‘खबरदार जर टांच मारूनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या’ या कवितेतील त्या लहान मुलाचा जोश आणि शत्रुप्रतीचा त्वेष कवितेच्या त्या ओळींतून मुलांच्या मना-अंगात भिनण्यासाठी, त्या शब्दांचा अर्थ तर मुलांना कळायला हवा..! आणि तो मराठी भाषाच मुलांना आली नाही, येऊ दिली नाही, तर त्यांना कळायचा कसा. मग त्याच्या तो जोश निर्माणच कसा व्हायचा..? नविन पिढीला दोष देऊन काहीच उपयोग नाही, हा दोष त्या पिढीला घडवणाऱ्यांचा म्हणजे आपला आहे.

केवळ इंग्रजी उत्तम बोलता यावं यामागे त्याला चांगली नोकरी लागावी, परदेशात मुलाने जावं हाच बहुतेकांचा उद्देश असतो पण या संकुचित विचारापायी आपण महाराष्ट्राच्या, देशाच्याआणि मुलाच्या भावविश्वाचा खुन करतोय हे आपल्या लक्षात का येत नाहीय? मुलांचं भावविश्व विकसित होण्यासाठी मातृभाषेची बैठक पक्की लागते. ही बैठक पक्की असली का जगातिल कोणतीही भाषा वा गोष्ट असाध्य नसते ही साधी गोष्ट ज्या दिवशी मराठी माणसाला समजेल तो मराहाराष्ट्रासाठी गौरवाचा दिवस असेल आणि तो सुदिन लवकरच यावा अशी तुम्हा सर्वांप्रती प्रार्थना..!!

जय हिन्द, जय महाराष्ट्र..!!

-नितीन साळुंखे

9321811091

इंद्रजीत खांबे; निराकारातून आकाराकडे..!!

आता नक्की आठवत नाही, पण मार्च महिन्याची २० किंवा २२ तारीख असावी. ‘लोकसत्ते’त ‘कणकवलीच्या छायाचित्रकाराचं जगभरात कौतुक’ ही बातमी पाहिली. कणकवली म्हणजे माझ्या सिंधुदुर्गातलं. गांवची बातमी म्हटली, की मी ती वाचतोच. मी ती बातमी वाचली. कणकवलीतले छायाचित्रकार श्री. इंद्रजीत खांबे यांना ‘अॅपल’ या जगप्रसिद्ध अमेरीकन कंपनीकडून, त्यांच्यासाठी फोटो काढण्यासाठी करारबद्ध केल्याची ती बातमी होती. ‘अॅपलने करारबद्ध केलेले, ते देशातील एकमेंव छायाचित्रकार आहेत’ असाही गौरवोद्गार त्या बातमीत काढलेला होता.

मी कायमस्वरुपी मुंबईत मुक्कामाला असलो तरी, माझं मूळ असलेल्या सिंधुदुर्गातल्या कला जगताशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. मला मुळातच कलांची आवड असल्याने, एखाद्या कलावंताशी ओळख असणं, हा मी माझा बहुमान समजतो. कला याचा अर्थ माणसाला व्यक्त होण्यास वाव देणारं लेखन, कवीता, चित्र-शिल्प-नाट्य इत्यादी कोणतंही माध्यम. सिंधुदुर्गातल्या अशा बहुतेक क्षेत्रातल्या कलावंतांना मी ओळखतो, पण इंद्रजीत खांबे हे नांव मी प्रथमच ऐकलं होतं आणि ते ही फोटोग्राफी क्षेत्रातलं..!

सिंधुदुर्गात आमचा चारचौघांपेक्षा वेगळा विचार करणारा, ‘आम्ही बॅचलर’ हा एक व्हाट्सअॅप ग्रूप आहे. ‘दै. तरुण भारत’चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमूख श्री. विजय शेट्टी या कल्पक माणसाच्या डोक्यातून ह्या ग्रुपने जन्म घेतला आहे. या ग्रुपमधले बहुतेक सर्वच सदस्य कुठल्या न कुठल्या क्षेत्रात नांव राखून असलेले आहेत. प्रत्येकाचा पिंड एकमेंकांपासून अगदी भिन्न, मात्र दुसऱ्याच्या विचारांचा आदर करण्याचा स्वभाव मात्र सारखा. या समूहातील बहुसंख्य सदस्य काम-व्यवसायात विविध क्षेत्रात असले तरी कलागताशी नजिकचा संबंध ठेवून असणारे. म्हणून मी या समूहात ‘इंद्रजीत खांबे कोण’ अशी चवकशी केली. दुसऱ्या क्षणाला अॅडव्होकेट विलास परबांनी इंद्रजीत खांबेंची माहिती व खांबेंचा नंबर पोस्ट केला. इकडे त्याच ग्रुपातला, परंतु माझा जुना दोस्त बाळू मेस्त्रीने मला माझ्या वैयक्तिक नंबरवर इंद्रजीत खांबेंचा नंबर पाठवला. मी या ग्रुपवर इंद्रदीतना भेटायची इच्छा व्यक्त केली. अशाच स्वरुपाची इच्छा आमच्या ग्रुपमधील इतरांनीही व्यक्त केली आणि पुढच्या काही वेळातच अॅड. विलास परब आणि श्री. विदय शेट्टीनी, कणकवलीत विजय सावंतांच्या घरात १४ एप्रिलला इंद्रजीत खांबेंसोबत आमच्या गप्पा गोष्टींचा एक लहानसा कार्यक्रम आयोजित केला. आमच्या ग्रुपमधल्या अनेकांना या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती, पण त्यांच्या त्यांच्या काही अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत. शेवटी आम्ही पाच-सहाजण या कार्यक्रमास गेलो.

इंद्रजीत खांबे त्यांच्या पत्नीसह आले होते. इंद्रजीतशी गप्पांची सुरुवात झाली आणि उलगडत गेला इंद्रजीतचा सिंधुदुर्गातल्या केशरी आंब्यापासून सुरू झालेला लालबूंद अमेरीकन ‘अॅपल’ पर्यंतचा प्रवास..

कला जन्म घेते, ती मनाच्या अस्वस्थ अवस्थेत. इंद्रजीतची फोटोग्राफीची सुरुवातही अशीच अस्वस्थतेतून झाली. इंद्रजीतचा स्वत:चा व्यवसाय होता. चार पाच माणसं त्याच्या हाताखाली काम करत होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर, चांगलं बस्तान असलेला व्यवसाय असुनही, काही तरी वेगळं करायची उर्मी अधून-मधून त्याच्या मनात उसळी मारायची, पण ती तेवढ्यापुरतीच. पुढे पुढे ही उसळी त्याला स्वस्थ बसू देईना आणि मग काय करावं याचा विचार सुरु असतानाच, त्याच्या मनाने नाटक करायचा विचार केला. खरं तर लौकीकार्थाच्या दृष्टीने हा अविचारच. पण अविचाराने वागणार नाही, तो हाडाचा कलावंतच नाही, असं मी मानतो. विचार करुन कला प्रसन्न होत नसते. इंद्रजीतचंही तसंच झालं..!

इंद्रजीतने कणकवलीचं आचरेकर प्रतिष्ठान जाॅईन केलं आणि नाटकं सुरू झाली. काहा दिवस गेल्यावर, त्याला तिथेही स्वास्थ्य लाभेना. एखादं नाटक करायचं ठरलं, की त्याच्या फार तर महिनानाभर आधी स्क्रिप्ट शोधण्यापासून तयारी व्हायची. स्क्रिप्टही कमीत कमी स्त्री भुमिका असलेली पाहायची, कारण सर्वच हौशी कलावंत असल्यामुळे, ते आपापल्या सोयीने तालमींकरता येणार. त्यात स्त्रीयांच्या आणखीनच अडचणी. एवढं सगळ केल्यावर उगाच केल्यासारखं म्हणून नाटक घालायचं, हे काही इंद्रजीतला जमेना. त्याची स्वप्न मोठी होती. ‘अविष्कार’ किंवा अतुल पेठेंसारख त्याला नाटक जगायचं होतं, केवळ करायचं नव्हतं. पण ते शक्य होईना, काही दिवस झाल्यावर तो कंटाळला आणि नाटकाच्या मार्गाला गुडबाय केलं आणि पुन्हा आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागला..

पुन्हा तो व्यवसायात रमला तरी, त्यात मन काही रमत नव्हतं. काही तरी करायचं, पण काय ते सुचेना. असंच एकदा विचार करत मोबाईलशी खेळत असताना, त्याच्या डोक्यात फोटोग्राफी करायचं अचानक क्लिक झालं. फोटोग्राफीत आपण आपल्या मनाचे मालक. कुठला ग्रुप नको, की कुणी सवंगडी नको. कुणावर अवलंबत्व नाही, हा मोठा फायदा. आपल्या वेळेनुसार, सवडीनुसार फोटो काढावेत, मनाला वाटेल त्या ठिकाणी जाऊन फोटो काढावेत. बस्स, आता पक्क ठरलं, फोटोग्राफीच करायची आणि इंद्रजीत सुटला. अचानक मन शातं झालं. देवाने आपल्या बाजुने कौल दिला, की कसं वाटतं, तसंच इंग्रजीतला वाटलं. तनामनात आत्मविश्वास भरून आला आणि त्या नंतरच्या लगेचंच काही दिवसात इंद्रजीत कॅमेरा घेऊन निघाला, कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपलं स्वत:चंच मन टिपायला. साल होतं २०१२..!

इंद्रजीतने पहिला दोरा केला तो पंढरपूर, सोलापूर, बीड, म्हसवड ह्या दुष्काळी भागाचा. स्वत:च्या मनाने जगायचं, तर ‘दुष्काळा’चा सामना करावा लागतो, त्याचा हा जणू संकेत होता. ह्या दौऱ्यात इंद्रजीतने अनेक छायचित्र टिपली. पंढरपूरला त्याला वयाने जराजर्जर झालेले आजोबा भेटले. ‘पुता, आमच्या नशिबीच दुष्काळ लिवलेला हाय बग, आता त्या पांडुरंगाचाच आसरा’ असं म्हणत निराश झालेले. त्यांच्या नशिबातला दुष्काळ त्यांच्या भेगाळलेल्या कपाळावर स्वच्छ लिहिलेला इंद्रजीतला दिसला आणि त्याही परिस्थितीत त्यांचा ज्यावर दुर्दम्य विश्वास होता, तो त्यांचा त्राता पांडुरंगही तिथेच वास करुन असलेला दिसला. ‘अत्यंत बोलकं हे छायाचित्र सोबत दिलेलं आहे). दुष्काळाचे त्याने टिपलेले असे अनेक फोटो आम्हाला इंद्रजीतने दाखवले.

पुढे त्याने केलेल्या फोटोच्या अनेक सिरिज त्याने दाखवल्या. त्या त्या फोटोमागची त्याची कल्पना आणि भावनाही त्याने उलगडून दाखवली. स्वत:च्या पत्नीच्या गरेदरपणाच्या सातव्या महिन्यात उद्भवलेल्या अडचणींचा सर्व प्रवास इंद्रजीतने ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’ या शीर्षकाखाली कॅमेराबद्ध केलेला त्याने आम्हाला दाखवला..मला त्यातलं फार काही कळलं नसलं तरी, या सिरिजचं शीर्षक मात्र जाम आवडलं, ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’..! स्त्रिची प्रसूती म्हणजे प्रश्नचिन्हच असतं. कशी होईल इथपासून ते काय होईल आणि जे होईल, ते व्यवस्थीत असेल ना, इथपर्यंत अनेक प्रश्न या दरम्यान सतावत असतात. शिवाय पोटुशी स्त्री, एका बाजूनं पाहिली असता, दिसतेही प्रश्नचिन्हासारखी..! त्यात त्यांच्या पत्नीच्या गर्भारपणात काही अडचणी निर्माण झाल्याने, प्रश्नचिन्हाखाली असलेलं टिंब जरा जास्तच गडद झालेलं होतं. इंद्रजीतच्या पत्नीचा व त्यांचा स्वत:चाही ह्या गडद टिंबाच्या प्रश्नचिन्हामागे धावण्याचा प्रवास, कृष्न-धवल फोटोंत त्यांनी फार सुरेख पकडला होता..! रिझल्ट लागेपर्यंत त्यांच्या मनातही कृष्ण-धवल भावनाच होत्या, त्याचंच प्रतिबिंब ती छायचित्र होती..!

या व्यतिरिक्त मातीतून जन्म घेणारे आणि त्याच मातील पाठ लागू नये याची काळजी घेणारे कोल्हापूरच्या तालमीतले मल्ल, दापोली नजिकच्या बुधल गांवातल्या, घरबांधणीपासून मासेमारी करणाऱ्या महिला, ‘हिरवी’ गांय अशा अनेक सिरिज, त्यांच्या जन्मकथा आम्हाला इंद्रजीतने दाखवल्या, उलगडून सांगितल्या. शेवटी ती त्याची प्रसिद्ध सिरिज आली. आमच्या सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत श्री. ओमप्रकाश चव्हाण यांच्यावर केलेली..

ओमप्रकाश चव्हाण हे सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत. स्त्री भुमिका करणारे. यांच्यासोबत इंद्रजीत सतत २-२.५ वर्ष सावलीसारखे वावरले. त्यांचेअसंख्य फोटो काढले. नेहेमीचं आयुष्य जगताना काढले, तसंच भुमिकेत शिरल्यानंतर त्यांच्यात झालेला अमुलाग्र बदलही त्यांनी नजाकतीने टिपला. जातीवंत पुरुषाचं रुपांतर, तेवढ्याच जातीवंत स्त्रीमधे होतानाचे इंद्रजीत साक्षिदार आहेत. ओमप्रकाश चव्हाण एकदा का स्त्रिवेशात शिरले, की त्यांच्यातला पुरुष जणू लुप्त व्हायचा. इतका की, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या वावरण्यात, कपडे बदलण्यात एक स्त्रीसुलभ सहजता यायची. ‘हा पुरूष आहे’ हे सांगुनही तिऱ्हाईताने ते मान्य केलं नसतं, एवढे ओमप्रकाश अमुलाग्र बदलून जायचे. ओमप्रकाशजींचं हे एका क्षणात होणारं ट्रान्सफाॅर्मेशन इंद्रजीतने अनेकदा अनुभवलं आणि आलेला प्रयेक अनुभव पहिल्यापेक्षा अद्भूत होता..

ओमप्रकाशजींचा पुरु-स्त्री-पुरुषात होणारा प्रवास उलगडून दाखवणारा एक आणि एकमेंव फोटो इंग्रजीतना त्यांच्यासोबतच्या दोन-अडीच वर्षांत टिपता आला. तसा फोटो पुन्हा मिळाला नाही. तो फोटो सोबत देतोय.

ह्या फोटोत भुमिकेतून बाहेर आल्यानंतर ओमप्रकाश साडी सोडताना दिसतो. अंगावरचे दागीने अद्याप उतरवलेले नाहीत. अंगात ब्लाऊज नाही. ह्या फोटोतील ओमप्रकाशजींची साडी बदलताना जी सावली भिंतीवर पडलीय, त्यात या फोटोचं आणि ओमप्रकाशजींच्या जगण्याचं अवघं मर्म इंद्रजीतने नेमकं पकडलं आहे. इद्रजीतच्या एकूणच फोटोंत सावल्यांचा खेळ जास्त बोलका आहे. पण ओमप्रकाशजींची अवघी कहाणी सांगणारा हा फोटो मला जास्त बोलका वाटला..साडी सोडता सोडता, त्यांच्यातली स्त्री हळुहळू झाड सोडत असताना त्या स्टील फोटोत मला दिसली..साडी सोडतानाच्या ओमप्रकशजींच्या भिंतीवरच्या सावलीत, स्त्री शरिराची सगळी वळणं उतरलीयतं. नुसती सावली पाह्यली असता, ती स्त्रीच आहे असं कुणालाही वाटेल. परंतु फोटोतल्या ओमप्रकाशजींच्या छातीवरचं जावळ त्यांची स्त्री असण्यापासूनची फारकत दिसतेय..

विज्ञानातलं एक महत्वाचं तत्व या फोटोत मला दिसलं. पुरुषात x आणी y क्रोमोझोन्स असतात आणि स्त्रीमधे दोन x, असं विज्ञान सांगते. याचा अर्थ सर्व पुरषांत एक सुप्त स्त्री असतेच, असा मी घेतो आणि नेमकं तेच इंद्रजीतने टिपलेल्या ओमप्रकाशजींच्या या फोटोत मला दिसलं. पुरुषांत स्त्री असते म्हणूनच अर्धनारी-नटेश्वर होतो, सिता-राम होतो, राधा-कृष्ण होतो, उमा-महेश होतो. ही नांव उलटी वाचली जाऊ शकत नाहीत. ओमप्रकाशींचं हे स्त्री आणि पुरुषामधलं, दोघांचाही आब राखूनचं, जगण दाखवलेला हा इंद्रजीतने टिपलेला फोटो, मला सर्वात जास्त आवडला..!!

त्या दोन-तीन तासांत काही तरी वेगळं करु पाहाणाऱ्या, कणकवलीसारख्या कोकणतील एका छोट्या शहरातील एका अस्वस्थ माणसाचा जगप्रसिद्ध छायाचित्रकारापर्यंत झालेला प्रवास उलगडला. निराकाराकडून आकाराकडे झालेला हा प्रवास सोपा नव्हता. वर कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, स्वत:च्या मनाला न्याय द्यायचा, तर जीवनात दुष्काळ सदृष परिस्थितीला तोंड द्यायची तयारी लागते. तशी तयारी इंद्रजीतने ठेवली, आणि त्याला लहान-लहान गोष्टीतला आनंद दिसू लागला. मग कणकवलीतल्या गडनदीतील दगडांत त्याला कन्याकुमारीचं शिल्प दिसलं आणि सावंतवाडीच्या नरेन्द्र डोंगरात त्यांना कांचनगंगा दिसलं. अशी दिव्य दृष्टी प्रत्येक संवेदनशील कलावंताला आपोआप लाभत असते आणि मग दुष्काळाचा सदैव सुकाळ होतो. इंग्रजीतला अशी दृष्टी लाभलीय..!

सच्ची अस्वस्थता योग्य मार्ग सापडला असता माणसाला किती उंचीवर घेऊन जाऊ शकते, ह्याचं इंद्रजीत हे उत्तम उदाहरण..! काहीतरी करु पाहाणाऱ्या इंद्रजीतचा प्रवास, आणखी छान करु कडे सुरू झाला आहे..

बहुतेक सर्व फोटो त्याने मोबाईलने टिपलेत, हे आम्हाला त्यांने वारंवार सांगुनही खरं वाटेना. यापुढे जाऊन जेंव्हा इंद्रजीतने सांगितलं, की त्याला ‘अॅपल’चं मिळालेलं प्रतिष्ठेचं काम, त्याने मोबाईलवर काढलेल्या फोटोमुळेच मिळालंय, तेंव्हा मला फक्त झीट यायची बाकी होती. इंद्रजीतचं पुढचं म्हणणं, मला अधिक पटलं. तो म्हणाला, की डोक्यात पक्का झालेला विचार जेंव्हा नजरेत उतरतो, तेंव्हा तंत्र आणि साधन दुय्यम ठरतं. तुमचा विचार पक्की असेल, तर तुम्ही साध्या कॅमेऱ्यानेही विष्य स्पष्टपणे मांडणारा फोटो काढू शकता आणि तोच पक्की नसेल, तर मग कितीही महागडा कॅमेरा घ्या, तुम्ही फक्त फोटो काढू शकाल, त्यात मॅटर असेलच असं नाही.

चित्रकार नामानंद मोडक यांनी रेखाटलेलं इंद्रजीतचं फ्रेमबद्ध केलेलं केलेलं अर्कचित्र आम्ही या भेटीची आठवण म्हणून इंद्रजीतला नजर केलं..!

इंद्रजीतने गप्पांचा शेवट अगदी सोप्या भाषेत गहन तत्व सांगून केला. इंद्रजीत म्हणाला, विचार आणि महत्वाचा, तंत्र आणि साधन दुय्यम..! हेच तत्व सर्व कलांना आणि कलावंतांना सारखंच लागू होतं. मला तुरुंगातल्या भिंतींवर महाकाव्य लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आठवले उगाचंच..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

22.04.2019

‘नोटा’;लोकशाहीच्या बाळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल- (उत्तरार्ध)

(उत्तरार्ध)

‘नोटा’;लोकशाहीच्या बाळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल –

‘नोटा’ वापरणारे कोण असतात? माझं मत..!

ज्यांना जो पक्ष आवडतो, त्याना मतदार मतदान करत असतो. काहीजण पक्ष कुठलाही असे, आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करत असतो. अशांना देशापेक्षा जात महत्वाची वाटते. काही आपल्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो. काही पक्षांची पारंपारीक मतं असतात, ती काही झालं तरी त्या पक्षाच्या उमेगवारालाच जातात . पक्षाची ध्येय-धोरणं काय आहेत, त्या ध्येय-धोरणांवर पक्ष चाललाय का, पक्षाचं नेतृत्व कोण आहे, ते कार्यक्षम आहे किंवा नाही, याचा हे मतदार अजिबात विचार करत नाहीत. हे त्या पक्षाच्या आंधळ्या प्रेमात असतात.

विकले गेलेले मतदार हा एक अलीकडच्या काळात उदयाला आलेला मतदारांचा वर्ग. ज्या पक्षाने त्यांना विकत घेतलेलं असतं, त्या पक्षाला मतदान करतात(करतातच असंही नाही). पण ते मतदान करतात. काही लोक काहीच विचार न करता एकदा या पक्षाला, तर दुसऱ्या निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षाला मतदान करत असतात.

या व्यतिरिक्त मतदारांचा आणखी एक वर्ग असतो. हा कुंपणावर बसलेला मतदार. हा हवा पाहून मतदान करतो. हा कोणत्या वेळेला कुठे उडी मारेल हे काही सांगता येत नाही. पैशाने किंवा कुठल्याही किपकोळ आमिषाला बळी पडून मतदान करणाराही हा मतदार असतो. यात पूर्वी अशिक्षित, गरीब वस्त्यांत राहाणारे लोक असत, पण गेल्या काही निवडणुकांतून, अगदी पैसे घेत नसले तरी, सोसायटीत पेव्हर ब्लाॅक्स बसवणाऱ्या किंवा चाळींच्या गल्ल्या सिमेंट-काॅम्क्रिटच्या करुन देणाऱ्या उमेदवाराला सुशिक्षित-उच्चशिक्षित लोकांच्या सोसायट्याही एकगठ्ठा मतदान करताना दिसून येत आहेत. हे समजून-उमजून तत्कालिक स्वार्थाच्या लोभाने केलेलं मतदान.

मग ‘नोटा’ ला मतदान करणारे कोण असतात?

तर, एकंदर राजकारणाला कंटाळलेल्या, सर्वच राजकीय पक्षांबद्दल उदासीन असणारे लोक, काहीच बदल होणार नाही अशा निराशेने घेरलेले लोक, जे पूर्वी मतदानालाच जायचे नाहीत, त्यातले बहुसंख्य मतदार आता मतदानाला आवर्जून जातात, पण ते ‘नोटा’ला मतदान करतात..! असं करून ते देशातील सर्वच रादकीय पक्षांचा आणि ते राबवीत असलेल्या ध्येय-धोरणांता निषेध व्यक्त करत असतात. यापूर्वी राजकीय पक्षांचा निषेध व्यक्त करायचा झाल्यास, आपापसांत बोलून ‘सर्व सारखे’ आहेत असं म्हणत, राजकारण्यांना शेलक्या शिव्या द्यायचं काम खाजगीत चालायचं, ते आता ‘नोटा’च्या माध्यमातून सार्वजनिकरित्या होत आहे. ‘नोटा वापरून आपला राग काढण्यासाठी का होईना, लोक मतदानाला जातात हे महत्वाचं आहे. हा सकारात्मक बदल आहे.

‘मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ठरवून ‘नोटा’ चावापर करणारे दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, जे बहुसंख्येने सत्ताधारी पक्षाचे समर्थक असतात. ह्या प्रकारच्या लोकांत मी आणि माझ्यासारखे लोक येतात. यंदाच्या निवडणुकांतून मी नोटा का वापरणार’, याची माझी कारणं खाली स्पष्ट करत आहे.

सांप्रत सत्तेवर असणाऱ्या सरकारने २०१४ साली सत्तेवर येताना संपूर्णपणे विकासाचा जयघोष करत सत्ता काबीज केली होती. नुसती काबीज केली नव्हती, तर ह्या देशातील सर्वजाती-धर्माच्या, पंथाच्या, भाषेच्या, प्रांताच्या जनतेने त्यांच्या पदरात भरभरून मतांचं दान घातलं होत. जनता विकासाला किती आसुससलेली होती, तेच त्या मतदानातून दिसून आलं होत. मला मी या पक्षाचा समर्थक असल्याचा अभिमान होता. सत्तेवर आल्यानंतरच्या काही वर्षांत, सध्याच्या सरकारने काही चांगल्या योजना आणल्या. नोटाबदली(नोटबंदी) आणि जीएसटीसारखे धाडसी निर्णयही घेतले. नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांत अमलबजावणीतून अक्षम्य चूक होऊनही, त्यावेळी मी सरकारचा उद्देश चांगला असल्याचे सांगत, सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देणारे काही लेखही लिहिले होते. काळा पैसे भारतात परत आणण्याचा निर्णय आणि त्यासाठी स्थापन केली गेलेली स्वतंत्र टीम आणि त्यांनी केलेले प्रयत्न मला सुखावून गेले होते. ( त्यातून प्रत्येकाला १५ लाख मिळतील असं पंतप्रधान कधीही म्हणाले नव्हते. हा विरोधी पक्षांचा आरोप, मी आज सत्ताधारी पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात जाऊनही मी कधीही मान्य करणार नाही.). ‘अच्छे दिन आयेंगे” याविषयी माझ्या मनात जराही शंका नव्हती.

पण आज पांच वर्षानंतर जे चित्र दिसतंय, ते निराशाजनक आहे. सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांच्या योजनांच्या यशापयशाबद्दल प्रचार सभांत चकार शब्द नाही. त्यामुळे किती लोकांचं जीवनमान सुधारलं, किती व्यवसाय नव्याने सुरु झाले, किती जाणं नोकऱ्या मिळाल्या, शौचालय बांधली, परंतु त्यातील पाण्याच्या व्यवस्थेचं काय, आताच्या निवडणुकांत फिरणाऱ्या प्रचंड काळ्या पैशांचा आणि नोटबंदीचा नेमका संबंध काय, देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, बेरोजगारी, शेतकऱ्यांना आश्वासन दिलेला किमान हमी भाव आणि अशाच इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल हे लोक प्रचार सभांतून ब्र ही काढताना दिसत नाहीत. यातील. यातील किती योजना सफल झाल्या, किती असफल झाल्या, त्याची कारणं देऊन लोकांना प्रचारातून विश्वासात घेणं अपेक्षित होत. लोक शहाणे असतात आणि पाच वर्षात एवढ्या मोठ्या देशाचं चित्र कोणतंही सरकार बदलू शकत नाही, हे त्यांना समजत असतं. परंतु त्यावर काहीच बोललं जात नाही, हे अनाकलनीय आहे. या उलट सर्व प्रचार केंद्रित झालेला दिसतोय, तो पाकिस्तान या नगण्य शत्रूच्या उभ्या केलेल्या बागूलबूवावर. जनतेच्या देशभक्तीच्या भावनांना जागृत करून, सैनिकांच्या बलिदानावर मतांचा जोगवा मागण्यांवर. पाकिस्तानच्या आडोश्याखाली, मुसलमानांची भीती दाखवून हिंदू मतांचं करण्यात येणाऱ्या ध्रुवीकरणावर. याचा अर्थ सरकारने सुरु केलेल्या काही किंवा सर्वच योजना फसल्या आहेत असा घ्यायचा का?

भ्रष्टाचार निर्मूलनाचा जयघोष करत, सत्तेवर आलेल्या या सरकारच्या काळात सरकारवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही हे जरी खरं असलं तरी, सरकारं बनतात आणि बिघडतात, ते त्या ठिकाणी असलेल्या बेहिशोबी पैशांसाठीच, हे न जाणण्याइतकी जनता काही आता दूधखुळी राहिलेली नाही. सत्तेत जायची सर्वांचीच जी चढाओढ असते, ती समाजसेवेसाठी नसून, समाजसेवेच्या नांवाखाली भ्रष्टाचार करण्यासाठीच असते हे सर्वाना समजतं. आरोप झालेला नाही याचा अर्थ भ्रष्टाचार नाही, असा नाही. तो असतोच. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी तो होतच राहतो. मग तो पक्षनिधीच्या नांवाखाली का झालेला असेना..! भ्रष्टाचाराची जर एवढी चाड असती, तर पक्षाला मिळणाऱ्या निधीची माहिती, माहितीच्या अधिकाराखाली का आणत नाहीत, याच उत्तर कुणी देत नाही. मला म्हणायचंस, ते निम्न स्तरावरील भ्रष्टाचारासंबंधी. खालच्या स्तरावरच्या सरकारी आस्थापना, ज्याच्याशी सामान्य लोकांचा रोजचा संबंध येतो, त्या सरकारी आस्थापनातील भ्रष्टाचार किती कमी झालेला आहे, हे ठामपणे सांगता येत नाही. उलट वाढलाय. जे काम हजार रुपयांत व्हायचं, ते आता दोन हजारच्याखाली होत नाही, हा सामान्य लोकांचा अनुभव आहे. जनतेला कमी होणं अपेक्षित असतो, तो हा भ्रष्टाचार. गेल्या पांच वर्षात एकही भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा झाल्याचे (श्री. छगन भुजबळ सोडून. परंतु तो भ्रष्टाचारापेक्षाही राजकीय बळी होता, असं माझं मत आहे.) उदाहरण नाही, उलट भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना निवृत्तीपश्चात मुदतवाढ दिली जात असल्याची उदाहरणं दिसतात. जे भ्रष्टाचारी गत पाच वर्षांत तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे राहीलेले दिसणं अपेक्षित होते, तेच उजळमाथ्याने निवडणुकीची तिकटं घेऊन मतं मागण्याच्या रांगेत उभे असल्याचंही दिसतं. भ्रष्टाचारावर या प्रचारात काहीच बोललं जात नाही, हे मला तरी न पटण्यासारखं आहे.

वरील काही महत्वाचे मुद्दे सोडून सध्या प्रचारात असलेल्या मुद्द्यावर माझा आक्षेप आहे. भारतासारख्या जागतिक महाशक्ती होऊ पाहणाऱ्या खंडप्राय देशाच्या केंद्रीय सरकारच्या निवडणुकीत, केवळ आणि केवळ विकासाचे मुद्दे हवेत. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे हे स्पष्ट होण्यासाठी विकासाचे मुद्दे महत्वाचे असतात. त्यावर जनमत बनवणं आणि त्यासाठी मतदान मागणं गरजेचं असतं. २०१४ सालच्या निवडणुकीत हे झालं होतं आणि सर्व जनतेने बहुमताचं दान सरकारच्या पदरात टाकलं होतं, हे विसरून चालणार नाही. राममंदिर, गोमांस भक्षण, त्या नांवाखाली केलं जाणार मॉब लिंचिंग, कालचाच श्रीमती प्रज्ञा सिंहाचं हेमंत कारकरेंबद्दल काढलेलं अत्यंत आक्षेपार्ह्य बोलणं, पंतप्रधानांची जात हे काही निवडणुकांचे मुद्दे होऊ शकत नाहीत. साधू संन्याशांचा, सर्वच धर्मातील कट्टरपंथीयांचा राजकारणातील वाढता वावर, स्त्रियांविषयीचा सर्वपक्षीय अनादर हे चिंता करण्यासारखे मुद्दे आहेतच. मला हे पटत नसल्याने, मी कायद्याने उपलब्ध करून दिलेल्या नोटा’ च्या सनदशीर मार्गाने जाण्याचं निश्चित केलेलं आहे. .

दुसरा विषय समाजात निर्माण झालेली अस्वस्थतता. समाजात कधी नव्हती एवढी अस्वस्थात सध्या अनुभवायला येत आहे. जातीवरून, धर्मावरून, खाण्याच्या पद्धतीवरून माणसा-माणसांमध्ये द्वेष भावना निर्माण झालेली अनुभवायला येते. अशी अस्वस्थात मी या पूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती. समाजमाध्यंमावर आपली मतं आजही मांडता येतात, परंतु आपली मत मांडली आणि ती प्रस्थापितांच्या विरुद्ध जाणारी असली, की त्या मतांचा प्रतिवाद मर्यादशील शब्दांत करण्याच्या भानगडीत न पडता, समाजमाध्यमातल्या विशिष्ट’ट्रोळ्या’ असंसदीय

भाषेत त्या मतांवर तुटून पडतात. देशद्रोही, कम्युनिस्ट, अर्बन नक्षल इत्यादी आरोप त्या वेगळी मतं मांडणाऱ्या व्यक्तीवर केले जातात. सध्या सत्तेवर असलेल्या पक्षापासून माझ्यासारख्या लोकांना दूर नेण्याचं महत्वाचं कार्य ह्या ‘ट्रोळ्या’ करत आहेत. मी ‘नोटा’ पर्याय स्वीकारण्यामागे हे देखील एक महत्वाचं कारण आहे.

मला अनेकजण ‘नोटा’ वापरण्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ऐवजी कुठल्यातरी इतर पक्षाला मत द्या, असा मित्रत्वाचा सल्लाही देत आहेत. परंतु मी जसा सध्याच्या सरकारवरच्या सध्याच्या धोरणांवर, वक्तव्यांवर नाराज आहे, तसाच मी इतर पक्षात माजलेल्या घराणेशाहीचाही विरोधक आहे, त्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचाही विरोधक आहे. जातीच्या, धर्माच्या आधारावर मतं मागणारांचा मला तिटकारा आहे. मी या पक्षांना मत द्यायचा कधीही विचार करू शकत नाही. अशा परिस्थितीत, मला ‘नोटा’ पर्याय वापरण्याखेरीज अन्य पर्याय असल्यास दाखवून द्यावं.

मला मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून भाजप समर्थक राहिलेलो आहे. तरीही वरील मुद्द्यानावर मी ठरवून ‘नोटा वापरणार आहे. मीच कशाला, माझ्या घरातली इतर तीन मतं, त्यातला एक नवं-मतदार, जो भारतीय सशस्त्र सेनादलात जाऊ इच्छितो आणि त्या दृष्टीने त्याची तयारीही सुरु आहे, तोही सध्याच्या प्रचारात सेनादलांच्या बलिदानाचा होणार दुरुपयोग पाहून, ‘नोटा’ला मतदान करणार आहे. ‘मला या लोकांनी चालवलेलं सैन्याची डिग्निटी घालवण्याचं काम मंजूर नाही’ हे त्याच मत आहे आणि माझा त्याला पाठिंबा आहे.

‘नोटा’ वापरून काय होणार, तुमचं मत फुकट जाणार असा सर्वांचाच सूर असतो. परंतु नोटा वापरून आपल्याला आपल्या आवडत्या किंवा सर्वच राजकीय पक्षांच्या न पटलेल्या ध्येय धोरणांचा निषेध व्यक्त करता येतो. मी ‘नोटा’ पर्याय वापरणार आहे, तो असा निषेध व्यक्त करण्यासाठीच. ‘नोटा’ वापरून काहीच होण्यासारखं नसेल, तर मग हा पर्याय उपयोगाचा नाही, असं काहीजण घसा फोडून का सांगतायत, ते ही लक्षात येत नाहीय.

‘नोटा’ची वाढती संख्या लोकांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीबदल किती अस्वस्थता आहे, हेच दाखवते. कालपर्यंत या पर्यायाचा फारसा काही उपयोग नाही असं काही जणांना वाटत होत, परंतु आज आणि उद्या मात्र ‘नोटा’ची दाखल सर्वानाच घ्याची लागणार आहे. या पुढच्या काळात ‘नोटा’ला दुर्लक्षून चालणार नाही. राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराच्या निवडीबाबत आणि स्वतःच्या ध्येय-धोरणांबाबत अधिक सतर्क रहावे लागणार आहे आणि मतदारही मतदान टाळण्यासाठी काही युक्तिवाद करू शकणार नाही. ‘नोटा’ मुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे अशी चिन्ह आहेत. शिवाय नकारात्मक मतदानाचा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीही उपयोग होणार आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे, असं मी समजतो

-नितीन साळुंखे

‪9321811091‬

20.04.2019

(या निवडणुकांच्या निनित्ताने गेल्याच तीन-चार महिन्यांत केलेल्या राजकीय लिखाणातला माझा हा शेवटचा लेख. या पुढचं माझं सर्व लेखन राजकारणविरहीत माझ्या आवडीच्या विषयांचं असेल)

‘नोटा’; लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..! – (पूर्वार्ध)

(पूर्वार्ध)

‘नोटा’; लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पांऊल..!

‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..! राजकीय पक्षांच्या मनमानीवर, ध्येयधोरणांवर आणि मुजोरीवर आळा घालून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कायद्याने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला हा एक सशक्त पर्याय आहे. ‘नोटा’ची ताकद काय आहे, याची चुणूक गतवर्षीच झालेल्या पांच राज्यांच्या निवडणूकांतून दिसून आलेली आहे. जनतेच्या हिताची धोरणं राबवण्यापासून ढळलेल्या सर्वच राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी ‘नोटा’ हे मतदारांच्या हाती कायद्याने दिलेलं एक प्रभावी अस्त्र आहे.

आपल्या बहुपक्षीय लोकशाहीत, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाने आपला एक उमेदवार दिलेला असतो. काहीजण अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवत असतात. पक्षाने कोणता उमेदवार द्यावा, यावर नागरीकांचं काही नियंत्रण मसतं. तरीही त्या त्या मतदारसंघात काम करणारा त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता, त्या त्या मतदारसंघात उमेदवार म्हणून द्यावा असा एक सभ्य संकेत असतो. बऱ्याचदा तो संकेत पाळलाही जातो. पण अलिकडे, कुठल्याही पक्षात कार्यकर्ता राहीलेला नाही, जे आहेत ते पेड वर्कर्स आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वच पक्षांना निवडणुकांच्या तोंडावर बाहेरून उमेदवार आयात करावे लागतात. उमेदवार आयात करताना, कोणताही पक्ष, त्या उमेदवाराची पात्रता पाहाण्यापेक्षा, साम-दाम-दंड-भेद आदी आयुध वापरून निवडून येण्याची क्षमता पाहिली जाते आणि मग एखाद्या मतदारसंघात असा बनेल माणूस आपल्याला उमेदवार म्हणून मिळतो. जो पक्ष निवडून येण्याची जास्त शक्यता असते, त्या पक्षाकडून आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी अशा व्यक्तींना भरपूर मागणी असते..

आपण आपल्या आवडत्या पक्षाने दिलेला उमेदवार कसाही असला तरी त्याला मत देतो. आपण त्या माणसाला मत देत असलो तरी, प्रत्यक्षात आपण त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या आवडत्या पक्षाला मत देत असतो. कोणताही पक्ष सत्तेवर येण्यासाठीच निवडणूक लढवत असतो आणि आपल्याला आवडत असलेला पक्ष सत्तेवर यावा म्हणूनही आपण मत देत असतो..! आपल्यापैकी सर्वचजण कुठल्या ना कुठल्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या आवडत्या आणि आपल्याला सत्तेवर यावा असं वाटत असलेल्या पक्षाला मतदान करत असतो.

मग मतदारांना ‘नोटा’चा पर्याय का उपलब्ध करुन द्यावा लागला, हा प्रश्न उरतो. त्याला कारण आहे, गेल्या काही वर्षांपासून मतदारांना गृहीत धरलं जाण्याची राजकीय पक्षांची बळावलेली प्रवृत्ती. एकदा का मतदारांनी एखाद्या व्यक्तीला आणि त्या माध्यमातून पक्षाला निवडून दिलं, की पुढची पांच वर्ष त्यांनी चालवलेला तमाशा निमूट बघत बसण्यापलिकडे मतदारांच्या हातात काहीच नसतं. राजकीय पक्षांच्या अशा प्रवृत्तीतून बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकारणाचं झालेलं टोकाचं गुन्हेगारीकरण, तत्वांशी घेतलेली फारकत, निष्ठेशी केलेली प्रतारणा या सर्व प्रकारांनी चिडलेल्या जनतेला आपला रोष व्यक्त करावासा वाटला, तर कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता. जनतेची ही कुचंबणा ओळखून एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, २३ सप्टेंबर २०१३ साली, मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असा निर्णय दिला आणि जनतेच्या हातात, ‘तुमच्यापैकी कुणीगी माझा देश चालवण्यास लायक नाहीत’, हे बजावून सांगण्याचा ‘नोटा’ हा एक प्रभावी पर्याय मिळाला..!

कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा नोटाचा वापर २०१३ मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता. यानंतर नोटाबद्दल लोकजागृती होऊन ‘नोटा’कडे अधिकाधिक मतदारांचा कल होऊ लागला आणि नोटाचा प्रभाव २०१७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. गुजरात विधानसभेच्या या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी (जवळपास दोन टक्के मतदारांनी) ‘नोटा’ हा पर्याय निवडला, ज्यातून आपली नाराजी व्यक्त केली आणि कोणत्याच राजकीय पक्षावर आपला विश्वास उरला नसल्याचे दाखवून दिले. या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आणि यात तब्बल ३० विधानसभा जागांच्या निकालांवर ‘नोटा’चा थेट परिणाम झाला. त्यानंतर झालेल्या २०१८ मधील कर्नाटक निवडणुकांतही मतदारांनी मोठ्याप्रमाणावर ‘नोटा’चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला. गत वर्षाच्या शेवटाला झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांतही लाखो मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांत ‘नोटा’ने अनपेक्षीतरित्या सत्ताबदल करुन निर्माण केलेली दहशत आपल्या सर्वांना माहित असेलच.

‘नोटा’ची सर्वात जास्त दहशत असते, ती सत्तेवर असलेल्या पक्षाला. कारण सत्तेवर येताना जी आश्वासनं जनतेला दिसेली असतात, त्या आश्वासनाचा पाच वर्षातील हिशोब देण्याची वेळ आता आलेली असते. ती आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत, असं जर जनतेला वाटलं किंवा दिलेल्या आश्वासनांपेक्षा भलतंच काही तरी होतंय असं जरी जनतेला वाटलं, तर एकतर ती विरोधी पक्षाला मतदान करण्याचा किंवा मग सरळ ‘नोटा’ वापरण्याचा विचार करते. अशावेळी सत्तेवर असलेल्या पक्षाचे पाठीराखे किंवा त्यांनी उपकृत केलेले त्यांचे पेड कार्यकर्ते, समाजमाध्यमांतून ‘नोटा’ला मत देणे म्हणजे मत वाया घालवणे येथपासून, ते ‘नोटा’ला मत देणारे देशद्रोही आहेत, अशा निखालस खोट्या बोबा मारत सुटतात आणि स्वत:चा उघडेपणा अधिक स्पष्टपणे दाखवत सुटतात. ‘नोटा’ पर्यायामूळे राजकीय पक्षांची आणि त्यांच्या लोंबत्यांची दुकानं आणि त्यांच्या खोटेपणाचा तमाशा बंद व्हायची पाळी आली असल्याने, हे लोक ‘नोटा’सारख्या संपूर्ण कायदेशीर पर्यायाला बदनाम करत सुटतात.

-©️नितीन साळुंखे

9321811091

19.04.2019

(उत्तरार्ध)

पण सत्ताधारी पक्षावर नाराज असणारे सरसकट सर्वच जण नोटा वापरतात का?

तर तसं नसतं.

तर मग ‘नोटा’ वापरणारे कोण असतात?

हे दोन दिवसांनी उत्तरार्धात वाचा..!!

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

इतिहासाच्या खांद्यावरचं वेडं वर्तमान..!!

काल बऱ्याच वर्षांनी मुंबई-गोवा रस्त्यावरून प्रवास केला. चार-पांच वर्षांपूर्वी या रस्त्यावरून अनेकदा प्रवास करत असे. तेंव्हा रस्त्याचं काम सुरु झालं होतं. सुरु झालं होतं म्हणजे पेपरमधे बातम्या वाचल्या होत्या. काही ठिकाणी, म्हणजे मुंबईच्या उंबऱ्यावरची रस्त्याच्या आजुबाजूच्या काही इमारती तोडलेल्या दिसतंही असत. रस्त्याला काही कळणारी आणि अनेक न कळणारी डायव्हर्जन्स काढली होती. सुखरुप प्रवासापेक्षा अपघाताचीच शक्यता जास्त होती. हे सर्व लक्षात घेता, कधी गांवी जायचंच झालं तर, पुणे-सातारा-कोल्हापूरमार्गे जाणं, थोडं लांबचं पडलं तरी, सोयीचं नि सुरक्षित होतं..!

काल मात्र अगदी ठरवून खालच्या रस्त्याने गेलो. अगदी अमुलाग्र बदल झालाय. ओळखीच्या खुणा अनोळखी झाल्यासारख्या वाटतायत. रस्ता पूर्ण व्हायला तरी आणखी दोनेक वर्ष तरी जातील, अजून रस्ता अगदी नजर लागेल आणि नजर ठरणारही नाही अशा पद्धतीने तयार होतोय. हे श्रेय नि:संशय श्री. नितीन गडकरींचं. गडकरी हे चवीने खाण्याचे शौकीन असल्याचं अनेकदा त्यांच्या मुलाखतीत ऐकलंय. ते त्यांच्या प्रकृतीतही दिसतं. ‘रस्ता’ आणि ‘पूल’ हे शब्द, रस्सा आणि पुलाव शब्दांशी साम्य राखणारे असल्याने असेल कदाचित, पण गडकरी यात कमालीचा रस घेतात आणि ते पूर्णब्रम्ह असल्यासारखे पूर्णही करतात, हा आजवरचा अनुभव आहे. मोदी सरकारच्या काळात देशात रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली किंवा सुरू आहेत हे मात्र खरंच आहे.

नवीन तयार होणारा चार लेनचा मुंबई-गोवा हायवे ही काही पूर्णपणे नवीन निर्मिती नाही. नवीन हायवे इतिहास बनण्याच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जुन्याच दोन लेनच्या हायवेच्या आधारानेच कात टाकतोय, त्यामुळे काही जुन्या खुणा अद्याप शिल्लक आहेत. फक्त त्या नवीन साज चढवून उभ्या असल्याने चटकन ओळखता येत नाहीत, एवढंच..! माझी इतिहासात रुची असल्याने, माझा अशा जुन्या खुणा शोधायची खोड आहे. कारण नवीन जे काही नव्या रुपात उभं असतं, ते त्या जुन्याच्या खांद्यावरच उभं राहात असतं. इतिहास असा सहजासहजी पुसता येत नसतो. थोडं शोधक नजरेने पाहिलं तर काही ओळखीच्या खुणा अजुनही शिल्लक असलेल्या दिसून येतात..

रस्त्याचा असो वा एखाद्या ठिकाणाचा किंवा अगदी एखाद्या व्यक्तीचाही, इतिहास पूर्णपणे खोडून काढता येत नाही, हे सत्य आहे. इतिहासाच्या खांद्यावर वर्तमान उभं असतं आणि ते भविष्याच्या दिशेने कुतुहलाने पाहात असतं. ‘विकासा’चंही तसंच असतं. विकास काही एका दिवसांत किंवा काही वर्षांत होत नाही. वर्तमानातला जो काही काळा-गोरा विकास दिसतोय, तो असाच त्याच्या इतिहासाच्या खांद्यावर उभा आहे. त्यामुळे आजची प्रगती छाती फुगवून सांगताना, गत काळात काहीच झालं नाही असं म्हणणं, खोटेपणाचं तर आहेच, परंतु कृतघ्नपणाचं जास्त आहे. नवीन बनत असलेला मुंबई-गोवा हाचवे असाच ७० वर्ष किंवा त्याहीपूर्वी इतिहासातील कुणी गरजूने तयार केलेल्या जुन्या रस्त्याचा आधार घेत आकाराला येत आहे..! नवीन असेल, तर त्याचं रुपडं..!!

तशीच विलक्षण सुधारणा रेल्वेतही दिसते. माझा संबंध उपनगरी रेल्वेशी जास्त आणि अगदी दैनंदिन येत असल्यामुळे, मला हा फरक नुसता दिसतोच असा नाही, तर अनुभवायलाही येतो. योगायोगाने आज १६ एप्रिल. बरोबर १६६ वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या १८५३ मधे आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली, ती अजुनही धावत आहे. आजची रेल्वे आणि सुरुवातीच्या काळातली रेल्वे यात जमीन अस्मानाचा फरक असला तरी, आजची रेल्वे त्याच ऐतिहासिक मार्गावरून धावत आहे. आजच्या रेल्वेत झालेल्या सुधारणा त्याच इतिहासातल्या, १६६ वर्षांपूर्वी इंग्रजांनी भारतात आणलेल्या फलाटांवर आणि रुळांवर झालेल्या आहेत, हे इतर सर्व विसरत असले तरी मला विसरता येत नाहीत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या, गत ७० (या अटल बिहारी वाजपेयींची ६ व मोदी सरकारची ३-४ वर्ष धरलेलेली आहेत) वर्षांतल्या प्रत्येक सरकारने आपापल्या कुवतीनुसार आणि वेगानुसार त्या सुधारण घडवत आणलेल्या आहेत. हे श्रेय सर्वांचं आहे. सध्याच्या सरकारचा सुधारणांचा वेग मोठा आहे, हे त्यांचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं आणि मोदी सरकारचं अभिनंदन करायला हवं. ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला द्यायलाच हवं. ते नाकारण्याचा कोतेपणा किंवा खोटेपणा करु मये असं मला वाटतं. आपल्याला सर्वात जास्त चीड कशाची यायला हवी, तर ती खोटेपणाची..!

दोन-तीन वर्षांपूर्वी एका कट्टर राष्ट्रवादी (काॅग्रेस नव्हे, तर राष्ट्रभक्त किंवा नुसतं भक्त ) विद्वानाने माझ्याशी चर्चा करताना, त्या काळची आठवण काढून ‘रेल्वे हिन्दूंनी आणली म्हणून आपण आज प्रगती करु शकलो’ असं सद्गदीत उद्गार काढलेले मला आठवतात. वर माझ्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह पाहून ‘त्या काळी ब्रिटिश हिन्दूस्थानवर राज्य करत असल्याने, ते हिन्दूच नव्हते काय’ असंही स्पष्टीकरण दिलं. ‘मग त्याच न्यायाने अनेक मुसलमान राजवटींनी शेकडो वर्ष हिन्दूस्थानवर काज्य केलं होतं, मग त्यांना हिन्दू का म्हणू नये’ असा प्रश्न त्यांना विचारण्याचं माझ्या ओठांवर आला होता, पण सोयिस्कर राष्ट्रवादावर वाद घालायचा नसतो, हे मला माहित असल्याने मी वाद घालायच्या भानगडीत पडलो नाही. भक्ती, मग ती कुणाचीही असो, काही काळाने ती आंधळी आणि बहिरीही होत असते..!

हा लेख मी दोन दिवसांपूर्वीच लिहून ठेवला आहे आणि पोस्ट करायची वाट पाहात होतो. वाट पाहात होतो, कारण सिंधुदुर्र्गातल्या माझ्या गांवी माझ्या मोबाईलला डिजिटल रेंज नव्हती. रेंज हवी असली तरी ७-८ किलोमिटरचा प्रवास करुन मला फोडा किंवा वैभववाडीत येणं भाग पडतं. डिजिटल इंडीया माझ्या खेड्यात त्या ताकदीनं अद्याप पोचलेला नाही, परंतु तो निश्चितच पोहोचेल. कारण ‘जीओ’च्या लायनी टाकायचं काम जोरात सुरू आहे. कुणाच्या का आरवण्याने पाहाट होत असेल, तर तिचं स्वागत करायला हवं. पण हे स्वागत करताना, ह्या डिजिटल युगाचा पाया, सर्वांचा विरोध पत्करुन माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींनी घातला होता, हे मला विसरता येत नाहीय..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

१६.०४.२०१९

वैभववाडी.

‘मनातलं काही’ – माझं ई-बुक

“ज्या जगात आपण जन्माला आलो आहोत त्या जगाकडे आणि त्यातल्या नानाविध व्ववहारांकडे डोळ्यांत अखंड कुतुहल ठेऊन जगणं म्हणजेच सुसंस्कृतपणानं जगणं..!”. पु.ल. देशपांडेंनी चेतना चिंतामणीचं जगणं म्हणजे काय, ते या एका वाक्यात सांगितलंय.

पुलंनी दाखवलेल्या चेतना चिंतामणीच्या गांवाच्या दिशेने चालताना, मला वाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भेटत गेलेल्या असंख्य अनामीक ‘ज्ञानेश्वरां’ना माझं हे पहिलं पुस्तक अर्पण..!

-नितीन साळुंखे

9321811091

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

पुन्हा एक आनंदाची बातमी..

माझे पहिलेच ईपुस्तक #मनातलं_काही हे BRONATO.com तर्फे किंडल वर प्रकाशित झाले आहे.

#ई_पुस्तकाची_लिंक:

हे ईपुस्तक वाचण्यासाठी आवश्यक बाबी-

१. किंडल App

२. ऍमेझॉन अकाउंट

कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी BRONATO प्रतिनिधीला 9970051413 वर संपर्क करा.

-नितीन साळुंखे

@BRONATO

_माझे_ ईपुस्तक प्रकाशक

आठवलेली आणखी एक गोष्ट-

आठवलेली आणखी एक गोष्ट-

असाच एक गांव असतो. त्यात एक मल्ल राहात असतो. गोष्टीत काही नेहेमीच आटपाट नगर आणि चक्रम राजाच असायला हवा असं काही नाही. तर, गांव आणि मल्लही असू शकतो. तसा या गांवात एक मल्ल आहे. मल्ल म्हणजे पेहेलवान.

ह्या मल्लाला आपल्या ताकदीचा प्रचंड अभिमान असतो. गेल्या काही वर्षात याने आपल्या ताकदीच्या जोरावर आजुबाजूच्या परिसरातल्या सर्वच मल्लांना स्पर्धेत हरवलेलं असतं आणि माझ्यासमोर एकही मल्ल टिकता कामा नये, असा पणच त्याने केलेला असतो. कुठेही स्पर्धा असली, की आपला लंगोट कसून हा धावलाच तिथे. काही अपवाद वगळता बहुतेक सर्व स्पर्धा याने जिंकलेल्या होत्या. हरलेल्या दोन-चार स्पर्धांही ‘पंचां’मुळे तो हरला असं आपलं त्याचं म्हणणं होतं. पण तो म्हणतो ते नाकारायची कुणाची बिशादच नव्हती. बरं, या स्पर्धा काही फक्त कुस्तीच्याच असायच्या असं नाही, तर ताकदीवर आधारीत कुठलीही स्पर्धा या नरसिंहाला चालायची. याला आता कुणी स्पर्धकच उरला नाही की काय, असं वाटायला लागावं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती खरी..!

अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार? पण त्या तोडण्यातही मजा शोधावी, असं आपल्या त्या गांववाल्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी केली स्पर्धा जाहीर. गांवची आपली एक तेवढीच करमणूक. ह्या स्पर्धेची मात्र एक अट असते, की हे झाड एका घावात तोडायचं. स्पर्धा जिंकणाराला भरघोस बक्षिस मिळणार असतं.

आपले पेहेलवान रेशमी लंगोट कसंत स्पर्धेच्या दिवशी त्या गांवात पोहोचतात. आणखीही स्पर्धक आलेले असतात. पण ह्याला पाहून आणि ह्याच्या ताकदीच्या कथा ऐकलेल्या असल्यामुळे, कुणीच ते झाड एका घावात तोडायला पुढे येत नाही. त्या सर्वांकडे तुच्छतेने पाहात, मांड्यां थोपटत (स्वत:च्याच), “माझ्यासमोर ताकद दाखवायची कुणाची हिंमत असेल तर त्याने पुढे यावं आणि ते झाड एका घावात तोडून दाखवावं”, असं तो मल्लेन्द मोठ्या गर्वाने गर्दीला आव्हान देतो..

एक कृश प्रकृतीचा, सदरा- लेंगा-गांधी टोपी परिधान केलेला गोरा मध्यमवयीन माणूस उठतो आणि त्याला ते झाड तोडायची संधी मिळावी, अशी विनंती तो ह्या मर्दाला करतो. त्याच्याकडे तुच्छतेने पाहात आपला मल्ल त्याला मोठ्या उदारपणे झाड तोडायची संधी देतो.

तो माणूस कुऱ्हाड उचलतो. झाडाभोवती प्रदक्षिणा घालून खोडाचं नीट निरिक्षण करतो. एका जागी थांबतो आणि अंगात असेल नसेल तेवढा जोर काढून खोडाच्या त्या जागेवर घांव घालतो. पण हाय रे दैवा, झाड काही तुटत नाही. तो निराश होऊन बाजुला जाऊन बसतो. मल्ल खीं खीं हसत त्याला खिजवायला सुरुवात करतो. पण तो माणूस शांत बसतो.

आपल्या मल्लाला चेव चढतो. ‘और कोई है माय का लाल’ असं तो त्या गर्दीला आव्हान देतो. ह्या मर्दाला आनंदाच्या वेळी राष्ट्रभाषेत बोलायची सवय असते. बराच वेळ कुणी उठत नाही. ह्या मर्दाची आधीच फुगलेली छाती गर्वाने आणखी फुगते. एवढ्यात आणखी एक माणूस हात वर करतो. गोरटेलासा, पातळ केसांचा, सौम्य-स्निग्ध चेहेऱ्याचा, मध्यमवर्गीय प्रकृतीचा हा माणूस पाहून ह्या माणसाला पाहून आपले मर्देश चेकाळतातच. “तो क्या तुम यह पेड एकही झटके मे तोडोगे’”, आपला मल्ल त्याला तुच्छतेने सवाल करतो. “हमने हात उपर किया हा नही था, किसीने पिछेसे मेरा हात पकड के उपर किया. हम इस पेड कटाईं के बारे मे कुछ नहा जानते हैं. हम तो यंहाॅ से गुजर रहे थे और ये मुकाबला देखने रुक गये थे”, असं तो म्हणू लागला. आपल्या मल्लाला वाटलं, की तो घाबरला म्हणून असं म्हणतोय. आता ह्या मल्लाला चेंव चढला. “बहाना मत बनाव”, मल्ल म्हणाला, “अब तुमको इस पेड पर घांव डालना ही पडेगा”. आता आपल्याला यात पडल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं म्हणत, तो माणूस कुऱ्हाड उचलतो, निशाणा साधतो आणि झाडावर घांव घालतो. पण झाड तिथेच.

आता मात्र आणखी कुणीही पुढे येत नाही. बराच वेळ जातो. कुणीही स्पर्धक पुढे येत नाही असं पाहून, शेवटी आजुबाजूला गर्वाने पाहात आपले मल्लेश्वर छाती पुढे काढून झाडाजवळ येतात. झाडाला वाकून नमस्कार करतात. कुऱ्हाड उचलतात, तेहेतीस कोटी देवांपैकी एका देवाचं नांव घेतात आणि घालतात घांव त्या वठलेल्या वृक्षाच्या खोडावर. त्या बरोबर झाड उजव्या बाजूला जाऊन कोसळतं.

मल्ल महाराज आजुबाजूला जमलेल्या गर्दीकडे मोठ्या अभिमानाने पाहातात. जे ही दोन माणसं करु शकली नाहीत, ते मी केलं अशी दर्पोक्ती करतात. लोकंही टाळ्या वाजवतात आणि त्याचा जयजयकार करतात. लोकांचं काय, कशालाही टाळ्या पिटतात.

आता बक्षिस समारंभाची वेळ येते. आता आपलंच नांव पुकारलं जाणार म्हणून मल्ल सावरून बसतो, तोच एक अनपेक्षित घटना घडते. स्पर्धेचा विजेता म्हणून तिनही स्पर्धकांना बक्षिस दिलं जातं. झाडावर शेवटचा घांव घातलेला मल्ल पहिला अचंबित होतोआणि मग चिडतो. ‘मी एका घावात झाड तोडलं असल्याने, ह्या बक्षिसावर माझाच हक्क आहे. ह्या दोन माणसांना संधी मिळूनही ते हे वठलेलं झाड तोडू शकले नाहीत. मी मात्र एका घावात हे झाड तोडलं. ह्या दोघांचा बक्षिसावर काहीच हकक नसताना, गांवाने ह्यांना बक्षिस दिलं हा माझ्यावर अन्याय आहे” असं म्हणत तो चिडून थयथयाट करु लागतो. वेड्यासारखं बरळू लागतो.

सरपंच शांत असतो. तो म्हणतो, “मल्ल महाराज, आपण एका घांवात हे झाड तोडलं हे खरंय. पण तुम्ही ते तोडू शकलात कारण, त्या दोघांनी प्रथम घातलेल्या घांवावरच तुम्ही तुमचा घांव घातलात. सर्वात महत्वाचा पहिला घांव होता, कारण तो घांव घालणाऱ्या त्या शहाण्या माणसाला, तो घांव नेमका कुठे घालायला हवा हे बरोबर माहित होतं, दुसऱ्याला काही माहित नसल्याने, त्याने पहिल्याच्या घावावरच घांव घातला आणि दोन नेमक्या जागेवरच्या घांवांनी कमकुवत झालेलं ते झाड, तुमच्या शेवटच्या घांवाने तुटलं. खरा बक्षिसपात्र तो पहिला इसम आहे. तो शांत आहे, कारण एका घांवात हे झाड तुटणार नाही याची त्यांला कल्पना होती आणि तुम्ही मात्र मीच सर्व केलं असं सांगत आहात. आमच्या गांवची जनता सुज्ञ आहे आणि आम्ही विचार करुनच तुम्हा सर्वांना श्रेय देण्याचं ठरवलं आहे”

आपल्या मल्लाला गांवच्या जनतेच्या वतीने सरपंचाने दिलेलं हे उत्तर पटलं की नाही ते माहित नाही.

गोष्ट तूर्तास समाप्त..!

-नितीन साळुंखे

9321811091

03.04.2019