बाळासाहेबांच्या त्या भेटीचा तो क्षण..

बाळासाहेबांच्या त्या भेटीचा तो क्षण..

सन २०१०च्या जानेवारीत बाळासाहेबांसोबत भेटीचा योग आला होता..हा फोटो त्या भेटीच्या वेळचा आहे. अर्थात मी बाळासाहेबांच्या भेट मागितली आणि ती मिळाली, अस काही घडायला मी काही मोठा नव्हतो. मी तर त्यांचा साधा शिवसैनिकही नव्हतो. परंतु काही गोष्टी घडण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि ते नशिब फळण्यासाठी योगही यावा लागतो. तसंच काहीसं या भेटीबाबत घडल. ही भेट घडली अगदी योगायोगाने आणि त्याला निमित्त होते माझे मित्र आणि कणकवलीचे तत्कालीन आमदार श्री. प्रमोद जठार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या २००९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत कणकवली मतदार संघातून मिळवलेला विजय. या विजयाची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो.

कणकवली मतदार संघ हा ओळखला जातो, तो महाराष्ट्राच्या राजकारणातल एक बड प्रस्थ श्री नारायण राणे यांचा म्हणून. तसाच या मतदार संघातील पूर्वीचा देवगड हा भाग, भाजपचा पारंपारीक मतदार संघ. देवगडचं प्रतिनिधित्व पूर्वी अप्पासाहेब गोगटे आणि नंतर श्री. अजित गोगटे या भाजपच्या नेत्यांनी केल असलं तरी, उभ्या महाराष्ट्रात हा मतदार संघ आणि हा मतदार संघ ज्या जिल्ह्यात येतो, तो सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो तो श्री. नारायण राणे यांचा म्हणूनच. श्री. जठार यांच्या पूर्वी या मतदारसंघाचं प्रतीनिधित्व भाजपच्याच श्री. अजित गोगटे यांच्याकडे होत. परंतु श्री. अजित गोगटे निवडून आले होते तेंव्हा शिवसेना आणि भाजप युती होती आणि नारायणरावही तेंव्हा शिवसेनेत होते.

सन २००५ मध्ये श्री. नारायण राणे यांनी कोन्ग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पुढे सिंधुदुर्ग आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्वच गणित बदलली. तशीच ती सिंधुदुर्गातही बदलली. सन २००९ साली झालेल्या निवडणुकीत नारायण राणेंच्या कणकवलीत राणेंच्या विरुद्ध उभं राहून विजय मिळवणं सोपं नव्हत. विजय सोडा, कणकवलीतून राणेच्या विरोधात उभं राहून राणेंना कशाला अंगावर घ्यायचं, या विचाराने अनेक इच्छुकांनी निवडणुकीला उभं राहण्याचा बेत मनातल्या मनात रिचवला होता. या पार्श्वभूमीवर राजकारणात एकदम नवखे असलेल्या श्री. प्रमोद जठाराना भाजपने तिकीट देऊ केलं आणि या पूर्वी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणूक न लढवलेल्या, परंतु लालबागचं नडू रक्त अंगात खेळवणाऱ्या जाठारानीही हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं. कणकवली मतदार संघातून तेंव्हा कोन्ग्रेसतर्फे ठाण्याच्या श्री. रवींद्र फाटकांना तिकीट मिळालेले होते. कणकवली मतदार संघाची ख्याती अशी, की इथे श्री. नारायण राणेंच्या नांवाने धोंडा जरी उभा केला तरी तो निवडून येणार. इथे तर श्री. रवींद्र फाटकासारखा मुंबईचा बडा नेता उभा राहिला होता. जठारांचा पराभव पक्का, याच गुर्मीत सगळे वावरत असताना निवडणुकांचा रिझल्ट लागला आणि श्री. प्रमोद जठार अवघ्या ३४ मतांनी या मतदारसंघातून विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं. श्री. नारायण राणेंनी हा पराभव हलक्यात घेतला नाही. वारंवार पुनर्मोजणी केली गेली. शेवटी सायंकाळी पांच-साडेपांचच्या दरम्यान अंतिम निर्णय जाहीर करून श्री. प्रमोद जठार यांना कणकवली मतदार संघातून विजयी घोषित करण्यात आलं. सर्वात कमी मतांनी विजय मिळाला असला तरी मतमोजणीसाठी सर्वात जास्त वेळ लागलेला हा मतदारसंघ आणि श्री. जठारांचा हा विजय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमचा नोंदला गेला.

भाजपच्या श्री. प्रमोद जठार यांनी २००९च्या विधानसभा निवडणूकीत कणकवलीत मिळवलेला विजय, या माझ्या भेटीच्या मागे आहे. त्याचं झालं असं, की या विजयानंतर दोनेक महिन्यांत श्री. जठाराना ‘मातोश्री’वरून, बाळासाहेब त्यांना भेटू इच्छितात, असं कळवणारा फोन आला आणि सांगितलं गेलं, की तुम्ही कधी येणार हे कळवावं. त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं, की बाळासाहेबांची प्रकृती बरी नसल्याने ते जास्तीजास्त ५ मिनिट भेटू शकतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने, सोबत कोण येणार त्यांची नावं कळवावी असंही सांगण्यात आलं. आता मला तारीख नक्की आठवत नाही, परंतु २०१०च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्री. व सौ. जठार आणि त्यांच्यासोबत आम्ही चार-पांचजण असे ‘मातोश्री’वर भेटीला येतो असं आम्ही कळवलं.

अखेर तो दिवस उजाडला. आम्ही सायंकाळी सहाच्या सुमारास आम्ही ‘मातोश्री’वर पोहोचलो, प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आम्हाला पुन्हा सूचना देण्यात आली, की आपली भेट फक्त पाच मिनिटांची आहे आणि बाळासाहेबना प्रकृतीचा त्रास होत असल्याने फार बोलू नका. आम्हाला बोलणं तर लांबचं होतं, बाळासाहेबांच अगदी जवळून दर्शन झाल तरी खूप होत. नंतर आम्हाला बाळासाहेबांच्या, मला वाटतं, दुसऱ्या मजल्यावरील खोलीपाशी घेऊन जाण्यात आल आणि आम्ही आत प्रवेश करताच समोरच बाळासाहेबांच्या कृश परंतु अत्यंत तेजस्वी कुडीच साक्षात दर्शन घडलं. आम्ही पाहतोय ते स्वप्ंन की खरं, हेच कळेना. काय बोलावं किंवा काय करावं हे ही सुचेना. आम्हा सर्वांची हीच परिस्थिती. आम्हाला भानावर आणत बाळासाहेबांनी हातानेच आम्हाला बसायला सांगितलं. श्री. प्रमोद जठाराना जवळ बोलावलं, त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि बाळासाहेबांच्या त्या कृश कुडीतून आलेल्या त्याच त्यांच्या चीरपरिचित धारदार आवाजात बाळासाहेबांनी उद्गार काढले, ‘पोरा, तू करून दाखवलस, माझ स्वप्न पूर्ण केलंस’..!

श्री नारायण राणेच्या कणकवली मतदारसंघातून श्री. प्रमोद जठारांनी मिळवलेला विजय भाजपच्या नेत्यांना तर सुखावून गेलाच होता, पण त्याहीपेक्षा त्या विजयाचा बाळासाहेबांना झालेला आनंद कैक पटीने जास्त होता, हे आम्हाला जाणवून गेलं. श्री. जठारांनी प्रत्यक्ष राणेंना हरवलं नसलं, तरी ‘कणकवली जठारांची’ अशी बाळासाहेबांना सुखावणारी नविन ओळख जठारामुळ् कणकवलीला मिळाल्याचा तो आनंद होता.

श्री. नारायण राणेंच शिवसेनेतून जाणं बाळासाहेबांन खूप लागलं होत असा त्याचा अर्थ..आणि म्हणून त्यांना झालेला आनंद त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून जाणवत होता..

श्री. प्रमोद जठारांसोबत त्या क्षणाला मी व आणखी चार-पाचजणं होतो. सर्वांनी बाळासाहेबांना वाकून नमस्कार केला. सर्वांनाच एकएक करून काही क्षण बाळासाहेबांनी त्यांच्या त्या खुर्चीच्या शेजारी बसवून घेतलं. आम्हा प्रत्येकाच्या पाठीवर मायेने हात फिरवून आम्हा सर्वांची चौकशी केली, आशीर्वाद दिला. आमची पाच मिनिटांची ठरलेली भेट पाऊण तासावर कधी गेली, हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही घड्याळाकडे लक्ष देत आवरतं घेत होतो, पण साहेबांनी आग्रह करून बसवून घेतलं. वर, ‘डॉक्टरांना काय कळतंय, आज माझ आयुष्य काही काळासाठी वाढल’, असही ते मिश्कील हसत म्हणले. श्री. राज ठाकरेंनी तयार केलेली बाळासाहेबांची ‘फोटोबायोग्राफी’ आणि आणखी काही पुस्तक या प्रसंगी आम्हाला भेट म्हणूनही दिली..या भेटाप्रसंही बाळासाहेबांच्या स्नुषा सौ रश्मी ठाकरे, स्वीय सहाय्यक, बहुतेक म्हात्रे असावेत आणि त्यांचा तो प्रसिद्ध नेपाळी सेवक हजर होते.

आज या घटनेला नऊ वर्ष झाली. माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. वरच्या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्तींच्या आणि माझ्या संबंधातही जाणवण्याइतका वेगळेपणा आला. असं असलं तरी माझ्या आयुष्यातला बाळालाहेबांसोबतचा तो पाउण तास मला कधीही विसरता आलेला नाही. विसरणं शक्यही नाही.

आज रविवार दि.१७ नोव्हेंबर २०१९.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनाम्मित्त तो सुवर्णक्षण पुन्हा जगावासा वाटला..

हा फोटो त्या सुवर्ण क्षणाचा आहे..! हा क्षण टिपलाय त्या प्रसंगी हजर असलेला आमचा फोटोग्राफर मित्र व बाळासाहेबांच्या अगदी जवळचा असलेल्या बाळा तुळसकरांनी..

-नितिन साळुंखे

9321811091