सन १८९६ मधे मुंबईत पसरलेली प्लेगची साथ आणि आताचा ‘कोरोना’

सन १८९६ मधे मुंबईत पसरलेली प्लेगची साथ आणि आताचा ‘कोरोना’

इसवी सनाच्या १८९६च्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिण्यापासून मुंबईत प्लेगची साथ पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळच्या सरकारने आता सारखंच लाॅक डाऊन, आयसोलेशने, क्वारंटाईन इत्यादी उपाय योजले होते आणि ते सक्तीने अमलातही आणले होते. त्यावेळच्या सरकारने लोकांना थाळ्या-टाळ्या नि पणत्या-मेणबत्त्या पेटवायला सांगितलं होतं की नाही, ते मात्र त्यावेळच्यी बातम्यांतून दिसलं नाही.

त्या काळात या साथीत मरणाऱ्या माणसांचा वेग एवढा भयानक होता की, आठवड्याला सरासरी २००० माणसं मरत होती. घरातल्या मेलेल्या एका माणसाला सरणावर जाळून परत येतायत तोवर, त्याच घरातलं दुसरं मयत तयारच असायचं, इतकं मरण या काळात फोफावलं होतं.  मरणाचं कुणाला काही वाटेनासंच झालं होतं. माणसांनी संवेदना हरवल्या होत्या आणि ते सहाजिकच होतं..स्मशानांना उसंत नव्हती. रोजच्या, सरणाच्या भट्ट्या २४ तास पेटत्या होत्या. नव्हे, दर तासा मिनिटाच्या मरणाला कोण रडणार. लाकडं जाळावीत तशी आणि त्याच संवेदनशुन्यतेने माणसं जाळली जात होती..! अश्रू सुकले होते.  माणसाचं मढं आणि सरणावर जळू पाहणार लाकूड, जणू एकंच झालं होत. त्यामानाने आता खूप बर आहे. ‘कोरोनाने मारण्याचं प्रमाण खूप कमीआहे. इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन वाहिन्यांच्या निर्बुद्ध आणि संवेदनाशून्य बातम्या ऐकून, धक्क्याने मारणारी संख्या कदाचित जास्त असेल. 

ह्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर्सही बळी  पडत होते. सोबत दिलेल्या एका बातमीत डॉक्टर नॅन्सन नावाचे एक प्रमुख डॉक्टर प्लेगमुळे मृत्युमुखी पडल्याचं म्हटलं आहे. 

त्यावेळीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वाना मुंबईबाहेर पळायची आतासारखीच घाई लागली होती. प्लेगच्या साथीतून वाचण्यासाठी मुंबईतले गिरणी कामगार नोकऱ्या सोडून आपापल्या गावी, आपाल्या प्रांतात चालले होते (गांववालेही त्यांचं स्वागतच करत होते. गावाकडे माणुसकी शिल्लक असल्याने, आतासारखी ‘गांवबंदी’ तेंव्हा घातली गेली नव्हती). कामगारांअभावी गिरण्या बंद पडत चालल्या होत्या. मुंबईतल्या जवळपास ७५ टक्के गिरण्या ह्या काळात बंद पडल्या होत्या. मग गिरणी मालकांनी कामगारांना प्रलोभन (आणि गरज) म्हणून रोजचा पगार रोख द्यायची तयारी दर्शवली होती, जेणे करुन कामगारांनी इथेच थांबावं आणि त्यांचं घरही चालावं. तरीही कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतं.

जवळपास ३,२५,००० माणसांनी तेंव्हा मुंबई सोडली होती. असं सोबतच्या एका बातमीतून लक्षात येईल. त्याकाळातली मुंबईची लोकसंख्या २०-२५ लाख असावी आणि ती पाहता, हा आकडा खूपच मोठा होता. आताच्या ‘कोरोना’च्या साथीतही असं काही तरी करावं, असं खाजगी कारखानदारांना, उद्योग-धंद्यांच्या मालकांना आणि विविध प्रकारची पॅकेज देऊ करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारांनाही का सुचू नये, याचं आश्चर्य वाटतं..! हा उपाय करुन पाहायला हवा होता. निदान काही लोक तरी मुंबई सोडून जायचे थांबले असते.

मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात उद्भवलेली ही साथ पुढे पुणे आणि कराची पर्यंत कशी पसरत गेली, त्याचीही बातमी तुम्हाला सोबत दिसेल. 

आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पुढचा बराच काळ आपल्याला कोरोनासोबतच जगायचं असल्याचं अनेक तज्ज्ञ आपल्याला सांगत आहेत आणि ते खरंही आहे. अगदी अशीच भावना १८९६-१९०० पर्यंत मुंबई आणि देशात धुमाकूळ घातलेल्या प्लेगबाबतही होती. सोबतच्या एका बातमीत तसं स्पष्ट म्हटलेलं दिसतंय. ही  बातमी आहे २९ नोव्हेम्बर १९०२ची. ‘The plague in Bambay is now being treated as Permanent Disease.’ असं म्हटल्याचं ह्या बातमीत दिसेल. प्लेग आपल्याबरोबर कायम राहील असं जे १९०२ सालात म्हटलं गेलं होत, ते आता पर्यंत कितपत खरं ठरलंय, हे तुमचं तुम्ही ठरवा. 

असंच कोरोनासंबंधीही होईल. कोरोनाची आपल्याला सवय होईल आणि त्याच्यासोबत जगायला पण शिकू;कीं  बहुना आपण त्याला आपल्यासोबत जगायला शिकवू, हा आशावाद कायम बाळगा. योग्य ती काळजी घ्या आणि टीव्हीवरच्या बातम्या पाहायचं टाळा. विशेषतः मराठी. हिंदी बातम्याही टाळल्यास उत्तम, त्यामुळे हिंदू-मुसलमानात द्वेषाचा व्हायरस पसरण्यास अटकाव होईल. अर्थात १८९६च्या प्लेगच्या काळात हिंदू-मुसलमान व्हायरस अजिबात पसरला नव्हता आणि हे श्रेय त्यावेळच्या ‘जुलमी’ ब्रिटिश सरकारचं.  

ह्या लेखाचा उद्देश शंभर -सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो काळ आणि आताच काळ यातला (फारसा पडलेला नसलेला) फरक दाखवून देण्याचा आहे. 

#सोबत नमुन्यादाखल दिलेल्या बातम्यांचा कालावधी जानेवारी १८९७ ते १९०२च्या दरम्यानचा आहे आणि शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या सदर बातम्या मला मिळवून देण्याचं श्रेय माझा कोल्हापूर निवासी मित्र भरत महारुगडे याच आहे. 

-©️नितीन साळुंखे

9321811091

12.05.2020

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s